Wednesday, 10 May 2017

भगवान बुद्ध आणि वेद





गेली दीडशे वर्षे हे सांगण्यात येतंय की भगवान बुद्धाने एक नवीन धर्म स्थापन केला व त्यांनी मुळच्या वैदिक धर्माच्या विरोधात बंड उभारले. ज्यांचा वेदांचा तर राहुदेत पण बुद्धसाहित्याचाही अभ्यास आहे असे अभ्यासु लोकही असा बालिश तर्क करतात हे पाहून आश्चर्य वाटतं. ज्यांचा काहीच अभ्यास नाही त्या विषयी काय बोलावं ???? मुळात तत्कालीन इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की बुद्धांनी नवीन काहीच सांगितले नाही. जैनादि-बौद्ध पंथ हे केवळ वैदिक धर्मातल्या महाभारतकालानंतरच्या काही निर्माण झालेल्या अवैदिक प्रथांना विरोध करण्यासाठी निर्माण झालेले प्रतिक्रियात्मकच आहेत असे स्पष्ट लक्षात येते. पण ना वेदांचा अभ्यास ना बौद्ध साहित्याचा!  केवळ पाश्चिमात्यांच्या लिखाणावर आपली मते बनवायची ही सांप्रतकालची विद्वत्तेची कसोटी आहे की काय असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही.  म्हणूनच सत्य काय आहे हे सिद्ध करण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच!


बुद्धाने हिंदु धर्म सोडून मी नवीन धर्म संस्थापत आहे असं एकही वाक्य मला कुठेही आढळलं नाही. तो मुळात जन्माने हिंदुच होता व मेलाही हिंदुच म्हणूनच की काय राहुल सांस्कृत्यायन ह्या बौद्ध पंडिताने देखील असं स्पष्ट म्हटलं की बौद्ध श्रमण व ब्राह्मण हे एकत्र राहत व त्यांना दोघांना जर कोणती उपाधी द्यायची तर ती फक्त आणि फक्त हिंदुच असेल. ह्याबबातीत राष्ट्रपती व एक विद्वान डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णनांचं एक वाक्य फार महत्वाचे आहे. ते त्यांच्या भारत सरकारनेच प्रकाशित केलेल्या बुद्धधर्मावरच्या २५०० वर्षाच्या इतिहासकथन करणार्या एका ग्रंथात म्हणतात

बुद्धाने कोणताही नवा धर्म संस्थापिला नाही ! तो हिंदुच म्हणून जगला व महा निर्वाण करता झाला.

भारत सरकारने प्रकाशित केलेला हा ग्रंथ 👇

Buddha did not feel that he was announcing a new religion. He was born, grew up and died up a Hindu. He was restating with a new emphasis the ancient ideals of Indo-aryan civilization.

 अर्थ - बुद्धाला आपण नवा धर्म संस्थापित आहोत असं कुठेही वाटलं नाही. तो हिंदु म्हणूनच जन्माला आला, वाढला व मेलाही हिंदु म्हणूनच. त्याने इण्डो-आर्यन संस्कृतीची प्राचीन तत्वे नव्या उत्साहात पुनरुज्जीवित केली.

Dr Radhakrishnan in his Foreward to "2500 years of Buddhism", page no.68
Govt. Of India, Publication Division

ह्याचा अर्थ काय? स्पष्ट आहे.

आता काहीजण आक्षेप घेतील तर आम्ही एकच प्रश्न विचारतो की त्यांनी बुद्धाने नवीन धर्म संस्थापिल्याचे एकतरी वाक्य आणून दाखवावं.

बुद्धाला वेदद्वेष्टा ठरविणार्यांनी खालील बुद्धाचेच वेदस्तुतीचे संदर्भ पहावेत


सम समानाय वतानि जन्तु उच्चावच्च गच्छति सन्नसत्तो !
विद्वा च वेदेहि समेच्च धम्मं न उच्चावच्चं गच्छति भूरिपँजो !
सुत्तनिपात - २६२

अर्थ - इंद्रियाधीन होऊन आपल्या इच्छेने काही कर्म किंवा तप करून लोक उच्च नीच अवस्थेला प्राप्त होतात. पण जो विद्वान वेदांचा आश्रय घेऊन धर्मज्ञान प्राप्त करतो, त्याची अवनती कधीच होत नाही.

थोडक्यात धर्माचे ज्ञान हे फक्त वेदांनीच होतं हे ते स्पष्ट सांगतो. ही त्याची वेदनिष्ठा नव्हे काय???

एव पि यो वेदगु भावितत्तो बहुस्सुतो होति अवेध धम्मो !
सो खो परे निँझपये पजाना, सोतो वधानूपनिसूपपन्नो !
सुत्तनिपात ३२२

अर्थ- ज्याने वेद जाणले आहेत, ज्याने स्वत:ला स्थिर ठेवलं आहे, जो बहुश्रुत आहे व ज्याने वेदांना सत्यप्रकारे जाणलं आहे, तो स्वत: ज्ञानी बनून इतरांना जे ज्ञानाचे अधिकारी आहेत, त्यांना ज्ञान देऊ शकतो.


इथेही पुन्हा वेदज्ञानीच सर्वज्ञानी आहे असा पुनरुच्चार केलाय.

यो वेदगू ज्ञानरतो सतीमा, संबोधिपत्तो सरणं बहूनाम् !
कालेन तम्हि हव्येन पवेच्छे, यो ब्राह्मणो पुँजपेक्खो यजेय !
सुत्तनिपात - ५०३

अर्थ - जो वेदांना जाणणारा(वेदगू), ध्यानपरायण, उत्तमस्मृती असलेला(सतीमा), जो अनेकांना शरण देणारा आहे, जो पुण्य अर्जित करणारा यज्ञ करतो, त्यालाच भोजन द्या !


इथे देखील खर्या वेदज्ञ मनुष्याबद्दल आदर आहे.
आता वेदज्ञ ब्राह्मणाची केलेली प्रशंसा पाहुयात.

यं ब्राह्मणं वेदगुं अाभिजन्ना, अकिचनं कामभावे असत्तं !
अद्धा हि सो ओघमिम अतारि, तिण्यो च पारं अखिलो अकखो !
सुत्तनिपात - १०५६

अर्थ - ज्याने त्या वेदज्ञ ब्राह्मणाला जाणलं की जो अकिंचन म्हणजे धनहीन आहे, कामहीन आहे, तो आसक्तीरहित असा ह्या संसारातून नक्कीच तारला जातो.

थोडक्यात वेद जाणणाराच संसारसागरातून पर होतो.

विद्वा च सो वेदगु नरोइव, भवाभवे संग इम विसज्जा !
सो विततण्णो अनिघो निरासो अतारि सो जाति जरांति ब्रूमीति !
सुत्तनिपात - १०६०

अर्थ - वेदांना जाणणारा विद्वान (वेदगु) ह्या संसारात जन्म किंवा मृत्युमध्ये आसक्ति सोडून, तृष्णा व पापरहित होऊन, जन्म व वृद्धावस्था रहित होतो, असं मी (बुद्ध) म्हणतो.

थोडक्यात पुन्हा इथे वेदज्ञानी मनुष्याचे कौतुक केलं असून तो पापरहित होऊन मुक्ती प्राप्त करतो हे स्वत: बुद्धच सांगतोय.

ब्रूमीति म्हणजे मी म्हणतो असा अर्थ आहे ! मी म्हणजे बुद्ध स्वत: !

ने वेदगु दिठ्ठिया न मुतिया स मानमेति नहि तन्मयोसो !
न कम्मुना नापि श्रुतेन नेय अनुपनीत: न निविशनेषु !

अर्थ - वेदांना जाणणारा कधीही सांसारिक दृष्टी व असत्यविचाराने कधी अंहकारास प्राप्त होत नाही. केवळ कर्म नि श्रवणाने तो कधीही प्रेरित होत नाही.


बुद्धाने जी काही निंदा केलीय ती खोट्या वैदिकांची ! सत्य जाणणार्या वैदिकांची नव्हे ! जे स्वत:ला वैदिक म्हणवितात परंतु वेदांचा अर्थच जाणत नाही, त्यांची निंदा केलीय. अर्थात अशी निंदा निरुक्तकार यास्काचार्यांनी पण केलीय. पण म्हणून त्यांना कुणी वेदनिंदक म्हणतं काय???तसंच हे बुद्धाचे आहे.

संस्कृतमध्ये एक श्लोक आहे

यथा खरश्चंदनभारवाही न तु वेत्ति तत्वत: !

म्हणजे चंदनाचा भार वाहणार्या गाढवाला त्याचं ज्ञान असतं का? नाही ! कारण त्याच्यासाठी ते फक्त ओझंच असतं.

तसंच वेद नुसते पाठ करणारे पण त्याचा अर्थ न जाणणार्यांबद्दल व त्यानुसार आचरण न करणार्यांबद्दल बुद्धाने म्हटलंय. ह्याचा अर्थ वेदपठण करणारे गाढव आहेत असे नसून त्यांनी अर्थही जाणावा अशी अपेक्षा असते. आता ह्यावरून बुद्धाला वेदनिंदक म्हणणे हे वदतो व्याघाताचे उदाहरण होणार नाही काय???


मी ब्राह्मणच आहे - इति बुद्ध

एक कथा पाहणं आवश्यक आहे

सुंदरिक भारद्वाज सुत्ता मध्ये कथा येते की सुंदरिक ब्राह्मणाने जेंव्हा यज्ञ समाप्त केला, तेंव्हा त्या यज्ञाचा शेषभाग तो एका ब्राह्मणाला देऊ इच्छित होता. त्याने संन्यासी गौतमाला पाहिलं व त्याची ज्ञाती (जात) विचारली. तेंव्हा बुद्ध म्हणाला

"जात विचारु नये. मी ब्राह्मणच आहे."

 तो पुढे म्हणतो

यदन्तगू वेदगु यन्नकाले, यस्साहूति लभे तरस इज्जेति ब्रूमि
सुत्तनिपात ४५८

अर्थ - वेदांना जाणणारा (वेदगु) ज्याच्या आहूतीस प्राप्त करतो, त्याचा यज्ञ सफल होतो, असं मी म्हणतो.

पुढे सुंदरिक भारद्वाज म्हणतो की,

"माझा यज्ञ आज सफल झाला कारण आपल्यासारखा वेदज्ञ महापुरुष आज माझा यज्ञशेष प्राप्त करता झाला."

आता ह्यावरूनही बुद्ध हा यज्ञांचा समर्थक ठरत नाही काय? की हे वाचूनही त्याकडे दुर्लक्ष करणार??की ह्यावरून बुद्धाला ब्राह्मणद्वेष्टा ठरविणार??? पण तरीही काही लोक बुद्धांस यज्ञद्वेष्टा ठरवितात.

काय म्हणावं ह्यांच्या बुद्धीमांद्यास???


बुद्धाचे वेदाध्ययन


डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या "बुद्ध आणि त्याचा धम्म" ह्या ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनासंबंधी सविस्तर लिहिलं आहे. तरीही
ललितविस्तार नामक ग्रंथात बुद्धाच्या वेदाध्ययनाची कथा सविस्तर आलीय.

सिद्धार्थाने ब्रह्मचारी राहून चारीही वेदांचं अध्ययन केलंय ह्याचा पुरावा ललितविस्तार मध्ये आहे.

स ब्रह्मचारी गुरुगेह वासी, तत्कार्यकारी विहितान्नभजी !
सायं प्रभातं च हुताशसेवो, वूतेन वेदाश्च समध्यगीष्ट !

अर्थ - त्याने ब्रह्मचारी बनून गुरुगृही निवास करून त्यांची सेवा करून शास्त्रविहीत भोजन करून प्रात:सायं यज्ञ करून वेदांचं अध्ययन केलंय.

बुद्धाने यज्ञाची निंदा केली नसून यज्ञातल्या पशुहत्येची निंदा केलीय.

ब्राह्मणाधिगम्य सुत्त नावाने जे सुत्त आहे, त्यात बुद्धाच्या यज्ञाची निंदा वाचायांस मिळते. पण ही निंदा यज्ञाची नसून हिंसक यज्ञाची आहे. ज्या यज्ञात पशुहत्या केली जाते व प्राण्यांचा जीव घेतला जातो, त्या यज्ञांची निंदा बुद्धाने केलीय.पण काही दीडशहाण्यांनी ह्याचा विपरीत अर्थ काढून बुद्धाला यज्ञद्वेष्टा ठरविला.

त्रिपीटककारांनी स्पष्टपणे बुद्धाचा वेद व यज्ञावरचा विश्वास प्रकट केलाय.

बुद्ध स्वत:स वेदगु व वेदांतगु म्हणतो

(संदर्भ - चुल्लनिद्देश्य २.४.१८ व २.४.२८,  महानिद्देस्स १.९.८१ व १.१५.१८२, सिघनिक्काय)


संयुत्त निकाय हे पाच वेदांचा उल्लेख करतो. आता पाचवा वेद म्हणजे महाभारत किंवा इतिहास असेल हे स्पष्ट आहे. कारण महाभारताला पंचम वेद म्हणण्याची परंपरा आहे.

"टिन्नम् वेदनम् परगु" असं शैल ब्राह्मण मझ्झिम निकाय मध्ये स्पष्ट म्हणतो. इथे वेदनम् हा शब्द स्पष्ट आहे.

उज्जय सुत्त, सम्युत्त निकाय व सहावग्गसुत्त हे ३.९ मध्ये स्पष्टपणे बुद्धाच्या दृष्टिकोनातुन खरा यज्ञ कोणता व खोटा कोणता हे स्पष्ट करतं.

"एतम् यन्नं महाफ्फलो, एतं यजेत मेधावी, एतं हि यजमानसेवा सेयं होति " असे उल्लेख स्पष्ट आहेत.

आता अग्निहोत्राचा उल्लेख

अंगुत्तरनिकाय, सम्युक्त निकाय, मझ्झिमनिकाय ह्यामध्ये अग्निहोत्र करा असा उल्लेख निषाद व रथाकारास आहे.

गौतम बुद्ध हा यज्ञ च्या ऐवजी "यन्न" हा पालीभाषेतला शब्द वापरतो फक्त एवढाच फरक.  अनेक ठिकाणी बुद्धाने यज्ञसंस्थेचे कौतुक केल्याची उदाहरणे आहेत व ती विश्वासार्ह आहेत. अगदी धम्मपदाची किंवा सुत्तनिपात किंवा तत्सम ग्रंथांची उपरोक्त उदाहरणे नक्कीच अभ्यसनीय आहेत.

आता तुम्हीच ठरवा सत्य काय ते !

तुका म्हणे सत्य असत्यासी !
मन केले ग्वाही !

© तुकाराम चिंचणीकर
पाखंड खंडिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

3 comments:

  1. सुत्तनिपातमध्ये 262 क्रमांकाचे सुत्त खालीलप्रमाणे आहे.

    २६२ मातापितु-उपट्ठानं पुत्तदारस्स संगहो।
    अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तमं।।५।।

    २६२. आईबापांची सेवा, बायको-मुलांचा संभाळ आणि व्यवस्थितपणें केलेलीं कर्में, हें उत्तम मंगल होय. (५)

    ReplyDelete
  2. याचा चुकीचा अर्थ काढला आहे.


    ३२२ एवंऽपि यो वेदगु भावित्तो। बहुस्सुतो होति अवेधधम्मो।
    सो खो परे निज्झपये पजानं। सोतावधानूपनिसूपपन्नो।।७।।

    ३२२. तसाच विद्वान्, भावितात्मा, बहुश्रुत, अप्रकम्प्य आणि श्रोतावधानानें ज्यानें निर्वाणज्ञान संपादिलें आहे असा ज्ञानी—तोच लोकांचे समाधान करूं शकेल. (७)

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या लाडक्या महामानव डॉक्टर आंबेडकरांनी संपादिलेल्या पाली मराठी शब्दकोशामध्ये वेदगुचा अर्थ वेदज्ञ असाच केला आहे.पण आपण विद्वान करताय. शेवटी

      नोsलुकोsप्यवलोकते दिवा सूर्यस्य किं दूषणं।

      Delete