*आज आंतरराष्ट्रीय योग दिवस...!*
श्रीमन्महाभारतामध्ये योगदर्शनाचा प्रवक्ता हा साक्षात् हिरण्यगर्भ आहे असे म्हटलंय. इथे हिरण्यगर्भ म्हणजे कोण???
ऋग्वेदाच्या दशम मण्डलाच्या १२१व्या सूक्ताचा आरंभंच
*हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ आसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम।*
*हिरण्यो हिरण्यमयो [निरु० १०।२३]*
इथे हिरण्यगर्भ शब्दाने नेमकं काय अभिप्रेत असावं???
प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अर्थात तो ईश्वर...! कशावरून???
*हिरण्यमय म्हणजे सुवर्णासमान चमचमणारा गर्भ-मध्यवर्त्ती गर्भसदृश भूवन ज्याचा आहे अथवा हे हिरण्य-प्रकाशमान सूर्यादि पिंड ज्याच्या मध्यभागी आहेत, तोच हिरण्यगर्भ-परमात्मा...*
(भाष्यकार - ब्रह्ममूनि परिव्राजक)
*ज्या ईश्वरानेच ही चराचर सृष्टी निर्माण केली, तोच हिरण्यगर्भ ह्या योगदर्शनाचा आद्य प्रवक्ता असून अन्य कोणताही पुरातन वक्ता नाहीच असे महाभारतकारांचे वचन आहे.*
ह्याचे नेमकं तात्पर्य काय???
*योगदर्शन यद्यपि भगवान महर्षि श्रीपतंजलीप्रोक्त सूत्रांमध्ये आपणांस प्राप्त होणारं असलं तरी त्याचा मूळ प्रवक्ता हा साक्षात् ईश्वर आहे. पण ईश्वर तर निर्गुण निराकार आहे, मग तो कसा प्रवक्ता? इथे तो प्रवक्ता आहे म्हणजेच त्यावरून त्याची वाणी म्हणजेच चतुर्वेदभगवान हेच त्याचे प्रवक्तेपण अभिप्रेत आहे...*
*म्हणजेच योगदर्शनाचे मूल हे वेदंच असल्यामुळे वेदांमध्ये असलेली योगविद्या हीच योगदर्शनाची सैद्धांतिक भूमिका आहे. पुढेच भगवान महर्षि श्रीपतंजलींनी त्याच योगविद्येंस सूत्ररुपांत रचून आज आपणांस ते योगदर्शन म्हणून षट्दर्शनापैंकी एक असे प्राप्त करून दिलं. पुढे त्यावर त्यांनी स्वत:च विस्तृत असे भाष्य (व्यासभाष्य) केलं असावं किंवा महर्षि वेदव्यासांनी ते केलं असावं, म्हणून त्यांस वेदभाष्य म्हटलं गेलं असावं. त्यांस आर्ष अर्थात ऋषिप्रणीत भाष्य म्हणतात. सुदैवाने आज हे उपलब्धही आहे. इतकंच काय तर ह्याच व्यासभाष्यांवर राजा भोजासहित अन्य पाच (एकुण ६) वृत्तीही उपलब्ध आहेत. यावर सविस्तर कधीतरी. यद्यपि इतिहासांत अनेक पतंजली होऊन गेलेले असले तरी विद्यमान योगदर्शनाचे प्रवक्ते भगवान महर्षि श्रीपतंजली हेच आहेत नि त्यांचा काळ श्रीमन्महाभारताच्या समीपचाच आहे.*
म्हणजेच योगदर्शन हे प्रत्यक्ष वेदप्रणीतंच असल्याने ते आस्तिक दर्शन अर्थात वेदांना व ईश्वरांस मानणारंच आहे. *सांप्रत दुर्दैवाने काही लोक आस्तिक म्हणजे वेद मानणारा पण ईश्वर मानणारा असेलंच असे नव्हे असा अत्यंत हास्यास्पद तर्क मांडतात. म्हणजे ह्यांच्या मते आस्तिक म्हणजे वेद मानणारा असला तरी ईश्वरांस मानणारा असेलंच असे नव्हे. म्हणजे आस्तिक परंतु निरीश्वरवादी म्हणे. म्हणून ते योगदर्शनांस आस्तिक परंतु निरीश्वरवादी असे म्हणताना दिसतात. सांख्यदर्शनाच्या बाबतीतही हेच विधान अनावधानाने केलं जातं. हे अत्यंत दुर्दैवी आहे....!*
*या भ्रमांस सर्वांस कारणीभूत मधील काळांतली अनार्ष भाष्ये जरी असली तरी आपण निरीश्वरवाद ह्या शब्दाचा अर्थ प्रथम जाणून घेऊयांत. जगत्सृष्ट्यत्वामध्ये ईश्वर हा निमित्त कारण की उपादान कारण हा प्रश्न असल्याने ह्याचा नीटसा अर्थ न आकळल्यानेही हा गोंधळ झालेला आहे. इथे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे कदापिही नसून तो जगताच्या निर्मितीमध्ये निमित्त की उपादान कारण इतकाच चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून सांख्य किंवा योगदर्शनांस अगदी आस्तिक पण निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारा असे म्हणण्यापर्यंत काही लोकांची लेखणी धजावते हे पाहून अत्यंत खेद होतो. मूळात षट्दर्शनापैकी एकही दर्शन हे निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे तर नाहीच. त्यामुळे सांप्रत समाजमाध्यमांवर अनेक जण कुणाचं तरी वाचून मूळ सैद्धांतिक भूमिका न जाणून घेता किंवा पारिभाषिक शब्दावली न आकळून घेता षट्दर्शनांना निरीश्वरवादी म्हणजे ईश्वर नाकारणारे असे रेटत बसतात, अशांपासून सावध रहावे ही विनंती...! सविस्तर कधीतरी पुन्हा ह्यावर येऊच...*
योगदर्शनाचा मूळ हेतु काय???
अष्टांग योगदर्शन हे क्रियात्मक नि अनुभवसिद्ध शास्त्र आहे. त्याचा मूल हेतु मनुष्यांस आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष देणं हाच आहे. त्यापासून विभूतिपादातून प्राप्त होणारे लाभ यद्यपि भौतिक स्वरुपाचे असल्या तरी ते काही अंतिम नसून अंतिम ध्येय आत्मसाक्षात्कार हेच आहे.
*सांप्रत काही भारत विखंडन शक्ती भगवान महर्षि श्रीपतंलजी हे बौद्ध होते असा मिथ्या तर्क मांडताना दिसतात. या मागे जितके डावे सक्रिय आहेत, तितकेच काही हिंदुद्वेष्टे नवबौद्धही(सर्व नवबौद्ध असे नाहीत). इतकंच काय तर काही लोक योगदर्शन हे शैव किंवा रुद्रापासून प्रणीत असून तो अवैदिक देव असून वैष्णव अर्थात विष्णु आदि देव वैदिक आहेत असाही भ्रममूलक प्रचार सुरु आहे. म्हणजेच योगदर्शन हे अवैदिक आहे असा अपप्रचार नेटाने सुरु आहे. जिज्ञासूंनी ह्यांपासून सावध रहावे ही विनंती...! आणि हो काही लोक योग हा सेक्युलर आहे असाही भ्रममूलक प्रचार करताना दिसतात, सबका साथ, सबका विकासचा विपरीत अर्थ काढत...! त्यापासूनही सावधान...!*
आज आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त हा संक्षिप्तसा लेखनप्रपंच...!
भवदीय
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#आंतरराष्ट्रीय_योग_दिवस_योगदर्शन_पतंजली_योगविद्या_आस्तिक_नास्तिक_निरीश्वरवादी
नमस्कार सर, आमच्या येत्या दिवाळीअंकात एखादा लेख/ कथा पाठवता येईल कां ? माझा इमेल : Aishwarya Kokatay kokatayash@gmail.com
ReplyDelete