१८० लक्ष वर्षांपूर्वीचं रामायण आजही का प्रमाण वाटतं? (याची कालगणना मागे दिलीय, आह्मीं शास्त्र प्रमाण मानणारे आहोत) ज्याला आपण प्रत्यक्ष कधी पाहिलं सुद्धा नाही, ना तो आपल्या नात्यातला ना गोत्यातला ना आपला तसा काही रक्ताने पूर्वज असा, अशी व्यक्ती आपल्याला का आदर्श वाटावी? दोन शब्दांत दोन संस्कृती असा लेख लिहिणारे अनेक असतीलही, कुणाविषयी अनादर नाही, पण विश्वदिग्विजयी श्रीमत् स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे भारतीय संस्कृती ज्या त्याग आणि सेवा या दोन आदर्शांवर आधारलेली आहे, किंबहुना या दोन आदर्शांशिवाय भारतीय संस्कृतीचं अस्तित्वही आपण कल्पू शकत नाही, त्यातला त्याग हा जो काही आदर्श आहे तो ज्या या पुराणपुरुषाच्या, इतिहास पुरुषाच्या चरित्रामध्ये सातत्याने दृग्गोच्चर होतो, त्या अमृतत्वाची प्राप्ती केलेल्या लोकोत्तर आणि महनीय व्यक्तिमत्त्वाचं चिंतन आम्हास का करावसं वाटतं???
काही क्षणांमध्ये ज्याचा राज्याभिषेक होणार आहे असा एक युवक ती राज्याभिषेकाची आज्ञा ऐकनाताही शांत, निश्चल नि निर्विकार होताच, पण ज्याला पुढील काही क्षणभरात सांगितले जाते की तुला आता १४ वर्षांचा वनवास स्वीकारावा लागेल आणि हे ऐकल्यावरही तो कुठल्याही प्रकारची उद्विग्नता, आक्रोश, हास्य, द्वेष, दुःख, असूया, वेदना, पीडा, विलाप न दर्शविता अत्यंत शांतपणे तशा प्रकारची आज्ञा देणाऱ्या आपल्या त्या मातेचे कोड कौतुक तर करतो आणि जणू काही तिने आपल्यावर उपकार केले आहेत, अशा प्रकारची भाषा करतो.
सकाळी साधा वेळेवर चहा किंवा उपाहार नाही मिळाला तर आमची दिवसभर चीडचीड होते, आम्हाला त्रास होतो, संताप होतो, दिवसाची सुरुवात कोणाचे तोंड पाहून झाली अशी भावना आमच्या अंतकरणात येते; अशावेळी हा ऐन सदतिसाव्यांत पोहोचलेला युवक (आषोडशात् सप्ततिवर्षपर्यम्तं यौवनम् - कामसूत्र) की माझ्यावर आता खऱ्या अर्थाने उपकार झालेले आहेत आणि मला मिळालेली वनवासाची आज्ञा ही माझ्या दृष्टीने अत्यंत वरदानच ठरणार आहे.
आश्चर्य म्हणजे ज्याच्यामुळे ही आज्ञा त्याला मिळाली, तो त्याचा जन्मदाता पितासुद्धा त्याला तु मला कारावासात का डांबत नाहीस अशी स्पष्टपणे आज्ञा देत असूनही हा माणूस चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची रेषही न ढळता की आपल्या जन्मदात्या पित्यालाच निजकर्तव्याचा बोध देत शांत करतो आणि रघुकुलाची 'प्राण जाई मगर बचन न जाई' या वचनाची स्मृती जागृत करतो.
सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये आपल्या चित्ताची समतोलता कुठेही न ढळु देणारा हा पुरुषोत्तम केवळ भारतीयंच नव्हे तर अखिल मानवज्ञातीचा जीवनादर्श का आहे???
आहुतस्याभिषेकाय विसृष्टस्य वनाय च। न मया लक्षितस्तस्य स्वल्पोप्याकारविभ्रमः।
महानाटक
राज्याभिषेकाला बोलाविते समयी आणि वनवासाची आज्ञा दिल्यानंतर वनवासाला जाते वेळी ज्याच्या चेहऱ्यावरची एक रेषही हलली नाही, म्हणजेच चेहऱ्यावरचे भाव दोन्ही अवस्थांमध्ये समान होते, याचा अर्थ तो भावनाशून्य होता किंवा निर्लज्ज होता किंवा संवेदनाशून्य होता असा नसून त्याच्या अलौकिक स्थितप्रज्ञतेचा नि पुरुषश्रेष्ठत्वाचा तो मूर्तिमंत साक्षात्कार होता.
तो ईश्वरी अवतार आहे किंवा नाही हा भाग स्वतंत्र आहे, तो प्रत्येकाच्या स्वतंत्र चिंतनाचा, अनुभवाचा, श्रद्धेचा सद्गुरु प्राप्त कृपाशिर्वादाचा विषय आहे, ज्याचं त्याने ठरवावं, पण आमचा इतिहासपुरुष म्हणून आह्मीं जेंव्हा रामादिवत् वर्तितव्यं म्हणतो, तेंव्हा त्याचा आधार काय???
तर कैवल्योपनिषदांत म्हटल्याप्रमाणे त्यागानेच प्राप्त होणारं हे अमरत्व, कैवल्यत्व!
हे प्रजेने किंवा संततीने किंवा धनप्राप्तीने होत नाही तर केवळ त्यागानेच होते.
त्याच्या अखंड नामस्मरणाने प्राप्त होणारी बुद्धीची स्थिरता हा प्रत्येकाच्या अनुभूतीचा विषय आहे, संतसम्राट कैवल्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबारायांनी म्हटल्याप्रमाणे सुरवंटामध्ये रूपांतर होणे असा काहीसा जो दृष्टांत आहे, हा जो काही विषय आहे प्रत्येकाच्या श्रद्धेचा असल्याने त्यावर इथे विस्तार करणे नको, कारण हे असे विषय बोलूच नयेत....
पण तरीही उपास्य देवतेची भक्ती म्हणजेच त्याचे गुण आपल्या अंगी धारण करणं हीच तर भक्तीची व्याख्या आहे असे म्हटल्यांस वावगं ठरणार नाही...
भगवान श्रीरामरायाच्या जन्मोत्सवानिमित्त त्याच्या चरणी ही वाग्पुष्पांजली !
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
PakhandKhandinee.blogspot.com
#श्रीरामनवमी_श्रीरामजयंती_वनवास_भारतीय_संस्कृती_त्याग_विवेकानंद
No comments:
Post a Comment