Tuesday, 19 November 2019

स्व. माननीय श्रीएकनाथजी रानडेंचं आज पुण्यस्मरण...



*एक जीवन, एक ध्येय्य!!!*

साम्यवादी विचारधारेच्या राष्ट्रद्रोही मानसिकतेने ग्रस्त नेतृत्वामुळे चीनच्या युद्धापश्चात् भारतवर्षांस आलेल्या आत्मग्लानीमुळे ती पाहून एक आजीवन अखंड ब्रह्मचारी असा युवक, ज्याने रा स्व. संघाच्या माध्यमांतून अवघं जीवन *राष्ट्राय स्वाहा, इदं न मम।* म्हणून समर्पित केले होते, तो राष्ट्राच्या ह्या अवनतीमुळे अंतर्मुख झाला. ह्या परिस्थितींत राष्ट्रांस पुन्हा एका योद्ध्या संन्याशाच्या तेजस्वी अशा पुनरुत्थानाच्या संदेशाची आवश्यकता होती. नुकतीच विश्वदिग्विजयी श्रीमत्स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी साजरी झाली होती.  त्यासाठीच काही मास स्वतःला एकांतवासांत नेऊन समग्र विवेकानंद साहित्याचे पुनःअध्ययन करून एका योद्ध्या युवकाने *'The Rousing Call to a Hindu Nation'* नावाचा विवेकानंदांच्या आव्हानात्मक विचारांचा एक ग्रंथ सिद्ध केला. हा ग्रंथ मराठीत *'हिंदुतेजा, जाग रे!'* नावाने प्रकाशितही आहेच. पण तेवढ्यावरंच त्या युवकाचं समाधान होणार नव्हतं. एका ग्रंथाचे निर्माण तर झालं होते पण त्या संदेशाचे पालन करणारी युवा पिढी निर्माण करणार कोण ह्याच तत्वचिंतनात तो मग्न होता. विवेकानंदांना अपेक्षित तेजस्वी नि राष्ट्रसमर्पित युवक-युवती निर्माण करायच्या कुठून?

आणि ह्यातंच सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा पण दक्षिणसमुद्रातून होणार्या संभाव्य आक्रमणाची शंका लक्ष्यीं येऊन तत्कालीन राष्ट्रसूत्रधारांनी, ज्यात आदरणीय गोळवलकर गुरुजींसारखे लोकही होते, त्यांच्याच आज्ञेने सुदूर दक्षिणेतल्या भारतमातेच्या चरणकमलांचं संवाहन करणार्या त्रिसागरातल्या शिलेवर स्मारक उभारण्याची संकल्पना आली.

*परिव्राजक अवस्थेत सर्व हिंदुस्थान पादाक्रांत करणार्या भावी विश्वदिग्विजयी स्वामीजींच्या अंतिम निवासांत ज्या कन्याकुमारीच्या शिलेवर त्यांचे तीन रात्र (२५-२७ डिसेंबर, १८९२) ध्यान घडलं नि ज्यातून त्यांचा एक पुनर्जन्मंच जणु झाला, त्याच शिलेवर त्यांचेच भव्य स्मारक उभारण्याचे ध्येय्य ह्या युवकाने निश्चित केलं. त्याच शिलेवर जगज्जननी श्रीपार्वती मातेने भगवान श्रीशंकराच्या प्राप्तीसाठी उग्र तपश्चरण केलं होते. तीच पवित्र शिला विवेकानंदांसाठीही जीवनाचे ध्येय्य दर्शविणारी ठरली होती.*

त्रिपादसागरांनी वेष्टित त्या पवित्रशिलेवर स्वामीजींच्या स्मारकाची सर्व सिद्धता करण्यांस हाच युवक योग्य ठरला. आणि प्रत्यक्ष कार्यांस आरंभ केला.

*कथा शिलास्मारकाची...*

योद्ध्या संन्याशाच्या त्या स्मारकाच्या निर्माणाची कथा ज्या ह्या महापुरुषाच्या करकमलांतून सिद्धांस गेली, तींस अभ्यासायचे असेल तर जिज्ञासूंनी उपरोक्त शीर्षक असलेला ग्रंथ अवश्य अभ्यासावांच. विस्तारभयास्तव लिहीत नाही. त्याच्या लेखिका आहेत विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती नि राष्ट्रीय उपाध्यक्षा पद्मश्री सुश्री निवेदिता भिडे दीदी... दीदी आमच्या मित्रसूचीत आहेत हे आमचं भाग्य आहे.

आपल्या आधीच्या पिढीच्या लोकांना ह्यासाठीची रोमांचित करणारी प्रक्रिया ज्ञात असेलंच. त्याकाळी एक एक रुपया भारतीयांकडून गोळा करून हे दिव्य स्मारक उभारण्यांत आलं. अनेकजण आज जीवित आहेत हा साक्षात्कार करणारी...

*विवेकानंद केंद्राची संकल्पना...*

केवळ दगटा विटांचे स्मारक पुरेसं नसून जीवित स्मारकं अर्थात मनुष्यनिर्माणाचे कार्य करण्यासाठी स्वामीजींना अपेक्षित असलेले युवक निर्माणाच्या प्रक्रियेत पुढे विवेकानंद केंद्र कन्याकुमारी ह्या संस्थेच्या स्थापनेची संकल्पना माननीय एकनाथजींच्या अंतःकरणांत आली नि तींस त्यांनी मूर्तस्वरुपही दिली. गेली आठ वर्षे विवेकानंद केंद्राशी व्यक्तिशः संपर्कात असल्याने केंद्राशी घनिष्ठ संबंध आहेच. केंद्राच्या स्थापनेचा इतिहासही केंद्राच्या वतीने प्रकाशित आहेच.

*मनुष्य निर्माण नि राष्ट्रपुनरुत्थान* हे केंद्राचे ब्रीदवाक्य असून गेली चाळीस वर्षे केंद्र त्याहेतुने कार्यरत आहे.
आरंभीच्या शब्दांप्रमाणे एक जीवन, एक ध्येय्य जगलेल्या माननीय श्रीएकनाथजींविषयी माझ्या अल्पबुद्धींस जे सूचलं ते लिहिण्याचा एक प्रयत्न आहे. माननीय एकनाथजींच्या चरित्रचिंतनासाठी उपरोक्त लेखिका दीदींचेच एकनाथजी हे चरित्र चिंतनीय आहे. तद्वतंच आमचे बंधु नि पत्रकार नि वर्गमित्र मित्र श्री सागर सुरवसे ह्यांनी माननीय एकनाथजींचे लिहिलेलं एक चरित्रही अवश्य अभ्यसनीय आहे.

एकनाथजींच्या ग्रंथसंपदेविषयी भविष्यांत कधीतरी लिहुच...

सांप्रत अन्य कार्यामुळे नि अध्ययनामुळे केंद्राच्या कार्यांत पूर्वीसारखा वेळ आम्ही देऊ शकत नाही ह्याची आम्हांस खंत आहे.

पण सर्वांना एक विनंती की उपरोक्त चार ग्रंथ प्रत्येकाने अभ्यासावेतंच असे आहेत.

*माननीय एकथानजींच्या हातून निर्माण झालेल्या विवेकानंद शिलास्मारकाच्या निर्माणाची कथा संक्षेपांत निम्नलिखित चित्रफीतींत आपणांस अभ्यासावयांस प्राप्त होईल.*

*https://youtu.be/eVR-l6T8WZ0*

माननीय श्रीएकनाथजींस विनम्र अभिवादन नि आदरांजली...!

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्वएकनाथजी_रानडे_पुण्यस्मरण_विवेकानंद_शिलास्मारक_कन्याकुमारी_विवेकानंदकेंद्र

No comments:

Post a Comment