गत वर्षी देवदेवेश्वर संस्थान पर्वतीवतीने मृत्युंजयेश्वर मंदिर, पुणे येथे थोरल्या श्रीमाधवरावांवर व्याख्यान देण्याचा योग आला होता. हिंदवी स्वराज्याची पानपताने विस्कटलेली पुन्हा सुव्यवस्थित करण्याचे अलौकिक कार्य ज्या पेशव्याच्या हातून घडलं त्याचे आज पुण्यस्मरण...
स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखा लोकोत्तर पुरुषही ज्याच्यावर सर्व पेशव्यांत थोर पेशवे कोण हा लेख लिहितो ह्यावरून ह्या पेशव्याची योग्यता लक्ष्यीं येते.
*अवघ्या २७ वर्षांच्या आयुर्मानात ह्या पेशव्याने जे काही अभूतपूर्व कर्तृत्व संपादन केलंय, ते केवळ विलक्षण आहे. उत्तर हिंदची मोहिम असेल किंवा कर्नाटकची स्वारी असेल किंवा निजाम-हैदर सारख्यांचा किंवा रोहिल्यांचा निःपात असेल, ह्या पेशव्याने आपल्या चार पिढ्यांच्या स्वराज्यवृद्धीचा संकल्प पूर्ण करून हिंदवी स्वराज्याचा अंमल संपूर्ण हिंदुस्थानभर जो प्रस्थापित केला, तो अत्यंत चिंतनीय आहे. पानपतांवर मराठी राज्याचा अवतार संपला असा शत्रुमित्रांचा झालेला भ्रम श्रीमाधवरावांनी आपल्या पराक्रमाने मोडून काढला हे त्यांचे कर्तृत्व अत्यंत प्रशंसनीय आहे.*
*भेलसा येथे स्वतंत्र तोफ कार्यालयाची निर्मिती*
वेदकाळापासून हिंदुंना तोफनिर्मितीचे ज्ञान होते ह्याविषयी अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. तोप किंवा तोफ हा शब्दंच मूळात संस्कृत धातु तुप् तुफ् ह्या पीडार्थक धातुंपासून निष्पन्न होतो. पंडित शिवपूजनसिंह कुशवाह ह्या आर्यसमाजी विद्वानाने ह्यावर एक स्वतंत्र ग्रंथही निर्माण केला आहे. महर्षि दयानंदांनीही त्यांच्या वेदभाष्यांत ह्याचा निर्देश केला आहे. विस्तारभयास्तव ह्यावर पुढे लिहुच. पण श्रीमाधवरावांचे हे कृत्य द्रष्टेपणाचे होते हे निश्चितंच...
*सर्वांना एकत्र बांधणारा पेशवा...*
पानपतानंतर स्वकीयांमध्ये झालेल्या दुहींस नष्ट करून सर्वांची एकमोट बांधणारा पेशवा म्हणून श्रीमाधवरावांची नोंद करावी लागेल. *शिंदे-होळकरांना दौलतीचे स्तंभ असे गौरवून किंवा नागपूरकर भोसल्यांनाही आपल्याकडे वळवून आणून श्रीमाधवरावांनी हिंदुपतपातशाहीची पुनर्संस्थापना केली हे त्यांचे यश काही अल्प नव्हते. अंतर्गत बंडाळी मोडण्याचे अत्यंत दुष्कर कार्य त्यांना अत्यंत अल्पायुष्यांत करावं लागलं म्हणूनंच विशेष आहे.निजामअलीसारखा मराठ्यांचा कट्टर वैरी श्रीमाधवरावांच्या पराक्रमाने दिपून मराठ्यांचा मित्र बनला. शहाआलम बादशाह हा एवढा बट्टेबाज पण तोही श्रीमाधवरावांच्या कर्तृत्वांवर विसंबून इंग्रजांना सोडून मराठ्यांच्या आश्रयांस आला.*
युद्धकलेंत काय किंवा हिशेबव्यवहारांत काय श्रीमाधवरावांनी आपले तेज सर्वत्र दाखवून दिले. *हरएक प्रकारचे कपट, दुष्टावा, वक्रगामीपणा, यांचे जे पीक महाराष्ट्रांत थैमान घालत होते, त्याचे संपूर्ण उच्चाटन करून न्यायनीतीचे, निष्पक्षपातीपणाचे, सार्वजनिक हिताचे असे एक नवीनंच वातावरण ह्या पेशव्याने राष्ट्रांत उत्पन्न केले.*
*व्यक्तिमत्व*
*निर्मल वर्तन, कर्तव्यनिष्ठा, धाक व लौकिकांतील पूज्यभाव* हे गुण माधवरावांच्या अंगी होते. माधवराव धर्मनिष्ठ होते. चारित्र्यसंपन्न तर होतेच. *बाळाजी विश्वनाथाचे राजकारणी धोरण, बाजीराव पेशव्याची लष्करी धडाडी नि नानासाहेबाची प्रजापालनदक्षता* हे तीन्ही गुण थोरल्या श्रीमाधवरावांत अंगभूत होते.
*श्रीमाधवराव जीवित असते तर इंग्रज भारतावर राज्यंच करु शकले नसते...*
ह्या विधानांत कोणतीही अत्युक्ती नाही. दुर्दैवाने अल्पायुष्य हा आम्हा हिंदुंना शाप आहे की काय कळंत नाही. पुण्यश्लोक श्रीशिवप्रभु असतील, धर्मवीर श्रीशंभुछत्रपती असतील, थोरले श्रीबाजीराव असतील किंवा हे थोरले श्रीमाधवराव असतील. ह्या चौघांना अत्यंत अल्पायुष्य लाभलं. सर्वात न्यून तर ह्याच पेशव्यांस. *अंतिम आयुष्यांत श्रीमाधवरावांनी ब्रिटीशांच्या विरोधांत मोहिम हाती घेतलीच होती हे कागदपत्रांवरून लक्ष्यीं येतंच. सर्व मराठेमंडळी एकवटली असून नजीबखान-अब्दालीसारखे शत्रुही नाहीसे होऊन, दिल्लीचा बादशाहाही अनुकूल होऊन सर्व राष्ट्राच्या परमोच्च बिंदुस प्राप्ती होणार अशी सुचिन्हे दिसू लागताच काळाने ह्या पेशव्यांस वयाच्या २७व्या वर्षी ग्रासावे ही नियतीची क्रूर योजनाच म्हणावी लागेल.*
पण ह्याचे कारण पहायचं तर नियतींस दोष न देता तो आमचाच सर्वस्वी आहे हे सूज्ञांस कळेल. *आमची सामुहिक उपासना न्यून पडते हे त्रिवार सत्य आहे.* हे कुणांस पटो न पटो.
*अंतिम संदेश*
ज्येष्ठ इतिहासकार सरदेसायांनी पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या खालोखाल ह्या पेशव्याची योग्यता वर्णिताना जे विधान केलंय ते रियासतीत वाचण्यासारखं आहे. अंतिम क्षणी श्रीशिवप्रभुंनी जो संदेश दिला, तोच संदेश थोरल्या श्रीमाधवरावांनी दिला, जो हिंदुंना अत्यंत बोधनीय आहे.तो संदेश होता...
*काशी नि प्रयाग मुक्त करा...*
लेखणींस विराम देताना थोरल्या श्रीमाधवरावांविषयी प्रसृत असलेल्या एका आख्यायिकेचं चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही. एका संस्कृत सुभाषितांत तो अनुभव आहे
*वृष्टिर्विना पंकमहो विचित्रं स्थलद्वये तिष्ठति सार्वकालं।*
*दानांवुभिर्माधवरायमन्दिरे विप्रस्य बाष्पैः खलु रामशास्त्रिणां।*
ह्या थोर पेशव्यांस पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#श्रीमंत_थोरले_श्रीमाधवराव_पेशवे_पुण्यस्मरण_कार्तिकवद्यअष्टमी_पानिपत_हिंदुपदपातशाही_इंग्रज_निजाम_सावरकर
No comments:
Post a Comment