महाभारतात आदिपर्वाच्या प्रथमच अध्यायांत एक वचन आहे.
*इतिहासपुराणाभ्यां वेदं समुपबृंहयेत् |*
*बिभेत्यल्पश्रुताद्वेदो मामयं प्रतरिष्यति ||२०४||*
(भांडारकर प्रत)
ह्यावचनांत किंचितसा भेद करून नि महाभारतकारांची क्षमायाचना करून
*मईसाधनाभ्यां मराठेतिहासं समुपबृहंयेत ।*
*बिभेत्यल्पश्रुतादेतिहासो मामयं प्रतरिष्यति ।*
(मुक्त छंदांत केलेली रचना)
अर्थ - *मराठ्यांच्या तेजस्वी इतिहासाचे उपबृंहण करायचे असेल तर इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे कृत मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्यांनीच करायला हवं. नाही केल्यांस तो इतिहासपुरुष हे अल्पश्रुत लोक माझा विपर्यास करतील म्हणून घाबरतो.*
इतिहासाचार्य राजवाड्यांविषयी काही लिहिण्यांस सांप्रत तरी असमर्थ आहे म्हणून इतकंच. आजीवन अखंड केवळ इतिहासाचाच ध्यांस घेऊन त्याविषयीच जीवनसर्वस्व अर्पण केल्याचे उदाहरण इतिहासांत तरी अन्यत्र क्वचितच आढळेल.
*कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी ।*
*ह्या भवभूतीच्या उक्तीप्रमाणेच ज्यांचे सख्य जीवनभर उन्हाळ्यांतील कडक उन, हिवाळ्यांतील कडाक्याची थंडी नि ग्रीष्मांतल्या सततच्या संततधारा ह्यांच्याशीच होते अशा पुरुषश्रेष्ठाचे आज पुण्यस्मरण.*
*ज्याप्रमाणे थोरल्या महाराजांनी नि त्यांच्या जीवलगांनी अवघी तीन तपे हलकल्लोळ करून महाराष्ट्रधर्माचे राज्य चोहीकडे करून पूर्वजांस अभिमानित केलं, तद्वतच आयुष्यांतली तीन तपेहून अधिक कालावधी इतिहासाचे हे उपबृंहण करण्यांस ह्या विश्वनाथाने प्रदीप्त प्रतिभा, अवर्णनीय नि:स्पृहता, अत्युदात्त निरपेक्षता नि अतुलनीय कष्टशीलता ह्या अंगभूत गुणांनी ह्या इतिहासपुरुषाची सेवा करून पूर्वजांस उपकृत केलं.*
*राजवाड्यांची बलदंड देहयष्टी*
शक्तीने पावती सुखे ।
शक्ती नसता विटंबना ।
समर्थ
यौवनावस्थेतच उत्तम व्यायाम करून बलदंड शरीर निर्माण करणारे राजवाडे आहाराच्या बाबतीत जसे वृकोदर भीमासमान आहारप्रेमी होते तद्वतच ह्याच इतिहाससंशोधनासारख्या दुर्घट नि वरपांगी नीरस वाटणाऱ्या कार्यांतही स्वत:च्या पोटावर बिबे ओढणारेही होते. ते सांगतात
*नेमाने पहाटे पाच वाजता मी उठत असेन व तालमीत जाऊन दोन तास उत्तम मेहनत करीत असे. बैठका,जोर, जोडी, मल्लखांब व कुस्ती अशी सुमारे दीड-दोन हजार मेहनत रोज होई, तो सात वाजत. नंतर शेर-दीड शेर दूध पिऊन अर्धा तास कॉलेजाभोवताली मैदानात व झाडाखाली सहल व विश्रांती होई. आठपासून नऊपर्यंतचा वेळ वर्तमानपत्र वाचण्यात जाई. पुढे एक तास नदीवर पोहणे होत असे. परत येऊन भोजन आटोपून खोलीकडे यावे, तो नेमके साडेअकरा वाजत.*
*चहासारख्या अग्निमांद्य वाढविणाऱ्या पदार्थाचा तिरस्कार* करणारे राजवाडे लिहितात
*अलीकडील लोकांच्या खिशात चहा घेण्यांस दोन आणे खुळखुळतात; परंतु तेवढ्याच पैशात अर्धा मूठ बदामगर, दोन चार खडीसाखरेचे खडे, १०।१२ काळी द्राक्षे असा माधवरावी मेवा घेता येईल. (माधवरावी म्हणजे न्यायमुर्ती माधव गोविंद रानडेे यांच्या खिशांत बदाम पिस्ते वगैरेच असायचे). मी हा मेवा घेतो म्हणूनच माझे दंड पीळदार व डोळे पाणीदार आहेत.*
*मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान*
वय वर्षे बारा ते सव्वीस (२६) पर्यंत राजवाडे केवळ इंग्रजीतच बोलत, लिहित नि वागत. पण पुढे ह्याचाच पश्चात्ताप त्यांना झाला नि ते पुढे मातृभाषेचे कट्टर अभिमानी बनले. एकेकाळी इंग्रजीच्या वेडाने झपाटलेले हेच राजवाडे पुढे मातृभाषेचे इतके अभिमानी बनले की पुढे त्यांनी मातृभाषेतच लिहायची शपथ घेतली. *माझ्या साहित्याचे आकलन करण्यांस लोकांना वीस वर्षे लागतील असे राजवाडे एकदा म्हणाले होते.* दुर्दैव हे की आजही इतकी दशके होऊनही त्यांचे साहित्य आम्हांस अभ्यासु वाटत नाही.
पत्रव्यवहार तर त्यांनी मोडी, मराठी किंवा संस्कृतमधूनच केला.
*स्वभाषा, स्वभूमी नि स्वजन ह्यांना वाहिलेले नि:स्पृह जीवन*
साने गुरुजी राजवाड्यांच्या ह्या मातृभाषाप्रेमाविषयी लिहितात की
*ज्ञानेश्वरांसारख्या वागीश्वरांनी आपल्या अमृतासमान ओव्या कोळशाने खांबावर लिहिल्या; दासोपंतांनी निंबाचा पाला खाऊन लक्षावधी ग्रंथ लिहून ठेवला; या प्राचीन वाग्वीरांप्रमाणेच नि:स्वार्थ होऊन ज्यावेळी आम्ही लिहावयांस लागूं, त्यावेळेस मराठी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही.*
इंग्रजी पोषाखाचा धिक्कार करणारे राजवाडे एकदा म्हणाले होते की
*पंचा घालून प्रयोगशाळेत प्रयोगाचे काम केले तर ऑक्सिजन निर्माण होणार नाही काय ?*
*कामिनी कांचनाचा त्यागच हे महत्कार्य घडवु शकतो*
राजवाड्यांच्या जीवनचरित्राचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आयुष्यभर ह्या दोन गोष्टींपासूनची त्यांची परावृत्तता. व्यसनांपासूनची त्यांची परावृत्तताही. कधीकधी विड्या ओढायचे पण त्यांनी स्वत:च सांगितल्याप्रमाणे कैक महिने ते त्यापासून राहु शकत असत. ह्यावरूनच व्यसनाधीतना नव्हती हे लक्ष्यी येते.
*बहुविषयांचा धांडोळा*
*इतिहास, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजनीति शास्त्र, तर्कशास्त्र, तर्कज्ञान व मानसशास्त्र* ह्याविषयांचे राजवाड्यांनी ह्या यौवनावस्थेत महाविद्यालयीन जीवनांत नि पुढे अध्ययन केलं.
*मराठ्यांच्या इतिहासाची साधने ह्याची प्रस्तावना*
असे क्वचितच ग्रंथ किंवा ग्रंथमाला असतात की ज्यांची *प्रस्तावना मुखोद्गत* करावीशी अशी असते. त्यात *सावरकरांच्या जोसेफ मैझिनीसारखीच किंवा वै. सोनोमामा दांडेकरांच्या श्रीज्ञानेश्वरीची किंवा वै. शंकरमहालाज खंदारकरांची श्रीगाथाभाष्याची किंवा स्वामी वरदानंद भारतींची सार्थमनुस्मृतीभाष्याची. त्यापेक्षाही दिव्य नि तितक्याच ज्वलज्जहाल शब्दांची पर्जन्यवृष्टी करणारी राजवाड्यांची 'मराठ्यांच्या इतिहासांची साधने' ह्या बावीस खंडात्मक ग्रंथमालेची प्रस्तावना* ही प्रत्येकांने वाचावयांसच हवीच. ही प्रस्तावनाच खरंतर एका स्वतंत्र लेखमालेचा विषय व्हावा अशी आहे. अर्थात इतिहासाचार्यांच्या इतिहाससंशोधनाच्या आरंभीच्या १० वर्षांच्या अथक परिश्रमाचे नि साधनेचे ते एक *स्वादुरसो मधुपेयो* ह्या अथर्ववेदवचनाप्रमाणेच असे एक फल आहे. जिज्ञासूंनी ही प्रस्तावना वाचावींच अशीच आहे.
*१२७ पृष्ठांच्या द्वादशप्रकरणात्मक* अश्या ह्या प्रस्तावनेत इतिहासाचार्यांनी पानिपतच्या पराभवाची आजपर्यंत (त्याकाळपर्यंत) सांगितलेल्या अष्टादश अर्थात अठरा कारणांची मांडणी करून त्याचे सप्रमाण व बिनतोड खंडनही त्यात केले आहे. ही प्रस्तावना आमच्या गतेतिहासाकडे सताड अर्थात उघड्या नेत्रांनी पाहण्यांची एक प्रेरणाही आम्हांस देते.
*अवघ्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यांत इतिहास संशोधनाचे अद्वितीय नि भावी पिढींस मार्गदर्शक असे कार्य करणाऱ्या ह्या इतिहासाचार्याने जे काही विलक्षण कार्य केलंय, त्यावरूनच इतिहासाचार्य ही पदवी त्यांच्यापश्चात अद्याप कुणांसही प्राप्त झाली नाही हे लक्षणीय सत्य आहे.*
राजवाड्यांच्या एकुण ग्रंथसंपदेविषयी लिहिण्यांस सांप्रत असमर्थ आहे कारण जितकं वाचलं तितकंच लिहिलंय. भविष्यांत कैक वर्षांनी अवश्य ग्रंथपरिचय लिहीनच.
*अखेर तो महाराष्ट्रेतिहास पोरका झाला*
आजच्या दिवशीच इसवीसन १९२६ मध्ये धुळ्यांत ह्या महापुरुषाने अखेरचा श्वांस घेतला. सानेंच्या भाषेत
*आशेचा मेरु उन्मळला, कर्तव्यनिष्ठेचा सागर आटला, उत्साहाचा सूर्य अस्तंगत झाला, महाराष्ट्र सरस्वती अनाथ झाली, महाराष्ट्रेतिहास पोरका झाला.*
अशा ह्या भीष्मासमान थोर पुरुषांस आज त्यांच्या पुण्यस्मरणी विनम्र अभिवादन !
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#इतिहासाचार्य_विश्वनाथ_काशिनाथ_राजवाडे_पुण्यस्मरण_मराठ्यांच्या_इतिहासाची_साधने_महाराष्ट्रेतिहास
No comments:
Post a Comment