Sunday, 24 September 2017

वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक द्वितीय - स्त्रियांचा वेदाधिकार

शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त विशेष लेखमाला
वैदिक स्त्री-दर्शन - लेखांक द्वितीय - स्त्रियांचा वेदाधिकार 
मागच्या लेखांत आम्ही वेदांविषयीची आमची भूमिका स्पष्ट केली. आता ह्या लेखांमध्ये एका महत्वाच्या प्रश्नाची उकल करणार आहोत की जी लेखमालेच्या दृष्टीने महत्वाची आहे. ती म्हणजे स्त्रियांचा वेदाधिकार ! जर स्त्रियांना वेदाधिकारच नसेल तर त्यांच्याविषयी वेद काय म्हणतो नि नाही हे पहायची आवश्यकताच काय? पण वेदांचा अधिकार स्त्रियांना आहेच आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच !
सर्वप्रथम प्रश्न येतो तो स्त्रियांच्या वेदाधिकाराचा !
दे॒वा ए॒तस्या॑मवदंत॒ पूर्वे॑ सप्तऋ॒षय॒स्तप॑से॒ ये नि॑षे॒दुः ।
भी॒मा जा॒या ब्रा॑ह्म॒णस्योप॑नीता दु॒र्धां द॑धाति पर॒मे व्यो॑मन् ॥
ऋग्वेद - १०.१०९.४
ह्या मंत्रात स्त्रीस स्पष्टपणे उपनीता अर्थात उपनयन झालेली म्हटलंय. अष्टाध्यायी मध्ये ४.१.४९ येथे स्त्रींस स्पष्टपणे उपाध्यायी, आचार्या म्हटलंय. सिद्धांतकौमुदी स्त्रीप्रकरणामध्ये हा संदर्भ आहे. वेदांचा अभ्यासच नाही तर ती आचार्या कशी काय असु शकते??? त्यामुळे स्त्रियांना वेदाधिकार आहे हे स्वत: वेदभगवान उच्चरवाने उद्घोषून सांगतोय. त्यांना उपनयनाचा व यज्ञाचाही अधिकार आहे. परंतु नंतरच्या काळातले परवर्ती साहित्य जिथे जिथे स्त्रियांना वेदाधिकार नाकारते, तितके ते प्रक्षेपयुक्त असून ते वेदवरुद्ध असल्याने ते अप्रमाण आहे. स्त्रियांना वेदाधिकार आहेच आहे, ह्यात काडीमात्र शंका असायचे कारण नाही. ह्याविषयांवर मी अनेकवेळा भाष्य केलंय. प्रत्यक्ष चार संहितांमध्ये स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारा एकही निषेधात्मक मंत्र कदापि नाही. नाही म्हणजे ना आणि ही ! जे लोक पश्चातच्या परवर्ती ग्रंथांना प्रमाण मानून स्त्रियांना वेदाधिकार नाकारतात, त्या मूर्खांविषयी व स्वमतांधांविषयी इथे संवादच न केलेला बरा. असो.
जर स्त्रियांना वेदाधिकार नसताच तर वेदांवरच्या अनेक सूक्तांवर स्त्रियांची नावे का असती? परमेश्वर जर पक्षपाती असता तर त्याने ही नावे वर ठेवलीच नसती. अनेकांना हा युक्तिवाद वाचून आश्चर्य वाटेल. तेंव्हा ज्यांना वेदांच्या सूक्तांवरची ऋषि व देवतावाचक नावे ह्यांविषयी चिंतन पहायचे असेल त्यांनी आमचा "वेदांतील ऋषि व देवता विवेचन" हा लेख वाचावा ही विनंती. किंवा पंडित भगवद्दत्त वेदालङकार लिखित "ऋषि-देव विवेचन" व ऋषि रहस्य" हे दोन ग्रंथ वाचावेत. पीडीएफ हवे असल्यांस आपणांस पाठवेन.
या दंप॑ती॒ सम॑नसा सुनु॒त आ च॒ धाव॑तः ।
देवा॑सो॒ नित्य॑या॒शिरा॑ ॥
ऋग्वेद - ८.३१.४
ह्या मंत्रामध्ये स्पष्टपणे दंपती असे दोघांचा उल्लेख करून स्त्रींस पतीसमीप बसून यज्ञाचा अधिकार सांगितलाय.
ब्रह्मचर्येण कन्या युवानं विन्दते पतीम् !
अथर्ववेद - ११.५.१८
ह्या मंत्रांत कन्येंस ब्रह्मचर्य पालन करून उत्तम पतींस प्राप्त करण्याचा अधिकार आहे. हे ब्रह्मचर्य म्हणजेच वेदाध्ययन आहे, सर्वशास्त्रांचे अध्ययन ह्या अर्थानेच आहे.
वेदांतले स्त्रियांचे वेदाधिकार देणारे संदर्भ द्यायला आम्ही आरंभ केला की काही पौराणिक मंडळी
म्हणतात की स्त्रियांना यज्ञात पुरुषाच्या समीप बसायचा अधिकार आहे पण वेदमंत्र म्हणायचा नाही.
तर ह्या आक्षेपाचंही निवारण आता करुयांत. हे लोक ह्या निषेधासाठी वेदांतला एखादा मंत्राचा संदर्भ द्या म्हटलं की एकही देत नाही. आजपर्यंत कित्येकांना विचारला, एकानेही निषेधात्मक मंत्र वेदांतून दिलेला नाहीये. स्वमतांधतेसाठी हे लोक ज्या परवर्ती साहित्याचा संदर्भ आपल्या नकारासाठी योजितात आता त्याच परवर्ती साहित्यात स्त्रियांचा वेदाधिकार कसा मान्य केलाय ते पाहुयांत.
गोभिलगृह्यसूत्र २.१.१९
पश्चादग्ने: संवेष्टितङ्कटमेवञ्जातीयं वान्यत् पदा प्रवर्तयन्तीं वाचयेत् - प्र मे पतियान: पपन्था: कल्पतामिति !
अर्थ - इथे 'प्र मे पतियान्" ह्या मंत्राचा तिने पाठ करावा असे स्पष्ट निर्देश आहे.
आता आश्वलायन श्रौतसूत्र - १.११.१
वेदं पत्न्यै प्रदाय वाचयेद्धोताsध्वर्युर्वा वेदोsसि वित्तिरसि !
अर्थ - वेद पत्नींस देऊन होता किंवा अध्वर्युने हा "
वेदोsसि वित्तिरसि.." मंत्र तिच्याकडून वदवून घ्यावा.
आता शौनकाचार्यकृत ऋग्विधान - अध्याय ३, खंड २२
इमामिति जपेत् कन्या नाभिमालस्य नित्यश: !११७!
एवमेव जपेद्भर्ता ततो दीर्घायुषो नु तौ !११८!
कन्येने "इमां त्वमिन्द्रमीढ्व:" ह्या ऋग्वेदातल्या १०.८५.४५ ह्या मंत्राचा नाभींस स्पर्श करून उच्चार करावा व असाच पतीनेही करावा तर निश्चित दोघांसही दीर्घायु प्राप्त होते.
पुढे ह्यातच अध्याय ४, खंड १२, ६३ वा श्लोक
इमामिति त्रिसूक्तेन दशकृत्वो दशावरम् !
सपत्नीं बाधते तेन पतिताश्चातीव मन्यते !
इमाम् हे ऋग्वेदातले सूक्त दहावेळा जपेल तर सवतींस हानी प्राप्त होते व तिचा पती तिचाच जास्ती आदर करतो. (थोडक्यात वशीकरण)
चारीही वर्णाच्या स्त्रियांना वेदाधिकार
ब्राह्मणक्षत्रियविशां शुद्राणां स्त्रीजनेश्वर: !
यथाक्रमेण पुज्यैनां गन्धपुष्पजलाक्षतै: !८२!
कुंकुमालक्तकैर्दीपैर्माषान्नवटकै: शुभै: !
कुसुमैर्वत्सकञ्चापि मन्त्रेणानेन पाण्डव ! ८३!
ओं माता रुद्राणा दुहिता वसूनां स्वसादित्यानाममृतस्य नाभि: !
प्र नु वोचं चिकितषे जनाय मा गामनागामादितिं वधिष्ट" नमो नम: स्वाहा ! ८४!
इत्थं सम्पूज्य गां पृष्ट्वा पश्चात्तां च क्षमापयेत् !८५!
भविष्यपुराण - उ. अ. ६९, श्लोक ८२-८४
अर्थ - ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र ह्यांच्या स्त्रियांनी इथे क्रमश: त्या गायींस गन्धपुष्पजलाक्षतादिंनी पुजन करून कुंक, पुष्पयुक्तदीप, तथा उडदाचे डाळीने (इथे माषान्न शब्दाने उडीद हाच अर्थ अभिप्रेत आहे व तोच अर्थ शास्त्रसंमत आहे) व फुलांनी गोमातेंस "ओं माता रुद्राणां" हा ऋग्वेदांतला मंत्राने पुजा करावी.
ह्यावरून चारीही वर्णांच्या स्त्रियेंस वेदमंत्र म्हणायचा अधिकार सिद्ध होतो हे वेगळं सांगायचे नाही.
जाताजाता एक सांगतो. ह्या उपरोक्त माता रुद्राणां मंत्राचा अतिशय चुकीचा अर्थ पाश्चिमात्यांनी व त्यांचीच री ओढणार्या भारतरत्न काणेंसारख्या विद्वानांनी घेतलाय, ज्याचे खंडण सप्रमाण मी माझ्या "मधुपर्कात गोमांस किवां मांस आहे का" ह्या लेखांत केलंय. जिज्ञासूंनी माझ्या पाखण्ड खण्डिणी नामक ब्लौगवर सविस्तर वाचावा ही विनंती. असो तो वेगळा विषय तरीपण सांगितला.
कलिवर्ज्य प्रकरण नावाचे थोतांड
स्त्रियांना वेदाधिकार नाकारणारे आजचे स्वयंघोषित मंडळी ज्या कलिवर्ज्य प्रकरण नामक थोतांड प्रकरणाचा संदर्भ नकारासाठी देतात, की ज्यांत कलियुगांत स्त्रियांना वेदाधिकार अकारण नाकारला आहे, त्याची समीक्षा खरंतर स्वतंत्रपणे करावी लागेल. पण एकाच वाक्यांत सांगायचे झाले तर मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे
धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुती: !
धर्मजिज्ञासेंत मनुष्यांस श्रुती अर्थात वेदच प्रमाण आहे, आणि हे वेद म्हणजे काय हे आम्ही प्रथम लेखांकात स्पष्ट केलंच आहे. तरीही ह्याच मनुस्मृतीत म्हटल्याप्रमाणे
या वेदबाह्या: स्मृतय: याश्च काश्च कुदृष्टय: !
सर्वास्ता निष्फला: प्रेत्य तमोनिष्ठास्तु ता: स्मृता: !
१२.९५
जे वेदबाह्य स्मृत्या आहेत, त्या त्याज्य आहेत कारण त्या कुदृष्टीने आल्यामुळे हे स्पष्ट म्हटलंय. ह्यावरूनच वेदांच्या विरोधात जाणारे कोणतेही वचन, मग भले ते कोणत्याही प्रकांड विद्वानांचे किंवा महाराजांचे असो, ते त्याज्य असल्याचे प्रमाण आहे हे. त्यामुळेच हे कलिवर्ज्य प्रकरण मागच्या काही शतकांतले असल्याने व त्यातही ते वेदविरुद्ध असल्याने ते त्याज्यच आहे.
वेदमंत्रांनी स्त्रियांच्या गर्भावर परिणाम होतो म्हणून नकार????
वेदाधिकार मान्य करणारे पण तरीही नकार देणारे काही लोक असा तर्क करतात की वेदमंत्रांनी अंगात उष्णता होते. त्याने स्त्रियांच्या गर्भावर परिणाम होतो म्हणून स्त्रियांनी वेदमंत्र म्हणु नये.
अशा लोकांना आम्ही विचारु इच्छितो की एवढीच स्त्रियांच्या कल्याणाची चिंता आपण वहात असाल तर मग वेदकाळात स्त्रिया वेदाध्ययन कशा काय करत होत्या? त्यांना गर्भ नव्हते का? त्यांना काय विशेष अधिकार प्राप्त होत्या का???
त्या स्त्रिया नि आजच्या कलियुगांतल्या स्त्रिया ह्यांत काय शरीरभेद आहे का??? असे कुठल्या ग्रंथात लिहिलंय की त्याकाळच्या स्त्रियांमध्ये व आजच्या कलियुगांतल्या स्त्रियांमध्ये शरीरभेद आहे म्हणून???
मंत्रांचे सामर्थ्य मीही जाणतो व अनुभवतो. ते नाकारायचा आमचा प्रश्नच नाही नि हेतुही नाही. पण म्हणून अकारण आपल्या स्वमतांधतेपोटी हा अप्पलपोटेपणा दर्शवणे शहाणपणाचे लक्षण आहे का???
मी स्पष्टवक्ता आहे, ज्यांना राग येतो त्यांनी माझे लेख वाचु नयेत. शाप दिलेत तरी चालतील. वेदांची सेवा ह्यापेक्षा श्रेष्ठ माझ्यादृष्टीने ह्या जगांत काहीच नाही. कुमारिल भट्टांच्या भाषेत
यदि वेदा: प्रमाणं स्यु: जीवेयम् !
वेदांचा अधिकार स्त्रियांलाच काय सर्व मानवजातीलाच आहे.
यथेमां वाचं कल्याणीमावदानि जनेभ्य: !
ब्रह्मराजन्याभ्यां शुद्राय चार्याय च स्वाय चारणाय !
यजुर्वेद - २६.२
ह्या मंत्रांत वेदाधिकार सर्वांस सिद्ध आहे.
ज्याला साक्षात् ईश्वराची वाणी म्हणायची त्यांस केवळ कुणा विशिष्ट समुहांपूरते मर्यादित ठेवायचे हे किती शहाणपणाचे लक्षण? ह्यावरून आपण त्या परमात्म्यांसच दूषण लावतो आहेत हे का कळत नाही??? अर्थात आजकाल कुणीही कुणाला वेदाधिकार नाकारत नाही. काही अपवाद वगळता सर्वत्र सर्वांना वेदाधिकार आहे. हे अपवाद अर्थातच त्याज्य आहेत.
वेदोद्धारक महर्षि दयानंद सरस्वतींनी तर १५० वर्षांपूर्वीच अखिल मानवजातींस वेदाधिकार आहे हे वेदमंत्रांचे अनेकानेक स्पष्ट संदर्भ देऊन त्यांच्या अजरामर "सत्यार्थ प्रकाश" नामक ग्रंथात सिद्ध केलंय. तेंव्हापासून आर्य समाज अखिल मानवजातींस वेदाधिकार प्रदान करत आहे. तेंव्हा आजकाल ब्राह्मण लोक आम्हांला वेद शिकवित नाहीत असे बोंबलणार्यांनी कृपया इकडे लक्ष द्यावे. आर्य समाजच नव्हे तर इतरही अनेक ठिकाणी वेदाध्ययन सर्वांसाठी असलेले आम्ही स्वत: पाहुन आलोय. ज्यांना जिज्ञासा असेल त्यांनी शोध घ्यावा.
विस्तारभायस्तव इथेच स्त्रियांचा वेदाधिकार हा महत्वाचा विषय संपवून लेखणींस विराम देतो. पुढील लेखांत सविस्तर वैदिक स्त्रीदर्शन प्रत्येक वेदांनुसार घडविले जाईल. ज्यांना शंका असतील त्यांनी अवश्य विचाराव्यांत.
भवदीय,
©तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

No comments:

Post a Comment