इयत्ता नववीत आमच्या प्रशालेचे मराठीचे शिक्षक गुरुवर्य श्रीनंदकुमार कुलकर्णी सरांनी आम्हा विद्यार्थ्यांना नवव्या अध्यायाचा पाठ अध्यापन केला. तेंव्हापासून अद्यापपावेतो नवव्या अध्यायाचे पठण हा नित्यक्रम आहेच. हा अध्याय माझा तरी अत्यंत प्रिय आहे. गीतेविषयीची जी काही भावना आहे, ती अशी आहे.
दहावी झाल्यावर प्रभुपादांचे गीताभाष्य अक्षरशः संपवलं होते. त्यातली श्रीयोगेश्वराची चित्रं इतकी भावली की त्यावरंच ध्यानधारणा आरंभ केली. नवव्या अध्याच्या पठणाने जी शांती अंतःकरणांस लाभत आलेली आहे, तिचं शब्दांत वर्णन करणं केवळ असंभव आहे.
मधील काळांत आर्ष वेदभाष्यामुळे नि आर्ष अशा वैदिक साहित्याच्या अध्ययनाने वेदंच सर्वोच्च प्रमाण हा सिद्धांत अंतसात् रुढ झाल्याने यद्यपि श्रीकृष्णांस ईश्वर मानण्यांस अंतःकरण संदेही आहे, तथापि गीतेविषयीचा पूज्यभाव काही न्यून होण्यासारखा नाही.
वेदांकडे अक्षम्य दुर्लक्ष्य...
गीता कितीही श्रेष्ठ असली नि ती वेदांचा सार असली तरी ती वेदांइतकी पूज्य कधीच होऊ शकत नाही. दुर्दैवाने संप्रदायाभिनिवेशाने हिंदु समाजाची इतकी हानी केली आहे की गीतेलाच सर्वोच्च प्रमाण मानून हिंदुसमाजाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याचा अक्षम्य अपराध मधील काळांत केलेला आहे की ज्यामुळेच हिंदु समाजाचे पतन झालंय. आणि आणखीच दुर्भाग्याची गोष्ट तर ही की श्रीमत्स्वामी श्रीविवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे हिंदु समाजाने गीतेचा तेजस्वी असा विश्वदिग्विजयाचा जीवनसंदेश त्यागून अध्यात्माच्या नावाखाली तिची असत्य व्याख्या करून पलायनवाद स्वीकारून स्वतःची अपरिमित हानी करून घेतली आहे. तो संदर्भ सहसंलग्न आहेच.
गीतेचे अध्ययन महत्वाचं आहेच. पण वेदांपेक्षा गीतेला श्रेष्ठ मानणार्या लोकांच्या बुद्धीची जितकी कीव करावी तितकी न्यूनंच आहे. अस्तु।
गीता सर्व शास्त्रांचे सार आहे हे विधान कितीही मोहक असलं तरी गीतेंस वेदांइतकी योग्यता खचितंच नाही. अगदी भामतीकारांनीच सांगितल्याप्रमाणे
भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा, कर्णापाटव आदि दोषांपासून मूक्त असलेला एकंच ग्रंथ आहे नि तो म्हणजे वेदंच. गीता ही कितीही वेदानुकूल असली तरी ती वेदांचे स्थान घेऊच शकत नाही. तसं स्थान तिला देणार्यांनी आयुष्यांत वेद कधीच उघडून न पाहिल्याने किंवा पाहूनही संप्रदायाभिनिवेशाने तसा भ्रम होणं स्वाभाविकंय. अस्तु।
गीता आम्हांसही वंदनीय आहेच पण हे सर्व लिहिण्याचा हेतु इतकाच की ती वेदांइतकी पूज्य नाहीच होऊ शकत नाही. ज्यांना ती तशी मानायची असेल त्यांनी आनंदाने मानावी.
अद्वैतवाद, द्वैतवाद, त्रैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, शुद्धाद्वैतवाद द्वैताद्वैतवाद हा वादाचा विषय आहे. ह्यातलं अंतिम काय हे शोधण्यासाठी वेद हा अंतिम मार्ग आहे, गीता नव्हे. जर गीतेंत एकंच मार्ग असता तर इतके संप्रदाय निर्माण झालेच नसते. ह्यात दोष गीतेचा नसून तिच्याकडे त्या दृष्टीने पाहणार्यांचा आहे असे आम्हांस वाटते. तरीही वेदांची अंतःसाक्षीच महत्वाची आहे.
गीतेंस दोष देण्याचा आमचा हेतु मूळीच नाही. जर असता तर आम्ही प्रत्यही गीतेचा पाठ केलाच नसता. पण गीतेच्या नावाने वेदांकडे दुर्लक्ष करण्याच्या घातुक मानसिकतेकडे लक्ष वेधणे हा हेतु आहे.
श्रीकृष्ण ईश्वर नाही तर मग यदा यदा हि धर्मस्यचं काय ??
हा श्लोक तो ईश्वर असल्याचे निदर्शक नसून धर्मसंस्थापनेसाठी पुन्हा पुन्हा जन्म घेण्याचा वैदिक सिद्धांतंच प्रस्थापित करणारा एक ऋषि किंवा महात्मा आहे हे सिद्ध करतो. कारण जो अजन्मा आहे, त्याला जन्म घेण्याचे कारण मूळातंच नाही. हा वदतो व्याघात ठरेल...
महाभारताच्या अध्ययनाशिवाय गीता आकळणं असंभव आहे.
श्रीमन्महाभारत ही गीतेची पार्श्वभूमी आहे. त्याच्या अध्ययनाशिवाय गीताध्ययन असंभव आहे कारण शेवटी गीतेतल्या पात्रांची ओळख ही महाभारतातंच होते.
अस्तु। गीतेचं पठण वेदांसह नित्य आवश्यक आहेच. दोन्ही ग्रंथ नित्य पठणीय आहेतंच ह्यात संदेहंच नाही.
मोक्षदा एकादशी....
मोक्ष अर्थात मूक्ती शब्दाचा रुढ अर्थ जो आहे नि वैदिक सिद्धांतानुसार जो मूल अर्थ आहे, त्याविषयी स्वतंत्रपणे विवेचन करणं आवश्यक असल्याने मुक्ति से पुनरावृत्ती इतकंच सांगून लेखणींस विराम देतो...
गीतेविषयी इतकंच काहीसं...
गीता जयंती अर्थात मोक्षदा एकादशीच्या निमित्त सर्वांस शुभेच्छा!
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
Pakhandkhandinee.blogspot.com
#श्रीमद्भगवद्गीताजयंती_मोक्षदाएकादशी_वेद_भगवानश्रीकृष्ण_महाभारत
No comments:
Post a Comment