Monday, 29 May 2017

यज्ञोपवीत (जानवे) - एक चिंतन




आर्य सनातन वैदिक हिंदु धर्मात यज्ञोपवीत अर्थात जानव्याला व डोक्यावरच्या सहस्त्रारचक्राच्या ठिकाणच्या शीखेला अतीव महत्व आहे. परमादरणीय श्री भिडे गुरुजींनी जो रायगडी सुवर्ण सिंहासनाचा संकल्प धारण करण्याविषयी चार जुनला येण्यासाठी आम्हा सर्व धारकर्यांना जी आज्ञा दिली आहे, तदनुसार गडावर तत्प्रसंगी सर्वांस यज्ञोपवीत धारण करण्यांस आम्ही सिद्ध आहोत. म्हणूनच आम्हा सर्व धारकरी बंधुंस त्याविषयीच्या स्पष्टतेचा व भ्रमांचा निराकरण करणारा एक लेख आमचे धारकरी बंधु योगेशजी देशपांडेंनी काही सप्ताहापूर्वीच लिहिला. इतर अभ्यासु बंधु धारकर्यांनीही वेळोवेळी त्यावर लिहिलंय. पण त्यावर त्यात शास्त्रीय प्रमाणांसहित थोडं स्पष्टीकरण द्यावे वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच! पुण्यश्लोक श्रीशिवप्रभूंनी राज्याभिषेकसमयी उपनयन होतांच यज्ञोपवीत धारण करण्याचा व आग्र्याहून सुटकेसमयी धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजेंस उपनयन संस्कार केल्याचा उल्लेख सर्वश्रुत आहेच.

स्वराज्यसंकल्पक परमादरणीय श्री. शहाजी महाराजांच्या चरित्रातले उल्लेख

जयराम पिंडे नावाच्या समकालीन राजप्रासादातल्या (दरबारातल्याच) लेखकाने "राधामाधवविलासचम्पु"  नावाच्या अप्रतीम ग्रंथामध्ये शहाजी महाराजांची दिनचर्या दिलीय. त्यात वेदमंत्रांच्या पठनाने त्यांची पहाट होत असे लिहिलेय. जिज्ञासूंनी तो ग्रंथ मुळातून वाचावा ही विनंती!

पृष्ठ क्रमांक ३४-३५ - दिनचर्या
(सोबत पाने जोडली आहेत)

शहाजी महाराज अस्खलित संस्कृत मधून संवाद करीत व संस्कृत कोडी टाकत व ती पूर्ण करणार्यांस पारितोषिक देऊन सन्मान करत. प्रश्नांची कवींना उत्तरे द्यायला सांगत.

बजाजी निंबाळकरांच्या शुद्धीकरणाचा इतिहास हा सर्वश्रुत आहे कारण शुद्धीकरण करताना जो यज्ञ करतात त्यात गळ्यात यज्ञोपवीत घालणं आवश्यक आहे. कोणताही यज्ञ करताना ते घालावंच लागतं. कारण यज्ञोपवीताशिवाय यज्ञ करता येत नाही.

शंभुराजेंनी सुद्धा एका कुलकर्ण्याचे शुद्धीकरण केल्याचा इतिहास आहे.
लग्न करताना सुद्धा अनेक जण यज्ञोपवीत घालतात. आणि हे सर्व जातींमध्ये आहे.

नुकताच माझ्याच घरासमीप श्रीसंत नामदेव मंदीरातच पंढरपूरात कालच म्हणजे २८ मेला एक श्रीविश्वकर्मा त्वष्टापांचाळ समाज, पंढरपूर ह्यांचा सामुदायिक उपनयन सोहळा संपन्न झाला. चाळीस ते पन्नास जणांना मी स्वत: त्या कार्यक्रमात पाहिलंय. संध्याकाळी मोटी शोभायात्रा निघाली होती. पंढरपूरात ये ऊन खात्री करून घ्यावी. हे पांचाल समाजाचे आहेत. (सोबत चित्र जोडलं आहे)


महाराष्ट्र राज्य सरकारने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास - मराठा कालखंड - भाग १" - शिव काल (इ.स. १६३० ते १७०७) ह्या ग्रंथात

धार्मिक चालीरीती व परंपरा ह्या शीर्षकाखाली स्पष्ट लिहिलं आहे की त्या काळात सर्व जातीत ६ संस्कार केले जात. प्रमुख म्हणजे मौंजीबंधन (मुंज ), विवाह, गर्भाधान व अन्य संस्कार!

पृष्ठ क्रमांक ६१६
(सोबत चित्र जोडलं आहे)

ह्या ग्रंथाची ओनलाईन पीडीएफ www.msblc.Maharashtra.gov.inवर मिळेल.


आता आधुनिक इतिहास पाहुयांत

डॉ. आंबेडकरांनी ६,००० अनुयायांस वाटलेली यत्रोपवीतं !
( सोबत सर्व चित्रे जोडली आहेत. )

धनंजय कीर लिखित आंबेडकर चरित्रात पृष्ठ क्रमांक १४८ वर आंबेडकरांनी जानवी वाटल्याचा उल्लेख आह तो खालीलप्रमाणे.

"परिषदेच्या कार्याचा समारोप करतेवेळी प्रतिनिधींना यज्ञोपवीते वाहण्यात आली. आंबेडकरांचे ब्राह्मण सहकारी देवराव नाईक ह्यांनी पौरोहित्य स्वीकारून सहा सहस्त्र प्रतिनिधींचा वेदमंत्रांच्या गजरात हा समारंभ पार पाडला."

पुढे आंबेडकर गोलमेज परिषदेसाठी लंडनला ४ ओक्टोबर, १९३० साली "व्हॉईसरॉय ओफ इंडिया" ह्या बोटीने निघायच्या आधी आपले वरील ब्राह्मण मित्र देवराव नाईकांविषयी ते म्हणतात

"देवराव नाईक हे आपले उजवे हात असुन ते आपल्या(माझ्या) अनुपस्थितीत चळवळीला मार्गदर्शन करतील. "
ह्याच नाईकांवर पुढे त्यांनी "बहिष्कृत भारत" ह्या आपल्या मुखपत्राची जबाबादारी सोपवून संपादक पद दिले.

थोडक्यात त्यावेळी त्यावर कुणीही आक्षेप घेतला नाही. पण ३ जुनच्या प्रतिष्ठानच्या सिंहासन संकल्पांस व जानवी धारणांस मात्र काही द्वेष्टे लोक विरोध करताहेत. अर्थात अशा मुर्खांकडे कोण लक्ष द्यावे?

सावरकरांनीही जानवे वाटप केल्याचे उदाहरण

बाळाराव सावरकर लिखित रत्नागिरी पर्वातही सावरकरांनी अनेक ब्राह्मणेतर लोकांना गायत्री मंत्र, गीता, स्तोत्र शिकविल्याचे अनेक उल्लेख आहेत. वैश्य बंधुंचा वैदिक पद्धतीनेच उपनयनाचाही उल्लेख आहे. अनेक तथाकथित पृर्वास्पृश्य अशा आमच्या महार बंधुंस सावरकरांनी सर्वाधिकार दिल्याचे प्रसंग जागोजागी आढळतील. ह्या रत्नागिरीच्या स्थाबद्धतेत त्यांनी केलेली सामाजिक क्रांती ही केवळ अवर्णनीय व विलक्षण आहे. महत्वाचे म्हणजे आंबेडकर-सावरकर भेटीही ह्यावेळीच झाल्या आहेत. जिज्ञासूंनी हा ग्रंथ वाचावा. असो.

एका महत्वाच्या आक्षेपाला उत्तर

ब्राह्मणांनी आम्हाला जो अधिकार नाकारला तो आता का देताहेत????

ह्या आक्षेपांला पुरावा तर काहीच नाही. उलट आता अधिकार दिला नाही म्हणून बोंबलणारे तो आता देताहेत तर विरोध करताहेत. वाह रे वाह !

आता डॉ. आंबेडकर अधिकार नकार ह्याबाबतीत काय म्हणताहेत ते आपण पाहुयांत.

‘‘जहां तक उपनयन संस्कार और यज्ञोपवीत धारण करने का प्रश्न है, इस बात का कहीं कोई प्रमाण नहीं मिलता कि यह शूद्रों के लिए वर्जित था। बल्कि ‘संस्कार गणपति’ में इस बात का स्पष्ट प्रावधान है और कहा गया है कि शूद्र उपनयन के अधिकारी हैं।’’
(समग्र आंबेडकर हिंदी वांग्मय - खंड ७, पृष्ठ क्रमांक ३२५-३२६ - भारत सरकार)

म्हणजे उपनयन सर्वांना होतं हे स्वत: बाबासाहेबच म्हणताहेत. आता किती विरोध करणार????


बरं ही काही पहिली वेळ नाही प्रतिष्ठानने जानवी वाटायची!

धारकर्यांना माहिती असेल की ह्याआधीही अनेकवेळा आदरणीय गुरुजींनी सर्वांस जानवी धारण करण्यांस सांगितले आहे. थोडक्यात रायगडावरच्या यज्ञोपवीत धारणाला विरोध करणार्यांना व त्यातही अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर किंवा वैदिक-अवैदिक वाद शोधु पहाणार्यांना आमच्या धारकरी बंधुंनी दुर्लक्षित करावे. आपलं काम आपण करावे ही विनंती ! त्यांना आता काही काम नसल्याने केवळ विरोधाला विरोध करायचे काम शेष आहे. दुर्लक्षावे ही विनंती!

आता धर्मशास्त्रीय मुळ संदर्भ पाहुयांत!

आमच्या हिंदुधर्मांतल्या १६ संस्कारांचे मुळ हे वेदांमध्ये आहे. त्यामध्ये जो दहावा असा उपनयन संस्कार आहे, त्यात प्रत्येकांस यज्ञोपवीत धारण करण्याचा अधिकार आहे. विशेषत: डोक्यावर शिखा (शेंडी) व गळ्यात यज्ञोपवीत (जानवे) ह्याचा आधार वैदिक आहे तो निम्नलिखित

शिखिभ्य: स्वाहा  !
अथर्ववेद - १९.२२.२५

इथे शिखा हा शब्द स्पष्टपणे आलाय..

उपवीतिने पुष्टानां पतये नम:!
यजुर्वेद - १६.१७

इथे उपवीत म्हणजेच यज्ञोपवीत धारण करणार्या पतींचा सन्मान करा अशी आज्ञा आहे.

अथर्ववेदाचे ब्रह्मचर्य सूक्त ११ वे कांड, ५ वा अध्याय हा स्पष्टपणे उपनयनाचे व यज्ञोपवीताचा उल्लेख करतो. म्हणूनच वेदांवरचे सर्वश्रेष्ठ भाष्यकार महर्षि दयानंद

"यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापतेर्यत् सहजं पुरस्तात् !
आयुष्यमग्र्यं प्रतिमुञच् शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेज:!
पारस्कर गृह्यसूत्र - २.२.१०
वैखानस व बौधायन गृह्यसुत्र सुद्धा !

हा संदर्भ देतात सत्यार्थ प्रकाश मध्ये.

यज्ञोपवीताची वैज्ञानिक कारणमीमांसा

यज्ञोपवीत का आवश्यक ह्याची वैज्ञानिक कारणमीमांसा उपरोक्त श्लोकात आहे. तिथे पुरस्तात् असा शब्द आहे ज्याचा अर्थ हे यज्ञोपवीत आधीपासूनच आहे असा होतो. आता आधीपासून म्हणजे कधी?

तर मातेच्या गर्भापासून!

 तिथे आपल्या शरीराचे भरणपोषण ज्या जोडलेल्या नाळीने होते, जी आपल्या नाभींस जोडलेली असते, त्याचे चित्र जर आपण पाहिले तर तेही आपल्या यज्ञोपवीताप्रमाणेच दिसते. (सोबत गर्भस्थ शिशुचे चित्र जोडले आहे.) थोडक्यात ज्याप्रमाणे मातेच्या गर्भात तिची नाळ आपले पोषण व रक्षण करते तद्वतच उपनयनानंतर आपले गुरु आपणांस ते यज्ञोपवीत घालून आपले रक्षण करतात असा भावार्थ आहे. ही झाली वैज्ञानिक कारणमीमांसा! बाकी यज्ञोपवीताचे शारीरिक लाभ तर आहेतच. मनुस्मृतीतही हा उल्लेख आहे पहा



मातुरग्रेsधिजनं द्वितीयं मौञजीबन्धने!  तृतीय यज्ञदीक्षायाम् !
२.१६९

म्हणजे आधी आईच्या गर्भात, दुसरे उपनयनावेळी व तिसरे यज्ञाच्या दीक्षेवेळी.

आयुर्वेदांत आयुष्यवर्धक अमृता नाडी म्हटलंय यज्ञोपवीताला !

जर गर्भातली ती नाळ तुटली तर जसे आपण जीवित नाही राहु शकणार तद्वतच यज्ञोपवीताचे आहे. म्हणूनच आयुर्वेदांत त्याचा असा गौरव आहे. असेच यज्ञोपवीत व शिखेचे उल्लेख गृह्यसुत्रादि धर्मग्रंथांमध्ये व नंतरच्या सर्व परवर्ती साहित्यातही आढळतात.विस्तारभयास्तव ते इथे देत नाही.

यज्ञोपवीतांस परमपवित्र समजलं जायचं कारण वेदाध्ययन, यज्ञाधिकार ह्या सर्वांस तो संस्कार आवश्यक असल्याने त्यांस विद्यासुत्र, यज्ञसूत्र, ब्रह्मसूत्र अथवा सावित्रीसूत्र अशी नावे आहेत. यज्ञोपवीत उपनयनाचा आत्मा असल्याने सर्व हिंदुंना तो अधिकार आहे. सर्व म्हणजे सर्व. हे आम्ही पूर्ण अभ्यासाअंती लिहितोय. असो.

वेदांचा अधिकार सर्वांस आहे व त्यासाठी यज्ञोपवीत आवश्यक आहे.

आता काही जण विचारतील की आदरणीय गुरुजी तिथे काय वेदाध्ययन करणार आहेत का?  तर तसे नाही. मी केवळ मुळ संदर्भ द्यावा म्हणून लिहिलंय. त्यामुळे सर्व धारकर्यांनी ते आणायलाच हवं. तिथे आपण बत्तीस मण सुवर्ण सिंहासनाचा पवित्र सत्यसंकल्प घ्यायचा असल्याने त्या यज्ञोपवीताच्या साक्षीने तो घ्यायचा आहे. म्हणूनच हा लेखनप्रपंच!

स्त्रियांना सुद्धा यज्ञोपवीताचा अधिकार

वाल्मीकि रामायणात सीतेने यज्ञोपवीत धारण केल्याचा, संध्या केल्याचा व मेघनाथाने युद्धात माया निर्माण करण्यासाठी सीतेची प्रतिकृती निर्माण करून तिचे यज्ञोपवीत कापल्याचे उदाहरण आहे. म्हणजे सीता यज्ञोपवीत धारण करत होती. संदर्भ

यज्ञोपवीतमाधुय भिन्नता तेन तपस्विनी
युद्धकांड - ६२.३१

 तिची सासु कौसल्याही यज्ञ केल्याचा उल्लेख आहेच. वालीची पत्नी तारा देखील मंत्रविद् होती असे म्हटलंय. (किष्किन्धा कांड - १६.१२) महाभारतात कुंती स्वत: यज्ञ करत होती. (वनपर्व २८९-२०)

जर स्त्रिया धारण करत होत्या तर आपणांस काय धाड भरली आहे???

यज्ञोपवीत ९६ पेरांचेच का?

कारण प्रकृती ही ९६ तत्वांनी बनलेली आहे व आपण त्या प्रकृतीने बाध्य आहोत ही भावना रहावी म्हणून. दुसरे महत्वाचे कारण असे की मानवी आयुष्य शंभर वर्षांचे कमीतकमी मानलेलं आहे व चौथ्या वर्षानंतर मुंज केल्यांस आयुष्यांत ९६ वर्षे शेष राहतात म्हणूनही हा संदर्भ आहे.

ते डाव्याबाजूवरून उजव्या बाजुंसच उतरते का घालायचे?

वामांसदक्षकट्यन्तं ब्रह्मसूत्रं तु सव्यत: !
अन्तर्बहिरिवात्रयर्थं तत्वतन्तुसमन्वितम्!
परब्रह्मोपनिषद - १०

ह्याचे कारण हेच आहे की ह्यात तीन अवयवांचा प्रामुख्याने समावेश येतो. एक ह्रदय, द्वितीय आपली नाभी व तिसरे उजवा हाताचा मुठ. आपले ह्रदय हे डाव्या बाजुंस असून ते जानवे नाभीपर्यंत येत असल्याने त्याची जाणीव ह्रदय म्हणून श्रद्धा, नाभी म्हणून सामर्थ्य किंवा वीर्य ह्या अध्यात्मिक अर्थाने आपणांस ज्ञात राहावी हा हेतु असतो. उजवा हात हा पुरुषार्थाचा प्रतीक आहे ह्याचे प्रमाण अथर्ववेदांत आहे

कृतं मे दक्षिणे हस्ते जियो मे सव्य आहित: !
७.५०.८

खरंतर विस्तारभयास्तव जानव्याच्या अर्थाविषयी जास्ती स्पष्टीकरण देऊ शकत नाही. क्षमस्व !

हा झाला धर्मशास्त्रीय इतिहास.


अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु!!!


भवदीय,

©तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

4 comments:

  1. श्री.चिंचणीकर यांस, आपला यज्ञोपवीत (जानवे) - एक चिंतन हा लेख उत्तम आहे. आपले अन्य लेखही वाचण्याची उत्सुकता आहे. पूर्वी आपल्या धर्मामध्ये जातींचे स्वरूप आजच्या सारखे नव्हते. एक व्यवसाय,कार्य,कर्म करणारे समूह एकत्र राहत. उदा.सुतारकाम करणाऱ्या व्यक्ती जर एकत्र समूहाने राहिल्या तर सुतारकामाची हत्यारे,लाकडे,कच्चा माल,तंत्रज्ञान याची देवाणघेवाण सोपी होई. पण कुणालाही कुठलाही व्यवसाय करायला बंदी नव्हती. आपले शेकडो ऋषी हे जन्माने ब्राह्मण नव्हते. त्यांनी १२ / १२ वर्षे तप करून म्हणजे ज्ञानसाधना करून हजारो उत्तमोत्तम ग्रंथ लिहिले. मौंजीबंधन करून यज्ञोपवीत धारण करणे ही त्या काळातील CET होती असे म्हणावे लागेल. नंतरच्या मोगल आणि ब्रिटीश - पोर्तुगीज राजवटींनी आणि त्यांना सामील आपल्या मंडळींनी नसलेल्या जातींच्या भिंती अभेद्य केल्या.त्यामुळे त्यांना आपल्या धर्माला बदनाम करणे, आपल्याला फोडणे आणि राज्य करणे सोपे झाले. आपले लेख, आपल्या नाव तपशिलासह शेअर केले, पुढे पाठविले तर चालतील का? --- मकरंद करंदीकर.

    ReplyDelete
    Replies
    1. यथार्थ चिंतन मकरंदजी ! सहमत पूर्ण ! आणि धन्यवाद प्रतिसादासाठी ! माझे लेख कुठही प्रसृत केले तरी मला काहीही हरकत नाही ! अवश्य करा. बिनधास्त ! मला नावाची अभिलाषा नाही !

      Delete
  2. आदरणीय मान्यवर, पंढरपूर येथे 28 मे ला विश्वकर्मा त्वस्टl पांचाळ समाजाचा सामुदायिक उपनयन सोहळा पार पडल्याचे नमूद केले आहे, मात्र पांचाळ समाज हा मुळचा ब्राम्हण समाजच आहे, केवळ सुवर्ण, कांस्य, लोह , ताम्र, पाषाण शिल्प आणि लाकडी कोरीव शिल्प यावरून सोनार सुतार लोहार कासार आणि शिल्पी असे म्हटले जाऊ लागले, त्या काळात हा समाज ही सर्व पाचही वेगवेगळ्या प्रकारची कला फक्त धार्मिक कार्यासाठी अनुसरत असत, इतर वर्णात असलेल्या परंतु हाच व्यवसाय करणाऱ्या जातीना धार्मिक कार्यात भाग घेता येत नसे, हजारो वर्षांच्या घडामोडी त मुळ वैदिक परंपरा आणि पौरोहित्य विसरून फक्त व्यवसाय मध्ये हा समाज मग्न राहिले. त्यामुळे पांचाळ समाज हा मूळ ब्राम्हण असलेला समाज व्यवसायावरून जातीनिहाय ओळखू लागला, त्या नंतर जात लावली तरच आरक्षण मिळते, विश्वब्राम्हण लावल्यास आरक्षण मिळत नाही, त्या मुळे व्यवसायावरून जात लावल्या स संभ्रम होतो. संपुर्ण भारतभर विशेषतः दक्षिण भारतात समाज अजूनही वैदीक परंपरा संस्कृती टिकवून आहे, या समाजातील शिल्पी लोकांचे तर पुरातन काळापासून वेरूळ येथील लेण्या असो भारतातील प्राचीन शिल्पकला भव्य मंदिरे असो त्या मध्ये फक्त यांचे योगदान आहे, ब्राम्हणोत्पत्ती मार्तंड या ग्रँथात या विश्वब्राम्हण समाज बद्दल माहिती दिली आहे. षटकर्म करण्याचा अधिकार असून गोत्र, सूत्र आणि प्रवर आहेत. पांचाळ तील पाच शाखेतील प्रमाणे चार वेद आणि पाचवा सुक्ष्मवेद देखील धार्मिक कार्यात अवलंबिला जातो

    ReplyDelete
    Replies
    1. जी मान्य आहे. पण आपण शेवटी जो पांचवा सुक्ष्म वेद नावाचा उल्लेख केला आहे तो मात्र खटकणारा आहे. असा कोणताही सुक्ष्म वेद नाहीये. पण तरीही हा भ्रम का प्रसृत होतो ते कळंत नाही. असो...आपणांस तो सुक्ष्म वेद कुठून माहिती झाला ते सांगावे.

      Delete