वर्षभरात ज्या एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो, असा आजचा दिवस...! वैशाख शुद्ध पंचमी....!
श्रीमच्छंकरभगवत्पादस्य २५३१तमः जन्मोत्सवः| युधिष्ठिराब्दे २६३१तमे वैशाख शुद्ध पञ्चम्यां यस्य अवतरणं अवनीतले जातं| बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु:| यस्य करकमलात् पाखण्डिभि: खण्डित: वैदिकधर्मस्योद्धारः जातः, यस्य सकाशात् हिन्दुराष्ट्रस्य आर्य्यावर्तस्य समाजस्य च उत्थानं जातं, आपूर्वांचलपश्चिमसमुद्रात् तथा आसेतुशीताचलं समस्त वेदविरुद्धमतखण्डनं कृत्वा अवनीमण्डले येन श्रौतधर्मस्य पुनरुद्धार: कृत:, आचार्यपीठस्य स्थापनां कृत्वा यस्य हस्ते राष्ट्रनिर्माणं जातं, तं आचार्यवर्यस्य कृते किं लिखामि???
२५३१ वर्षांपूर्वी बौद्धादि अशा मूळच्या वैदिक परंतु पश्चात अवैदिक झालेल्या एकुण ६४ मतमतांतरांनी ह्या आर्य्यसनातन वैदिक हिंदुधर्मांस ग्रासले असताना, श्रौतधर्माचा तो चंडांशु काहीसा मावळवीत असताना, कालटी येथे आर्यांबा नि शिवगुरुच्या पोटी युधिष्ठिर शक २६३१ वैशाख शुद्ध पंचमीस एका दिव्यात्माचा जन्म झाला. समकालीन अशा श्रीचित्सुखाचार्यांच्या बृहच्छंकरविजय ह्या चरित्राप्रमाणे वयाच्या पांचव्या वर्षी त्यांचे त्यांच्या पित्यानी उपनयन केलं नि पित्याच्या त्याचवर्षीच्या अकस्मात देहावसानानंतर वयाच्या पुढे तीन वर्षात सर्व वेद कंठस्थ आठव्या वर्षी संन्यास धारण करून बाराव्या वर्षी सर्व शास्त्र अधिगत करून वयाच्या सोळाव्या वर्षी प्रस्थानत्रयींवर भाष्य करून हा मनुष्य आचार्यपदवींस प्राप्त होतो. तिथून पुढची १६ वर्षे हा मनुष्य आसेतुहिमाचल अवघा हिंदुस्थान अर्थात तत्कालीन आर्य्यावर्त अक्षरश: पिंजून काढून तत्कालीन ६४ मतांचंं आवश्यक तिथे निराकरण नि पुन: सर्वांचा आवश्यक तेथे समन्वय करून श्रौतीयधर्माची पुनर्संस्थापना करतो...!
राष्ट्रनिर्माते भगवान श्रीशंकराचार्य
विचार करा अडीच सहस्त्र वर्षांपूर्वी वाहनांची काय सुविधा असेल? तत्कालीन भारतवर्ष अगदीच अवनत नसला तरी आजच्या इतका आधुनिक परिवहनाच्यादृष्टीने प्रगत होता का? अशा विपन्नावस्थेमध्ये हा सोळा वर्षांचा युवक एका उदात्त ध्येय्याने प्रेरित अवघ्या राष्ट्राला 'सूत्रै: मणिगणा: इव' म्हणत चार दिशांच्या चार पीठांमध्ये एकसूत्राने गोवत राष्ट्राची अखंडता अबाधित ठेवतो...! संस्कृती नि साधनेचा शलाका पुरुष असा हा पुरुषोत्तम एकीकडे स्वत:ला आर्षधर्माचा पुनरुद्धारकर्ता नि भाष्यकार म्हणून नि दार्शनिक म्हणून सिद्ध करतो तर दुसरीकडे भारतीय अस्मिता नि एकतेचा उद्गाता म्हणून राष्ट्रनिर्माणाचं कार्य करतो...! अवघ्या सोळा वर्षांत हे महानतम कार्य???आज संभव आहे???
आज आपण आधुनिक विमानादि साधनांनी म्हटलं तरी १६ वर्षांमध्ये हा दिग्विजय प्राप्त करू शकतो??? दिग्विजय दूरंच राहुदे, पण समग्र भारतवर्षाची केवळ परिक्रमा तरी करु शकतो का??? ते सातत्य टिकवून ठेऊ शकतो का???
बरं त्या १६वर्षांच्या कार्याची फल:श्रुती काय? त्यापश्चात् भारतवर्षांवर अशोकादिंच्या बौद्धधम्माच्या रेट्याने अहिंसेच्या अतिरेकाने राष्ट्राचे सैन्यबळ न्यून होऊन अडीच सहस्त्र वर्षे झालेली ग्रीक, शक, कुशाण, हुण आदिंच्या टोळधाडी, त्याला समुद्रगुप्त(चंद्रगुप्त मौर्य नव्हे), शकारि नि कुशाणांतक स्कंदगुप्त नि विक्रमादित्य, हुणांतक यशोधर्मा नि मिहिरगुल, म्लेंच्छनाशक मराठ्यांचा तेजस्वी पराक्रम ही पाच सोनेरी पाने नि सहावं ब्रिटीश नामक दस्युंचा पराभव हा सर्व इतिहास जो आपण पाहतो, त्याची विजीगीषु पार्श्वभूमी कुठे असेल तर ती आचार्यांच्या दिग्विजयामध्ये...! अर्थात आचार्यांची विस्मृती हेच त्या आक्रमणांचे कारणही म्हणावं लागेल...!*
आजही ह्या भारतवर्षांवर अनेक परकीय आक्रमणं आहेतंच! अशा परिस्थितींत समग्र हिंदुस्थानाला एकसमयावच्छेदेकरून सुसंघटित करणाऱ्या राष्ट्रसंघटकांस जयंतीनिमित्त स्मरण न करणे नि आदरांजली न वाहणे ह्यापेक्षा करंटेपणा कोणता???
तत्वज्ञानाच्या दृष्टीने आचार्य अद्वैती असतील, त्यांचे ते मत कुणांस पटो न पटो, कुणी त्याची समीक्षा करो न करों, पण त्यांनी केलेलं राष्ट्रोद्धाराचे कार्य आपण विसरु शकु का??? ते विसरलं तर राष्ट्रघात हा ठरलेलाच आहे....!*
जाता जाता....
*भगवत्पादांची एकुण १९ संस्कृत चरित्रे उपलब्ध असताना एकंच सर्वत्र प्रचलित असलेला माधवीय शंकरविजय, की जो मूळचा त्यांचा नसूनही, तोच एकमेव अभ्यासून आचार्यांविषयी आपल्या चरित्रचिंतनाची इति:श्री करणं हे आमच्यासारख्या आचार्यभक्तांस शोभणारं नाही...!*
आजच्या कथित अद्वैतवाद्यांस किंवा शांकरमतानुयायांस आचार्यांच्या कालनिर्णयाचं काहीही पडलेलं नसलं तरी आह्मांस ते निजकर्तव्याचा बोध देणारं ठरतं...!
म्हणूनंच ह्या राष्ट्रोद्धारकांस जयंतीनिमित्त कोटी अभिवादन...!
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#श्रीमच्छंकराचार्य_जयंती_शांकरमठविमर्श_शंकरदिग्विजय_राष्ट्रनिर्माण_वैदिकधर्म
सुंदर👌
ReplyDelete