Sunday, 11 October 2020

*अ॒हमिंद्रो॒ न परा॑जिग्य॒ इद्धनं॒ न मृ॒त्यवेऽव॑तस्थे॒ कदा॑च॒न ।* ऋग्वेद - १०।४८।५


तेरा दिवसांपूर्वी हिंदुराष्ट्रपती श्रीसावरकरांचे चरित्रकार, ज्येष्ठ अभ्यासक, व्याख्याते, भागवताचार्य, हिंदुत्वनिष्ठ अर्थात राष्ट्रनिष्ठ विचारवंत असे श्री वासुदेव नारायण उत्पात उपाख्य वाना हे काळाचे बोट धरून अमरपंथी निर्गमन कर्ते झाले ! एका धगधगत्या यज्ञज्वालेची समिधा मृत्यू नामक वेदीवर अर्पिली गेली. पांडित्याचा महासागर जणु शुष्क झाला. ज्वलज्जहाल नि तितक्याच रसात्मक वाणीचा सूर हरपला आणि मृत्यूच्या स्कंधावर हा पुरुषोत्तम आरूढ झाला.
त्या जगन्नियंत्याने निर्माण केलेल्या ह्या जगन्नामक नाट्यरचनेचा कार्यभाग त्यागून तो त्या परमेश्वराच्या आदेशाने नेपथ्यांस जाता झाला. आपल्या इहलोकाच्या यात्रेचे संवरण करून कीर्तिशेष होऊन गेला..आपल्या दिव्य आभेंस विकीर्ण करीत त्या पुढे अस्तमानांस जाणाऱ्या प्रभाकरासमानच महाप्रस्थानासाठी अस्तांस निघता झाला...!
१९६६, २६ फेब्रुवारीस ज्याप्रमाणे मृत्युंजय वैनतेयाच्या प्रायोपवेशनाने सावरकर सदन ओस पडले, तद्वतच भूवैकुंठीचे ते नैऋत्येस असलेले 'राधानारायण सदन' हे आता जणू ओसंच पडले आहे. बुद्धिभेद नि तज्जन्य बुद्धीमांद्याच्या तमास दूर करणारा तो ज्ञानसूर्य आता अस्तास गेला आहे.
ज्याने आपली निष्ठा हिंदुराष्ट्र, पूर्णपुरुषोत्तम योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, त्यांची पत्नी जगज्जननी श्रीरुक्मिणी माता आणि हिंदुह्रदयसम्राट सावरकर ह्या चार दैवतांसच वाहिली होती, त्या आमच्या गुरूश्रेष्ठ व्यक्तिमत्वाचे असणे हे आज नसण्यांत शब्दांकित व्हावे, ह्यापेक्षा यातनामय ते काय ???
सावरकर हा पंचाक्षरी मंत्र आमच्या अगदी बालपणी इयत्ता सातवींत ज्या मुखाग्रातून प्रथम आमच्या कर्णी लागला, त्या गुरुमंत्राची जी उपास्य देवता जिचे त्यांनी आजीवन अखंड अनुष्ठान केले, त्याच तेजोनिधीच्या वादळी जीवनाची सांगता ज्या कृतज्ञतेच्या नि कृतार्थतेच्या मार्गाने झाली, त्याच, अगदी त्याच भावनेने ह्या पुरुषश्रेष्ठाने आपली जीवनयात्रा संपविली असेल.
धन्योऽहम्! धन्योऽहम्! कर्तव्यं मे न विद्यते किंचित्।
धन्योऽहम्! धन्योऽहम्! प्राप्तव्यं। सर्वमद्य संपन्नम्।
ते जणु आप्तकाम झाले, पूर्णकाम झाले...!
पण ते असे रिक्तकाम नको व्हायला हवे होते..कारण ते हवे होते!
ते असायला हवेच होते...एक शिष्य म्हणून माझ्यासाठी तरी त्यांचे गुरु म्हणून अस्तित्व हवेच होते...!
कारण...ज्येष्ठ साहित्यिक भाषाप्रभु श्रीपुभांच्या शब्दांतच सांगायचे तर
*"त्यांचे ते असणेही अत्यंत उपकारक होते, फार प्रेरक होते...!कारण त्यांचे ते असणे नव्हतेच, सूर्याचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही. सागराचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही, अग्नीचे असणे हे नुसते 'असणे' असत नाही...!"*
आम्हीं पुभा ऐकले ते अप्पांच्या मुखातूनच. तेही पुभांची जन्मशताब्दी सावरकर क्रांतिमंदिरामध्ये त्यांनीच तीन दिवसीय व्याख्यानमालेत साजरी केली म्हणून.
वयाच्या ८१ मध्येही हा ज्ञानोपासक प्रत्यही १० पृष्ठे शब्दांकित करत होता. त्यांची लेखणी त्यांच्या उपास्यदेवतेप्रमाणे हिंदुत्वाची, हिंदुराष्ट्रीयत्वाची, हिंदुसंघटनाची, पाखण्ड खण्डणाची ज्योत अखंड तेवत ठेवत होती...दुष्टांवर प्रहार व सुष्टांवर स्तवनांजली अर्पण करत होती...!
प्रहार...
स्वधर्माचा, स्वराष्ट्राचा, राष्ट्रपुरुषांचा नि तज्जन्य गौरवशाली इतिहासाचा जाज्वल्य नि सगर्व अभिमान त्यांच्या चित्तांस चेतवीत होता. म्हणूनंच ह्या हिंदुधर्माचे, हिंदुत्वाचे नसलेले रिडल्स(कोडे) पाहणाऱ्यावर त्यांनी अवघ्या हिंदुस्थानात एकट्यानेच प्रतिघात केला होता...हे एकमेव कार्य ह्या विद्वत्श्रेष्ठाच्या संपूर्ण चरित्रांस ललामभूत ठरावं असं आहे...!
मऊं मेणाहुनिं आह्मीं विष्णुदास...
ह्या श्रीतुकोक्तींस त्यांचे जीवन अगदी सार्थ करणारे होते...
हिरण्यमयेन् पात्रेण सत्यस्याऽपिहितं मुखम्।
तत्त्वं पूषन् अपावृणु सत्यधर्माय दृष्टये।
या श्रुतीच्या आदेशान्वये त्या आणीबाणीच्या कारावासापश्चात् पुढे जीवनभर त्यांनी ह्या राष्ट्रधर्माचे यथोचित् पालन आपल्या लेखणीतून केलं. ह्या लेखणीबरोबरंच त्वत्स्थंडिली त्यांची वाणीही त्यांनी सहर्ष अर्पिली. त्यांची वीरश्री, त्यांचा आवेग, त्यांची विजीगीषु वृत्ती, त्यांचे पौरुषत्व सर्वकाही हिंदुत्वाच्या, हिंदुराष्ट्राच्या, देव-देश-धर्माच्या रक्षणासाठीच होते. हिंदुंच्या स्वत्वस्वाभिमानाची मानखंडना करणाऱ्या, त्यांच्या बुद्धीवर पराभूततेचा नि आत्मविस्मृतीचा कलंक लावणाऱ्या त्या राष्ट्रद्रोही दुष्प्रचारांवर त्यांनी आपल्या प्रत्युत्पन्न मतीने केलेला तो प्रहार अचंबित करणारा होता...
कलंक मतीचा झडो...
न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् असे म्हणणाऱ्या योगेश्वराच्या श्रीमद्भगवद्गीतेचे ते निःस्सीम भक्त होते. हिंदुधर्मांवर, इतिहासांवर घेतल्या जाणाऱ्या आक्षेपरुपी कलंकाच्या ग्रहणाचे सावट दूर करून आत्माभिमान जागृत करणारी त्यांची लेखणी होती...!
इतका सर्व विद्याव्यासंग करूनही हा मनुष्य एकीकडे लोकहिताचे राजकारण तर दुसरीकडे कलेचाही तितकाच भोक्ता होता. उत्पातांची लावणीची परंपराही समर्थपणे चालवीत होता. पण त्यांच्या ह्या रसिकतेमध्ये महाकवी कालिदासाचा आल्हाददायक शृंगार होता, बीभत्सता मात्र नव्हती...अश्लीलतेचा तर स्पर्शही नव्हती...!
सूर्यप्रभव वंशाची सत्कीर्तिगीते गाणाऱ्या त्या कविकुलगुरु महाकवि श्रीकालिदासाच्या मेघदुतांवरील त्यांची प्रवचनमालिका, त्यावरील मल्लिनाथीचे त्यांनी अत्यंत सुबोध नि आकलनीय भाषेमध्ये केलेलं चिंतन आमच्या चिरस्मरणांत राहील...!
दुर्बोध विषय अगदी सोप्प्या नि सहजगम्य भाषेत सांगायची त्यांची एक विशेष शैली होती...
मला तर ते नेहमी म्हणायचे कि तु फार जड लिहितोस नि बोलतोस. नको इतकं जड व्यक्त होऊस..आपल्याला किती येतं त्यापेक्षा आपण समोरच्यापर्यंत ते किती सुलभरीतीने पोहोचवितो हे महत्वाचे...
हा माझ्यासाठी मोलाचा उपदेश होता...
धन्यो गृहस्थाश्रमः।
इतकं वादळी जीवन जगूनही उपरोक्त उक्तीप्रमाणे ह्या सद्गृहस्थाने आपला संसार मात्र अगदी धन्य केला. दोन तपांहून अधिक काळ ज्या भागवतश्रेष्ठ शांतिब्रह्म जनार्दनशिष्योत्तम श्रीएकनाथाच्या रुक्मिणीस्वयंवरावर त्यांनी भाष्य केलं, त्याच श्रीनाथांप्रमाणे त्यांनी त्यांचा गृहस्थाश्रमही अगदी उत्तम केला. सर्व संतांमध्ये श्रीनाथांचाच संसार अगदी सर्वोत्तम झाला. अप्पांनीही तेच केलं...
प्रपंच करावा नेटका ह्या राष्ट्रगुरु श्रीसमर्थांच्या वचनांसी त्यांची निष्ठा होती...!
हिंदुत्व नि हिंदुसभा हे सतीचं वाण...
"मला लोक नेहमी विचारतात की तुमचा राजकीय पक्ष कोणता? मी अखिल भारत हिंदुमहासभा हेच छातीठोकपणे सांगतो." इतकं ठणकाऊन सांगणं हे त्यांनाच जमलं. कारण हिंदुसभा नि हिंदुत्व हे सतीचं वाण फार थोड्यांना अंगी बाणवावं वाटतं. किंबहुना ते असिधाराव्रत पेलण्याचे सामर्थ्य फार काहींच्याच अंगी आहे. हे येरागबाळ्याचे कामंच नोव्हें...म्हणून की काय ते मला अधिक प्रिय नि वंदनीय होतेच नि राहतील...!

गर्व से कहों हम ब्राह्मण है।
ब्रिटीशांनी पेरलेल्या जातीद्वेषाला नि विशेषतः ब्राह्मणद्वेषाला, ज्याला पुढे काही कथित महात्म्यांनी भरीस भर घातली, मानवद्रोही डाव्यांनी ज्या ब्राह्मणद्वेषावरंच आपल्या कथित समानतेची बिगुलं नि डफली वाजविल्या, राजकीय पक्षांनीही त्यावर आपली पोळी भाजली, त्या सततच्या गोबेल्स प्रचारामुळे जो ब्राह्मण समाज निष्पाप नि निरपराध असूनही स्वतःला अकारण दोषी मानून आत्मविस्मृतीने नि अपराधी भावनेने ग्रस्त झाला, त्याच ब्राह्मण समाजांस आपल्या आत्माभिमानाचं नि गौरवाचं तेजोमयी ब्रह्मरसपान ज्यांनी आपल्या लेखणीने घडवलं, त्या ब्राह्मणश्रेष्ठाचं ब्रह्मलीन होणं...! आणि हे करताना अन्य कोणत्याही ज्ञातीविषयी एक अवाक्षरही नाही.

तुका ह्मणें सत्य सांगे, येवोत रागें येतील तें।

ही त्यांची पंढरपूरी निर्भीड वृत्ती होती. अरेला कारे म्हणायची. आयुष्यभर सत्याचीच उपासना केला. म्हणूनंच मानियेलें नाहीं बहुमता...!

त्यांच्याच भाषेत ते कुणाच्या बापाला घाबरत नव्हते...!

नाहीतर आज हिंदुत्वाच्या अर्थात राष्ट्रीयत्वाच्या नावाने 'ते आमच्याकडे यावेत' म्हणून त्यांचे वाट्टेल ते लांगुलचालन करून एका ब्राह्मण समाजांस मात्र पूर्णतः आरोपीच्या स्थानी कल्पून आपलं उजवं समाजवादी राजकीय सत्तास्थापनेचे हिंदुत्व रेटण्याची स्पर्धा आहेच...कदाचित ह्या उजव्या समाजवाद्यांच्या मते हिंदुत्वामध्ये ब्राह्मणांना काही स्थान नसावंच...!

पण अप्पा मात्र ह्यांस कधीच बळी पडले नाहीत...!

अप्पा शेवटी पूज्यनीय अप्पांकडे गेले...!

ज्या पूज्यनीय योद्धा संन्यासी स्वामी श्रीवरदानंद भारतींचं त्यांनी शिष्यत्व पत्करलं, त्या पूज्यनीय अप्पांनी आपल्या ह्या शिष्यांसही 'आपणासारिखे करितीं तात्काळ' ह्या उक्तीप्रमाणे असे केलं...अर्थात पूज्यनीय स्वामींचे सर्वच शिष्य अगदी 'आपणांसारिखेंच' आहेत. त्या गुरुश्रेष्ठांसही आपल्या शिष्योत्तमाच्या ह्या चरित्राचं निःसंशय कौतुहलंच नि अभिमानंच असावा...!

असा हा वाना नावाचा तारा हिंदुत्वाची अर्थात राष्ट्रीयत्वाची रेघ मोठी करत, ८१ वर्षे अखंडपणे ती ज्योत तेवत ठेवत, ती आपली उपास्य देवता सावरकर नावाच्या ज्योतीप्रमाणेच आपली प्राणज्योत त्या अनंतात विलीन करता झाला...!

एका तेजाची परंपरा आज खंडित झाली...एक दिवा विझून गेला...!

ह्या नररत्नांस जवळून पाहता आलं, ऐकता आलं, अनुभवता आलं इतकीच ह्या शिष्याच्या नरदेहाची सार्थकता...त्यांनी मला शिष्योत्तम मानलं व वैचारिक वारसदार मानलं इतकंच काय ते त्यांचे माझ्यावरचे न फिटणारं ऋण...!
आयुष्यभर हे दायित्व स्कंधी वाहण्याचं नि त्या गुरुने केलेल्या प्रत्येक सदुपदेशाचे यथोचित अनुकरण नि त्यांस दिलेल्या प्रत्येक शब्दाचं पालन करणं इतकीच आदरांजली मी त्यांस वाहु शकतो...!
काय लिहु????

आज जणु माझ्या लेखणीतले शब्दंच संपलेत, वाणीही हिंपुटी झालीय नि लेखणी अवरुद्धतेने बोथट झालीय...!
आज माझं शब्दभांडार तुमच्या चरणी अक्षरशः रितं केलंय...
अप्पा...

तुमच्या चरणी ह्या तुमच्या शिष्योत्तमाचा हा विनम्र शब्दालंकार...!

*धन्यं यश: सुरभितं विमलं कुलन्ते,*
*धन्य: पिता गुणवती जननी च धन्या ।*
*धन्या च गौरववती खलु जन्म-भूमि:,*
*त्वद्-वर्त्मनोsनुगमने वयमत्र धन्या: ।*

No comments:

Post a Comment