Saturday, 27 October 2018

आज पंडित भगवद्दत्त रिसर्च स्कौलर ह्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी !





(२७ ऑक्टोंबर, १८९३ ते २२ नोव्हेंबर, १९६८)

*यह जीवन मैनें वैदिक वाङ्मय के अर्पण कर रखा है ।*

प्रस्तावना पृष्ठ ख - वैदिक वाङ्मय का इतिहास - भाग प्रथम

ज्यांची योग्यता असूनही ज्यांना कुठलाही पुरस्कार कधीच मिळाला नाही, पुरस्कार तर राहुदेत पण साधा निर्देशही कुठे होत नाही, अशा विद्वानांचे साहित्य अभ्यासायला प्राप्त होणं हे भाग्याचे लक्षण. आणि असे विद्वान आर्यसमाजी परंपरेतच जास्ती निर्माण व्हावेत हे दुसर्या अर्थाने दुर्भाग्याचे लक्षण ! कारण केवळ आणि केवळ उपेक्षा आणि उपेक्षाच ! अस्तु !

मागील वेळीच पंडित युधिष्ठिर मीमांसकावरील लेखात ज्या पंडित भगवद्दत्तांचा उल्लेख केला होता, त्यांच्याविषयी हे चिंतन ! संशोधन काय नि किती नि कसं करावे व तेही स्वकीय भारतीय दृष्टिकोनातून; भारताचा इतिहास पाश्चात्यांना बुद्धी गहाण न टाकता स्वकीय भारतीय दृष्टीकोनातून कसा सप्रमाण नि ससंदर्भ लिहावा ह्याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंडित भगवद्दत्तजी, बीए, रिसर्च स्कौलर ! ज्यांच्या नावापुढे रिसर्च स्कौलर हे शब्द अगदी यथार्थ प्रतिबिंबित होतात, त्या एका संशोधकाचे हे किंचितसे चरित्रचिंतन !


पंडितजींचा जन्म नि अध्ययन

पंडितजींचा जन्म अमृतसर मध्ये २७ ऑक्टोंबर, १८९३ ह्यादिवशी चंदनलाल नि हरिदेवी ह्या मातापित्यांच्या पोटी झाला. पंडितजींनी १९१३ साली बीएसाठी लाहौरच्या दयानंद महाविद्यालयांत प्रवेश घेताच संस्कृत भाषेचे अध्ययन आरंभ केले. त्या आधी तत्कालीन इंटरमिजिएटमध्ये ते विज्ञानशाखेचे विद्यार्थी होते. *१९१५ ला बीए उत्तीर्ण होताच त्यांनी वेदाध्ययन हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम लक्ष नि ध्येय्य ठरविलं नि त्यानुसार आयुष्यभर कालक्रमणा केली.* त्याचे कारण प्रत्यक्ष महर्षि दयानंदांकडून योगदीक्षा शिकलेले स्वामी लक्ष्मणानंद हे त्यांचे प्रेरक.

७००० हून अधिक हस्तलिखितांचे संकलन नि संशोधन

त्या स्वातंत्र्यपूर्व अशा कठीण काळामध्येच पंडितजींनी दयानंद लाहौर विद्यालयांतून प्रथम अवैतनिक(विनामूल्य) असे  अध्यापनाचे नि तदनंतर महात्मा हंसराजजींच्या कृपेने तिथल्याच  *वैदिक संशोधन मंडलातच* सदस्यता प्राप्त करून वैदिक साहित्याच्या संशोधनाचे आलोडनात्मक कार्य आजीवन केलं. ह्याच काळात त्यांनी सात सहस्त्रांहून अधिक हस्तलिखितांचे संकलन नि संपादन केलं. *ह्या एकोणीस वर्षांच्या कालावधीतच पंडितजींनी इथेच वैदिक नि तत्संबंधित सर्व संस्कृत साहित्याचे विपुल अध्ययन केलं. तेच त्यांच्या जीवनाचे इप्सित नि एकमेव ध्येय होते.*

वैदिक वाङ्मय का इतिहास

पंडितजींच्या संपूर्ण जीवनांत त्यांच्या विद्वत्तेवर कळस चढविणारा ग्रंथ म्हणजे ही त्रिखंडात्मक रचना. वास्तविक पाहता हा ग्रंथ चतुर्खंडात्मक होता. प्रथम खंडामध्ये पंडितजींनी *वेदों की शाखाएँ* ह्या शीर्षकान्वये वेदांच्या संहिता, त्यांचे ब्राह्मणग्रंथ, त्यांच्या शाखा, त्यांचे चरण ह्याविषयी विस्तृत विवेचन केलं असून चतुर्थ अध्यायांत अगदी स्पष्टपणे त्यांनी व्यासांनी एका वेदांचे चार विभाग केले का ह्या पुराणप्रणीत अवैदिक नि थोतांड सिद्धांताचे प्रमाणपूर्वक खंडन केलंय. ह्यातून व्यासांची निंदा करण्याचा कोणताही हेतु नसून त्यांच्या प्रती होणार्या आदरातूनच त्यांच्या नावाने प्रसृत होणार्या भ्रमांचे निराकरण हा विशुद्ध हेतु आहे नि होता. वेद आधीच चार असताना व्यांसांनी त्याचे चार विभाग करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. पण पुराणपंकामध्ये गर्त रुतलेली बुद्धी सत्य कशी स्वीकारणार ? अस्तु !


शुक्लयजुर्वेदासंबंधी महाराष्ट्राशी संपर्क

पंडितजींनी ग्रंथाच्या प्रस्तावनेतच शुक्ल यजुर्वेदासंबंधीच्या विवेचनासंबंधी नाशिकच्या *शुक्ल-याजुष-विद्या प्रवीण पंडित अण्णा शास्त्री वारे नि त्यांचे चिरंजीव विद्याधर शास्त्री वारे* ह्याद्वयींविषयी आदरपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली आहे. म्हणजेच पंडितजींचा महाराष्ट्राशी छान संपर्क होताच.

द्वितीय खंडात पंडितजींनी *वेदोंके भाष्यकार* ह्या शीर्षकान्वये वेदांच्या भाष्यकारांविषयी विस्तृत विवेचन केलं आहे. आज पर्यंत सर्वसामान्यत: लोकांचा भ्रम असतो की वेदांवर सायणाचार्य हे एकच भाष्यकार होऊन गेले. पण सायणांच्या आधीही अनेक भाष्यकार चतुर्वेदांवर होऊन गेले आहेत हे अतिशय मोलाचे संशोधनात्मक कार्य पंडितजींनी ह्या द्वितीय खंडात केलंय. ही सर्व हस्तलिखिते त्यांनी स्वत: प्राप्त केली.  वस्तुत: वेदांवरील शंभरहून अधिक भाष्यकारांची हस्तलिखिते आज प्राप्त आहेत. पण आम्हाला सायण सोडून पलीकडे पहायची इच्छाच कुठेय ?

स्कंदस्वामी हे ऋग्वेदांवरील प्रथम भाष्यकार जे सहाव्या शतकांतले. हे नाव तरी कित्येकांना परिचित आहे? अस्तु !

तृतीय खंडात *ब्राह्मण तथा आरण्यक* ह्या साहित्याविषयी पंडितजींनी विस्तृत विवेचन केलं आहे.

*चतुर्थ भाग दुर्दैवाने प्रकाशित व्हायचा राहिला.*

ह्या चतुर्थ भागात पंडितजींनी वेदांशी संबंधित कल्पसूत्रादि साहित्याविषयी विवेचन करण्याचं योजिलं होते. परंतु हे सर्व साहित्य नि तत्संबंधी जुळविलेली कागदपत्रे विभाजनासमयी नष्ट झाल्याने हा भाग अप्रकाशितच राहिला.

*विभाजनाने पंडितजींचे बव्हतांश साहित्य अक्षरश: नष्टप्राय झालं.*

ज्यांना विभाजनाची गोष्ट भारतावरील उपकार वाटते, त्या उजव्या स"माज"वाद्यांना अशा संशोधनात्मक साहित्याची आस्था नि व्यथा कशी नि काय कळणार म्हणा ? अस्तु !

*पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयाशी पंडितजींचा संपर्क होता*

वैदिक साहित्याचे माहेरघर म्हणून पुण्यातले डेक्कन महाविद्यालय तसं जगप्रसिद्धच आहे. ह्या महाविद्यालयाशी पंडितजींचा संपर्क होता हे त्यांच्या साहित्यावरून स्पष्ट होते. विशेषत: उपरोक्त वैदिक वाङ्मयाचा इतिहास ह्या ग्रंथातून.

*पाश्चात्यांचा दुष्ट हेतु त्यांच्या पत्रातूनच उघड करणारे पंडितजी*

ज्यांच्या नावापुढे भारतीय विद्वान नतमस्तक होताना दिसतात, त्या मैक्सम्युलर, ग्रिफीथ, व्हिटने, मोनियर विल्यम्स, मैक्डोनेल, कीथ, जेम्स मिल, विल्यम जोन्स आदि आदि पाश्चात्यांचे सत्यस्वरुप नि उघडउघड भारताविषयीचा आत्यंतिक द्वेष नि पराकोटीचा पूर्वग्रहदोष नि तज्जन्य विकृत लेखन त्यांच्याच साहित्यातून नि पत्रव्यवहारातून उघड करणारा हा पंडित्वर्य्य एतद्देशीयांस कसा भावेल म्हणा? एकीकडे मैक्सम्युलर पती-पत्नींना वसिष्ठ-अरुंधतींचा किंवा सायणांचा अवतार म्हणविणारे विवेकानंद असतील तर दुसरीकडे ह्याच मैक्सम्युलरला त्याच्या जीवितपणीच त्याची पत्रव्यवहारातून नि स्वतंत्र वेदभाष्यातून अक्षरश: चिरफाड करून त्याविषयी *यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोपि द्रुमायते* या एकाच वचनावरून त्याची योग्यता दर्शविणारे महर्षि दयानंद असतील. आणि ह्याच परंपरेतून महर्षींचा वारसा तितक्याच संपन्नतेने नि त्याच चिकाटीने नि विजीगीषु वृत्तीने यथार्थपणे वाहणारे पंडितजी असतील !

*Western Indologists - A Study in Motives*

ह्या ग्रंथातून ह्या सर्व पाश्चात्यांची वैदिक साहित्य नि भारतीय इतिहासाविषयीची दृष्टी पंडितजींनी सर्वप्रथम उघड केली. दुर्भाग्य असे की अद्यापही आमच्या लोकांना जाग येत नाही. वैचारिक दरिद्रता हा आमच्या विद्वत्तेला लागलेला शापच जणु !

*पंडितजींची आणखी काही विपुल नि संशोधनात्मक अशी ग्रंथसंपदा*

१) *अथर्ववेदीय पञ्चपटलिका* - हा संग्रही आहे पण वाचला नाही.

२) *अथर्ववेदीय मांडुकीशिक्षा* - संग्रही आहे पण वाचला नाही.

३) *वाल्मीकीय रामायणाचे बाल, अयोध्या तथा अरण्य काण्डाचे पश्चिमोत्तर काश्मिरी संस्करणाचे संपादन* ह्यातील पुढील भागांचे संपादन पुढे विश्वबंधु नि राम लभया ह्यांनी केल्याचे आपणांस प्राप्त होते. ह्याची प्रस्तावना वाचनीय आहे.

४) *ऋग्वेद पर व्याख्यान* - ह्या ग्रंथात वेदार्थविषयक अनेक महत्त्वपूर्ण समस्यांचे समाधान आहे. विशेषत: शाखा नि संहिता ह्यातील भेद उत्तमरीतीने स्पष्ट केलाय. हा ग्रंथ वेदाध्ययनासाठी अत्यावश्यकच आहे.

५) *ऋग्मन्त्र व्याख्या* :- हा ग्रंथ मी वाचला नाहीये.

६) *वेदविद्या निदर्शन* - ह्या ग्रंथामध्ये वेदमंत्रातील पदार्थ विद्येसंबंधी अर्थात वैज्ञानिक अर्थासंबंधी विस्तृत विवेचन आहे. वेदांतील विज्ञान हा विषय इथे विस्तृत आहे. अनेक अनाकलनीय नि गुढ सिद्धांत पंडितजींनी ह्यांत मांडलेले आहेत.

७) *यास्कीय निरुक्त विस्तृत विवेचन* - पंडितजींनी ह्यामध्ये *सिद्धेश्वर वर्मा तथा पुण्याचे इतिहासाचार्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाडे (निरुक्ताचे मराठी भाषांतर) ह्यांसारख्यांनी यास्काचार्यांवर घेतलेल्या भ्रममूलक नि पक्षपाती आक्षेपांचे खंडन केले असून यास्कीय शैलीचे तर्कशुद्ध विवेचन केलं आहे.* आपलेच विद्वान म्हणविणारे आपल्याच ऋषीमूनींची निंदा करताना दिसतात हे राजवाड्यांसारख्यांच्या लेखनावरून स्पष्ट होतं. असो. दुर्भाग्य !

८) *भारतवर्ष का बृहद् इतिहास* - ह्या द्विखंडात्मक ग्रंथामध्ये पंडितजींनी भारताचा सविस्तर नि बृहदेतिहास जो अनेक संदर्भांनी विवेचनात्मक शैलीत सिद्ध केलेला आहे. ह्या ग्रंथाच्या अंती पंडितजींनी दिलेल्या संदर्भग्रंथांची सूची चिंतनीय आहे. विशेषत: भारतीय इतिहासाचे लेखन भारतीय दृष्टिकोनातून कसे करावे हे ह्यापेक्षा उत्तम कुठेच दिग्दर्शित होत नाही. ह्याच्या तृतीय अध्यायांतच पंडितजींनी पाश्चात्यांनी भारतीय इतिहासाविषयी प्रसृत केलेल्या भ्रमांचा परामर्श घेतलेला आहे.

९) *भारतवर्ष का सांस्कृतिक इतिहास*

१०) *ऋषि दयानन्द जी सरस्वती के पत्र और विज्ञापन* ह्याचे एकुण चार खंड असून ह्यात महर्षींच्या पत्रांचे संकलन नि संपादन आहे.

११) *पूना प्रवचनों में कथित व थियोसोफिस्ट में प्रकाशित जीवनी का सम्पादन*

१२) *सत्यार्थप्रकाशचे हिंदी संपादन*

१३) *Western Indologists : A Study in Motives* वर ह्याविषयी लिहिलंच आहे. हा उपरोक्त बृहदेतिहास ग्रंथाचाच तृतीय अध्याय आहे.

१४) *भाषा का इतिहास*

पंडितजींचा एक अतिमहत्वाचा ग्रंथ म्हणजे भाषेचा त्यांनी लिहिलेला इतिहास. वैदिक संस्कृत पासून सर्वच भाषांची त्यांनी केलेली समीक्षा पंडित रघुनंदन शर्मांच्या वैदिक संपत्तीपेक्षाही जास्ती विस्तृत नि चिकीत्सक आहे. भाषांचा उद्गम, विकास नि ह्रास ह्याविषयी पाश्चात्य नि एतद्देशीय सर्वच मतांची चिकित्सा ह्या ग्रंथात पंडितजींनी केली आहे. विशेषत: ब्रिटीशांनी निर्माण केलेला आर्य नि द्रविड भाषांविषयीचा विघटनकारी नि देशद्रोही संघर्ष पंडितजींनी सप्रमाण ससंदर्भ खोडून काढलेला आहे.  जिज्ञासूंनी हा ग्रंथ अवश्य अभ्यासावा.

१४) *वैदिक कोश* - पंडित भगवद्दत्तांनी व हंसराजांनी दोघांनी मिळून संपादित केलेला हा वैदिक कोश वैदिक शब्दांसंबंधी उपयुक्त आहे.ह्याच्या प्रथम भागांत पंडितजींनी ब्राह्मण ग्रंथ हे वेद आहेत का ह्याविषयी विवेचन केलं आहे.

१५) *वैदिक कोष* - राजवीर शास्त्रीजींनी संपादित केलेला हा वैदिक कोष ह्याचे मुख्य संपादक पंडितजीच असून हा अकराशेंहून अधिक पृष्ठांचा आहे. ह्यात प्रत्येक वैदिक शब्दांची व्युत्पत्ती दिली असून महर्षि दयानंदांच्या साहित्यातला संदर्भही दिला आहे.

१६) *पंडित गुरुदत्तांच्या लेखांचा अनुवाद* - हा पंडितजींनीच केला असून तो पीडीएफ आहे.

१७) *बार्हस्पत्य अर्थशास्त्रम्* ह्या आंग्लग्रंथांस प्रस्तावना

पंडितजींची आणखीही काही ग्रंथसंपदा आहे जी आम्ही अद्याप वाचलीच नाही. त्यामुळे तिचा स्वतंत्र निर्देश जोडलेल्या पृष्ठांत केलाच आहे तिथे जिज्ञासूंनी पहावा.

*पंडितजी सनदी अधिकार्यांना शिकवायचे*

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या उत्तीर्ण विद्यार्थांना (आयएएस-आयपीएस) पंडितजी इतिहासाविषयी मार्गदर्शन केल्याचा संदर्भ आहे. स्वत: पंडित नेहरुंनी त्यांच्या विद्वत्तेची प्रशंसा केलीय.

ह्यातली सर्व ग्रंथसंपदा आज प्रकाशित असून ती पीडीएफही उपलब्ध आहे. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी www.vedrishi.com वरून ही मागवावी. किंवा पीडीएफही अभ्यासावीच.

*अंतिम निवेदन*

आज त्यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जन्मशताब्दी असूनही अनेकांना त्यांचे नावही ज्ञात नसावं ही केवढी मोठी शोकांतिका ! म्हणूनच खरी श्रद्धांजली अर्पण करायची असेल तर त्यांचे साहित्य क्रय करून ते अध्ययन करून आपल्या इतिहासाविषयी नि साहित्याविषीच्या भ्रमांचे निराकरण व्हावे नि यथार्थ आकलन व्हावे हीच त्या जगदीश्वराच्या चरणी प्रार्थना !

जयोस्तु आर्य सनातन वैदिक हिंदु धर्म ।
जयोस्तु आर्यावर्त(हिंदुराष्ट्रम्)
जयोस्तु पंडित भगवद्दत्तजी ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पंडित_भगवद्दत्त_रिसर्च_स्कौलर_शतकोत्तर_रौप्य_जन्मशताब्दी_वैदिक_वाङ्मय_इतिहास_वेद_पुणे_डेक्कनमहाविद्यालय

No comments:

Post a Comment