मृत्यू न ह्मणें हा भूपती। मृत्यू न ह्मणें हा चक्रवर्ती।
दासबोध ३।९।११
हिंदुस्तानच्या इतिहासातील तीन मृत्युंजय रत्ने - एक महाभारतातील श्री भीष्माचार्य, द्वितीय श्रीशंभुछत्रपती आणि तृतीय स्वातंत्र्यवीर श्रीविनायक दामोदर सावरकर ! एक इच्छामरणाचे वरदान लाभल्याने ५६ दिवस शरशय्येवर राहतो, दुसरा ४० दिवस सर्व अंगाची सालटी काढली जाताना, अवयव तोडले जात असताना, डोळ्यांत तप्त सळई घुसवली जाताना व जिव्हा कापली जात असतानाही मृत्युला आवाहन देतो आणि तिसरा प्रायोपवेशनाने मृत्युस झुंजवतो! तो महाभारतातला कर्ण मृत्युंजय वगैरे नाही बरंका उगाचच कादंबरीकारांच्या नादी लागू नये.
सर्वसामान्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागते, मृत्युचा पाश यमदेवता आवळत असताना आमच्यासारखे त्यातून सुटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात, पण काही वीर असे असतात की अशांशी मृत्यु झुंजत असतो, कारण मृत्यु त्यांच्यापुढे जणु पराजित असतो, शेवटी त्यांनाच मृत्युची दया येते व ते त्याला जवळ ये म्हणतात आणि कवटाळतात.
अत्युक्ती वाटेल पण ज्वलज्वलनतेजस मृत्युंजय श्रीसंभाजीराजांच्या जीवनाकडे पाहिलं, विशेषतः माघ वद्य सप्तमीपासून ते आजच्या फाल्गुन वद्य अमावस्येपर्यंत जवळजवळ ४० दिवस त्यांच्याशी मृत्यूने दिलेली झुंज, त्यांनी मृत्युशी दिलेली नव्हे, ती पाहता उपरोक्त वचन अत्युक्ती ठरणार नाही. बुऱ्हाणपूरची लूट आणि मोंगली मुलखात चालवलेली लचकेतोड, तत्कालीन खडकी म्हणजे औरंगाबाद अर्थात आजच्या संभाजीनगरांवर श्रीशंभुछत्रपतींनी बसविलेली दहशत यामुळे औरंगजेब अत्यवस्थ झाला होता. शिवाय औरंगजेबाचा शहजादा अकबर संभाजीराजांच्या आश्रयाला येऊन राहिला होता. म्हणूनच खाफीखानाने म्हटल्याप्रमाणे 'दक्षिणेतल्या काफीरांचा बीमोड' करण्यासाठी स्वराज्यावर निघालेला यवनाधम म्लेंच्छ पातशहा ७ लाखांची फौज घेऊन श्रीशंभुछत्रपतींशी ९ वर्षे झुंजताना त्यांच्या तळपत्या खड्गाने तो स्वतःचाच किमाँश खाली उतरवता झाला. तिकडे गोव्यात इसवी सन १५३५ पासून ते १७१५ पर्यंत पोर्तुगीजांनी म्हणजेच ख्रिस्त्यांनी केलेले अनन्वित अत्याचार पाहून ज्यांनी हडकोळणला 'हे हिंदू राज्य आता जाहलें आहे' म्हणून शिलालेख कोरत त्या अत्याचारांस पायबंद घातला होता, मातब्बरखानाच्या पत्राप्रमाणे तळकोंकणातल्या मशिदी व मदरसे उध्वस्त करून ज्यांनी इस्लामच्या प्रचारास खीळ बसवली, अशा ज्वलज्वलनतेजस श्रीशंभुराजेंच्या चरित्राचे चिंतन करण्याचा मोह टाळता येत नाही.
कारण हा विस्तव आहे हे कितीही सत्य असलं, हातीं घेणाऱ्याला तो पोळवणारा असला तरीही ! इतिहासाचा अभ्यास आणि मांडणी ही व्यक्तिनिष्ठ पद्धतीने न करता वस्तुनिष्ठ पद्धतीने करावी हा नियम कितीही निष्ठेने पाळला तरीही !
तरीही तो ४० दिवसांचा छळ असह्य आहे...
कारण अत्यंत कविमनाचा हा रसिक योद्धा त्या सर्व असह्य पीडा सोसण्यासाठीच कसा काय जन्मला झाला होता हे कळत नाही. आपल्यासारखा कोणी असता तर पहिल्याच दिवशी शरण गेला असता आणि सुंता करून घेता. श्रीशंभुछत्रपतींची धर्मनिष्ठा मात्र वादातीत होती. बलिदानाच्या काही महिने आधी म्हणजे १६८८ मध्ये श्रीशंभुछत्रपतींनी रचलेल्या 'सातशतक' नामक काव्याकडे पाहता अंतिमतः त्यांचा डोळा हा ईश्वरी अधिष्ठानाकडे लागलेला होता हे लक्षात येते
रंग अनेक रंगे मन मेरे कहू। रंग साँवरे मे रंगि जे हैं।
अर्थ - माझं मन पूर्वी अनेक रंगांमध्ये रंगलेलं असलं तरी आता मात्र ते त्या सांवळ्या कृष्णाच्या रंगीच रंगले आहे.
संदर्भ - छत्रपति संभाजी स्मारक ग्रंथ - पृष्ठांक ३०७
'मन राम रंगी रंगले हो' याप्रमाणेच त्यांचे अंतःकरण आता कृष्णरंगी रंगलं होते. राष्ट्रसूत्रधार श्रीलोकमान्यांनी 'आशेची निराशा व निराशेची आशा' या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे 'निर्वाणीचे धैर्य' हा जो शब्दप्रयोग केला आहे, तो इथे श्रीशंभुछत्रपतींना अत्यंत लागू होतो.
जाता जाता...
औरंगजेबाने रहल्लुखानामार्फत श्रीशंभुछत्रपतींना विचारलेल्या दोन प्रश्नांमध्ये भले 'मुसलमान हो' म्हटल्याचा संदर्भ नसला तरी सुद्धा राजाराम महाराजांच्या आज्ञेने लिहिलेल्या चिटणीस बखरीमध्ये तो प्रश्न विचारल्याचा आणि श्रीशंभू छत्रपतींनी त्याला बाणेदारपणे नकारात्मक व अपमानास्पद प्रत्युत्तर दिल्याचा उल्लेख आहेच, पण भले तो संदर्भ समकालीन नसला तरीही त्याने श्रीशंभुछत्रपतींच्या धर्मवीरत्वावर कुठेही प्रश्नचिन्ह येत नाही. पुढे ९ मे, १७०३ला औरंगजेबाने हाच 'मुसलमान हो' प्रश्न श्रीशाहुछत्रपतींना विचारला आणि त्यांनी बाणेदारपणे नकार दिला, तो संदर्भ 'मोंगल दरबारची बातमीपत्रे खंड तीन' मध्ये जिज्ञासूंनी पहावा. आंतरजालांवर पीडीएफ सहज प्राप्य आहे.
मृत्युंजयाच्या चरणी ३३५व्या पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन !
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#मृत्युंजयअमावस्या_धर्मवीर_श्रीशंभुछत्रपति_बलिदान_हिंदवीस्वराज्य_हिंदुधर्म
No comments:
Post a Comment