Friday, 22 April 2022

कन्यादान - वास्तव नि विपर्यास



धर्माचें पाळण, करणें पाषांड खंडन|

हेचिं आह्मासिं करणें काम, बीज वाढवावें नाम|

जगद्गुरु श्रीतुकोबाराय


कन्या दान????


कन्येचं म्हणजे मुलीचं दान कसं काय होऊ शकतं? दान करायला ती काय वस्तु आहे का? बघा बघा हिंदुधर्मात स्त्रियांना किती तुच्छ वागणुक आहे. कन्या ही दान केली जाते???


ह्या नि अशाप्रकारचे आक्षेप आपल्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण हे खरंच असे आहे का??? हिंदुधर्मामध्ये स्त्री ही खरंच दान करण्याची वस्तु आहे का???


मग जर तसं नसेल तर कन्यादान असा शब्द का योजिला जातो? ह्यासाठी सर्वप्रथम दान या शब्दाचा अर्थ घेऊयांत...!


स्वस्वत्वनिवृत्तिपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं|


देय‌ वस्तुंवरील आपला अधिकार त्यागून तो दुसऱ्यांस देणे म्हणजे दान...! म्हणजे दानानंतर त्या‌‌ गोष्टीवरचा आपला अधिकार संपतो. ती वस्तु आपली राहतंच नाही...


पण कन्या किंवा मुलगी ही जर वस्तु मूळीच नाहीये तर मग तिचं दान कसं? खरंतर ह्या प्रश्नातंच त्याचे उत्तर दडलंय. इथे 'दान' शब्दाने काहीतरी वेगळाच अर्थ अभिप्रेत असावा. आपल्या शास्त्रकारांना ही शंका होतीच म्हणून तिचं निरसन त्यांनी सहस्त्रो वर्षांपूर्वी आधीच करून ठेवलंय. धर्मशास्त्रामध्ये कल्प नावाचे जे‌ साहित्य आहे जे एक वेदांग आहे, त्यामध्ये धर्मसूत्र, गृह्यसूत्र, श्रौतसूत्र नि शुल्बसूत्र नावाचे चार ग्रंथ‌‌ येतात. त्यातल्या एका पारस्कर गृह्यसूत्रामध्ये १|४|१६ येथील 'मित्रस्य त्वेति मधुपर्कं प्रतीक्षते' ह्या सूत्रावरील पंडित गदाधरांचे भाष्य पहा.


स्वत्वत्यागपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं न कथंचिदप्यस्वकन्या कर्तुं शक्यते, नापि परस्य कन्या भवति विवाहोत्तरमपि ममेयं कन्या कन्यत्यभिधानात्| अत्र गौणो ददाति|


म्हणजे स्वत्व त्यागपूर्वक परस्वत्वापादान हे दान आहे वर सांगितल्याप्रमाणे. पण स्वकन्या कोणत्याही प्रकारे स्वकन्या राहुच नये असा प्रयोग होऊच शकत नाही, आणि कन्या दुसऱ्याची तशी होऊही शकत नाही, कारण विवाहापश्चातही 'ममेयं कन्या' असा शब्दप्रयोग आहे. म्हणजेच‌ विवाहानंतरही ती आपली म्हणजे वडिलांची किंवा कन्यादान करणाऱ्याची कन्या म्हणून राहतेच. कारण ती काही वस्तु नाहीये तिचं नातं हस्तांतर व्हायला किंवा संपायला. इथे गौणो असा शब्द आहे. म्हणजेच दान हा शब्द इथे केवळ गौण अर्थाने आहे.


जाता जाता


ह्यातल्या मधुपर्कावर आह्मीं मागे सविस्तर लेख लिहिला आहे, तो‌ ब्लॉगवर आहे...!


आपस्तंब धर्मसूत्रांमध्ये ६|१३|१० येथे स्पष्ट म्हटलं आहे की


यथादानं क्रयविक्रयधर्माश्चापत्यस्य न विद्यते|


म्हणजे इतर वस्तुंप्रमाणे कन्येचं किंवा अपत्याचे दान धर्मशास्त्रांत कधीच अपेक्षित नाही. कारण शास्त्र संतानांच्या क्रय-विक्रयाची संमतीच देत नाही.


म्हणजेच आपल्या हिंदुधर्मामध्ये मुलं-मुली विकायची अनुमतीच नाही कारण ती काही वस्तु नाहीयेत. हा आपल्या धर्माचा मोठेपणा नाही का ???


म्हणजेच इथे कन्येबरोबर दान हा शब्द मुख्यार्थवाचक नसून गौणार्थक आहे. सोप्प्या भाषेत तो लाक्षणिक अर्थाने आहे, शब्दश: नाही. म्हणजेच इथे दान हा शब्द शब्दश: दान ह्या अर्थाने नाही...!


आणखी स्पष्टीकरण पाहुयांत


मनुस्मृतीमध्ये विवाहाचे‌ आठ प्रक्रार सांगितले असून त्यातल्या पहिल्या चार अशा ब्राह्म, दैव, आर्ष नि प्राजापत्य नामक विवाहपद्धतींमध्ये ह्या दान शब्दाचा अर्थ स्पष्ट सांगितला आहे तो असा...


दान म्हणजे तिचे भरण-पोषण तथा तिच्या मानमर्यादेच्या रक्षणासाठीचं दायित्व वरांवर(पतीवर) सोपवण्यासाठी म्हणून व दोघांनी सख्यभावाने परस्परांसह राहून धर्मपूर्वक अर्थार्जन करून त्याचा योग्य कारणें विनियोग करून प्रजोत्पादन करण्याची अनुमती देण्यासाठी इतक्या महदर्थाने हा शब्द योजिला आहे....


म्हणजे इथे दान शब्द किती व्यापक अर्थाने आहे पहा...!


वैखानस गृह्यसूत्रामध्ये ह्या विवाहांच्या वेळी जो संकल्प आहे, त्यात म्हटलंय की


अस्य सहधर्मचारिणी भवतीति ब्राह्मे विवाहे धर्मप्रजासंपत्त्यर्थ| यज्ञापत्यर्थं| ब्रह्मदेवर्षिपितृप्त्यर्थं प्रजासहत्वकर्मभ्यो ददामीत्युदकेन तां दद्यात् (दाति) ॥ ४ ॥ कन्याप्रदः इति ।


ही कन्या ह्याची धर्मचारिणी व्हावी कशासाठी तर धर्मानुष्ठान म्हणजे धर्माचरण, प्रजोत्पादन तथा गृहस्थाश्रमांतील सर्व कार्यांमध्ये सहभाग, देव, ऋषि पित्रांच्या तर्पणासाठी...!


आचार्य शौनकांनी दान शब्दाचा अभिप्राय‌ सांगताना लिहिलं आहे की


कन्यां सहत्व कर्मभ्य: करोति प्रतिपादनम्|


परस्परांनी एकत्र मिळून प्रजोत्पादन तथा श्रौत-स्मार्त कर्मानुष्ठान म्हणजेच धर्मानुष्ठान करण्यासाठी...


आता इतकं सांगूनही कुणाला आणखी शंका असेच तर सांगतो...


जेंव्हा कन्येचा विवाह होतो‌ तेंव्हा तिच्या भावी आयुष्यासाठी घरातले नातेवाईक, सगेसोयरे, तिचे मित्रादि, सर्व हितचिंतक तिला काहीतरी वस्तु किंवा गोष्टी भेट म्हणून देतात. हे सर्व तिच्यासाठीच्या प्रेमासाठी स्नेहासाठी दिलं जातं. ह्या ज्या गोष्टी दिल्या जातात तेच मूळात कन्यादान आहे. म्हणजे कन्यादान शब्दामध्ये‌ कन्येबरोबर ज्या वस्तु दिल्या जातात त्यांचे‌ दान अभिप्रेत आहे, कन्येचं दान नव्हे...!


पुरोहित लोक हेच धन किंवा भेटवस्तु त्या कन्येंस द्यायला लांगतात. हेच‌ कन्यादान आहे...


इतकं लक्षात घेतलं तरी पुरेसं!!!


कन्यायै दानमिति कन्यादानम्|


जे कन्येंस भेट म्हणून दिलं जातं तेच कन्यादान....!


इतकं सांगूनही कुणाला कळंत नसेल तर आह्मीं सोबत कन्यादानप्रयोग मराठी अनुवादासहित जोडला आहे तो पहावा ही विनंती...!


संदर्भ दानचंद्रिका - दिवाकरभट्ट महादेवभट्ट काळे - काशी


हां संपूर्ण प्रयोग वाचावा. त्यात कोणते वाक्य आहे नि नाही हे तुम्हाला कळेल...!











शेष, कुणाचं नाव घ्यायला नि निंदा करायला आह्मांस वेळ नाही. कारण आमची लेखणी व वाणी आह्मांस दूषित करायची नाही...!  आपणांसही विनंती की आपण आपली वाणी दूषित करु नये...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#कन्यादान_विवाहसंस्कार_हिंदुधर्म_गृह्यसूत्र_धर्मशास्त्र

No comments:

Post a Comment