ॐ ऋ॒तं च॑ स॒त्यं चा॒भी॑द्धा॒त्तप॒सोऽध्य॑जायत । ततो॒ रात्र्य॑जायत॒ तत॑: समु॒द्रो अ॑र्ण॒वः ॥
ॐ स॒मु॒द्राद॑र्ण॒वादधि॑ संवत्स॒रो अ॑जायत । अ॒हो॒रा॒त्राणि॑ वि॒दध॒द्विश्व॑स्य मिष॒तो व॒शी ॥
ॐ सू॒र्या॒च॒न्द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चा॒न्तरि॑क्ष॒मथो॒ स्व॑: ॥
अघमर्षणसूक्त - ऋग्वेद - १०|१९०
संध्येमध्ये नित्य गायले जाणारे हे सूक्त...!
हे अखिल सृष्टीचं नवसंवत्सर आहे, केवळ मराठी किंवा हिंदु नवसंवत्सर नव्हे...! अर्थात हिंदुधर्म हा अनादि अनंत सत्य सनातन असल्याने तसं म्हटलं तरी चालेल...!
आज गुढी पाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात सृष्टीच्या निर्मितीचा दिवस...! हे संवत्सर अर्थात वर्ष हे शुभकृत नावाने आहे. मागील वर्षीचे नाव प्लव होते, त्याआधीचे शर्वरी. ही संवत्सरांची नावे सूर्यसिद्धांत ह्या ग्रंथामध्ये आहेत. आपल्या सभोवतालची ही सृष्टी कशी निर्माण झाली, कुणी केली, कधी केली, का केली ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न हा मानवी स्वभाव आहे. ज्याला असे प्रश्न पडत नसावेत तो मनुष्य म्हणावा का असा प्रश्न पडतो. त्यामुळे ह्या जिज्ञासेचे समाधान करण्याचा प्रयत्न जेंव्हा आपण करतो, त्यावेळी आपल्याला वळावं लागतं ते आपल्या प्राचीन इतिहासाकडे, वेदांकडे, षड्दर्शनांकडे. कारण आपल्या प्राचीन ऋषिमूनींनी, तत्वचिंतकांनी, वैज्ञानिकांनी ह्या सर्व शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न निश्चितंच केला आहे. तोच शोधण्याचा हा काहीसा लेखनप्रपंच...!
आमच्या आधीच्या अनेक लेखांमध्ये सांगितल्याप्रमाणे सृष्टीनिर्मितीचा सैद्धांतिक इतिहास हा वेदांमध्ये आहे. यद्यपि आह्मीं वेदांमध्ये लौकिक मानव्यादि इतिहास नाकारत असलो तरी सृष्टीनिर्माण कशी झाली ह्याचे रहस्य मात्र वेदांमध्ये आहे हे आह्मीं सातत्याने सांगत आलो आहोत. नासदीय सूक्त, पुरुषसूक्त, उपरोक्त अघमर्षणसूक्त ह्यांमध्ये प्रामुख्याने हा सैद्धांतिक इतिहास सूत्ररुपाने आहे. म्हणूनंच आज ज्या सृष्टीनिर्मितीचा दिवस आहे, तो तसा आहे हे कशावरून खरं???
अनादि पुरुष करुणावरुणालय अशा परब्रह्म परमात्म्याने त्याचे अनुग्रहित स्वकीय अनादि असे वेदरुपी ज्ञान मानवसृष्ट्यारंभी चार ऋषींच्या अंत:करणामध्ये प्रकाशित केलं. त्याच वेदांमध्ये ऋग्वेदाच्या उपरोक्त श्रुतींमध्ये सृष्ट्युत्पत्तीच्या क्रमाचा उपदेशही त्या ईश्वराने केला आहे. उपरोक्त ऋग्वेदाच्या अघमर्षण सूक्ताचा संक्षेपांत अर्थ असा आहे
"त्या ईश्वराने तपस: म्हणजे तपाने ऋत् अर्थात सत्य ज्ञान अर्थात परम ज्ञान प्रकट केलं. त्यातून सृष्टीरचनेची सामग्री अर्थात सत्(प्रकृती) प्रकट झाले, त्यानंतर रात्र(प्रकृतीची विषमावस्था) प्रकट झाली, त्यानंतर अर्णव समुद्र(प्रकृतीची महत्तत्वम् आकाश), त्यानंतर संवत्सर, नि पुन्हा रात्री नि दिवस प्रकट झाले. त्या सर्व चराचर सृष्टींस तो ईश्वर त्याच्या सहज स्वभावाने नियंत्रित करता झाला. त्यातून सूर्य्य म्हणजे स्वप्रकाशित लोक, चंद्र म्हणजे परप्रकाशितलोक, पृथिव्यादि लोक, धाता म्हणजे तो सर्वांना धारण करणारा परमात्मा पूर्वीप्रमाणेच रचता झाला. याच प्रमाणे त्याने दिवं म्हणजे उपरोक्त सूर्य्यादि लोक, पृथिव्यादि लोक, अंतरिक्ष म्हणजे अवकाश किंवा तत्स्थित वस्तु, अथ: म्हणजे सुद्धा, स्व: म्हणजे द्युस्थानीय मध्यस्थ लोक नि लोकलोकांतर निर्माण केले...!"
हे अघमर्षण सूक्त आहे जे आपण सर्व हिंदु लोक संध्येच्या वेळी म्हणतो. ह्यामध्ये आपली ही जी सृष्टी आहे, तिची उत्पत्ती संक्षेपाने सांगितली आहे. जींत तिचे उपादान कारण, निमित्त कारण ह्यांचा उहापोह संक्षेपात आहे.
खरंतर ह्या सूक्ताचे विवेचन करण्यासाठी स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल किंवा स्वतंत्र ग्रंथही रचावा लागेल इतकं विलक्षण ज्ञान ह्या सूक्तामध्ये आहे. कारण ह्यातला प्रत्येक शब्द हा लेखासमान विस्तार करण्याजोगा आहे. पण विस्तारभयास्तव अगदी संक्षेपांत विवेचन करतो.
इथे अशी शंका होईल की मंत्रामध्ये दोनदा रात्र असा शब्द का आला आहे? पहिल्यांदा जो रात्र शब्द आला आहे त्याचा नेमका अर्थ काय? कारण जर सृष्टीच अद्याप निर्माण व्हायचीय तर रात्र कुठून आली? सूर्य्यादि लोकलोकांतर निर्माण व्हायच्या आधीच रात्र कशी होईल?
इथे पहिल्या रात्र ह्या शब्दावरून काहींना ते प्रलयावस्थेचे वर्णन वाटेल. पण ते ना महा प्रलयावस्थेचे वर्णन आहे ना सृष्टीच्या अस्तित्वात येण्याचे. प्रकृती म्हणजे काय तर त्रिगुणांची साम्यावस्था. इथे रात्रि शब्दाने त्या दशेचे वर्णन आहे की त्या सत् म्हणजे प्रकृतीमध्ये त्या ईश्वराच्या सामर्थ्याने तिची साम्यावस्था नष्ट होऊन विषमता निर्माण झाली, तेंव्हा तिची अवस्था जी अद्यापपावेतो व्यवहारशून्य अकथनीय अशी होती, ती आता तशी राहिली नाही. म्हणजेच ती आता व्यवहारयोग्य शक्तिसंपन्न झाली. परंतु ती अद्याप व्यवहारात प्रत्यक्षात आली नाही म्हणजेच प्रत्यक्ष कर्तृत्वसंपन्न झाली नाही. प्रलयामध्ये सत् अर्थात प्रकृती किंवा सृष्टीनिर्मितीची सामग्री ही मृतकावस्थेत अशी होती जींत आता जिवंतपणा आला नि तिची अवस्था सुषुप्तीदशा तुल्य झाली. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी घोर तमयुक्त व्यवहारहित दशेचा बोध आपणांस होतो परंतु ती अवस्था सर्वार्थानेच व्यवहारशून्य दशा म्हटली जाऊ शकत नाही, तद्वतंच ह्या प्रकारच्या अवस्थेचा बोध इथे आपणांस रात्री ह्या प्रथम शब्दांवरून घ्यायचा आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी निद्रेमध्ये आपले लौकिक व्यवहार तसे स्तब्धंच असतात, पण ह्याचा अर्थ आपण मृत असतो असे नव्हे, तद्वतंच ही अवस्था रात्र शब्दावरून बोधक आहे.
पुढे शब्द आहे अर्णव समुद्र. आता सृष्टीच निर्माण व्हायचीय तर समुद्र कुठून आला? तर इथे समुद्र शब्दाने आपण जो रुढार्थ घेतो तो अर्थ नसून प्रकृतीने धारण केलेलं परमाणुमय रुप हा अर्थ आहे. हे महत्तत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सृष्टीरचनेची सामग्रीच वर म्हटल्याप्रमाणे...!
त्या महत्तत्वरुप प्रकृतीपासून म्हणजे अर्णव समुद्रापासून संवत्सर निर्माण झाले.संवत्सर म्हणजे काळाची नियत अवधी किंवा परिमाण. माप...पण इथे मूळातसृष्टी अद्याप निर्माणंच व्हायचीय तर संवत्सर कुठून आलं? तर इथेही परत संवत्सराचा अर्थ ब्रह्म दिवस आहे ज्याचा अर्थ तो नियमित काल जो सृष्टीनिर्माणापासून ते अंतापर्यंतचा काळ आहे. जेंव्हा सृष्टीनिर्माणासंबंधीची सर्व सामग्री योग्यावस्थेत पोहोचली, तेंव्हा प्रकृतीचे परमाणु विविध रुप धारण करून पंचतत्वांची उत्पत्ती झाली, त्यानंतर लोकलोकांतर निर्माण झाले, त्यानंतर चराचर जगत् निर्माण झाले, ह्यासंच संवत्सर अर्थात ब्राह्म दिन ही संज्ञा आहे. ब्राह्मदिनामध्ये सृष्टी निर्माणाची प्रक्रिया होते ती पूर्णावस्थेला पोहोचते, ब्राह्मरात्रीमध्ये तिचा प्रलयसुरु होतो. म्हणजेच इथे संवत्सर हा शब्द सृष्टीनिर्मितीपासून ते सृष्टीअंताचा एकुण काळ असा आहे...!
त्यानंतर सूर्य्यचंद्रादि लोक निर्माण केले, द्यौलोक, पृथ्वी, अंतरिक्ष हे सर्व त्या धात्याने म्हणजे परमेश्वराने जसे ते त्याने पूर्वीच्या कल्पामध्ये निर्माण केले होते, अगदी तसे निर्माण केले. म्हणजेच ही सृष्टी गतकल्पातल्या सृष्टीप्रमाणेच निर्माण झाली आहे. संक्षेपांत सृष्टीनिर्मितीचे चक्र हे नित्य असल्याने त्यात सातत्य आहे व ते चक्र अनादि अनंत आहे. म्हणूनंच आह्मीं वेदांमध्ये केवळ सृष्टीचक्राचेच रहस्य आहे असे सांगतो ते ह्यासाठीच...!
विस्तारभयास्तव इथेच ह्यासूक्ताच्या विवरणांस विराम देऊन आजच्या दिवसाकडे वळतो...
हीसृष्टी निर्माण झाली खरी. पुरुषसूक्तामध्ये आधी वनस्पति-प्राणी निर्माण झाले व सर्वात शेवटी मानव निर्माण झाले असे म्हटलंय. तो स्वतंत्र विषय. पण ती कोणत्या तिथींस झाली त्याचे उत्तर आजचीच तिथी कशावरून??? बरं या मासाला चैत्रमास नाव का पडलं? चैत्र महिन्यालाच नूतन वर्षारंभ का? ह्याचे उत्तर देताना वेदभगवान सांगतो
मधु॑श्च॒ माध॑वश्च॒ वास॑न्तिकावृ॒तूऽ...
यजुर्वेद १३|२५
वासंतिकावृत्त म्हणजे वसंत ऋतुमधले दोन मास मधु व माधव जे मधु म्हणजे मधुर असा चैत्र मास व माधव म्हणजे वैशाख मास. क्रमानुसार मधु म्हणजे चैत्र मास सर्वात आधी म्हणून सृष्ट्यारंभ हा चैत्रात मानला जातो. आता प्रश्न असा पडेल की ह्याचे नाव मधु असताना चैत्र कसं पडलं? तर आपल्या वैदिक मासांची नावे ही पौर्णिमेवरून व त्यावेळच्या नक्षत्रांवरून पडली आहेत. भगवान महर्षि श्रीपाणिनींनी ह्याचे विश्लेषण करताना म्हटलं आहे की...
पाणिनीय अष्टाध्यायी
साऽस्मिन् पौर्णमासीति (संज्ञायाम्)॥ ४।२।२०
ह्यावरची काशिका-वृत्ति असे सांगते
साऽस्मिन् पौर्णमासी इति संज्ञायाम् ४।२।२१
सा इति प्रथमासमर्थादस्मिन्निति सप्तम्यर्थे यथाविहितं प्रत्ययो भवति|
पौर्णमासी विशेषवाची शब्दाने सप्तम्यर्थ मध्ये म्हणजे ती पौर्णिमा ज्या नक्षत्रांस येते, ते नक्षत्र सप्तमी विभक्तीने त्या त्या मासाचे नाव बनतं.
जसं आज चैत्र मास आरंभ झाला. आता ह्या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती पहा. तिचे नक्षत्र आहे चित्रा. म्हणून त्या चित्रा नक्षत्राची सप्तमी ती चैत्र म्हणून चैत्र मास हे नाव....!
चित्रा नक्षत्रेण युक्ता पौर्णमासी चैत्री, सा यस्मिन् स चैत्रो मास:|
चित्रा नक्षत्राने युक्त पौर्णिमा तो मास किंवा महिना हा चैत्र. असेच पुढे विशाखा नक्षत्रांवरून वैशाख मास वगैरे जिज्ञासूंनी जाणीव घ्यावे...
आता कालांतराने ज्योतिष विद्येचा विकास जसा होत गेला, तसा ह्याचा इतिहास शब्दबद्ध केला गेला.
चैत्रे मासि जगद् ब्रह्मा, ससर्ज प्रथमेऽहनि|
शुक्लपक्षे समग्रन्तुं, तदा सूर्योदये सति|
हेमाद्रि
अर्थ - चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या प्रथम दिनी सूर्योदयी त्या ब्रह्म्याने सृष्टी निर्माण केली.
ह्यालाच ब्रह्मदिन, सृष्टिसंवत्, वैवस्वतादिमन्वतरारंभ, सत्ययुगादियुगारंभ, कलिसंवत्, विक्रमसंवत् असेही नावे आहेत.
आता हे सृष्टिसंवत कसे???
तर आपण नित्यसंध्यमध्ये जो संकल्प गातो, त्याचीगणना पाहिली तर जे उत्तर येते तेच...!
अथ सङ्कल्प पाठ
(सृष्ट्यादिसंवत्-संवत्सर-अयन-ऋतु-मास-तिथि -नक्षत्र-लग्न-मुहूर्त)
ओं तत्सत्-श्रीब्रह्मणो द्वितीये परार्द्धे श्रीश्वेतवराह कल्पेवैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे अथवा प्रथमपादे एकवृन्द-सप्तनवतिकोट्येऽ कोनत्रिंशल्लक्षैकोनपञ्चाशत्सहस्र- त्रयोविंशत्यधिकशततमे ( *१९७२९४९१२४* ) सृष्ट्यब्दे नवसप्तत्युत्तर-द्विसहस्रतमे ( *२०७९* ) वैक्रमाब्दे, *शुभ नाम*- संवत्सरे *उत्तरायणे- वसंत ऋतौ* मासानां मासोत्तमे *मधु अथवा चैत्रमासान्तर्गते* *प्रतिपदातिथौ *रेवती नक्षत्रे *शिव*- मुहूर्ते भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गते महाराष्ट्र-प्रदेशे सोलापूर नामकस्य जनपदस्य पंढरपूरनाम्न्यां पुण्यभूमौ अङ्गिरसबार्हस्पत्यभरद्वाजेतिप्रवरान्वितभरद्वाजगोत्रोत्पन्नोऽहंऋग्वेदान्तर्गतआश्वलायनसूत्रस्यशाकलशाखाध्यायीचिंचणीकरकुलोत्पन्नःराधाकृष्णस्यपुत्रोऽस्मितुकारामनामशर्मोऽहं ममोपात्तदूरितक्षयद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं संकल्पं करिष्ये।
ह्यात जी १९७२९४९१२४ ही गणना आहे ती पृथ्वी मानव्यादि जीवांच्या अनुकूल निर्माण झाल्याची असून पृथ्वीवर मानवसृष्टी कधी झाली म्हणजे प्रथम मानव कधी प्रकट झाले व त्यानंतर वेद कधी प्रकट झाले ह्याची गणना जी आहे ती निम्नलिखित
महर्षि दयानंद सरस्वतींनी त्यांच्या 'ऋग्वेदादिभाष्यभूमिका' ह्या ग्रंथामध्ये वेदोत्पत्ति प्रकरणामध्ये ह्याचा विस्तार केला आहे तो तिथे पहावा... संक्षेपांत तो इथे देतो
मानवजन्मसंवत्सर - १,९६,०८,५३,१२३,
म्हणजेच आपण मानव म्हणून पृथ्वीवर येऊन इतकी वर्षे लोटली आहेत...! हे अनेकांना पटणार नाही. न पटो आह्मांस काही फरक पडत नाही...!
कलियुगाब्द - ५१२४, युधिष्ठिराब्द - ५१६१, विक्रम संवत - २०७९, शालिवाहन शके - १९४४ शुभकृतनाम संवत्सर चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या पवित्र पर्वाच्या अर्थात गुढीयाच्या पाडव्याच्या माझ्या समस्त हिंदु बांधवांना आणि सर्व मानवाजातीसंच हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
भवदीय...
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#चैत्रशुक्लप्रतिपदा_गुढीपाडवा_सृष्टीसंवत_वैदिकहिंदुधर्म_सृष्टीनिर्मिती_ऋग्वेद
No comments:
Post a Comment