Wednesday, 14 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्त विचार: । - लेखांक तृतीय

मागील द्वितीय लेखांकात आपण चतुर्वेदभाष्यकार श्रीमत्सायणाचार्यांची वेदभाष्याविषयीची नि एकुणच वेदांविषयीची भूमिका त्यांच्याच शब्दांत पाहिली. ज्यांना तो लेखांक वाचायचा असेल, त्यांनी इथे वाचावा ही विनंती.

*http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_10.html?m=1*

आता त्या लेखांतच म्हटल्याप्रमाणेच या लेखामध्ये आपणांस त्यांच्या यम-यमी सूक्ताविषयीच्या विचारांची मांडणी करायची आहे नि त्याची समीक्षा करायची आहे.

सायणांचे भाष्य अनेकांनी प्रकाशित केलं. *आम्ही प्रस्तुत लेखमालेसाठी परमादरणीय राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्य टिळकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पुण्यातच स्थापन झालेल्या वैदिक संशोधन मंडळाने संपादित केलेली ऋग्वेदभाष्याची चतुर्खंडात्मक संपूर्ण संस्कृत प्रतच अभ्यासली आहे. राजवाडे, सातवळेकर आदि विद्वानांनी त्याचे संपादन केलं होते. आंतरजालांवर ती पीडीएफ स्वरुपांत*

https://archive.org/search.php?query=Rg%20Veda%20with%20Sayana%27s%20Commentary

येथे प्राप्य आहे. जिज्ञासूंनी ती इथे अभ्यासावी. अस्तु ।

ह्याचे चार खंड असून चतुर्थ खंडात नवम नि दशम मंडलाचे भाष्य असून पृष्ठ क्रमांक २९४ ते २९९ पर्यंत हे यम-यमी सूक्त आहे. ह्यात सायणाचार्यांनी जागोजागी यम-यमींस भाऊ-बहीणच सिद्ध करण्याचा अट्टाहास केलेला आहे हे ज्याला संस्कृत कळतं त्याला सहज लक्षात येईल. ज्यांना संस्कृत येत नाही त्यांनी पंडित श्रीराम शर्मा आचार्यांचे सायणावलंबी भाष्य अभ्यासावे. तेही पीडीएफ उपलब्ध आहे. किंवा कोणत्याही सायणाचार्यांच्या हिंदी भाष्यकाराचे अभ्यासावे. *सोबत मूळ सायण भाष्य नि त्याचा पंडित भीमसेन शर्माकृत हिंदी भाष्य १८९५ ह्या वर्षीचे हे सर्व पीडीएफ जोडलंच आहे.*

https://drive.google.com/file/d/1yKbm5-TwTZVPmVY5AeDmGJaUVAP9hzNB/view?usp=drivesdk

ह्या सूक्ताच्या प्रथम मंत्रामध्ये सायणाचार्यांच्या मते विवस्वान नामक पुरुषांस जन्माला आलेले यम-यमी नामक पुत्र-पुत्री असून एके दिवशी एका निर्जन अशा विस्तीर्ण समुद्राच्या तीरावर मध्यभागी यमी यमांजवळ येऊन त्यांस प्रणययाचना करते. द्वितीय मंत्रामध्ये आपण दोघे सहोदर असल्याने हा संपर्क योग्य नाही असे बोलून यम तिला नाकारतो. केवळ हा भाग निर्जन आहे म्हणजे आपल्याला इथे कुणी पाहणार नाही हा तर्क खोडताना यम तिला वायु, अंतरिक्ष आदि साक्षीदारांची मांडणी करतो नि ते आपलं हे निंद्यनीय कर्म पाहतील असा तर्क करतो. ईश्वराने ही सर्व व्यवस्था केली आहे असे सांगतो. तृतीय मंत्रात तर यमीचे उत्तर सांगताना सायणांनी  प्रजापतीने अर्थात ब्रह्मदेवाने पूर्वी स्वकन्येशी ते कर्म केलं असा संदर्भ देऊन यमी याचना करते असे भाष्य केलं आहे. किंवा पूर्वी देवांनीही ते कर्म केलं आहे असे लिहिलंय.

सायणाचार्यांसारख्या विद्वानांनी असे लेखन करावे? कधी देवांनी असे निंद्य कर्म केलंय ? हे त्यांच्या समग्र वेदभाष्याविषयीच्या भूमिकेशी, जी आम्ही मागील लेखांकातच मांडलीच आहे, तिच्याशी पूर्ण विद्रोह करणारे आहे. म्हणून आमचं ठाम मत आहे की सायणांचे हे भाष्यच नव्हे. आणि जरी असले तरी हे निंद्यच आहे. मूळीच अनुकरणीय नाही.

*मूळात प्रजापतीने स्वदुहितेशी अर्थात ब्रह्मदेवाने स्ककन्येशी व्यभिचार कर्म केले असा जो आरोप ऐतरेय ब्राह्मणांच्या मूळ सूर्य नि उषेच्या अलंकारिक कथेवरून पुराणकथाकारांनी लावलेला आहे की ज्यावरून वैदिक धर्मांवर वाट्टेल ते घाणेरडे आक्षेप घेण्यांस शत्रुंचं फावतं, ती प्रजापतीची दूहिता ही कथा नेमकी काय आहे येंविषयी निरुक्तकारांनी स्पष्ट अभिप्राय दिला असून, अगदी ऐतरेय ब्राह्मणकारांनीही ती कथा सूर्याचे रुपक आहे असे स्पष्ट सांगूनही तिचा संबंध तथाकथित चतुर्मुखी ब्रह्मदेवाशी जोडून त्यांस निंदित करण्याचे पातक जे झालं आहे, त्याविषयी स्वत:ला पुराणप्रेमी म्हणविणारे काय स्पष्टीकरण देणार आहेत ?*

सुदैवाने ह्यावर सर्वप्रथम *वेदोद्धारक महर्षि दयानंदांनी त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* ह्या ग्रंथामध्ये स्पष्टपणे शंका निरसन केलंच आहे. ही *कथा अलंकारिक आहे* हे सप्रमाण सिद्ध केलं आहे. पुढे *वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकरांनीही त्यांच्या वेदभाष्यामध्ये नि *भारतीय संस्कृती* नामक ग्रंथामध्ये ह्या *प्रजापतीची दुहिता* नामक कथेचा विस्तार करताना ती सूर्याची अलंकारिक कथा किंवा *त्या प्रजापतीच्या अर्थात राजाच्या सभा नि समिती अशा दोन कन्या असा राज्यव्यहारपरक अर्थ लावला आहे. ह्यासाठी त्यांनी अथर्ववेदाच्या मंत्राचाच संदर्भ दिला आहे.* ज्याने वैदिक साहित्याचे प्रामााणिक अध्ययन डोळसपणे केलंय, त्याला हे अलंकार सहजगत्या लक्ष्यात येतीलच. अस्तु !

तरीही सायणाचार्य ह्या सूक्तामध्ये प्रजापतीची दूहिता ह्या कथेचा विकृतार्थ काढून यमीच्या मुखातून ते उच्चारतात हे कितपत वैदिक सिद्धांतांस धरून आहे ? यद्यपि पुढील मंत्रांत यमाने तिचा निषेध केला असला तरी हा अर्थ विकृतच आहे. सायणांनी सूर्यापासून सरण्युंस हे दोन पुत्रपुत्री झाले असे यमाच्या तोंडी घातलंय. आता मूळात सूर्य हा जड पदार्थ आहे. तो कसा रुप धारण करेल ? सूर्य नामक जडापासून कशी कुठल्या स्त्रींस कन्यापुत्र होतील ? वेदांमध्ये स्पष्टपणे मनुष्यजीवनिर्मितीसाठी स्त्री-पुरुषांचे रजो-वीर्यमीलन हेच मैथुनी सृष्टीचे कारण यजुर्वेदामध्ये सांगितलं आहे, ज्यात पुरुष हा उपादान कारण असून स्त्री ही निमित्त कारण आहे. अमैथुनी सृष्टी ही केवळ आदिसृष्टीत होते अशी वेदांची स्पष्ट मान्यता असल्यामुळे इथे सूर्याची कुठल्याही स्त्रीपासून संतानोत्पत्ती संभवच नाही. हे सर्व आम्ही यम-यमींस मानवदेहधारी स्त्री-पुरुष अथवा जीवविशेष मानणार्यांसाठी लिहिलं आहे.

पुढील सहाव्या मंत्रामध्ये यमीने स्वर्ग (द्यौ) नि नरक नामक स्थानविशेषाची गोष्ट केली आहे की जी वैदिक सिद्धांतांस मूळीच अनुसरून नाही. *स्वर्ग किंवा नरक हे कोणतेही स्थानविशेष नसून निरुक्तकारांनी स्पष्टपणे त्यांस केवळ सुखादि भावना हेच नाव दिलं आहे. येविषयी आमचा एक आधीचा लेख आहेच. निरुक्तकारांनी स्पष्टपणे अध्याय २ खंड १२ व १३ येथे स्पष्टपणे स्वर्ग हा कोणताही स्थानविशेष नसून तो केवळ सुखनाम आहे असे स्पष्ट सांगितलं आहे. तरीही सायणाचार्य निरुक्तकारांना नाकारताना ते स्थानविशेष असे मानताना दिसतात. हे भाष्य खरंच सायणांचेच आहे का ?*

*स्वत: परमहंस भगवान पुज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनीही वैकुंठादि लोक स्थानविशेष नाहीत असे स्पष्ट एका स्तोत्रांत लिहिलं आहे. तो संदर्भ मी सविस्तर देईनच.*

*दहाव्या मंत्रामध्ये "जामय:" शब्दाचा अर्थ सायणांनी बहिण असा काढलाय. वास्तविक पाहता निघण्टु मध्ये १.१२ येथे जामि हे उदकनाम अर्थात जल ह्या अर्थाने आहे. अंगुली अर्थात बोट असाही दिलाय.*

अमरकोशामध्ये जामि शब्दाचा अर्थ

*जामि स्त्री। भगिनी*

*समानार्थक: भगिनी,स्वसृ,जामि*

*३।३।१४२।२।२* असा दिला आहे तर तिथेच आणखी कुलस्रिया किंवा स्नुषा अर्थात सून असाही आहे. मनुस्मृतीमध्येही जामयो म्हणजे घरातील स्त्रिया असा शब्द आहेच.

ऋग्वेद ६.२५.३ येथील मंत्रानुसार

*इन्द्र॑ जा॒मय॑ उ॒त येऽजा॑मयोऽर्वाची॒नासो॑ व॒नुषो॑ युयु॒ज्रे । त्वमे॑षां विथु॒रा शवां॑सि ज॒हि वृष्ण्या॑नि कृणु॒ही परा॑चः ॥*

म्हणजेच वेदाच्या प्रत्यक्ष अंत:साक्षीनुसार इथे *जामय शब्दाचा अर्थ पतिव्रता भार्या* असाच घ्यायला हवा. महर्षि दयानंदांनीही तोच घेतला आहे. बहिण म्हणून नव्हे.

*ज्या सायणांनी आपल्या वेदभाष्याच्या भूमिकेत स्पष्टपणे वेदांमध्ये कोणताही मनुष्यादिकांचा किंवा कुणाचाही इतिहास नाही असे स्पष्ट म्हटलं आहे, तेच सायण प्रजापतीने अर्थात ब्रह्म्याने स्वकन्येशी व्यभिचार केला असे लिहितील का? किंवा देवांनी असे कर्म आधी केलं असे लिहितील का ? बरं ह्याच सायणांनी वेद सृष्ट्यारंभीच प्रकाशित झाले असे स्पष्ट लिहिलं आहे. असे सायणाचार्य श्वेताश्वतरोपनिषदाच्या*

*यो ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै ।*

ह्या वचनानुसार त्या परमात्म्याने त्या ब्रह्म्यांस चार वेद दिले असे वचन कसे नाकारतील ? ह्याचाच अर्थ हे भाष्य सायणांचे नाहीयेच हे सिद्ध होते. अन्यथा ते त्यांच्याच भूमिकेशी विरोध कसा दर्शवतील ? बरं जरी त्यांचं आहे असे मानलं तरी स्वप्रतिज्ञाहानीचा नि पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा अदि सर्वांशीच विरोध केल्यासारखं होईल.

बाराव्या मंत्रातही यमाचा नकार कळविताना सायण बहिण-भावांचा संपर्क पाप आहे असाच अर्थ घेतात. तो पाप आहे हे जाहीरच आहे पण मूळात ते भाऊ बहीणच नाहीत तर. तेराव्यांतही ती यमी यमांस अन्य स्त्रीला तु स्वीकारशील पण मला नाही असा आरोप करते. शेवटी चौदाव्या मंत्रांत यम तिला पुन्हा परपुरुषाशी संपर्क करण्यांस सांगून स्वत:पासून विलग करतो.

असा हा एकुण यम-यमी सूक्ताचा सायणप्रणीत अर्थ आहे. ज्यांना अधिक इच्छा असेल, त्यांनी सायणांचे कोणतेही भाष्य उघडून पहावं. आम्ही वर पीडीएफ दिलीच आहे.

*आता आश्चर्याची गोष्ट अशी आहे की ह्याच सायणांनी यजुर्वेदाच्या १२.६३ येथील मंत्रामध्ये मात्र यम-यमींस पती-पत्नी मानलंय.*

आणि इथे मात्र ते ह्या सूक्तामध्ये तींस भाऊबहिण मानतात. असे का ? मान्यय की सूक्तानुसार नि मंत्रानुसार अर्थ बदलतो. पण इतका विरोध ?

असो पुढील लेखांकामध्ये ह्या सूक्ताविषयी अन्य भाष्यकारांनी दिलेले अर्थ पाहुयांत.

अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_सायणाचार्य_ऋग्वेदभाष्य_वेदकालीन_विवाहसंस्था_राजवाडे_वास्तव_विपर्यास:*

No comments:

Post a Comment