*ब्राह्मणेन निष्कारणो धर्मः षडङ्गो वेदाध्येयो ज्ञेयोश्च।*
भगवान महर्षि श्रीपतंजली कृत व्याकरण महाभाष्य
आजीवन अखंड ब्रह्मचर्य्य पालन करून सहा वेदाङ्गांसहित वेदांचे नि आर्ष ग्रंथांचे गुरुमुखातून संप्रदायपूर्वक अध्ययन करून, पश्चात् योगसाधनेने निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त करून, ईश्वरसाक्षात्कार करून वैदिक सिद्धांतांचे यथार्थ ज्ञान झालेला, अविप्लुत ब्रह्मचर्यावस्था प्राप्त असलेला एखादा ऋषि जेंव्हा वेदार्थप्रतिपादनांस तत्पर होतो, तेंव्हा 'ऋषयो मन्त्रद्रष्टारः।' ह्या निरुक्तकारांच्या वचनांस तो ऋषि म्हणून सिद्ध होतो. तोच पुढे त्या वैदिक धर्माच्या सत्यनिष्ठ आचरणाने महर्षि बनतो...
आपल्याकडे माघ वद्य दशमी अर्थात उत्तरेत फाल्गुन कृष्ण दशमींस, विक्रम संवत १८८१, शनिवारी, मूळ नक्षत्रांवर, १२ फेब्रुवारी, १८२५ मध्ये म्हणजेच कालपासून १९७ वर्षांपूर्वी गुजरातमधल्या टंकारा नामक ग्रामी कर्शनजी तिवारी नामक एका औदिच्य ब्राह्मण दांपत्याच्या पोटी मूलशंकर नामक एका प्रज्ञासूर्याचा उदय झाला. वेदोद्धारक आदित्य बालब्रह्मचारी ब्रह्मवर्चसी अशा त्यांचीच काल आङ्ग्लदिनांकाने जयंती होती...
या सत्पुरुषाचं माझ्या जीवनांतलं स्थान इतकंच आहे की हा सत्पुरुष नसता तर मी आज जे आहे ते नसतो. इतकंच काय तर जो ब्लॉग लेखन आह्मीं करतो तोही नसता...
But for him we would have lost our Vedas!
ब्रिटीशकाळात ब्रिटीशांना किंचितही बुद्धी गहाण न टाकलेला एकमेव स्वयंप्रज्ञ महापुरुष..शुद्ध भारतीय वृत्तीचा नि परंपरेचा आग्रही अभिमानी...
हिंदुंना त्यांच्या मूल विशुद्ध अशा वैदिक धर्माकडे पुनः पुनः खेचून नेणारा आर्ष धर्मोपदेशक...
माझ्या पाखण्ड खण्डिणी नामक ब्लॉगचा हाच खरा निर्माता...
पाखण्ड खण्डिणीची सहा-सात वर्षे...
सात वर्षांपूर्वी तिथीने श्रीगणेश चतुर्थींस पाखण्ड खण्डिणी ह्या आमच्या ब्लॉगचा श्रीगणेशा आह्मीं केला होता. हा ब्लॉग का काढावासा वाटला, त्यातंच ह्या सत्पुरुषाच्या जयंतीचं गमक आहे...
जणु एका अस्वस्थ दशकाचा प्रवास..
कारण त्याला तशी पार्श्वभूमी होती त्याच्याही पूर्वीच्या तीन वर्षांच्या सततच्या चिंतनाची, अस्वस्थतेची नि संशोधनाची. अर्थात ब्लॉग सुरु करावं हे सुरु करायच्या काही दिवस आधीही काहीच निश्चित नव्हतं. ब्लॉगची नोंदणी वगैरे अचानक झालेली असली तरी त्या आधीचं काहीसं अनुभवकथन...
समग्र विवेकानंद ग्रंथावलीचे अध्ययन २०१२
त्यावेळी विवेकानंद केंद्रामध्ये निवासी होतो. त्यावेळी सीएसची आर्टिकल्स नुकतीच संपल्याने वेळंच वेळ असल्याने समग्र विवेकानंद पुन्हा नव्याने अभ्यासायला घेतले. इयत्ता नववीत राजयोग, ज्ञानयोग, कर्मयोग अभ्यासून झाले होतेच. माझा मित्र चिदानंदची कृपा...
पण आता समग्र विवेकानंद अभ्यासत असताना स्वामीजींना ज्या एका श्लोकरुपी प्रश्नाने छळलं होतं, तो म्हणजे
*अश्वालम्भं गवालम्भं संन्यासं च पलपैतृकम्।*
*देवराच्च सुतोत्पत्तिं कलौ पंच विवर्जयेत्।*
कलिवर्ज्य
प्रमदानंदांना त्यांनी विचारलेल्या ह्या श्लोकरुपी पत्राने आमच्याही अंतःकरणांत जो काही अस्वस्थतेचा प्रवास त्यावेळी आरंभ झाला, तो पुढे २०१५ मध्ये समग्र आंबेडकर वाङ्मयाच्या काही खंडांच्या अध्ययनाने त्यात आणखीच तुपाची धार पडल्यासारखे झालं व तो वणवा त्या साली अक्षरशः पेटला...
हिंदु लोक नि त्यातही यज्ञ करणारे विशेषतः ब्राह्मण लोकंच पूर्वी गोमांस किंवा इतर मांस खायचे???
प्रत्यक्ष वेदांमध्येच गोमांसाचे व अन्य मांसाशनाचे समर्थन आहे काय???
वैदिक यज्ञांमध्येच पशुहिंसेचे समर्थन किंवा तशी आज्ञा वेदभगवान खरंच देतो आहे काय???
अस्पृश्यतेचा उगम खरंच वेदांशी संबंधित आहे काय???
डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या 'अस्पृश्य कोण होते' ह्या ग्रंथामध्ये केलेली ही विपर्यस्त मांडणी, त्याला विवेकानंदांच्या साहित्यातली आधीची अत्यंत परस्परविरोधी विधानं जी अत्यंत गोंधळात टाकणारी होतीच, त्यांचे समाधान काय ह्या विचाराने अक्षरशः त्यावेळी आमची झोप उडाली होती. खरंच झोप उडाली होती...
विवेकानंद केंद्रामध्ये रात्र रात्र तिथल्या संगणकांवर ह्या Is there a Beef in Vedas ह्याचे समाधान शोधत बसायचो...
ज्या वेदांविषयी आह्मां हिंदुंना अपार श्रद्धा आहे, त्या वेदांमध्ये अशी आक्षेपार्ह विधाने असतील काय???
आह्मीं खरं तर नावाचे ब्राह्मण...
कारण आमच्या घरात कुणीच वेदाध्ययन केलेले नसल्याने वेदांतलं वंही कुणाला ज्ञात असण्याचा संभव नव्हताच. इयत्ता बारावीत संस्कृतच्या पाठ्यपुस्तकामध्ये वेदांचा अगदी किंचितसा परिचय झाला होता. पण तो असून नसल्यासारखा....ह्या सर्व प्रश्नांनी रात्रंदिवस अस्वस्थ झालेल्या आह्मांस शंकासमाधान लाभलं ते ह्या चार अक्षरांनी - दयानंद!
त्यापूर्वी ना कुठला संत आमचे समाधान करु शकला ना कुठला आधुनिक काळातला अवतारी पुरुष! त्या सर्वांविषयी आदर ठेऊनही ह्या वेदोद्धारक सत्पुरुषाच्या चरणी आमच्या धर्माचा मूलाधार अशा त्या चतुर्वेदभगवानांच्या 'सत्यार्थ प्रकाशासाठी' तरी आह्मीं चिरकाल ऋणी आहोत...
इथे एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की प्रत्येक महापुरुषाकडून काही ना काही चांगलं घेणं आवश्यक आहे. कुणीही सर्वार्थाने त्याज्य नाही नि सर्वार्थाने स्वीकारार्ह्यही. विवेकाचा आश्रयो।
२०१४ साली नुकतंच व्हॉट्सप सुरु केलं व एण्ड्रॉईड मोबाईल आला. त्यामुळे २०१५ पासून गुगलवर शोधाशोध सुरु झाली होती...
आणि आणि आणि...
एक चमत्कार म्हणा काहीही म्हणा...
मी तरी ही दैवी कृपाच मानतो...
वेदांमध्ये गोमांस किंवा मांस नाही किंवा आहे हे शोधताना प्रथम वेदमहर्षि सातवळेकर व पश्चात् महर्षि दयानंद नि त्यांचा 'सत्यार्थ प्रकाश' हा मला अमृतासमान असा ग्रंथराज प्राप्त झाला नि माझ्या अंतःकरणांतल्या प्रस्तुत विषयाविषयीच्या शंकासुराला कुठेतरी वैदिक समाधानाच्या अस्त्राने तात्पुरतं शांत केलं. पुढे त्यांचा आणखी अमृताहुनीही अमृतोपम असा 'ऋग्वेदादिभाष्यभूमिका' हा ग्रंथ प्राप्त झाला नि प्रस्तुत विषयासंबंधीच्या सर्वच शंका मिटायकडे प्रवास सुरु झाला...
खरंतर ह्या दोन ग्रंथांनी माझ्या आयुष्यांत काय केलं हे लिहायसाठी स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल. आता त्यावर काहीच लिहीत नाही पण एकाच वाक्यात सांगायचं झालं तर
वैदिक धर्माचे अत्यंत विशुद्ध असे स्वरुप आकळून घेण्यासाठीची सद्बुद्धी ह्या ग्रंथद्वयींनी मला प्राप्त करून दिलीच पण त्याहीपेक्षा अत्यंत चिकीत्सक अशी बुद्धी दिली जिच्याने समोर येणारं साहित्य प्रत्येकवेळी तर्काच्या, प्रमाणांच्या आधारांवर तपासून घेण्याची अत्यंत विचक्षण दृष्टी प्राप्त झाली...
महर्षींनी मला काय शिकवलं???
*तापाच्छेदाच्च निकषात् सुवर्णमिव पण्डितैः।*
*परीक्ष्य मद्वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।*
तत्वसंग्रह
सोनं ज्याप्रमाणे कसोटीवर घासून ते तावून सुलाखून ठोकून वगैरेच शुद्ध मानलं जातं, तद्वतंच माझी वचने परीक्षा करूनंच सत्य मानावीत, केवळ मोठेपणा पाहून नव्हे...
ह्या वचनाप्रमाणे ही वृत्ती विकसित झाली नि तिथूनंच पाखण्ड खण्डणाची चिकीर्षा निर्माण झाली...
*युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।*
श्री भास्कराचार्य
म्हणजे कोणतेही वचन तर्क-युक्ती आदिंनी तपासून सत्य म्हणून स्वीकारावे, केवळ कुणी मोठ्याने म्हटलंय म्हणून नव्हे...हा विवेक ज्या यतिवर ऋषिश्रेष्ठामुळे प्राप्त झाला त्याची काल जयंती...
अर्थात हे सर्व सांगायचं कारण काय???
हा काही अंहकार प्रदर्शनासाठी मांडलेला डाव नव्हे किंवा आपण किती अभ्यासु आहोत, चिकीत्सक आहोत, जिज्ञासु आहोत वगैरे दाखवण्याचा बालिश अट्टाहासही नव्हे...
मग तरीही हे लेखन का???
तर काल ज्या सत्पुरुषाची आङ्ग्ल दिनांकांने जयंती होती, त्यांचे माझ्यावरचं जे ऋण ते व्यक्त करण्यासाठी हा लेखनप्रपंच...
कारण हिंदु म्हणुन जन्मांस आल्यावर जी काही ऋणं फेडावी लागतात, त्यांत ऋषिऋण नावाचं एक ऋण आहे...
अर्थात ह्या ऋषीचं एक ऋण आह्मांस फेडायचं आहेच...ईश्वरी कृपा झाली तर पाहुयांत....
इथे एक महत्वाचे सांगणं आवश्यक आहे...
आह्मीं ऋषिवर श्रीदयानंदांस मानतो म्हणजे त्यांची सर्वच मते आह्मीं आंधळ्यासारखी प्रमाण मानतो असे नव्हे. त्यांचे प्रत्येक वाक्य आह्मीं उपरोक्त श्लोकांप्रमाणे घासून-पुसूनंच मग स्वीकारतो व इथून पुढेही स्वीकारंत राहु. आजही दयानंदांचे कोणतंही वाक्य वाचताना त्याला आधार काय हेच पाहतो व पुढे जातो. आणि हाच खरा नियम सर्व सत्पुरुषांविषयी लागु करावा ह्या मताचे आह्मीं आहोत...
अर्थात ह्यात कुठेही त्या सर्व महापुरुषांचा अवमान करण्याचा हेतु खचितंच नव्हे. उलट हाच विवेक आहे...
आप्तस्तु यथार्थवक्ता असे न्यायदर्शन सांगतं..
अर्थात कोणत्याही महापुरुषाची मते अभ्यासताना तो कोणत्या काळात जन्मांस आला हेही लक्ष्यीं घ्यावं लागतं. तरंच सारासार विचार होतो...
जाता जाता ह्या आदित्य बालब्रह्मचारींस अभिवादन करताना एक श्लोक आठवतो
*आदित्यब्रह्मचर्याभिधविमलमहःपुञ्जतो ध्वान्तवृन्दंभिन्दानो वाममार्गाचरणनिशिचरानन्दरात्रीनिहन्ता।*
*पुण्यात्माम्भोजकान्तो निगममतवनोद्धासने चेतनांशुः संसारोद्बोधनोऽयं विलसतु हृदये श्रीदयानन्दभानुः।*
*आदित्य ब्रह्मचर्य्यरूपी निर्मल तेज:पुंजाने पापांधकारांस नष्ट करणारे, वेद विरुद्ध मार्गामध्ये विचरण करणाऱ्या निशाचरांस आनंद देणाऱ्या रात्रीचा नाश करणारे, वैदिकमत रूपी उपवनांस बुद्धिरूपी किरणांनी प्रफुल्लित करणारे आणि संसारांस मोहनिद्रेतून जागवणारे स्वामी दयानंद मुनीरुपी सूर्यभगवान आमच्या अंतःकरणांस ज्ञानाने प्रकाशित करोत...
भवदीय
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#महर्षि_दयानंद_जयंतीविशेष_वैदिकधर्म_वेदांमध्ये_गोमांस_मांस_पशुबली_अस्पृश्यता_विवेकानंद_आंबेडकर