Wednesday, 15 February 2023

उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

 



उपासनेचा मोठा आश्रयो| उपासनेवीण निराश्रयो|

उदंड केले तरी तो जयो| प्राप्त नाही|

दासबोध - १६|१०|२९


श्रीदासनवमी अर्थात राष्ट्रगुरु समर्थ श्रीरामदास पुण्यस्मरण...


उपासनेने काय होऊ शकतं याचं प्रत्यंतर सर्वच संतांप्रमाणे ठोसरांच्याही कुटुंबात येतं. श्रीमहिपतींच्या संतविजयात म्हटल्याप्रमाणे समर्थांचे पिताश्री श्रीसूर्याजीपंत वयाच्या १२ व्या वर्षापासून पुढे २४ वर्षे सूर्योपासक होते. त्यांची नित्याची गायत्र्योपासना ही


बारा सहस्त्र जप नित्य, करित असे एकाग्र चित्त|

बारा वर्षे लोटता सत्य, साक्षात् आदित्य भेटला|

संतविजय - १|२७


नित्य गायत्रीचा १२,००० इतका जप ! या जोडीलाच १००० सूर्यनमस्कार. इतकी साधना ठोसरांची न्यूनतम १२ वर्षे (काही ठिकाणी २४ वर्षे) सुरु होती. 


त्या सूर्यप्रभावें, पुत्र झाला दैदिप्यमान|

म्हणोनिं नाम नारायण, ठेविलें तयाचें|

श्रीदासगणु महाराज


ठोसरांच्या वंशात पिढ्यान्पिढ्यांच्या सुर्योपासनेने जो सूर्यासारखा दैदिप्यमान तेजस्वी पुत्र नारायणाच्या रुपाने जन्मांस आला, त्या नारायणाने चिंता करितों विश्वाची म्हणत तत्कालीन पतित अशा भारतवर्षाचा उद्धार करण्याच्या हेतुने तत्कालीन देशकालवर्तमान चिंताग्रस्त होऊन व्यक्तिगत संसारसुखावर लाथ मारून द्वादश वर्षे गोदातटाकीं त्याच रविकुळटिळकाच्या प्राप्तिस्तव


आचरुनि तपश्चर्येला रघुनंदन आपुला केला ताटकीं| प्रगटला पुढें श्रीराम सुजनविश्राम विमलसुखधाम अहल्योद्धारी| हे भवभयसंकटवारी ताटकीं| - पू. श्रीदासगणु महाराजांची रचना.


तेरा कोटी श्रीरामनामाचा जप नि गायत्रीची कैक पुरश्चरणं केली..! श्रीसमर्थांच्या जीवनाचं‌ सार श्रीसमर्थांनी स्वत:च जे सांगितलंय, ते या एकाच शब्दांत


उपासना, उपासना, उपासना, उपासना|


मध्येच आहे. रामसोहळ्यामध्ये श्रीमेरुस्वामींनी म्हटल्याप्रमाणे


नित्य विध्युक्त प्रात:स्नान, काळत्रय संध्यावंदन|सहस्त्र गायत्री उच्चारोन, आराध्यमंत्र जपिजे| 

४८|३८


श्रीसमर्थांनी तपकाळात गायत्रीची कैक पुरश्चरणे केली होती, जींत नित्य १००० किंवा १२०० इतकी गायत्र्योपासना होतीच. आपल्या सर्व प्राचीन शास्त्रकारांनी नित्य संध्योपासनेमध्ये किंवा अगदी स्वतंत्र असा १२०० इतका गायत्रीचा जप सर्वश्रेष्ठ उपासना म्हणून सांगितला आहेच. यावर प्रमाणासहित स्वतंत्र विवेचन कधीतरी करेन. आता हा लगेचंच इतका कुणाला जमेल की नाही म्हणून अधिकारभेदाने अन्य मंत्रांची उपासनाही सांगितलीय. श्रीसमर्थांनी तर गायत्रीबरोबर उपास्यदैवत श्रीरामनामाची उपासनाही केलीय. दोन्ही एकत्र का केलं असावं असा प्रश्न साहजिकंय. वास्तविक गायत्री नित्य १२०० केला तर अन्य कुठल्या मंत्राची उपासना करावीच कशाला असा प्रश्न स्वाभाविकंय. पण ह्याचे उत्तर समर्थांनी स्वत: दिलंय दासबोधामध्ये. श्रीसमर्थ म्हणतात


नाना पुरश्चरणें करावी| नाना तीर्थाटणें फिरावी|

नाना सामर्थ्यें वाढवावी| वैराग्यबळें| 

दासबोध - १०|७|१३


सकाळी एकदाच गायत्री केली की काम भागलं असे नव्हे तर दिवसभर पुन्हा नामानुसंधान रहावं म्हणून उपासना सांगितलीय. चित्तशुद्धीसाठी हे सर्व आवश्यक आहे.


सर्व संतांनी नामंच घ्यायला का सांगितलंय???


कुठल्याही संतांचे चरित्र उघडून पाहिलं तरी हाच उपदेश दिसतो की नाम घ्या.


आता प्रश्न असा पडतो की नामस्मरण का करावं, जप का करावा? नामजपाने काय फल प्राप्त होतं? या‌सर्व प्रश्नांची उत्तरे षट्दर्शनांनीच प्राप्त होतात.  त्याशिवाय शंका समाधानंच होत नाही. म्हणून तर आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी षट्दर्शने रचली. महर्षि भगवान पतंजली योगदर्शनामध्ये म्हणतात


तज्जपस्तदर्थभावनम्| योगदर्शन - १|१|२८


प्रणवाचा जप करणे म्हणजे प्रणवाने दाखविला जाणारा जो ईश्वर आहे त्याची भावना करणे. ज्याचा जप आपण करतो, त्याची भावना आपण करतो. कारण नाम नि नामी अभिन्न असल्याने नामाच्या निर्देशाने त्या नामीचाच बोध होते व आपल्याला त्याची भावना होते.


त्याचे आणखी फल काय? योगदर्शनकार पुढे म्हणतात


ततः प्रत्यक्चेतनाधिगमोऽप्यन्तरायाभावश्च।।१|२९


परमेश्वराच्या चिंतनाने व्याधि, संशय इत्यादि विघ्ने निर्माण होत नाहीत, स्वरुपाचे दर्शन होते, मनाला त्रास उत्पन्न करणारी एकुण ९ विघ्ने आहेत ती पुन्हा केंव्हातरी अभ्यासु. तूर्तास चित्तांस निर्माण होणारी प्रक्षुब्धता, अस्वस्थता, अस्थिरता, सर्व दोष हे सर्व नामस्मरणाने दूर होतात. म्हणून सर्व संतांनी पुन: पुन: नाम घ्यायला सांगितलंय.


खरंतर षट्दर्शने अभ्यासली तर हे सर्व कळेल.पण ती अभ्यासायला तितका वेळ आपल्याला नसतो नि तसा योग्य गुरुही शिकवायला नसतो. म्हणूनंच 'वेदमार्ग मुनी गेले, करु संती केलें तें|' या श्रीतुकोबारायांच्या वचनाप्रमाणे संतांनी सांगितले व केले, तेच आपण करावं कारण त्यांना त्याची प्रचिती असल्याने. आपली अक्कल जास्त चालवु नये. अतितर्काने माती होते. उपसानेच्या दृढाश्रयानेच समर्थ होता येतं. श्रीसमर्थाच्या जीवनाचे आणखी मर्म म्हणजे


समर्थे समर्थ करावें|


आपणांसही ते समर्थ व्हायचं असेल तर ही उपासना हीच एकमेव तारणहार आहे. आज श्रीसमर्थांच्या पुण्यस्मरणी इतकंच...


असो ऐसें सकळहि गेलें, परंतु येकचिं राहिलें| 

जे स्वरुपाकारी जाहलें, आत्मज्ञानी|

दासबोध


भवदीय...


#श्रीसमर्थ_दासनवमी_पुण्यतिथी_सज्जनगड_रामदासीसंप्रदाय_उपासना_षट्दर्शने_वैदिकहिंदुधर्म

No comments:

Post a Comment