शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला...
वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक तृतीय
मागच्या लेखामध्ये आपण स्त्रियांचा वेदाधिकार ह्यांविषयी संवाद केला. आता ह्या लेखांपासून वेदांमधील स्त्री-दर्शनाचा प्रत्यय घेणार आहोत.
स्त्रियांचे व्यक्तिमत्व स्वरुप व कार्य
दैनंदिन जीवनामध्ये स्त्रियांचे व्यक्तिमत्व चिंतन करताना त्यांच्या एकुण स्वरुपाविषयी व कार्याविषयी आपणांस चिंतन करायचे झाल्यांस अनेक पैलु दृष्टिगोचर होतात. जसे की
१. धर्मनिष्ठा, २. भोजन बनविणे (स्वयंपाक), ३. पशुपालन ४. गृहकार्य, ५. कुटुंबाचे नियंत्रण व नियोजन व व्यवस्था, ६. पवित्रता, ७. पती सेवा, ८. पत्नीचे अधिकार, ९. सम्राज्ञीचे पद, १०. सौभाग्यवतीचे पद ११. दीर्घायुष्य, १२. उत्तम व बलसंपन्न संतती निर्माण, १३. ईश्वरोपासना, १४. यज्ञाधिकार, १५. स्नानसंध्या, १६. आर्थिक नियोजन, १७. शिक्षण व वेदाधिकार १८. बालकांस शिक्षण व संगोपन
इत्यादि गोष्टींतून स्त्रियांच्या व्यक्तिमत्वाच्या व कार्याच्या स्वरुपांचे चिंतन वेदभगवानाच्या संदर्भांतून आपणांस करता येईल.
स्त्रीची धर्मनिष्ठा नि वेदचिंतन
स्त्री ही जात्याच धर्मपरायण व एकनिष्ठ असते. तिची लज्जा नि अनुद्धतता ही केवळ पुज्यच आहे सदैव. वेदांमध्ये स्त्रीविषयी जी विशेषणे योजिली आहेत त्यात अनेकानेक विशेषणांचे चिंतन आपणांस करायचे आहे. त्यात प्रामुख्याने
ऋग्वेदाच्या प्रथम मंडलात ३५, ३९, ११६, ११७ आदि सूक्तांमध्ये स्त्रींस वध्रिमती असे म्हटलंय. ह्या शब्दाचा अर्थ सांगताना वध्रि शब्द हा बंधन, इंद्रिय, दोरी आदि वाचक आहे. "प्रशस्ता वध्रिबन्धनम् अस्या अस्तीति वध्रिमती यद्वा प्रशस्ता वध्रय इन्द्रियाणि अस्या: सन्तीति" -जिचे बंधन प्रशंसनीय आहे अर्थात जी स्त्री धार्मिक नियमांनी स्वत:स बाध्य आहे, नियमांस कधीच तोडत नाही, जणु जी धर्मरुपी बंधनांनी किंवा दोरीने बांधली गेली आहे, जितेंद्रिय, धर्म्मपरायण, धर्म्मतत्त्ववेत्री अर्थात जाणणारी आहे तिला इथे "वध्रिमती" असे म्हटलंय. तींस प्रत्यक्ष परमेश्वर अर्थात हिरण्यगर्भ किंवा हिरण्मय पुरुष(परमेश्वरच) सूर्यासारखा तेजस्वी, निष्कलङक, पापांधकारनिवारक पुत्र प्रदान करतो असा भावार्थ आहे.
ह्यांच उपरोक्त सूत्रांमधील मंत्रांमध्ये स्त्रीस वर्त्तिका असे म्हटलंय. तो शब्द धर्मव्रतपरायण स्त्रीसाठी आलाय. "वर्तते धर्म्मस्यानुकूलेन या पुन: पुन: वर्तते सा वर्त्तिका" जी सदा धर्मानुकूल वर्तन करण्यांस पुन: पुन: तत्पर आहे अशी ती स्त्री !
स्त्रियांचे संघटन व विकास
ह्यांविषयी अथर्ववेद ११ व्या कांडात प्रथम अध्यायांत म्हणतो
ओ३म् शु॒द्धाः पु॒ता यो॒षितो॑ य॒ज्ञिया॑ इ॒मा आप॑श्च॒रुमव॑ सर्पन्तु शु॒भ्राः । अदुः॑ प्र॒जां ब॑हु॒लान्प॒शून्नः॑ प॒क्तौद॒नस्य॑ सु॒कृता॑मेतु लो॒कम् ॥
शुद्ध स्वभाव, पवित्र आचरण, पूजनीय, सेवायोग्य, शुभ्र चरित्राची गुणवैशिष्ट्ये असलेल्या ह्या स्त्रिया ज्ञानांस प्राप्त होवोत. ह्यां स्त्रियांपासून आम्हांस उत्तम संतान व बहुविध असे पशु प्राप्त झाले आहेत. इथे स्त्रियांना गौ आदि पशुंची देखभाल ठेवायची अपेक्षा आहे. कारण गौशिवाय दुध व तुप येऊच शकत नाही व त्याशिवाय यज्ञादि कृत्ये होऊ शकत नाहीत.
स्त्रियां उत्तम सुख देणार्या आहेत. त्यांची गुणवैशिष्ट्ये उपरोक्त मंत्रांत वर्णिली आहेत. ह्या संपूर्ण अध्यायांत स्त्रियांचे अतिशय उदात्त वर्णन आहे. स्त्रियांचे संघटन ह्या मंत्रांमध्ये सांगितले असून स्त्रियांनी गुणवती स्त्रीची निवड करावी असे सांगितलंय. स्त्रियांचा संघटनाधिकार इथे अधोरेखित आहे.
नारी ह्या शब्दाचा अर्थ
यजुर्वेदभाष्यामध्ये नारी शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना महर्षी दयानंद सरस्वती म्हणतात
नराणामियं शक्तिमती स्त्री तत्सम्बुद्धौ
यजुर्वेद भाष्य - ५.२६
यजुर्वेद भाष्य - ५.२६
पुरुषांना शक्ती प्रदान करणारी अशी ती नारी.
पृष्ठ क्रमांक ४३३ - यजुर्वेद भाष्य - महर्षि दयानंद सरस्वती
गृहकार्य
वेद सांगतो की स्त्रियांनी पवित्र, निर्मळ नि पुजनीय बनून आपल्या गृहकार्यांत संलग्न व्हावे. घरामध्ये पाणी व अन्नाचा उत्तम प्रबंध करावा. भात आदि अन्न तयार करणार्या स्त्रिया ह्या उत्तम कर्म करणार्या लोकांच्या स्थानांस प्राप्त होवोत. ह्यातून स्त्रियांना स्वयंपाकादि गोष्टी करणे हे अतिशय अभिमानास्पद कार्य सांगितले असून त्यानेही स्त्रियांस उत्तम गती प्राप्त होते असा भावार्थ आहे. भोजन हे उत्तम, बलवर्धक गुणकारक व सुस्वादु असावे असे वेद सांगतो.
पशुपालन व सदाचार युक्त मधुर भाषण
हे कार्य केवळ पुरुषांचेच नसून स्त्रियांचेही आहे असे सांगताना अथर्ववेद ११.१.२२ येथे म्हणतो
ओ३म् अ॒भ्याव॑र्तस्व प॒शुभिः॑ स॒हैनां॑ प्र॒त्यङे॑नां दे॒वता॑भिः स॒हैधि॑ । मा त्वा॒ प्राप॑च्छ॒पथो॒ माभि॑चा॒रः स्वे क्षेत्रे॑ अनमी॒वा वि रा॑ज ॥
इथे स्त्रियांनी गौआदि पशुंचे पालन अशा प्रकारे करावं की ते त्यांस अगदी प्रिय होतील.
शिवी, शाप किंवा व्यभिचार तुम्हांस प्राप्त न होवो अशी वेद भगवान इथे स्त्रियांस प्रार्थना करतो. स्त्रिया ह्या सतत मृदुभाषणी, सत्यवचनी व चारित्र्यसंपन्न असाव्यांत अशी वेद अपेक्षा राखतो. जर स्त्रियांस आपल्या पतींस सदैव अनुकूल ठेवायचे असेल तर तिने सतत मधुरभाषण व तेही सत्य तेच सांगावे. सत्यं ब्रुयात् मितं ब्रुयात् हे तत्व पाळावंच. असत्य भाषण कधीच करु नये, भले ते अप्रिय असो.
स्त्रियांना आपले कार्यक्षेत्र विस्तृत ठेवावे अशी वेद अपेक्षा करतो. वेदभगवान स्त्रियांस संकुचित व घरकामी कधीच अपेक्षा ठेवत नाही. चूल नि मूल एवढ्यांचपूरती स्त्रियांची अपेक्षा वेदभगवान करत नाही. तो स्त्रियांस व्यापक दृष्टीने विचार व कार्यप्रवृत्त होण्यांस सिद्ध करायांस सांगतो.
उत्तम स्वयंपाक घर
ओ३म् ऋ॒तेन॑ त॒ष्टा मन॑सा हि॒तैषा ब्र॑ह्मौद॒नस्य॒ विहि॑ता॒ वेदि॒रग्रे॑ । अं॑स॒द्रीं शु॒द्धामुप॑ धेहि नारि॒ तत्रौ॑द॒नं सा॑दय दै॒वाना॑म् ॥
अथर्ववेद - ११.१.२३
अथर्ववेद - ११.१.२३
ह्या मंत्रामध्ये स्त्रींस उत्तम स्वयंपांक घराची प्राप्ती होऊदेत अशी प्रार्थना आहे.
स्त्रीही ही कल्याणकारी आहे.
ओ३म् शि॒वा भ॑व॒ पुरु॑षेभ्यो॒ गोभ्यो॒ अश्वे॑भ्यः शि॒वा । शि॒वास्मै सर्व॑स्मै॒ क्षेत्रा॑य शि॒वा न॑ इ॒हैधि॑ ॥
अथर्ववेद - ३.२८.३
अथर्ववेद - ३.२८.३
ह्या मंत्रामध्ये स्त्रींस कल्याणी होऊदे अशी प्रार्थना आहे. स्त्री ही पुरुषाचेच नव्हे तर जगाचे कल्याण करणारी अशी भावना ह्या मंत्रामध्ये वेदभगवान बाळगतो.
पित्याच्या घरी उत्तम शिक्षा
वेदभगवान स्त्रींस पित्याच्या घरी वेदादि षट्शास्त्रांचे व उत्तम नीतिनियमांचे व पवित्र आचरणांची शिक्षा प्रदान करा अशी आज्ञा देतो. म्हणूनच अथर्ववेद 'ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतीम्' असे म्हणतो.
स्त्री ही पूर्णायु प्राप्त करो
पुत्र आणि नातवंडांच्या समवेत क्रीडा करत स्त्री आनंद प्राप्त करो. ह्यातून वेदभदवान स्त्रींस दीर्घायुष्य चिंतितो.
वेदभगवान तसेही चारशे वर्षांचे आयुष्य ऋग्वेदामध्ये चिंतितोच आहे. अथर्ववेदामध्ये शरद:शतम् आदि मंत्रांमध्येही शंभर वर्षांची आयु सांगितलीच आहे.
पवित्रता
स्त्रीने आपली वस्त्रे पुरुषांस कधीही प्रदान करु नयेंत असे अथर्ववेद १४.१.२० येथे सांगतो.
सुखप्राप्ती साठी तींस सुवर्ण, जलादि सर्व वस्तु प्राप्त होऊन ती पतींसह सुखी होवो अशी प्रार्थना अथर्ववेद १४.१.४० येथे करतो.
स्त्री ही घराची सम्राज्ञी आहे.
अथर्ववेद १४.१.४३ येथील मंत्रामध्ये ज्याप्रमाणे बलवान समुद्राने नदींचे चक्रवर्ती साम्राज्य निर्माण केले आहे तसेच पतीच्या घरात जाऊन स्त्री ही सम्राज्ञी बनु अशी आज्ञा करतो.
ऋग्वेदामध्ये सुद्धा हाच भाव व्यक्त करताना १०.८५.४६ येथे
स॒म्राज्ञी॒ श्वशु॑रे भव स॒म्राज्ञी॑ श्व॒श्र्वां भ॑व ।
ननां॑दरि स॒म्राज्ञी॑ भव स॒म्राज्ञी॒ अधि॑ दे॒वृषु॑ ॥
ननां॑दरि स॒म्राज्ञी॑ भव स॒म्राज्ञी॒ अधि॑ दे॒वृषु॑ ॥
तु सासर्यांसाठी तुझ्या आचरणाने सम्राज्ञीचे स्थान प्राप्त कर. सासुसाठीही सम्राज्ञी हो. नणंदेसाठीही सम्राज्ञी हो व माझ्या भावांसाठी अर्थात तुझ्या दीरांसाठीही घरात तु सर्वांची सम्राज्ञी हो.
ह्या मंत्रातून ऋग्वेद स्त्रींस किती उच्च स्थान प्राप्त करण्याची आज्ञा देतो हे आपणांस कळते. हे स्थान तिने तिच्या शुद्ध आचरणाने व व्यवहाराने, मृदु भाषणाने प्राप्त करायचे आहे.
हे ऋग्वेदाचे दशम मंडलातले ८५ वं सूक्त हे पूर्ण स्त्री-पुरुष विवाह व त्यांचे भावी आचरणांसंबंधी अतिशय उदात्त चिंतन प्रकट करणारे आहे.
दांपत्यजीवनांचे अत्युत्कृष्ट चिंतन उपरोक्त ऋग्वेद सूक्तामध्ये आहे.
ह्या दांपत्यजीवनामध्ये आकांक्षांचे व वैदिक आर्यांना स्त्रीपासून काय अपेक्षित असावे ह्याचे उत्कृष्ट चिंतन उपरोक्त सूक्तामध्ये ऋग्वेदांत आहे. नवीन गृहात संसारास येणार्या स्त्रींने घरातील लोकांची मने कशी जिकांवीत व तिचे आचरण कसे सम्राज्ञी समान असावे ह्यांचे इतके सुदंर दिग्दर्शन असताना काही मूढ लोक प्राचीन काली आर्यांना विवाहसंस्थेचे ज्ञान नव्हते व ते अतिशय विकृतावस्थेत जगत होते हे मत बाळगतात व त्यावर ग्रंथ लिहितात हे त्यांचे मत किती फोलपणाचे व अज्ञानदर्शक आहे हे इथे सिद्ध होते.
राजवाड्यांच्या विवाहसंस्थेच्या इतिहासाची विकृती
त्यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनही राजवाड्यांनी त्यांच्या उपरोक्त ग्रंथांत उपरोक्त सूत्रांचे एकुणच वैदिक ऋचांचे काढलेले अतिशय घाणेरडे व विकृत अर्थ व त्यावरून भारतीय विवाहसंस्थेचा केलेला एक टिपणात्मक अभ्यास हा किती विकृत आहे हे त्यांच्या अज्ञानमूलकतेचे प्रदर्शक तर आहेतच पण त्यांचा तो ग्रंथ वाचून हिंदुंच्या विवाहसंस्थेविषयी वाट्टेल ते विकृत तर्क करणारे द्वेष्टे लोकही किती अंध आहेत हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. ह्या संपूर्ण सूक्ताचा अभ्यास केला तरी वैदिक आर्यांची दांपत्यजीवनाची कल्पना सर्वसामान्यांस आकळेल. पण काय करणार? पाश्चिमात्यांना बुद्धी गहाण टाकल्यांवर मनुष्य असे विकृत ग्रंथच लिहिणार. असो त्याची समीक्षा स्वतंत्रपणे भविष्यात करणारच आहे. ज्यांना राग येतो त्या राजवाडे भक्तांनी माझे लेख वाचु नयेत. मी स्पष्टवक्ता आहे. वेदांचा अकारण अपमान सहन केला जाणार नाही, मग तो कुणीही करो.
एकमेकांविषयीच्या एकनिष्ठेवाचून खरे सुखी दांपत्य जीवन असू शकत नाही. परस्परांतील द्वैत समूळ नष्ट करून एकात्म प्रेम उत्पन्न करण्याबरोबरच इंद्रियनिग्रह व कर्तव्यनिष्ठा, दक्षता आणि स्वार्थत्याग याही गोष्टींची पूर्ण जाणींव आर्यांस उपरोक्त वेदवचनांवरूनच प्राप्त होती असे म्हणण्यांस कोणताही प्रत्यवाय नाही.
ह्यां स्त्रींस सुपुत्रवती व सौभाग्यवती कर अशी आज्ञा ह्याच सूक्तामध्ये आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही.
सर्वांत उदात्त संकल्पना
इ॒मां त्वमिं॑द्र मीढ्वः सुपु॒त्रां सु॒भगां॑ कृणु ।
दशा॑स्यां पु॒त्राना धे॑हि॒ पति॑मेकाद॒शं कृ॑धि ॥
दशा॑स्यां पु॒त्राना धे॑हि॒ पति॑मेकाद॒शं कृ॑धि ॥
ह्या मंत्राचे दोन अर्थ वेगवेगळ्या भाष्यकारांनी काढले आहेत. आर्य समाजी भाष्यकारांनी ह्यांत पतींस एकादशावा पुत्रनिर्माण कर असा अर्थ काढला आहे. पण बाळशास्त्री हरदासांनी त्यांच्या "वैदिक राष्ट्रदर्शन" नामक पुण्यातल्या व्याख्यानमालेत, ज्याचे ग्रंथ द्विखंडात प्रकाशितही आहेत, त्याची पीडीएफ हवी असल्यांस देईनच, त्यांनी निम्नलिखित अर्थ काढलाय.
ह्या मंत्रामध्ये दहा पुत्रांस तु जन्म देऊन अकरावा पती कर अशी आज्ञा आहे. म्हणजेच दहा पुत्रांनतर तो पती तिचा एकादश अर्थात अकरावा पुत्र होवो अर्थात तिथे त्यांचे पती-पत्नी संबंध संपुष्टांत येऊन ती त्याचा पुत्रवत सांभाळ करेल. ही इतकी विशुद्ध संकल्पना केवळ वेदच सांगु शकतो.
ऋग्वेदांतील सौभाग्यवती स्त्री !
ह्याच सूक्तामध्ये अनेकवेळा स्त्रींस सौभाग्यवती व उत्तम संतती प्राप्त करणारी असे म्हटलंय.
संतती कशासाठी तर अमरत्वासाठी!
संतती प्राप्तीचा हेतु हा त्या संततीने विलक्षण कर्तृत्व करून तींस व सर्व कुटंबांस आपल्या कीर्तीने व कर्तृत्वाने अमरत्व प्राप्त करून द्यावे अशी अपेक्षा ऋग्वेद ५.४.१० येथे व्यक्त करतो.
उत्तम व पराक्रमी संततीची अपेक्षा
अथर्ववेदामध्ये वैदिक गृहिणीने आपली मूलें ही शत्रुंचा नि:पात करणारी, तेजस्वी असावीत अशी प्रार्थना आहे. ती स्वत: तेजस्वी व सौभाग्यशाली असावी व पतीची कीर्ती सर्वत्र पसरावी.
अनेकांच्या विवाहामध्ये ऋग्वेदांतले उपरोक्त हेच मंत्र म्हटले जातात. जिथे घाई गडबड नसते तिथेच अर्थात ! असो.
स्त्रीने ज्ञानप्राप्ती करायची आहे.
अथर्ववेदामध्ये १४.१.६४ येथे स्त्रींस सर्व प्रकारचे म्हणजे भूत, भविष्य व वर्तमान असे तीन्ही प्रकारचे ज्ञान प्राप्त करुन पतीसेवेंत रुजु होण्यांस सांगितलेय. वेद हा तीन्ही काळात असल्यामुळे त्यांचे अध्ययन इथे तींस अपेक्षित आहे.
ब्रह्मचर्य पालनाचा अधिकार व वेदग्रहण
यजुर्वेदामध्ये ३४.१० येथे स्त्रींस विवाहपूर्व ब्रह्मचर्य पालन करून वेदादि षट्शास्त्रांचे अध्ययन करून उत्तम पतींस प्राप्त करण्यांचा आदेश आहे. जर योग्य पती प्राप्त न झाल्यांस तिने आजीवन अविवाहित राहावे व ब्रह्मचर्याचे पालन करावे पण अयोग्य पतींस वरु नये अशी वेदभगवान इथे आज्ञा देतो.
मनुस्मृतीतही "काममरणादिगच्छेद" येथे हाच अर्थ अभिप्रेत आहे. असो त्यांवर सविस्तर लेखामाला भविष्यांत येईलच.
सूर्यदर्शन दीर्घायुसाठी
स्त्रियांनी सूर्याचे दर्शन सतत घेतले पाहिजे व स्वच्छ सूर्यप्रकाशात विचरण केले पाहिजे अशी वेदांची आज्ञा अथर्ववेदांत १४.२.५ येथे आहे. सूर्याची किरणे ही शरीरांस आरोग्यदायक आहेत हे वेदभगवान किती तरी आधीच सांगून ठेवतो, जे आधुनिक विज्ञान आज आम्हांस सांगते. असो..थोडक्यांत स्त्रियांनी स्वच्छ प्रकाशांत राहायला हवं. कोंडून घेता कामा नये. वेदांमध्ये सूर्य-रश्मी चिकीत्साही स्वतंत्रपणे आहेच आहे. कारण सूर्यकिरणांनी अनेक जंतु व कृमी नष्ट होतात असे वेदभगवान स्पष्टपणे अथर्ववेद २.३२.१ येथे सांगतो व रोग नष्ट होतात हे ६.३.८ येथे सांगतो ..म्हणून स्त्रियांनी स्वच्छ सूर्यप्रकाशाचा आस्वाद घेतलाच पाहिजे हे आरोग्यदायक सूत्र वेदभगवान सांगतो.
विवाह हा केवळ संतानोत्पत्तीसाठी, शरीरोपभोगासाठी नव्हे.
विवाहाचा दिव्य उद्देश्य वेदांमध्ये केवळ कामवासनेच्या तृप्तीसाठी नसून उत्तम संतान प्राप्ती जी राष्ट्रनिष्ठ व धर्मनिष्ठ असावी, ज्याचे वर्णन वरही केलंय, ह्यासाठीच आहे. स्त्री-पुरुषांनी केवळ ऋतुगामी व्हावं म्हणजे ऋतुकालातच समागम करावी अशी स्पष्ट आज्ञा वेदभगवान देतो. विवाह म्हणजे अनियंत्रित संभोगांचे लायसन्स नाहीये. इंद्रियसंयम हवाच. हा विवेक वेदभगवान सांगतो.
सुखदायिनी सर्वांसाठीच
स्त्री ही सर्व कुटुंबासाठीच सुखदायिनी, सुमंगला, घराची वृद्धी करणारी, सासर्यांस शांति प्रदान करणारी व सासूंस आनंद देणारी व्हावी असे अथर्ववेद १२.२.२६ व १४.२.२७ येथे सांगतो. घरातल्या सर्व नियमांचे उत्तम पालन करणारी अशी होवो.
ईश्वरोपासक स्त्री (अग्निहोत्रादि संध्यादि कर्मे)
अथर्ववेदामध्ये स्त्रींस १४.२.२४ येथे अग्नीची अर्थात ईश्वराची उपासक म्हटलंय. ह्यावरूनच स्त्रींस यज्ञाधिकार व वेदाधिकार स्पष्टय हे सिद्ध आहे. माझ्या द्वितीय लेखांकातही मी तो सिद्ध केलेलाच आहे. विस्तार करत नाही. पण ह्यातून तिलाही ईश्वरोपासनेचा अधिकार स्पष्ट होतो. अग्निहोत्र, संध्यादि कर्मे नित्य करायला हवीत. ह्या अर्थाचे स्पष्ट मंत्र वेदांमध्ये आहेत, विस्तार करत नाही.
सदा आनंदी राहणे
वेदभगवान अथर्ववेदामध्ये १४.२.४३ येथे स्त्रींस सतत आनंदी राहण्याची आज्ञा देतो.
स्त्रियांची भूमिका
ऋग्वेदामध्ये १०.१५९.२ येथे स्त्रींस
अ॒हं के॒तुर॒हं मू॒र्धाहमु॒ग्रा वि॒वाच॑नी ।
ममेदनु॒ क्रतुं॒ पतिः॑ सेहा॒नाया॑ उ॒पाच॑रेत् ॥
ममेदनु॒ क्रतुं॒ पतिः॑ सेहा॒नाया॑ उ॒पाच॑रेत् ॥
मी ज्ञानवती, घराची मुख्याधिकारी, धैर्यशाली व्याख्याती आहे. शत्रुंचा नाश करणारी आहे म्हणून पतीने माझ्या अनुकूल आचरण करावे.
इथे स्त्रीच्या अनुकूल पतीने आचरण करावे अशी स्पष्ट आज्ञा दिलीय. म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या अनुकूल आचरण करायला हवं हेच सर्वत्र स्पष्ट होते.
पुढच्या मंत्रांमध्ये तिचा पुत्र शत्रुनाश करणारा, तिची पुत्री तेजस्विनी व ती स्वत: तेजस्विनी असा आशय आहे.
विवाहाचे वय
आ धे॒नवो॑ धुनयंता॒मशि॑श्वीः सब॒र्दुघाः॑ शश॒या अप्र॑दुग्धाः ।
नव्या॑नव्या युव॒तयो॒ भवं॑तीर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेकं॑ ॥
ऋग्वेद - ३.५५.१६
नव्या॑नव्या युव॒तयो॒ भवं॑तीर्म॒हद्दे॒वाना॑मसुर॒त्वमेकं॑ ॥
ऋग्वेद - ३.५५.१६
वेदांविषयीच्या स्त्री चिंतनाचा महत्वाचा विषय म्हणजे स्त्रियांच्या विवाहाचे वय ! वेदभगवान स्त्रींस संपूर्ण यौवनावस्था प्राप्त केल्यांवरच विवाहांस पात्र समजतो, आधी नाही. मनुस्मृतीतही "त्रीणि वर्षाण्युदीक्षेत्" ह्या श्लोकांतही मासिक धर्म प्राप्त झाल्यानंतर तीन वर्षांनंतर विवाह करायची आज्ञा आहे. ह्यांस सुश्रुतस्थानाचेही प्रमाण आयुर्वेदांतले आहेच आहे. त्यांवर सविस्तर कधीतरी लिहीनच. पण तूर्तांस बालविवाह निषेध ऋग्वेद तरी करतोच करतो हे सांगणे न लगे. स्त्रींस योग्य यौवनावस्था प्राप्त झाल्यांवरच तिने विवाह करावा व तोही योग्य पतीशींच.
थोडक्यांत उपरोक्त लेखनांतून स्त्रियांविषयीचे धर्मनिष्ठ, राष्ट्रनिष्ठ, पराक्रमी, शूर, पतीचे हित करणारी, सम्राज्ञी पदाची पात्रता धारण करणारी, ईश्वरोपासक, संध्यादि कर्मे नित्य करणारी, पवित्रता प्राप्त असलेली, सौभाग्यवती, सर्वांचे कल्याण करणारी, ब्रह्मचर्य पालन करणारी इंद्रियसंयमी, सदाचारयुक्त भाषणादि आचार संपन्न अशी, संघटन कुशल अशी, ज्ञानवती, गृहकृत्यदक्ष वगैरे वगैरे गुणवैशिष्ट्यांचे चिंतन आपणांस प्राप्त झालेले आहे.
पुढील लेखांत आणखी सविस्तर चिंतन करुच.
तूर्तांस लेखणींस विराम !
तूर्तांस लेखणींस विराम !
भवदीय,
#स्त्रीदर्शन
अतिशय सुंदर माहिती आणि लेख। आज अशा लिखाणाची आपल्या धर्माला गरज आहे। आपण असेच लिहीत जावो ही ईश्वराकडे प्रार्थना।
ReplyDeleteएक विनंती आपणास शक्य असल्यास शूद्रांना धर्माधिकार, वेदाधिकार आणि यज्ञधिकार यावर लिखाण करावे।
आपणास शुभेच्छा
मनःपूर्वक आभारी आहे ! हो त्यावरही लिहिलेलच आहे आधीही ! पुनश्च सविस्तर लिहीनच !
Deleteआपले लिखाण खूपच छान आहे ।
ReplyDeleteआपला संपर्क कसा होवू शकेल ।
माझा संपर्क
रमेश शिंदे - 9987966666
धन्यवाद ! ८८८८८३८८६३
Deleteखूप छान माहिती भाऊ,,,
ReplyDelete