Saturday, 10 November 2018

अथ ऋग्वेदे यम-यमी सूक्तविचार: । - लेखांक द्वितीय


सत्य-असत्यासी मन केले ग्वाहीं ।
मानियेलें नाही बहुमता ।

जगद्गुरु श्रीतुकोबाराय

मागील लेखांकात म्हटल्याप्रमाणे इथून पुढे ह्या सूक्तावरील आक्षेपांचे विचारमंथन करायचे आहे. ज्यांना प्रथम लेखांक वाचायचा असेल त्यांनी तो

http://pakhandkhandinee.blogspot.com/2018/11/blog-post_9.html?m=1

इथे वाचावा ही विनंती. आता प्रथम आक्षेपाचा विचार करुयांत.

*आक्षेप क्रमांक १* - म्हणे हे सूक्त यम-यमी नामक भावा बहिणीचे आहे म्हणे - इति सायणाचार्य नि तदनुयायी सर्व सनातनी परंपरेतले वेदभाष्यकार नि त्यांचे अनुयायी नि धर्मप्रेमी विद्वान. सर्व पाश्चात्य नि तदनुयायी एतद्देशीय विद्वान किंवा इतिहासकार

*उपरोक्त आक्षेपाचं समाधानपूर्वक खंडन* -

ह्या सुक्तांस भाऊ बहिण मानायचा भ्रम प्रामुख्याने आरंभ झाला तो इथपासूनच. वास्तविक पाहता सायणाचार्य हे वेदांविषयीचे एक नामांकित नि अतिशय चतुरस्त्र विद्वान. ज्यांनी चारीही वेदांवर प्रथम भाष्य केलं आहे नि तत्संबंधित वैदिक साहित्यावरही विस्ताराने भाष्य केलंय असे सायणाचार्य हे वेदजगतांत गौरवाने उल्लेखिले जातात. त्यांचे स्थान खूप मोठं असल्याने त्यांच्याविरोधात लेखणी हाती घेताना त्यांच्याविषयीच्या आदरांस कुठेही न्यूनता न आणता सत्य मांडण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांचा कालावधी विक्रम संवत १३७२ ते १४४४ आहे. इसवी सन १२३७ ते  १३०९.

सायणाचार्य हे बुक्क प्रथम, कंपण, संगम द्वितीय, हरिहर द्वितीय, विजयनगर आणि उपराज्ये येथील राज्यांचे मंत्री होते. सायणाचार्य हे यजुर्वेदी बौधायनसूत्री ब्राह्मण हे त्यांनी स्वत:च सांगितलं असून त्यांच्या भावाने अर्थात माधवानेही हेच लिहिलं आहे. सायणाचार्यांनी प्रथम यजुर्वेदाची तैत्तिरीय संहिता, काण्व संहिता, ऋग्वेद, अथर्ववेद आणि सामवेद असे चारीही वेदांवर भाष्य केलं असून आठ ब्राह्मणग्रंथांवर नि आरण्यकांवरही त्यांचे भाष्य आहे. त्यांच्या ऋग्वेदभाष्याच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी त्यांनी

*वैदिकमार्गप्रवर्तक श्रीबुक्क महाराजांच्या समयीच ह्या ऋग्वेदभाष्याचे लेखन झालंय*

असे स्पष्ट म्हटलं आहे. ऋग्वेदभाष्यापूर्वी त्यांनी प्रथम तैत्तिरीय संहिता, ब्राह्मण ग्रंथ नि आरण्यकांचे भाष्य केले होते.

*सायणाचार्यांचे भाष्य त्यांचे एकट्याचे नाही हे त्यांनी स्वत:च मान्य केलंय.*

आमच्या आधीच्या काही लेखांमध्ये आम्ही स्पष्ट लिहिलं होते की सायणाचार्यांचे भाष्य हे संपूर्णत: सायणांचे नाहीये. त्याला प्रमाण निम्नलिखित.

त्यांनी त्यांना त्यांच्या वेदभाष्यांत सहाय्यकृत झालेल्या भाष्यकारांचे नावही स्पष्टपणे उल्लेखिलं आहे.त्यांची नावे अशी

१. *नारायण वाजपेययाजी*
२. *नरहरिसोमयाजी*
३. *पंढरी दीक्षित*

ह्याचे कारण हेच आहे की सायणाचार्यानी भाष्य करायच्या आधी प्रत्येकवेळी जी भूमिका लिहिली आहे तींत नि तदनंतर केलेल्या भाष्यांत काहीवेळा परस्परभेद दिसून येतो. हे कसे ते पाहुयांत.

सायणाचार्यांच्या प्रमुख सैद्धांतिक मान्यता पाहुयांत ज्यातून त्यांची वेदभाष्य करण्यामागील दृष्टी लक्षात येईल. सविस्तर प्रमाण न देता केवळ निर्देश करतो आहे.

१. *यस्य निश्वसितं वेदा:* यावरून वेद हे ईश्वरोक्तच असून ते त्याचे नि:श्वास आहेत. *यथा घटपटादि द्रव्याणां..* ह्यावरून ते स्वत: प्रमाण आहेत, त्यांना इतर कुठल्याही प्रमाणाची आवश्यकता नाही. ह्यासाठी त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.२ येथील *चोदनालक्षणोsर्थोधर्म:* ह्या सूत्रावरील शाबरमूनींचे भाष्य प्रमाण म्हणून दिलंय. इंद्रादि शब्दांवरून प्रत्यक्ष परमेश्वराच्या रुपाचेच ग्रहण करा असे ते सांगतात. हे शाबर भाष्य सुदैवाने पीडीएफ उपलब्ध आहे.

२. *जीवविशेषैरग्निवाय्वादित्यैर्वेदानामुत्पादित्वात्*  ह्यावचनावरून जीवविशेष अशा अग्नी, वायु, आदित्य आणि अंगिरा ह्या चार ऋषींना ईश्वराने वेद हे जीवसृष्ट्यारंभी अंत:करणात प्रकट केले नि तिथून ते आपणांस परंपरेने प्राप्त झाले हेच सांगितलं आहे. *श्रुते: ईश्वरस्य अग्न्यादि प्रेरकत्वेन निर्मातृत्वं द्रष्टव्यम्* असे शब्द वापरले आहेत त्यांनी. त्यासाठी ऐतरेय ब्राह्मण ५.३२ येथील संदर्भ योजिला आहे.

३. जैमिनीच्या पूर्वमीमांसेतील प्रथम अध्यायाच्या द्वितीय पादांतील सूत्र ३१ ते ४५ यावरील शाबरभाष्याचे विस्तारपूर्वक प्रमाण देऊन सायणाचार्यांनी आणखी काही सिद्धांत मांडले आहेत, ज्यात एक म्हणजे वेदमंत्रांचे उच्चारण केवल अदृष्ट नव्हे तर दृष्ट फलासाठीही असल्याने ते निरर्थक नाहीत. मंत्र अर्थासाठीच आहेत.

४. जिथे वेदमंत्रांचा सरळ अर्थ निघत नसेल तिथे गौण अर्थ घ्यावा.उदा. *चत्वारि शृंगा त्रयोsस्य पादा* ह्या मंत्रांत त्या वेदपुरुषांस बेैलासारखे चार शिंगे आहेत असा अर्थ नसून इथे गौण अर्थ म्हणजे ते चार शिंगे हे होता, अध्वर्यु, उद्गाता आणि ब्रह्मा हे चार आहेत असे सायण सांगतात.

५. जिथे वेदांमध्ये परस्परविरोधी वचने आहेत असे वाटेल(तसं ते नाहीयेच तरीही) तिथेही गौण अर्थच घ्यावा. तुच माता नि तुच पिता असा मंत्र असेल तर इथे विरोध आहे असे न धरता एकत्वच आहे असे समजावे.

६. वेदांमध्ये बबर आदि मनुष्यादिकांचा, ऋषींचा, राजांचा किंवा अन्य कुठल्याही अनित्य व्यक्तिविशेषाचा इतिहास आहे का ह्याचे खंडन त्यांनी पूर्वमीमांसेतल्या १.१.३१ येथील *परन्तु श्रुतिसामान्यमात्रम्* ह्या सूत्राचा आधार घेऊन वेदांमध्ये नित्य पक्ष आहे त्यामुळे अनित्य अशा व्यक्तींचा वेदांत इतिहास नाही असा स्पष्ट सिद्धांत मांडला आहे. म्हणजेच वेदांमध्ये मानवांचाच काय कुणाचाच इतिहास मूळीच नाही. वेदांमधील नावे ही यौगिक आहेत, लौकिक नाहीत. कारण ते वेद हे अपौरुषेय आणि नित्य आहेत.

७. वेद कुणी रचले आहेत का ह्याचे खंडन करताना सायणांनी *उक्तं तु शब्दपूर्वत्वम्*, *आख्या प्रवचनात्* ही पूर्वमीमांसेची सूत्रे देताना वेदांचा कुणीही मनुष्य किंवा स्त्रीकर्ता नाही असे स्पष्ट सांगितलं आहे. म्हणजेच वेद कुणीही मनुष्याने रचलेले नाहीत.

८. वेदांच्या अपौरुषेयत्वासाठी अर्थात ईश्वरोक्तत्वासाठी सायणांनी ब्रह्मसूत्रातील (उत्तर मीमांसेतील) *शास्त्रयोनित्वात्*, *अत एव च नित्यत्वम्* ही दोन सूत्रे देऊन आणि *वाचा विरुपा नित्यया* हा ऋग्वेद ८.७५.६ येथील मंत्र देऊन आणि महाभारतातील *अनादिनिधना नित्या वागुपसृष्टा स्वयंभुवा* हा श्लोक देऊन वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध केलं आहे. वेदवाणी ही ईश्वरप्रणीत नि जीवसृष्ट्यारंभी हे सांगितलं आहे.

ही एकुण सायणाचार्यांची वेदांविषयीची सैद्धांतिक मान्यता आहे. हे सर्व संदर्भ आम्ही त्यांच्या वेदभाष्यापूर्वीच्या उपोद्घातांतीलच दिले आहेत. जिज्ञासूंनी ते स्वत: अभ्यासावेत.

*आश्चर्य म्हणा किंवा आणखी काहीही*

पण हेच सिद्धांत *आर्य समाजाचे संस्थापक वेदोद्धारक महर्षि दयानंदांनीही दीडशे वर्षांपूर्वीच त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभूमिका* नि *सत्यार्थ प्रकाश* आदि ग्रंथामध्ये मांडले आहेत. तरीही ह्याच महर्षि दयानंदांच्या नि सायणाचार्यांच्या वेदभाष्यांत अनेकठिकाणी भेद आहे. कारण एकच आहे की सायणाचार्यांनी हे सिद्धांत पुढे भाष्य करताना सर्वच ठिकाणी पाळल्याचे दिसतच नाही ही शोकांतिकाय. ह्यावरूनच सायणांचे सर्वच भाष्य हे सायणांचे नाही हे आम्ही जे वर लिहिलंय त्याला पुष्टी मिळते. अन्यथा वेदांत इतिहास न मानणारे सायणाचार्य पुढे वेदमंत्रांचे भाष्य करताना इतिहासपक्ष मांडताना का दिसतात ? नित्य पक्ष सोडून अनित्यपक्ष मांडताना का दिसतात ? ज्यांनी हे सर्व स्वत: मूळातून अभ्यायलंय, त्यांच्याच हे लक्षात येईल. येविषयी भविष्यांत आणखी सविस्तर विवेचन करेनच पण सांप्रत ह्या लेखमालेविषयी विस्तार.

*नामूलं लिख्यते किंचित् नानपेक्षितमुच्यते ।*

आम्ही आधार (पुरावा) असल्याशिवाय कधीच काही लिहित नाही. ही शास्त्राची आम्हांस आज्ञा आहे. ह्यात अहंकार नाही. पुढील लेखांकात सायणांची उपरोक्त यम-यमी सूक्ताविषयीची भूमिका पाहुयांत नि त्याची समीक्षाही करुयांत.


अस्तु ।

क्रमश: ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

*#ऋग्वेद_यमयमी_वेदकालीन_विवाहसंस्था_भाऊबहीण_पतीपत्नी_सायणाचार्य_वेदापौरुषेयत्व_वास्तव_विपर्यास*

No comments:

Post a Comment