Friday, 23 April 2021

ताटी उघडा बा विठ्ठला...

 





घट्ट मिटलेले डोळे कधी उघडणारंयेस???


श्रीविठोबा, तु आहेस का??? खरंच आहेस का???


आमचा इतका अधिकार नाही की तुला श्रीजनाबाईंप्रमाणे विठ्या मूळ मायेच्या कारट्या वगैरे म्हणावं...


आमचा इतका अधिकार नाही की तुला आमच्या श्रीनामदेवरायांप्रमाणे घास भरवावा...


आमचा इतका अधिकार नाही की श्रीचोखोबारायांप्रमाणे तुला आळवावं...


आमचा इतका अधिकार नाही की तुला श्रीतुकोबारायांप्रमाणे भंडारा डोंगरावर तुलाच भजताना त्यांच्या आवळाईच्या पायात टोचलेला काटा काढण्यासाठी प्रकट करावं...


कुणाकुणाचं अन् किती नाव घ्यावं???


आमचा अधिकार मूळीच नाही.


पण तु भक्तकामकल्पद्रुम आहेस ना? अनाथांचा नाथ आहेस ना...???


समोsहं सर्वभूतेषु न मे द्वेष्योsस्ति न प्रियः हे तुझंच ब्रीद आहे ना ???


मग तुझी आर्ततेने भक्ती करणारा एखादा संतसम्राट किंवा भक्तराज असो किंवा आमच्यासारखा यःकश्चित एक अतितुच्छ तुझाच ग्रामनिवासी असो...तुला सगळे सारखेच ना रे???


मग आता का डोळे मिटून बसलायेस???


जगात काय चाललंय ते तुला दिसेनासं झालंय का???


सगळं देवावरंच टाकून विसंबणारा मूळीच नाही. कारण प्रत्येक जीव आपल्या आपल्या कर्मांस बाध्य आहे हे तुझंच तर सांगणं आहे...ते मान्यही आहे...


पण मग तु आहेस ना संकटात धाऊन येणारा आणि पतितांनाही पावन करणारा...


मग आज तुझे डोळे मिटलेत का???


लक्षावधी आज तुझ्याकडे डोळे लाऊन बसलेत...


तु तर द्वारंच बंद करून बसलाय...


असे म्हणायचं का आता???


किती दिवस ही तुझी निद्रा???


आज चैत्र एकादशी...मागच्या वर्षीही तुझं दर्शन नाही नि ह्यावर्षीही नाही. हे किती दिवस???


डोळे उघड नि बघ...उघडशील का???


भवदीय...


#पंढरपूर_श्रीविठ्ठल_दर्शन_चैत्रएकादशी_श्रीरुक्मिणी_संतपरंपरा_वारकरी_संप्रदाय

Thursday, 11 March 2021

महाशिवरात्री अर्थात बोधोत्सव दिवस...



*उदीच्य प्रकाश नामक ग्रंथानुसार कैक शतकांपूर्वी सौराष्ट्रप्रांती अर्थात विद्यमान गुजरातमध्ये अन्हलवाडा ह्या संस्थानचे अधिपति मूलराज सौलंकीनी एका विशिष्ट कार्यासाठी संपूर्ण भारतातून १००० एक सहस्त्र सच्चरित्र नि सत्वशील ब्राह्मणांना बोलाविलं होते. तेच ब्राह्मण पुढे ह्या सौराष्ट्रप्रांती उदीच्य ब्राह्मण नावाने प्रसिद्ध झाले.  दोनशे वर्षांपूर्वी याच काठियावाडीमध्ये टंकारा नामक ग्रामी ह्याच परंपरेत कर्शनजी लालजी तिवाडी ह्या औदिच्य किंवा उदीच्य सामवेदी ब्राह्मणाच्या गृही विक्रम संवत १८८१ अर्थात इसवी सन १८२४ मध्ये एका बालकाचा जन्म झाला. माघ वद्य दशमींस...मूलशंकर हे पाळण्यातले नाव असलेले हे बालक पुढे जगद्विख्यात यतिवर महर्षि दयानंद सरस्वति नावाने प्रसिद्ध झाले...*


हे घराणे मूलतः शैवपंथी असल्यामुळे भगवान शंकरांचे अनन्य भक्त...


पांचव्या वर्षी ह्या बालकाची शिक्षा आरंभ झाली आणि आठव्या वर्षी उपनयन संस्काराने ह्याच्य् द्वितीय जन्मांस प्राप्ती झाली. यजुर्वेदाचे अध्ययन आरंभ करताच रुद्रपाठाची आवर्तने सुरु झाली आणि १४व्या वर्षांपर्यंत व्याकरण आणि शब्दरुपावली वगैरे कंठस्थ झाली. अगदी यजुर्वेदही संपूर्ण कंठस्थ झाला. 


*शिवभक्तीचे संस्कार*


बालपणापासूनंच ह्या बालकांवर शिवभक्तीचे संस्कार झाल्याने नित्यनियमाने पिंडीची पूजा करणे वगैरे कार्यक्रम सुरु झाले. आणि अखेर तो दिवस उजाडला. शिवभक्त असल्याने ह्या बालकांस महाशिवरात्रीचे उपवास, तत्संबंधित उपासना ह्या सर्वांचीच शिक्षा आधीपासूनंच देण्यात आली.


*महाशिवरात्रीची रात्र आणि मूलशंकरचा बोधोत्सव*


अखेर ती महाशिवरात्रीची रात्र आली. दिवसभराचा उपवास करून हा बालक  रात्रीच्या प्रहरी असलेल्या चार शिवपुजांसाठी मंदिरात गेला. तीन पुजा करतातच त्याच्या लक्ष्यीं आलं की मंदिरातला पुजारी व आपले सर्व मित्र झोपी गेले आहेत. चौथ्या पुजेच्या आरंभ करण्यापूर्वीच एक अकस्मात घटना घडली नि...


*शिवरात्रींस निद्रा घेणं हा व्रतभंग असल्याने बालक मूलशंकर हा सतत डोळ्यांवर पाणी मारत होता. त्यांचे वडील स्वतः झोपी गेले पण हा बालक मात्र पित्याची आज्ञा पालन करत अक्षुण्ण जागा राहिला. रात्रीची नीरव शांतता आणि ती निस्तब्धता ह्या मूलशंकरांच्या जीवनांत मात्र एका महान नाट्यासम कलाटणी देणारी ठरली. ह्याच वेळी त्या नीरव शांततेमध्ये त्या बालकाने पाहिलं की त्या शिवाच्या पिंडीवर काही उंदरं हालचाल करताहेत. त्या पिंडीवरील तांदुळ ते भक्ष करताहेत. हे पाहून त्या बालकाच्या अंतःकरणांत उठलेल्या प्रश्नांनी त्या बालकांस आत्ममग्न बनविलं. त्याच्या मनांत विचार आला असेल की 


*"इतके दिवस अनेक कथांमधून ऐकत आलो की भगवान शिव हे तर शांतीचे अनुपम प्रतीक. योग्यांचाही योगी अससेला महायोगी, हे तर पाशुपतास्त्रधारी, रुद्रांचेही रुद्र, सर्वांचे महेश्वर, प्रबल प्रतापी, दुर्दान्त-दैत्य-दलनकारी असे हे महादेव त्या चार पाच उंदरांना साधे हटवु शकत नाहीत? आपण जे शिव ऐकले ते हेच का की वेगळे??? जे चालतात, फिरतात, बोलतात, हाती त्रिशुल धारण करतात, डमरु वाजवितात, शाप नि वर दोन्ही देतात, असे ते त्रिनेत्रधारी शिव नक्की आहेत तरी कोण???"*


आपल्या अंतःकरणांतले हे शंकांचे काहूर शांत करण्यासाठी ह्या मूलशंकरने शिवचतुर्दशीच्या रात्री, शिवमंदिरामध्ये, शिवमूर्तीसमोर, आपले महान शिवभक्त पिताश्री श्री कर्शनजींना विचारलं की हे शिव निश्चित आहेत तरी कोण जे स्वतःची त्या उंदरांपासून साधी रक्षा करु शकत नाहीत???


आपल्या पुत्राच्या ह्या प्रश्नाचे समाधान पिता करुच शकले नाहीत पण त्या असमाधानाने सुरु झाला शोध एका आत्मचिंतनाचा, एका आत्मगौरवाचा...!


*एका मूलशंकर नामक बालकाने त्याचवेळी प्रतिज्ञा केली की खऱ्या सत्यनिष्ठ शिवाचं दर्शन मला जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी ह्या शिवमूर्तीची किंवा पिंडीची पूजाच करणार नाही...*


एका शिवभक्त कुटुंबामध्ये शिवपिंडीचीच पूजा नाकारणारा हा नास्तिक पुत्रंच जन्माला यावं असंच त्या पित्याला वाटलं असणार तर काय नवल?


पण हा बालक तर आस्तिकांचाही आस्तिक होता, कारण तो निघाला होता एका अनंताच्या प्रवासासाठी...


*तिवारींचा मुलगा निघाला होता आपल्या खऱ्या शिवाच्या अर्थात रुद्राच्या शोधासाठी...आपल्या अंतरात्म्यांतल्या सत्यनिष्ठ शिवाच्या साक्षात्कारासाठी...*


*हा बालक निघाला होता आर्ष ग्रंथांच्या उद्धारासाठी नि वैय्याकरणातला सूर्य होण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता श्रुतिभास्कर आजीवन अखंड आदित्य बालब्रह्मचारी वेदोद्धारक महर्षि श्रीमद्दयानंद बनण्यासाठी....*


*हा बालक निघाला होता वेदांवरचा सर्वोत्तम भाष्यकार होण्यासाठी, तासन्तास समाधी लावून मगंच वेदार्थ करण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता प्राचीन आर्यांचा तेजस्वी व गौरवशाली असा वेदरुपी वारसा त्यांना पुन्हा प्रदान करण्यासाठी...*


*हा बालक निघाला हिंदुंना अर्थात आर्यांना त्यांच्या विस्मृत आत्मगौरवाचा साक्षात्कार करून देण्यासाठी...*


*हा बालक निघाला होता हिंदुंना कृण्वन्तो स्वयमार्यं तथा विश्वमार्यंम् हे बनविण्यासाठी...*


अशा ह्या बालकासाठी ही चतुर्दशीची रात्र ठरली ती बोधोत्सव रात्र...आत्मचिंतनासाठी, आत्मस्वरुपाच्या शोधासाठी, आत्मगौरवाच्या पुनर्प्राप्तीसाठी, आत्मसंस्थित होण्यासाठी...


आपणही असा काही बोध आजच्या ह्या पवित्र रात्री घेऊयांत...आपल्यातल्या सत्यनिष्ठ शिवतत्वाला जाणण्यासाठी...


आपल्या मूलतत्वांस जाणण्यासाठी, आपल्यातल्या आत्मस्वरुपास ओळखण्यासाठी...


*(वैधानिक सूचना - प्रस्तुत लेखाचा उद्देश्य मूर्तीपूजेची निंदा करण्याचा किंवा तिला नाकरण्याचा मूळीच नाही. लेख व्यवस्थित वाचावा ही पुनश्च विनंती. न समजल्यांस सोडून द्यावा किंवा आमच्या पुंढील लेखांची वाट पहावी...धन्यवाद)*


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#महाशिवरात्री_बोधोत्सव_महर्षि_दयानंद_वेदोद्धारक_शिवपिंड_भगवानशंकर_रुद्र

Tuesday, 9 March 2021

श्रीसमर्थांची तथाकथित 'पत्नी' आणि समाजमाध्यमं...



चौथा अत्यंत साक्षेप|फेडावे नाना आक्षेप|अन्यायें थोर अथवा अल्प|क्षमा करीत जावे||

दशक - ११, समास ५


समाजमाध्यमांवर काय प्रसृत करावं आणि करु नये ह्याचा विवेक दुर्दैवाने आह्मीं गमावून बसलोय. दिसला एखादा संदेश की कर गावभर...


त्यातून कोणत्याही आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेल्या सत्पुरुषांस अट्टाहासाने कुणीतरी पत्नी होती असे दाखवायचा एक प्रयत्न फार असतो. म्हणजे आधी श्रीहनुमंतांस सूर्यानावाची एक पत्नी बळंच दाखवून झाली. दक्षिणेत ह्मणें त्या दोघांचं मंदीरही आहे. किती दुर्भाग्य! पुढे श्रीभीष्माचार्यांसही विवाहित दाखविण्याचा अट्टाहास भांडारकर वगैरे एतद्देशीय विद्वानांनीच केला. आता राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदासांची न झालेली पत्नी दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे.


नुकतीच श्रीदासनवमी झाली व काल योगायोगाने आतंरराष्ट्रीय महिला दिवसही झाला. म्हणूनंच की काय कुणाला तरी समर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती कथा प्रसृत करण्याचा मोह झाला असावा.


*मूळात जिच्याशी समर्थांचा विवाहच झाला नाही ती पत्नी कशी? तिचा उल्लेख नियोजित वधु असाच करायला हवा...! पण व्याकरणाचा गंधही नसणाऱ्यांना हे कुठून कळणार???*


सांप्रत समाजमाध्यमांवर एक निनावी लेख प्रसृत होतो आहे ज्यात श्रीसमर्थांच्या तथाकथित पत्नीसंबंधी वाट्टेल ती भाकडकथा प्रसृत केली जाते आहे जिला समर्थ साहित्यात तर काडीमात्र आधार तर नाहीच पण ती कथा इतकी विपर्यस्त आहे की ती चीड आणणारी तर आहेच आहे पण अत्यंत हास्यास्पद आणि खोटी आहे हे वाचल्याक्षणीच ओळखु येते. असा नतद्रष्टपणा लेखकाला का करावासा वाटला हे तेच जाणो....


वास्तविक ज्यांनी श्रीसमर्थांच्या चरित्राचे अध्ययन केलेलं आहे, त्यामध्ये प्रामुख्याने श्री गिरीधरस्वामींचा समर्थप्रताप, आत्माराम महाराजांचा दासविश्रामधाम वगैरे ग्रंथ संदर्भग्रंथ म्हणून अत्यंत विश्वसनीय आहेत. ज्येष्ठ समर्थभक्त कै. आदरणीय गुरुवर्य श्रीसुनीलजी चिंचोलकरांनी त्यांच्या 'चिंता करितो विश्वाची' ह्या चरित्र ग्रंथामध्ये श्रीसमर्थांच्या विवाहसंबंधी व त्या नियोजित वधुच्या पुढील विवाहासंबंधी विस्तृत विवेचन केलं आहे. त्याचा सांराश असा


"गिरीधरस्वामींच्या समर्थप्रतापमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की समर्थांचे अंतःकरण हे जात्याच वैराग्यप्रवण असल्यामुळे त्यांच्या विवाहसंबंधी चार वेळा स्थळे दाखविण्याचा प्रयत्न झाला जो त्यांनी मूलींच्या पित्याशी बोलूनंच त्यांस नकार देत किंवा त्यांना आपल्या वैराग्यप्रवणतेविषयी सांगून पटवून दिले. ह्यातून समर्थांवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचे आपोआप निराकरण होते. पुढे समर्थांच्या मामाच्या मूलीशीच जो त्यांचा विवाह त्यांच्या मातुःश्रींनी ठरविण्याचा अट्टाहास मांडला, ते मामा भानजी गोसावी हे होते. समर्थांनी ऐन विवाहप्रसंगी आपल्या नियोजित वधुचा अव्हेर करून विवाह मंडपातून धुम ठोकली व ते तिथून पसार झाले. आता त्या कन्येचे पुढे काय झालं ह्याचे उत्तर देताना हनुमंत स्वामींच्या बखरीत उल्लेख आहे की तिचा विवाह तिथल्याच तिथे एका बीजवराशी करण्यांत आला. समर्थ अचानक असे बेपत्ता झाल्याचे कळतात लग्नमंडपात उडालेल्या हाहाःकाराला शांत करण्यासाठी गंगाधरपंतांनी मूलीच्या वडिलांना सांगून तिथेच आवाहन करून उपस्थित असलेल्या अंबडच्या देशमुखांशी तिचा विवाह लावला. बीजवर म्हणजे काय तर ज्याची पत्नी सात वर्षाची असतानाच वारली असा तो. त्यामुळे अंबडच्या देशमुखांच्या बीजवर मुलाशीच तिचा विवाह तिथेच लावण्यात आला."


ह्याचाच अर्थ समाजमाध्यमांवर प्रसृत होणारी जी कथा आहे ज्यामध्ये ती कन्या पुढे तशीच अविवाहित राहिल्याचा व अगदी छत्रपती शिवरायांना ती भेटल्याचा, सैन्यनिर्माण केल्याचा व अगदी समर्थांशीही पाच मिनीटं भेट घेतल्याचा अत्यंत बालिश उल्लेख केला आहे, ती अत्यंत खोडारडी तर आहेच पण तर्कदुष्टही आहे....!


असे संदेश प्रसृत करणाऱ्यांवर समाजाने बहिष्कारंच घातला पाहिजे किंवा नैर्बंधिक कृती तरी करायला हवी...


काही जण आक्षेप घेतील की एवढं अट्टाहासाने ह्यावर लिहायचं काय कारण तर आह्मीं सांगु इच्छितो की महापुरुषांविषयी अशा भाकडकथाच पुढे रुढ होत जातात व त्या आख्यायिकेचे रुप धारण करून लोकांना त्याच सत्य वाटायला लागतात. म्हणूनंच योग्य वेळीच त्यांचं खंडन आवश्यक आहे.


लेखासहित आह्मीं गुरुवर्य श्री सुनीलजींच्या त्या चरित्राची पृष्ठे जोडली आहेत ती वाचकांनी वाचावीत ही विनंती. ती आह्मांस आमचे मित्र समर्थभक्त श्री महेश फणसळकरांनी पाठविली त्याविषयी त्यांचे आभार...


अस्तु। 


श्रीसमर्थांसारख्या राष्ट्रपुरुषाविषयी अशा भाकडकथा प्रसृत करण्यांस श्रीसमर्थंच सद्बुद्धी देवोत हीच त्यांच्याचरणी प्रार्थना...!


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीसमर्थरामदास_चरित्र_त्यांची_तथाकथित_नियोजित_वधु_अंबडचे_देशमुख

Sunday, 7 March 2021

माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी





 *असो ऐसें सकळहीं गेले | परंतु येकचिं राहिलें | जे स्वरुपाकार जालें | आत्मज्ञानी ||*

श्रीमद्दासबोध


ज्यांना आत्मज्ञान झालं तेच कीर्तीने जीवित राहतात, अन्येषां कृते जीवितं मूतकमेव मन्ये। असे म्हटल्यांस अत्युक्ती नाही.


*पैशाच पंथी इस्लामी पाशवी अत्याचाराच्या आक्रमणाने गांजलेल्या नि पंधराव्या शतकांत पाच पातशहांच्या परदास्यतेत बद्ध झालेल्या महाराष्ट्रांस तारलं ते संतांनींच. महाराष्ट्राक्षितिजांवर संतसम्राट कैवल्यचक्रवर्ती श्रीज्ञानोबांच्या रुपाने स्वधर्मसूर्याचा जो उदय झाला, भक्तशिरोमणी श्रीनामदेवांनी ज्या भागवतधर्माची पताका अगदी पंजाबांपर्यंत नेली, श्रीगोरोबाकाका, श्रीसेनामहाराज, श्रीचोखोबादि संतांनी ज्या भक्तिरसाचा डांगोरा कळिकाळाच्याही माथा सोटा हाणत पिटला, त्याच भागवतधर्मांस अर्थात वैदिक धर्माच्या अत्यंत विशुद्ध अशा स्वरुपांस इतिहासाचार्य वि का राजवाड्यांनी म्हटल्याप्रमाणे सहिष्णुपासून जयिष्णु बनविण्याचे कार्य महाराष्ट्रधर्म नावाच्या संजीवनीने प्राप्त झालं. संतचरित्रकार श्री पांगारकरांनी म्हटल्याप्रमाणे त्या महाराष्ट्रधर्माचा पाया ज्या श्रीनाथांच्या रुपाने रचला गेला, जगद्गुरु संतश्रेष्ठ श्रीतुकोबारायांच्या रुपाने ज्या महाराष्ट्रधर्माची ईमारत फळांस आली त्याच महाराष्ट्रधर्मांस राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या तेजस्वी नि विजीगीषु वृत्ती निर्माण करणाऱ्या वाणीने, लेखणीने, कृतीने, आचाराने, व्यवहाराने सहिष्णु पासून जयिष्णु बनवलं नि त्यावर कळस चढविला, ज्यांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या अरिशोणितप्राशी खड्गाच्या तीक्ष्ण धारेने हिंदवी स्वराज्याचा मुकुटमणीच धारण केला, त्या श्रीसमर्थांच्या समाधीचा आजचा दिवस...*


*मुख्य तें हरिकथा निरुपण।दुसरें तें राजकारण।तिसरें तें सावधपण। सर्वांविषयी।*


असे म्हणत मुख्य त्या हरिकथेला कुठेही न त्यागता राष्ट्रहिताचे राजकारण करणारा नि सर्वांविषयी सावधपणा बाळगायला सांगणारा हा राष्ट्रसंत


*भेटो कोणी एक नर। महार धेंड चांभार।त्याचे राखावे अंतर। या नाव भजन।*


सर्व हिंदुंसमाजाचं अंतर्बाह्य संघटन करणारा


*पतित करावे पावन।शहाणे करावे जन।सृष्टीमध्ये भगवद्भजन। वाढवीत जावे।*


पतितांना पावन करणारा नि सर्वांना शहाणं करणारा कृतिशील समाजोद्धारक


ईश्वरांस काय मागावं हे सांगताना


*कोमलवाणी दे रामा।विमल करणी दे रामा।सज्जनसंगती दे रामा।अभेदभक्ती दे रामा। बहुजन मैत्री दे रामा।*


प्राचार्य शिवाजीराव भोसल्यांनी अगदी सार्थ म्हटल्याप्रमाणे 


*"म्हणजे सज्जनसंगती, अभेदभक्ती, बहुजनमैत्री ह्या तीन शब्दांसाठी भावनिक एकात्मकतेचे नोबेल पारितोषिक ह्या माणसाला द्यायला खरंतर काही हरकत नाही !"*


*विद्यावैभव अर्थारोहण दे रामा।जनसुखकारक, प्रसंगओळख, आंतरपारख दे रामा।*


असा ज्ञानी भक्त आणि इतका सर्व विश्वप्रपंच करत असतानाही


*विवेक आणि वैराग्य हेचि जाणावे महद्भाग्य।*


विवेक नि वैराग्याशी सतत संधान साधणारा हा वैराग्यसंपन्न महात्मा...



हिंदुधर्मरक्षक पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी, रक्षणासाठी नि संवर्धनासाठी त्या जगन्मातेकडे


*दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकतो। परंतु रोकडे काही। मुळ सामर्थ्य दाखवी।*


*तुझा तो वाढवीं राजा। सीघ्र आह्मांसि देखिजा।*


अशी काकुळतेने प्रार्थना करणारा हा जगन्मातेचा भक्त...


पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या स्वराज्यनिर्मितीपश्चात त्यांस आपल्या स्वप्नीं पाहिलेल्या रामराज्याची आनंदवनभूवनाची संज्ञा देत कृतकृत्यतेचा अनुभव करणारा कर्तृत्वसंपन्न पुरुषश्रेष्ठ...


*म्हणौनि आम्ही रामदास। रामचरणी आमुचा विश्वास।कोसळोनि पडो हे आकाश। परि आणिकांचि वास न पाहो।*


असे म्हणत ह्या नश्वर देहाचा त्याग करणारा हा आत्मज्ञानी ऋषि...


आज त्यांच्या चरणी कृतानेक साष्टाङ्ग दंडवत...!


आज नरवीर नरश्रेष्ठ श्री तानाजी मालुसरे ह्यांचेही पुण्यस्मरण...सावरकरांच्या शब्दांमध्ये


*धन्य शिवाजी तो रणगाजी, धन्य चि तानाजीं। प्रेमें आजि सिंहगडाचा, पोवाडा गाजी।*


माघ वद्य नवमी अर्थात दास नवमी...


पाखण्ड खण्डिणी

Pakhandkhandinee.blogspot.com


#दासनवमी_श्रीसमर्थ_रामदास_राष्ट्रगुरु_राष्ट्रसंत_श्रीशिवप्रभु_हिंदवीस्वराज्य_महाराष्ट्रधर्म

Saturday, 20 February 2021

#भीष्माष्टमी_माघशुद्धअष्टमी



आज श्रीभीष्माचार्यांचे पुण्यस्मरण ! माघ शुद्ध अष्टमींस इसवी सन पूर्व ३१३८ ह्या दिवशी परमवंदनीय श्रीभीष्माचार्यांनी देहत्याग केला.

व्यक्तिश: आमच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णापश्चांत महाभारतातले श्रीभीष्माचार्य हे सर्वोत्तम प्रिय नि आदर्श व्यक्तिमत्व ! आजीवन अखंड ब्रह्मचर्य पालन केलेला हा सिंहह्रदयी पुरुष !

पित्याच्या वचनांसाठी चतुर्दश वर्षे राज्यत्याग करणारे नि विजवनास स्वीकारणारे भगवान श्रीरामचंद्र आम्हांस आदर्श आहेतच. पण त्यांच्याही पुढे जाऊन पित्याच्या सुखासाठी केवळ राज्यत्यागच नव्हे नि तोही कायमचाच पण त्याबरोबरच वैवाहिक सुखाचाही त्याग करून आजीवन अखंड नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करून उर्ध्वरेतस होणार्या श्रीभीष्माचार्यांविषयी आम्हांला कधीच आदर का वाटत नाही?


भगवान श्रीकृष्णांनी स्वत: ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् असे म्हणून स्वपत्नी रुख्मिणीसह विवाहापश्चात द्वादश वर्षे नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन केलं. पण श्रीभीष्माचार्यांनी तर आजीवन अखंड उर्ध्वरेतस असे जीवन व्यतीत केलं. म्हणूनच प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच त्यांची स्तुती करताना त्यांस उर्ध्वरेतस् असंच अनेकवेळा म्हटलंयय. आणि युद्धापश्चांत युधिष्ठिरांस त्यांच्याकडून राजधर्माची शिक्षा प्राप्त करण्यांची आज्ञा दिलीय. 


श्रीभीष्माचार्यांचे षड्वेदाङ्गासहित वेदाध्ययन


श्रीभीष्माचार्यांस देवव्रत, गङ्गादत्त आणि गाङ्गेय अशी तीन नावे आदिपर्वांत दिलेली आहेत. त्यांचे वर्णन असे आहे.


वेदानधिजगे साङ्गान् वसिष्ठादेव वीर्यवान् ।

कृतास्त्र: परमेष्वासो देवराजसमो युधि ।


आदिपर्व - १००.३५ 


अर्थ - महर्षि वसिष्ठांकडून षड्वेदाङ्गांसहित वेदांचे अध्ययन केलेला हा बलवान पुत्र अस्त्रविद्येचा ज्ञाता, महान धनुर्धर आणि देवराज इंद्रासमान पराक्रमी आहे.


पुढे असं वर्णन आहे की ते शुक्राचार्यांप्रमाणेच सर्व नीतीशास्त्राचे ज्ञाते, बृहस्पतिसमानच ज्ञाते नि भगवान परशुरामांची अस्त्रविद्या प्रतिष्ठित असलेले, राजधर्म नि अर्थशास्त्राचे जाणकार असे आहेत.


श्रीभीष्माचार्य गंगेकडून शंतनुंस प्रथम भेटींस आले तेंव्हा त्यांचे वय ३६ होते असे महाभारत सांगते. पुढे त्यांस यौवराज्याभिषेक झाला व पुढील चार वर्षांतच त्यांच्या पित्याचा सत्यवतीशी विवाह झाला. म्हणजेच प्रतिज्ञाकरतेवेळी त्यांचे वय हे ४० होते. त्याचे प्रमाण स समा: षोडषाष्टौ च चतस्त्रोष्टौ तथापरा: असे आहे. म्हणजे १६+८+४+८=३६ वर्षे. साङ्गोपाङ्ग चतुर्वेदाध्ययनासाठी इतका वेळ लागणं क्रमप्राप्तच आहे.


देवव्रतांची भीष्म प्रतिज्ञा


सत्यवतीच्या पित्यांस दाशराजांस ते म्हणतात 


राज्यं तावत्पूर्वमेव मया त्यक्तं नराधिप |

अपत्यहेतोरपि च करोम्येष विनिश्चयम् ||८७||


राज्याचा त्याग तर मी पूर्वीच केलाय. आता अपत्यहेतुचा तो त्याग मी निश्यचाने करेनच.


अद्यप्रभृति मे दाश ब्रह्मचर्यं भविष्यति |

अपुत्रस्यापि मे लोका भविष्यन्त्यक्षया दिवि ||८८||


हे दाशराज, इथूनपुढे माझे नैष्ठिक ब्रह्मचर्य होईल. आणि निपुत्रिक असूनही स्वर्गाचे द्वारे माझ्यासाठी उघडी राहतील.


नहि जन्मप्रभृत्युक्तं मम किंचिदिहानृतम् ।

यावत् प्राणा ध्रियन्ते वै मम देहं समाश्रिता: ।

परित्यजाम्यहं राज्यं मैथुनां चापि सर्वश: ।

उर्ध्वरेता भविष्यामि दाश सत्यं ब्रवीमि ते ।


जन्मापासून एकही असत्य कथन न केलेला मी प्राण जाईपर्यंत राज्यत्याग करून मैथुनाचाही सर्वस्वी त्याग करेन. हे दाशराज, आता मी उर्ध्वरेतस् बनेन. सत्य तेच बोलतो.


देवव्रत आता भीष्म होतात. आणि त्यांची ही घनघोर प्रतिज्ञा पाहून पिता पिता शंतनु त्यांस 


तद्ष्ट्वा दुष्करं कर्म कृतं भीष्मेण शन्तनुः |

स्वच्छन्दमरणं तस्मै ददौ तुष्टः पिता स्वयम् ||९४||


स्वच्छन्दमरणाचे (स्वेच्छामृत्युचे) वरदान देतात.


काय तो त्याग ! केवळ अद्वितीय ! धन्य ते माता-पिता नि धन्य तो पुत्र !


श्रीभीष्माचार्य विवाहित होते काय ?


काही विद्वानांनी श्रीभीष्माचार्यांच्या चारित्र्यांवर संदेह घेतांना त्यांस विवाहित ब्रह्मचारी ठरवलं आहे.


येंविषयी खंडनात्मक नुकताच एक ग्रंथ वाचण्यांत आलाय. 


WAS BHĪSMĀCĀRYA MARRIED ? BY W R ANTARKAR(1978)


ह्या पुस्तिकेमध्ये लेखकाने उपरोक्त सर्व आक्षेपांचे खंडन केलं असून ग्रंथ अत्यंत चिंतनीय आहे. वस्तुत: महाभारतामध्ये २३ वेळा श्रीभीष्माचार्यांस उर्ध्वरेतस म्हटलेलं आहे. श्रीभीष्मांच्या जन्माच्यावेळीच त्यांना इथून पुढे आजीवन स्त्रीपासून विरहित नि आजीवन अखंड ब्रह्मचारी होईल असे वचन आहे. स्वत: महाभारतावरील टीकाकार श्रीनीळकंठाने श्रीभीष्माचार्यांच्या ब्रह्मचर्याचे वर्णन करताना त्यांस अविप्लुत ब्रह्मचर्यं आणि नित्य ब्रह्मचारी असेच म्हटलंय. अर्थात ह्याच नीळकंठांचा गोंधळ बर्याच ठिकाणी दिसतो. कारण हेच नीळकंठ दुसर्या ठिकाणी श्रीभीष्म विवाहित होते असेही म्हणताना दिसतात. अस्तु !


डॉ. दांडेकरांसारखे तथाकथित विद्वानही श्रीभीष्माचार्यांवर षंढ किंवा नपुंसक असल्याचा घाणेरडा आरोप करतात. किती ती लाजिरवाणी गोष्ट ? हे दुसरे शिशुपालच म्हणावे लागतील, नाही का? 


अग्निपुराणामध्ये श्रीभीष्माचार्यांस अविवाहित अर्थात नैष्ठिक ब्रह्मचारीच म्हटलंय. गर्गसंहितेत (१०।७।५४) तर भीष्माचार्यांचे वर्णन करताना 


भीष्मं विना ही मदनं को विजेतुं भवेन्नर:।


श्रीभीष्माचार्याशिवाय मदनांस जिंकण्यांस कोण सामर्थ्यसंपन्न आहे ?


असं म्हटलंय.


श्रीभीष्म-युधिष्ठिर संवाद


श्रीभीष्माचार्यांचे अलौकिक ज्ञान जाणून घ्यायचे असेल तर त्यांचे शांतिपर्वातील उपरोक्त संवाद अभ्यासायलाच हवा.


दहा दिवस घनघोर युद्ध करून स्वत:च्याच युद्धातून पतनाचे रहस्य पांडवांना सांगून अर्जुनाच्या बाणांच्या मारांनी श्रीभीष्माचार्य शरपंजरी पडले. त्यानंतर युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्णांनी श्रीभीष्मांस येऊन त्यांच्या देहावसानाविषयी माहिती देताना म्हटलंय 


पञ्चाशतं षट्च कुरुप्रवीर शेष दिनानां तव जीवितस्य ।

तत: शुभै: कर्मफलोदयैस्त्वं समेष्यसे भीष्म विमुच्य देहम् ।

शांतिपर्व ५१।१४


अर्थ - हे कुरु श्रेष्ठ, आता आपल्या जीवनांतले ५६ दिवसच शेष असून तदनंतर हे श्रीभीष्म, आपण ह्या देहाचा त्याग करून आपल्या शुभकर्मांनी कल्याणकारी फल प्राप्त कराल.


स्वत: श्रीभीष्माचार्य युधिष्ठिरांस आज्ञा देताना म्हणतात की तु उत्तरायण आरंभ होईल तेंव्हा मला भेटींस ये. पुढे युधिष्ठिर त्यांस सूर्य उत्तरायण करण्यासाठी काहीच दिवस शेष असून तो करताच आपण देह त्याग कराल असे म्हणतो आणि पुन्हा त्यांच्या आज्ञेंस शिरसावंद्य मानून हस्तिनापुरांत पन्नास दिवस निवास करून युधिष्ठिर त्यांच्याकडे जावयांस निघतात. तेंव्हा श्रीभीष्माचार्य म्हणतात


परिवृत्तो हि भगवान्सहस्त्रांशुर्दिवाकर: ।

अष्टपञ्चाशतं रात्र्य: शयानस्याद्य मे गता: ।

माघोsयं समनुप्राप्तो मास: पुण्यो युधिष्ठिर: ।

त्रिभागशेष: पक्षोsयं शुक्लो भवितुमर्हति ।


भगवान सूर्य आता उत्तरेंस परिवृत्त झाला असून या शय्येवर पडून मला आता ५८ दिवस झाले आहेत. आता हा पुण्यप्रद असा माघ मासाचा शुक्ल भाग सुरु झाला असून त्या मासाचे तीन भाग शेष आहेत. हा शुक्ल पक्ष होईल.


त्यांच्या देहावसानाचा समय समीप येताच सर्व पांडव भगवान श्रीकृष्णासहित तिथे उपस्थित होतात. वैशंपायन श्रीभीष्माचार्यांच्या देहावसानाचे वर्णन करताना लिहितात. 


भीष्मस्य कुरुशार्दूल देहोत्सर्गं महात्मन: ।

निवृत्तमात्रे त्वयने उत्तरै वै दिवाकरे ।

समावेशयदात्मानमात्मन्येव समाहित: ।


अर्थ - हे युधिष्ठिर तु आता कुरुश्रेष्ठ श्रीभीष्माचार्यांचा देहोत्सर्ग श्रवण कर. सूर्याचे उत्तरायण सुरु झालेलं असून श्रीभीष्माचार्यांनी स्वत:स परमात्म्यांत समाविष्ट केलं.


शुक्लपक्षस्य चाष्टम्यां माघमासस्य पार्थिव ।

प्राजापत्ये च नक्षत्रे मध्यं प्राप्ते दिवाकरे ।


माघमासाच्या शुक्लपक्षाच्या अष्टमींस प्रजापती अर्थात रोहिणी नक्षत्रांस सूर्य मध्यान्ही आला असता श्रीभीष्मांनी देहोत्सर्ग केला.


म्हणजे आजच्याच दिवशी माध्यान्हसमयी श्रीभीष्म गेले. हा काळ आहे इसवी सन पूर्व ३१३८ माघ शुद्ध अष्टमी. म्हणजेच आजपासून ३१३८+२०१९ = ५१५७ वर्षे पूर्व.


श्रीभीष्माचार्य हे अहिताग्नी होते. अर्थात ते नित्य अग्निहोत्र करणारे होते. अगदी शरशय्येवर असतानाही त्यांच्या समीप अग्निहोत्राचा उल्लेख आहे. ऐतरेय ब्राह्मणामध्ये सप्तम पंचिकेत नवम कंडिकेमध्ये ब्रह्मचार्यांस अग्निहोत्राचा अधिकार दिलेलाच आहे. 


जर महाभारत खोटंच असतं तर इतके खगोलीय किंवा ज्योतिषशास्त्रीय संदर्भ कसे काय आले असते ? बरं हे संदर्भ आजही तसेच चालत आलेले आहेत. ह्याचाच अर्थ ही परंपरा गणितीय असून ती अगदी अचूक आहे.


श्रीभीष्माचार्य देहावसानसमयी २३६ वर्षांचे होते असे पंडित कोटा वेंकटाचलम त्यांच्या *The Age of Mahabharata War ह्या ग्रंथामध्ये म्हणतात. अर्थात युद्धसमयी त्यांचे वय एकतर दोनशेंच्या समीप असावं. श्रीव्यास त्यांच्यापेक्षा वीस वर्षे लहान असून युद्धसमयी भीम नि भगवान श्रीकृष्णादिकांचे वयही नव्वदीच्या समीपच होते.


ह्या कुरुश्रेष्ठांस त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी वंदन नि अभिवादन !


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com


#श्रीभीष्माचार्यमाघशुद्धअष्टमीदेहोत्सर्ग_उत्तरायण

Friday, 29 January 2021

*आर्षमतविमर्शिनी नामक श्रीशबरस्वामीं कृत पूर्वमीमांसा भाष्य यावरील सप्तखंडात्मक टीका*





*आर्षमतविमर्शिनी नामक श्रीशबरस्वामीं कृत पूर्वमीमांसा भाष्य यावरील सप्त खंडात्मकटीका* कर्ता - पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय पंडित श्रीयुधिष्ठिर मीमांसक


गेली दोन वर्षे जिचा शोध घेत होतो, ती ग्रंथमालिका आज प्राप्त झाली ! काही गोष्ट ईश्वरकृपेनेच लाभतात ! दोन वर्षांपूर्वी आम्ही उपरोक्त वैदिक विद्वान पदवाक्यप्रमाणज्ञ महामहोपाध्याय पंडित श्रीयुधिष्ठिरजी मीमांसक जयंतीविशेष निमित्त एक लेख लिहिला होता. आमच्या ब्लॉगवर आणि इथे मुखपुस्तिकेवरही तो आहे. मागील वर्षी २२ सप्टेंबरला पुनर्प्रकाशित आहे. त्यामध्ये आम्ही वंदनीय पंडितजींनी पूर्वमीमांसेवरील जे श्रीशबरमुनीकृत आर्षभाष्य आहे, त्यावरील त्यांनीच रचलेल्या सप्तखंडात्मक आर्षमतविमर्शिनी नामक टीकेचा उल्लेख केला होता. षटदर्शनांचे प्रामाणिक अध्ययन करायचे असेल तर त्यावरील प्राचीन अशी आर्षभाष्ये अभ्यासायला हवीत, हा महर्षी श्रीमद्दयानंद यांनी मांडलेला सिद्धांत आम्हांस पटणारा असल्यामुळे आप्तवाक्य प्रमाण मानून पूर्वमीमांसेच्या दृष्टीने श्रीशबरस्वामींचे भाष्य हे महर्षींनी आर्ष मानले आहे. अर्थात त्यातही जो भाग वेदानुकूल तोच ग्राह्य ! आप्तांचे वाक्य हे वेदानुकूल असेल तरंच ग्राह्य ! सुदैवाने श्रीशबरमुनींचे हे भाष्य पूर्ण संस्कृतमध्ये आम्हांस द्विखंडात्मक प्राप्तही झाले होते. पण हा विषय आमच्या एकूणच बुद्धीच्या बाहेरचा असल्याने ते केवळ संग्राह्य करून ठेवले होते. ज्यांनी पूर्वमीमांसेचे काहीसे अध्ययन केलं असेल किंवा ज्यांना पूर्वमीमांसेचा काहीसा परिचय जरी असेल, तरी त्यांना हे ज्ञात असेल की महर्षी श्रीजैमिनींच्या पूर्वमीमांसेवर मूळ श्रीशबरमुनींचे भाष्य असून त्यावर पुढे वेदोध्दारक श्रीकुमारिल भट्टपादांनी आणखी विस्तृत भाष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते भाष्यही ते पूर्ण करू शकले नाहीत. पुढे पूर्वमीमांसेत इतर संप्रदायांची मतेही निर्माण झाली काळाच्या ओघाने ! आणि त्यामुळे मूळ महर्षी श्रीजैमिनी प्रणित ह्या वैदिक दर्शनाचे संबंधी काही भ्रमही निर्माण झाले ! त्यावर विस्ताराने संवाद करण्याचे हे स्थळ नसल्याने केवळ इतकेच सांगून हा विषय मांडतो की उपरोक्त लेखक श्रीपंडितजींना ह्यासंबंधी विस्तृत विवेचन करण्याचे अंतःकरणामध्ये सतत वाटू लागले ! अर्थात हा सर्व विषय प्रत्यक्ष गुरुमुखातून अध्ययन करण्याचा अर्थात संप्रदायपूर्वक वेदाध्ययन ज्याला आम्ही म्हणतो, तसा प्रत्यक्ष अधिकारी गुरुमुखातून श्रवण करण्याचा असल्याने श्रीपंडितजींनी सनातनी परंपरेतले तत्कालीन पूर्वमीमांसेचे सूर्य गणले जाणारे असे काशीस्थ श्री चिन्नास्वामी शास्त्री ह्यांच्याकडून पूर्वमीमांसेचे विधिवत अध्ययन केले ! प्रथम खंडामध्ये पंडितजींनी येविषयीं विस्ताराने लिहिले आहे. अर्थात आम्ही मागे पंडितजींचा ह्यावरील एक लेख वाचला होता, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आपल्या ह्या वंदनीय गुरूंच्या देहावसानासंबंधीच्या श्रद्धांजलीपर लेखामध्ये आपल्या गुरूंचा गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. अधिक माहितीसाठी वेदवाणी नामक काशीहून प्रकाशित होणारे एक अत्यंत अभ्यासपूर्ण असे मासिक ज्यामध्ये हा लेख आपणांस वाचण्यांस प्राप्त होईल. वेदवाणी - काशी भाद्रपद संवत २०१३, सप्टेंबर १९५६ वर्ष ८, अंक ११
https://archive.org/details/finalbook5/page/n1296/mode/1up ह्यामध्ये पृष्ठक्रमांक २३ पासून पंडितजींचा आपले गुरु श्रीचिन्नास्वामी यांच्याविषयी सविस्तर लेख आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती ! *काशीमध्ये राहूनच त्यांनी सनातनी विद्वानांकडून मीमांसाशास्त्राचे केलेलं अध्ययन* पूर्वमीमांसेतला तत्कालीन सूर्य अशी ज्यांची ख्याती होती असे महामहोपाध्याय पंडित अ. चिन्नास्वामी शास्त्री तथा पंडित पट्टाभिराम शास्त्री नामक सनातनी परंपरेतल्या व आर्य समाजाशी काही विधेयांत तात्विक विरोध असलेल्या विचारधारेतल्या मीमांंसकांकडून ह्या शास्त्राचे गहन अध्ययन केल्यामुळे त्यांचा ह्या शास्त्राविषयीचा अधिकार होता. आश्चर्य म्हणजे याच पंडित अ. चिन्ना स्वामींनी काशीच्या बनारस हिंदू विश्वविद्यापीठामध्ये स्त्रियांना वेदांच्या शिक्षणाचा अधिकार सनातनी असूनही प्रदान केला होता. काशीमध्ये त्यांच्या ह्या निर्णयाने त्यावेळी गोंधळही उडाला होता. असो तो स्वतंत्र विषय ! तर आता पदवाक्यप्रमाणज्ञ म्हणजे काय ??? पद म्हणजे व्याकरणाचे पद वाक्य म्हणजे पूर्वमीमांसेचे वाक्य प्रमाण म्हणजे न्यायशास्त्राचे प्रमाण व्याकरणन्यायमीमांसादिषु शास्त्रेषु परिणतः इति हेतोः "पदवाक्यप्रमाणज्ञ" इति! संक्षेपात सांगायचे तर ज्या मनुष्याने संप्रदायपूर्वक अर्थात अधिकारी गुरुमुखातून कैक वर्षे ह्या तीन विषयांवर अध्ययन केलेले असून ज्याला त्या विषयांमध्ये विशेष गती आहे, अशी व्यक्ती पदवाक्यप्रमाणज्ञ गणली जाते ! अशा उपाधीने गौरविली गेलेली अत्यंत थोडीच मंडळी सांप्रत समयी तर आहेतच, पण त्यावेळीही ती अत्यल्पच होती संख्येने ! असो ! तर पंडितजींचे ह्या शबरभाष्यावरील हे सप्तखंडात्मक हिंदी भाष्य प्राप्त होणे हे आम्हांस अत्यंत आनंददायक तर आहेच पण त्या ईश्वराचे अनंत उपकार आणि हे स्कॅन करणाऱ्या आमच्या आर्यसमाजी बांधवांचे महदुपकार अशा कृतज्ञ बुद्धीने आम्हांस उपकृत करणारे आहे ! याचा तृतीय खंड मात्र स्कॅन नाहीये. तो झाला की त्याचाही धागा जोडेनच ! मीमांसा दर्शन पर शबर स्वामी कृत भाष्य: खण्ड-१,२,४,५,६,७ कुल आकार- ३८५ MB
https://drive.google.com/folderview?id=1RchHldmKyM4mOktosD-EYOd0S6CeGLHt एका मर्यादेची जाणीव आम्हांस ह्याची जाणीव आहे की ही सर्व शास्त्रे ही प्रत्यक्ष गुरुमुखातून अर्थात संप्रदायपूर्वक श्रवण करून समजून घ्यायची आहेत. आणि ह्यासाठी लागणारा कालावधी आणि श्रमही हे केवळ सद्भाग्याने प्राप्त होणारे आहे. ते भाग्य आम्हांस कधी प्राप्त होईल तो ईश्वरंच जाणे ! पण निदान काही संकल्पना स्पष्ट होण्यासाठी ह्या ग्रंथांची आवश्यकता निश्चित आहे! इथे जाता जाता एक सांगावेसे वाटते ! पुण्यश्लोक छत्रपती श्रीशिवाजी महाराज, श्रीगागाभट्ट आणि पूर्वमीमांसा सांगण्यांस काहीसा आनंद आणि समाधनही वाटते की ह्या पूर्वमीमांसेशी उपरोक्त शब्दांचा घनिष्ट संबंध आहे. कारण छत्रपती घराणे हे मुळात वेदनिष्ठ तर होतेच आणि म्हणून संस्कृत भाषेविषयी छत्रपती घराण्याची निष्ठा हा स्वतंत्र चिंतनाचा विषय असला तरी इथे केवळ इतकेच सांगणे आहे की स्वतः श्रीकुमारिलभट्टपादांचे हे अपूर्ण राहिलेले कार्य करायची मनीषा श्रीगागाभट्टांच्या मनीही होती. इतकेच काय प्रत्यक्ष श्रीशिवप्रभुंनाही ही लालसा होती असे स्पष्ट प्रमाण उपलब्ध आहे. येविषयी विस्तृत विवेचन पुढील लेखामध्ये करूच ! तोपर्यंत अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु। भवदीय, पाखण्ड खण्डिणी #पूर्वमीमांसा_श्रीशबरमुनी_श्रीकुमारिल_भट्टपाद_पंडित_श्रीयुधिष्ठिर_मीमांसक_श्रीगागाभट्ट_छत्रपती_श्रीशिवाजीमहाराज

Sunday, 11 October 2020

*अ॒हमिंद्रो॒ न परा॑जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽव॑तस्थे॒ कदा॑च॒न ।* ऋग्वेद - १०।४८।५


तेरा दिवसांपूर्वी हिंदुराष्ट्रपती श्रीसावरकरांचे चरित्रकार, ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, भागवताचार्य, हिंदुत्वनिष्ठ अर्थात राष्ट्रनिष्ठ विचारवंत असे श्री वासुदेव नारायण उत्पात उपाख्य वाना हे काळाचे बोट धरून अमरपंथी निर्गमन कर्ते झाले ! एका धगधगत्या यज्ञज्वालेची समिधा मृत्यू नामक वेदीवर अर्पिली गेली. पांडित्याचा महासागर जणु शुष्क झाला. ज्वलज्जहाल नि तितक्याच रसात्मक वाणीचा सूर हरपला आणि मृत्यूच्या स्कंधावर हा पुरुषोत्तम आरूढ झाला.
त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला..आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करीत त्या पुढे अस्तमानांस जाणाऱ्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला...!
१९६६, २६ फेब्रुवारीस ज्याप्रमाणे मृत्युंजय वैनतेयाच्या प्रायोपवेशनाने सावरकर सदन ओस पडले, तद्वतच भूवैकुंठीचे ते नैऋत्येस असलेले 'राधानारायण सदन' हे आता जणू ओसंच पडले आहे. बुद्धिभेद नि तज्जन्य बुद्धीमांद्याच्या तमास दूर करणारा तो ज्ञानसूर्य आता अस्तास गेला आहे.
ज्याने आपली निष्ठा हिंदुराष्ट्र, पूर्णपुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, त्यांची पत्नी जगज्जननी श्रीरुक्मिणी माता आणि हिंदुह्रदयसम्राट सावरकर ह्या चार दैवतांसच वाहिली होती, त्या आमच्या गुरूश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे असणे हे आज नसण्यांत शब्दांकित व्हावे, ह्यापेक्षा यातनामय ते काय ???
सावरकर हा पंचाक्षरी मंत्र आमच्या अगदी बालपणी इयत्ता सातवींत ज्या मुखाग्रातून प्रथम आमच्या कर्णी लागला, त्या गुरुमंत्राची जी उपास्य देवता जिचे त्यांनी आजीवन अखंड अनुष्ठान केले, त्याच तेजोनिधीच्या वादळी जीवनाची सांगता ज्या कृतज्ञतेच्या नि कृतार्थतेच्या मार्गाने झाली, त्याच, अगदी त्याच भावनेने ह्या पुरुषश्रेष्ठाने आपली जीवनयात्रा संपविली असेल.
धन्योऽहम्! धन्योऽहम्! कर्तव्यं मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहम्! धन्योऽहम्! प्राप्तव्यं। सर्वमद्य संपन्नम्।
ते जणु आप्तकाम झाले, पूर्णकाम झाले...!
पण ते असे रिक्तकाम नको व्हायला हवे होते..कारण ते हवे होते!
ते असायला हवेच होते...एक शिष्य म्हणून माझ्यासाठी तरी त्यांचे गुरु म्हणून अस्तित्व हवेच होते...!
कारण...ज्येष्ठ साहित्यिक भाषाप्रभु श्रीपुभांच्या शब्दांतच सांगायचे तर
*"त्यांचे ते असणेही अत्यंत उपकारक होते, फार प्रेरक होते...!कारण त्यांचे ते असणे नव्हतेच, सूर्याचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही. सागराचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही, अग्नीचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही...!"*
आम्हीं पुभा ऐकले ते अप्पांच्या मुखातूनच. तेही पुभांची जन्मशताब्दी सावरकर क्रांतिमंदिरामध्ये त्यांनीच तीन दिवसीय व्याख्यानमालेत साजरी केली म्हणून.
वयाच्या ८१ मध्येही हा ज्ञानोपासक प्रत्यही १० पृष्ठे शब्दांकित करत होता. त्यांची लेखणी त्यांच्या उपास्यदेवतेप्रमाणे हिंदुत्वाची, हिंदुराष्ट्रीयत्वाची, हिंदुसंघटनाची, पाखण्ड खण्डणाची ज्योत अखंड तेवत ठेवत होती...दुष्टांवर प्रहार व सुष्टांवर स्तवनांजली अर्पण करत होती...!
प्रहार...
स्वधर्माचा, स्वराष्ट्राचा, राष्ट्रपुरुषांचा नि तज्जन्य गौरवशाली इतिहासाचा जाज्वल्य नि सगर्व अभिमान त्यांच्या चित्तांस चेतवीत होता. म्हणूनंच ह्या हिंदुधर्माचे, हिंदुत्वाचे नसलेले रिडल्स(कोडे) पाहणाऱ्यावर त्यांनी अवघ्या हिंदुस्थानात एकट्यानेच प्रतिघात केला होता...हे एकमेव कार्य ह्या विद्वत्श्रेष्ठाच्या संपूर्ण चरित्रांस ललामभूत ठरावं असं आहे...!
मऊं मेणाहुनिं आह्मीं विष्णुदास...
ह्या श्रीतुकोक्तींस त्यांचे जीवन अगदी सार्थ करणारे होते...
हिरण्यमयेन् पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम्।
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये।
या श्रुतीच्या आदेशान्वये त्या आणीबाणीच्या कारावासापश्चात् पुढे जीवनभर त्यांनी ह्या राष्ट्रधर्माचे यथोचित् पालन आपल्या लेखणीतून केलं. ह्या लेखणीबरोबरंच त्वत्स्थंडिली त्यांची वाणीही त्यांनी सहर्ष अर्पिली. त्यांची वीरश्री, त्यांचा आवेग, त्यांची विजीगीषु वृत्ती, त्यांचे पौरुषत्व सर्वकाही हिंदुत्वाच्या, हिंदुराष्ट्राच्या, देव-देश-धर्माच्या रक्षणासाठीच होते. हिंदुंच्या स्वत्वस्वाभिमानाची मानखंडना करणाऱ्या, त्यांच्या बुद्धीवर पराभूततेचा नि आत्मविस्मृतीचा कलंक लावणाऱ्या त्या राष्ट्रद्रोही दुष्प्रचारांवर त्यांनी आपल्या प्रत्युत्पन्न मतीने केलेला तो प्रहार अचंबित करणारा होता...
कलंक मतीचा झडो...
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् असे म्हणणाऱ्या योगेश्वराच्या श्रीमद्भगवद्गीतेचे ते निःस्सीम भक्त होते. हिंदुधर्मांवर, इतिहासांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपरुपी कलंकाच्या ग्रहणाचे सावट दूर करून आत्माभिमान जागृत करणारी त्यांची लेखणी होती...!
इतका सर्व विद्याव्यासंग करूनही हा मनुष्य एकीकडे लोकहिताचे राजकारण तर दुसरीकडे कलेचाही तितकाच भोक्ता होता. उत्पातांची लावणीची परंपराही समर्थपणे चालवीत होता. पण त्यांच्या ह्या रसिकतेमध्ये महाकवी कालिदासाचा आल्हाददायक शृंगार होता, बीभत्सता मात्र नव्हती...अश्लीलतेचा तर स्पर्शही नव्हती...!
सूर्यप्रभव वंशाची सत्कीर्तिगीते गाणाऱ्या त्या कविकुलगुरु महाकवि श्रीकालिदासाच्या मेघदुतांवरील त्यांची प्रवचनमालिका, त्यावरील मल्लिनाथीचे त्यांनी अत्यंत सुबोध नि आकलनीय भाषेमध्ये केलेलं चिंतन आमच्या चिरस्मरणांत राहील...!
दुर्बोध विषय अगदी सोप्प्या नि सहजगम्य भाषेत सांगायची त्यांची एक विशेष शैली होती...
मला तर ते नेहमी म्हणायचे कि तु फार जड लिहितोस नि बोलतोस. नको इतकं जड व्यक्त होऊस..आपल्याला किती येतं त्यापेक्षा आपण समोरच्यापर्यंत ते किती सुलभरीतीने पोहोचवितो हे महत्वाचे...
हा माझ्यासाठी मोलाचा उपदेश होता...
धन्यो गृहस्थाश्रमः।
इतकं वादळी जीवन जगूनही उपरोक्त उक्तीप्रमाणे ह्या सद्गृहस्थाने आपला संसार मात्र अगदी धन्य केला. दोन तपांहून अधिक काळ ज्या भागवतश्रेष्ठ शांतिब्रह्म जनार्दनशिष्योत्तम श्रीएकनाथाच्या रुक्मिणीस्वयंवरावर त्यांनी भाष्य केलं, त्याच श्रीनाथांप्रमाणे त्यांनी त्यांचा गृहस्थाश्रमही अगदी उत्तम केला. सर्व संतांमध्ये श्रीनाथांचाच संसार अगदी सर्वोत्तम झाला. अप्पांनीही तेच केलं...
प्रपंच करावा नेटका ह्या राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या वचनांसी त्यांची निष्ठा होती...!
हिंदुत्व नि हिंदुसभा हे सतीचं वाण...
"मला लोक नेहमी विचारतात की तुमचा राजकीय पक्ष कोणता? मी अखिल भारत हिंदुमहासभा हेच छातीठोकपणे सांगतो." इतकं ठणकाऊन सांगणं हे त्यांनाच जमलं. कारण हिंदुसभा नि हिंदुत्व हे सतीचं वाण फार थोड्यांना अंगी बाणवावं वाटतं. किंबहुना ते असिधाराव्रत पेलण्याचे सामर्थ्य फार काहींच्याच अंगी आहे. हे येरागबाळ्याचे कामंच नोव्हें...म्हणून की काय ते मला अधिक प्रिय नि वंदनीय होतेच नि राहतील...!

गर्व से कहों हम ब्राह्मण है।
ब्रिटीशांनी पेरलेल्या जातीद्वेषाला नि विशेषतः ब्राह्मणद्वेषाला, ज्याला पुढे काही कथित महात्म्यांनी भरीस भर घातली, मानवद्रोही डाव्यांनी ज्या ब्राह्मणद्वेषावरंच आपल्या कथित समानतेची बिगुलं नि डफली वाजविल्या, राजकीय पक्षांनीही त्यावर आपली पोळी भाजली, त्या सततच्या गोबेल्स प्रचारामुळे जो ब्राह्मण समाज निष्पाप नि निरपराध असूनही स्वतःला अकारण दोषी मानून आत्मविस्मृतीने नि अपराधी भावनेने ग्रस्त झाला, त्याच ब्राह्मण समाजांस आपल्या आत्माभिमानाचं नि गौरवाचं तेजोमयी ब्रह्मरसपान ज्यांनी आपल्या लेखणीने घडवलं, त्या ब्राह्मणश्रेष्ठाचं ब्रह्मलीन होणं...! आणि हे करताना अन्य कोणत्याही ज्ञातीविषयी एक अवाक्षरही नाही.

तुका ह्मणें सत्य सांगे, येवोत रागें येतील तें।

ही त्यांची पंढरपूरी निर्भीड वृत्ती होती. अरेला कारे म्हणायची. आयुष्यभर सत्याचीच उपासना केला. म्हणूनंच मानियेलें नाहीं बहुमता...!

त्यांच्याच भाषेत ते कुणाच्या बापाला घाबरत नव्हते...!

नाहीतर आज हिंदुत्वाच्या अर्थात राष्ट्रीयत्वाच्या नावाने 'ते आमच्याकडे यावेत' म्हणून त्यांचे वाट्टेल ते लांगुलचालन करून एका ब्राह्मण समाजांस मात्र पूर्णतः आरोपीच्या स्थानी कल्पून आपलं उजवं समाजवादी राजकीय सत्तास्थापनेचे हिंदुत्व रेटण्याची स्पर्धा आहेच...कदाचित ह्या उजव्या समाजवाद्यांच्या मते हिंदुत्वामध्ये ब्राह्मणांना काही स्थान नसावंच...!

पण अप्पा मात्र ह्यांस कधीच बळी पडले नाहीत...!

अप्पा शेवटी पूज्यनीय अप्पांकडे गेले...!

ज्या पूज्यनीय योद्धा संन्यासी स्वामी श्रीवरदानंद भारतींचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, त्या पूज्यनीय अप्पांनी आपल्या ह्या शिष्यांसही 'आपणासारिखे करितीं तात्काळ' ह्या उक्तीप्रमाणे असे केलं...अर्थात पूज्यनीय स्वामींचे सर्वच शिष्य अगदी 'आपणांसारिखेंच' आहेत. त्या गुरुश्रेष्ठांसही आपल्या शिष्योत्तमाच्या ह्या चरित्राचं निःसंशय कौतुहलंच नि अभिमानंच असावा...!

असा हा वाना नावाचा तारा हिंदुत्वाची अर्थात राष्ट्रीयत्वाची रेघ मोठी करत, ८१ वर्षे अखंडपणे ती ज्योत तेवत ठेवत, ती आपली उपास्य देवता सावरकर नावाच्या ज्योतीप्रमाणेच आपली प्राणज्योत त्या अनंतात विलीन करता झाला...!

एका तेजाची परंपरा आज खंडित झाली...एक दिवा विझून गेला...!

ह्या नररत्नांस जवळून पाहता आलं, ऐकता आलं, अनुभवता आलं इतकीच ह्या शिष्याच्या नरदेहाची सार्थकता...त्यांनी मला शिष्योत्तम मानलं व वैचारिक वारसदार मानलं इतकंच काय ते त्यांचे माझ्यावरचे न फिटणारं ऋण...!
आयुष्यभर हे दायित्व स्कंधी वाहण्याचं नि त्या गुरुने केलेल्या प्रत्येक सदुपदेशाचे यथोचित अनुकरण नि त्यांस दिलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन करणं इतकीच आदरांजली मी त्यांस वाहु शकतो...!
काय लिहु????

आज जणु माझ्या लेखणीतले शब्दंच संपलेत, वाणीही हिंपुटी झालीय नि लेखणी अवरुद्धतेने बोथट झालीय...!
आज माझं शब्दभांडार तुमच्या चरणी अक्षरशः रितं केलंय...
अप्पा...

तुमच्या चरणी ह्या तुमच्या शिष्योत्तमाचा हा विनम्र शब्दालंकार...!

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*