Sunday, 6 February 2022

वेत्ति पारं सरस्वत्या लतानाम गानसरस्वती।

 



वेत्ति पारं सरस्वत्या लतानाम गानसरस्वती।

लतानाम गानसरस्वत्याः पारं वेत्ति सरस्वती।


श्रीमधुसूदन सरस्वतींची क्षमायाचना करून आज म्हणावंसं वाटतं की


श्रीसरस्वतीची थोरवी गानसरस्वती लतादीदींच जाणतात व गानसरस्वती लतादीदींची थोरवी प्रत्यक्ष श्रीसरस्वतीच जाणते....

 

दीपावलीच्या भल्या पहाटे उठावं व अभ्यंगस्नान उरकून सूर्योदयापर्यंत गायत्री करत संध्याही उरकून घ्यावी व प्रा. राम शेवाळकरांचं 'ज्ञानदेव म्हणे' ऐकायला घ्यावं. 'ॐ नमोजी आद्याच्या' आरंभीचे त्यांचे चिंतन श्रवण करून गानसरस्वतीच्या (...इथे माझी लेखणी खरी थांबली होती कारण पुढचे शब्द काहीच सुचत नव्हते) अधरामृतातून कैवल्यचक्रवर्ती संतश्रेष्ठ श्रीज्ञानोबारायांच्या भावार्थदीपिकेच्या त्या अद्वितीय मंगलाचरणाचे ते तीन शब्द ऐकण्यासाठी जणु कर्णांच्या ठायीं सर्व शक्ती एकवटाव्यात. परब्रह्म परमात्म्याच्या प्राप्तीसाठी व्याकुळ झालेल्या जीवात्म्याची कोकिळेच्या आर्तस्वरांनी आरंभ झालेली ती अभंगावली, त्या सावळ्यासुंदर कासेपीतांबरु श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी अभिभावित होत, ह्रदयरुपी भुंग्याने प्रकट केलेल्या गुंजारवाने ऋणुझणु करत विश्वाचें आर्त मनी प्रकटत, तो सोनियाचा दिवस जणु पाहत, वृत्तीची निवृत्ती आपणां सकट होत अवघेचिं वैकुंठ जणु चतुर्भूज होत नि अंती सौभाग्यसुंदरु अशा त्या बापरखुमादेवीवरुच्या साक्षात्काराने त्या आत्मतत्वाचा तो मोगरा फुलंत फुलंत अंती त्या विश्वेश्वरांस तोषविण्यासाठी त्या श्रीमाऊलींने ते पसायदान मागत तो वाग्यज्ञ सुसंपन्न करींत त्या विश्वस्वधर्मसूर्याचे दर्शन घडवावं....


शब्दसृष्टीचा जणु ईश्वरंच अशा त्या श्रीज्ञानराज माऊलीने आत्मानुभूतीने शब्दब्रह्मामध्ये संबद्ध केलेली ही अभंगरचना ज्या शब्दांतही न मांडता येणाऱ्या दिव्यानुभूतीचा संस्पर्श श्रोत्यांस घडविते, ती ज्या गानसरस्वतीने गायिलीं तिचं वर्णन म्या पामराने काय करावं??? आजपासून ती प्रत्यक्ष त्या आळन्दीवल्लभ श्रीज्ञानेशासंच तो सर्व अभंगनाद ऐकवंत नसेल कशावरून???




शिवकल्याण राजा...


तीनशे वर्षे! तीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्याच्या अंधःकारांत चाचपडंत होता....


मला सव्वाशे वर्षांचे आयुष्य हवंय, शिवचरित्र ब्रह्मांडापल्याड नेण्यासाठी म्हणत आयुष्याची १०० वर्षे शिवचरित्राचा पोत नाचवत जो गोंधळी नुकताच शिवलोकांस आपल्या आराध्य दैवतांस कायमचं भेटण्यासाठी कैलासगमन करता झाला, त्यांच्या उपरोक्त धीरगंभीर निवेदनाने श्रोत्यांच्या कर्णीं जणु सर्व प्राण एकवटावेंत नि हिंदुपदपातशाह हिंदवीस्वराज्यसंस्थापक श्रीशिवप्रभुंच्या चरित्राचे जणु सारंच असे 'प्राणीमात्र जालें दुःखी पासून ते शिवकल्याण राजा'पर्यंत असलेलं ११ गीतांचं ते ध्वनिमुद्रित शिवभारत ज्या गानसम्राज्ञीच्या स्वरांनी आरंभ होतं नि अंतही पावतं, ते ऐकत असताना तिच्या मुखातून ऐकलेल्या अन्य सहस्त्रावधी गीतांचा विसरही आपणांस पडल्याशिवाय राहणारही नाही इतके माधुर्य तींमध्ये आहे...ह्यात काही अत्युक्ती वाटावीं असे आह्मांस तरी वाटत नाही...!




जयोस्तुते...


स्वातंत्र्याच्या सूर्याची ती आरती ज्या महाकवी अशा प्रत्यक्ष कविकुलगुरुचा वारसा चालविणाऱ्या क्रांतिसूर्याच्या लेखणीतून उदयांस आली, ते स्वतंत्रतेचे महन्मंगल स्तोत्र जिच्या मुखांतून स्वरबद्ध झालं, त्या गानकोकिळेचा तो स्वर आज स्वर्गी त्या हिंदुराष्ट्रपतींसही तृप्त करत नसेल कशावरून???


ने मजसीं नें...


मातृभूमीच्या विरहाने ओथंबलेले ते सागरसूक्त ज्या मातृभक्त विनायकाच्या शब्दप्रतिभेचा सर्वोत्तम आविष्कार ठरलं, ती मातृवंदना ज्या दीदींनी भावंडासमवेत गायिलीं, ती दीदी आज नसली तरी त्या गीताने ती अमर आहेच...


भेटीं लागें जीवा लागलीसें आस...


जिच्या अधरद्वयांतून लक्षावधी सूर गेली ९ दशके प्रकटली आहेत, तिने गायिलेल्या असंख्य गीतांचे चिंतन करण्यासाठी सरस्वतीच्या लेखणीतली शाईही संपावी, अशा त्या स्वरसम्राज्ञीने ही आयुष्यभर केलेली स्वरसाधनाही त्या अनंताच्या भेटीसाठीच असावी. *संतश्रेष्ठ जगद्गुरु श्रीतुकोबारायांच्या आत्मानंदपरिप्लुत अभंगसमुद्रांतली ही   त्यांच्या उपास्यदेवतेच्या प्राप्तीसाठी असलेली विरहोत्कटतेची परिसीमा गाठणारी रचना ऐकताना ती गाणारीही जो जीव ओतून ती गातें, ते श्रवण करून आज तिची तीं आर्तता त्या श्रीविठ्ठलापर्यंत पोहोचलीं व त्याने तिला त्याच्या..*


सुंदर ते ध्यान उभे विटेंवरी...


अशा सगुण रुपाचे दर्शन तेच तिचें सर्वसुख बनवलं.....


ती लता आज मूक्त जाहलीं....


तिच्या असंख्य श्रवणीय नि तितक्यांच चिंतनीय गीतांमधल्या आह्मांस आमच्या व्यक्तिगत जीवानमध्ये सर्वांत जास्त भावलेल्या स्वराविष्कारांविषयीची आमची ही शब्दरुप भावांजली...


भवदीय


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com

 #लतामंगेशकर_श्रीविठ्ठल_श्रीज्ञानेश्वरमाऊली_श्रीतुकोबाराय_छत्रपतिशिवाजीमहाराज_सावरकर_बाबासाहेबपुरंदरे

Wednesday, 12 January 2022

सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं।


 

आयुष्यांतला पहिला विश्वदिग्विजयी प्रेरणास्त्रोत! ह्यात जोडलेल्या चित्रांतले ते डोळे पहा! पाहताक्षणीच हे डोळे एका योग्याचे आहेत हे कुणांसही कळेल, त्यासाठी देवेंद्रनाथ असायची आवश्यकता नाहीच. ते दोन डोळे...!इथे भाषाप्रभु पु भा आठवतात...!

इयत्ता आठवीत कवठेकर प्रशालेत नुकताच प्रवेश घेतल्यावर एका स्पर्धेसाठी वाचलेलं स्वामीजींचं छोटंसं चरित्र, त्यानंतर नववीत बालमित्र चिदानंद कडून घेतलेले राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग नि श्रीठाकुरांचे दीर्घ चरित्र नि तिथून आरंभ झालेलं चारित्र्यनिर्मितीचं एक सत्र! नित्य ध्यानधारणा, एकपाठी होण्यासाठी न्यूनतम १२ वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रताच्या पालनासाठीची कसून तयारी, स्वामीजींची व्याख्यानं मूळ इंग्रजीतूनंच मुखोद्गत करण्यासाठीची धडपड, पुढे पुण्यपत्तनी आल्यावर मनुष्यनिर्माण नि राष्ट्रपुनरुत्थानाच्या प्रेरणेने विवेकानंद केंद्राचं कार्य, वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु वै. श्रीसोनोमामांच्या भाषेत हिंदु तत्वज्ञानाची नुसती प्रस्तावना म्हणून दहा खंडांचं समग्र विवेकानंद वाचन, मेरी लुईस बर्कचे सहा खंड, एस एन धरांचे तीन चरित्रात्मक खंड, स्वामीजींच्या सार्ध शती समारोहानिमित्त पुण्यातल्या अनेक महाविद्यालयांमध्ये युवकवर्गांस इंग्रजीतून विवेकानंदांवर आवाहन, १०,०००हून अधिक युवक-युवतींशी केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष विवेकानंद पोहोचवणं, सार्ध शतीच्या समारोपांस १२ जानेवारी, २०१४ मध्ये सावरकर क्रांतिमंदिरामध्ये स्वामीजींच्या विश्वदिग्विजयांवरंच आयुष्यांतलं पहिलंवाहिलं अत्यंत वेगांत केलेलं व्याख्यान, त्यानंतर कैक वर्षांची मनोकामना पूर्ण होत्साता केंद्राच्या समर्थ भारत शिबीरापश्चात् २८-२९ डिसेंबरला शिलास्मारकांवर तासन्तास केलेली ध्यानधारणा, तिथून पुढे आजपर्यंतची गत आठ वर्षांतली वेदांपासून सावरकरांपर्यंतची ८५च्या समीप प्रकट व्याख्यानं, तीही चारही भाषांमधून - मराठी, हिंदी, इंग्रजी नि संस्कृत...!






विवेकानंद - भिनत जाणारी पाच अक्षरे


पावित्र्याच्या तेजाने तळपणारा, ईश्वरावरील श्रद्धेचे शुभकवच ल्यालेला, मृगेेंद्राचे सामर्थ्य नसनसांत स्फुरलेला, पौरुषाने मुसमुसलेला, दीनदलितांबद्दल ह्रदयांत अपार करुणा असणारा एक योद्धा संन्यासी...! वेदांचा प्रखर अभिमानी, महर्षि दयानंदांप्रमाणेच वेदांचा अधिकार सर्वांस आहे असे यजुर्वेदाच्या आधारे प्रतिपादणारा वेदनिष्ठ, धर्म हीच भारताची जीवनशक्ती आहे असे ठासून सांगणारा पण हे करूनही धर्माच्या नावाखाली निर्माण झालेल्या काही कुप्रथांवर मात्र धर्माला कुठेही धक्का न लागु देता प्रहार करणारा कर्ता धर्मसुधारक, स्त्रियांना केवळ शिक्षण द्या, त्यांचा उद्धार त्या स्वतः करतील असे सांगणारा खरा स्त्रीसुधारक, आजच्या भाषेत फेमिनिस्ट, तथाकथित उच्चवर्णीय ब्राह्मणांच्या काही चुकांसाठी त्यांच्यावर रोष करणारा पण त्यांना निजकर्तव्याचा बोध देण्यासाठी श्रीकुमारिलभट्टपादांचे उदाहरण देत ब्राह्मणत्व हाच हिंदुधर्माचा आदर्श आहे असे दुसरीकडे सांगणारा, एकीकडे अद्वैती मेंदु नि इस्लामी शरीर असे म्हणणारा तर दुसरीकडे राजयोगामध्ये इस्लामची नि पैगंबराची कठोर शब्दांमध्ये पोलखोल करणारा, ख्रिस्त्यांना त्यांच्याच देशांत जाऊन भारतामध्ये येऊन धर्मांतर कराल तर धमकावणारा धर्ममार्तंड, एक हिंदु परधर्मात गेला तर एक हिंदु कमी झाला असे नसून हिंदुधर्माचा एक शत्रु वाढला असे प्रतिपादणारा हा परमश्रद्धेय हिंदुत्वाग्रही, हिंदु हा शब्द उच्चारतांच अंगामध्ये वीजेची लहर उसळायला हवी असे ठासून सांगणारा हिंदुत्वनिष्ठ, विदेशांत जाऊन आपल्या असामान्य भाषाप्रभुत्वाने नि विशुद्ध चारित्र्याने वैदिक धर्माचा डंका पिटवणारा पण इथे भारतात आल्यावर इथल्या भारतीयांना प्रसंगी काही चुका सांगणारा व पाश्चात्य तंत्रज्ञान, आधुनिकता नि भारतीय तत्वज्ञान ह्या सर्वांचा तौलनिक अभ्यास मांडून दोन्हींचा समन्वय करूनही स्वधर्माचा, स्वसंस्कृतीचा, न्याय्य परंपरांचा, हितकारी रुढींचा तितकाच अभिमानाने छाती फुगविणारा एक राष्ट्रीयत्वाचा अभिमानी युवक, अंती वेदांत हाच जगाचा भावी धर्म होईल असे निक्षून मांडणारा आत्मज्ञानी, निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झालेला एक व्यावहारिक वेदान्ती!!!


काय लिहावं ह्या विश्वदिग्विजयी युवकाविषयी....???


किती लिहावं???


केंद्राच्या उद्देश्याप्रमाणे मनुष्यनिर्माणासाठी नि राष्ट्र पुनरुत्थानासाठी स्वामीजी वाचावेच लागतील. ज्यांना स्वामीजी अभ्यासायचे आहेत त्यांनी निदान त्यांची भारतीय व्याख्याने (Lectures from Columbo to Almora) आधी वाचावीत, मग अन्य साहित्य वाचलं तरी चालेल. वर बव्हतांश साहित्याचा उल्लेख केलाच आहे तो आमचा अहंकार पोसण्यासाठी नव्हे तर विवेकानंद साहित्याची ओळख व्हावी ह्यासाठी...! 


स्वामीजींच्या साहित्यामध्ये काही ठिकाणी परस्परविरोध नि सदोष विधाने निश्चित आहेत पण ज्याने समग्र अभ्यासलेत तो भ्रमित होणार नाही. कारण त्यांच्या साहित्यातले संदर्भ मोडून तोडून मांडून बुद्धिभेद केलाच जातोय. अखंड सावधान असावे!


अर्थात आठवीपासून सुरु झालेला हा प्रवास आयुष्यभराचा आहे...


प्राचार्यांच्या भाषेत यासाठीच बोलणे ऐकणे.....!


म्हणूनंच 


सदा विवेकानन्दमयं सुविवेकमयं स्वानन्दमयं।


काल जयंतीनिमित्त स्वामीजींना अभिवादन करण्यासाठी हे गीत नुकतंच काल गायलं आहे, ते इथे श्रवण करावं...चुका आहेतंच मान्य...


https://youtu.be/GdLbqFIsd20


भवदीय


पाखण्ड खण्डिणी


#स्वामी_विवेकानंद_विश्वदिग्विजय_विवेकानंदकेंद्र_शिलास्मारक_हिंदुत्व_वेदाभिमान_राष्ट्रीयत्व

Friday, 24 December 2021

The myth of Jesus, the Christ - येशु ख्रिस्ताचे मिथक

 


*The question is not when Jesus was born. The important question is whether Jesus was ever actually born.....🤔*


*प्रश्न हा नाहीये की कथित येशु कधी जन्मला.. महत्वपूर्ण प्रश्न हा आहे की हा कथित येशु खरंच जन्मला होता का? 🤔🤔🤔*


आयुष्यांत कधीही बायबल न वाचलेला हिंदुसमाज (काही अपवाद वगळता) या कधीच अस्तित्वात नसलेल्या ख्रिस्ताची जयंती अज्ञानाने साजरी करतो....का???


किती भोळेपणा? किती अज्ञान?? किती तो आत्मघात???


अरे वाचा की कधीतरी... करा की जरा चिकीत्सा...


आपल्याच धर्मातल्या पोथ्या-पुराणांची, वेदांची, प्रथांची, रुढींची, परंपरांची, सणांची, उत्सवांची बुद्धिवादी चिकीत्सा 'असे का' म्हणून करता ना? हे असंच का करायचं, ते तसंच का करायचं विचारता ना?? करता ना चिकीत्सा???


चांगली गोष्टंय चिकीत्सा ही करायलाच हवी ! अवश्य व्हायलाच हवी...अहो चार्वाक आपल्याकडे जन्माला आला व त्याला आपण दर्शनांमध्ये स्थान देऊन अभ्यासतो... नास्तिक असला तरी...


पण हा कोण कुठला ख्रिस्त???


पण मग त्या कथित ख्रिस्ताची व त्याच्या कथित बायबलचीही व ख्रिस्ती पैशाचपंथाचीही करा ना...


तसंही ते लोक तर बायबल फुकट वाटतात कारण त्यांना कोट्यावधींचा निधी येतो... थोडं गुगल करा कळेल...


बायबल वाचल्याने काही पाप लागणार नाही बरंका उलट पाप लागायचं बंद होईल...एकदा वाचा तरी कथित ख्रिस्ताचे कथित बायबल


*त्या बायबलमधली आत्यंतिक क्रुरता, अश्लीलता, बीभत्सता, त्या कथित ख्रिस्ताची आग लावायची, मद्य पिऊन झिंगायची भाषा...*


*सर्वधर्मसमभाव???*


*बायबल न वाचताच सर्वधर्मसमान आहेत असे ठरवून मोकळे???*


बापरे...


*धर्मांतर हे राष्ट्रांतर कधी पटणार???*


*ज्या ख्रिस्त्यांनी ईन्क्विजिशनच्या नावाखाली गोव्यांत आपल्या पूर्वजांच्या सरसकट कत्तली करत मुंडक्यांचे अक्षरशः मनोऱ्याचे मनोरे रचले, पुरावे आहेत, केवळ गोव्यातंच नव्हे सर्व हिंदुस्थानात त्यांचे पांढरे पाय लागल्यापासून त्यांनी केलेल्या अत्याचारांचे प्रसंग नुसते नामोल्लेख करायचे म्हटले तरी वेळ पुरणार नाही, त्यांच्या पूर्वजाची जयंती साजरी करायची?*


*पुरावे आहेत बरंका त्यांनीच लिहिलेले अभिमानाने लिहून ठेवलेलेत त्यांच्याच ख्रिस्ती मिशनऱ्यांनी आणि प्रवाश्यांनी...*


इतकंच नव्हे तर ह्याच ख्रिस्ती ब्रिटीशांनी आपल्यावर दीडशे वर्षे राज्य केलं...माहितीय ना???


इतकंच नव्हे तर त्यांनी आपला इतिहास अत्यंत विकृत केला, आपल्यात इतिहासाच्या नावाने भांडणं लावली जी आजही पेटविली जातात...आजही आर्याक्रमण सिद्धांत विकृतपणे शिकविला जातो....


हे सगळं विसरायचं अरे वाह...🙄


काही दीडशहाणे म्हणतील की अहो त्यात त्या ख्रिस्ताची काय चूक??? तो तर बिचारा शांतिदुत होता...


शांतिदुत???


बायबल न वाचताच...इतिहास न जाणताच...


अहो सगळी त्याचीच तर चूक आहे...


काही म्हणतील तो अस्तित्वातंच नव्हता तर मग त्याची काय चूक???


मग नव्हता तर साजरी का करता जयंती??? 😂😂😂🤣🤣🤣


एकदा बायबल वाचा मग कळेल की सगळी चुक कुणाची ते...


पण आपल्याला काय???


एवढा Fundamentalist Attitude कशाला??? मूलतत्ववादी मानसिकता बरंका गोड शब्दांमध्ये....🥺


एमएनसीज मध्ये एसीत बसून निर्लज्जपणे त्या लाल टोप्या घालायच्या, लेकरांना घालायच्या, कॉन्हेण्ट मध्ये घातलेल्याच असतात आधीच, त्याचे फोटो निलाजरेपणे सोशल मीडियावर संग्राह्य करायचे


पापी पेट का सवाल ना...


पोटासाठी काहीही...


वाह वाह वाह....


हा काही द्वेष नाहीये,गरळ ओकली नाहीये....


हे सत्य आहे जे कळायला हवं, जाणून घ्यायला हवं....


मानव माणूस म्हणून जागे व्हा व ख्रिस्ताची सत्यता जाणून घ्या....


जागे व्हा.....

Sunday, 12 December 2021

धर्मवीर डॉक्टर मुंजे यांचं आज जन्म दिनांकाने स्मरण

 


एक कुशल नेत्र विशारद, सशस्त्र क्रांतिकारक, निष्ठावंत हिंदुमहासभाई, हिंदूंना शस्त्र सामर्थ्याचे महत्त्व वेळोवेळी पटवून देणारा एक दूरदृष्टीचा योद्धा, सैनिकी शिक्षणाचा जणूकाही प्रवर्तक म्हणता येईल अशी योग्यता असलेला सत्पुरुष, राजा-मुंजे करारामधून पापस्तानचं षड्यंत्र फार पूर्वीच हाणून पाडणारा व पूर्वास्पृश्य बांधवांचा उद्धारकर्ता आणि हिंदू समाज समाजाचा संघटन कर्ता, अखंड हिंदुराष्ट्राचा एक द्रष्टा पुरस्कर्ता...


*राजा-मुंजे करार*


एम सी राजा आणि धर्मवीर डॉक्टर मुंजे या दोघांमध्ये फेब्रुवारी १९३२ यामध्ये जो महत्त्वाचा करार झाला जो हिंदुस्थानच्या सामाजिक उद्धरणासाठी होता, विशेषतः पूर्वास्पृश्य बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. हा करार गांधी आणि आंबेडकर यांच्या पुणेकराराच्या आधी झालेला असूनही आंबेडकरांनी याकडे दुर्लक्ष केलं हे अत्यंत दुर्दैवी आहे 


*स्वतंत्र मतदार संघ की संयुक्त मतदारसंघ???*


एमसी राजा यांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशन या संस्थेने संयुक्त मतदार संघाची म्हणजे (जॉईंट इलेक्टोरेट्स) ची मागणी केली होती. पण आंबेडकर मात्र स्वतंत्र मतदार (सेपरेट इलेक्टोरेट्स) संघाचे पुरस्कर्ते होते. आरंभी ते तसे नव्हते. 


*Communal Award - कम्युनल एवॉर्ड - जातीय निवाडा*


ऑगस्ट १९३२ मध्ये ब्रिटिशांनी हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यासाठी व मुस्लिमांना अधिक लाभ देण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे सेपरेट एलेक्टोरेट्स ची घोषणा केली, याला कम्युनल अवॉर्ड (जातीय निवाडा) असे म्हटले जातं. यातून पूर्वास्पृश्य बांधवांना स्वतंत्र मतदारसंघ तर प्राप्त होणार होतेच पण त्याबरोबर दुहेरी मतदान सुद्धा प्राप्त होणार होतं. आंबेडकरांना हा करार त्यांच्या व्यक्तिगत लाभासाठी महत्त्वाचा वाटत असला तरी हा करार हिंदू समाज फोडणारा होता इतकेच नव्हे तर पूर्वास्पृश्य बांधवांसाठी देखील घातक होता. म्हणूनच या अत्यंत घातक कराराचे वर्णन करताना बॉम्बे क्रॉनिकलने १८ ऑगस्ट १९३२ मध्ये म्हटलेलं आहे की 'या कम्युनल एवॉर्डमुळे भारताची राष्ट्रीय एकात्मता ही अल्पसंख्यांक वादा पुरती मर्यादित झाली, संकुचित झाली.' ब्रिटिशांना हेच तर साध्य करायचं होतं. गांधींनी तातडीने या स्वतंत्र मतदार संघाला कम्युनस एवॉर्डला विरोध करत आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि हा करार मोडून काढला. गांधींनी त्यांच्या आयुष्यात केलेलं हे एक चांगलं कार्य म्हणावे लागेल.


इथे प्रश्न असा निर्माण होतो की आंबेडकर जे पूर्वी स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात होते व संयुक्त मतदार संघाचे समर्थक होते, ते आज अचानक त्याचे विरोधक कसे झाले ? ? ?


आंबेडकरांच्या या बदललेल्या भूमिकेसंबंधी चर्मकार समाजाचे श्री पा ना राजभोज यांनी व्यक्त केलेले मत अत्यंत चिंतनीय आहे. ७ जुन, १९३२ या दिवशी व्हाईसरॉयच्या खाजगी सचिवाला लिहिलेल्या पत्रामध्ये ते लिहितात


*"काही महिन्यांपूर्वीच डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतंत्र मतदारसंघाला विरोध केला होता पण तेच आंबेडकर आता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करत आहेत हे अत्यंत चिंताजनक आहे. पूर्वास्पृश्य बांधवांच्या उद्धारासाठीच चाललेले सर्व प्रयत्न हे ते आम्ही हिंदूच आहोत याच भावनेने आहेत आणि म्हणूनच त्यांच्यामध्ये आणि अन्य हिंदूंमध्ये असलेले जे काही वाद-विवाद आहेत, तो आमचा अंतर्गत विषय आहे. आंबेडकरांनी ज्या स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली आहे ती जर यशस्वी झाली तर या दोघांच्या एकत्रीकरणाचे सर्व प्रयत्न हे व्यर्थ ठरतील."*


याच उपरोक्त राजांनी स्थापन केलेल्या ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस असोसिएशनच्या सहाय्यक सचिवांनी जीके थावरे यांनी जे विधान केलं होतं,ते महत्त्वाचं आहे मार्च १९३२


*"उपरोक्त कम्युनल अवॉर्ड म्हणजेच अल्पसंख्यांक कायदा हा मुस्लिमांसाठी जास्त लाभदायक ठरेल व यातून आमच्या पूर्वास्पृश्य बांधवांचा (डिप्रेस्ड क्लासेसचा) काहीही लाभ होणार नाही कारण यातून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मुसलमानांना १७७ जागा मिळतील आणि आमच्या पूर्वास्पृश्य बांधवांना केवळ ५९."*


*२४ सप्टेंबर १९३२ चा पुणे करार*


आजचे आंबेडकरवादी बांधव गांधींना कितीही शिव्या घालतात, पण या पुणेकराराने आंबेडकरी जनतेचा म्हणजेच पूर्वास्पृश्य बांधवांचा खरतर सर्वात मोठा लाभंच झाला कारण उपरोक्त कम्युनल अवॉर्डमुळे पूर्वास्पृश्य बांधवांना केवळ ७१ जागा मिळणार होत्या ज्याया पुणे करारामुळे १४८ पर्यंत गेल्या. हा पुणे करार मुंजेंच्या करारानंतर चा होता


*आश्चर्य म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजा नि धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या उपरोक्त आधीच्या कराराचे वर्णन 'Less troublesome and more straigthforward' असे केलं होते, तरीही त्यांनी तो नाकारावा.*


हे असं का घडलं ह्यावर कधीतरी स्वतंत्र चिंतन करु...


आज धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या जयंतीनिमित्त एका अत्यंत महत्त्वाच्या कार्याचं चिंतन करणे आवश्यक वाटले म्हणून हा लेखन प्रपंच !आमच्या अखिल भारत हिंदू महासभेने या कम्युनल एवॉर्डला विरोध केला होता हे येथे जाताजाता सांगणे आवश्यक आहे. अखिल भारत हिंदू महासभेच्या ध्येय धोरणांमध्ये अस्पृश्यतेचे पूर्ण उच्चाटन हे अत्यंत महत्त्वपूर्ण विधेय आहे यावर आम्ही मागे लिहिले आहे.


*ज्यांना धर्मवीर डॉक्टर मुंजे समजून घ्यायचे आहेत त्यांनी महामहोपाध्याय बाळशास्त्री हरदास आणि त्यांची पत्नी वीणा हरदास यांनी लिहिलेले दोन खंड जुन्या आवृत्तीचे वाचावेत नवीन आवृत्तीचे नको. का नको ते कधीतरी सांगेन.*


जाता जाता महत्वाचं


*प्रस्तुत लेखक हा वेदप्रामाण्यवादी आहे म्हणूनंच तो अस्पृश्यतेला अत्यंत विकृत नि वेदविरुद्ध प्रथा मानणारा असल्यामुळे हिंदू धर्मशास्त्रामध्ये तिचं अस्तित्व पूर्ण नाकारतोच नाकारतो. कारण आमचा हिंदू धर्मशास्त्राचा काहीतरी अभ्यास आहे हे सर्वांस ज्ञात आहे. मुळात ही अस्पृश्यता नेमकी कधी निर्माण झाली हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असल्यामुळे इथेच लेखणीस विराम देऊ....!*


धर्मवीर डॉक्टर मुंजे यांच्या चरणी विनम्र अभिवादन


#अस्पृश्यता_धर्मवीर_डॉ_मुंजे_हिंदुमहासभा_सशस्त्र_हिंदूंचे_सैनिकीकरण_आंबेडकर_गांधी_पुणेकरार_पाकिस्तान

Thursday, 25 November 2021

उर्ध्वरेता भवेद्यस्तु स देवो त नु मानुष: ।



तीन सूर्य एकाच चित्रामध्ये - अवकाशांतला सूर्य, शिवसूर्य नि गुरुसूर्य 

जे उर्ध्वरेतस अर्थात आजीवन अखंड ब्रह्मचारी असतात, ज्यांनी कामिनी अन् कांचन दोन्हींचाही त्याग आयुष्यात केलेला असतो, ज्यांच्या देहाची आसक्ती नष्ट झालेली असते, गीतेतल्या द्वितीय अध्यायांतल्या स्थितप्रज्ञाप्रमाणे ज्यांनी *प्रजहाति यदा कामान् सर्वान मनोगतान्* असे जीवन व्यतीत केलेलं असते, अशी लोकोत्तर व्यक्तिमत्वं ही त्रिकालीही सर्वत्र नि सर्वकाल ही साक्षात देवंच मानली जातात, नव्हे ती देवंच असतात. इथे देव शब्दाचा अर्थ शतपथ ब्राह्मणामध्ये दिल्याप्रमाणे


*विद्वाँसो हि देव:।* असा आहे.


धर्मशास्त्रांतल्या कोणत्याही कार्यक्रमांतल्या किंवा आमच्या नित्याच्या संध्येच्या प्रत्यहीच्या संकल्पांत वर्णन केल्याप्रमाणे १९६ कोटींहून अधिक वर्षांचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या ह्या भारतवर्षांस अर्थात हिंदुराष्ट्रांस अनेक दैवी स्त्री-पुरुषांची परंपरा लाभलीय. कवीकुलाचा कुलगुरु असा महाकवी श्रीकालिदास त्याच्या रघुवंश नामक अतिप्रसिद्ध काव्यात लिहितो की


*अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराज: ।*

*पूर्वोsपरा: तोयनिधीं वगाह्य पृथिव्यां मानदण्ड: इव स्थित: ।*


उत्तरदिशेंस प्राप्त हिमालय नावाचा नगाधिराज जो असा पर्वतश्रेष्ठ विराजमान आहे, जो पृथ्वीचा पूर्व व पश्चिमेचा मानदंड म्हणून स्थित आहे.


अशा ह्या नगाधिराजाच्या आश्रयांस विसावलेले हे हिंदुराष्ट्र ज्याचे वर्णन विष्णुपुराण करताना म्हणते


*गायन्ति देवा: किल गीतकानि धन्यास्तु ते भारत भूमिभागे।*

*स्वर्गापवर्गास्पदमार्गभूते भवन्ति भूय: पुरुषा: सुरत्वात्।*

*कर्माण्ड संकल्पित तवत्फलानि संन्यस्य विष्णौ परमात्मभूते।*

*अवाप्य तां कर्ममहीमनन्ते तस्मिंल्लयं ये त्वमला: प्रयान्ति ॥*


*साक्षात देवगण निरंतर हेच गान करतात की ज्यांनी स्वर्ग आणि मोक्षाच्या मार्गांवर आरुढ होण्यासाठी भारतवर्षामध्ये जन्म घेतला ते मनुष्य आमच्यापेक्षा अधिक धन्य तथा भाग्यशाली आहेत! जे लोक ह्या कर्मभूमीमध्ये जन्म घेऊन समस्त आशाकांक्षांनी मूक्त होऊन आपली सर्व कर्मे ही परमात्मा अशा श्रीविष्णुंस अर्पण करतात, ते पापरहित होऊन निर्मल अंतःकरणाने त्या परमात्म शक्तीमध्ये लीन होतात.*


विष्णु पुराण - २।३।२४-२५


आपल्या हिंदुधर्मामध्ये राजा हा प्रत्यक्ष विष्णुचा अवतार मानला जातो. प्रत्यक्ष धर्मवीर श्रीशंभुछत्रपतींनी श्रीशिवछत्रपतींना विष्णुचा अवतारंच म्हटलेलं आहे बुधभूषणमध्ये व दानपत्रामध्ये. राज्याभिषेक प्रयोगामध्येही श्रीशिवछ्त्रपतींच्या हाती श्रीविष्णुची मूर्ती दिलेलीच होती. उपरोक्त विष्णु पुराणाचा श्लोक श्री भिडेगुरुजींना तंतोतंत लागु होत नाही असं म्हणायचं आपलं साहस होईल काय???


कारण परमादरणीय श्रीभिडे गुरुजींनीही आपलं जीवनसर्वस्व त्याच विष्णुअवतारासाठी अर्थात भगवान श्रीशिवछत्रपतींसाठी वाहिलं आहे. कर्माण्ड संकल्पित तवत्फलानि संन्यस्य विष्णौ परमात्मभूते।


असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरेल काय???


आज इचलकरंजीमध्ये गुरुजींची सभा झाली त्यावेळी खेचलेली ही प्रतिमा समाजमाध्यमांवर प्राप्त झाली. त्यानिमित्त हे चिंतन


मूळात ह्या सत्पुरुषाविषयी जितकं लिहील, तितकं न्यूनंच आहे...

 

*असितगिरीसमं स्यात्कज्जलं सिन्धुपात्रे....*


अस्तु।


#परमादरणीय_श्रीसंभाजीराव_भिडे_गुरुजी_शिवप्रतिष्ठान_हिंदुस्थान_श्रीशिवछत्रपती

Monday, 22 November 2021

हिंदुत्व हे स्वयंभु आहे आणि तसेच राहुद्यांत...

 




समोरच्याच्या गोल टोपीवर किंवा क्रॉसवर जर प्रतिक्रिया म्हणून तुमचं जानवं घालणार असाल, शेंडी ठेवणार असाल किंवा कपाळी गंध लावणार असाल तर तुम्हाला हिंदुत्वाची सैद्धांतिक परिभाषाच समजली नाही असे सिद्ध आहे किंबहुना हिंदुत्व आकळलंच नाहीये...


शेेंडी-जानव्याचा अधिकार सर्व हिंदुंना आहे व होताही हे ऐतिह्य प्रमाणांच्या आधारेही स्पष्ट आहे. आणि आह्मीं हट्टाने हे मांडत आलोच आहोत अगदी साधार नि सप्रमाण....कारण अध्यात्मिक उपासनेप्रमाणेच राष्ट्रीय उपासनेमध्येही प्रतीकांची आवश्यकता असतेच असते...


त्यांचे मुसलमानत्व जोपर्यंत आहे, ख्रिश्चनत्व जोपर्यंत आहे, ते त्यांचे 'त्व' सोडत नाहीत तोपर्यंतंच आमचं हिंदुत्व आहे, तोपर्यंत आह्मीं आमचं 'त्व' सोडणार नाही असे म्हणणं हे प्रतिक्रियात्मक हिंदुत्व असल्याचे लक्षण आहे...


किंबहुना अगदी स्पष्ट शब्दांत हे हिंदुत्व स्वयंभु नाहीये आणि ते कामाचंही नाही...


असलं हिंदुत्व मला तरी व्यक्तिशः मान्य नाही.....


कारण माझं हिंदुत्व हे इतरांच्या मुसलमानत्वांवर किंवा ख्रिश्चनत्वांवर अवलंबून मूळीच नव्हतं, नाही नि नसेलही...


पण आजकाल हिंदुत्वाची कुठली व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला जातोय हे कळणं माझ्यासारख्या अल्पबुद्धीधारकाला अवघड चाललं आहे...


हिंदुत्व हे स्वयंभु आहे रे दादांनो...


जेंव्हा अन्य कोणतंही 'त्व' अस्तित्वातंच नव्हतं तेंव्हापासून हिंदुत्व आहे...


त्यामुळे ते इतरांच्या 'त्व'वर अवलंबून खचितंच नाही...


आणि जर ते तसे असेल असे तुम्हाला वाटत असेल किंवा तसं तुम्ही ठसविण्याचा प्रयत्न कळत किंवा नकळत किंवा हेतुपुरस्सर करत असाल तर मग हिंदुत्वाच्या व्याख्येच्या पुनर्विचाराची किंवा पुनर्मांडणीची आवश्यकता आहे... केवळ स्पष्टीकरणासाठी...


पण उगाचंच स्वतःला प्रागतिक किंवा बुद्धिवादी दाखवण्याच्या हेतुने नाही ते 'नेरेटिव्हज सेट' करण्याचा प्रयत्न हिंदुत्वाच्या नावाखाली होत असेल तर अवघडंय हिंदुत्वाचे नि हिंदुत्वनिष्ठांचे...


हिंदुराष्ट्रपति तात्याराव स्वतः असे एका ठिकाणी म्हणालेले आहेत पण त्यांचे ते वक्तव्य एका पत्रकाराला उद्देश्यून आहे ही मर्यादा लक्ष्यीं घ्यावी...


यद्यपि त्यांचे हिंदुत्व हे धर्माला नाकारणारं नसलं आणि ते धर्म त्याचा एक भाग मानणारं असलं तरीही...


ह्यावर लिहिणार नव्हतो पण राहवलं नाही म्हणून...


काही दिवस विश्रांतीपूर्व अंतिम लेख...


एक महिन्याने भेटुच...


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#हिंदुत्व_हिंदुराष्ट्रीयत्व_हिंदुधर्म_इस्लाम_ख्रिश्चनिटी

Friday, 12 November 2021

पद्मश्री प्रा डॉ. मीनाक्षी जैन

 




एका प्रामाणिक नि नामवंत इतिहासकाराचा सन्मान


२००६ मध्ये पुण्यात सिंबायोसिस वाणिज्य महाविद्यालयांत प्रवेश घेतल्यांवर ग्रंथालयांत अचानक आमच्या पूज्यनीय स्वामी वरदानंद भारतींची (पू. अप्पा) पुस्तके पहायला मिळाली. वै. गुरुवर्य भागवताचार्य वा ना उत्पातांकडून पू. अप्पांविषयी फार ऐकलंच होते पण अप्पांची पुस्तके वाचायची ही पहिलीच वेळ होती. श्रीकृष्ण कथामृत वाचल्यावर सार्थमनुस्मृतीभाष्य वाचायला घेतलं. मोठाच्या मोठा ठोकळा वाचताना परिशिष्टांमध्ये ज्या टीपा होत्या, त्यात मीनाक्षी जैन हे नाव वाचल्याचे स्मरतंय. 


नुकताच त्यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाल्याचे कळलं नि मोदीजींविषयी कृतज्ञतेने अंतःकरण भरून तर आलंच पण एका प्रामाणिक इतिहासकारिणीचा योग्य सन्मान झाला ह्याचा मनस्वी आनंद झाला.


मीनाक्षी जैन कोण आहेत???


२००२ साली जेंव्हा माननीय अटलजींचे सरकार होते, माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी राष्ट्रीय अभ्यासक्रमासंबंधी National Curriculum Framework for School Education (NCFSE), 2002) नावाने एक अहवाल प्रकाशित केला होता, त्यान्वये शालेय अभ्यासक्रमामध्ये मूल्य शिक्षणाचा आरंभ झाला होता. त्यावेळी मार्क्सवाद्यांनी भारतीय इतिहासाचे केलेलं विकृतीकरण ह्यांस तोंड देण्यासाठी नि भारताचा सत्येतिहास समोर आणण्यासाठी भारतीय इतिहासाचे पुनर्लेखन आरंभ झालं. आरंभी इयत्ता अकरावीची 'मध्ययुगीन भारत' नि 'प्राचीन भारत' ही दोन पुस्तके पुनर्लिखित करण्यांत आली तींत मध्ययुगीन भारतांवर प्रा. मीनाक्षी जैनांनी नि प्राचीन भारतांवर प्रा. माख्खन लालांनी जी पुस्तके लिहिली, त्यांतला सत्येतिहास पाहून डाव्यांच्या पोटांत अक्षरशः पोटशुळ उठला.


इस्लामप्रिय मार्क्सवाद्यांना भारतीय इतिहासाचे हे वास्तवस्वरुप पाहून पित्त खवळणं स्वाभाविक होते. म्हणूनंच ज्यांची नावे घेणंही आह्मांला पाप वाटतं, अशा चांडाळचौकडीने ह्या प्रामाणिक इतिहासकारांच्या विरोधांत अगदी नेहमीच्या खोटेपणाच्या आवामध्ये 'भारतीय इतिहासाचे भगवीकरण' 'जातीय ध्रुवीकरण'(Communalisation of History Texts Books) वगैरे म्हणत बोंबा मारायला आरंभ केलाच व त्यावर त्याच नावाने त्यांनी एक स्वतंत्र पुस्तिकाही छापली. अर्थात त्याला पुढे मीनाक्षीजींनी व प्रा माख्खन लालांनी राजेंद्र दीक्षितांसह सहलेखनाने (Educating to Confuse and Disrupt) प्रत्युत्तरही दिलं. तीही पुस्तके दिल्लीच्या इंडिया फर्स्ट फाऊंडेशनने प्रकाशित केलीच आहेत. आह्मीं ती २०१२ साली विवेकानंद केंद्रामध्ये वाचली होती. त्यावेळी त्यावर लेखही लिहिला होता. दिल्लीमध्ये ती प्राप्त होतील जिज्ञासुंसाठी. 


सांगायचा हेतु हा की ज्या मीनाक्षीजींनी मध्ययुगीन कालखंडाचा इतिहास जो इस्लामी पाशवी अत्याचाराने रक्तरंजित झालेला असल्याने तो प्रमाणासहित पुढे आणला, त्यांचा सन्मान होणं हे अत्यंत आनंदाचे आहे. मीनाक्षीजींची अन्य ग्रंथसंपदा म्हणजे त्यांनी सतीप्रथेवर केलेलं लेखन महत्वाचे आहे. काही दिवसांपूर्वी तो ग्रंथ पीडीएफ प्राप्त झाला. त्यांनी श्रीराम मंदिर नि अयोध्याप्रश्नांवरही दोन पुस्तके लिहिली असून मंदिरांवरही त्यांचं एक स्वतंत्र पुस्तक आहेत. सर्व चित्रे सहसंलग्न आहेत.








राजा-मुंजे करार 


मीनाक्षीजींच्या आणखी लेखनापैकी त्यांनी अखिल भारत हिंदुसभेचे तत्कालीन अध्यक्ष धर्मवीर डॉ. मुंजे नि डिप्रेस्ड क्लास मिशनचे एम सी राजा ह्या दोघांमध्ये झालेल्या करारासंबंधी केलेलं लेखन चिंतनीय आहे जे राजा-मुंजे कराराने विख्यात आहे. ह्याचे पीडीएफ सुदैवाने आहे. गांधींनी आंबेडकरांसोबत जो पुणे कराराचा प्रयोग केला, त्याआधी हा करार झाल्याने आंबेडकरांच्या नि एकुणंच भारताच्या सामाजिक क्रांतीसंबंधीचा एक महत्वाचा कागद म्हणून ह्या कराराकडे पाहणं आवश्यक आहे. आश्चर्य म्हणजे आंबेडकरांनी ह्या कराराचे वर्णन Less troublesome and more straight forward असं केलं होते पुणे कराराच्या तुलनेने.


मीनाक्षीजांचा सन्मान ह्यापूर्वीच मोदीजींनी तसा केला आहे


२०१४ साली सत्ता येताच मोदी सरकारने मीनाक्षीजींची नेमणुक  Indian Council of Historical Research च्या सदस्यपदी केलीच आहे जी अत्यंत महत्वाची नेमणुक आहे.


पण आश्चर्य आहे सत्ता येऊन ७ वर्षे झाली तरी अद्याप इतिहासाच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे परिवर्तन अपेक्षित आहे ते दिसेना. असो आशा आहे की पुढे ते येईलंच.


२०२० चा पुरस्कार त्यांना चार दिवसांपूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला ही आनंदाची गोष्ट आहे


एक दोन अपवाद सोडता मोदी सरकार योग्य व्यक्तींनाच पुरस्कार देतंय ही समाधानाची गोष्ट आहे


प्रामाणिक इतिहासकारांचा सन्मान होणं हे केवळ महत्वाचेच नव्हे तर प्रेरणादायीही आहे. 


आदरणीय प्रा. डॉ मीनाक्षी जैन ह्यांना पद्मश्री प्राप्तीहेतु अभिनंदन नि भारत सरकारचेही आभार!


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#भारतीय_इतिहासाचे_पुनर्लेखन_पद्मश्रीपुरस्कार_डॉमीनाक्षी_जैन_मार्क्सवादीविकृती_सतीप्रथा_अयोध्या