Tuesday, 25 October 2022

महर्षि दयानंदांचे विस्मरण - नव्हे नव्हें राष्ट्राचे मरण...!

 




आज आश्विन वद्य अमावस्या! आज‌ दीपावली! हिंदुंचा सर्वोच्च सण...! आज सुदैवाने सूर्यग्रहण होतं. दोन शतकांपूर्वी असेच ग्रहण ह्या भारतमातेला लागलं होते. एकेकाळी विश्वगुरुच्या पदांवर आरुढ असलेला हा आर्य्यावर्त, हा भारतदेश, हे प्राचीन हिंदुराष्ट्र आठशे वर्षांच्या म्लेंच्छांच्या परदास्यतेमध्ये गुंतल्यावर पुण्यश्लोक शिवाजी नि महाराणा प्रतापांसारख्या क्षत्रियोत्तमांनी त्याच्या‌‌ विमुक्ततेसाठी, अवनी मंडळ निर्यावनी करण्यासाठी आपल्या खड्गाच्या धारेने क्षातत्रेजाचं विजयी प्रदर्शन करूनही पुन्हा ब्रिटीश दस्युंच्या पारतंत्र्यात ते बद्ध झालं. याची कारणमीमांसा हा स्वतंत्र विषय‌ असला तरी वैदिक धर्माला आलेली ग्लानी हे प्रमुख कारण कुणीच नाकारणार नाही. वेदांचा झालेला दु:स्वास, अनार्ष ग्रंथांचा अनाचार, अस्पृश्यता, स्त्रियांचे ८व्या वर्षी विवाह, विधवास्त्रियांची पुनर्विवाहबंदीमुळे झालेली दु:स्थिती, सतीचप्रथेचा काहीसा आचार, जन्मजात वर्णव्यवस्थेने निर्माण केलेली जातीव्यवस्था नि त्यातून दुर्दैवाने पुढे निर्माण झालेली विषमता, चातुर्वर्ण्याचे झालेलं कर्महीनपतन, विशेषत: ब्राह्मण नि क्षत्रियांची झालेली कर्मच्युती या नि अशा कैक कारणांनी इतिहासामध्ये मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रचलित विभिन्न संप्रदायांच्या बाह्य आवडंबराने हिंदुसमाज जेव्हा प्रवंचित आणि प्रपीडित होत होता, अशावेळी हिंदूंसाठी त्यांचा विशुद्ध वैदिक धर्म हा आपल्या दिव्य आभेचा प्रसार करून जनसाधारणाच्या अभ्युदय आणि नि:श्रेयसाचे साधन रूप बनणे आवश्यक होता. वेद आचरणांत आणणं आह्मीं जवळजवळ सोडूनंच दिले होते, केवळ कंठस्थ करत होतो, ते आह्मांस पुन्हा आचरणप्राप्त करून देणं आवश्यक होतं...


भारतदेश हा गुरुपरंपरा प्रमाण मानणारा! योगेश्वर भगवान श्रीकृष्णाच्या जन्मस्थानी मथुरेच्या पाठशाळेमध्ये एक अंध दंडी संन्यासी भारतदेशाची ही अवनतावस्था पाहून व्यथित होत होता. ८१वर्षांच्या आजीवन अखंड ब्रह्मचर्याच्या साधनेने नि वेदाध्ययनाने परिप्लुत नि तप:पूत झालेला तो अनार्षग्रंथांच्या जंजालामध्ये फसलेल्या हिंदू समाजाला आर्षग्रंथांच्या उद्धाराने उद्दीपित करू इच्छित होता. परंतु स्वतः जर्जर, वयोवृद्ध आणि चक्षुहीन असल्यामुळे हे दिव्य कार्य करणे त्या सत्पुरुषाला संभव नव्हते. त्याच्या पाठशाळेमध्ये तसे अनेक छात्र येऊन गेले परंतु आपल्या गुरुच्या आदर्शांना आणि मान्यतांना चरितार्थ करण्याच्या दृष्टिकोनातून एकमात्र ध्येयाने प्रेरित होऊन या वसुंधरेवर एका नवीन वैचारिक क्रांतीचा सूत्रपात करण्याची योग्यता त्याच्या केवळ एकाच सत्शिष्यामध्ये मध्ये होती. तो गुरु म्हणजे दंडी स्वामी विरजानंद सरस्वति आणि तो सत्शिष्य म्हणजे महर्षी दयानंद सरस्वती! आज त्याच महर्षि दयानंदांचे पुण्यस्मरण...!


वेद हाच हिंदुंचा एकमेव उद्धाराचा मार्ग आहे हिंदुंना सतत निक्षून सांगणाऱ्या एका सत्पुरुषाची ह्या भरतभूमीला आवश्यकता होतीच होती. धर्मशोधन, शास्त्रसुधार नि प्रचलित विकृतींना ध्वस्त करण्याची प्रचंड इच्छा धुमायित अग्नीप्रमाणे ज्याच्या अंत:करणांत घनीभूत होत होती, जी योग्य संधी प्राप्त होताच प्रचंड हुताशनाच्या रुपाने प्रज्वलित होऊन तींमध्ये अज्ञान, अंधविश्वास नि जडतेचा विशाल स्तुप जळून भस्म होणं आवश्यक होतं, असे अंत:करण असलेली एकंच व्यक्ती होती महर्षि दयानंद सरस्वती! धर्माचे मंडन नि अधर्माचे खंडन करण्यासाठी शेकडो वर्षे प्रचलित असलेल्या मिथ्या धारणांच्या खंडनासाठी ज्याची जिव्हा सदैव काळपुरुषाप्रमाणे ज्वालाग्राही होती, तो कालजिव्ह होता वेदऋषि दयानंद! हे 'कालजिव्ह' नाव गुरुनेच त्यांना दिलं होतं...!


आज महर्षि दयानंदांचे‌ स्मरण का व कशासाठी???


स्वातंत्र्यपूर्वकाळात इतके महापुरुष‌ जन्माला आलेले असताना ह्या एका संन्याशाचे स्मरण कशाला? तेही दीपावलीच्या मुहूर्तावर??? त्यासाठी महर्षि दयानंदांच्या आधीची परिस्थिती पहायला हवी...


म्हणे वेद हे केवळ द्विजांसाठीच आहेत किंवा कलियुगांत केवळ शुद्रंच आहेत, अन्य वर्ण नाहीत(कलौ शुद्रौ सम्भव:), स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नयेत,उच्चारुही नयेत, वेद शंखासुराने पळवले, व्यासांनीच एका वेदांचे‌ चार विभाग केले म्हणे, वेद हे केवळ कर्मकांडासाठीच आहेत, त्यांचे अन्य कोणतंही प्रयोजन नाही, खरं ज्ञान उपनिषदांमध्येच आहे, षट्दर्शने परस्परविरोधी आहेत म्हणे, मीमांसक ईश्वर मानत नाहीत, केवळ कर्म प्रधान मानतात, नैय्यायिकही तसेच‌ काहीतरी मानतात, सांख्य व योग निरीश्वरवादी आहेत, उत्तरमीमांसाच आधीच्या दर्शनापेक्षा श्रेष्ठ असून तींत आधीच्या सर्वमतांचे खंडन आहे वगैरे‌ वगैरे, वेदांमध्ये विविध अवतारांचे वर्णन आहे, वेदांमध्ये नद्यांची, पर्वतांची वर्णने आहेत, वेदांमध्ये आपला भारतवर्षीच इतिहास आहे म्हणे, आर्य इकडून तिकडे गेल्याचे संदर्भ आहेत म्हणे, वेद काही शेकडो‌ किंवा सहस्त्रो वर्षांपूर्वी रचले गेलेत, तेही क्रमाक्रमाने, वेदांची‌ रचना ऋषींनी केली आहे म्हणें, वेदांमध्ये गायीसहित अनेक निर्दोष नि निष्पाप पशुंची हिंसा व मांसभक्षण आहे‌ वगैरे, कलिवर्ज्याचे प्रकरण, ज्यानुसार ही सर्व पशुहिंसा आज त्याज्य आहे, संन्यासही त्याज्य आहे म्हणे,(तरीही सर्व करतातंच हे) अस्पृश्यता वैदिकंच आहे म्हणें, स्त्रियांना पुनर्विवाहाचा अधिकारंच नाही, त्यांनी सती गेलंच पाहिजे आदि आदि अनेक अवैदिक कुप्रथांचं, भ्रांतींचं व अनार्ष ग्रंथांचं आजच्यासारखंच ग्रहण जेंव्हा आपल्या प्राणप्रिय वैदिक धर्माला लागलं होते, तेंव्हा ह्या ग्रहणाच्या मोक्षासाठी आर्षग्रंथाचा उद्धार करण्याच्या हेतुने आर्षज्ञानप्रचंडभानु अशा दयानंद नामक दिवाकराची आवश्यकता होती.


मथुरेच्या पाठशाळेत आर्षज्ञानाची ज्योत प्रज्वलित केलेला हा योद्धा‌ संन्याशी गुरुला गुरुदक्षिणा देता झाला की भारतवर्षाचा उद्धार करण्यासाठी वेद, वेद आणि वेदांचाच प्रचार जीवनभर करीन व जे काही वेदबाह्य ते‌ त्याज्य‌ मानून आर्ष ग्रंथांचा

पुनरुद्धार करत समग्र मानवजातींस वेदांचा मार्ग दाखवीन...! समग्र मानवजातींस...!

आपला हिंदुधर्म हा ईश्वरप्रणीत व ऋषिप्रणीतंच असल्याने आर्ष म्हणजे ऋषिप्रणीत ग्रंथांच्या आधारेच ह्या धर्माचा व राष्ट्राचा उद्धार‌ करण्याची विजीगीषु मानसिकता ह्या दयानंद नामक वेदवेत्त्याच्या ह्रदयी गुर्वादेशाने निर्माण झाली व जीवनभर त्या आदेशाचे पालन करण्यासाठी वेदोद्धारक श्रीकुमारिलभट्टपादांप्रमाणेच ह्या वैय्याकरणसूर्याने प्राचीन आर्षपरंपरेला अनुसरून वैदिक ग्रंथरुपी गायीचं दोहन करून वैदिक सिद्धांतांची‌ यथार्थ पुनर्संस्थापना करण्यासाठी ऋग्वेदादिभाष्यभूमिका नि सत्यार्थ प्रकाश र्या ग्रंथद्वयांची निर्मिती केली. ज्यात‌ त्यांनी विशुद्ध वैदिक मताच्या पुनर्संस्थापनेसाठी तत्कालीन प्रचलित सर्व वैदिक नि अवैदिक मतांची‌ चिकीत्सा वेदांच्या आधारेच आपल्या‌ तर्कसंपन्न सुतीक्ष्ण बुद्धीने करून अखिल मानवजातींस आपल्या आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला...! हे करताना काही ठिकाणी अत्यंत कठोर भाषेचा झालेला प्रयोग हा त्या सत्पुरुषाच्या‌ सात्विक‌ संतापाचा साक्षात्कार असला तरी शेवटी ह्या‌ सर्वामागे सत्याचा स्वीकार नि‌ असत्याचा त्याग हेच त्यांचे जीवनविषयक सूत्र होतं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर 


*"सत्याचा स्वीकार आणि असत्याचा त्याग हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. मनुष्याचा आत्माही त्याला सत्याकडे अग्रेसर करत असते, परंतु तोच मनुष्य हठधर्मिता, दुराग्रह, अज्ञान, अनभ्यास, अंधाभिमान, पंथाभिमान, संप्रदायाभिनिवेश, लोकापवाद, तीन प्रकारच्या ऐषणा, स्वार्थादिकता या‌कारणांंमुळे सत्याचा‌ स्वीकार करत नाही."*


इति देव दयानंद


*महर्षि दयानंदांचे साहित्य*


उपरोक्त दोन ग्रंथ, ऋग्वेदावर सप्तम मंडल ५२व्या‌सुक्तापर्यंत भाष्य, यजुर्वेदाचं‌ संपूर्ण भाष्य, वेदांग प्रकाश नावाने १६ खंड, पंचमहायज्ञविधी, वेदान्तध्वान्तनिवारण, कैक शास्त्रार्थ, आर्योद्देशरत्नमाला, संस्कारविधी, संस्कृतवाक्यप्रबोध, व्याकरण महाभाष्याचा हिंदी अनुवाद, इतरही अनेक ग्रंथ गुगलवर पहावेत. विस्तारभयास्तव सर्व सूची इथे देत नाही. आपल्या धर्माकडेचे नव्हे तर इतरही मतमतांतरांकडे आपण कसं पहावं हे पाहण्सासाठी हे सर्व ग्रंथ चिंतनीय आहेत.


*महर्षि‌ दयानंदांचे वेगळेपण कशात आहे???*


मला चारही वेदांचे भाष्य करायला चारशे वर्षे‌ लागतील असे दयानंद म्हणाले होते.‌यावरून त्यांची‌ वेदांकडे पाहण्याची दृष्टी काय होती हे लक्ष्यीं येईल. अर्थात वेदभाष्य हा किती अवघड‌ विषय आहे हेहीं कळून येईल. यात‌ काहींना अत्युक्ती वाटेल पण ज्यांना ती परंपरा ज्ञात आहे त्यांना ह्यातलं मर्म कळेलंच. आजकाल कुणीही उठतं व वेदांवर वाट्टेल ते‌ लिहितं व्यक्त होते, अशावेळी दयानंदांचे हे वाक्य महत्वाचं आहे.

शास्त्रार्थाची परंपरा उज्वल करत हिंदुंना वेदांच्या आधारावरंच‌ एकमत करायला लावणं. ह्यासाठी कैक संप्रदाय नि मतप्रणालींचे‌ खंडन करून त्यांचा‌ तळतळाटही त्यांनी भोगला, आजही भोगताहेत. पण यामागे त्यांचा हेतु शुद्ध होता. चार वेदांच्या एकाच छत्राखाली सर्व हिंदुंना एकत्र करण्याचे‌ त्यांचे‌ स्वप्न दिव्यंच‌ होतं ह्यात‌ संदेह नाही. पण हे सर्व करत असताना त्यांची भूमिका ही

*तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितै:| परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

तत्वसंग्रह

*युक्तियुक्तं ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्|*

भास्कराचार्य

या न्यायाने दयानंदांची सर्वच मते ग्राह्य असावीत असा अट्टाहास मूळीच नाही पण तरीही ती विचार करायला लावावीत अशीच होती. हिंदुंना विचारप्रवृत्त करायला लावणारा,‌‌ सत्यासत्यतेची कसोटी प्रत्येकवेळी लावायला लावणारा हा महात्मा म्हणूनंच ब्रिटीशांच्या व काही स्वकीय‌ स्वमतांधांच्या रोषांस कारणीभूत ठरला. त्यांच्या निर्भीड अशा वैदिक डिंडिमाने‌ काही कृपमंडुक संप्रदायाभिनिवेशींना तो‌ त्यांच्या मतमतांतराचा काळ वाटला व म्हणून त्यांचा‌ कायमचा काटा‌ काढण्यासाठी त्यांच्यावर विषप्रयोग करण्याचा घाट घातला गेला.‌ असे सतरा विषप्रयोग पूर्वी पचवलेला तो ह्या अठराव्या विषप्रयोगाने मात्र जीवनाच्या अंतिम प्रवासाकडे निघाला. 


*महर्षि दयानंदांचे महाप्रस्थान*


*आश्विन वद्य अमावस्या - ३० ऑक्टोबर, १८८३*


*हा माझा अंतसमय जवळ आलाय, उपचार सोडून द्या आता.*


जहाल विषप्रयोगाने शरीरावर आलेल्या फोडांतून होणारा रक्तस्त्राव सहन करत हा महात्मा आधी काही काळ प्रात:काली ११ वाजता शौच-मुखमार्जन करून, दंतधावन करून, क्षौर करून स्नानासाठी उत्सुक असूनही वैद्यांच्या आदेशे ते करु शकला नाही. ओल्या वस्त्राने शरीर स्वच्छ करताच फोडांमधून वाहणाऱ्या रक्ताने श्वास तीव्रगतीने सुरु झाला.


*एका महायोग्याच्या महाप्रस्थानाचा हा आरंभ होता*


आपलं मन, प्राण तथा आत्मा संपूर्णत: एकाग्र करून त्या परब्रह्म परमात्म्यांवर केंद्रित करून हा योगी महानिर्वाणांस निघाला.


एका शिष्याने त्यासमयी पृच्छा केली


*महाराज, आपले चित्त कसे आहे?*


महर्षि दयानंद - *छान आहे. आज एक मासाने आम्हांस विश्रांतीचा समय प्राप्त झाला आहे.*


लाला जीवनदासांचा प्रश्न - *आपण कुठे आहात ?*


महर्षींचे उत्तर - *ईश्वरेच्छेमध्येच !*


त्या प्रभुभक्त संन्याशाने आपले स्वत्व त्या ईश्वरांस अर्पण केलं.


पुढे सायंकाळी साडेपाच वाजता शिष्यांनी आणखी विचारलं की आता आपले चित्त कसंय?त्यावेळी हा ऋषी उत्तरला


*छान आहे. प्रकाश(तेज) आणि अंध:काराचा भाव आहे.*


कुणाला काहीच समजलं नाही. पुढे त्या ऋषीने तिथी नि वार ज्ञात करून वेदमंत्रांचे पठण केलं. संस्कृत भाषेत ईशस्तवन केलं. तत्पश्चात हिंदी भाषेत परमेश्वराचा गुणानुवाद करून श्रेष्ठ अशा गायत्री मंत्रांचा जप करून आपल्या उत्फुल्ल वदनाने प्रिय अशा


*ॐ विश्वा॑नि देव सवितर्दुरि॒तानि॒ परा॑ सुव । यद्भ॒द्रं तन्न॒ आ सु॑व ॥*


ह्या ऋग्वेदातल्या ५.८२.५ येथील प्रिय मंत्रांचा गंभीर स्वरोच्चार केला. अनेकवेळा पुन्हा पुन्हा उच्चार केला. काही वेळ समाधी अवस्थेत जाऊन चित्त एकाग्र केलं नि पुन्हा नेत्र उघडून आपले अंतिम उद्गार त्या ऋषिश्रेष्ठाने उच्चारले ते असे


*हे दयामय सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरी यही इच्छा है, तेरी यही इच्छा है, तेरी इच्छा पूर्ण हो, अहा तुने अच्छी लीला की ।*


त्यावेळी सरळ झोपलेल्या त्या महात्म्याने एका बाजुंस होऊन एक दीर्घ श्वास घेऊन तो रोखला (कुंभक) नि लगेचच पूर्ण रेचक (श्वास सोडला) केला. तो अमर आत्मा पांचभोतिक देह त्यागून त्या ईश्वरांस प्राप्त झाला. त्याची मानवलीला समाप्त झाली.


*एकोणिसाव्या शतकांतला एक महर्षि, आर्षधर्माचा द्रष्टा, अद्वितीय धर्माचार्य आणि संशोधक, महान समाजोद्धारक, संस्कारक तथा राष्ट्र नि अखिल मानवजातीचा सर्वविधपरिपूर्ण मंगलकामनाकर्ता हा आज महासमाधींस प्राप्त झाला. त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो महात्मा त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. महर्षि मनु, महर्षि व्यास, महर्षि याज्ञवल्क्य, महर्षि जैमिनी, परमहंस भगवान पूज्यपाद श्रीमदाद्यशंकराचार्यांच्या प्रोज्वल परंपरेंचा तो प्रतोस्ता ऋषि, भारतीय नवजागरणाचा पुरोधा आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला. सायंकाळी सहा च्या सुमारांस.*


आयुष्यांत एकदा तरी सत्यार्थ प्रकाश व ऋग्वेदादिभाष्यभूमिका हे दोन ग्रंथ हिंदुंनी वाचावेत ही नम्रतेची विनंती...!


त्या महायोग्याच्या चरणी कोटी अभिवादन...!



भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महर्षि_दयानंद_सरस्वति_पुण्यतिथी_वैदिकधर्म_सत्यार्थप्रकाश_स्वधर्माचरण_हिंदुत्व

1 comment: