*इ॒दं नम॒ ऋषि॑भ्यः पूर्व॒जेभ्यः॒ पूर्वे॑भ्यः पथि॒कृद्भ्यः॑ ॥*
ऋग्वेद - १०.१४.१५
भारतवर्षाच्या इतिहासांत स्थितप्रज्ञ महात्मे अनेक होऊन गेले. श्रीमत्स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे ह्या भरतभूमींस कधीच महापुरुषांची उणीव अशी भासलीच नाही. अशांतच एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत एक तेजस्वी तारा ह्या भरतभूमींवर आपल्या जाज्वल्य वेदनिष्ठेने सूर्यासमान प्रखर तेजस्वी विद्युल्लतेसमान प्रकाशित होत होता. आत्मविस्मृत भारतीयांना वेदांचा तेजस्वी जीवनसंदेश *मनुर्भव नि कृण्वन्तो विश्वमार्यम्* ह्या वेदाज्ञेंतून प्रदान करत होता. दीपावलीच्या आजच्या दिवशीच अशा एका वेदभाष्यकाराचे नि समग्र क्रांतीचे अग्रदूत अशा ऋषिश्रेष्ठाचे देहावसान व्हावं ? आणि तेही विषप्रयोगाने ?
सतरा वेळा विषाचे घोट पिणारा हा महायोगी नौली आदि क्रियांनी ते विष अनेकवेळा उत्सर्ग करता झाला. पण ह्या अठराव्या विषप्रयोगांत मात्र सोमल नामक (इंग्रजीत आर्सेनिक एसिड) विष काचेसह दुधातून देण्यात आलं नि ह्या ऋषिश्रेष्ठाचा आजच आश्विन अमावस्येंस अंत झाला.
*आश्विन अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*
*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*
जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणार्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.
*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*
आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.
एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली
*महाराज, आपले चित्त कसे आहे?*
महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*
लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*
महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*
त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.
पुढे सायंकाळी साडेपाचवाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला
*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*
कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा
*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*
ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला. अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे
*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*
त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.
*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*
वैदिक परंपरेनुसार स्वत:च्या स्वीकार पत्रांत आधीच लिहून ठेवल्याप्रमाणे महर्षींच्या देहांस वैदिक अग्निसंस्कार करण्यांत आला. संन्याशांना सर्वसामान्यत: जे करण्यांत येत नाही पण जे करणं वेदप्रणीत आहे तेच करून वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन ह्या पुरुषश्रेष्ठानं केलं.
*५९ वर्षांचा जीवनकाल संपवून आपल्या पावित्र्याच्या तेजाने तळपणारा, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेला, मृगेंद्राचे सामर्थ्य नसानसांत स्फुरलेला, दीनदलितांविषयी ह्रदयांत अपार करुणा बाळगलेला दयासागर नि करुणासागर, हिमाचलापासून कन्याकुमारीपर्यंत नि गुजरातपासून ते बंगालपर्यंत सर्वत्र वैदिकधर्माची विजयपताका प्रसारित करणारा, पौरुषाने मुसमुसून संपन्न झालेला हा दयानंद नामक दिवाकर आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करत त्या अस्तमानांस जाणार्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला. सर्व विश्वांस उदयित करणार्या त्या प्रभाकरांबरोबरच हा द्वितीय प्रभाकर आपल्या प्रिय सविता देवतेंस अर्थात अखिलजगहितेच्छु नि अपौरुषेय अशी वैदिक वाणी प्रदान करणार्या ईश्वरांस प्राप्त करता झाला.*
*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*
*धन्या अपीड्यमुनय: सुनयस्तु येषां ।*
*भूयस्त्वया सुमनसा तपसोद्धृतो वै ।*
*सा शारदा श्रुतिमयी सुतरान्तु धन्या ।*
*याsसूत पूतचरितं सुतमद्वितीयं ।*
*अमन्दसंविन्मकरन्द-माधुरीं, प्रदाय विद्वन्मधुपाय निर्भरम् ।*
*वसुन्धरोद्यानममुञ्चदञ्चितं सुमं प्रतस्थे तु दिबालयं प्रति ।*
वेदार्थ कल्पद्रुम - भाग १ - पृष्ठ ३
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_आश्विन_अमावस्या_महानिर्वाण_दीपावली
मूर्तिपूजेविषयी तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल
ReplyDelete