(१६ नोव्हेंबरचं हे चिंतन)
श्रीमद्वाल्मीकि रामायण नि श्रीमन्महाभारत हे ग्रंथद्वय हिंदुतनमनाचे जणु श्वास नि प्रश्वास आहेत असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही. या दोन आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांनी मानवी स्वभावाला अक्षरश: वेडावून ठेवलं आहे. हे ग्रंथ वाचत असताना एका प्रामाणिक जिज्ञासु अंत:करणाच्या युवकांस किंवा कुणाही वाचकांस काही प्रश्न पडतात जसे की हे ग्रंथ सत्येतिहास खरंच आहेत काय, त्यात लिहिलंय मूळ ग्रंथकर्त्याने जसे लिहिलं तसेच आजही उपलब्ध आहे का की त्यात काही प्रक्षेप किंवा विक्षेप काळानुसार झाले आहेत काय, त्यात सत्यासत्यता किती, त्यांचा कालनिर्णय कोणता, त्याची अध्ययन पद्धती कोणती, त्यातल्या पात्रांची ऐतिह्य घटनांची यथोचित मीमांसा, त्यांच्या प्रतींची सत्यासत्यता काय वगैरे वगैरे अनेक प्रश्न पडतात. या सर्वांचे समाधान करण्यासाठी काय पद्धती अवलंबावी ह्याचा विचार करताना आह्मांस जे सुचलं ते मांडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न!
ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।
भगवान महर्षि श्रीपतंजलि कृत व्याकरण महाभाष्य
आजीवन अखंड किंवा अध्ययनापर्यंततरी नैष्ठिक ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि षट्दर्शनांचे नि तत्संबंधित आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला किंवा विवाह करूनही पुढे ही अवस्था प्राप्त केलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो. ऋतंभरा प्रज्ञेचे महत्व योगदर्शनामध्ये सांगितलं आहे.
हे कशासाठी? ही ऋषि अवस्था कशासाठी? कारण हे दोन्ही ग्रंथ हे ऋषिकृत म्हणजे आर्षग्रंथ आहेत, यद्यपि आज ते जसे आहेत तसे मूळ नसावेतही ह्यात काहीच संदेह नाही तरीही त्यांना अभ्यासण्यासाठी ती आर्ष दृष्टी हवी...! ही दृष्टी प्राप्त झाल्याशिवाय त्यांचे मर्म यथार्थाने कळणार नाही...!
अशा अधिकारी व्यक्तीने उपरोक्त सिद्धावस्था प्राप्त झाल्यावर मग श्रीमद्वाल्मीकि रामायणाच्या-श्रीमन्महाभारताच्या विविध संस्करणांचं(एकुण चार आहेत), प्रतींचं, हस्तलिखितांचं चिकीत्सक अध्ययन करावं, त्यावरील रामायणाच्या ३२ व महाभारताच्या ३६ अनुक्रमे अशा संस्कृत टीकांचं अध्ययन करावं, त्याच्या बडौद्याने व भांडारकरने केलेल्या चिकीत्सक प्रती(Critical edition) अभ्यासाव्यांत, परवर्ती संस्कृत साहित्यावरील त्याचा प्रभावही अभ्यासावा, ज्योतिर्गणिताचे अध्ययन असावं जे वेदांगात खरंतर येतंच ज्यातून खगोलशास्त्रीय वर्णनावरून काळनिर्मितीसही लाभ होईल, हिंदुस्थानातल्या इतर भाषांतली रामायणंही अभ्यासावीत, पाश्चात्य राष्ट्रांमध्येही रामायणं कुठे-कुठे होती त्याचंही अध्ययन करावं यासंबंधी काही खंड प्रकाशित आहेत A Critical inventory of Ramayana Studies in the World या नावाने, तदनंतर पुरातत्वादि आधुनिक ज्ञानशाखाही अभ्यासाव्यांत, भूगोलाचंही अध्ययन हवं, भाषाशास्त्राचं (Linguistics) अध्ययन हवं, तत्पश्चात् वाल्मीकि रामायण नि महाभारतातले ऐतिह्य स्थलनिर्देश नि ऐतिह्य राजवंशाचे वगैरे निर्देश, वंशावळ्या, त्यातले वनस्पति नि प्राणीजन्य वर्णन (Plant and animal Diversity), त्याचा आजच्या काळाशी किंवा त्या काळाशी असलेला संबंध! इतकं न्यूनतम(🤭) अध्ययन करावं. ह्यासाठीच काही अध्यात्मिक साधना गाठीशी हवी जी वर निर्देशिली आहे. तर कुठेतरी अधिकारी होता होईल. हे न करता व्यक्त होणं नि निष्कर्षाप्रत येणं हा घाईघाईचा आत्मघात वाटतो आह्मांस. निदान आमच्या आत्मिक समाधानासाठी तरी! भले हा आयुष्यभराचा विषय असला तरी...! अशा प्रकारे अवस्था प्राप्त केलेला मनुष्य जेंव्हा रामायण-महाभारतावर भाष्य करेल, त्यावेळी तो अधिकारी समजण्यास हरकत नसावी.
अर्थात ह्या आमच्या व्यक्तिगत मान्यता आहेत ज्या आमच्या व्यक्तिगत अध्ययनाने आह्मांस प्राप्त झालेल्या आहे. हे कुणांस पटो न पटो! पण या दोन महत्वपूर्ण आर्षग्रंथांच्या अध्ययनाची एक स्वच्छ दृष्टी आपल्याला असावी म्हणून हा दृष्टिकोन आह्मांस योग्य वाटतो...!
ज्यांनी असा इतका चिकीत्सक अभ्यास केला नसेल किंवा करायची इच्छा नसेल तरीही ते उपरोक्त विषयांवर व्यक्त होत असतील तर त्यांना आह्मीं कुठल्याही प्रकारे निंदित नाही किंवा दुर्लक्षितही नाही. प्रत्येकाचा दृष्टिकोन असु शकतो, नाही असे नाही. तात्पर्य इतकंच आहे की अभ्यासाची एक नवीन दृष्टी प्राप्त व्हावी. याचा अर्थ आजपर्यंत या विषयांवर जे व्यक्त झाले ते चुकीचे होते किंवा दोषी होते, न्यून होते असे मूळीच नाही. पण तरीही आह्मांस इतक्या सखोल अध्ययनाची आवश्यकता भासते. आणि इतकंच नव्हे तर कुणांस यावर आणखी काही सुचत असेल तर सुचवावेही. नवीन दृष्टिकोनाचे स्वागतंच आहे कारण इथे कुणीही सर्वज्ञ नाहीये.
काही जण विचारतील की इतिहासात असे संशोधन खरंच कुणी केलंय का? उत्तर - नाही असेच वाटतं. एक वेदमहर्षि श्रीपाद दामोदर सातवळेकर जे स्वत: चतुर्वेद वेदभाष्यकार असल्याने अधिकारी निश्चित होते, ते त्यांच्या रामायणभाष्यावरील दहा खंडांमध्ये कुठेतरी जवळ गेले आहेत असे वाटते. पण पूर्णांशाने म्हणता येत नाही. अन्य कुणीही महाभारतावरही असे संशोधन केल्याचे दृष्टिक्षेपात माझ्या तरी नाही. महर्षि दयानंद सरस्वति निश्चित अशी आर्षदृष्टी लाभलेले नि समाधी अवस्था लाभलेले अधिकारी होते पण त्यांच्यावरील सततच्या विषप्रयोगामुळे ते हाती घेतलेलं वेदभाष्यही दुर्दैवाने पूर्ण करुही शकले नाहीत यद्यपि त्यांनी त्यामागची भूमिका स्पष्ट करून ठेऊन महदुपकार निश्चित केले आहेत. एक दृष्टी देण्याचे काम त्यांनी निश्चित केलं आहेच. पण मग ही पद्धत योग्य कशावरून? उत्तर - महाजनो येन गत: स पन्थ:|
अखंडप्रजाजनरंजनमूर्ती मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांची नि योगेश्वर पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचीही कृपाही हवी..! खरंतर वरील अवस्था प्राप्त केलेल्याला ती झालीच असेल. किंबहुना ती एकच झाली तर अन्य सायासही कमी होतील. त्यामुळे नित्योपासना हवीच.
या सर्वासाठी कदाचित एखाद्याचे आयुष्यही जाईल! किंवा अगदी न्युनतम पंचवीस-तीस वर्षे तरी सहज जातील. एवढा मोठ्ठा प्रकल्प खरंच करण्यांस कुणी धजेल माहिती नाही. पण अनेक जण रामायण महाभारतावर शंका विचारतात म्हणून आमचं फेसबुक बंद होते, त्याकाळात मागे १६ नोव्हेंबरला हे मागे जे सुचलं होते ते आज इथे लिहिलंय.
काहींना वाटेल हे फारंच अति आहे. इतकं करण्यापेक्षा श्रीरामजयराम करत रहा की. श्रीराम प्रसन्न होतील व खरंय काय ते सांगतील. तर अशांना सांगणं आहे की हे नामस्मरण व उपासना कुणीच नाकारत नाहीयेच. आह्मीं वरच उपासनेचे महत्वही मांडलेलंच आहे.
तो श्रीरामराया किंवा तो योगेश्वर भगवान ह्यात काही चुकीचं असेल तर योग्य मार्गदर्शन करीलही!
सत्यसंकल्पाचा दाता तो नारायण|
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#श्रीरामायण_महाभारत_वाल्मीकि_इतिहाससंशोधन_अध्ययन_पुरातत्व_संस्कृतभाषा_वेदवेदांगे_षट्दर्शने
No comments:
Post a Comment