(७ मे, १८८० ते १८ एप्रिल, १९७२)
*अथातो धर्मशास्त्रेतिहासस्य जिज्ञासा।*
ईश्वरीय अशा आर्यसनातन वैदिक हिंदुधर्मशास्त्राचा सारगर्भित, सप्रमाण नि साधार इतिहास अध्ययन करणे हे येरागबाळ्याचे काम तर नोव्हेंच. पण त्यातही तो समग्र इतिहास शब्दबद्ध करणे हे तर त्याहूनही अत्यंत दुष्कर कार्य. हा सर्व इतिहास आपल्या विचक्षण विवेचनाने शब्दबद्ध करणाऱ्या एका विद्वद्वर्य्याची आज जयंती.
*एक प्रखर धर्मसुधारक*
*अस्पृश्यता-केशवपनादि विकृत नि वेदविरुद्ध प्रथांवर कोरडे ओढणारा हा धर्मशास्त्रज्ञ महाराष्ट्रांत जन्माला आला हे आमचं भाग्य. विधवाविवाह नि विवाहविच्छेद(घटस्फोट) आदिंना धर्मशास्त्रीय प्रमाणांतून समर्थन करणारा हा धर्मसुधारक. इतकंच काय पण आमच्या भूवैकुंठ पंढरीत एका सकेशा विधवेच्या श्रीविठ्ठलपूजेच्या अधिकार प्राप्तीसाठी तिचे विधीज्ञपत्र घेणारा हा विधीज्ञ. आंतरज्ञातीय विवाहाचाही पुरस्कर्ता. लोणावळा येथे मीमांसातज्ञ श्री केवलानंद सरस्वती यांनी श्रीरघुनाथशास्त्री कोकजे, मम. श्रीधरशास्त्री पाठक आदि अनेक मान्यवरांच्या आधारे स्थापन केलेल्या धर्मनिर्णयमंडळाचाही सक्रिय पुरस्कर्ता...*
जरी ते धर्मसुधारक असले तरी आजच्या कथित धर्मसुधारकांसारखे धर्मविध्वंसक खचितंच नव्हते. त्यांचे एक महत्वाचे मत आह्मीं लेखाच्या अंती दिले आहे तें वाचावें.
*भारतरत्न श्रीकाणेंचे Magnum-Opus*
*History of Dharmashastra - Five Volumes - Seven Parts*
मुळ आंग्ल भाषेतले विचारधन - एकुण पृष्ठसंख्या ६४२७ - प्रथमावृत्ती
साडे-सहा सहस्त्र पृष्ठांचे हे मुळ आंग्ल साहित्य हे पुण्याच्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने सहा दशकांपूर्वीच प्रकाशित केलेलं आहे. सुदैवाने ते सर्व खंड आज पीडीएफ स्वरुपात www.archive.org ह्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ह्याचा हिंदी अनुवाद उत्तर प्रदेश हिंदी संस्थानाने पाच खंडात प्रकाशित केला असून तो आमच्या संग्रही आहे. मराठीतही यशवंत आबाजी भटांनी तो अनुवादित केला असून अगदी संक्षेपांत दोन खंडांमध्ये राज्य सरकारने प्रकाशित केला आहे. तो अनुवाद खरंतर पूर्ण प्रकाशित होणार होता पण संक्षेपातंच झाला. तोही संग्रही आहे. पीडीएफ आहेतंच. जिज्ञासूंनी ते अवश्य संग्राह्य करावेत.
हिंदुधर्मशास्त्राचा एवढा सखोल अभ्यास करून त्याची सविस्तर मांडणी करणारा पुरुष हा विरळाच ! काणेंचे हे कर्तृत्व अलौकिकंच म्हणून की काय भारत सरकारने त्यांना "महामहोपाध्याय व भारतरत्न" ह्या सर्वोच्च सन्मानाने संबोधित केलं होतं.
अर्थात ह्या पंचखंडात्मक ग्रंथामध्ये काणेंनी केलेला धर्मग्रंथांचा कालनिर्णय मात्र त्यांनीच प्रामाणिकपणे तो अंतिम प्रमाण मानु नये असे लिहिल्याने तो स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे.
*या खंडांविषयी काही विवेचन*
खरंतर हा स्वतंत्र लेखनाचा विषय असला तरी काही गोष्टींचा निर्देश अगदी संक्षेपाने करणं क्रमप्राप्त आहे.
*काणेंनी आपला परिचय पांचव्या खंडाच्या द्वितीय भागामध्ये दिलेला आहे, तो वाचण्यासारखा आहे. ह्याच पांचव्या खंडामध्ये बौद्धधम्माच्या किंवा पंथाच्या भारतातून नाहीसे होण्यामागच्या कारणांची जी मीमांसा त्यांनी केली आहे, ती फारंच चिंतनीय आहे. कारण ब्रिटीश नि वामपंथी म्हणजे डाव्या इतिहासकारांनी बौद्धविरुद्ध हिंदु संघर्ष पेटविण्यासाठी इतिहासाचे जे विकृत चित्र उभे केले आहे, त्याची साधार समीक्षा श्रीकाणेंनी केलेली आहे, जी वाचायलाच हवी. अधिक संदर्भ अर्थात हेमचंद्र रायचौधरींच्या पॉलिटिकल हिस्टरी ऑफ इंडिया मध्ये विस्ताराने आहेत, तिथे वाचावेत. तृतीय खंडात त्यांनी केलेल्या हिंदुंच्या प्राचीन आहारपद्धतीविषयीचे विवेचन काहीसं अमान्य आहे म्हणूनंच त्यांच्या मधुपर्काविषयीच्या लेखनाची समीक्षा आह्मीं आमच्या मधुपर्कावरील लेखांत स्वतंत्रपणे केली आहे, त्यांच्याविषयी पूर्ण आदर ठेऊनंच. पांचव्या खंडातंच त्यांनी हिंदुस्थानांतील धर्मस्थळांची जी माहिती दिली आहे, त्यांत आमच्या पंढरीविषयीचे विवेचन फार उत्तम आहे. विठ्ठलमूर्तीवरील आक्षेपांचे खंडनही चिंतनीय आहे. इतर खंडांमध्ये त्यांनी पुराणांचा केलेला समन्वयही अभ्यसनीय आहे.*
विस्ताराने ह्या सर्व खंडांवरील परिचयात्मक लेखमाला वेळ मिळाल्यांस आह्मीं भविष्यांत कधीतरी लिहुच.
ह्याबरोबरंच काणेंनी इतरही विपुल ग्रंथसंपदा निर्माण केलीच केली, जिची विकीपीडियावर माहिती आहेच. विशेषतः संस्कृत काव्यशास्त्रांवरचा त्यांचा ग्रंथ फार चिंतनीय आहे. पाश्चात्यांनी घेतलेल्या आक्षेपांचे सप्रमाण खंडन काणेंच्या तर्कशुद्ध नि प्रत्युत्पन्न मतीचं प्रदर्शक आहे.
*जाता जाता...*
हिस्टरी ओफ धर्मशास्त्राच्या प्रस्तावनेत काणेंनी अतिशय सूचक व मार्मिक वक्तव्य केले आहे, जे चिंतनीय आहे. ते म्हणतात. 👇
आदरणीय काणेंची प्रस्तावना - मुळ आंग्ल खंड द्वितीय - दिनांक १५ मे, १९४१
*"धर्मशास्त्राच्या विशिष्ट विषयांचे प्रतिपादन करणारी उत्कृष्ट पुस्तके प्रख्यात विद्वानांनी जगाला सादर केली आहेत. तथापि, माझ्या माहितीप्रमाणे कोणत्याही एका लेखकाने समग्र धर्मशास्त्राची चिकीत्सा करण्याचा आत्तापर्यंत प्रयत्न केलेला नाही. त्या दृष्टीने हा ग्रंथ त्या विषयांवरील अग्रेसर ग्रंथाच्या स्वरुपाचा आहे. अनेक युरोपियन आणि भारतीय ग्रंथकारांची अशी रूढी पडून गेली आहे की भारताला सांप्रतकाळी पीडा देणाऱ्या बहुतेक अनिष्ट गोष्टी जातीव्यवस्था आणि धर्मशास्त्रात वर्णन केलेला जीवनक्रम ह्याच्यामुळे उत्पन्न झाल्या असल्याचे प्रदिपादन करावयाचे. बऱ्याच प्रमाणात मला हे मत मान्य नाही. मी असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की मनुष्याचा स्वभाव महत्त्वाच्या बाबतीत सर्व जगभर एकसारखाच असल्याकारणाने भारतात उत्पन्न झालेल्या प्रकारच्याच अनिष्ट प्रवृती आणि अनिष्ट गोष्टी सर्वही देशात उत्पन्न होत असतात आणि त्या देशात जातिव्यवस्था अस्तित्वात असली अथवा नसली तरीही तेथील मूळच्या उपयुक्त संस्थांची कालांतराने भारतातल्याप्रमाणेच अनिष्ट अशी रुपांतरे होतात. जातिनिर्बंधामुळे काही विशिष्ट अनिष्ट परिणाम झाले आहेत ही गोष्ट मला मान्य केली पाहिजे; परंतु जातिव्यवस्था ही एकंच बाब अशा स्वरूपाची नाही. कोणतीही समाजव्यवस्था पूर्णत्वाला पोचलेली नसते आणि अशा अनिष्ट परिणामापासून सुरक्षितही नसते. मी स्वत: जरी ब्राह्मणप्रमुख अशा समाजात वाढलो असलो तरी विद्वान लोक एवढे मान्य करतील की मी सर्व प्रश्नांच्या साधक आणि बाधक अशा दोन्हीही बाजु मांडल्या असून नि:पक्षपातीपणाने प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे."*
काणेंचे हे शब्द अत्यंत सूचक आहेत.
ते राज्यभेचे सदस्यही होते.
अशा विद्वत्तेच्या महासागरांस आज जयंतीनिमित्त साष्टाङ्ग प्रणाम...!
Pakhandkhandinee.blogspot.com
#भारतरत्न_महामहोपाध्याय_श्रीपांडुरंग_वामन_काणे_धर्मशास्त्राचा_इतिहास_अस्पृश्यता_केशवपन_विधवाविवाह
No comments:
Post a Comment