Wednesday, 8 March 2023

आंतरराष्ट्रीय महिलादिनानिमित्त...

 


स्त्रियांवर सहस्त्रो वर्षे अन्याय किंवा अत्याचार झाला, त्यांना शिकुच‌ दिलं गेलं नाही, लिहु-वाचुही दिलं नाही, चूल नि मुल यातंच अडकवून ठेवलं, स्त्रियांचे सहाव्या किंवा आठव्या वर्षी विवाह, केशवपन, विधवापुनर्विवाह निषेध, सतीची प्रथा(ही मूळात नव्हतीच), पडदा प्रथा हा सर्व अन्याय सहस्त्रो वर्षे किंवा अनादि काळापासून सुरुच होता यासारखा भ्रम एकीकडे...


तर दुसरीकडे स्त्रियांवर कधीच अजिबात अत्याचार किंवा अन्याय झालाच नाही, त्यांच्यावर कुठलीही बंधने लादलीच गेली नाहीत, मूळ आचारापासून भ्रष्ट झालोच नाहीत, उपरोक्त कुठल्याही अनिष्ट प्रथा मूळात नव्हत्याच किंवा ज्या होत्या त्या‌ अनिष्ट नव्हत्याच उलट शास्त्रसंमतंच होत्या, स्त्रियांचे‌ हित करणाऱ्याच होत्या हा नि ह्यासारखा भ्रम दुसरीकडे...


या दोन्ही अतिरेकी नि अवास्तव भ्रमांतून समस्त स्त्री-पुरुष हे दोघे ज्यादिवशी बाहेर येतील आणि सत्य ते स्वीकारून, चांगलं ते पुढे घेऊन नि वाईट ते त्यागून व्यष्टी नि समष्टीच्या हितासाठी पात्रापात्रविवेक धारण करत पुढे जातील, तोच खरा आंतरराष्ट्रीय महिला दिन किंवा पुरुष दिन ठरेल !


*स्त्रिया ह्या स्त्रियाच राहुन त्यांच्यातलं स्त्रीत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस अधिकाधिक पुरुष‌ न बनवता आणि पुरुषही पुरुषंच राहून त्यांच्यातलेही पुरुषत्व नष्ट न करता त्यांना दिवसेंदिवस स्त्रैण न करता ज्यादिवशी दोघे एकत्र होऊन स्व-स्वरुपाचा बोध घेत एकमेकांच्या मर्यादा नि एकमेकांची बल-शबल स्थाने योग्य प्रकारे ज्ञात करून आत्मोद्धारासाठी जगतील, त्यादिवसापासून महिला किंवा पुरुष दिनाची मूळी आवश्यकताच भासणार नाही...*


थोडा इतिहास पाहुयांत...


आमच्या वैदिक हिंदु धर्माचा किंवा न्यूनतम या भारतवर्षाच्या, भरतभूमीच्या इतिहासाचा विचार केला तरी महाभारतकालापर्यंत तरी, ज्यांस वेदकाळ म्हणता येईल, इथे वेदकाळ म्हणजे जोपर्यंत एकंच वेदमत सर्वत्र प्रतिष्ठापित होते असा महाभारतकाळापर्यंतचा काळ, निदान या काळापर्यंत तरी स्त्रियांविषयी सर्वत्र आदराचीच भावना होती. ज्या काही कुप्रथा वर सांगितल्या‌हेत त्या‌ त्याकाळापर्यंत तरी अस्तित्वात असल्याचे काडीचंही प्रमाण उपलब्ध नाही. एखादा उल्लेख महाभारती आढळत असेल तर तो प्रक्षेप आहे नि:संदेह. कुणाला पटो न पटो...


पण त्यापश्चात् एक-दीड सहस्त्र वर्षांनी जैन नि बौद्ध मतांचा झालेला उदय‌ पाहिला तर भगवान बुद्धाच्या साहित्यात केलेली स्त्रियांची आत्यंतिक निंदा पाहिली तर हा स्त्रियांविषयी मूळचा उदार असा वैदिक दृष्टिकोन बौद्ध काळात कुठेतरी संकुचित होत गेल्याचा दिसतो. आह्मीं भगवान बुद्धाचं समग्र साहित्य जे त्रिपीटक नावाने विस्तारलेलं आहे, ते बव्हतांश अभ्यासल्यानेच हे विधान करतोय. स्वत: भगवान बुद्धांचंच त्याच्या बौद्धपंथामध्ये माजलेला अनाचार पाहून 'येत्या पाचशे वर्षात माझा बुद्ध धम्म नष्ट होईल' हे चुल्लवग्गातलं(विनयपिटक) आनंदाशी झालेलं संभाषण आहेच. हा काळ इसवी सन पूर्व १८वं शतक आहे, ब्रिटीशांनी ठरविलेला काळ आह्मीं मानत नाही. त्यानंतर सातशे वर्षांनी चंद्रगुप्त मौर्याचं अभूतपूर्व साम्राज्य(इसवी सन पूर्व ११व्या शतकाच्या समीप) ह्यात हा अनाचार दिसत नसला तरी त्यानंतर किंवा त्या काळात निर्माण झालेली अनेक अवैदिक मतं नि त्याने वैदिक धर्मांस आलेली ग्लानी ज्यावर पुढे सहाशे वर्षांनी भगवत्पूज्यपाद श्रीमच्छंकराचार्यांनी(इसवी सन पूर्व ५वं शतक) वैदिक धर्माचे पुनरुत्थान करत वैदिक सिद्धांताची पुनर्प्रतिष्ठापना केलेली दिसत असली तरी त्यांच्या‌ साहित्यातही(चरित्रात नव्हे) काही स्थळी स्त्रियांविषयी वेदाधिकार नाकारणारी विधाने दिसतात. अर्थात ही प्रक्षिप्त असावीत असं आमचं आचार्यांच्या समग्र १९ चरित्रांचे व साहित्याचं अवगाहन केल्यानंतरचं मत आहे. भले अनेकांना ते मान्य होणार नाही विशेषत: स्वत:ला शांकरमतानुयायींना तरी. पण क्षणभर ते सोडलं तरी भारतीयांचा‌ स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन हा पुन्हा आचार्यांच्या काळात पूर्वीच्या वेदकाळासारखा उदात्त झालेलाच दिसतो. 


*मग नेमकं कुठं चुकलं???*


तर उत्तर आहे इस्लामी आक्रमणानंतर...होय कारण ही आक्रमणे अत्यंत पाशवी आणि न भूतो अशी होती. इथूनंच स्त्रियांवर नको ती बंधने लादण्यांत आली, अगदी केवळ ब्राह्मण समाजापुरती मर्यादित असणारी केशवपन किंवा विधवा पुनर्विवाह निषेधासारखी वचने आपल्याला धर्मशास्त्राचा अविभाज्य भाग असल्याची दिसतात. हाच वैदिक धर्माच्या पतनाचा खरा आरंभ आहे. पण याचा अर्थ असाही नाही की अगदीच स्त्रियांवर बंधने आली. म्हणजे त्यांना लिहायला वाचायला शिकु दिलंच नाही, सतीप्रथा सरसकट होतीच असा भ्रम जो आपण करून घेतो तो अत्यंत आत्मघातकी आहे. कारण भारतीय इतिहासांत कधीही असा काळ फारसा नव्हता की जिथे स्त्रियांना लिहायला वाचायला अगदीच प्रतिबंध होता. कारण आजपासून ६०० वर्षांपूर्वी म्हणजे १४व्या शतकांत काश्मीरमध्ये शेतामध्ये‌ काम करणाऱ्या माता-भगिनी संस्कृतमध्ये काव्यरचना करत होत्या असा लेखी संदर्भ आहे(विक्रमांकदेवचरितम्) आह्मीं यावर सविस्तर लेख मागे लिहिला आहेच. आह्माला स्वत:ला अद्याप संस्कृतमध्ये एक श्लोक रचता आला नाहीये. पण लौकिक शिक्षण नाकारलं नसलं तरी 


*'स्त्रीशुद्रौ नाधीयताम्'*


अशा काही विकृत स्मृतीवचनांमुळे स्त्रियांना वेदाधिकार मात्र या काळात मात्र नाकारला गेला असेल हे आह्मीं मान्य करतोच. त्यामुळे आह्मीं असे म्हणत नाही की सगळंच छान होते पण अगदीच वाईट होतं असेही दिसत नाही. पण इस्लामी आक्रमणानंतर आह्मां भारतीयांचा स्त्रियांविषयीचा मूळचा उदार दृष्टिकोन हा काही अंशी संकुचित व्हायला सुरुवात झाली हे त्रिवार सत्य. याचं दायित्व मुस्लिमांचे नसून आमचंच आहे हे मान्यंच करावं लागेल. वेदमहर्षि सातवळेकरांनी त्यांच्या 'वैदिक व्याख्यानमाले'मध्ये हा विषय काहीअंशी साधार मांडला आहे तिथे अभ्यासावा. यावर कधीतरी येऊच...


*अर्थात ज्या धर्मात स्त्रीला भद्रा, काली, दुर्गा, रमा, सरस्वती, अंबिका, चंडिका म्हणुन पूजिलं जातं, त्याच धर्मात नि त्याच राष्ट्रात स्त्रियांप्रती केवळ ब्राह्मणसमाजापुरता असलेला केशवपनाचा आग्रह, सतीचा काही ठिकाणीच आढळणारा अपवादात्मक अतिरेक किंवा निदान तो वेदसंमतंच आहे असे मानणारी वेदमंत्रांचा वाट्टेल तो अर्थ काढणारी सायणाचार्यांची काही ठिकाणी विकृत अशी वेदभाष्ये नि त्यालाच प्रमाण मानणारी धर्ममार्तंड मंडळी, आमच्या धर्मसिंधुसारख्या ग्रंथांमध्ये ६-८व्या वर्षीच कन्यांचा‌ विवाह लावण्याच्या अत्यंत शास्त्रविरुद्ध नि वेदविरुद्ध अशा आज्ञा,‌ इतक्या लहान वयात त्या विधवा झाल्यातर आयुष्यभर पुनर्विवाहाचा निषेध, म्हणजे आयुष्यभर केशवपन करीत त्यांनी तसंच रहायचं, यद्यपि हे केवळ ब्राह्मण समाजापुरतं असलं तरी जिथे हा धर्ममार्तंड म्हणविणारा समाजंच इतका भरकटला होता, तिथे धर्माची ग्लानी वेगळी काय सांगायची? हा सर्व विकृत प्रकर घडत असताना वेळोवेळी हिंदुस्थानात अनेक सत्पुरुष‌ निर्माण झाले नि त्यांनी स्त्रियांच्या उत्थानासाठी अलौकिक कार्य केलं. मग त्यामध्ये अगदी समर्थ रामदासांसारखे संत असतील किंवा आधुनिक काळात कर्व्यांसारखे, स्वामी विवेकानंदांसारखे, सावरकरांसारखे कर्ते सुधारक असतील. पण ह्या‌ सर्वात महर्षि दयानंदांचे नाव मात्र अग्रगण्याने घ्यावं‌ लागेल ज्यांनी या सर्व मध्यकालीन वेदविरुद्ध स्मृतींना धिक्कारून मूळ वेदांच्या आधारावरंच स्त्रियांना वेदसंमत वेदाधिकार, पुनर्विवाहाचा अधिकार, पूर्ण यौवनावस्था प्राप्त झाल्यावरंच विवाह वगैरे जे क्रांतिकारक असे वेदाधारित सिद्धांत मांडून वैदिक धर्माची पुनर्प्रतिष्ठापना केली, त्याने स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी पुन्हा ढवळून निघाली आणि ती अत्यंत स्वच्छ नि शुद्ध झाली. अर्थात महर्षींच्या या दृष्टिकोनाला तुच्छ‌ लेखणारे व त्यांचा विद्वेष करणारी मंडळीही त्याकाळी होती व आजही आहेतंच जी अद्यापही मध्ययुगीन मानसिकतेमध्ये जगणारी आहेत. कुणाचं नाव घेण्याची आवश्यकता नाही.*


पण हा झाला इतिहास - वर्तमानाचं काय?


काही जण म्हणतील अहो सारखं काय इतिहास उगाळता? आजच्या आमच्या तरुण पिढीला या तुमच्या इतिहासाशी काही घेणंदेणं नाहीये तुम्ही काय इतिहास उकरून काढता? तर आह्मीं सांगु इच्छितो की असा रस खरंच नसेल तर एका दृष्टीने ते चांगलंच आहे. पण दुसरीकडे ह्या इतिहासाचे भांडवल करून त्याचे विकृतीकरण करत संपूर्ण सत्य‌ न मांडता केवळ आपल्या‌ स्वार्थाला सोयीस्कर तेवढं मांडून हिंदु धर्म नि संस्कृतीचा अपलाप करण्याची जी कथित पू-रोगामी, अ-बुद्धिवादी, स'माज'वादी, साम्यवादी, नास्तिक, कथित विवेकवादी, कथित स्त्रीवादी अशी म्हणजेच संक्षेपात हिंदुद्वेष्टी अशी जी काही समाजविघातक वृत्ती मागील सात आठ दशकांत फोफावलीय, जीतून समाजमन कलुषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो, ती पाहता या सर्व इतिहासाचा विचार करणं आवश्यक वाटल्याने हा लेखनप्रपंच...!


*या‌ सर्व लेखनाचा हेतु काय?*


पूर्वजांच्या चुकांवर पांघरुण घालणं? असे वरील लेखात कुठेतरी दिसतंय का वाचकांनी पहावं. मग नेमका हेतु काय? 


आपल्या इतिहासाचा अयोग्य वापर करून कुणी आपला बुद्धिभेद करत असेल तर त्याला आपण योग्य प्रत्युत्तर देणं व त्यातून आपली एकात्मता कुठेही विघटित होऊ न देणं हेच आजंच नव्हे येत्या काळातही राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने नि मानवतेच्या दृष्टीनेही श्रेयस्कर आहे. म्हणूनंच युवापिढीने यादृष्टीने विचारमंथन करणे आवश्यक असल्याने आज महिलादिनाच्या निमित्ताने हा प्रपंच...!


*स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे...*


*कारण इतिहासात आमच्यावर पिढ्यान्पिढ्या अन्याय झाला म्हणून आता आह्मीही त्याचा‌ सूड घेऊ, वाट्टेल तसे वागु, स्वैराचार करु ही भावना स्त्रीवादाच्या नावाने कुठेतरी फोफावत असेल तर समाजधारणेच्या दृष्टीने ते फार घातक आहे. ते होऊ नये म्हणून हा अट्टाहास. अर्थात हे सर्व पुरुषांनाही लागु होते. दोघांनीही मर्यांदाचे भान राखलं पाहिजे. एकमेकांचा आदर केला पाहिजे.*


लेखाचा अंत एकाच वाक्याने करतो


स्वामी विवेकानंदांनी तत्कालीन स्वत:ला स्त्रीसमाजसुधारक म्हणविणाऱ्यांना एका ठिकाणी छान कान उघाडणी केलीय. ते म्हणतात


"स्त्रियांचा उद्धार करणारे आपण कोण आहोत? त्यांच्या कल्याणाची तुम्हाला खरंच तळमळ असेल तर त्यांना शिक्षण द्या, सुशिक्षित करा, इतकंच करा. बाकीचा उद्धार त्या त्यांचा स्वत:चा स्वत:च करून घेतील. तुम्ही लुडबूड करु नका."


*स्वामीजींचे शब्द नेमके असे नसतील तरी भाव हाच आहे. आह्मीं स्त्रियांचा उद्धार करु शकतो ही भावना पुरुषांनी मनातून काढून टाकली पाहिजे. अरे जी साक्षात् भवानी आहे, सृष्टीकर्ती आहे, जगज्जननी आहे, जगत्स्रष्टी आहे, जिच्या उदरातून योगेश्वर भगवान श्रीकृष्ण नि भगवान श्रीरामचंद्र, पुण्यश्लोक शिवाजी, ज्ञानोबा-तुकोबांसारखे लोकोत्तर पुरुष जन्माला आले, मैत्रेयी, गार्गीसारख्या स्त्रिया निर्माण झाल्या, सीता-रुक्मिणी, सत्यवान-सावित्रीसारख्या पतिनिष्ठ स्त्रिया निर्माण झाल्या, ईश्वराने सृजनाचे अलौकिक कार्य जिच्या उदरी सोपावलं, तिचा उद्धार करणारा तु कोण? तु तिला केवळ योग्य शिक्षण संस्कार दे, ती केवळ तिचाच नव्हे तर जगाचाही उद्धार करेल...कारण ती साक्षात् नारायणी आहे...*


आंतरराष्ट्रीय‌ महिला दिनानिमित्त समस्त स्त्रीवर्गांस अभिवादन करत इतकंच...


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#आंतरराष्ट्रीयमहिलादिन_स्त्रीवाद_वैदिकधर्म_फेमिनिझम_सतीप्रथा_पुनर्विवाह

No comments:

Post a Comment