Thursday, 14 July 2022

श्रीगुरुपौर्णिमा चिंतन

जो स्वत: मुक्त नाही तो आपल्याला काय मुक्त करणार???


नानक देवांची एक कथा आहे. ते एका राजाकडे गेले. तो‌ राजा साधुसंतांचे आदरातिथ्य करणारा सत्शील राजा होता. त्यावेळचे राजे तसेच होते. तर त्याने नानकदेवांना विचारलं की आपल्यासारखा सत्पुरुष‌ माझ्या राजप्रासादी आला. माझं भाग्य! काय हवं ते मागा. नानकदेव म्हणाले मी मागेल ते तु देऊ शकणार नाहीस. तरीही आग्रह केल्यावर ते म्हणाले मला तुझं राज्य दोन तासांसाठी दे. राजाने नानकांना राज्य देऊन टाकलं.‌ राज्य घेतल्या घेतल्या त्यांनी राजाला बंदी बनवलं व त्या राजाच्या गुरुलाही, पुरोहितालाही सर्वांना बंदी बनवलं. राजाला आश्चर्य वाटलं हे काय घडतंय. नानक देव म्हणाले आता तुझ्या गुरुला तुला सोडवायला‌ सांग. राजा गुरुकडे गेला पण पण तो गुरुच मूळात बद्ध होता, अडकला होता. तो काय मुक्त करणार राजाला?


राजाला बोध प्राप्त झाला. त्याने नानकांचे पाय धरले. 


तात्पर्य काय???


गुरु स्वत: जीवनमूक्त असेल, अधिकारी असेल, तर तो आपल्याला मुक्त करेल. तोच बद्ध असेल तर आपला काय उद्धार व्हायचा???


गुरु कशासाठी करायचा??? 


उत्तर - मोक्षासाठी अर्थात ईश्वरप्राप्तीसाठी. अर्थात जन्म-मृत्युच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी, आत्मज्ञानासाठी...!


आयुष्यांत गुरु अनेक असतातही लौकिकार्थाने. पण परमार्थामध्ये मोक्षगुरु हा मात्र आयुष्यांत एकंच असतो, ज्याला आपण सद्गुरु म्हणतो. आणि हा सद्गुरु कोण तर ईश्वर प्राप्त करून देतो तो. श्रीएकनाथांनी एका ठिकाणी म्हटलंय


मंत्रतंत्र उपदेशितें घरोघरी गुरु आईटें|

जो शिष्यांस मिळवितों सद्वस्तुतें,

सद्गुरु तयातें श्रीकृष्ण मानीं|


गुरु तसे पुष्कळ असतात मंत्र तंत्र देणारे. पण शिष्याला सद्वस्तु प्राप्त करून देतो तोच खरा गुरु, सद्गुरु...! 


आता‌ सद्वस्तु म्हणजे ईश्वर...!


आता असा गुरु जो स्वत: ईश्वरप्राप्ती केलेला असेल तरंच तो आपल्याला प्राप्त करून देईल ना? तोच अडकलेला असेल तर तो आपल्याला काय मूक्त करणार??? म्हणूनंच उपनिषदं म्हणतात


तद्विज्ञार्थं स गुरुमेवाभिगच्छेत् समित्पाणिं श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठम्|


श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु करावा..!


म्हणूनंच ईश्वरप्राप्तीसाठी गुरु निवडताना मात्र तो अत्यंत चाणाक्षपणे निवडला पाहिजे. विवेकानंदांनी श्रीरामकृष्णांना साडेतीनवर्षे तपासलं नि मगच गुरु म्हणून स्वीकारलं. कारण त्यांना मोक्ष‌ हवा होता, ईश्वर हवा होता आणि तेच योग्य आहे. इथे भोळेपणा चालत नाही. नाहीतर हानीच होते. नाहीतर आपण काय करतो? आपल्याला हा विवेकंच राहिलाच नाहीये. 


कारण आपणंच मूळात मोक्षहेतुने गुरु करतंच नाही. भौतिक लाभासाठी करतो. मला हे हवं, ते हवं. ते लोक लुच्चेगिरीने नवससायास करतात तसंच आपलं झालंय. आणि नेमकं इथेच चुकतो आपण...! 


दुर्दैवाने आजकालही सर्वत्र गुरुत्वाचे स्तोम माजलंय. अक्षरश: ह्याची माळ घाल, त्याची माळ घाल...आणि ती सुद्धा प्रतिष्ठेसाठी. अरे टिंगल वाटते का गुरु-शिष्य परंपरा म्हणजे???


म्हणूनंच गुरुचं नाव घेऊ नये असे‌ सांगताना शास्त्रकार सांगतात की


*आत्मनामगुरोर्नाम नामातिकृपणस्य च|*

*श्रेयस्कार्यो न गृह्णय्यात् ज्येष्ठापत्य कलत्रयो:|*


आत्मनाम म्हणजे मीमी म्हणु नये, गुरुचं नाव घेऊ नये. का? तर मी त्या गुरुचा‌ शिष्य म्हणून माझी लायकी नसतानाही उगाचंच मला प्रतिष्ठा नको व माझ्याहातून काही वाईट घडलं तर माझ्या गुरुंस माझ्या अपकृत्यामुळे अप्रतिष्ठा नको. अतिकंजुस माणसाचं नाव घेऊ नये, थोरल्या मुलाचं नाव घेऊ नये नि बायकोने नवऱ्याचे व नवऱ्याने बायकोचं नाव घेऊ नये...! असं शास्त्र सांगतं. आता असं का इतर‌ स्पष्टीकरण देत बसत‌ नाही. पुन्हा केंव्हातरी...


मग आता प्रश्न असा पडेल की मग हा अधिकारी मोक्षगुरु भेटायचा कसा? असा जीवनमूक्त पुरुष किंवा स्त्री भेटणार कशी? बरं त्याला ओळखायचा कसा??? कारण त्याला ओळखायची आपलीही योग्यता हवी ना...! 


कारण ह्यात फसवणुकही होतेच...!


माझ्यासारख्या सर्वसामान्य मनुष्याला हा प्रश्न पडणं स्वाभाविकंच आहे.  कारण असा जीवनमुक्त पुरुष‌ समजा सभोवताली असला तरी आपण त्यांस ओळखायचं कसं???


कारण आपण काही विवेकानंद नाही आहोत..


मग ह्याचं उत्तर काय??


तर आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण अखंड करत राहणे...


अशाने काय होते???


योग्यवेळ आली की वास्तविक असा जीवनमुक्त गुरुच आपल्याला शोधत येतो...हो...!


अर्थात हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे. 


आता प्रश्न असा पडेल की आपण एखादा गुरु केलाच असेल नि तो असा जीवनमुक्त नसेल तर? आपली निवड चुकली म्हणून निराश व्हायचं कारणंच नाही. ह्या आधीच्या गुरुने सांगितलेली उपासना निष्ठेने केली तरी योग्य मार्ग मिळु शकतो...


काहीजण म्हणतील की भले आपला तो आधीचा गुरु मुक्त नसेल पण तरीही आपण त्याने दिलेल्या नामावर दृढ श्रद्धा ठेऊन साधना केली तर...?


तरीही वर म्हटल्याप्रमाणे पुढे आपोआप मार्गदर्शन भेटत जाते...!


इथे जाता जाता एक सांगणं...


कैवल्यचक्रवर्ती श्रीमाऊली तर गुरुशिष्याचे हे नाते‌ सांगताना म्हणते 


माझा गुरु माझाच, इतर कुणाचा नाही..


म्हणजे पातिव्रत्यभाव असावा. म्हणजे एकावेळी एकंच गुरु नि एकंच शिष्य. म्हणजे माझ्या गुरुला मी एकंच शिष्य असायला हवा. व मलाही तो एकंच गुरु...! अर्थात हे तोपर्यंतंच जोपर्यंत शिष्य आत्मस्थिती प्राप्त करत नाही तोपर्यंतंच...! हा स्वतंत्र विषय...! अस्तु|


कालच्या गुरुपौर्णिमेनिमित्त काल सहज केलेलं हे चिंतन...! जे सुचलं ते लिहिलं...


#श्रीगुरुपौर्णिमा


भवदीय...

Tuesday, 21 June 2022

हिरण्यगर्भो योगस्य वक्ता नान्य: पुरातन:। महाभारत १२|३४९|६५


 



*आज आंतरराष्ट्रीय योग दिवस...!*


श्रीमन्महाभारतामध्ये योगदर्शनाचा प्रवक्ता हा साक्षात् हिरण्यगर्भ आहे असे म्हटलंय. इथे हिरण्यगर्भ म्हणजे कोण???


ऋग्वेदाच्या दशम मण्डलाच्या १२१व्या सूक्ताचा आरंभंच


*हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम।*


*हिरण्यो हिरण्यमयो [निरु० १०।२३]*


इथे हिरण्यगर्भ शब्दाने नेमकं काय अभिप्रेत असावं???


प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अर्थात तो ईश्वर...! कशावरून???


*हिरण्यमय म्हणजे सुवर्णासमान चमचमणारा गर्भ-मध्यवर्त्ती गर्भसदृश भूवन ज्याचा आहे अथवा हे हिरण्य-प्रकाशमान सूर्यादि पिंड ज्याच्या मध्यभागी आहेत, तोच हिरण्यगर्भ-परमात्मा...*


(भाष्यकार - ब्रह्ममूनि परिव्राजक)


*ज्या ईश्वरानेच ही चराचर सृष्टी निर्माण केली, तोच हिरण्यगर्भ ह्या योगदर्शनाचा आद्य प्रवक्ता असून अन्य कोणताही पुरातन वक्ता नाहीच असे महाभारतकारांचे वचन आहे.*


ह्याचे नेमकं तात्पर्य काय???


*योगदर्शन यद्यपि भगवान महर्षि श्रीपतंजलीप्रोक्त सूत्रांमध्ये आपणांस प्राप्त होणारं असलं तरी त्याचा मूळ प्रवक्ता हा साक्षात् ईश्वर आहे. पण ईश्वर तर निर्गुण निराकार आहे, मग तो कसा प्रवक्ता? इथे तो प्रवक्ता आहे म्हणजेच त्यावरून त्याची वाणी म्हणजेच चतुर्वेदभगवान हेच त्याचे प्रवक्तेपण अभिप्रेत आहे...*


*म्हणजेच योगदर्शनाचे मूल हे वेदंच असल्यामुळे वेदांमध्ये असलेली योगविद्या हीच योगदर्शनाची सैद्धांतिक भूमिका आहे. पुढेच भगवान महर्षि श्रीपतंजलींनी त्याच योगविद्येंस सूत्ररुपांत‌ रचून आज आपणांस ते‌ योगदर्शन म्हणून षट्दर्शनापैंकी एक असे प्राप्त करून दिलं. पुढे त्यावर त्यांनी स्वत:च विस्तृत असे भाष्य (व्यासभाष्य) केलं असावं किंवा महर्षि वेदव्यासांनी ते‌ केलं असावं, म्हणून त्यांस वेदभाष्य म्हटलं गेलं असावं. त्यांस आर्ष अर्थात ऋषिप्रणीत भाष्य म्हणतात.‌ सुदैवाने आज हे उपलब्धही आहे. इतकंच काय तर ह्याच व्यासभाष्यांवर राजा भोजासहित अन्य पाच (एकुण ६) वृत्तीही उपलब्ध आहेत. यावर सविस्तर कधीतरी. यद्यपि इतिहासांत अनेक पतंजली होऊन गेलेले असले तरी विद्यमान योगदर्शनाचे प्रवक्ते भगवान महर्षि श्रीपतंजली हेच आहेत नि त्यांचा‌ काळ श्रीमन्महाभारताच्या‌ समीपचाच आहे.*


म्हणजेच‌ योगदर्शन हे प्रत्यक्ष‌ वेदप्रणीतंच असल्याने ते आस्तिक दर्शन अर्थात वेदांना व ईश्वरांस‌ मानणारंच आहे.‌ *सांप्रत‌ दुर्दैवाने काही लोक आस्तिक म्हणजे वेद मानणारा पण ईश्वर मानणारा असेलंच असे नव्हे असा अत्यंत‌ हास्यास्पद तर्क मांडतात. म्हणजे ह्यांच्या‌ मते आस्तिक म्हणजे वेद मानणारा असला तरी ईश्वरांस मानणारा असेलंच असे नव्हे. म्हणजे आस्तिक परंतु निरीश्वरवादी म्हणे. म्हणून ते योगदर्शनांस आस्तिक परंतु निरीश्वरवादी असे म्हणताना दिसतात.‌ सांख्यदर्शनाच्या बाबतीतही हेच विधान अनावधानाने केलं जातं. हे अत्यंत दुर्दैवी आहे....!*


*या‌ भ्रमांस सर्वांस कारणीभूत मधील काळांतली अनार्ष भाष्ये जरी असली तरी आपण निरीश्वरवाद ह्या शब्दाचा अर्थ‌ प्रथम जाणून घेऊयांत. जगत्सृष्ट्यत्वामध्ये ईश्वर हा निमित्त कारण की उपादान कारण हा प्रश्न असल्याने ह्याचा नीटसा अर्थ‌ न आकळल्यानेही हा गोंधळ झालेला आहे. इथे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे कदापिही नसून तो जगताच्या‌ निर्मितीमध्ये निमित्त की उपादान कारण इतकाच चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून सांख्य किंवा योगदर्शनांस अगदी आस्तिक पण निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे म्हणण्यापर्यंत‌ काही लोकांची‌ लेखणी धजावते हे पाहून अत्यंत खेद होतो. मूळात‌ षट्दर्शनापैकी एकही दर्शन हे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे तर नाहीच. त्यामुळे सांप्रत समाजमाध्यमांवर अनेक जण कुणाचं तरी वाचून‌‌ मूळ सैद्धांतिक भूमिका न जाणून घेता किंवा पारिभाषिक शब्दावली न आकळून घेता षट्दर्शनांना निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे असे रेटत बसतात, अशांपासून सावध रहावे ही विनंती...! सविस्तर कधीतरी पुन्हा ह्यावर येऊच...*


योगदर्शनाचा मूळ हेतु काय???


अष्टांग योगदर्शन हे क्रियात्मक नि अनुभवसिद्ध शास्त्र आहे. त्याचा मूल हेतु मनुष्यांस आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष देणं हाच आहे. त्यापासून विभूतिपादातून प्राप्त होणारे लाभ यद्यपि भौतिक स्वरुपाचे असल्या तरी ते काही अंतिम नसून अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हेच आहे. 


*सांप्रत काही भारत विखंडन शक्ती भगवान महर्षि श्रीपतंलजी हे बौद्ध होते असा मिथ्या तर्क मांडताना दिसतात. या मागे जितके डावे सक्रिय आहेत, तितकेच‌ काही हिंदुद्वेष्टे नवबौद्धही(सर्व नवबौद्ध असे नाहीत). इतकंच काय तर काही लोक योगदर्शन हे शैव किंवा रुद्रापासून प्रणीत असून तो अवैदिक देव असून वैष्णव अर्थात विष्णु आदि देव वैदिक आहेत असाही भ्रममूलक प्रचार सुरु आहे. म्हणजेच योगदर्शन हे अवैदिक आहे असा अपप्रचार नेटाने सुरु आहे. जिज्ञासूंनी ह्यांपासून सावध रहावे ही विनंती...! आणि हो काही‌ लोक योग हा सेक्युलर आहे असाही भ्रममूलक प्रचार करताना दिसतात, सबका साथ, सबका विकासचा‌ विपरीत अर्थ काढत...! त्यापासूनही सावधान...!*


आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त हा संक्षिप्तसा लेखनप्रपंच...!


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस_योगदर्शन_पतंजली_योगविद्या_आस्तिक_नास्तिक_निरीश्वरवादी

Thursday, 2 June 2022

प्रात:स्मरणीय हिंदुपति वीरशिरोमणी महाराणा श्रीप्रतापसिंह...

 




भाद्रपद शुक्लपक्ष‌ विक्रम संवत् १९३९ समयी सत्यार्थ प्रकाश हा आपला अजरामर ग्रंथ 


*'महाराणाजीका उदयपूर'*


या‌ स्थानी रचला असे महर्षि श्रीमद्दयानंद सरस्वतींनी भूमिकेत लिहिलं होते. मूळचे गुजरातचे असलेल्या महर्षींना संन्यासोत्तर 'यद्यपि आमुचा स्वदेश भूवनत्रयामध्ये वास|' असला तरी 'महाराणाजीका उदयपूर' असे शब्द का लिहावेसे वाटले असतील???


वडिलांच्या इच्छेने ७व्या वर्षापासून २१ पर्यंत लंडनमध्ये राहून इंग्रजांपेक्षाही अधिक इंग्रज झालेला अरविंद नावाचा युवक तत्कालीन आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण होऊन इकडे भारतात येऊन मातृभूमीच्या विमोचनार्थ जन्मभूमीत येऊन स्वत:ला क्रांतिकार्यात झोकून देतो नि एका खटल्यामध्ये पोलिस पकडायला आले असताना हा सनदी अधिकारी अत्यंत साध्या अशा सतरंजीवर झोपलेला दिसतो, तेंव्हा आश्चर्यचकित झालेल्या त्या आरक्षींना(पोलिसांना) तो अभिमानाने म्हणतो की


*'स्वातंत्र्याच्या‌ काजासाठी पृथ्वीपती असलेला माझा राणा प्रताप हा एकेकाळी राजसुखाचा, सत्तासुंदरीचा त्याग करून गवताच्या शय्येवर निजता झाला, त्याच्या त्यागापुढे माझी ही साधी शय्या काय मोठी?'*


हे ऐकून त्या अधिकाऱ्यांची तळपायाची आग मस्तकांत गेली नसेल कशावरून???


आयुष्यांत कुणाचा अभिमान बाळगावा? आमच्यासमोर आदर्श कोण असावेत?


आज देशामध्ये महापुरुष निर्माण व्हायचे का बंद झाले? स्वातंत्र्यानंतर हे सगळं बंद का झालं???


आमचं बीज इतकं अशुद्ध का झालं???


*कारण महाराणा प्रतापांस नि शिवप्रभुंस वाट चुकलेला देशभक्त म्हणणाऱ्या दुरात्मा गांधींस आह्मीं राष्ट्रपिता म्हणून गौरविलं...! त्याला नोटेवर घेतलं...!*


*ज्याची वीरता, रणकुशलता, कष्टसहिष्णुता नि नीतिमत्ता अत्यंत‌ वंदनीय नि अनुकरणीय होती, अशा क्षत्रियोत्तम सत्पुरुषांस आह्मीं केवळ पुण्यतिथी नि जयंतीपुरतं मर्यादित ठेवलं...!आणि आता तर केवळ मेवाडपुरतं...*


प्रत्यक्ष महाराणांचा नि समस्त राजपुतान्याचा साद्यंत नि साधार इतिहास लिहिणाऱ्या ज्येष्ठ इतिहासकार महामहोपाध्याय श्रीगौरीशंकर ओझांनी म्हटल्याप्रमाणे जो स्वदेशाभिमानी, स्वतंत्रतेचा पुजारी, रणकुशल, स्वार्थत्यागी, नीतिज्ञ, दृढप्रतिज्ञ, सत्यनिष्ठ वीर, उदार क्षत्रिय तथा कवी होता...होय कवी होता...!


*पूर्वजांचा सगर्व अभिमानी...*


अकबरनाम्याचा लेखक अबुलफज़ल लिहितो की महाराणा प्रतापांस आपल्या पूर्वजांचा सगर्व अभिमान होता...


आह्मांला तो आहे का????


*हल्दीघाटीच्या‌ युद्धांत प्रताप विजयीच होता. अकबर त्याला कधीही हारवु शकलाच नाही. ९ वर्षे अकबर त्याच्याशी झटत राहिला पण त्याला कधीच विजय‌ प्राप्त झाला नाही...!*


*त्याचा आदर्श होता की बापा रावळांचा‌ वंशज कधी कुणापुढे मान तुकवणार नाही. स्वदेशप्रेम, स्वतंत्रता नि स्वदेशाभिमान हे ज्याचे मूलमंत्र होते, असो तो महाराणा...*


*उंची मोठी असलेला, विशाल नेत्र असलेला, भारदस्त नि प्रभावशाली मुखमंडल असलेला, पीळदार मिश्या असलेला, रुंद छाती असलेला, विशाल बाहुबल असलेला नि गव्हाळी रंगाचा तो‌ प्रताप तत्कालीन रीतिप्रमाणे दाढी ठेवत नव्हता असे त्याचे‌ व्यक्तिमत्वाचे दर्शनी वर्णन आहे...!*


अशा पुरुषश्रेष्ठाच्या चरणी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!


*जन्म - विक्रम संवत १५९७, ज्येष्ठ शुद्ध तृतीया...*


भवदीय,


#महाराणाप्रताप_जयंती_हिंदुपती_मेवाड_राजस्थान_हल्दीघाटी_उदयपूर


Monday, 16 May 2022

काश्यां हि काशते काशी काशी सर्वप्रकाशिका|

 




*काश्रृ दीप्तौ इति धातोः काशते निर्माणमार्गे स्वतेजसा या सा अथवा काशते विराजते शिव: अनिर्वचनीयज्योतिषा यत्र सा काशी|*


काश्रृ दीप्तौ ह्या संस्कृत धातुपासून काशी हा शब्द‌ तयार होतो, ज्याचा अर्थ आहे जी स्वतेजाने प्रकाशते, चमकते अशी किंवा जिथे प्रत्यक्ष शिवाचा निवास आहे, जिथे अनिर्वचनीय ज्योती विराजमान आहे अशी ती काशी...!


*अविमुक्त, वाराणसी, काशी, महाश्मशान, आनंदकाननरुद्रावास आदि शब्दांनी संबोधित असलेली ही काशी आज मूक्त होण्याच्या मार्गावर...! पावणे नऊ लाख वर्षांपूर्वीच्या महर्षी श्रीमद्वाल्मीकिंच्या रामायणकालापासून काशीचं असलेलं महत्व आह्मां हिंदुंना वेगळं सांगायची आवश्यकता नाही. परवर्ती वैदिक साहित्यामध्येही, वेदांच्या‌ संहिता नव्हे बरंका तर वेदांवरचे व्याख्यानरुपी ग्रंथ असे शतपथगोपथादिंमध्ये काही ठिकाणी काशीचा ऐतिहासिक उल्लेख आढळतोच. महाभारतीही व अगदी जैन बौद्ध ग्रंथांमध्येही. पुराणांमध्ये तर बोलायलाच नको. स्कंदपुराणांध्ये काशी खंडामध्ये ज्ञानवापीवर स्वतंत्र ५२ वा अध्यायंच आहे. विस्तारभयास्तव इथे देऊ शकत नाही क्षमस्व...!*


त्यामुळे इस्लामांध जिहादी पाशवी आक्रमणामुळे उध्वस्त झालेली हिंदु मंदिरांच्या विध्वसांची परंपरा कुठेतरी खंडित होतेय हा अभिमानाचा क्षण सर्व हिंदुंसाठीच आहे.


*औरंग्याने ८ एप्रिल, १६६९ मध्ये काशी विश्वेश्वर पाडायचा आदेशच दिला होता. त्याचे फर्मानंच आहे तसं.*


संदर्भ मआसिर-ए-आलमगिरी - आंग्लानुवाद श्रीजदुनाथ‌‌ सरकार. सोबत जोडला आहे. असे ढीगभर संदर्भ आहेत...





*हिंदु(जैन-बौद्धही) मंदिरांच्या विध्वंसाचा मुस्लीम इतिहासकारांनी सांगितलेला समकालीन दुर्दांत दाहक ज्वलंत इतिहास*


*मूस्लीम इतिहासकारांनी अगदी प्रामाणिकपणे नि अभिमानाने हिंदु मंदिरांच्या, ज्यामध्ये जैन नि बौद्ध‌ दोघेही आलेत(संविधानानुसारही हीच‌ व्याख्या आहे बरंका) विध्वंसाचा इतिहास अगदी सप्रमाण नि साधार शब्दबद्ध करून ठेवला आहे. मूळ पर्शियन नि उर्दुमध्ये असलेला हा समग्र इतिहास जो एलिएट आणि डॉसन(Elliot & Dawson) नावाच्या‌ दोन पाश्चात्य इतिहासकारांनी 'History of India as told by it's Own Historians' नावाने आठ‌ खंडांमध्ये प्रकाशित केलेला आहे. गुगल करून कुणीही वाचावा.*


*त्याचा‌ इतिहास संक्षेपामध्ये ज्येष्ठ इतिहासकार स्वर्गीय सीता राम‌ गोयलांनी "Hindu Temples - What happened to them" नावाने द्विखंडात्मक प्रकाशित केला आहे तोही वाचायसाठी उपलब्ध आहे.‌ विकतही घेऊ शकता.* त्याची‌ पीडीएफ लिंक


* *Hindu Temples: What Happened to Them? Vol. I* (Sitaram Goel)


https://drive.google.com/file/d/1pNO3PLf4hmlP_BuNfxh8ZeoebXm3rcLD/view?usp=drivesdk


* *Hindu Temples: What Happened to Them? Vol. II* (Sitaram Goel)


https://drive.google.com/file/d/1pOmAA7Ot16LyOcsTqVI4DGwk3mgeXBsN/view?usp=drivesdk


*ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी निदान ह्यातला पहिला खंड अभ्यासावा ज्यात‌ स्व. सीता राम गोयलांनी भारतातल्या कुठल्या जिल्ह्यातली कुठल्या तालुक्यातली कुठली मशीद कोणत्या नि किती मंदिरांना पाडून बांधली आहे हे मुस्लीम इतिहासकारांचे‌ संदर्भ देऊनंच मांडलं आहे. मागे आह्मीं स्व. सीता राम गोयलांवर जो लेख लिहिला होता त्यात‌ ह्याविषयी लिहिलं होते. असो...*


हिंदुंना खरंच इस्लाम काय कळून घ्यायचा असेल स्व. सीता राम गोयलांची ही पुस्तके वाचायलाच हवीत...! *सुदैवाने यंदाचे‌ वर्ष‌ हे त्यांचे‌ जन्मशताब्दीचे वर्ष आहे. पण हिंदुत्वाद्यांमधल्या एकालाही ह्याची‌ पुसटशीही जाण नाही. असो‌ हरकत नाही...!*



सांगण्याचे तात्पर्य इतकंच की मुस्लिमांनी स्वत: त्यांच्या कृत्यांचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवलेलाच आहे. तो निदान वाचण्याचे‌ कष्ट तरी आपण घेऊयांत...! 


*श्रीशिवछत्रपतींचा आदेश...*


*शेष, आजच्या निर्णयाने सर्वात जास्त आनंद नि समाधान कुणांस झालं असेल तर ते पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंना, पृथ्वीवरचे‌ तत्कालीन ब्रह्मदेव असे श्रीगागाभट्टांना ज्यांनी काशीच्या‌ विश्वेश्वराचा विध्वंस प्रत्यक्ष‌ पाहिला होता ज्यानंतरंच ते शिवप्रभुंना भेटायला आले होते, श्रीनानासाहेब पेशव्यांना, श्रीनाना फडणवीसांना, थोरल्या श्रीमाधवराव पेशव्यांना...! ह्या‌ सर्वांनी काशी मूक्त करा असे टाहो फोडून सांगितलं होते...! सर्व संदर्भ उपलब्ध आहेत...!*


शीघ्रातिशीघ्र त्यांचे‌ ते‌ स्वप्न पूर्ण होईलंच...!


आणखी खूप काही व्हायचं आहे. ही तर केवळ सुरुवात आहे...!


आरंभ हैं प्रचंड...!


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#काशी_वाराणसी_काशीविश्वेश्वर_ज्ञानवापी_रामायणमहाभारत_जैनबौद्धसाहित्य_शिवाजीमहाराज_पेशवे_इस्लामीजिहाद_ मंदिरविध्वंस

Thursday, 5 May 2022

बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु:|

 




वर्षभरात ज्या‌ एका दिवसाची आतुरतेने वाट‌ पाहत असतो, असा आजचा दिवस...! वैशाख शुद्ध पंचमी....!


श्रीमच्छंकरभगवत्पादस्य २५३१तमः जन्मोत्सवः| युधिष्ठिराब्दे २६३१तमे वैशाख शुद्ध पञ्चम्यां यस्य अवतरणं अवनीतले जातं| बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु:| यस्य करकमलात् पाखण्डिभि: खण्डित: वैदिकधर्मस्योद्धारः जातः, यस्य सकाशात् हिन्दुराष्ट्रस्य आर्य्यावर्तस्य समाजस्य च उत्थानं जातं, आपूर्वांचलपश्चिमसमुद्रात् तथा आसेतुशीताचलं समस्त वेदविरुद्धमतखण्डनं कृत्वा अवनीमण्डले येन श्रौतधर्मस्य पुनरुद्धार: कृत:, आचार्यपीठस्य स्थापनां कृत्वा यस्य हस्ते राष्ट्रनिर्माणं जातं, तं आचार्यवर्यस्य कृते किं लिखामि???


२५३१ वर्षांपूर्वी बौद्धादि अशा मूळच्या‌ वैदिक परंतु पश्चात अवैदिक झालेल्या एकुण ६४ मतमतांतरांनी ह्या आर्य्यसनातन वैदिक हिंदुधर्मांस ग्रासले असताना, श्रौतधर्माचा तो‌ चंडांशु काहीसा मावळवीत असताना,  कालटी येथे आर्यांबा नि शिवगुरुच्या पोटी युधिष्ठिर शक २६३१ वैशाख शुद्ध पंचमीस एका दिव्यात्माचा जन्म झाला. समकालीन अशा श्रीचित्सुखाचार्यांच्या बृहच्छंकरविजय ह्या चरित्राप्रमाणे वयाच्या पांचव्या वर्षी त्यांचे त्यांच्या‌ पित्यानी उपनयन केलं नि पित्याच्या त्याच‌वर्षीच्या अकस्मात देहावसानानंतर वयाच्या पुढे तीन वर्षात सर्व वेद‌ कंठस्थ आठव्या वर्षी संन्यास धारण करून बाराव्या वर्षी सर्व शास्त्र अधिगत करून वयाच्या सोळाव्या‌ वर्षी प्रस्थानत्रयींवर भाष्य करून हा मनुष्य आचार्यपदवींस प्राप्त होतो. तिथून पुढची १६ वर्षे हा मनुष्य आसेतुहिमाचल अवघा हिंदुस्थान अर्थात तत्कालीन आर्य्यावर्त अक्षरश: पिंजून काढून तत्कालीन ६४ मतांचंं आवश्यक तिथे निराकरण नि पुन: सर्वांचा आवश्यक तेथे समन्वय करून श्रौतीयधर्माची पुनर्संस्थापना करतो...!


राष्ट्रनिर्माते भगवान श्रीशंकराचार्य


विचार करा अडीच‌ सहस्त्र वर्षांपूर्वी वाहनांची काय सुविधा असेल? तत्कालीन भारतवर्ष अगदीच अवनत नसला तरी आजच्या इतका आधुनिक परिवहनाच्यादृष्टीने प्रगत होता का? अशा विपन्नावस्थेमध्ये हा सोळा वर्षांचा‌ युवक एका उदात्त ध्येय्याने प्रेरित अवघ्या राष्ट्राला 'सूत्रै: मणिगणा: इव' म्हणत चार दिशांच्या चार पीठांमध्ये एकसूत्राने गोवत राष्ट्राची अखंडता अबाधित ठेवतो...! संस्कृती नि साधनेचा शलाका पुरुष असा हा पुरुषोत्तम एकीकडे स्वत:ला आर्षधर्माचा पुनरुद्धारकर्ता नि भाष्यकार म्हणून नि दार्शनिक म्हणून सिद्ध करतो तर दुसरीकडे भारतीय अस्मिता नि एकतेचा उद्गाता म्हणून राष्ट्रनिर्माणाचं कार्य करतो...! अवघ्या सोळा वर्षांत‌ हे महानतम कार्य???आज‌ संभव आहे???


आज आपण आधुनिक विमानादि‌ साधनांनी म्हटलं तरी १६ वर्षांमध्ये हा दिग्विजय प्राप्त करू शकतो??? दिग्विजय‌ दूरंच राहुदे, पण समग्र भारतवर्षाची केवळ परिक्रमा तरी करु शकतो का??? ते सातत्य टिकवून ठेऊ शकतो का???


बरं त्या १६वर्षांच्या कार्याची फल:श्रुती काय? त्यापश्चात् भारतवर्षांवर अशोकादिंच्या बौद्धधम्माच्या रेट्याने अहिंसेच्या अतिरेकाने राष्ट्राचे सैन्यबळ न्यून होऊन अडीच‌ सहस्त्र वर्षे झालेली ग्रीक, शक, कुशाण, हुण आदिंच्या टोळधाडी, त्याला समुद्रगुप्त(चंद्रगुप्त मौर्य नव्हे), शकारि नि कुशाणांतक स्कंदगुप्त नि विक्रमादित्य, हुणांतक यशोधर्मा नि मिहिरगुल, म्लेंच्छनाशक मराठ्यांचा तेजस्वी पराक्रम ही पाच सोनेरी पाने नि सहावं ब्रिटीश नामक दस्युंचा पराभव हा सर्व इतिहास जो आपण पाहतो, त्याची विजीगीषु पार्श्वभूमी कुठे असेल तर ती आचार्यांच्या दिग्विजयामध्ये...! अर्थात आचार्यांची विस्मृती हेच त्या आक्रमणांचे कारणही म्हणावं लागेल...!*


आजही ह्या भारतवर्षांवर अनेक परकीय आक्रमणं आहेतंच! अशा परिस्थितींत समग्र हिंदुस्थानाला एकसमयावच्छेदेकरून सुसंघटित करणाऱ्या राष्ट्रसंघटकांस जयंतीनिमित्त स्मरण न करणे नि आदरांजली न वाहणे ह्यापेक्षा‌ करंटेपणा कोणता???


तत्वज्ञानाच्या दृष्टीने आचार्य अद्वैती असतील, त्यांचे ते‌ मत कुणांस पटो न पटो, कुणी त्याची समीक्षा करो न करों, पण त्यांनी केलेलं राष्ट्रोद्धाराचे कार्य आपण विसरु शकु का??? ते विसरलं तर राष्ट्रघात हा ठरलेलाच आहे....!*


जाता जाता....


*भगवत्पादांची एकुण १९ संस्कृत‌ चरित्रे उपलब्ध असताना एकंच सर्वत्र प्रचलित असलेला माधवीय शंकरविजय, की जो मूळचा त्यांचा नसूनही, तोच एकमेव अभ्यासून आचार्यांविषयी आपल्या चरित्रचिंतनाची इति:श्री करणं हे आमच्यासारख्या आचार्यभक्तांस शोभणारं नाही...!*




आजच्या कथित अद्वैतवाद्यांस किंवा शांकरमतानुयायांस आचार्यांच्या‌ कालनिर्णयाचं काहीही पडलेलं नसलं तरी आह्मांस ते निजकर्तव्याचा बोध देणारं ठरतं...!


म्हणूनंच ह्या राष्ट्रोद्धारकांस जयंतीनिमित्त कोटी अभिवादन...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमच्छंकराचार्य_जयंती_शांकरमठविमर्श_शंकरदिग्विजय_राष्ट्रनिर्माण_वैदिकधर्म

Thursday, 28 April 2022

श्रीमंत थोरल्या बाजीरावांस...

 



शतकोटी अभंग‌ लिहिण्याची आमच्या भक्तशिरोमणी श्रीनामदेवरायांची‌ प्रतिज्ञा ज्याप्रमाणे जगद्गुरु श्रीतुकोबारायांनी पूर्ण केली, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करत व दिल्लींद्रपदलिप्सव: अशा श्रीशंभुछत्रपतींच्या देहावसानाचा प्रतिशोध घेत दिल्ली जिंकून त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत स्वराज्यमंदिरांवर हिंदुपतपातशाहीचा कळस चढविला...!


बाजीरावांच्या पुण्यवंतपणाचे दर्शन तत्कालीन अन्य मराठे‌ सरदारांच्या पत्रांतून आपणांस घडल्यावर संदेहांस जागा उरत नाही.‌ मागे ह्यावर लिहिलंय.


कान्होजी आंग्रे त्यांच्याबद्दल एक पत्रात लिहितात👇🏻👇🏻👇🏻


*"आपणापेक्षा इष्टमित्र सुह्रदसंबंधी दुसरे कोण आहेत?"*

(पेशवे दप्तर - खंड ३०- पृष्ठ ४१)


सेखोजी आंग्रे म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"हा मनसुबा आपणच कबुल करावा. शिरोपस्थाई आपणच व्हावे. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? येवढे महद्यश संपादिले त्याचे कलशारोपण आपणच करावे."*


(पेशवे दप्तर - खंड ३ - पृष्ठ ४३)


*"आपण ज्या पाण्यात बुडा म्हणाल त्या पाण्यात बुडावयांस सिद्ध आहो."*

(पेशवे दप्तर - खंड ३३ - पृष्ठ ४३)


सर जदुनाथ सरकार म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao Ballal was unequalled for the daring and originality of his genius and the volume and the value of his achievements. He was truly a carlylean Hero as King-or rather as 'Man of Action'. If Sir Robert Walpole created the unchallengeable position of of the Prime Minister in the unwritten constitution of England, Bajirao created the same institution in the Maratha Raj at exactly the same time."*


Foreward to Peshwa Bajirao I and Maratha Expansion by V S Dighe - 1994.


इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी श्रीमंतांच्या सर्व मोहिमांची अगदी‌ संक्षेपांत जी माहिती‌ दिलीय, ती आह्मीं सोबत जोडली आहे. ती वाचल्यांवर या अपराजित अशा रणधुरंधर पेशव्याच्या दिव्य पराक्रमाची साक्षी अंत:करणांस‌ पटेल...! थोरले बाजीराव हे शब्दश: वाऱ्याप्रमाणे दौड करून विद्युल्लतेप्रमाणे सर्व हिंदुस्थानभर आपल्या खड्गाचे पाते‌ तळपून हिंदुत्वशत्रुंचा आळीपाळीने परामर्श कसे घेत होते हे ह्यांवरून लक्ष्यीं येईल...!






*शत्रु सावध होण्यापूर्वीच अत्यंत द्रुतगतीने दिवसरात्र कुच करून त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याचे नुकसान करावयाचें आणि तो‌सावध होऊन आपलीं संघटना करु लागण्यांपूर्वीच तिथून निसटावयाचेें परतावयाचें, नंतर चपळाईनें त्याच्या छावणीभोवतीं फिरून त्याचीं रसद मारावयाचीं व त्याच्या उजव्या डाव्या बाजुचें लचकें तोडून त्यांस‌ जर्जर करावयाचें व अशा छाप्यांनी तो धैर्यहीन होऊन मागें हटला म्हणजे पुन्हा त्याच्यावर उघड आक्रमण करून त्याचा घुव्वा उडवायचा...!*


संदर्भ - ना के बेहरे लिखित पहिलें बाजीराव पेशवे


बाजीरावांच्या युद्धनीतीची संक्षेपांत‌ मांडणी ही म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही...! 


बाजीराव गेल्यावर श्रीशाहुमहाराज लिहितात


*"बाजीसारखा शिष्य गेला, याउपर या मुलुखातून जावे किंवा प्राण सोडावा."*


चिमाजी अप्पांस लिहिलेलं पत्र


हिंदुस्थानच्या इतिहासातल्या एकमेव अपराजित योद्ध्यांस पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन...!


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमंतथोरलेबाजीरावपेशवे_हिंदुपदपातशाही_हिंदवीस्वराज्य_साम्राज्य_रणधुरंधर_अपराजितयोद्धा

Friday, 22 April 2022

कन्यादान - वास्तव नि विपर्यास



धर्माचें पाळण, करणें पाषांड खंडन|

हेचिं आह्मासिं करणें काम, बीज वाढवावें नाम|

जगद्गुरु श्रीतुकोबाराय


कन्या दान????


कन्येचं म्हणजे मुलीचं दान कसं काय होऊ शकतं? दान करायला ती काय वस्तु आहे का? बघा बघा हिंदुधर्मात स्त्रियांना किती तुच्छ वागणुक आहे. कन्या ही दान केली जाते???


ह्या नि अशाप्रकारचे आक्षेप आपल्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण हे खरंच असे आहे का??? हिंदुधर्मामध्ये स्त्री ही खरंच दान करण्याची वस्तु आहे का???


मग जर तसं नसेल तर कन्यादान असा शब्द का योजिला जातो? ह्यासाठी सर्वप्रथम दान या शब्दाचा अर्थ घेऊयांत...!


स्वस्वत्वनिवृत्तिपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं|


देय‌ वस्तुंवरील आपला अधिकार त्यागून तो दुसऱ्यांस देणे म्हणजे दान...! म्हणजे दानानंतर त्या‌‌ गोष्टीवरचा आपला अधिकार संपतो. ती वस्तु आपली राहतंच नाही...


पण कन्या किंवा मुलगी ही जर वस्तु मूळीच नाहीये तर मग तिचं दान कसं? खरंतर ह्या प्रश्नातंच त्याचे उत्तर दडलंय. इथे 'दान' शब्दाने काहीतरी वेगळाच अर्थ अभिप्रेत असावा. आपल्या शास्त्रकारांना ही शंका होतीच म्हणून तिचं निरसन त्यांनी सहस्त्रो वर्षांपूर्वी आधीच करून ठेवलंय. धर्मशास्त्रामध्ये कल्प नावाचे जे‌ साहित्य आहे जे एक वेदांग आहे, त्यामध्ये धर्मसूत्र, गृह्यसूत्र, श्रौतसूत्र नि शुल्बसूत्र नावाचे चार ग्रंथ‌‌ येतात. त्यातल्या एका पारस्कर गृह्यसूत्रामध्ये १|४|१६ येथील 'मित्रस्य त्वेति मधुपर्कं प्रतीक्षते' ह्या सूत्रावरील पंडित गदाधरांचे भाष्य पहा.


स्वत्वत्यागपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं न कथंचिदप्यस्वकन्या कर्तुं शक्यते, नापि परस्य कन्या भवति विवाहोत्तरमपि ममेयं कन्या कन्यत्यभिधानात्| अत्र गौणो ददाति|


म्हणजे स्वत्व त्यागपूर्वक परस्वत्वापादान हे दान आहे वर सांगितल्याप्रमाणे. पण स्वकन्या कोणत्याही प्रकारे स्वकन्या राहुच नये असा प्रयोग होऊच शकत नाही, आणि कन्या दुसऱ्याची तशी होऊही शकत नाही, कारण विवाहापश्चातही 'ममेयं कन्या' असा शब्दप्रयोग आहे. म्हणजेच‌ विवाहानंतरही ती आपली म्हणजे वडिलांची किंवा कन्यादान करणाऱ्याची कन्या म्हणून राहतेच. कारण ती काही वस्तु नाहीये तिचं नातं हस्तांतर व्हायला किंवा संपायला. इथे गौणो असा शब्द आहे. म्हणजेच दान हा शब्द इथे केवळ गौण अर्थाने आहे.


जाता जाता


ह्यातल्या मधुपर्कावर आह्मीं मागे सविस्तर लेख लिहिला आहे, तो‌ ब्लॉगवर आहे...!


आपस्तंब धर्मसूत्रांमध्ये ६|१३|१० येथे स्पष्ट म्हटलं आहे की


यथादानं क्रयविक्रयधर्माश्चापत्यस्य न विद्यते|


म्हणजे इतर वस्तुंप्रमाणे कन्येचं किंवा अपत्याचे दान धर्मशास्त्रांत कधीच अपेक्षित नाही. कारण शास्त्र संतानांच्या क्रय-विक्रयाची संमतीच देत नाही.


म्हणजेच आपल्या हिंदुधर्मामध्ये मुलं-मुली विकायची अनुमतीच नाही कारण ती काही वस्तु नाहीयेत. हा आपल्या धर्माचा मोठेपणा नाही का ???


म्हणजेच इथे कन्येबरोबर दान हा शब्द मुख्यार्थवाचक नसून गौणार्थक आहे. सोप्प्या भाषेत तो लाक्षणिक अर्थाने आहे, शब्दश: नाही. म्हणजेच इथे दान हा शब्द शब्दश: दान ह्या अर्थाने नाही...!


आणखी स्पष्टीकरण पाहुयांत


मनुस्मृतीमध्ये विवाहाचे‌ आठ प्रक्रार सांगितले असून त्यातल्या पहिल्या चार अशा ब्राह्म, दैव, आर्ष नि प्राजापत्य नामक विवाहपद्धतींमध्ये ह्या दान शब्दाचा अर्थ स्पष्ट सांगितला आहे तो असा...


दान म्हणजे तिचे भरण-पोषण तथा तिच्या मानमर्यादेच्या रक्षणासाठीचं दायित्व वरांवर(पतीवर) सोपवण्यासाठी म्हणून व दोघांनी सख्यभावाने परस्परांसह राहून धर्मपूर्वक अर्थार्जन करून त्याचा योग्य कारणें विनियोग करून प्रजोत्पादन करण्याची अनुमती देण्यासाठी इतक्या महदर्थाने हा शब्द योजिला आहे....


म्हणजे इथे दान शब्द किती व्यापक अर्थाने आहे पहा...!


वैखानस गृह्यसूत्रामध्ये ह्या विवाहांच्या वेळी जो संकल्प आहे, त्यात म्हटलंय की


अस्य सहधर्मचारिणी भवतीति ब्राह्मे विवाहे धर्मप्रजासंपत्त्यर्थ| यज्ञापत्यर्थं| ब्रह्मदेवर्षिपितृप्त्यर्थं प्रजासहत्वकर्मभ्यो ददामीत्युदकेन तां दद्यात् (दाति) ॥ ४ ॥ कन्याप्रदः इति ।


ही कन्या ह्याची धर्मचारिणी व्हावी कशासाठी तर धर्मानुष्ठान म्हणजे धर्माचरण, प्रजोत्पादन तथा गृहस्थाश्रमांतील सर्व कार्यांमध्ये सहभाग, देव, ऋषि पित्रांच्या तर्पणासाठी...!


आचार्य शौनकांनी दान शब्दाचा अभिप्राय‌ सांगताना लिहिलं आहे की


कन्यां सहत्व कर्मभ्य: करोति प्रतिपादनम्|


परस्परांनी एकत्र मिळून प्रजोत्पादन तथा श्रौत-स्मार्त कर्मानुष्ठान म्हणजेच धर्मानुष्ठान करण्यासाठी...


आता इतकं सांगूनही कुणाला आणखी शंका असेच तर सांगतो...


जेंव्हा कन्येचा विवाह होतो‌ तेंव्हा तिच्या भावी आयुष्यासाठी घरातले नातेवाईक, सगेसोयरे, तिचे मित्रादि, सर्व हितचिंतक तिला काहीतरी वस्तु किंवा गोष्टी भेट म्हणून देतात. हे सर्व तिच्यासाठीच्या प्रेमासाठी स्नेहासाठी दिलं जातं. ह्या ज्या गोष्टी दिल्या जातात तेच मूळात कन्यादान आहे. म्हणजे कन्यादान शब्दामध्ये‌ कन्येबरोबर ज्या वस्तु दिल्या जातात त्यांचे‌ दान अभिप्रेत आहे, कन्येचं दान नव्हे...!


पुरोहित लोक हेच धन किंवा भेटवस्तु त्या कन्येंस द्यायला लांगतात. हेच‌ कन्यादान आहे...


इतकं लक्षात घेतलं तरी पुरेसं!!!


कन्यायै दानमिति कन्यादानम्|


जे कन्येंस भेट म्हणून दिलं जातं तेच कन्यादान....!


इतकं सांगूनही कुणाला कळंत नसेल तर आह्मीं सोबत कन्यादानप्रयोग मराठी अनुवादासहित जोडला आहे तो पहावा ही विनंती...!


संदर्भ दानचंद्रिका - दिवाकरभट्ट महादेवभट्ट काळे - काशी


हां संपूर्ण प्रयोग वाचावा. त्यात कोणते वाक्य आहे नि नाही हे तुम्हाला कळेल...!











शेष, कुणाचं नाव घ्यायला नि निंदा करायला आह्मांस वेळ नाही. कारण आमची लेखणी व वाणी आह्मांस दूषित करायची नाही...!  आपणांसही विनंती की आपण आपली वाणी दूषित करु नये...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#कन्यादान_विवाहसंस्कार_हिंदुधर्म_गृह्यसूत्र_धर्मशास्त्र