ग्रंथलेखक - श्री. अनंत दामोदर आठवले (संन्यासोत्तर स्वामी वरदानंद भारती)
तं कालं विपश्चितः कवयः आरोहन्ति।
अथर्ववेद - १९।५३।१
काय लिहावं नि लिहु नये असा विषय आज उपस्थित झाला आहे. गेली पाच सहा दिवस ह्याच मनःस्थितीत आहे. कारण ज्याच्याविषयी लिहायचंय, त्याच्याविषयी लिहिण्यांस कविकुलगुरुचीही प्रतिभा थिटी पडेल. 'यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह' हे वचन त्यालाच लागु पडतं. म्हणूनंच मूळ ग्रंथलेखकाने ज्या कैवल्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांचा संदर्भ देत
राजहंसाचे चालणें। भूतली जाहलीया शहाणे। आणिक काय कोणें। चालवेचिं ना।
असे म्हटले आहे, तेच शिरोधार्य मानून हा अनुभवप्रपंच करत आहे.
तीन वर्षांपूर्वी अगदी कालच्याच दिवशी म्हणजे २९ जुलै २०१८ ला हा ग्रंथ आमच्या पराग महाराज चातुर्मास्येंबरोबर पूज्यनीय अप्पांची ग्रंथसंपदा क्रय करताना हातीं आला होता. तरी त्यावेळी काही वाचणं झालं नव्हतं. पण मागच्या महिन्यांत आमचे गुरुबंधु वै. वाना महाराजांचे चिरंजीव श्री. ऋषिकेशजी उत्पात, श्री. श्रीकांत महाराज हरिदास ह्यांच्याशी संवाद करताना पूज्यनीय अप्पांच्या ह्या ग्रंथश्रेष्ठाचा विषय झाला नि ह्याचे चिंतन करायचं ठरलं. प्रत्यही सायंकाळी १० ते ११ या वेळेत एक तास ह्या सद्ग्रंथाचे पठण नि आवश्यक तिथे विवेचन आह्मीं आरंभ केलं. २९ जुनला हा वाग्यज्ञ आरंभ झाला नि २५ जुलैला सायंकाळी हा ग्रंथ संपला. त्याचाच हा वृत्तांत...
खरंतर ग्रंथपरिचय असा स्वतंत्र लिहावा लागेल किंवा त्यावर लाईव्ह यावं लागेल. पण तूर्तास अन्य कार्य असल्याने विस्तारभयास्तव केवळ या लेखामध्येच काही अनुभव कथनाचा हेतु आहे...
भगवान श्रीकृष्णाविषयी आजपर्यंत अनेकांनी अनेकप्रकारे लिहिलं आहे. त्याला पूर्ण पुरुषोत्तम जरी सर्व जाणत असले, तरी त्याची तशी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने यथार्थ मांडणी मात्र कुणी केल्याचे फारसं दिसत नाही, कारण बव्हतांश लोकांनी त्याला ईश्वरी अवतार व त्यातही केवळ भक्तकामकल्पद्रुम असाच मानल्याने व दुर्दैवाने काही स्थानी केवळ रासक्रीडेपूरताच किंवा त्यांच्या बाललीलांपूरताच त्यांस मर्यादित केल्याने केवळ भक्तीपंथापूरताच तो चिंतनीय राहिला. परंतु श्रीमन्महाभारतामध्ये आलेली त्यांची पुरुषश्रेष्ठत्वाची वास्तववादी भूमिका मांडण्यांत मात्र कुणी प्रयत्न केल्याचा दिसत नाही. महामहोपाध्याय श्रीबाळशास्त्री हरदासांनी 'भगवान श्रीकृष्ण'च्या माध्यमांतून केलेला प्रयत्न काहीसा स्तुत्य अवश्य आहे व चिंतनीयही आहे. पण प्रस्तुत लेखकाने अर्थात पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींनी केलेला प्रयत्न मात्र एकमेवाद्वितीय असाच म्हणावा लागेल. आमच्या अल्पाध्ययनाप्रमाणे...
व्यक्तिनिर्माता नि राष्ट्रनिर्माता भगवान श्रीकृष्ण
व्यष्टी नि समष्टीचाच सतत विचार करणारा नि धर्मसंस्थापनेसाठी जीवनसर्वस्व पणांस लावणारा नि ह्या सर्वासाठी स्वतःचे व्यक्तिमत्व आधी घडविणारा नि त्यातून इतरांना घडविणारा व एकुणंच व्यावहारिक पातळीवर धर्मसंस्थापनेसाठी मनुष्यनिर्माण नि राष्ट्रपुनरुत्थानाचा संकल्पसिद्ध आचरणकर्ता असा हा भगवान श्रीकृष्ण जो योगेश्वर म्हणून गणला गेला, त्याचे हे अत्यंत अभिनव नि तत्वार्थद्रष्टं असे स्वरुप पूज्यनीय श्रीअप्पांनी ज्या प्रकारे मांडलं आहे, ते पाहून त्यांच्या अफाट नि अचाट अशा तर्कशुद्ध नि प्रत्युत्पन्न मतीच्या वैभवाची साक्ष तर पटतेच पण ह्या पुरुषश्रेष्ठाविषयीचा आपला आदर केवळ दुणावतोच असे नव्हे तर तो सर्वोच्च शिखरांवर जाऊन पोहोचतो.
ग्रंथनिर्मितीचा हेतु अर्थात उपक्रमाच्या दृष्टीने विचार करता प्रत्यक्ष लेखकानेच म्हटल्याप्रमाणे
"महर्षी व्यासांच्या अलौकिक प्रज्ञेविषयी नितांत आदर बाळगूनही असे म्हणावे लागते की काही वेळा तरी श्रीकृष्णाचे वर्णन करताना व्यासमहर्षींची दिव्य प्रतिभाही स्तिमित झाली आहे. भगवान श्रीकृष्ण हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. हे रत्न इतके तेजस्वी आहे, त्याला इतक्या विविध प्रकारचे पैलू आहेत की त्या सगळ्यांचे यथार्थ आकलन करण्याकरिता व्यास-वाल्मिकिंच्याच तोडीची योग्यता असेल तरच काहीसे साधेल. नाहीतर काजव्याने सूर्याची तेजस्विता मोजण्यास जावे तसे होईल."
पण असे असूनही लेखकानेच म्हटल्याप्रमाणे
"भक्तांचा श्रीकृष्ण, तत्वज्ञानी श्रीकृष्ण, योगेश्वर श्रीकृष्ण, सर्वस्वाच्या त्यागाची प्रेरणा देणारा श्रीकृष्ण, कर्माकर्माची यथार्थ मीमांसा करणारा श्रीकृष्ण, कर्तव्याचे योग्य ते प्रबोधन करणारा श्रीकृष्ण हे जसे श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्त्वाचे तेजस्वी असे अनेक पैलू आहेत, त्याचप्रमाणे धर्मसंस्थापनेसाठी, सज्जनांच्या संरक्षणासाठी, प्रत्येक प्रसंगी अत्यंत सावध राहणारा, चातुर्याने, कौशल्याने निर्णय घेणारा आणि दुष्ट नराधमांच्या केवळ स्वार्थीपणाने प्रेरित झालेल्या आशाकांक्षावर, त्यादिशेने घडणाऱ्या प्रयत्नांवर पाणी ओतून त्यांच्या पदरी अपयश बांधणारा राजकारणी श्रीकृष्ण हेही श्रीकृष्णाच्या दिव्योदात्त व्यक्तिमत्वाचे एक दैदिप्यमान अंग आहे. श्रीकृष्णाचे हेच राष्ट्रसंरक्षक समाजोद्धारक वैशिष्ट्य आपणापुढे यथामती मांडावे अशी माझी इच्छा आहे."
या ग्रंथांची मांडणी भगवान श्रीकृष्णाच्या राजकीय नि व्यावहारिक श्रेष्ठत्वाची अत्यंत चिकीत्सक नि आचरणपर अशीच आहे. जी सर्वसामान्यांसही आकळणारीच आहे. दुर्दैवाने भक्तांनी, कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी नि सर्वच कृष्णभक्तांनी भगवान श्रीकृष्णाचे हे असे राष्ट्रोद्धारक नि व्यष्टी नि समष्टीच्या कल्याणाचे विशुद्ध रुप उलगडून दाखविण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. अगदी राज्यव्यवहार शास्त्राच्या अभ्यासकांनीही, राजनीतिधुरंधरांनीही हे केलं नाही. किंवा ज्यांना राष्ट्रनिष्ठ समाजधुरीण म्हणता येईल अशांनीही नाही. अशावेळी भगवान श्रीकृष्णांस पूर्णपुरुषोत्तम नि ईश्वरी अवतार म्हणून पूर्ण श्रद्धेने स्वीकारणाऱ्या, पूर्वायुष्यांत 'श्रीकृष्णकथामृतासारखे' भक्तिरसपर चरित्रचिंतन करणारे महाकाव्य रचणाऱ्या पूज्यनीय अप्पांनीच अशा एका आगळ्यावेगळ्या ग्रंथांचीच रचना करावी हे अत्यंत विशेष आहे. किंबहुना 'महाभारताचे वास्तव दर्शन' या त्यांच्या ग्रंथाबरोबरंच त्यांचा हा ग्रंथश्रेष्ठही त्यांच्या 'अनंत'प्रतिभेंस कळस पोहोचविणारा आहे.
पण तरीही एक गोष्ट मात्र विशेष सांगावीशी वाटते की लेखक योगेश्वरांना ईश्वरी अवतार मानत असूनही संपूर्ण ग्रंथामध्ये कुठेही चमत्कारिक वर्णन करून प्रसंग न रंगविण्याची लेखकाने काळजी घेतलेली आहे. हे ह्या ग्रंथांचे फार वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण तो ईश्वरी अवतार आहे, तो काहीही करु शकतो म्हटलं की संपलं. मग आह्मांस तो आचरणीय राहतंच नाही. किंबहुना तो केवळ मूर्तीमध्ये पूजिण्यातंच आह्मीं धन्यता मानतो. आचरणांत मात्र कधीच आणत नाही. ही उणीव मात्र लेखकाने अत्यंत कसोशीने भरून काढल्याने त्यांच्याविषयी किती ऋण व्यक्त करावेत हे कळत नाही.
एक गोष्ट मात्र इथे आवर्जून नमुद करावीशी वाटते...
ह्या ग्रंथाचे प्रत्यही विवेचन करताना आह्मांस एक सतत जाणवत होते की ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या राज्यव्यवहारकुशलतेचे नि व्यष्टी नि समष्टीच्या हिताचे असे कुटनीतीचे वर्णन करताना लेखकाने प्राचीन अर्थशास्त्रकारांची वचने उद्धृत केली असती तर ग्रंथांस आणखी बहार आली असती. अर्थात ही काही ह्या ग्रंथांची न्यूनता नसली तरी जर अप्पा आज जीवित असते तर त्यांना ही विनम्र विनंती मी तरी अवश्य केली असती. नि पुढील आवृत्तीमध्ये ते संदर्भ भरीस घालण्याचा अट्टाहास केला असता. ह्यात कुठेही त्यांच्याविषयी अनादर व्यक्त करण्याचा हेतु नसून उलट त्यांच्याविषयीच्या अत्यादरानेच हे लिहितो आहे. वाचकांचा भ्रम नसावा ही विनंती...
ग्रंथांतले काही विशेष उल्लेखनीय संदर्भ
खरंतर सर्वच ग्रंथ विशेष उल्लेखनीय शब्दन्शब्द म्हणून असला तरी ह्या ग्रंथांतली काही वाक्ये तर अशी चिंतनीय आहेत की ती अक्षरशः सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवावीत. अशी अनेक वाक्ये आहेत जी इथे विस्तारभयास्तव देणं संभव नाही त्याहेतु क्षमस्व. लेखकाने महाभारत मांडत असताना किंवा श्रीकृष्णाचे पुर्वचरित्र मांडत असताना वर्तमान राजकारणाशीही व महाभारत पश्चातच्या भारतवर्षाच्या इतिहासाशी घातलेली सांगडही अत्यंत महत्वाची आहे. एक दोन ठिकाणी प्रामाणिक मतभेद अवश्य आहेत. अस्तु।
ग्रंथांतले अंतिम प्रकरण वाचताना तर कुणांसही नेत्रकडा ओलावल्याशिवाय राहतंच नाही. कारण तिथेच त्या भगवानाच्या नि पूर्णपुरुषोत्तमाच्या ब्रह्मचर्याचे नि सत्यनिष्ठेचे जे दर्शन घडलंय ते वाचून कुणाचेही अंतःकरण द्रवेलंच...
उपसंहाराच्या दृष्टीने ग्रंथांच्या अंती लेखकाने जे व्यक्त केलं आहे ते पाहणं आवश्यक आहे. आपल्या ब्रह्मचर्याच्या प्रतिज्ञेवर भगवान श्रीकृष्णाने परीक्षितींस जीवित केल्यावरचा प्रसंग वर्णिताना लेखक लिहितो की
"हे ही एक प्रकारे विश्वरूप दर्शनच आहे. पण ते तेजानें सूर्यासारखे दैदिप्यमान असले तरी शारदीय पुर्ण चंद्राप्रमाणे आल्हाददायक आहे. कमलासारखे कोमल आहे. सर्व ज्ञानेंद्रियांना तृप्त करील असे सद्गुणी आहे. श्रद्धावंतांना इथे जीवाचा विसावा सापडेल. सत्पुरुषांना आपला भाव आकाराला आला याचा प्रत्यय येईल, साधकांना यामुळे आश्वासन मिळेल, निस्वार्थी निरलस कार्यकर्त्यांना येथे आदर्श गवसेल, प्रखर बुद्धिमत्ता येथे समाधान पावेल, प्रामाणिकांचे मन येथे स्थिरावेल. तर योग्यांना आपले हृदय येथे आत्मरूपामध्ये अवस्थेत झाल्याचे अनुभवास येईल.."
अंती लेखक लिहितो...
"नास्तिकांचे समाधान माझ्या या विवेचनाने होईल असे मला वाटत नाही. त्यासाठी मी हा प्रयत्न केलेलाही नाही. पण या माझ्या प्रयत्नामुळे श्रद्धावंतांना नास्तिकांच्या आघाताला उत्तरे देता येतील आणि निरागस अनभिज्ञांचा बुद्धिभेद टळेल, एवढा विश्वास मला आहे."
*उपक्रमोपसंहारावभ्यासोऽपूर्वता फलम् ।*
*अर्थवादोपपत्ती च लिङ्गं तात्पर्यनिर्णये ।।*
आमच्या प्राचीन शास्त्रकारांनी ग्रंथांची तात्पर्य लक्षणे सांगताना सहा गोष्टींचा विचार केला आहे. ज्यामध्ये उपक्रम (आरंभ), उपसंहार(अंत), अभ्यास(पुनरावृत्ति), अपूर्वता(अविषयता), फल (प्रयोजन), अर्थवाद(प्रतिपाद्य वस्तुची स्तुति आणि विपरीताची निंदा) आणि उपपत्ति(दृष्टांत प्रतिपादन)...
ग्रंथाची मांडणी ह्या सहाही तात्पर्यार्थनिर्णयांस अत्यंत अनुकूल असल्याने लेखकाच्या चरणी नि त्या ग्रंथनायकाच्या चरणी कोटी अभिवादन करून हा अनुभवप्रपंच पूर्ण करतो...
शीघ्रातिशीघ्र पूज्यनीय अप्पांचाच उपरोल्लेखित 'महाभारताचे वास्तव दर्शन' हा ग्रंथराजही आह्मीं १२ ऑगस्टपश्चात विवेचनांस घेऊच.संभव झाल्यांस फेबुवर प्रत्यही लाईव्हही करु. त्याची सूचना योग्यवेळी देऊच...
लेखाच्या अंती श्रीधरस्वामींच्या ओळी आठवतात, त्या अशा...
मिथ्यातर्कसुकर्कशेरितमहावादान्धकारान्तरभ्राम्यन्मन्दमतेरमन्दमहिमंस्त्वज्ज्ञानवर्त्मास्फुटम् ।श्रीमन्माधव वामन त्रिनयन श्रीशङ्कर श्रीपते गोविन्देति मुदा वदन् मधुपते मुक्त: कदा स्यामहम्॥
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#भगवान_श्रीकृष्ण_एक_दर्शन_अनंत_आठवले_वरदानंद_भारती_राज्यव्यहारकुशल_कुटनीतिज्ञ_राष्ट्रनिर्माता_महाभारत
No comments:
Post a Comment