Sunday, 14 October 2018

*वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक चतुर्थ*

*श्रीशारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला*

*वैदिक स्त्री दर्शन - लेखांक चतुर्थ*

स्त्रियांचा वेदाधिकार - पुराकल्पे तु नारीणां येविषयी काही विचार

कन्या किंवा कोणतीही स्त्री ही यज्ञोपवीताची अधिकारिणी आहे का येविषयी प्रस्तुत लेखांत विचार करायचा आहे. मागील वर्षीच्या नवरात्रोत्सवानिमित्तच्या लेखमालेत वेदाधिकाराविषयी द्वितीय लेखांकात विचार केलाच होता. पण तरीही अधिक विवेचनासाठी पुन्हा लेखनप्रपंच ! ह्या पूर्वीचे लेख ब्लॉगवर आहेतच तिथे वाचावेत.

*पुरा कल्पेषु तु नारीणां मौञ्जी बन्धनमिष्यते ।*
*अध्यापनं च वेदानां सावित्रीवचनं तथा ।*

यमस्मृति

स्त्रियांचा वेदाधिकार मांडताना तत्पक्षीयांकडून हा श्लोक उद्धत केला जातो. ह्यावर त्यांना वेदाधिकार नाकारणार्या सनातन म्हणविणार्या काहींकडून मात्र कल्प शब्दाच्या इतिहास परक अर्थावरून विरोध केला जातो. त्याचा समीक्षात्मक विचार करुयांत. पूर्वपक्ष नि उत्तरपक्ष अशी मांडणी लेखांत केली आहे.

*पूर्वपक्षी* - कल्प हा शब्द कालवाचक आहे नि त्यामुळे पुरातनकाळीच किंवा पूर्वीच्या कल्पातच स्त्रियांस वेदाधिकार होता. ह्या कल्पात तो नाहीये असा ह्याचा अर्थ आहे.

*सिद्धांतपक्षी (आम्ही)* - इथे कालवाचक अर्थ घेणं व्याकरणशास्त्रांस धरून नाही. कारण *इष्यते* शब्द वर्तमानकालीन असल्यामुळे तो जुळत नाही. हा *इष्यते* शब्द *परोक्षे लिट्* ह्या पाणिनीच्या सूत्रानुसार भूत अनद्यतन परोक्षकाळात लिट् लकार यायला हवा. *इष्यते* शब्दाचा अर्थ इष्ट असा आहे, नाकी *ऐतिहासिक इष्ट होता असा.* म्हणूनच इथे कल्प शब्दाचा अर्थ *"पूर्वविधिषु"* अर्थात वेदाध्ययन, सावित्रीवचन तथा विवाहादि क्रिया करण्यापूर्वी मौञ्जीबंधन अर्थात त्यांचे उपनयन असा अर्थ अभिप्रेत घ्यायला हवा. इथे कल्प शब्दाविषयी प्रमाण पाहूयांत

*अमरकोषे*

*कल्पे विधिक्रमौ - १७।४०*

कल्प, विधि, क्रम असे तीन अर्थ आहेत.

बरं आता साक्षात मनु महाराज काय सांगतात ते पाहुयांत.

मौञ्जीबंधनाच्या आधी वेदोच्चार करु नये.

*नह्यस्मिन्युज्यते कर्म किञ्चिदामौञ्जिबन्धनात् ।*

२।१७१

हा कल्प शब्द विधी अर्थीनेच संस्कृत साहित्यातही द्रष्टव्य आहे. जसे उत्तरकांड प्रमाण मानणारे तुम्ही लोक. भवभूतीच्या उत्तररामचरित्रात

*तदनन्तरं भगवतैकादशे वर्षे क्षात्रैण कल्पेनोपनीय त्रयीविधामध्यापितौ ।*

अर्थ - भगवान वाल्मीकिंनी लव नि कुश ह्यांस एकादश वर्ष पूर्ण होताच क्षात्रकल्प अर्थात क्षात्रविधिपूर्वक उपनयन करून त्यांस त्रयी विद्येचे अध्यापन केलं.

इथे त्रयी विद्या असा शब्द आहे. म्हणजे तीन वेद नव्हे बरं. तर तीन विद्या ज्या चार वेदांत आहेत अशा अर्थाने चारीही वेद शिकविले असा अर्थ आहे.

इथे कल्प शब्दांवर भाष्य करताना टीकाकार वीर राघव लिहितो

*कल्प्यतेsनुष्ठीयतेsनेनेति कल्प अनुष्ठान परिपाटी प्रकाशक ग्रन्थ: ।*


*पूर्वपक्षी* - बरं मग जर हे सत्य असेल तर जसे बालकांच्या उपनयनाविषयी अमुक वर्षी उपनयन नि अमुक प्रकारचे यज्ञोपवीत अशी विधाने आहेत तशी कन्यांविषयी का नाहीत?

*सिद्धांतपक्षी* - छान शंका आहे  ह्याचे समाधान निम्नलिखित आहे.

ज्यांनी वैदिक व्याकरणशास्त्राचा अभ्यास केला आहे,  त्यांस हे ज्ञात असेलच की शास्त्रकारांनी जिथे जिथे सामान्य विधानांत पुंल्लिंगाचा प्रयोग केलाय तिथे ते स्त्रीलिंगाचाही निर्देश ग्रहण करतातच. वैद्यकशास्त्रामध्ये किंवा आधुनिक दंडविधानामध्ये (इंडियन पीनल कोड) जसे पुंल्लिंगी (He) प्रयोग होतात, तेंव्हा त्यावरून स्त्रींने अपराध केल्यांस केवळ स्त्रीलिंगी शब्दांचा उल्लेख नसल्याने त्या अपराधमूक्त होतात की काय ? नाही ना.

जसं *य: कोsपि विषं भुङ्क्ते स स्त्रियते* ( जो कुणी विष प्राशन करेल तो मृतच होईल) ह्या वचनांत पुंल्लिंगी *य:* व *स:* शब्द आल्यामुळे स्त्रीलिंगी शब्द नसल्यामुळे स्त्रियांनी विष प्राशन केलं तर त्या जीवित राहतील काय?

अगदी पूर्वमीमांसेतही आमच्या शास्त्रकारांनी स्पष्टपणे निर्देश करताना

*जातिं तु बादरायणो ऽविशेषात्, तस्मात् स्त्र्यापि प्रतीयेत जात्यर्थस्याविशिष्टत्वात् ।६.१.८।*

ह्यावरील शाबरांचे भाष्य प्रमाण आहे. ते काय लिहितात ते पाहुयांत.

*तुशबः पक्षं व्यावर्तयति नैतद् अस्ति, पुंसो एवाधिकार इति{५/१९२}, जातिं तु भगवान् बादरायणो{५/१९३} ऽधिकृतां मन्यते स्म । आह । किम् अयं [६०९]{५/१९४} स्वर्गकाम इति जातिशब्दः समधिगतः? नेत्याह । कथं तर्हि । यौगिकः, स्वर्गेच्छायोगेन वर्तते। केन तर्हि शब्देन जातिरुक्ता, या अधिकृतेति गम्यते? नैव च{५/१९५} वयं ब्रूमो, जातिवचन इह शब्दोऽधिकारक इति । किं तर्हि । स्वर्गकामशब्देनोभावपि स्त्रीपुंसावधिक्रियेते इति । अतो न विवाक्षतं पुंलिङ्गम् इति कुतः? अविशेषात् । न हि शक्नोति एषा विभक्तिः स्वर्गकामं लिङ्गेन विशेष्टुम् । कथम्? लक्षणत्वेन श्रवणात् । स्वर्गे कामो यस्य, तमेष लक्षयति शब्दः । तेन लक्षणेनाधिकृतो यजेतेति शब्देनोच्यते । तत्र लक्षणमविशिष्टं स्त्रियां पुंसि च । तस्माच्छब्देनोभवापि स्त्रीपुंसावधिकृताविति गम्यते । तत्र केनाधिकारः स्त्रिया निवर्त्यते । विभक्त्येति चेत् । तन्न । कस्मात्? पुंवचनत्वात् । स्त्रीनिवृत्तावशक्तिः. पुंसो विभक्त्या पुनर्वचनमनर्थकम् इति चेन् न । आनर्थक्येऽपि स्त्रीनिवृत्तेरभावः, परिसङ्ख्यायां स्वार्थहानिः परार्थकल्पना प्राप्तबाधश्च । न चानर्थक्यम् । निर्देशीर्थत्वात् । तस्मात् स्त्र्यपि प्रतीयेत जात्यर्थस्याविशिष्टत्वात् ।*

ह्या सारांश सांगायचा तर इतकाच की इथे शाबरांना पुंल्लिंगच केवळ विवक्षित नसून दोन्ही अपेक्षित आहे. म्हणजेच तस्मात् शब्दावरून यज्ञांस स्त्री-पुरुष दोघांचा अधिकार सिद्ध होतो. इतर ठिकाणीही पुंल्लिंगाचा निर्देश असला तरी तिथे स्त्रीलिंगांचेही ग्रहण आहेच. जसे मनुस्मृतीत जातकर्म संस्काराचे प्रतिपादन करताना

*प्राङनाभिवर्धनात् पुंसो जातकर्म विधीयते ।*
२।२९

नाभिछेदनापूर्वी पुरुषांस जातकर्म करावे. इथे *पुंस:* शब्दावरून स्त्रीचाही उल्लेख अभिप्रेत आहेच.

*नामधेयं दशम्यां तु द्वादश्यां वास्य कारयेत् ।*

*चतुर्थे मासि कर्तव्यं शिशोर्निष्क्रमणं गृहात् ।  षष्ठेsन्नप्राशनम् ।*

इथे नामकरणामध्ये *अस्य* आणि निष्क्रमणामध्ये *शिशो:* शब्द पुंल्लिंगी असूनही तिथे स्त्रीचेही ग्रहण सिद्ध आहेच.

शांखायन कल्पामध्ये आचार्य लिहितात

*घृतवन्तं कुलायिनं रायस्पोषं सदस्त्रिणं वेदो दधातु वाजिनमिति वेदे पत्नीं वाचयति ।*

शांखायन - श्रौतसूत्र - १।५

अर्थ - घृतवन्त आदि वेदमंत्र पत्नींस म्हणायला लावावेत.

जर स्त्रियांना वेदाधिकार नसताच तर हा वेदमंत्र म्हणण्याचा विषयच आला नसता.

*विवाहसमयी स्त्रींस यज्ञोपवीताचा अधिकार*

ज्यांनी विवाह केला असेल त्यांस ज्ञात असेल की विवाह मंडपांत कन्येंस आणताना तिला यज्ञोपवीत धारण करण्यांस सांगितलंच आहे. ह्याचे प्रमाण

गोभिल गृह्यसूत्र - २।१।१९

*प्रावृतां यज्ञोपवीतिनीमम्बुदायन् जपेत् सोमोsददद् गन्धर्वाय ।*

अर्थ - उत्तरीयवस्त्राने आच्छादित तथा यज्ञोपवीत धारण केलेल्या त्या कन्येंस विवाह मंडपांत आणावे.

*पत्नींस यज्ञासंबंधी अधिकार*

*पत्युर्नो यज्ञसंयोगे ।*

अष्टाध्यायी - ४।१।३३

*पतिशब्दस्य नकारादेश: स्यात् यज्ञेन सम्बन्धे ।*

अर्थात पत्नी शब्द यज्ञाच्या संबंधाचा बोधक आहे.

गोभिल गृह्यसूत्रातले आणखी प्रमाण

*कामं गृह्यsग्नौ पत्नीं जुहुतात्सायं प्रातर्होमौ, गृहा: पत्नी, गृह्य एषोग्निर्भवतीति ।*
१।३।१५

ह्यावर भाष्यकार लिहितो

*पत्नीमध्यापयेत् कस्मात् ? पत्नी जुहुयादितिवचनात् न खल्वनधीत्य शक्नोति पत्नी होतुमिति ।*

अर्थात स्त्रींस वेदादिशास्त्र शिकविलेच पाहिजेत. कशासाठी ? तर तिने अग्निहोत्र करावे हे विधान असल्यामुळे. अध्ययन केल्याशिवाय ती हवन करण्यांस योग्य होत नाही. ह्याच गृह्यसूत्रातील *दम्पती एव ।* १।४।१५ इथेही दोघांचाही यज्ञाधिकार सिद्ध आहे.

*पूर्वमीमांसा दर्शनांत दोघांसही यज्ञाचा अधिकार*

*स्ववतोस्तु वचनादकैककर्म्यं स्यात् ।*
६।९।१७

*एवं प्राप्ते व्रूमः,-“स्ववतोस्तु वचनात्तयोः सहक्रियाएवं स्मरन्ति,--‘ धर्म्मे चार्थे च कामे च नातिचरि-तव्यः’ --इति, तथा‘ सह धर्म्मश्चरितव्यः, सहापत्यम् उत्पादयितव्यम्’ । तत्र यागोवश्यं सहपत्न्या कर्तव्य इति ।*

शाबरभाष्य - पूर्वमीमांसा

अर्थात स्त्री-पुरुष दोघांस एकच कर्म करण्याच्या वचनांनी बोध असल्यामुळे एकत्रच कार्य अभिप्रेत आहे. धर्मार्थकामात स्त्रींस पृथक करु नये अशी स्मृती आहे. म्हणूनच पत्नींसह अवश्य याग केलेच पाहिजेत.

तसेच पुन्हा मीमांसेत ६।१।२१ येथेही *फलवतां च दर्शयति ।* ह्या सूत्रावरील शाबरभाष्य पाहिलं तर दोघांसही यज्ञाधिकार एकत्र व दोघांसही स्वर्गांत आविनाश ज्योतींस धारण करण्याचा अधिकार आहे. शाबरांनी पुढे स्पष्टपणे *तस्मादप्युभौ अधिकृताविति सिद्धम् ।* ह्यावरून दोघांचाही अधिकार सिद्ध केलाय.

एवंच ।

*पूर्वपक्षी* - इथे केवळ वेदमंत्र म्हणायला सांगितले आहेत. त्यावरून वेदाध्ययन सिद्ध होत नाही.

*सिद्धांतपक्षी* - अर्थ न जाणता केलेल्या मंत्रपठणाला निरुक्तकारांनी दोषच दिला आहे.

भट्टभास्करभाष्यामध्ये १।१।१ येथे

*तज्ज्वलति कर्हिचित् ॥ (नि. 1.18) इति । किञ्च - स्थाणुरयं भारहार: किलाभूदधीत्य वेदं न विजानाति योऽर्थम् । योऽर्थज्ञ इत्सकलं भद्रमश्नुते स नाकमेति ज्ञानविधूत पाप्मा ॥ (नि. 1.18) इति । स्वाध्यायोऽध्येतव्यः (तै.आ. 2.15.1) इति विधिना चार्थज्ञानपर्यन्तमध्ययनं विधीयत इति न्यायसिद्धम् ।*

इथे वेदार्थ न जाणणार्यांस निरुक्तकारांचे वचन देऊन केवळ भारवाही म्हटलंय. व शेवटी अर्थज्ञानासहित अध्यापनच न्यायसिद्ध ठरवलं आहे. ह्यावरूनच वेदाध्ययन नि मंत्रपठण दोन्ही अर्थासहितच सिद्ध होते.

इतक्या सविस्तर विवेचनांवरून आम्ही स्त्रियांस वेदाधिकार नि यज्ञोपवीताचा अधिकार सिद्ध केला आहे. येत्या लेखांत आणखी विवेचन येईलच.

*अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु ।*

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#स्त्रियांचा_वेदाधिकार_पूर्वमीमांसा_गोभिलगृह्यसूत्र_विवाह_वैदिक_स्त्रीदर्शन_शारदीय_नवरात्रोत्सव

No comments:

Post a Comment