Wednesday, 15 February 2023

उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

 



उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

उदंड केले तरी तो जयो| प्राप्त नाही|

दासबोध - १६|१०|२९


श्रीदासनवमी अर्थात राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास पुण्यस्मरण...


उपासनेने काय होऊ शकतं याचं प्रत्यंतर सर्वच संतांप्रमाणे ठोसरांच्याही कुटुंबात येतं. श्रीमहिपतींच्या संतविजयात म्हटल्याप्रमाणे समर्थांचे पिताश्री श्रीसूर्याजीपंत वयाच्या १२ व्या वर्षापासून पुढे २४ वर्षे सूर्योपासक होते. त्यांची नित्याची गायत्र्योपासना ही


बारा सहस्त्र जप नित्य, करित असे एकाग्र चित्त|

बारा वर्षे लोटता सत्य, साक्षात् आदित्य भेटला|

संतविजय - १|२७


नित्य गायत्रीचा १२,००० इतका जप ! या जोडीलाच १००० सूर्यनमस्कार. इतकी साधना ठोसरांची न्यूनतम १२ वर्षे (काही ठिकाणी २४ वर्षे) सुरु होती. 


त्या सूर्यप्रभावें, पुत्र झाला दैदिप्यमान|

म्हणोनिं नाम नारायण, ठेविलें तयाचें|

श्रीदासगणु महाराज


ठोसरांच्या वंशात पिढ्यान्पिढ्यांच्या सुर्योपासनेने जो सूर्यासारखा दैदिप्यमान तेजस्वी पुत्र नारायणाच्या रुपाने जन्मांस आला, त्या नारायणाने चिंता करितों विश्वाची म्हणत तत्कालीन पतित अशा भारतवर्षाचा उद्धार करण्याच्या हेतुने तत्कालीन देशकालवर्तमान चिंताग्रस्त होऊन व्यक्तिगत संसारसुखावर लाथ मारून द्वादश वर्षे गोदातटाकीं त्याच रविकुळटिळकाच्या प्राप्तिस्तव


आचरुनि तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला ताटकीं| प्रगटला पुढें श्रीराम सुजनविश्राम विमलसुखधाम अहल्योद्धारी| हे भवभयसंकटवारी ताटकीं| - पू. श्रीदासगणु महाराजांची रचना.


तेरा कोटी श्रीरामनामाचा जप नि गायत्रीची कैक पुरश्चरणं केली..! श्रीसमर्थांच्या जीवनाचं‌ सार श्रीसमर्थांनी स्वत:च जे सांगितलंय, ते या एकाच शब्दांत


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


मध्येच आहे. रामसोहळ्यामध्ये श्रीमेरुस्वामींनी म्हटल्याप्रमाणे


नित्य विध्युक्त प्रात:स्नान, काळत्रय संध्यावंदन|सहस्त्र गायत्री उच्चारोन, आराध्यमंत्र जपिजे| 

४८|३८


श्रीसमर्थांनी तपकाळात गायत्रीची कैक पुरश्चरणे केली होती, जींत नित्य १००० किंवा १२०० इतकी गायत्र्योपासना होतीच. आपल्या सर्व प्राचीन शास्त्रकारांनी नित्य संध्योपासनेमध्ये किंवा अगदी स्वतंत्र असा १२०० इतका गायत्रीचा जप सर्वश्रेष्ठ उपासना म्हणून सांगितला आहेच. यावर प्रमाणासहित स्वतंत्र विवेचन कधीतरी करेन. आता हा लगेचंच इतका कुणाला जमेल की नाही म्हणून अधिकारभेदाने अन्य मंत्रांची उपासनाही सांगितलीय. श्रीसमर्थांनी तर गायत्रीबरोबर उपास्यदैवत श्रीरामनामाची उपासनाही केलीय. दोन्ही एकत्र का केलं असावं असा प्रश्न साहजिकंय. वास्तविक गायत्री नित्य १२०० केला तर अन्य कुठल्या मंत्राची उपासना करावीच कशाला असा प्रश्न स्वाभाविकंय. पण ह्याचे उत्तर समर्थांनी स्वत: दिलंय दासबोधामध्ये. श्रीसमर्थ म्हणतात


नाना पुरश्चरणें करावी| नाना तीर्थाटणें फिरावी|

नाना सामर्थ्यें वाढवावी| वैराग्यबळें| 

दासबोध - १०|७|१३


सकाळी एकदाच गायत्री केली की काम भागलं असे नव्हे तर दिवसभर पुन्हा नामानुसंधान रहावं म्हणून उपासना सांगितलीय. चित्तशुद्धीसाठी हे सर्व आवश्यक आहे.


सर्व संतांनी नामंच घ्यायला का सांगितलंय???


कुठल्याही संतांचे चरित्र उघडून पाहिलं तरी हाच उपदेश दिसतो की नाम घ्या.


आता प्रश्न असा पडतो की नामस्मरण का करावं, जप का करावा? नामजपाने काय फल प्राप्त होतं? या‌सर्व प्रश्नांची उत्तरे षट्दर्शनांनीच प्राप्त होतात.  त्याशिवाय शंका समाधानंच होत नाही. म्हणून तर आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी षट्दर्शने रचली. महर्षि भगवान पतंजली योगदर्शनामध्ये म्हणतात


तज्जपस्तदर्थभावनम्| योगदर्शन - १|१|२८


प्रणवाचा जप करणे म्हणजे प्रणवाने दाखविला जाणारा जो ईश्वर आहे त्याची भावना करणे. ज्याचा जप आपण करतो, त्याची भावना आपण करतो. कारण नाम नि नामी अभिन्न असल्याने नामाच्या निर्देशाने त्या नामीचाच बोध होते व आपल्याला त्याची भावना होते.


त्याचे आणखी फल काय? योगदर्शनकार पुढे म्हणतात


ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च।।१|२९


परमेश्वराच्या चिंतनाने व्याधि, संशय इत्यादि विघ्ने निर्माण होत नाहीत, स्वरुपाचे दर्शन होते, मनाला त्रास उत्पन्न करणारी एकुण ९ विघ्ने आहेत ती पुन्हा केंव्हातरी अभ्यासु. तूर्तास चित्तांस निर्माण होणारी प्रक्षुब्धता, अस्वस्थता, अस्थिरता, सर्व दोष हे सर्व नामस्मरणाने दूर होतात. म्हणून सर्व संतांनी पुन: पुन: नाम घ्यायला सांगितलंय.


खरंतर षट्दर्शने अभ्यासली तर हे सर्व कळेल.पण ती अभ्यासायला तितका वेळ आपल्याला नसतो नि तसा योग्य गुरुही शिकवायला नसतो. म्हणूनंच 'वेदमार्ग मुनी गेले, करु संती केलें तें|' या श्रीतुकोबारायांच्या वचनाप्रमाणे संतांनी सांगितले व केले, तेच आपण करावं कारण त्यांना त्याची प्रचिती असल्याने. आपली अक्कल जास्त चालवु नये. अतितर्काने माती होते. उपसानेच्या दृढाश्रयानेच समर्थ होता येतं. श्रीसमर्थाच्या जीवनाचे आणखी मर्म म्हणजे


समर्थे समर्थ करावें|


आपणांसही ते समर्थ व्हायचं असेल तर ही उपासना हीच एकमेव तारणहार आहे. आज श्रीसमर्थांच्या पुण्यस्मरणी इतकंच...


असो ऐसें सकळहि गेलें, परंतु येकचिं राहिलें| 

जे स्वरुपाकारी जाहलें, आत्मज्ञानी|

दासबोध


भवदीय...


#श्रीसमर्थ_दासनवमी_पुण्यतिथी_सज्जनगड_रामदासीसंप्रदाय_उपासना_षट्दर्शने_वैदिकहिंदुधर्म

Tuesday, 14 February 2023

महर्षि दयानंद सरस्वति जन्माला आलेच नसते तर...


 

१. स्त्रीशुद्रौ नाधीयतामति| स्त्री शुद्रांनी अध्ययन करता कामाच नये. वेद तर लांबंच, त्यांनी संस्कृतही शिकता‌ कामा नये. इति काही मध्यकालीन स्मृती व त्यालाच प्रमाण मानणारे आमचे धर्ममार्तंड विद्वान... स्वामी विवेकानंदांनीही मात्र ह्या मध्ययुगीन वचनांचा निषेध करून सर्वांना वेदाधिकार दिला आहे बरंका...

२. बाबा वाक्यं प्रमाणं| आमच्या पंढरीतले धर्मसिंधुकार बाबा पाध्ये यांनी धर्मसिंधु तृतीय परिच्छेद पूर्वार्ध भाग तिसरा पृष्ठांक ३९१ वर म्हटल्याप्रमाणे आमच्या हिंदु मुलींचे विवाह हे वयाच्या ६व्या किंवा ८व्या वर्षी झाले असते, जास्तीतजास्त ११व्या वर्षी, कारण अष्टवर्षा भवेत्कन्या ही स्मृती आह्मांला प्रमाण मानावी लागली असती. सोबत पुरावा जोडला आहे बरंका धर्मसिंधुचा. हे धर्मसिंधुसारखे काही ठिकाणी, सर्वच नव्हे, तर काही ठिकाणी वेदविरुद्ध अनार्ष ग्रंथ आह्मांला प्रमाण मानावे लागले असते. त्यातलं सगळंच काही त्याज्य नाहीये बरंका नाहीतर पुन्हा माझ्या नावाने शिमगा...स्त्रियांचे‌ विवाहाचे वय किती यावर आह्मीं मागे वैदिक प्रमाण देऊन सविस्तर लेख लिहिला आहे...


३. विधवा पुनर्विवाह निषेध - इतक्या लहान वयात विवाह होऊन समजा त्या विधवा झाल्या तर न्युनतम आमच्या ब्राह्मणसमाजात तरी त्या कायमच्या केशपवन करीत तशाच विधवा राहिल्या असत्या. कारण ही प्रथा केवळ ब्राह्मणांपुरतीच होती, इतर समाजात पुनर्विवाह व्हायचे. भले ब्राह्मणांमधली ती अत्यंत विकृतंच प्रथा होती जिला कुठलाही शास्त्राधार नाही पण आमचे लोक तसे अजुनही मानतात. एखादी विधवा स्त्री सकेशा समोर दर्शनाला किंवा आशिर्वाद घ्यायला आली तर तिला हाकलून लावणारे थोर महात्मे झाले आहेत आपल्यात. अजुनही आहेतंच...शास्त्रात् रुढीर्बलीयसी...

४. विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह कधीच झाले नसते. फारतर सती गेल्याची उदाहरणे आजही दिसली असती. कारण वेदमंत्रांमध्ये स्पष्टपणे पुनर्विवाहाचा अधिकार असताना तो धिक्कारणारे आहेतंच...

५. अस्पृश्यता आजही तितकीच भयंकर असती..

६. पूर्वास्पृश्य बांधवांना मंदिर प्रवेश कधीच मिळाला नसता.‌ यात सावरकरांचेही व इतर अनेकांचेही योगदान आहेच. पण मूळ प्रवर्तक महर्षि दयानंद. पण आजही मंदिरप्रवेश नाकारणारे आहेतंच काही...

७. कपाळावर टिळा आडवा लावायचा की उभा लावायचा, तो कशाने लावायचा ह्यावरही भांडत बसलो असतो आह्मीं. आजही ते‌ सुरु आहेच की. माझा कपाळावर टिळा लावायला मूळीच विरोध नाहीये, उलट मी टिळ्याचा समर्थकंच आहे पण निरर्थक वादाचा विरोधक आहे...

८. रामायणात श्रीसीतामातेचा विवाह ६व्या वर्षी झाला हा वेदविरुद्ध नि ऐतिह्यविरुद्ध नि प्रत्यक्ष‌ रामायणाशी विरुद्ध असा अपसिद्धांत रुढ झाला असता. अजुनही तसं मानणारे पुष्कळ जण आहेतंच...

९. वैदिक यज्ञांमध्ये पशुहिंसा सर्रास होतंच राहिली असती. जी आजही होतेच म्हणा. भले कलिवर्ज्याने ती वर्ज्य ठरवली असली तरी. तसा‌ संन्यासही कलिवर्ज्य ठरवला आहे तरी घेतातंच सगळे परंपरावादी. याबाबतीत यांच्यायांच्यातंच मेळ नाहीये ही गोष्ट वेगळी. शूsssक बोलायचं नाही...

१०. अश्वमेध म्हणजे घोड्याची हिंसा व त्या मृत अश्वाशी राणीचा संभोग(याचं सप्रमाण खंडन मी मागे केलंय), नरमेध म्हणजे मनुष्यबळी, गोमेध म्हणजे गायीचा बळी असे विकृत नि घाणेरडे अर्थ ग्रहण करण्यासारख्या विकृत प्रथा प्रमाण मानत असतो व त्यालाच खरा वैदिक धर्म समजत असतो.‌ ह्या अश्वमेध, नरमेध, गोमेध ह्यांचा वास्तविक अर्थ फार दिव्य आहे पण तो इतका विकृत केला गेलाय. जर महर्षि दयानंद न‌सते तर तोही पुन्हा वैदिक प्रमाणांच्या आधारे सत्यार्थाने आह्मांला कळला नसता..

११. वेदांमध्ये म्हणजे मंत्रसंहितांमध्ये इतिहास, भूगोल, वर्तमान, भविष्य, नद्या गंगा-सिंधु-यमुना, पर्वते, आर्य इकडून आले, तिकडे गेले, वाट्टेल ते अवतार, वाट्टेल ते ऐतिहासिक महापुरुष, वाट्टेल ते रामायण-महाभारत, वाट्टेल ते ऐतिहासिक शोध घेतले गेले असते. कुणी वेदांमध्ये कबीर शोधले असते, कुणी आपले गुरु, कुणी वर्धमान महावीर शोधले असते, कुणी भगवान बुद्ध नि कुणी आणखी काही. आजही तसा शोध घेणारे व त्यावर पुस्तके खरडणारे आहेतंच म्हणा आणि अशांना आपण विद्वान म्हणतो...

१२. वेदांमध्ये कृष्ण शब्द दिसला, राम शब्द दिसला जोड त्याचा शब्द श्रीराम नि श्रीकृष्णाशी. गंगा शब्द दिसला जोड त्याचा शब्द विद्यमान भारतकालीन गंगा नदीशी. वाट्टेल ते शोध घेत राहिलो असतो व वेदांचा विकृत अर्थ‌ काढत भारतीय इतिहासाची हेळसांड होत राहिली असती...आजही होतेच आहे...

१३. षट्दर्शने परस्परविरोधी आहेत, एक दर्शन दुसऱ्याला खोडतं ,पूर्वमीमांसा केवळ यज्ञंच सांगते, ईश्वर नाकारते, उत्तरमीमांसा पूर्वमीमांसेला जागोजागी खोडते, सांख्यदर्शन निरीश्वरवादी आहे वगैरे वगैरे अनेक अपसिद्धांत रुढ झालेले महर्षींनी नाकारले व दर्शनशास्त्राची यथोचित भूमिका स्पष्ट केली. ते नसते तर विचार करा काय झालं असतं...

१४. धर्मजिज्ञासेत वेदंच सर्वोच्च‌ प्रमाण आहेत हे  प्रत्यक्ष मनुमहाराजांपासून सर्व प्राचीन शास्त्रकारांनी ओरडून सांगितलं असूनही मध्ययुगात निर्माण झालेल्या स्मृतींना प्रमाण मानून वेदांनाही पायदळी तुडवायच्या विकृत परंपरा निर्माण झाल्या त्या धिक्कारायचं‌ सामर्थ्य केवळ दयानंदांमुळेच पुन्हा आह्मांला प्राप्त झालं. त्यामुळेच दयानंदांनी काही नवीन मत प्रस्थापित केलं असे आपल्याला वाटायला लागतं जे असत्य आहे...

१५. देवनागरी ही आद्यलिपी आहे, वेद अनादि व नित्य आहेत, ते ईश्वरकृत आहेत, मनुष्यकृत किंवा ऋषिमुनीकृत नाहीत, त्यांची रचना क्रमाक्रमाने झाली नाहीये, चारही वेद एकाच वेळी चार ऋषींच्या अंत:करणात प्रकट झाले हे सिद्धांत कधीच कळले नसते...वास्तविक महाभारतकालापर्यंत तरी वेदांविषयी हे सिद्धांत सर्वांना मान्य होतेच अगदी भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यपर्यंत तरी त्यांच्या‌ साहित्यात...पण मधील काळात हे सर्व नाकारण्यात आलं व वाट्टेल ते सिद्धांत निर्माण झाले जे महर्षि दयानंदांनी आधुनिक काळात साधार नि सप्रमाण खोडले आहेत...

१६. पृथ्वीवर मानवसृष्टी आह्मां सर्व हिंदुंच्या परंपरागत नित्याच्या संकल्पात म्हटल्याप्रमाणे १९६ कोटी वर्षांपूर्वी झाली हे सिद्धांताने पक्कं कळलं नसतं आह्मांला...

१७. डार्विनचा विकासवाद नि तदाधारित मानवविकासाची कल्पना किती थोतांड आहे ह्याची कल्पना आली नसती...

१८. अनेकेश्वरवाद म्हणजे वाट्टेल तितके ईश्वर आपण शोधले असते. अर्थात ईश्वरी अवतार मानणारे अनेक जण आपल्या वादासाठी एका मर्यादेनंतर पुढे जाऊन ब्रह्मासाठी ईश्वरही नाकारतातंच म्हणा. सगळं सोयीस्कर...

१९. ब्रिटीशांनी मांडलेला भेदकारी, विध्वंसकारी आर्याक्रमण सिद्धांत अजुनही रुढंच असता. जो अजुनही भारतीय‌ विद्वानांना पाश्चात्यांच्या आत्मघातकी अंधानुकरणामुळे सोडता आला नाहीये. अजुनही वेदांमध्ये वाट्टेल तो इतिहास‌ शोधणारे पढतमूर्ख आहेतंच नि राहतील. कारण सत्य न स्वीकारण्याची मानसिकता...

२०. ब्रिटीशांनी व पुढे डाव्यांनी केलेलं भारतीय इतिहासाचे पद्धतशीर विकृतीकरण अजुनही तसंच पुढे सुरु राहिलं असतं जे सर्वप्रथम महर्षि दयानंद नि त्यांच्या पं. भगवद्दत्त वगैरै अनुयायांनी खोडून काढलंय. इतरही विद्वानांचे योगदान आहेच...

२१. दयानंद नसते तर धर्मशास्त्रात नि दैनंदिन जीवनातही काय नि कुणाला प्रमाण मानावं, आप्त कुणाला मानावे हा विवेक आह्मीं निश्चित गमावून बसलो असतो, उपासना नेमकी काय नि कशी करावी हे कळलं नसते...

२२. दैनंदिन नित्य अशा पंचमहायज्ञांचे वास्तविक स्वरुप काय ते कळलं नसतं...

२३. संस्कृत व्याकरणशास्त्राची मूळची भगवान महर्षि श्रीपाणिनीकृत आर्ष परंपरा जी मधील काळात लुप्त झाली ती पुनरुज्जीवित झाली नसती...

२४. आह्मीं नेमके कोण आहोत, आमचं नेमकं स्वरुप काय, आमचं मूळ नेमकं काय आहे हे सांगणारे अनेक जण इतिहासात झाले असले तरी श्रीदयानंदांनी ज्या पद्धतीने आमचं मूळ आह्मांला सैद्धांतिकदृष्ट्या वेदांच्या आधारे ठामपणे सांगितलं, ते कधीच आह्मांला समजलं नसतं...

काही जणांना वाटेल की ह्यातलं काही कार्य इतरही महापुरुषांनी करून ठेवलंच आहे की.‌ मग दयानंदांचं इतकं कौतुक का? तर आह्मांस सर्वच महापुरुषांविषयी‌ समान आदर आहे हे आह्मीं वरही सांगितलंच आहे, प्रत्येकाचे योगदान मान्य आहेच, पण तरी महर्षि दयानंदांनी या सगळ्याची जोड वेदांशी घातली ती महत्वाची आहे...

ह्याचा अर्थ असा नाही की दयानंदांना आह्मीं आंधळ्यासारखे सर्वोच्च प्रमाण मानतो. मूळीच नाही. उलट दयानंदांचे काही सिद्धांत आह्मांस पटत नाहीत ते तेवढ्यापुरतं आह्मीं अमान्य करतो व ठामपणे तसं लिहितोही. अंधभक्ती मूळीच‌ नाही. कुठल्याच‌ महापुरुषाची नाही...

श्रीसमर्थांच्या भाषेत..

उत्तम नि भव्य तेचिं घ्यावें, मिळमिळीत अवघेचिं टाकावें| नि:स्पृहपणें विख्यात व्हावें, भूूमंडळी|

प्रत्येक महापुरुषाचे चांगलं ते घ्यावं, त्याज्य ते‌ त्यागावं. जे व्यष्टी नि समष्टीला अनुकूल व हितावह अशी निवड करावी. हीच‌ समन्वयात्मक भूमिका असावी. सर्वांविषयी समान आदर ठेऊन. सर्वच परंपरांविषयी समान आदर ठेऊन...

ह्या जन्मद्विशताब्दीनिमित्तचा हा अंतिम लेख...

भवदीय...

पाखण्ड खण्डिणी
pakhandkhandinee.blogspot.com

#महर्षिदयानंद_सरस्वती_आर्यसमाज_वैदिकसिद्धांत_वेदापौरुषेयत्व_भारतीयइतिहास_धर्मशास्त्र


Monday, 9 January 2023

रामायण-महाभारतांवर अधिकारवाणीने व्यक्त होण्यापूर्वी...

 



(१६ नोव्हेंबरचं हे चिंतन)

श्रीमद्वाल्मीकि रामायण नि श्रीमन्महाभारत हे ग्रंथद्वय हिंदुतनमनाचे जणु श्वास नि प्रश्वास आहेत असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही. या दोन आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांनी मानवी स्वभावाला अक्षरश: वेडावून ठेवलं आहे. हे ग्रंथ वाचत असताना एका प्रामाणिक जिज्ञासु अंत:करणाच्या युवकांस किंवा कुणाही वाचकांस काही प्रश्न पडतात जसे की हे ग्रंथ सत्येतिहास खरंच आहेत काय, त्यात लिहिलंय मूळ ग्रंथकर्त्याने जसे लिहिलं तसेच आजही उपलब्ध आहे का की त्यात काही प्रक्षेप किंवा विक्षेप काळानुसार झाले आहेत काय, त्यात सत्यासत्यता किती, त्यांचा कालनिर्णय कोणता, त्याची अध्ययन पद्धती कोणती, त्यातल्या पात्रांची ऐतिह्य घटनांची यथोचित मीमांसा, त्यांच्या प्रतींची सत्यासत्यता काय वगैरे वगैरे अनेक प्रश्न पडतात. या‌ सर्वांचे समाधान करण्यासाठी काय पद्धती अवलंबावी ह्याचा‌ विचार करताना आह्मांस जे सुचलं ते मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न! 


ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।

भगवान महर्षि श्रीपतंजलि कृत व्याकरण महाभाष्य


आजीवन अखंड किंवा अध्ययनापर्यंततरी नैष्ठिक ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि षट्दर्शनांचे नि तत्संबंधित आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो. ऋतंभरा प्रज्ञेचे महत्व योगदर्शनामध्ये सांगितलं आहे. 


हे कशासाठी? ही ऋषि अवस्था कशासाठी? कारण हे दोन्ही ग्रंथ हे ऋषिकृत म्हणजे आर्षग्रंथ आहेत, यद्यपि आज ते जसे आहेत तसे मूळ नसावेतही ह्यात काहीच संदेह नाही तरीही त्यांना अभ्यासण्यासाठी ती आर्ष दृष्टी हवी...! ही दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय त्यांचे मर्म यथार्थाने कळणार नाही...!


अशा अधिकारी व्यक्तीने उपरोक्त सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर मग श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या‌-श्रीमन्महाभारताच्या विविध संस्करणांचं(एकुण चार आहेत), प्रतींचं, हस्तलिखितांचं चिकीत्सक अध्ययन करावं,  त्यावरील रामायणाच्या ३२ व महाभारताच्या ३६ अनुक्रमे अशा संस्कृत टीकांचं अध्ययन करावं, त्याच्या बडौद्याने व भांडारकरने केलेल्या चिकीत्सक प्रती(Critical edition) अभ्यासाव्यांत, परवर्ती संस्कृत‌ साहित्यावरील त्याचा प्रभावही अभ्यासावा, ज्योतिर्गणिताचे अध्ययन असावं जे वेदांगात खरंतर येतंच ज्यातून खगोलशास्त्रीय वर्णनावरून काळनिर्मितीसही लाभ होईल, हिंदुस्थानातल्या इतर भाषांतली रामायणंही अभ्यासावीत, पाश्चात्य राष्ट्रांमध्येही रामायणं कुठे-कुठे होती त्याचंही अध्ययन करावं यासंबंधी काही खंड प्रकाशित आहेत A Critical inventory of Ramayana Studies in the World या नावाने, तदनंतर पुरातत्वादि आधुनिक ज्ञानशाखाही अभ्यासाव्यांत, भूगोलाचंही अध्ययन हवं, भाषाशास्त्राचं (Linguistics) अध्ययन हवं, तत्पश्चात् वाल्मीकि रामायण नि महाभारतातले ऐतिह्य स्थलनिर्देश नि ऐतिह्य राजवंशाचे वगैरे निर्देश, वंशावळ्या, त्यातले वनस्पति नि प्राणीजन्य वर्णन (Plant and animal Diversity), त्याचा आजच्या काळाशी किंवा त्या काळाशी असलेला संबंध! इतकं न्यूनतम(🤭) अध्ययन करावं. ह्यासाठीच काही अध्यात्मिक साधना गाठीशी हवी जी वर निर्देशिली आहे. तर कुठेतरी अधिकारी होता होईल. हे न करता व्यक्त होणं नि निष्कर्षाप्रत येणं हा घाईघाईचा आत्मघात वाटतो आह्मांस. निदान आमच्या आत्मिक समाधानासाठी तरी! भले हा आयुष्यभराचा विषय असला तरी...! अशा प्रकारे अवस्था प्राप्त केलेला मनुष्य जेंव्हा रामायण-महाभारतावर भाष्य करेल, त्यावेळी तो अधिकारी समजण्यास हरकत नसावी. 



अर्थात ह्या आमच्या व्यक्तिगत मान्यता आहेत ज्या आमच्या व्यक्तिगत अध्ययनाने आह्मांस प्राप्त झालेल्या आहे. हे कुणांस पटो‌ न पटो! पण या दोन महत्वपूर्ण आर्षग्रंथांच्या अध्ययनाची एक स्वच्छ दृष्टी आपल्याला असावी म्हणून हा दृष्टिकोन आह्मांस योग्य वाटतो...! 


ज्यांनी असा इतका चिकीत्सक अभ्यास केला नसेल किंवा करायची इच्छा नसेल तरीही ते उपरोक्त विषयांवर व्यक्त होत असतील तर त्यांना आह्मीं कुठल्याही प्रकारे निंदित नाही किंवा दुर्लक्षितही नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन असु शकतो, नाही असे नाही. तात्पर्य इतकंच आहे की अभ्यासाची एक नवीन दृष्टी प्राप्त व्हावी.‌ याचा अर्थ आजपर्यंत या विषयांवर जे व्यक्त झाले ते‌ चुकीचे होते किंवा दोषी होते, न्यून होते असे मूळीच नाही. पण तरीही आह्मांस इतक्या सखोल अध्ययनाची आवश्यकता भासते. आणि इतकंच नव्हे तर कुणांस यावर आणखी काही सुचत असेल तर सुचवावेही. नवीन दृष्टिकोनाचे स्वागतंच आहे कारण इथे कुणीही सर्वज्ञ नाहीये.

काही जण‌ विचारतील की इतिहासात असे संशोधन खरंच कुणी केलंय का? उत्तर - नाही असेच वाटतं.‌ एक वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर जे स्वत: चतुर्वेद वेदभाष्यकार असल्याने अधिकारी निश्चित होते, ते त्यांच्या रामायणभाष्यावरील दहा खंडांमध्ये कुठेतरी जवळ गेले आहेत असे वाटते. पण पूर्णांशाने म्हणता येत नाही. अन्य कुणीही महाभारतावरही असे संशोधन केल्याचे दृष्टिक्षेपात माझ्या तरी नाही. महर्षि‌ दयानंद सरस्वति निश्चित अशी आर्षदृष्टी लाभलेले नि समाधी अवस्था लाभलेले अधिकारी होते पण त्यांच्यावरील सततच्या विषप्रयोगामुळे ते हाती घेतलेलं वेदभाष्यही दुर्दैवाने पूर्ण करुही शकले नाहीत यद्यपि त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट करून ठेऊन महदुपकार निश्चित केले आहेत. एक दृष्टी देण्याचे काम त्यांनी निश्चित केलं आहेच. पण मग ही पद्धत योग्य कशावरून? उत्तर - महाजनो येन गत: स‌ पन्थ:|

अखंडप्रजाजनरंजनमूर्ती मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांची नि योगेश्वर पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचीही कृपाही हवी..! खरंतर वरील अवस्था प्राप्त केलेल्याला ती झालीच असेल. किंबहुना ती एकच झाली तर अन्य सायासही कमी होतील. त्यामुळे नित्योपासना हवीच. 

या सर्वासाठी कदाचित एखाद्याचे आयुष्यही जाईल! किंवा अगदी न्युनतम पंचवीस-तीस वर्षे तरी सहज जातील. एवढा मोठ्ठा प्रकल्प खरंच करण्यांस कुणी धजेल माहिती नाही. पण अनेक जण रामायण महाभारतावर शंका विचारतात म्हणून आमचं फेसबुक बंद होते, त्याकाळात मागे १६ नोव्हेंबरला हे मागे जे सुचलं होते ते आज इथे लिहिलंय. 

काहींना वाटेल हे फारंच अति आहे. इतकं करण्यापेक्षा श्रीरामजय‌राम करत रहा की. श्रीराम प्रसन्न होतील व खरंय काय‌ ते‌ सांगतील. तर अशांना‌ सांगणं आहे की हे नामस्मरण व उपासना कुणीच नाकारत नाहीयेच. आह्मीं वरच उपासनेचे महत्वही मांडलेलंच आहे.

तो श्रीरामराया किंवा तो योगेश्वर भगवान ह्यात काही चुकीचं असेल तर योग्य मार्गदर्शन करीलही! 

सत्यसंकल्पाचा दाता तो नारायण|


भवदीय...

पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीरामायण_महाभारत_वाल्मीकि_इतिहाससंशोधन_अध्ययन_पुरातत्व_संस्कृतभाषा_वेदवेदांगे_षट्दर्शने

Wednesday, 28 December 2022

उरीं राष्ट्रभक्ती रविवत् ज्वलंत, न यें भीती चित्तीं जरीं ये कृतांत - श्रीभिडेगुरुजी

 





काल लव्ह जिहाद नि धर्मांतरणाच्या विरोधांत केज इथे सकल हिंदु समाजाच्या वतीने हिंदुधर्मरक्षण मोर्चा काढण्यांत आला होता तन्निमित्तची ही क्षणचित्रे. श्रीभवानी माता मंदिर ते श्रीछत्रपति शिवाजी महाराज‌ चौक हा दोन अडीच किमीचा मार्ग ! तीन चार सहस्त्रांच्या संख्येसमोर ऐन माध्यान्ही सूर्य डोक्यावर आला असताना अत्यंत कमी अशा वीसेक मिनीटांत विषय‌ मांडण्याचं सौभाग्य लाभलं. चित्रफीत उपलब्ध झाली की इथे पाठवतोच. त्याचा गोषवारा...

"सर्वप्रथम इतक्या बहुसंख्येने राष्ट्रप्रेमी, हिंदुसमाजप्रेमी, संविधानप्रेमी हिंदु समाज एकवटल्याहेतु सर्वांच्या चरणी नतमस्तक! आपण एक अब्ज ९६ कोटी इतकी वर्षे या पृथ्वीवर आर्य्य किंवा हिंदु किंवा भारतीय म्हणून विराजमान आहोत. भारत हा शब्द ऋग्वेदांतला आहे. आपल्या संविधानाचा आंरभही India that is Bharat असा आहे. सर्वोच्च न्यायालयाने एकंच महिन्यापूर्वी आश्विनी उपाध्यायांच्या याचिकेत धर्मांतराच्या गंभीर विषयी सर्व राज्यांनी माहिती द्यावी असा आदेश दिला आहे,  धर्मांतर हे संविधानविरोधीच आहे, १४०० वर्षांपूर्वी कुणी मुसलमान नव्हता, २००० वर्षांपूर्वी कुणी ख्रिस्ती नव्हता, २५०० वर्षांपूर्वी पारशी नव्हता, सर्वधर्मसमान नाहीतंच, जर समान आहेत तर धर्मांतरणं व लव्ह जिहाद का, जर संविधानासमोर सर्वंच समान आहेत तर मग समाननागरी विधेयक का नको, वेगवेगळे कौटुंबिक निर्बंध का(फैमिली लॉ, पर्सनल लॉ), १९८५ मध्ये अखिल भारत हिंदुसभेच्या‌ वतीने लॉ कमिशनसमोर दाखल झालेले समाननागरी विधेयक, लोकसंख्या विस्फोटीचा प्रश्न सर्वांनाच डोकेदुखी ठरेल, Planting the Cross in Asia सगळा आशिया ख्रिस्तमय करण्याचं स्वप्न, इस्लाममय करण्याचे मुस्लिमांचे स्वप्न आणि आह्मीं हिंदु भोळसट आहोत सर्वधर्मसमभावाच्या गप्पा हाणतो, छत्रपति शिवरायांच्या चरित्राचे इस्लामीकरणाचं षड्यंत्र, माता-भगिनींचे सोशल मीडिया अकाऊंट्स तपासा, घरा-घरांमध्ये नित्योपासना हवीच, हिंदुंमध्ये सामुहिक उपासनाच नसल्याने संघटन होत नाही, निदान चहा प्यायला, गप्पा मारायला तरी एकत्र या, आर्थिक नाडी भक्कम करा, केवळ हिंदुंचा हिंदुंशीच व्यापार, चीन-पापस्तानाकडून कुरघोडी सुरुच, राज्यसभेत संविधान फाडलं जातं तरी सगळे गप्प, कारण फाडणारा हिंदु नाही त्यातही ब्राह्मण नाही, फाडणारा मुसलमान, आता संविधानाचा अपमान होत नाही, संविधानाचे खरे शत्रु कोण आहेत ओळखा, तुम्ही हिंदु-मुसलमान-ख्रिस्ती कुणीही असा, भारतीय ही आपली एकंच ओळख का होऊ शकत नाही, लैंड जिहादचा प्रश्न आहे, आपली विधीज्ञांची चमु(टीम) हवी, शिवाजी जन्माला यावेत ते शेजारच्या घरात हे किती दिवस, रक्त सळसळुद्या पण डोकं शांत ठेवा, आपण निदान मावळे तरी होऊयांत, या सगळ्याला रोखायचं असेल तर आपलं संघटन व निर्बंध(कायदा) व संविधान हीच आपल्या हातीं असलेली मोठी ताकद आहे, देश वाचवायचा असेल, संविधान वाचवायचं असेल तर हिंदु बहुसंख्य राहिले पाहिजेत...आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. जागे व्हा...!"




खरंतर वेळ फारंच कमी लाभल्याने फार संक्षेपांत मला हा विषय मांडावा लागला. पण तरीही केजच्या समस्त हिंदु जनतेचे आभार व विशेषत: आमच्या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी बांधवांचे ज्यांच्या प्रेरणेने व हेतुने हे सर्व आयोजित झालं. अन्य हिंदुत्वनिष्ठ‌ संघटनांचेही तितकेच आभार व अभिनंदन...! विशेषत: आमचे धारकरी बंधु श्री शाहुराजे गुंड व सर्व धारकरी बंधु यांचे अभिनंदन व ऋणी आहे. 

हिंदुंनो रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा...! लव्ह जिहाद हे फार मोठ्ठं संकट हिंदुपुढे आहे. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे...


संपूर्ण कार्यक्रमाची संक्षिप्त चित्रफीत जोडली आहे.‌ माझ्या चिंतनाची करतोच. आमचे बंधु ⁨शिवम जवंजाळ⁩ यांचे विशेष आभार..! 


भवदीय...


#धर्मांतरण_लव्हजिहाद_इस्लाम_ख्रिस्ती_सर्वोच्चन्यायालय_संविधान_हिंदुधर्मरक्षण_उपासना_काश्मीर_पाकिस्तान

Saturday, 24 December 2022

हुकलेले गुरु नि हुकलेली शिष्य परंपरा...








ज्या‌ देशांत वेदविद्यायुक्त जितेंद्रिय योगसाधनारत पुरुष जन्माला येत नाहीत नि नेतृत्व धारण करत नाहीत, तिथे नेहमी दुराचारी, पाखंडी, धूर्त नि ठग लोकांकडून सामान्य जनतेंस फसविलें जाते...


इति महर्षि‌ दयानंद सरस्वति


आमच्याकडे वस्त्रांची लक्षावधी वर्षांची नि जगप्रसिद्ध परंपरा असताना आमच्यातले कथित गुरु जेंव्हा स्वत:ला किंवा आमच्या देवीदेवतांना ख्रिस्त्यांचे पोशाख चढवतात, त्यावेळी गत सहस्त्रावधी वर्षे आह्मीं का परदास्यतेच्या शृंखलात बद्ध होतो ह्याची जाणीव होते. अर्थात हिंदुसमाजाची मुख्य समस्या हीच आहे की आमचे मूलभूत सिद्धांत पक्के नाहीत.‌ आह्मांला आमच्या स्वधर्माचेच ज्ञान जिथे नाही, तिथे परधर्माविषयी किंवा पैशाचपंथांविषयी यथार्थता कशी असणार? जिथे अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोकंच वैचारिक दृष्ट्या इतके हुकलेले आहेत, तिथे त्यांचा शिष्य परिवार कसा असेल ह्याची‌ कल्पनाच न केलेली बरी. हिंदुंना हिंदुच शत्रु आहेत, वेगळ्या शत्रुंची आवश्यकता काय???

या अध्यात्मिक गुरुंविषयी आमच्या मनात कोणताही अनादर नाही. पण ख्रिस्त्यांचे पोशाख ह्यांनी स्वत: का घालावेत? हे समर्थनीय कसं ठरु शकतं???

आधी रामकृृष्ण मठ, त्यानंतर महायोगी अरविंदांचा पाँडेचरी आश्रम(मी स्वत: २५ डिसेंबरलाच पाहिला आहे), नुकताच रा स्व संघ हे नि असले तथाकथित गुरु नि या‌ सर्व बव्हतांश हिंदुसंघटना म्हणविणाऱ्या २५ डिसेंबर किंवा ईद, मोहर्रम आला की यांना काय सर्वधर्मसमभावाच्या उकळ्या फुटतात कळत नाही. 

ते आमच्याकडे यावेत, ते आमच्याकडे यावेत हे म्हणत आह्मीं कधी त्यांच्याकडे जाऊन सुंता करून घेऊ ह्याचेही भान हिंदुंना राहणार की नाही ह्याची भीती वाटते. अर्थात बोलायची सोयंच‌ राहिली नाही. गोळवलकर गुरुजींना कुणीतरी मुसलमान येऊन मला हिंदु व्हायचं आहे असे म्हणाल्यावर त्यांनी त्याला 'तु हिंदु न होता एक सच्चा मुसलमान बनुन दाखव' असे म्हणणं हे उदाहरण आमचं हिंदुत्व कुठल्या थराला गेलं आहे ह्याचे द्योतक आहे.त्यांनी समाननागरी विधेयकालाही विरोध केला होता हे माहिती असावं हिंदुंना...!  पण त्यांच्याविरोधांत बोलायचं नाही...

पण शूssक बोलायचं नाही... आमच्या नेतृत्वावर शंका घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला??? 


स्वधर्माभिमान तर ह्यांच्यात नाहीच पण त्यातून जी विजीगीषु वृत्ती निर्माण व्हायला तीच नसल्याने हिंदु समाज अशांनाच नेतृत्व मानत असल्याने त्याच्या अस्तित्वाविषयी अंत:करण संदेहाने भरून येतं.

तुम्ही आमच्या शिबीरात या, नुसती‌ सुदर्शन क्रिया केली तर कुंडलिनी आपोआप जागृत होते असे म्हणणारे ह्यांचे अनुयायी पाहता भगवान महर्षि श्रीपतंजलींना योगदर्शन रचून पश्चात्तापाचीच भावना निर्माण व्हायला हवी यात काय संदेह???कुंडलिनी जागृती इतकी सोप्पी कधीपासून झाली???

कलियुगांत गुरुंच्या नावाने ठग निर्माण होतील हे वचन प्रत्यही प्रत्ययांस येणारं आहे. खरंतर आमच्याकडे श्रीज्ञानोबा- श्रीतुकोबा-श्रीनामदेवराय-श्रीचोखोबा-श्रीरामदास या‌ आत्मसाक्षात्कारी संतांची व भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांसारखी इतकी उज्जल नि उदात्त गुरुपरंपरा असताना आमच्या लोकांना हे असले गुरु करावेसे वाटतात यासारखी शोकांतिका काय??? योगेश्वर भगवान श्रीकष्ण, भगवान श्रीरामचंद्रांसारखे मर्यादा पुरुषोत्तम जिथे जन्मांस आले, तिथे ही अवस्था???


पतन आणखी काय असु शकतं एखाद्या राष्ट्राचं नि धर्माचं...??? 


पण आता शिष्यवर्ग एकतर धमक्या द्यायला अंगावर येणार किंवा काहीतरी गोड समर्थन करणार या कृतीचं...! धन्य...


गेल्या दोन दशकांत अनेक सत्पुरुषांचे व त्यातल्या त्यात गत दोन शतकांतल्या महापुरुषांचे चरित्र व साहित्य अभ्यासल्यावर एकंच गोष्ट लक्षात आली ती ही की ज्यांना वैदिक धर्माच्या मूलभूत सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान नाही असे बव्हतांश महापुरुष (मागच्या दोन शतकांतले) हे इस्लाम नि ख्रिश्चनिटीचं यथार्थ आकलन करण्यांत पूर्णत: अपयशी ठरले आहेत. सर्वधर्मसमान आहेत ही विषाची घुट्टी(गुटी) जी हिंदुंना बाळकडु म्हणून सतत पाजण्यांत येते, ती त्यांच्या पेशीपेशीत, नसानसांत अशी काही जाऊन बसते‌ की कितीही नैतिक प्रगती केली तरी ह्या लोकांना त्याची सत्यासत्यता कळत नाही. केवळ तीन चार महापुरुष आहेत ज्यांचा अपवाद आहे की ज्यांनी या दोन्ही समस्यांचे यथार्थ आकलन केलं इतकंच नव्हे तर त्यावर वस्तुनिष्ठ समाधानही सुचवलं. त्यामध्ये अग्रगण नाव महर्षि दयानंदांचे येतं ज्यांनी सर्वप्रथम वैदिक धर्माची विशुद्ध मांडणी करत दुसरीकडे इस्लाम नि ख्रिश्चनिटीची तर्कशुद्घ नि वस्तुनिष्ठ पोलखोल आपल्या सत्यार्थ प्रकाश या अजरामर ग्रंथामध्ये नि अनेक ख्रिस्ती मिशनरी नि मौलवींच्या शास्त्रार्थांमधून केली. त्यांच्या आर्यसमाजी परंपरेतले स्वामी श्रद्धानंद, लजपतरायांसारखे सिंहपुरुष व पश्चात् केवळ स्वातंत्र्यवीर सावरकर हेच एकमेव ठरले. आंबेडकरांनीही ही चिकीत्सा केली पण दुसरीकडे आपल्या वैदिक हिंदु धर्माला सुरुंग लावून फोडण्याची भाषा केली. सावरकरांनीही बुद्धिवादाच्या जोरावर सर्वधर्मग्रंथ आज कालबाह्य झाले आहेत अशीही विधानं केली, जी अत्यंत अनावश्यक होती. 


भले भले अध्यात्मिक गुरु म्हणविणारे लोक जर असे वागत असतील तर ह्यांची कथित अध्यात्म परंपरा तरी चूक आहे, ह्यांची‌ साधनापद्धती तरी चूक आहे हेच लक्षात आलं पाहिजे किंवा हे लोक लोकैषणेसाठी हे करत असावेत इतकंच सत्य आहे.


त्यामुळे या‌ सर्वांमध्ये केवळ महर्षि दयानंद हेच काय ते वेगळे उठून दिसतात. वाईट ह्याचे की दयानंदांचे सिद्धांत आपल्या प्रचलित सनातन धर्माला जणु काळ आहेत असे समजुन काही सनातन्यांनी इस्लामचे व ख्रिश्चनिटीच्या संस्थापकांची भलामण केली व महर्षींची यथेच्छ निंदा केली. (शास्त्रार्थ पंचक - माधवाचार्य शास्त्री) म्हणजे दयानंद शत्रु पण इस्लामचे नि ख्रिश्चनिटीचं संस्थापक मात्र महात्मा...! रामकृष्ण मठाने प्रकाशित केलेली महात्मा येशु व ख्रिस्त ही पुस्तके जिज्ञासूंनी वाचलेलीच असतील. बंगाली लोकांचे इस्लाम प्रेम नवीन नव्हेच म्हणा. मी विवेकानंद समग्र वाचले आहेत.


त्यामुळे अनेक जण आह्मांस विचारतात की आह्मीं सारखे दयानंद दयानंद का करतो तर त्याचे हेच कारण आहे. ज्यादिवशी हिंदु समाज सत्यार्थ प्रकाश हा अमर ग्रंथ समजून घेईल, तो सुदिन असेल...! हिंदुना स्वधर्माचं ज्ञान घेणं जितंक आवश्यक आहे त्याहीपेक्षा अन्य पैैशाचपंथीयांचेही आहे. तुलनात्मक धर्मशास्त्राध्ययन ही काळाची अत्यंत आवश्यकता आहे.



भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#ख्रिश्चनिटी_नाताळ_ख्रिसमस_इस्लाम_सर्वधर्मसमभावाचे_वेड_धर्मचिकीत्सा_संतपरंपरा_अध्यात्म

Thursday, 22 December 2022

अस्तित्वात नसलेल्या ख्रिस्ताचा ख्रिसमस???

 





*The Jesus that never existed...*


जो येशु ख्रिस्त कधी अस्तित्वातंच नव्हता त्याची जयंती? आयुष्यांत कधी बायबल वाचलंय का? छे छे! अहो वाचन वगैरे कोण करणार?


*येशु ख्रिस्ताच्या अस्तित्वाचा जिथे एकही ठोस पुरावा ख्रिस्ती‌ साहित्यात नाही, तिथे इथे हिंदुस्तानात नाताळ साजरा केला जाणार...*


*पहिल्या तीन शतकांत ख्रिसमस हा कथित सण स्वत: ख्रिस्ती लोक साजरा करत नव्हते. पण मूर्ख हिंदु समाज तो उत्साहाने पाळतो. १६व्या शतकांत उदयांस आलेला प्युरिटन्स नावाचा ख्रिस्त्यांमधलाच एक समुह ज्याने इंग्लंडमध्ये ख्रिसमसला बेकायदेशीर(Illegal) घोषित केलं होते. सुरुवातीला तीन-चार शतकांमध्ये चर्चमध्येही तथाकथित ख्रिस्ताचा जन्म साजरा केलाच जात नव्हता. २५ डिसेंबर हा दिवस कसा ठरवला गेला याची‌ कथा पण मजेशीर आहे पण विस्तारभयास्तव देत नाही.*






*गोव्यामध्ये हिंदुंवर अनन्वित अत्याचार...*


*जर सर्वधर्मसमान आहेत तर हे ख्रिस्ती लोक आपल्या हिंदुंना ख्रिस्ती का करतात? इतका साधा प्रश्न आपल्याला का पडत नाही?*



*ज्या‌ ख्रिस्त्यांनी आपल्या हिंदु पूर्वजांच्या मुंडक्यांचे मनोऱ्याचे मनोरे गोव्यात इन्क्विजिशनच्या नावाने रचले, त्या ख्रिस्ताचा नाताळ आमचे बावळट हिंदु साजरा करतात. स्वधर्माभिमान? छे! ज्यांनी आपल्या इतिहासाची वाट लावली, आपल्यात कलह निर्माण केला, वाट्टेल तसा घाणेरडा इतिहास लिहून आपला बुद्धिभेद केला, त्यांचे सण साजरे करायचे?आर्याक्रमण सिद्धांत त्यांनीच मांडला, जातीयवादही त्यांनीच पेरला, ख्रिस्ताच्या प्रचारासाठी पद्धतशीर विषाची पेरणी त्यांनीच केली. पण आपल्याला हे कुठे माहिती आहे? अहो खरा इतिहास कोण वाचणार म्हणा? ट्रेंड फॉलो करायला नको का फोटोशुटिंगसाठी...? खोटा इतिहास तर भटा-बामणांनी लिहिला. हे ख्रिस्ती‌ तर आमचे देवदुत म्हणणारे होतेच की...*


*ख्रिस्ती ब्रिटीश भारतात यायच्या आधी आपण जगाच्या व्यापारापैकी एकतृतीयांश वाटा असलेला इतके श्रीमंत होतो. आपली अर्थव्यवस्था आपला व्यापार इतका समृद्ध होता. पण ब्रिटीशांनी हे ओळखलं व आपली बारा बलुतेदारांवर आधारित असलेली गावगाड्याची अर्थव्यवस्था त्यांनीच पद्धतशीर नष्ट केली. हे आपल्याला माहिती तरी आहे???*


*छत्रपति शिवरायांनी धर्मांतर करणाऱ्या चार ख्रिस्ती मिशनऱ्यांची मुंडकी छाटली होती हे अनेकांना माहिती असेलंच. हाँ हे पुरोगामी महाराष्ट्रांत‌ कधी सांगितलंच जाणार नाही. तथाकथित शिवव्याख्यातेही सांगणार नाहीत. कारण सेक्युलर शिवराय मांडायचे आहेत ना!अहो असं काय करता? आमचा राजा कुठल्या धर्माविरुद्ध नव्हता. फक्त भटा-बामणांच्या विरोधांत होता...!*


*Planting the Cross in Asia...*


एकदा गुगलवर हे पाच शब्द शोधून पहा काय येतं. सगळा आशिया ख्रिस्तमय करायचं त्यांचे स्वप्न ते उघड उघड बोलताहेत. मागे ह्यावर सविस्तर लेख लिहिलाच आहे. 


*पहिल्या एक सहस्त्रकांत आह्मीं अख्खा‌ युरोप ख्रिस्तमय केला.‌पुढील एक सहस्त्रकांत अख्खा अमेरिका खंड ख्रिस्तमय केला. आता येत्या सहस्त्रकांत म्हणजे २००१ पासून ३००० मध्ये अख्खा आशिया ख्रिस्तमय करायची त्यांची जाहीर घोषणा आहे.*


१९९९ साली पोप जॉन पॉल भारतात आला होता त्यावेळी  अटल बिहारींचे सरकार होते. त्या पोपने सरळ घोषणा केली की आह्मांला येत्या सहस्त्रकांत अख्खा आशिया ख्रिस्तमय करायचा आहे. टाईम्स नावाचे वृत्तपत्रांत आलं होते हे. गुगल करून पहा वर्तमानपत्र मिळतील त्यावेळची...


पण आह्मांला काय? 


*आह्मीं सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार...! इतिहासातून काही शिकणार तर नाहीच.*


*आह्मीं आमच्या-आमच्यातंच भांडून एकमेकांची माथी फोडणार. कुणीतरी आमच्याआमच्यात विष पेरणार व आह्मीं शत्रुला सोडून स्वकीयांनाच शत्रु समजणार व कोरेगांव भीमा घडविणार.*


हिंदुंनो, जागे व्हा, इस्लामचं संकट जितकं उघड उघड आहे, तितकंच ख्रिस्त्यांचे स्वीट पॉईजन सारखं आहे. हा ख्रिस्ती वणवा एकेदिवशी देशाला गिळून टाकेल. धर्मांतर हे राष्ट्रांतर आहे हे वेळीच ओळखा.


*सर्वधर्मसमान नाहीयेत. भोळ्या भ्रमांत जगु नका...*


आयुष्यांत एकदा तरी बायबल कुरआन वाचून काढा, काही पाप लागत नाही. मग कळेल सर्वधर्मसमान खरंच आहेत का...!


*ते सगळ्या जगाला ख्रिस्तमय व इस्लाममय करायला बसलेत. आणि आपण बसलोय सर्वधर्मसमभावाचे गोडवे गात...!*


जागे व्हा...! जागे व्हा...! जागे व्हा...!


भवदीय


#ख्रिस्तीधर्मांतर_येशुख्रिस्त_नाताळ_बायबल_गोवा_अत्याचार_राष्ट्रांतर

Tuesday, 25 October 2022

महर्षि दयानंदांचे विस्मरण - नव्हे नव्हें राष्ट्राचे मरण...!

 




आज आश्विन वद्य अमावस्या! आज‌ दीपावली! हिंदुंचा सर्वोच्च सण...! आज सुदैवाने सूर्यग्रहण होतं. दोन शतकांपूर्वी असेच ग्रहण ह्या भारतमातेला लागलं होते. एकेकाळी विश्वगुरुच्या पदांवर आरुढ असलेला हा आर्य्यावर्त, हा भारतदेश, हे प्राचीन हिंदुराष्ट्र आठशे वर्षांच्या म्लेंच्छांच्या परदास्यतेमध्ये गुंतल्यावर पुण्यश्लोक शिवाजी नि महाराणा प्रतापांसारख्या क्षत्रियोत्तमांनी त्याच्या‌‌ विमुक्ततेसाठी, अवनी मंडळ निर्यावनी करण्यासाठी आपल्या खड्गाच्या धारेने क्षातत्रेजाचं विजयी प्रदर्शन करूनही पुन्हा ब्रिटीश दस्युंच्या पारतंत्र्यात ते बद्ध झालं. याची कारणमीमांसा हा स्वतंत्र विषय‌ असला तरी वैदिक धर्माला आलेली ग्लानी हे प्रमुख कारण कुणीच नाकारणार नाही. वेदांचा झालेला दु:स्वास, अनार्ष ग्रंथांचा अनाचार, अस्पृश्यता, स्त्रियांचे ८व्या वर्षी विवाह, विधवास्त्रियांची पुनर्विवाहबंदीमुळे झालेली दु:स्थिती, सतीचप्रथेचा काहीसा आचार, जन्मजात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली जातीव्यवस्था नि त्यातून दुर्दैवाने पुढे निर्माण झालेली विषमता, चातुर्वर्ण्याचे झालेलं कर्महीनपतन, विशेषत: ब्राह्मण नि क्षत्रियांची झालेली कर्मच्युती या नि अशा कैक कारणांनी इतिहासामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रचलित विभिन्न संप्रदायांच्या बाह्य आवडंबराने हिंदुसमाज जेव्हा प्रवंचित आणि प्रपीडित होत होता, अशावेळी हिंदूंसाठी त्यांचा विशुद्ध वैदिक धर्म हा आपल्या दिव्य आभेचा प्रसार करून जनसाधारणाच्या अभ्युदय आणि नि:श्रेयसाचे साधन रूप बनणे आवश्यक होता. वेद आचरणांत आणणं आह्मीं जवळजवळ सोडूनंच दिले होते, केवळ कंठस्थ करत होतो, ते आह्मांस पुन्हा आचरणप्राप्त करून देणं आवश्यक होतं...


भारतदेश हा गुरुपरंपरा प्रमाण मानणारा! योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मथुरेच्या पाठशाळेमध्ये एक अंध दंडी संन्यासी भारतदेशाची ही अवनतावस्था पाहून व्यथित होत होता. ८१वर्षांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या साधनेने नि वेदाध्ययनाने परिप्लुत नि तप:पूत झालेला तो अनार्षग्रंथांच्या जंजालामध्ये फसलेल्या हिंदू समाजाला आर्षग्रंथांच्या उद्धाराने उद्दीपित करू इच्छित होता. परंतु स्वतः जर्जर, वयोवृद्ध आणि चक्षुहीन असल्यामुळे हे दिव्य कार्य करणे त्या सत्पुरुषाला संभव नव्हते. त्याच्या पाठशाळेमध्ये तसे अनेक छात्र येऊन गेले परंतु आपल्या गुरुच्या आदर्शांना आणि मान्यतांना चरितार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून एकमात्र ध्येयाने प्रेरित होऊन या वसुंधरेवर एका नवीन वैचारिक क्रांतीचा सूत्रपात करण्याची योग्यता त्याच्या केवळ एकाच सत्शिष्यामध्ये मध्ये होती. तो गुरु म्हणजे दंडी स्वामी विरजानंद सरस्वति आणि तो सत्शिष्य म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती! आज त्याच महर्षि दयानंदांचे पुण्यस्मरण...!


वेद हाच हिंदुंचा एकमेव उद्धाराचा मार्ग आहे हिंदुंना सतत निक्षून सांगणाऱ्या एका सत्पुरुषाची ह्या भरतभूमीला आवश्यकता होतीच होती. धर्मशोधन, शास्त्रसुधार नि प्रचलित विकृतींना ध्वस्त करण्याची प्रचंड इच्छा धुमायित अग्नीप्रमाणे ज्याच्या अंत:करणांत घनीभूत होत होती, जी योग्य संधी प्राप्त होताच प्रचंड हुताशनाच्या रुपाने प्रज्वलित होऊन तींमध्ये अज्ञान, अंधविश्वास नि जडतेचा विशाल स्तुप जळून भस्म होणं आवश्यक होतं, असे अंत:करण असलेली एकंच व्यक्ती होती महर्षि दयानंद सरस्वती! धर्माचे मंडन नि अधर्माचे खंडन करण्यासाठी शेकडो वर्षे प्रचलित असलेल्या मिथ्या धारणांच्या खंडनासाठी ज्याची जिव्हा सदैव काळपुरुषाप्रमाणे ज्वालाग्राही होती, तो कालजिव्ह होता वेदऋषि दयानंद! हे 'कालजिव्ह' नाव गुरुनेच त्यांना दिलं होतं...!


आज महर्षि दयानंदांचे‌ स्मरण का व कशासाठी???


स्वातंत्र्यपूर्वकाळात इतके महापुरुष‌ जन्माला आलेले असताना ह्या एका संन्याशाचे स्मरण कशाला? तेही दीपावलीच्या मुहूर्तावर??? त्यासाठी महर्षि दयानंदांच्या आधीची परिस्थिती पहायला हवी...


म्हणे वेद हे केवळ द्विजांसाठीच आहेत किंवा कलियुगांत केवळ शुद्रंच आहेत, अन्य वर्ण नाहीत(कलौ शुद्रौ सम्भव:), स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नयेत,उच्चारुही नयेत, वेद शंखासुराने पळवले, व्यासांनीच एका वेदांचे‌ चार विभाग केले म्हणे, वेद हे केवळ कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही, खरं ज्ञान उपनिषदांमध्येच आहे, षट्दर्शने परस्परविरोधी आहेत म्हणे, मीमांसक ईश्वर मानत नाहीत, केवळ कर्म प्रधान मानतात, नैय्यायिकही तसेच‌ काहीतरी मानतात, सांख्य व योग निरीश्वरवादी आहेत, उत्तरमीमांसाच आधीच्या दर्शनापेक्षा श्रेष्ठ असून तींत आधीच्या सर्वमतांचे खंडन आहे वगैरे‌ वगैरे, वेदांमध्ये विविध अवतारांचे वर्णन आहे, वेदांमध्ये नद्यांची, पर्वतांची वर्णने आहेत, वेदांमध्ये आपला भारतवर्षीच इतिहास आहे म्हणे, आर्य इकडून तिकडे गेल्याचे संदर्भ आहेत म्हणे, वेद काही शेकडो‌ किंवा सहस्त्रो वर्षांपूर्वी रचले गेलेत, तेही क्रमाक्रमाने, वेदांची‌ रचना ऋषींनी केली आहे म्हणें, वेदांमध्ये गायीसहित अनेक निर्दोष नि निष्पाप पशुंची हिंसा व मांसभक्षण आहे‌ वगैरे, कलिवर्ज्याचे प्रकरण, ज्यानुसार ही सर्व पशुहिंसा आज त्याज्य आहे, संन्यासही त्याज्य आहे म्हणे,(तरीही सर्व करतातंच हे) अस्पृश्यता वैदिकंच आहे म्हणें, स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकारंच नाही, त्यांनी सती गेलंच पाहिजे आदि आदि अनेक अवैदिक कुप्रथांचं, भ्रांतींचं व अनार्ष ग्रंथांचं आजच्यासारखंच ग्रहण जेंव्हा आपल्या प्राणप्रिय वैदिक धर्माला लागलं होते, तेंव्हा ह्या ग्रहणाच्या मोक्षासाठी आर्षग्रंथाचा उद्धार करण्याच्या हेतुने आर्षज्ञानप्रचंडभानु अशा दयानंद नामक दिवाकराची आवश्यकता होती.


मथुरेच्या पाठशाळेत आर्षज्ञानाची ज्योत प्रज्वलित केलेला हा योद्धा‌ संन्याशी गुरुला गुरुदक्षिणा देता झाला की भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी वेद, वेद आणि वेदांचाच प्रचार जीवनभर करीन व जे काही वेदबाह्य ते‌ त्याज्य‌ मानून आर्ष ग्रंथांचा

पुनरुद्धार करत समग्र मानवजातींस वेदांचा मार्ग दाखवीन...! समग्र मानवजातींस...!

आपला हिंदुधर्म हा ईश्वरप्रणीत व ऋषिप्रणीतंच असल्याने आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या आधारेच ह्या धर्माचा व राष्ट्राचा उद्धार‌ करण्याची विजीगीषु मानसिकता ह्या दयानंद नामक वेदवेत्त्याच्या ह्रदयी गुर्वादेशाने निर्माण झाली व जीवनभर त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वेदोद्धारक श्रीकुमारिलभट्टपादांप्रमाणेच ह्या वैय्याकरणसूर्याने प्राचीन आर्षपरंपरेला अनुसरून वैदिक ग्रंथरुपी गायीचं दोहन करून वैदिक सिद्धांतांची‌ यथार्थ पुनर्संस्थापना करण्यासाठी ऋग्वेदादिभाष्यभूमिका नि सत्यार्थ प्रकाश र्या ग्रंथद्वयांची निर्मिती केली. ज्यात‌ त्यांनी विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी तत्कालीन प्रचलित सर्व वैदिक नि अवैदिक मतांची‌ चिकीत्सा वेदांच्या आधारेच आपल्या‌ तर्कसंपन्न सुतीक्ष्ण बुद्धीने करून अखिल मानवजातींस आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला...! हे करताना काही ठिकाणी अत्यंत कठोर भाषेचा झालेला प्रयोग हा त्या सत्पुरुषाच्या‌ सात्विक‌ संतापाचा साक्षात्कार असला तरी शेवटी ह्या‌ सर्वामागे सत्याचा स्वीकार नि‌ असत्याचा त्याग हेच त्यांचे जीवनविषयक सूत्र होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 


*"सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. मनुष्याचा आत्माही त्याला सत्याकडे अग्रेसर करत असते, परंतु तोच मनुष्य हठधर्मिता, दुराग्रह, अज्ञान, अनभ्यास, अंधाभिमान, पंथाभिमान, संप्रदायाभिनिवेश, लोकापवाद, तीन प्रकारच्या ऐषणा, स्वार्थादिकता या‌कारणांंमुळे सत्याचा‌ स्वीकार करत नाही."*


इति देव दयानंद


*महर्षि दयानंदांचे साहित्य*


उपरोक्त दोन ग्रंथ, ऋग्वेदावर सप्तम मंडल ५२व्या‌सुक्तापर्यंत भाष्य, यजुर्वेदाचं‌ संपूर्ण भाष्य, वेदांग प्रकाश नावाने १६ खंड, पंचमहायज्ञविधी, वेदान्तध्वान्तनिवारण, कैक शास्त्रार्थ, आर्योद्देशरत्नमाला, संस्कारविधी, संस्कृतवाक्यप्रबोध, व्याकरण महाभाष्याचा हिंदी अनुवाद, इतरही अनेक ग्रंथ गुगलवर पहावेत. विस्तारभयास्तव सर्व सूची इथे देत नाही. आपल्या धर्माकडेचे नव्हे तर इतरही मतमतांतरांकडे आपण कसं पहावं हे पाहण्सासाठी हे सर्व ग्रंथ चिंतनीय आहेत.


*महर्षि‌ दयानंदांचे वेगळेपण कशात आहे???*


मला चारही वेदांचे भाष्य करायला चारशे वर्षे‌ लागतील असे दयानंद म्हणाले होते.‌यावरून त्यांची‌ वेदांकडे पाहण्याची दृष्टी काय होती हे लक्ष्यीं येईल. अर्थात वेदभाष्य हा किती अवघड‌ विषय आहे हेहीं कळून येईल. यात‌ काहींना अत्युक्ती वाटेल पण ज्यांना ती परंपरा ज्ञात आहे त्यांना ह्यातलं मर्म कळेलंच. आजकाल कुणीही उठतं व वेदांवर वाट्टेल ते‌ लिहितं व्यक्त होते, अशावेळी दयानंदांचे हे वाक्य महत्वाचं आहे.

शास्त्रार्थाची परंपरा उज्वल करत हिंदुंना वेदांच्या आधारावरंच‌ एकमत करायला लावणं. ह्यासाठी कैक संप्रदाय नि मतप्रणालींचे‌ खंडन करून त्यांचा‌ तळतळाटही त्यांनी भोगला, आजही भोगताहेत. पण यामागे त्यांचा हेतु शुद्ध होता. चार वेदांच्या एकाच छत्राखाली सर्व हिंदुंना एकत्र करण्याचे‌ त्यांचे‌ स्वप्न दिव्यंच‌ होतं ह्यात‌ संदेह नाही. पण हे सर्व करत असताना त्यांची भूमिका ही

*तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितै:| परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

तत्वसंग्रह

*युक्तियुक्तं ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

भास्कराचार्य

या न्यायाने दयानंदांची सर्वच मते ग्राह्य असावीत असा अट्टाहास मूळीच नाही पण तरीही ती विचार करायला लावावीत अशीच होती. हिंदुंना विचारप्रवृत्त करायला लावणारा,‌‌ सत्यासत्यतेची कसोटी प्रत्येकवेळी लावायला लावणारा हा महात्मा म्हणूनंच ब्रिटीशांच्या व काही स्वकीय‌ स्वमतांधांच्या रोषांस कारणीभूत ठरला. त्यांच्या निर्भीड अशा वैदिक डिंडिमाने‌ काही कृपमंडुक संप्रदायाभिनिवेशींना तो‌ त्यांच्या मतमतांतराचा काळ वाटला व म्हणून त्यांचा‌ कायमचा काटा‌ काढण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा घाट घातला गेला.‌ असे सतरा विषप्रयोग पूर्वी पचवलेला तो ह्या अठराव्या विषप्रयोगाने मात्र जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे निघाला. 


*महर्षि दयानंदांचे महाप्रस्थान*


*आश्विन वद्य अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*


*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*


जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणाऱ्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.


*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*


आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.


एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली


*महाराज, आपले चित्त कसे आहे?*


महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*


लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*


महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*


त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.


पुढे सायंकाळी साडेपाच वाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला


*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*


कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा


*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*


ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला. अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे


*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*


त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.


*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*


आयुष्यांत एकदा तरी सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका हे दोन ग्रंथ हिंदुंनी वाचावेत ही नम्रतेची विनंती...!


त्या महायोग्याच्या चरणी कोटी अभिवादन...!



भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_सरस्वति_पुण्यतिथी_वैदिकधर्म_सत्यार्थप्रकाश_स्वधर्माचरण_हिंदुत्व