Thursday, 28 April 2022

श्रीमंत थोरल्या बाजीरावांस...

 



शतकोटी अभंग‌ लिहिण्याची आमच्या भक्तशिरोमणी श्रीनामदेवरायांची‌ प्रतिज्ञा ज्याप्रमाणे जगद्गुरु श्रीतुकोबारायांनी पूर्ण केली, त्याचप्रमाणे पुण्यश्लोक श्रीशिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रुपांतर करत व दिल्लींद्रपदलिप्सव: अशा श्रीशंभुछत्रपतींच्या देहावसानाचा प्रतिशोध घेत दिल्ली जिंकून त्यांच्या पाऊलांवर पाऊल टाकत स्वराज्यमंदिरांवर हिंदुपतपातशाहीचा कळस चढविला...!


बाजीरावांच्या पुण्यवंतपणाचे दर्शन तत्कालीन अन्य मराठे‌ सरदारांच्या पत्रांतून आपणांस घडल्यावर संदेहांस जागा उरत नाही.‌ मागे ह्यावर लिहिलंय.


कान्होजी आंग्रे त्यांच्याबद्दल एक पत्रात लिहितात👇🏻👇🏻👇🏻


*"आपणापेक्षा इष्टमित्र सुह्रदसंबंधी दुसरे कोण आहेत?"*

(पेशवे दप्तर - खंड ३०- पृष्ठ ४१)


सेखोजी आंग्रे म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"हा मनसुबा आपणच कबुल करावा. शिरोपस्थाई आपणच व्हावे. आपले पदरी आम्हासारिखे असता अगाध काय आहे? येवढे महद्यश संपादिले त्याचे कलशारोपण आपणच करावे."*


(पेशवे दप्तर - खंड ३ - पृष्ठ ४३)


*"आपण ज्या पाण्यात बुडा म्हणाल त्या पाण्यात बुडावयांस सिद्ध आहो."*

(पेशवे दप्तर - खंड ३३ - पृष्ठ ४३)


सर जदुनाथ सरकार म्हणतात 👇🏻👇🏻👇🏻


*"In the long and distinguished galaxy of Peshwas, Bajirao Ballal was unequalled for the daring and originality of his genius and the volume and the value of his achievements. He was truly a carlylean Hero as King-or rather as 'Man of Action'. If Sir Robert Walpole created the unchallengeable position of of the Prime Minister in the unwritten constitution of England, Bajirao created the same institution in the Maratha Raj at exactly the same time."*


Foreward to Peshwa Bajirao I and Maratha Expansion by V S Dighe - 1994.


इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी श्रीमंतांच्या सर्व मोहिमांची अगदी‌ संक्षेपांत जी माहिती‌ दिलीय, ती आह्मीं सोबत जोडली आहे. ती वाचल्यांवर या अपराजित अशा रणधुरंधर पेशव्याच्या दिव्य पराक्रमाची साक्षी अंत:करणांस‌ पटेल...! थोरले बाजीराव हे शब्दश: वाऱ्याप्रमाणे दौड करून विद्युल्लतेप्रमाणे सर्व हिंदुस्थानभर आपल्या खड्गाचे पाते‌ तळपून हिंदुत्वशत्रुंचा आळीपाळीने परामर्श कसे घेत होते हे ह्यांवरून लक्ष्यीं येईल...!






*शत्रु सावध होण्यापूर्वीच अत्यंत द्रुतगतीने दिवसरात्र कुच करून त्याच्यावर अचानक आक्रमण करून त्याचे नुकसान करावयाचें आणि तो‌सावध होऊन आपलीं संघटना करु लागण्यांपूर्वीच तिथून निसटावयाचेें परतावयाचें, नंतर चपळाईनें त्याच्या छावणीभोवतीं फिरून त्याचीं रसद मारावयाचीं व त्याच्या उजव्या डाव्या बाजुचें लचकें तोडून त्यांस‌ जर्जर करावयाचें व अशा छाप्यांनी तो धैर्यहीन होऊन मागें हटला म्हणजे पुन्हा त्याच्यावर उघड आक्रमण करून त्याचा घुव्वा उडवायचा...!*


संदर्भ - ना के बेहरे लिखित पहिलें बाजीराव पेशवे


बाजीरावांच्या युद्धनीतीची संक्षेपांत‌ मांडणी ही म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही...! 


बाजीराव गेल्यावर श्रीशाहुमहाराज लिहितात


*"बाजीसारखा शिष्य गेला, याउपर या मुलुखातून जावे किंवा प्राण सोडावा."*


चिमाजी अप्पांस लिहिलेलं पत्र


हिंदुस्थानच्या इतिहासातल्या एकमेव अपराजित योद्ध्यांस पुण्यतिथीनिमित्त कोटी अभिवादन...!


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीमंतथोरलेबाजीरावपेशवे_हिंदुपदपातशाही_हिंदवीस्वराज्य_साम्राज्य_रणधुरंधर_अपराजितयोद्धा

Friday, 22 April 2022

कन्यादान - वास्तव नि विपर्यास



धर्माचें पाळण, करणें पाषांड खंडन|

हेचिं आह्मासिं करणें काम, बीज वाढवावें नाम|

जगद्गुरु श्रीतुकोबाराय


कन्या दान????


कन्येचं म्हणजे मुलीचं दान कसं काय होऊ शकतं? दान करायला ती काय वस्तु आहे का? बघा बघा हिंदुधर्मात स्त्रियांना किती तुच्छ वागणुक आहे. कन्या ही दान केली जाते???


ह्या नि अशाप्रकारचे आक्षेप आपल्याही मनात येणं स्वाभाविक आहे. पण हे खरंच असे आहे का??? हिंदुधर्मामध्ये स्त्री ही खरंच दान करण्याची वस्तु आहे का???


मग जर तसं नसेल तर कन्यादान असा शब्द का योजिला जातो? ह्यासाठी सर्वप्रथम दान या शब्दाचा अर्थ घेऊयांत...!


स्वस्वत्वनिवृत्तिपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं|


देय‌ वस्तुंवरील आपला अधिकार त्यागून तो दुसऱ्यांस देणे म्हणजे दान...! म्हणजे दानानंतर त्या‌‌ गोष्टीवरचा आपला अधिकार संपतो. ती वस्तु आपली राहतंच नाही...


पण कन्या किंवा मुलगी ही जर वस्तु मूळीच नाहीये तर मग तिचं दान कसं? खरंतर ह्या प्रश्नातंच त्याचे उत्तर दडलंय. इथे 'दान' शब्दाने काहीतरी वेगळाच अर्थ अभिप्रेत असावा. आपल्या शास्त्रकारांना ही शंका होतीच म्हणून तिचं निरसन त्यांनी सहस्त्रो वर्षांपूर्वी आधीच करून ठेवलंय. धर्मशास्त्रामध्ये कल्प नावाचे जे‌ साहित्य आहे जे एक वेदांग आहे, त्यामध्ये धर्मसूत्र, गृह्यसूत्र, श्रौतसूत्र नि शुल्बसूत्र नावाचे चार ग्रंथ‌‌ येतात. त्यातल्या एका पारस्कर गृह्यसूत्रामध्ये १|४|१६ येथील 'मित्रस्य त्वेति मधुपर्कं प्रतीक्षते' ह्या सूत्रावरील पंडित गदाधरांचे भाष्य पहा.


स्वत्वत्यागपूर्वकं हि परस्वत्वापादनं दानं न कथंचिदप्यस्वकन्या कर्तुं शक्यते, नापि परस्य कन्या भवति विवाहोत्तरमपि ममेयं कन्या कन्यत्यभिधानात्| अत्र गौणो ददाति|


म्हणजे स्वत्व त्यागपूर्वक परस्वत्वापादान हे दान आहे वर सांगितल्याप्रमाणे. पण स्वकन्या कोणत्याही प्रकारे स्वकन्या राहुच नये असा प्रयोग होऊच शकत नाही, आणि कन्या दुसऱ्याची तशी होऊही शकत नाही, कारण विवाहापश्चातही 'ममेयं कन्या' असा शब्दप्रयोग आहे. म्हणजेच‌ विवाहानंतरही ती आपली म्हणजे वडिलांची किंवा कन्यादान करणाऱ्याची कन्या म्हणून राहतेच. कारण ती काही वस्तु नाहीये तिचं नातं हस्तांतर व्हायला किंवा संपायला. इथे गौणो असा शब्द आहे. म्हणजेच दान हा शब्द इथे केवळ गौण अर्थाने आहे.


जाता जाता


ह्यातल्या मधुपर्कावर आह्मीं मागे सविस्तर लेख लिहिला आहे, तो‌ ब्लॉगवर आहे...!


आपस्तंब धर्मसूत्रांमध्ये ६|१३|१० येथे स्पष्ट म्हटलं आहे की


यथादानं क्रयविक्रयधर्माश्चापत्यस्य न विद्यते|


म्हणजे इतर वस्तुंप्रमाणे कन्येचं किंवा अपत्याचे दान धर्मशास्त्रांत कधीच अपेक्षित नाही. कारण शास्त्र संतानांच्या क्रय-विक्रयाची संमतीच देत नाही.


म्हणजेच आपल्या हिंदुधर्मामध्ये मुलं-मुली विकायची अनुमतीच नाही कारण ती काही वस्तु नाहीयेत. हा आपल्या धर्माचा मोठेपणा नाही का ???


म्हणजेच इथे कन्येबरोबर दान हा शब्द मुख्यार्थवाचक नसून गौणार्थक आहे. सोप्प्या भाषेत तो लाक्षणिक अर्थाने आहे, शब्दश: नाही. म्हणजेच इथे दान हा शब्द शब्दश: दान ह्या अर्थाने नाही...!


आणखी स्पष्टीकरण पाहुयांत


मनुस्मृतीमध्ये विवाहाचे‌ आठ प्रक्रार सांगितले असून त्यातल्या पहिल्या चार अशा ब्राह्म, दैव, आर्ष नि प्राजापत्य नामक विवाहपद्धतींमध्ये ह्या दान शब्दाचा अर्थ स्पष्ट सांगितला आहे तो असा...


दान म्हणजे तिचे भरण-पोषण तथा तिच्या मानमर्यादेच्या रक्षणासाठीचं दायित्व वरांवर(पतीवर) सोपवण्यासाठी म्हणून व दोघांनी सख्यभावाने परस्परांसह राहून धर्मपूर्वक अर्थार्जन करून त्याचा योग्य कारणें विनियोग करून प्रजोत्पादन करण्याची अनुमती देण्यासाठी इतक्या महदर्थाने हा शब्द योजिला आहे....


म्हणजे इथे दान शब्द किती व्यापक अर्थाने आहे पहा...!


वैखानस गृह्यसूत्रामध्ये ह्या विवाहांच्या वेळी जो संकल्प आहे, त्यात म्हटलंय की


अस्य सहधर्मचारिणी भवतीति ब्राह्मे विवाहे धर्मप्रजासंपत्त्यर्थ| यज्ञापत्यर्थं| ब्रह्मदेवर्षिपितृप्त्यर्थं प्रजासहत्वकर्मभ्यो ददामीत्युदकेन तां दद्यात् (दाति) ॥ ४ ॥ कन्याप्रदः इति ।


ही कन्या ह्याची धर्मचारिणी व्हावी कशासाठी तर धर्मानुष्ठान म्हणजे धर्माचरण, प्रजोत्पादन तथा गृहस्थाश्रमांतील सर्व कार्यांमध्ये सहभाग, देव, ऋषि पित्रांच्या तर्पणासाठी...!


आचार्य शौनकांनी दान शब्दाचा अभिप्राय‌ सांगताना लिहिलं आहे की


कन्यां सहत्व कर्मभ्य: करोति प्रतिपादनम्|


परस्परांनी एकत्र मिळून प्रजोत्पादन तथा श्रौत-स्मार्त कर्मानुष्ठान म्हणजेच धर्मानुष्ठान करण्यासाठी...


आता इतकं सांगूनही कुणाला आणखी शंका असेच तर सांगतो...


जेंव्हा कन्येचा विवाह होतो‌ तेंव्हा तिच्या भावी आयुष्यासाठी घरातले नातेवाईक, सगेसोयरे, तिचे मित्रादि, सर्व हितचिंतक तिला काहीतरी वस्तु किंवा गोष्टी भेट म्हणून देतात. हे सर्व तिच्यासाठीच्या प्रेमासाठी स्नेहासाठी दिलं जातं. ह्या ज्या गोष्टी दिल्या जातात तेच मूळात कन्यादान आहे. म्हणजे कन्यादान शब्दामध्ये‌ कन्येबरोबर ज्या वस्तु दिल्या जातात त्यांचे‌ दान अभिप्रेत आहे, कन्येचं दान नव्हे...!


पुरोहित लोक हेच धन किंवा भेटवस्तु त्या कन्येंस द्यायला लांगतात. हेच‌ कन्यादान आहे...


इतकं लक्षात घेतलं तरी पुरेसं!!!


कन्यायै दानमिति कन्यादानम्|


जे कन्येंस भेट म्हणून दिलं जातं तेच कन्यादान....!


इतकं सांगूनही कुणाला कळंत नसेल तर आह्मीं सोबत कन्यादानप्रयोग मराठी अनुवादासहित जोडला आहे तो पहावा ही विनंती...!


संदर्भ दानचंद्रिका - दिवाकरभट्ट महादेवभट्ट काळे - काशी


हां संपूर्ण प्रयोग वाचावा. त्यात कोणते वाक्य आहे नि नाही हे तुम्हाला कळेल...!











शेष, कुणाचं नाव घ्यायला नि निंदा करायला आह्मांस वेळ नाही. कारण आमची लेखणी व वाणी आह्मांस दूषित करायची नाही...!  आपणांसही विनंती की आपण आपली वाणी दूषित करु नये...!


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#कन्यादान_विवाहसंस्कार_हिंदुधर्म_गृह्यसूत्र_धर्मशास्त्र

Saturday, 16 April 2022

वीर वानरलोकस्य सर्वशास्त्रविदां वरः| किष्किन्धा - ६६|२

 





आपल्या घरी सायंकाळी शुभंकरोति, श्रीरामरक्षा, भीमरुपी, अथर्वशीर्ष ही स्तोत्रं थोरा मोठ्यांकडून म्हटली जात नसतील, ती आपल्या कानांवर पडूनंच आपोआप मुखोद्गत झालीच‌ नसतील तर आपण करंटे आहोत. तरीही वाईट वाटुन न घेता आज‌ तरी संकल्प करावा...संध्याकाळी कार्यालयातून (ओफीसमधून) घरी आल्यावर टीव्ही नावाची घरबुडवी, समाजबुडवी, नातेबुडवी, बुद्धिबुडवी साडेसाती न लावता उपरोक्त स्तोत्रांचं पठण आपण करु शकत नसु तर आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय संस्कार देणाराहोत ह्याचा‌ विचार आपले आपण केलेला बरा...


हे असे स्तोत्रपठण केल्याने काय होते ह्याचे उत्तर काही वर्षे‌ सातत्याने त्या गोष्टी करूनंच पहावं...! कारण आमचे अनुभव सांगितलं तर तो आमचा अहंकार ठरेल...! काही अनुभव शब्दांत‌ व्यक्त करता‌ येतंच‌ नाहीत...! नाहीतंच...! किंबहुना करुच नयेत...! ते नुसते अनुभवावेत. साखर गोडंय‌ गोडंय असे लाखवेळा घोकलं तरी काही गोडवा कळेल का? ती‌ चाखल्यावरंच‌ कळेल...! 


सत्राणें हुड्डाणे ऐकताना अंगावर शहारे येत नसतील, बाहु स्फुरण पावत नसतील, अंगामध्ये चैतन्याची‌ लहर येत‌ नसेल तर आपण माणुस नाही आहोत...! कुणाला अत्युक्ती वाटो न वाटो...!


हनुमान चालिसा पाठ केली व प्रत्यही म्हटली तर आयुष्यांत‌ कधीही डिप्रेशन नावाचा भिकार रोग मनाला स्पर्शही करणार नाही आणि झाला असेल तर पळून जाईल. अनुभूती घ्यावी स्वत:च स्वतः...! आत्मविश्वास वाढवायचा असेल, व्यक्तिमत्व प्रभावसंपन्न करायचं असेल तर श्रीहनुमंतासारखे रसायनंच नाही.


श्रीसमर्थ का प्रेरित होते हनुमंत जागोजागी‌ स्थापन करायला? विवेकानंद का उच्चारत होते हनुमंत हीच‌ तुमची आता उपास्य‌देवता ठेवा म्हणायला? 



इयत्ता तिसरी किंवा चौथीत एका रात्रीत मारुती‌स्तोत्र पाठ करायचं, प्रति शनिवारी हनुमान चालिसेचे एक सो पाठ कर कोई म्हणत शंभराच्या वर पाठ करायचे, जय हनुमान मालिका पाहत हनुमंतांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन स्वत:ला आपण जणु काही हनुमानंच आहोत अशा आविर्भावात जगायचं, घरीच का‌ होईना पण व्यायाम करायचाच, तालमीत आत्ता आत्ता जायला लागलोय, हनुमंतांसारखे चार वेद सांगोपांग अभ्यासायचा प्रयत्न करायचा, त्यांच्यासारखंच सर्व शास्त्रांचे अध्ययन किंवा निदान वाचन तरी करायसाठी कटिबद्ध व्हायचं, त्यांच्यासारखंच संस्कृत अस्खलित बोलण्यासाठी प्रयत्न करायचा, भले आजही ते न येवो पण प्रयत्न तरी करायचाच...! किष्किंधा कांडात भगवान श्रीरामचंद्रांच्या नि श्रीहनुमंतांच्या प्रथम भेटीवेळचे ते‌ सात‌ श्लोक नुसते वाचावेत एकदा...! खूप वेळा लिहिलंय ह्यावर...! 


श्रीहनुमंत हा व्यक्तिमत्व निर्माणाचा नि राष्ट्र पुनरुत्थानाचा न दुजा असा मंत्र आहे....!


अशा चिरंजीवी राष्ट्रीय‌ व्यक्तिमत्वाची उपासना नाही करायची तर अन्य कुणाची करायची???


हनुमंत आमुची कुळवल्ली|


भवदीय.....


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीहनुमानजयंती_जन्मोत्सव_शक्तिउपासना_बलोपासना_रामायण_व्यक्तिमत्व_विकास

Thursday, 14 April 2022

बाबासाहेब समजून घेताना...

 


मला वेदाध्ययनाकडे वळायला लावणाऱ्या महामानवांस जयंतीनिमित्त अभिवादन...!

मला खऱ्या अर्थाने ब्राह्मण बनविणाऱ्यांस, माझ्या कर्तव्याच्या बोधासाठी...

काही जण म्हणतील की ज्या बाबासाहेबांनी जातीव्यवस्था नाकारली त्यांचेच नाव घेऊन तुम्ही जातीयवाद रेटताय... असा विचार करणाऱ्या पढतमूर्खांनी दूर रहावे...! कारण बाबासाहेबांनी स्वत: एकेकाळी जानवी वाटलीत. बहिष्कृत भारत ३ मे, १९२९ व परत महाडला...! मी लिहिलंय मागेच त्यावर...

मागे मी १२ फेब्रुवारींस महर्षि‌ दयानंदांच्या जयंतीनिमित्त लिहिलेल्या लेखामध्ये मांडलं आहे की २०१२ नि २०१५ साली विवेकानंद समग्र नि आंबेडकरांच्या काही खंडांच्या साहित्यपठणाने मी वेदाध्ययनाकडे वळलो. तिथूनंच पाखण्ड खण्डिणीची निर्मिती झाली. ज्या व्यक्तीने मला वेद काय आहेत हे जाणून घ्यायची खरी चिकीर्षा अंत:करणांत निर्माण केली, त्या आंबेडकरांना मी अभिवादन करणार नाही असे‌ कसं होईल?

युक्तियुक्तं वचो ग्राह्यं न तु पुरुषगौरवात्।

श्री भास्कराचार्य

मी व्यक्तीपूजक मूळीच नाही. स्वत: बाबासाहेबांनी एकेठिकाणी स्पष्टपणे व्यक्तीपूजेंस कठोर विरोध केला आहे. कोणत्याही महापुरुषाला मानत असताना त्याचे चरित्र पूर्ण अभ्यासून नि त्याने व्यक्त केलेली मते पूर्ण अभ्यासात घेऊनंच व त्याची यथार्थ चिकीत्सा करूनंच ती स्वीकारावी ह्या मताचा आहे. अर्थात हे करत असताना आपण फार भारी आहोत असा कुठेही भाव नसावा. वास्तविक बाबासाहेबांचे समग्र वाङ्मय पूूूूूर्वी २१ खंडांचे होते, जे आता ४०पर्यंत गेलंय. बरंच काही वाचायचं‌ राहिलंच आहे...


बाबासाहेब समजून घेताना

२०१५-१६ च्या दरम्यान मी मोतीबागेत संघांस आंबेडकरांवरची एक प्रदर्शनी करून दिली होती ती‌ संघाच्या अनेक शिबीरांमध्ये लागली होती.

ह्या शीर्षकाने मी खूप वर्षांपूर्वी ह्याच १४ एप्रिलला लाईव्ह आलो होतो. बाबासाहेब समजून घ्यायचे म्हणजे काय करायचं???

मी अस्पृश्यता मानत नाही. कारण माझं वैदिक हिंदु धर्मशास्त्राचे काहीसं अल्पसं का होईना वाचन आहे.‌ वाचन असा शब्द लिहिला आहे. मूळच्या विशुद्ध अशा वैदिक धर्मात अस्पृश्यतेला थारा मूळीच नव्हता हे स्वत: बाबासाहेबांनीही अनेक ठिकाणी प्रांजलपणे मान्य केलंच आहे आणि ते त्यावर शेवटपर्यंत ठामंच होते. त्यामुळे अस्पृश्यता नेमकी किती नि कशा स्वरुपाची होती, ती नेमकी कधी नि कशी आली, ह्यासंबंधी त्यांनी विस्ताराने चिंतन केलं असलं तरी स्वतंत्रपणे तो विषय अभ्यासण्याची माझीही इच्छा असल्याने आता‌ त्यावर काही मतं मांडत नाही. बाबासाहेबांच्या संविधानाने ती त्यावेळीच नाकारली असल्यामुळे आता तिचा विचार करणं हे केवळ हिंदुसमाजाच्या सर्वंकष हिताच्या दृष्टीने आहे, कारण बुद्धिभेद करणारे फार आहेत. बाबासाहेब स्वत: चिकीत्सक अभ्यासक करून सत्य स्वीकारणारे होते, आपण त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करताना इतकं भान तरी राखावं...!

बाबासाहेबांच्या‌ साहित्यामध्ये जो आक्रोश दिसतो तो‌ स्वाभाविक आहे. इतकंच काय‌ त्यांच्या साहित्यामध्ये अनेक ठिकाणी परस्परविरोधही दिसतो अगदी एकाच पुस्तकामध्येही परस्परविरोधी मतंही दिसतात. हे सगळं असलं तरी काही ठिकाणी राष्ट्राविषयीचा ज्वलंत अभिमानही आहे, इतिहासाविषयीचा साद्यंत असा विचारही आहे नि दुसरीकडे काही ठिकाणी अत्यंत‌ प्रक्षोभक अशी अमान्य होतील अशीही मते आहेत जी टोकाची वाटावीत. जशा २२ प्रतिज्ञा किंवा रिडल्स वगैरे किंवा क्रांति विरुद्ध प्रतिक्रांती. म्हणजे १९३५ पर्यंत भगवद्गीतेस हिंदुंचा‌ सर्वोच्च ग्रंथ मानणारे, भगवान श्रीकृष्णांस ईश्वरी अवतार मानणारे, महाडच्या सत्याग्रहावेळी गीता हाच आमच्या सत्याग्रहाचा, संघटनाचा प्रेरणाग्रंथ आहे असे म्हणणारे आंबेडकर पुढे‌ जाऊन क्रांतिविरुद्ध प्रतिक्रांतीमध्ये, रिडल्स मध्ये पूर्वीच्या मतांच्या अगदी विरोधी लेखन करतात. २२ प्रतिज्ञा का लिहितात? असं का घडतं???

एकीकडे ब्राह्मणांनी जातीव्यवस्था निर्माण केली नाही, तो‌ त्यांचा दोष‌ नाही असे म्हणणारे बाबासाहेब दुसरीकडे पुरोगामी ब्राह्मण नि सनातनी ब्राह्मण एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत असे सांगतात. आणि हऱ्या नरक्यासारखे लोक ह्यावरंच भाषणं ठोकत आंबेडकरी समाजाला ब्राह्मणांच्या‌ विरोधात पेटवत‌ राहतात. शेवटी त्याच्या नरक्याच्या पापी पेट‌ का सवाल होता तो..! बरं हेच आंबेडकर दुसरा विवाह एका ब्राह्मण स्त्रीशीच करतात...! बरं हेच आंबेडकर ६००० महार बांधवांना जानवी वाटप करतात...!

आता एवढ्यावरून बाबासाहेब ब्राह्मणद्वेष्टे ठरावेत का? किंवा त्यांचे‌ साहित्य‌ वाचून कुणी ब्राह्मणांना चोवीस तास‌ शिव्या‌ घालाव्यांत‌ का ?

मनुस्मृतीला आधी बापुसाहेब‌ सहस्त्रबुद्धेंच्या हस्ते जाळणारे बाबासाहेब पुढे हिंदु कोड बिलाच्या वेळी तिचाच आधार घेतात व विरोधकांना आव्हान देतात की ते‌ मनुस्मृतीविरोधी म्हणजेच हिंदुधर्मशास्त्राच्या विरोधांत आहे हे सिद्ध करा. 

हेच आंबेडकर एकीकडे वैदिक धर्माला डाईनामाईटने (सुरुंग) फोडावे म्हणतात तर दुसरीकडे त्याच‌ वेदांचा आधी गौरवही करतात..! 

एकीकडे इस्लामची तर्ककठोर चिकीत्सा करतात व लोकसंख्येच्या अदलाबदलीची भूमिका मांडतात...! पाकिस्तानच्या बाबतीत सावरकरांचा प्रस्तावंच‌ सर्वात उत्तम व स्पष्ट आहे असे‌ सांगतात...

सावरकर-आंबेडकर भेटी एकुण दहावेळा झाल्या आहेत बरंका...!

हिंदुत्व ही जितकी स्पृश्यांची मालमत्ता आहे तितकीच ती अस्पृश्यांचीही आहे असे ठामपणे सांगतात...

बरं हेच बाबासाहेब कम्युनिस्टांना स्वतःचा कट्टर हाडवैरी मानतात व कम्युनिझमची पूर्ण पोलखोल करतात. संविधानाचे खरे शत्रु आरंभापासून हे साम्यवादी व समाजवादीच आहेत असे ठामपणे संविधानसभेत मांडतात. जाहीरपणे...

हेच बाबासाहेब संविधानाच्या पूर्वपीठिकेत सेक्युलर व सोशालिस्ट शब्दाला कठोर विरोध करतात...

हेच बाबासाहेब संस्कृत हीच राष्ट्राची राष्ट्रभाषा व्हावी असे मांडतात व सभेत संस्कृतमध्ये अस्खलित‌ संवादही करतात (आह्मी त्यावर सविस्तर लेख मागे पुराव्यासहित लिहिला आहेच)

बरं हेच बाबासाहेब धर्म ही अफुची गोळी आहे हा मार्क्सवाद्यांचा सिद्धांत धिक्कारतात व माझ्या तत्वज्ञानाची मूळं ही धर्मात आहेत, राजकारणात नाहीत असे सांगतात...! तरुणांनी धर्मनिष्ठ रहावे असेच सांगतात...

बरं हेच बाबासाहेब अस्पृश्य कोण होते नि शुद्र कोण होते ह्या दोन पुस्तकांमध्ये त्यांनी वेदांवर घेतलेल्या आक्षेपांना आर्यसमाजी विद्वान पंडित शिवपूजनसिंह कुशवाह व धर्मदेव विद्यामार्तंडांनी लिहिलेल्या प्रतिवादांस जो सार्वदेशिक मासिक १९५१ चा अंक, जो मजसंग्रही आहे, तो वाचून पुढील आवृत्तीतून तो आक्षेपार्ह भाग काढून टाकतो असे सांगतात...

इतकंच काय तर धर्मदेव विद्यामार्तंडांनी लिहिलेल्या 'बौद्ध धर्म और वैदिक धर्म का तुलनात्मक अध्ययन' हे पुस्तक वाचून 

'"तुम्ही एका आईच्या ममतेने मला समजाऊन सांगितले. मलाही ते मान्य आहे. पण उच्चवर्णीय समाज मला ह्या मायेच्या ममतेने हे का समजावत नाही, आमचं का ऐकत नाही अशी विनवणीयुक्त तक्रार करतात."

(वरील दोन्ही संदर्भ - आर्यसमाज एवं डॉ अम्बेडकर - पण्डित कुशलदेव शास्त्री - पीडीएफ आहे)

हिंदु कोड बिलासाठी प्रस्तावना लिहिणारे हेच धर्मदेव विद्यामार्तंड जी चौदाव्या‌ खंडात प्रकाशित आहे...भाग द्वितीय मध्ये...!


पाकिस्तान किंवा भारताची फाळणी लिहिणारे हेच बाबासाहेब...

गांधींनी नि काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केलं लिहिणारे हेच बाबासाहेब...त्यात गांधींवर सडकूून टीका करणारे...


१९३५ पर्यंतचे बाबासाहेब नि नंतरचे बाबासाहेब ह्यामध्ये बराच भेद दिसून येतो हे खरंच आहे..

मग कुठले बाबासाहेब प्रमाण मानावेत???

हे सगळं लिहिण्याचा उद्देश्य काय???

बाबासाहेबांची निंदा ??? मूळीच नाही...

मग काय???

बाबासाहेबांच्या २२ प्रतिज्ञा स्वीकाराव्यांत‌ का?

रिडल्स स्वीकारावे का?? धम्मांतर स्वीकारावे का???

काय स्वीकाराने नि स्वीकारु नये ह्याचा‌ विवेक ज्याचा त्याचा आहे...

स्वत:ला आंबेडकरी म्हणविणारा समाज हा आपलाच धर्मबंधु आहे हे मान्य करूनही मधील काळात निर्माण झालेली दरी व आत्ता काही देशविघातक शक्ती निर्माण करत असलेली दरी कधी संपवणार? इथे आंबेडकरी समाज असा शब्दप्रयोग वेगळ्या अर्थाने केला नसून तो‌ लाक्षणिक आहे...

किती दिवस एकमेकांशी इतिहासावरून भांडत बसणार? 

काही वाईट सोडून जे चांगलं ते घेऊन पुढे कधी जाणार?

इतिहासात कोळसा व चंदन दोन्ही आहे, काय उगाळायचं ते आपण ठरवायचं..!

बाबासाहेबांची विद्वत्ता, व्यासंग, पुस्तकांविषयीची तीव्र आवड हे गुण शिकणार का आपण? 

We are Indians first and foremost

हे वाक्य विसरणार का???

संविधान जीवित ठेवण्याचे‌ दायित्व हिंदुंच्या‌ बहुंसंख्यतेवर आहे हे बाबासाहेबांचे सूचक वक्तव्य लक्ष्यात ठेऊन आचरणार का???

की एकमेकांत भांडत बसणार???

विचार कधी करणार व कृती???

नुसत्या जयंत्या नि पुण्यतिथ्या साजऱ्या करायच्या की आचरणही करायचं???

बाबासाहेबांचे कैकविध पैलु आहेत जे अद्यापही दुर्लक्षित आहेत, त्यांच्यावर अभ्यास करून देशाला पुढे नेणार? की समाजविघातक डाव्या व तत्सम शक्तींच्या नादी लागून एकमेकांची माथी फोडणार???

महामानवांस अभिवादन करण्यांपूर्वी हा विचार करणार???


भवदीय...!


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महामानव_डॉबाबासाहेब_आंबेडकर_राष्ट्रीयत्व_संविधान_हिंदुधर्म_देशहित_ब्राह्मण_मनुस्मृती

Tuesday, 12 April 2022

मंदिर समितीचं डोकं ठिकाणावर आहे का???



गुढीपाडव्यापासून दर्शन सुरु होणार म्हणून आह्मां पंढरपूरकरांना विशेष आनंद होता. पण गडबडीत दोन तीन दिवस थांबून ४ एप्रिललाच दोन वर्षांनी दर्शन घेतलं. व्याकुळ अंत:करणाने मंदिरात प्रवेश केला. श्रीविठोबाचे दर्शन घेऊन आईसाहेबांच्या दर्शनासाठी प्रवेश घेतला. खरंतर त्याच‌दिवशीच हे लिहिणार होतो. आईसाहेबांचे दर्शन घेण्यासाठी गर्भगृहात शिरलो अन् पाहतो तर आईसाहेबांच्या चरणकमलांची ही अवस्था...! एकीकडे मुखात श्रीसूक्त होते तर दुसरीकडे मनस्वी संताप, उद्वेग अन् चीड...! 😡


वज्रलेप निघालाय म्हणे...! दर्शन घेण्यासाठी चरणकमलांस स्पर्श केला अन् अक्षरश: अश्रु आले...! आधीच अंत:करण द्रवित होतंच. पण एकुणंच संमिश्र भावना, राग, चीड, संताप, आनंद, समाधान, पराकोटीचं दु:खही अन् उद्वेगही...! जोडलेल्या चित्रात दिसताहेत‌ त्यापेक्षाही आईसाहेबांच्या चरणकमलांची‌ स्थिती विचित्र होती.‌ ती स्पर्श करताना जाणवेलंच...


प्रस्थापितांना निष्कासित करून मंदिराचे सरकारीकरण केलं. ह्यांच्या हातीं कारभार दिला आणि ह्यांनी घाण केला दरबार अशी अवस्था झालीय...! खरंतर हे सगळं गेली ८ वर्षे नित्य अनुभवतो आहोतंच... पण हा आजचा प्रकार अतिरेक झालाय...


खरंतर दोन वर्षे मंदिर बंदंच होते म्हणजे पदस्पर्श दर्शन होण्याचा‌ प्रश्नंच नव्हता. अर्थात काहींना चोरूनही दर्शन दिलं जात होतंच. पण ते अगदी नगण्य म्हणून सोडूनही देऊ. मग जर पदस्पर्श दर्शनंच सुरु नसेल तर आईसाहेबांच्या चरणकमलांची ही अवस्था होऊन वज्रलेप निघतोच  कसा हा साधा प्रश्न आहे...





माझ्या आधीच्या माहितीनुसार खरंतर खूप वर्षांपूर्वी एका ज्येष्ठ मूर्तीशास्त्रज्ञाने कदाचित दोन्ही मूर्तींच्या वज्रलेपासंबंधी एक अत्यंत अभ्यासपूर्ण मत मांडून समितींस त्याची‌‌ संमती मागितली होती. पण वारकरी संप्रदायानेही त्यांस संमती देऊन काही शंकासमाधान विचारलं होते व ते झालंही होते. अर्थात‌ समितीने त्यावेळी काय पाऊल उचललं सर्वांस ज्ञात आहे. 


टाळेबंदीच्या काळातही वज्रलेप झालाय म्हणे


दोन वर्षांच्या काळात जेंव्हा टाळेबंदी होती, तेंव्हाही एक वज्रलेप करून घेतला आहे असे ऐकण्यांत आलं. जर हे खरं असेल तर आज झालेली दु:स्थिती नेमकी कुणाच्या दायित्वाची असा प्रश्न उभा राहतो...


वराहमिहीराची बृहत्संहिता 


ज्यांचा मूर्तीशास्त्राचा अभ्यास आहे त्यांना ज्ञात असेल की मूर्तीच्या रक्षणासाठी‌, संवर्धनासाठी ज्या प्रकारचे‌ रसायनशास्त्रातले प्रयोग करता येतात, त्यासंबंधी वराहमिहीराच्या बृहत्संहितेमध्ये एका श्लोकामध्ये माहिती आहे. ज्यांनी बृहत्संहिता अभ्यासली असेल त्यांना हे ज्ञात असेलंच. पीडीएफ आंतरजालांवर आहेच. मागे आह्मीं ह्यावर संक्षेपात लिहिलंही होते. अर्थात आह्मीं काही यातले तज्ञ नसल्याने केवळ उल्लेखासाठी हे आता नमुद करताहोत. तज्ञ मंडळी अधिक जाणतात...आह्मीं सर्वज्ञतेचा आव कुठेही आणत नाही आहोत नि आमची तशी इच्छाही नाही...


अंती प्रश्न एकंच आहे...


जे घडलंय त्याचे‌ दायित्व कुणाच्या‌ स्कंधावर? समितीच्या की पुरातत्वखात्याच्या की तत्संबंधित तज्ञांच्या ज्यांनी टाळेबंदीत केलेला वज्रलेप असेल किंवा आधीच्या तत्सम कृत्याचा???


बरं नुसता दोष‌ देऊनही काही होणार नाही. पुढे काय करायचं ह्याचा काही विचार समिती करणार आहे का? की नेहमीप्रमाणे जैसे थे


Maintain the status quo...???


आज चैत्र एकादशी. दोन वर्षांनी आज चैत्री वारी भरलीय. त्यामुळे आज हे लिहितानाही मनाची अवस्था विमनस्क आहे. पण 


बुडतें हे जन देखवेना डोळा...! 


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीविठ्ठलरुक्मिणीमंदिर_पंढरपूर_वारी_मूर्तीसंरक्षण_वज्रलेपदुरावस्था_चैत्रीएकादशी

Saturday, 2 April 2022

संवत्स॒रो अ॑जायत ।





ॐ ऋ॒तं च॑ स॒त्यं चा॒भी॑द्धा॒त्तप॒सोऽध्य॑जायत । ततो॒ रात्र्य॑जायत॒ तत॑: समु॒द्रो अ॑र्ण॒वः ॥

ॐ स॒मु॒द्राद॑र्ण॒वादधि॑ संवत्स॒रो अ॑जायत । अ॒हो॒रा॒त्राणि॑ वि॒दध॒द्विश्व॑स्य मिष॒तो व॒शी ॥

ॐ सू॒र्या॒च॒न्द्र॒मसौ॑ धा॒ता य॑थापू॒र्वम॑कल्पयत् । दिवं॑ च पृथि॒वीं चा॒न्तरि॑क्ष॒मथो॒ स्व॑: ॥


अघमर्षणसूक्त - ऋग्वेद - १०|१९०


संध्येमध्ये नित्य गायले जाणारे हे सूक्त...!


हे अखिल सृष्टीचं नवसंवत्सर आहे, केवळ मराठी किंवा हिंदु नवसंवत्सर नव्हे...! अर्थात‌ हिंदुधर्म हा अनादि अनंत‌ सत्य सनातन असल्याने तसं म्हटलं तरी चालेल...!


आज गुढी पाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात सृष्टीच्या निर्मितीचा दिवस...! हे संवत्सर अर्थात‌ वर्ष हे शुभकृत नावाने आहे. मागील वर्षीचे नाव प्लव होते, त्याआधीचे शर्वरी. ही संवत्सरांची नावे सूर्यसिद्धांत ह्या ग्रंथामध्ये आहेत. आपल्या सभोवतालची ही सृष्टी कशी निर्माण झाली, कुणी केली, कधी केली, का केली ह्या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न हा मानवी स्वभाव आहे. ज्याला असे प्रश्न पडत नसावेत तो मनुष्य म्हणावा का असा प्रश्न पडतो. त्यामुळे ह्या जिज्ञासेचे‌ समाधान करण्याचा‌ प्रयत्न जेंव्हा आपण करतो, त्यावेळी आपल्याला वळावं लागतं ते आपल्या प्राचीन इतिहासाकडे, वेदांकडे, षड्दर्शनांकडे. कारण आपल्या प्राचीन ऋषिमूनींनी, तत्वचिंतकांनी, वैज्ञानिकांनी ह्या सर्व शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न निश्चितंच केला आहे. तोच शोधण्याचा हा काहीसा लेखनप्रपंच...! 


आमच्या आधीच्या अनेक लेखांमध्ये‌ सांगितल्याप्रमाणे सृष्टीनिर्मितीचा सैद्धांतिक इतिहास हा वेदांमध्ये आहे.‌ यद्यपि आह्मीं वेदांमध्ये लौकिक मानव्यादि इतिहास नाकारत असलो तरी सृष्टीनिर्माण कशी झाली ह्याचे‌ रहस्य मात्र वेदांमध्ये आहे हे आह्मीं सातत्याने सांगत आलो आहोत. नासदीय सूक्त, पुरुषसूक्त, उपरोक्त अघमर्षणसूक्त ह्यांमध्ये प्रामुख्याने हा सैद्धांतिक इतिहास सूत्ररुपाने आहे. म्हणूनंच आज ज्या सृष्टीनिर्मितीचा दिवस आहे, तो‌ तसा आहे हे कशावरून खरं???


अनादि पुरुष करुणावरुणालय अशा परब्रह्म परमात्म्याने त्याचे अनुग्रहित स्वकीय अनादि असे वेदरुपी ज्ञान मानवसृष्ट्यारंभी चार ऋषींच्या अंत:करणामध्ये प्रकाशित केलं. त्याच‌ वेदांमध्ये ऋग्वेदाच्या उपरोक्त श्रुतींमध्ये सृष्ट्युत्पत्तीच्या क्रमाचा उपदेशही त्या ईश्वराने केला आहे. उपरोक्त ऋग्वेदाच्या अघमर्षण सूक्ताचा संक्षेपांत अर्थ असा आहे


"त्या ईश्वराने तपस: म्हणजे तपाने ऋत् अर्थात सत्य ज्ञान अर्थात परम ज्ञान प्रकट केलं. त्यातून सृष्टीरचनेची सामग्री अर्थात सत्(प्रकृती) प्रकट झाले, त्यानंतर रात्र(प्रकृतीची विषमावस्था) प्रकट झाली, त्यानंतर अर्णव समुद्र(प्रकृतीची महत्तत्वम् आकाश), त्यानंतर संवत्सर, नि पुन्हा रात्री नि दिवस प्रकट झाले. त्या सर्व चराचर सृष्टींस तो ईश्वर त्याच्या सहज स्वभावाने नियंत्रित करता झाला. त्यातून सूर्य्य म्हणजे स्वप्रकाशित लोक, चंद्र म्हणजे परप्रकाशित‌लोक, पृथिव्यादि लोक, धाता म्हणजे तो सर्वांना धारण करणारा परमात्मा पूर्वीप्रमाणेच रचता झाला. याच प्रमाणे त्याने दिवं म्हणजे उपरोक्त सूर्य्यादि‌ लोक, पृथिव्यादि लोक, अंतरिक्ष म्हणजे अवकाश किंवा तत्स्थित वस्तु, अथ: म्हणजे सुद्धा, स्व: म्हणजे द्युस्थानीय मध्यस्थ लोक नि लोकलोकांतर निर्माण केले...!"


हे अघमर्षण सूक्त आहे जे आपण सर्व हिंदु लोक संध्येच्या वेळी म्हणतो. ह्यामध्ये आपली ही जी सृष्टी आहे, तिची उत्पत्ती संक्षेपाने सांगितली आहे. जींत तिचे उपादान कारण, निमित्त कारण ह्यांचा उहापोह संक्षेपात आहे.


खरंतर ह्या सूक्ताचे विवेचन करण्यासाठी स्वतंत्र लेखमाला लिहावी लागेल किंवा स्वतंत्र ग्रंथही रचावा लागेल इतकं विलक्षण ज्ञान ह्या‌ सूक्तामध्ये आहे. कारण ह्यातला प्रत्येक शब्द हा लेखासमान विस्तार करण्याजोगा आहे. पण विस्तारभयास्तव अगदी‌ संक्षेपांत‌ विवेचन करतो.


इथे अशी शंका होईल की मंत्रामध्ये दोनदा रात्र असा शब्द का आला आहे? पहिल्यांदा जो रात्र शब्द आला आहे त्याचा नेमका अर्थ काय? कारण जर सृष्टीच अद्याप निर्माण व्हायचीय‌ तर रात्र कुठून आली? सूर्य्यादि लोकलोकांतर निर्माण व्हायच्या आधीच रात्र कशी होईल? 


इथे पहिल्या रात्र ह्या शब्दावरून काहींना ते प्रलयावस्थेचे वर्णन वाटेल. पण ते ना महा प्रलयावस्थेचे वर्णन आहे ना सृष्टीच्या अस्तित्वात येण्याचे. प्रकृती म्हणजे काय तर त्रिगुणांची साम्यावस्था. इथे रात्रि शब्दाने त्या दशेचे वर्णन आहे की त्या सत् म्हणजे प्रकृतीमध्ये त्या ईश्वराच्या सामर्थ्याने तिची साम्यावस्था नष्ट होऊन विषमता निर्माण झाली, तेंव्हा‌ तिची अवस्था‌ जी अद्यापपावेतो व्यवहारशून्य अकथनीय अशी होती, ती आता‌ तशी राहिली नाही. म्हणजेच ती आता व्यवहारयोग्य शक्तिसंपन्न झाली.‌ परंतु ती अद्याप व्यवहारात‌ प्रत्यक्षात आली नाही म्हणजेच प्रत्यक्ष कर्तृत्वसंपन्न झाली नाही. प्रलयामध्ये सत् अर्थात प्रकृती किंवा सृष्टीनिर्मितीची‌‌ सामग्री ही मृतकावस्थेत अशी होती जींत आता जिवंतपणा आला नि तिची अवस्था‌‌ सुषुप्तीदशा‌ तुल्य झाली. ज्याप्रमाणे रात्रीच्या वेळी घोर तमयुक्त व्यवहारहित दशेचा बोध आपणांस होतो परंतु ती अवस्था सर्वार्थानेच व्यवहारशून्य दशा म्हटली जाऊ शकत नाही, तद्वतंच ह्या प्रकारच्या‌ अवस्थेचा बोध इथे आपणांस‌ रात्री ह्या प्रथम शब्दांवरून घ्यायचा आहे. म्हणजे रात्रीच्या वेळी निद्रेमध्ये आपले लौकिक व्यवहार तसे स्तब्धंच असतात, पण ह्याचा अर्थ आपण मृत असतो असे नव्हे, तद्वतंच ही अवस्था रात्र शब्दावरून बोधक आहे. 


पुढे शब्द आहे अर्णव समुद्र. आता सृष्टीच निर्माण व्हायचीय तर‌ समुद्र कुठून आला? तर इथे‌ समुद्र शब्दाने आपण जो रुढार्थ घेतो तो अर्थ नसून प्रकृतीने धारण केलेलं परमाणुमय रुप हा अर्थ आहे. हे महत्तत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सृष्टीरचनेची सामग्रीच‌ वर म्हटल्याप्रमाणे...!


त्या महत्तत्वरुप प्रकृतीपासून म्हणजे अर्णव समुद्रापासून संवत्सर निर्माण झाले.‌संवत्सर म्हणजे काळाची नियत अवधी किंवा परिमाण. माप...पण इथे मूळात‌सृष्टी अद्याप निर्माणंच व्हायचीय तर संवत्सर कुठून आलं? तर इथेही परत संवत्सराचा अर्थ ब्रह्म दिवस आहे ज्याचा अर्थ तो नियमित काल जो‌ सृष्टीनिर्माणापासून ते अंतापर्यंतचा काळ आहे. जेंव्हा सृष्टीनिर्माणासंबंधीची सर्व सामग्री योग्यावस्थेत पोहोचली, तेंव्हा प्रकृतीचे परमाणु विविध रुप धारण करून पंचतत्वांची उत्पत्ती झाली, त्यानंतर लोकलोकांतर निर्माण झाले, त्यानंतर चराचर जगत् निर्माण झाले, ह्यासंच संवत्सर अर्थात ब्राह्म दिन ही संज्ञा आहे. ब्राह्मदिनामध्ये सृष्टी निर्माणाची प्रक्रिया होते ती पूर्णावस्थेला पोहोचते, ब्राह्मरात्रीमध्ये तिचा प्रलय‌सुरु होतो. म्हणजेच इथे‌ संवत्सर हा शब्द सृष्टीनिर्मितीपासून ते सृष्टीअंताचा एकुण काळ असा आहे...!


त्यानंतर‌ सूर्य्य‌चंद्रादि लोक निर्माण केले, द्यौ‌लोक, पृथ्वी, अंतरिक्ष हे सर्व त्या धात्याने म्हणजे परमेश्वराने जसे ते त्याने पूर्वीच्या‌ कल्पामध्ये निर्माण केले होते, अगदी‌ तसे निर्माण केले. म्हणजेच ही सृष्टी गतकल्पातल्या सृष्टीप्रमाणेच निर्माण झाली आहे.‌ संक्षेपांत सृष्टीनिर्मितीचे‌ चक्र हे नित्य असल्याने त्यात‌ सातत्य आहे व ते चक्र अनादि अनंत आहे. म्हणूनंच आह्मीं वेदांमध्ये केवळ सृष्टीचक्राचेच‌ रहस्य आहे असे‌ सांगतो‌ ते‌ ह्यासाठीच...!


विस्तारभयास्तव इथेच ह्या‌सूक्ताच्या विवरणांस विराम देऊन आजच्या दिवसाकडे‌ वळतो...


ही‌सृष्टी निर्माण झाली खरी. पुरुषसूक्तामध्ये आधी वनस्पति-प्राणी निर्माण झाले व सर्वात शेवटी मानव निर्माण झाले असे म्हटलंय. तो स्वतंत्र विषय. पण ती कोणत्या‌ तिथींस झाली त्याचे उत्तर आजची‌च तिथी कशावरून??? बरं या मासाला चैत्रमास नाव का पडलं? चैत्र महिन्यालाच नूतन वर्षारंभ का? ह्याचे उत्तर देताना वेदभगवान सांगतो


मधु॑श्च॒ माध॑वश्च॒ वास॑न्तिकावृ॒तूऽ...

यजुर्वेद १३|२५


वासंतिकावृत्त म्हणजे वसंत ऋतुमधले दोन मास मधु व माधव जे मधु म्हणजे मधुर असा चैत्र मास व माधव म्हणजे वैशाख मास. क्रमानुसार मधु म्हणजे‌ चैत्र मास सर्वात आधी म्हणून सृष्ट्यारंभ हा चैत्रात मानला जातो. आता प्रश्न असा पडेल की ह्याचे नाव मधु असताना चैत्र कसं पडलं? तर आपल्या वैदिक मासांची नावे ही पौर्णिमेवरून व त्यावेळच्या नक्षत्रांवरून पडली आहेत. भगवान महर्षि‌ श्रीपाणिनींनी ह्याचे विश्लेषण करताना म्हटलं आहे की...


पाणिनीय अष्टाध्यायी


साऽस्मिन् पौर्णमासीति (संज्ञायाम्)॥ ४।२।२०


ह्यावरची काशिका-वृत्ति असे सांगते


साऽस्मिन् पौर्णमासी इति संज्ञायाम् ४।२।२१


सा इति प्रथमासमर्थादस्मिन्निति सप्तम्यर्थे यथाविहितं प्रत्ययो भवति|


पौर्णमासी विशेषवाची शब्दाने सप्तम्यर्थ मध्ये म्हणजे ती पौर्णिमा ज्या नक्षत्रांस‌ येते, ते नक्षत्र सप्तमी विभक्तीने त्या त्या मासाचे नाव बनतं.


जसं आज चैत्र मास आरंभ झाला. आता ह्या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती पहा. तिचे नक्षत्र आहे चित्रा. म्हणून त्या चित्रा नक्षत्राची सप्तमी ती चैत्र म्हणून चैत्र मास हे नाव....!


चित्रा नक्षत्रेण युक्ता पौर्णमासी चैत्री, सा यस्मिन् स चैत्रो मास:|


चित्रा नक्षत्राने युक्त पौर्णिमा तो मास किंवा महिना हा चैत्र. असेच पुढे विशाखा नक्षत्रांवरून वैशाख मास वगैरे जिज्ञासूंनी जाणीव घ्यावे...


आता कालांतराने ज्योतिष विद्येचा विकास जसा होत गेला, तसा ह्याचा इतिहास‌ शब्दबद्ध केला गेला.


चैत्रे मासि जगद् ब्रह्मा,‌ ससर्ज प्रथमेऽहनि|

शुक्लपक्षे समग्रन्तुं, तदा‌ सूर्योदये सति|

हेमाद्रि


अर्थ - चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या प्रथम दिनी सूर्योदयी त्या‌ ब्रह्म्याने सृष्टी निर्माण केली.


ह्यालाच ब्रह्मदिन, सृष्टि‌संवत्, वैवस्वतादिमन्वतरारंभ, सत्ययुगादियुगारंभ, कलिसंवत्, विक्रमसंवत् असेही नावे आहेत.


आता हे सृष्टिसंवत कसे???


तर आपण नित्यसंध्यमध्ये जो‌ संकल्प गातो, त्याची‌गणना पाहिली तर जे उत्तर येते तेच...!

अथ सङ्कल्प पाठ


(सृष्ट्यादिसंवत्-संवत्सर-अयन-ऋतु-मास-तिथि -नक्षत्र-लग्न-मुहूर्त)


ओं तत्सत्-श्रीब्रह्मणो द्वितीये परार्द्धे श्रीश्वेतवराह कल्पेवैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे कलियुगे कलिप्रथमचरणे अथवा प्रथमपादे एकवृन्द-सप्तनवतिकोट्येऽ कोनत्रिंशल्लक्षैकोनपञ्चाशत्सहस्र-  त्रयोविंशत्यधिकशततमे ( *१९७२९४९१२४* ) सृष्ट्यब्दे नवसप्तत्युत्तर-द्विसहस्रतमे ( *२०७९* ) वैक्रमाब्दे, *शुभ नाम*- संवत्सरे *उत्तरायणे- वसंत ऋतौ* मासानां मासोत्तमे *मधु अथवा चैत्रमासान्तर्गते* *प्रतिपदातिथौ *रेवती नक्षत्रे *शिव*- मुहूर्ते भूर्लोके जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखण्डे आर्यावर्तान्तर्गते महाराष्ट्र-प्रदेशे सोलापूर नामकस्य जनपदस्य पंढरपूरनाम्न्यां पुण्यभूमौ अङ्गिरसबार्हस्पत्यभरद्वाजेतिप्रवरान्वितभरद्वाजगोत्रोत्पन्नोऽहंऋग्वेदान्तर्गतआश्वलायनसूत्रस्यशाकलशाखाध्यायीचिंचणीकरकुलोत्पन्नःराधाकृष्णस्यपुत्रोऽस्मितुकारामनामशर्मोऽहं ममोपात्तदूरितक्षयद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थ्यं संकल्पं करिष्ये।


ह्यात जी १९७२९४९१२४ ही गणना आहे ती पृथ्वी मानव्यादि जीवांच्या अनुकूल निर्माण झाल्याची असून पृथ्वीवर मानवसृष्टी कधी झाली  म्हणजे प्रथम मानव कधी प्रकट झाले व त्यानंतर वेद कधी प्रकट झाले ह्याची गणना जी आहे ती निम्नलिखित


महर्षि‌ दयानंद सरस्वतींनी त्यांच्या 'ऋग्वेदादिभाष्यभूमिका' ह्या ग्रंथामध्ये वेदोत्पत्ति प्रकरणामध्ये ह्याचा विस्तार केला आहे तो तिथे‌ पहावा... संक्षेपांत‌ तो इथे देतो


मानवजन्मसंवत्सर - १,९६,०८,५३,१२३,


म्हणजेच आपण मानव म्हणून पृथ्वीवर येऊन इतकी वर्षे लोटली आहेत...! हे अनेकांना पटणार नाही. न पटो आह्मांस काही फरक पडत नाही...!


कलियुगाब्द - ५१२४, युधिष्ठिराब्द - ५१६१, विक्रम संवत - २०७९, शालिवाहन शके - १९४४ शुभकृतनाम संवत्सर चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या पवित्र पर्वाच्या अर्थात गुढीयाच्या पाडव्याच्या माझ्या समस्त हिंदु बांधवांना आणि सर्व मानवाजातीसंच हार्दिक हार्दिक शुभेच्छा... 


भवदीय...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#चैत्रशुक्लप्रतिपदा_गुढीपाडवा_सृष्टीसंवत_वैदिकहिंदुधर्म_सृष्टीनिर्मिती_ऋग्वेद