Friday, 31 January 2020

#गांधींचे_खरे_मारेकरी_कोण??? #पटेल_नेहरु_की_काँग्रेस???



*गांधीवाद त्यादिवशीच संपला, ज्यादिवशी आह्मां ब्राह्मणांच्या सरसकट कत्तली झाल्या नि घरं जाळली गेली, जमिनी गेल्या. माझ्या आजोबांचे घर जाळलंय बरंका. नाही म्हणजे काही गांजेकस आज हे खोटंय म्हणतात म्हणून. पण तो इतिहास आह्मीं विसरलो नि पुढे आलो. विद्रोह करत बसलो नाही की कधी एल्गार पण केला नाही. आह्मीं चोवीस तास ते रेटतही बसलो नाही नि पुढे रेटणारही नाही. असो...*

पण त्या गांधींचा नि गांधीवादाचा खरा मारेकरी कोण हा शोध अद्यापही घेणं आवश्यक आहे.

*अनेक प्रश्न आहेत, जे अनुत्तरित आहेत.*

उदाहरणार्थ...

*अनेकवेळा काँग्रेस विसर्जित करा असं म्हणणारे गांधी काँग्रेसला नकोसे झाले होते का???*

*गांधीवध ही गांधींच्या ५५कोटींच्या हेकेखोरीचाच परिणाम आहे असे कथित सरदार पटेल राजाजींना म्हटल्याचे राजाजींनी गांधींजींवरच्या चरित्रांत स्पष्टपणे लिहिलंय. कपुर कमिटी रिपोर्टमध्येही हा संदर्भ आहेच. आह्मीं मागेही ह्यावर ससंदर्भ लिहिलं होतंच.*

गांधींनी बहुमत असताना पटेलांना डावलून नेहरुंना पंतप्रधानपदावर बसवलं हा घाव पटेलांच्या वर्मी लागला नसेल कशावरून???

पटेलांचा भला मोठा पुतळा गुजराती मानसिकतेतून उभारल्याने पटेलांच्या पडद्यामागच्या चरित्रांकडे पहायला आह्मीं तयारंच नाही आहोत.

*महाराष्ट्रांपूरता विचार करता पटेल हे अत्यंत गुजराती मानसिकतेचे महाराष्ट्रद्वेष्टे होते ह्याचे अनेक संदर्भ उपलब्ध आहेत. पटेलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या संग्रामांस केलेला प्रखर विरोध तर सर्वांस ज्ञात आहे. पटेलांच्या अंतःकरणांत महाराष्ट्रीय ब्राह्मणांविषयी असलेला रागही अनेकांना ज्ञात नसला तरी तो कागदोपत्रांतून नि त्यांच्या व्याख्यानांतून नि कृतीतून दिसतोच. हिंदुराष्ट्रपती श्रीस्वातंत्र्यवीरांच्या पुढाकाराने आरंभ झालेला नौदल सत्याग्रह दडपून टाकण्यांत पटेलांचा वाटा सर्वांनी एकदा अभ्यासावाच. हे पटेलांचे कृत्य किती घातकी नि नीचपणाचे होते हे सूज्ञ जाणतीलंच.*

*इतकंच काय पण गांधीवधापश्चात श्रीसावरकरांना अकारण कारावासांत डांबणारे सावरकरद्वेष्टे पटेल हे सरदार त्यांच्यासाठीच अर्थात सावरकरद्वेष्ट्यांसाठीच असु शकतात, आमच्यासाठी ते सरदार नाहीतंच नि होऊही शकत नाहीत. अर्थात पटेलांची कुंडली मांडायची ही वेळ नव्हे.* पण पटेल गांधीवधाच्या मागे असतील ही शक्यता नाकारता येत नाही. भले काहींना हे सर्व सत्य जाणून घ्यायची इच्छा नाहीच. कारण आता पुतळा उभारलाय ना???

*गांधींना मारायचे सहा-सात प्रयत्न खरंच झाले होते का???*

काही जण बेंबीच्या देठापासून सतत बोंबलताना दिसतात की म्हणे गांधीवधाचे आधीही प्रयत्न झाले होते. *हे विधान कपुर कमिटी रिपोर्टने पूर्ण असत्य ठरविले आहे, जो स्वतः काँग्रेसने संस्थापिला होता. त्यामुळे ह्यात तथ्य तर काहीच नाही.* पण क्षणभर असे प्रयत्न सत्य मानले तरी प्रश्न निर्माण होतो की मग इतक्या वेळ ही काँग्रेस, नेहरु-पटेलादि गांधीभक्त झोपा काढत होते काय???

एकीकडे गांधींना राष्ट्रपिता म्हणून मिरवायचं नि दुसरीकडे गांधीजींच्या सुरक्षेमध्ये ढिलाई करायची...हा कुठला न्याय???

*गांधीजीको मरने दो, हमें हमारा हक दो अशा घोषणा अनेक गांधीवाद्यांनीच केल्याचा स्पष्टोल्लेख आहे. अगदी सरोजिनी नायडुही गांधींवर चिडल्याचा उल्लेख आहे.*

*बरं ह्या सर्वांत नेहरु काय झोपा काढत होते का ?*

*गृहखाते काय करत होते ? कारण गृहमंत्री तर पटेलंच होते.*

ह्या सर्व गोष्टी कशाचा निर्देश करतात???

आता ह्यातून त्यांचा लाभ नेमका काय होता असा प्रश्न पडतोच...

गांधी काँग्रेस संपवायला निघाले होते, जे पटेल-नेहरुदिंना नको होते. त्यामुळे त्यांचा काटा काढणं आवश्यक होते. त्यामुळे गांधीवधाचे संभाव्य लाभ ह्यांना निम्नलिखित होते.

१. *गांधी गेल्यामुळे काँग्रेस वाचली हा प्रथम लाभ...*

२. *गांधीवधातून हिंदुत्ववादी चळवळ पूर्ण बदनाम करता येईल नि विशेषतः हिंदुसभेला नि संघाला संपविता येईल ही पटेलांची योजना असावीच.* अर्थात पुढे संघानी गोळवलकरांच्या नेतृत्वाखाली सोडवणूक करून घेतली. त्यावर पुन्हा केंव्हातरी...

३. *पटेल ब्राह्मणद्वेष्टे होतेच. त्यामुळे पंडित नथुराम गोडसेंना हाताशी धरून महाराष्ट्रांतली ब्राह्मणद्वेषाची लाट आणखी मोठी करता येईल हा पटेलांचा सूप्त हेतु असु शकतोच. आम्ही वरंच लिहिलंय की पटेलांच्या मनांत महाराष्ट्रीय ब्राह्मण नि त्यातही चित्पावनांविषयी विशेष द्वेष होता.* ह्याचे संदर्भ उपलब्ध आहेतंच.

४. *महाराष्ट्राची प्रतिमा कायमची मलीन करता येईल.*

५. *गांधीवधाच्या सहानुभूतींवर काँग्रेसला सतत सत्तेत राखता येईल..*

आणखीही खूप प्रश्न आहेत. तूर्तांस इतकंच.

विस्ताराने पुढे येऊच.

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#गांधीवध_पटेलनेहरु_काँग्रेस_संगनमत

Monday, 13 January 2020

उदीच्यै दिशे सोमाय च नम: ।




आम्ही हिंदु आमच्या नित्याच्या संध्येमध्ये जे दशदिशांस दिग्वंदन करतो, त्यात उत्तरदिशेंस उपरोक्त शीर्षक मंत्रांने अभिवादन करतो. आमच्या प्राचीन ऋषिमूनींनी आम्हा हिंदुंना तो विश्वदिग्विजयाचा वारसा प्रदान करताना दशदिशांचे हे दिग्वंदन ऋग्वेदाच्या कृण्वन्तो विश्वमार्यम् ह्या मंत्राज्ञेने दिला. आणि म्हणून तो वारसा नित्याच्या संकल्पांत आम्ही सानंद गातो.

भगवान वेदप्रणीत विश्वदिग्विजयाची आकांक्षा उरी बाळगणारे नि तदनुसार सर्व विश्वभर संचार करणारे हिंदु मधील काळातल्या बौद्ध नि जैनांच्या आत्यंतिक अहिंसेच्या रेट्यामुळे ह्या सत्वस्वाभिमानांस विस्मृत झाले आणि षंढ नि आत्मघातकी अहिंसेची भोंगळ गप्पाष्टके गात बसले. क्षात्रतेजाने हीन झालेला हा हिंदु समाज म्हणूनच अडीच सहस्त्र वर्षे ग्रीक(यवन), शक, कुशाण, हुण, म्लेंच्छ, मुसलमान, इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्या सर्वांस रणी धुळींस मिळवत आलाच हेही तितकंच सत्य.

ह्याच मधील काळात धर्मांध म्लैंच्छ अर्थात मूस्लिमांच्या परकीय आक्रमणांस पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या, श्रीशंभुछत्रपतींच्या खड्गाच्या धारेने जे हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेने तेजस्वी प्रत्युत्तर दिलं, त्याच स्वराज्याचं साम्राज्यात रुपांतर करून थोरल्या श्रीमंत बाजीरावांनी हा वारसा पुढे मराठ्यांना हस्तांतरित केला.

तो वारसा म्हणजेच पानिपत...!

*पुण्यश्लोक श्रीशिवप्रभुंच्या दक्षिणदिग्विजयापश्चात उत्तर दिग्विजयाचे स्वप्न पूर्ण करण्यांस उदीच्येंस प्रस्थान करणारे तेजस्वी नि रणधुरंधर मराठे नि त्या विजीगीषु परमोज्ज्वल इतिहासाचा तो क्षण म्हणजेच पानिपत !*

त्या आधी एक वर्ष...

*बचेंगे तो और भी लढेंगे ।*

*दत्ताजी शिंदे रणामाजी विद्ध्य...*
रचना - परमादरणीय श्रीसंभाजीराव भिडे गुरुजी 

१० जानेवारी, १७६०

महाभारतातला एक प्रसंगय. धनुर्धर वीरश्रेष्ठ अर्जुनाच्या श्रीकृष्णभगिनी सुभद्रेपासून जन्मलेल्या अभिमन्यु नामक वीरांस कौरवांनी सर्वांनी मिळून युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन रणी धूळींस मिळवलं. तरीही त्या तेजस्वी युवकाच्या मुखातून त्यावेळी जे शब्द पडले असावेत पण जे इतिहासाला नि भारतकारांना ज्ञात असावेत; परंतु ते शब्दबद्ध झाले नसावेत, त्यापरीची ती प्रेरणा तरी तीच असावी, तसेच हे दत्ताजींचे उपरोक्त शब्द.

त्यादिवशी त्या रणधुरंदर दत्ताजी शिंदेंच्या त्या देहांस गिलच्यांनी धरतांच दत्तांजींस तो प्रश्न केला.

*क्यौं पटेल और लढोगे ?*

तेंव्हा वारस होऊ अभिमन्युचे असा तेजस्वी बाणा अंगी धारण केलेल्या त्या दुध आईचे तेजप्रवाही नसांतूनी सळसळणार्या त्या दत्ताजींनी तितक्याच बाणेदारपणे त्यांस उत्तर दिलें.

*हाँ बचैंगे तो और लढेंगे ।*

ज्या धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे कौरव पांडवांचे पंचेचाळीस लक्षांचे देह संगरी शोणितांस प्राप्त झाले, त्याच भूमींस तो उत्तरदिग्विजय पुढे एक वर्षांनी मराठ्यांनी त्याच पानपतांवर साकार केला.

*लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या, आणि चिल्लरखुर्दा किती गेल्या ह्याची गणतीच नाही.*

काय आवश्यकता होती मराठ्यांनाच पानपतांवर जायची ? काय आवश्यकता होती लाख बांगडी फोडायची ? का ? कोण तो अब्दाली ? कुठली ती दिल्लीतली खिळखिळी झालेली पातशाही ? तिच्या संरक्षणासाठी नि अब्दालीचे संकट मोडण्यासाठी काय कारण म्हणून मराठ्यांनी स्वराज्य सोडून पानपतांवर जायचं ?

ह्याचे उत्तर आम्ही हिंदु मराठे म्हणून जेंव्हा स्वत:स विचारु, तेंव्हाच आमच्या ह्या परमोज्ज्वल इतिहासाचे दिग्दर्शन आम्हांस प्राप्त होईल.

*ते उत्तर आहे महाराष्ट्रधर्म ह्या शब्दांत.*

इथे मराठा ही वृत्ती आहे, जात नव्हे. देव, देश नि धर्माच्या रक्षणासाठी भगवा ध्वज हाती घेऊन उरी नि मुखांत तो हर हर महादेवाचा मंत्र घेऊन स्वराज्यरक्षण नि वृद्धीसाठी दिगदिगांतात भ्रमण करणारा तो तेजस्वी मराठा.

*बहोत लोक मेळवावें, एक विचारें भरावें ।*
*कष्टें करुन घसरावें, म्लेंच्छावरिं ।*

ह्या समर्थोक्तीप्रमाणे नि

*आमुचा स्वदेश ।*
*भुवनत्रयामध्ये वास ।*

ह्या जगद्गुरु तुकोक्तीप्रमाणे सर्व विश्वसाम्राज्य संपादन करण्याची अभिलाषा अंत:करणांत धारण करणारा तो हिंदु मराठा !

*इतिहासाचार्य वि का राजवाड्यांच्या भाषेत सहिष्णु हिंदुंस जयिष्णु करणारा तो मराठा नि त्याचा तो विजीगीषु असा महाराष्ट्रधर्म !*

पानपत समजून घ्यायचे असेल तर मागेच म्हटल्याप्रमाणे इतिहासाचार्य वि का राजवाड्यांचा *मराठ्यांच्या इतिहासाची साधने - खंड एक - १२७ पृष्ठांची द्वादश प्रकरणात्मक प्रस्तावना* नि त्यानंतर रियासतकार सरदेसाईंची *मराठी रियासत : मध्य विभाग ३: पानिपत प्रकरण (१७५०-१७६१)* आणि शंकर नारायण जोशींचे  *भाऊंच्या वीरकथा व पानिपत कुरुक्षेत्र वर्णन* हेही वाचनीय आहे. अभ्यासायला हवं. आणि शेवटी श्री उदय कुलकर्णींचे *सौल्स्टिस एट पानिपत* हे मूळ आंग्ल किंवा त्याचा मराठी अनुवाद तरी.

हे ग्रंथ पानपत आकळण्यासाठी अत्यावश्यकच आहेत.

इतिहासाचार्य लिहितात.

*गिलच्यांच्या धिप्पाड आणि अर्बुद शरीरांपुढे मराठ्यांच्या लहान व वामन मूर्तीचा टिकाव लागला नाही म्हणून एक आक्षेप आहे. गिलच्यांच्या लांबी रुंदी पेक्षा मराठ्यांच्या शरीराचें क्षेत्रफळ कदाचित लहान असेल परंतु लढाईत या क्षेत्रफळावर मोठी भिस्त असते असे नाही. कर्नाटकातील राठ आणि धिप्पाड शेतकरी, मथुरावृंदावनातील गलेलठ्ठ बैरागी, पंजाबातील उंच धिप्पाड व ठिसुळ शीख, रजपुतान्यातील रुंद छाताडाचे व भरगच्च मासाचे राठोड,  या सर्वांना लहान्या परंतु काटक मराठ्यांनी वेळोवेळी चीत केले होते. त्या मराठ्यांना अर्बुज गिलचांचे किंवा पृथ्वीच्या पाठीवरील कोणत्याही मनुष्याचे भय मागे कधीं वाटले नाही व पुढे कधीं वाटणारही नाही.*

पृष्ठ क्रमांक ९१ - मईसा खंड प्रथम - प्रस्तावना

*पानपत आपण खरंच हरलो का ?*

शं ना जोशींनी पानपताविषयी जे अंतिम मत उपरोक्त ग्रंथात व्यक्त केलंय ते पाहुयांत.

*पानिपतचा हा संग्राम मराठ्यांची कीर्ति यावच्चंद्रदिवाकरौ उज्ज्वल राखील; कितीही राज्यक्रांत्या किंवा घडामोडी झाल्या तरी या पानिपतच्या आठवणीनें मराठ्यांच्या बाहूंस स्फुरण चढेल, आणि कोणत्याही देशाचे राज्य करण्यांस मराठे सर्वथैव लायक आहेत याची खात्री हा प्रसंग निरंतर पटवीत राहील यात तिळमात्र शंका नाही.*

एवंच ह्या इतिहासांस वंदन करून नि त्या सर्व नररत्नांस त्यांच्या असीम त्यागासाठी नि अपरिमित शौर्यासाठी दंडवत करून लेखणींस विराम देतो !

जयोस्तु हिंदुराष्ट्रम् !
जयोस्तु महाराष्ट्रधर्म !
जयोस्तु राष्ट्ररक्षक मराठा !

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#पानिपत_राष्ट्ररक्षकमराठे_जयिष्णुहिंदु_महाराष्ट्रधर्म_राजवाडे_उत्तरदिग्विजय

वेद में इतिहास नहीं - प्रियरत्न आर्ष - ग्रंथ परिचय



सर्वेषां तु स नामानि कर्माणि च पृथक् पृथक्।
वेदशब्देभ्यः एवादौ पृथक्संस्थाश्च निर्ममे।
मनुस्मृति - १।२१

केवल भारताचाच नव्हे तर विश्वाचा आद्यग्रंथ वेद मानले जातात. अशा वेदांमध्ये इतिहास शोधण्याची प्रवृत्ती स्वाभाविक असली तरी ती स्तुत्य नाही. वेदांमध्ये राम-कृष्ण, विश्वामित्र-वसिष्ठ, सरस्वती-अयोध्या-गांधार आदि शब्द दिसले रे दिसले की लगेचच त्यांचा संबंध इतिहासकालीन व्यक्तींशी, राजांशी, ऋषींशी, नद्यांशी किंवा कोणत्याही स्थानांशी जोडून वेदांचा काळ किंवा निर्मिती सिद्ध करण्याचा अट्टाहास सर्व विद्वान करताना दिसतात. म्हणूनंच वेदांमध्ये इतिहास शोधणार्यांची आम्हांस कीव येते असे आम्हीं आजपर्यंत अनेकवेळा लिहिलं आहे. मानवसृष्ट्यारंभी प्रकट झालेल्या नित्य अशा वेदांमध्ये इतिहास कसा बरं असेल? पण पाश्चात्य तर राहुदेतंच पण त्यांना बुद्धी गहाण टाकलेले एतद्देशीय विद्वानही एकवेळ फारतर राहुदेत..पण स्वतःला सनातनी परंपरेतले म्हणविणारे, षड्दर्शने नि षड्वेदाङ्गांसहित संप्रदायपूर्वक वेदाध्ययन केलेले विद्वानही जेंव्हा वेदांमध्ये अवतारवाद, राम-कृष्णाचे उल्लेख, सरस्वती नदीचा शोध, विश्वामित्रादि ऋषींचे उल्लेख आदि आदि इतिहास शोधायचा प्रयत्न करतात, तेंव्हा आम्हांस अत्यंत खेद होतो. अशा सर्वांसाठी वेदांत इतिहास आहे की नाही ह्याविषयी उत्तम समाधान करणारी ही पुस्तिका आहे...

दीड वर्षांपूर्वीच ही अभ्यासली होती. पण मधील काळांत अप्राप्य झाली नि परवा रात्री अचानक प्राप्त झाली म्हणून ग्रंथपरिचयासाठी हा लेखनप्रपंच...

वेदांमधले ऋषि

ह्यावर आम्ही मागेही एक विस्तारपूर्वक लेख लिहिलाच आहे. पण अधिक अध्ययनासाठी प्रस्तुत लेखकाने केलेलं विवेचन अत्यंत उपयुक्त आहे. आणखीही दोन ग्रंथ चिंतनीय आहेत. वेदांमध्ये विश्वामित्र-वसिष्ठादि शब्द आले की लगेचच त्यांचा इतिहासपरक अर्थ काढून रामायणकालाशी किंवा कोणत्या तरी काळाशी त्या मंत्रांचा किंवा सूक्तांचा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला जातो जो अत्यंत निंदनीय आहे....

चारीही वेदांमध्ये ८६२ पदार्थांचे वर्णन आहे, ज्यामध्ये ३८६ केवळ ऋषी आहेत, ७१ ऋषि देवता आहेत तर अन्य ४०५ केवळ देवता आहेत. प्रस्तुत लेखकाने ह्यावर फार विस्तारपूर्वक चिंतन केलेलं आहे.

वेदांतले सर्व शब्द हे यौगिक आहेत. ते धातुज आहेत. त्यांचा इतिहासकालीन व्यक्तींशी, संस्थांशी, स्थानांशी जो काही संबंध आहे तो लेखारंभी प्रकट केलेल्या श्लोकानुसार आहे. ज्याचा अर्थ हा आहे की वेदांतल्या शब्दांवरून नंतरच्या काळांत सर्व वस्तुंची नि संस्थांची नावे ठेवली गेली आहेत. वेदांतल्या शब्दांचे जे अर्थ प्रकट होतात त्या अर्थाचे ग्रहण करून तशी नावे नंतरच्या काळांत धारण केली गेली आहेत. ह्यावरून वेद हे सर्वात आधी सिद्ध होतात नि मग सर्व इतर वस्तु किंवा व्यक्ती.

पण आपल्या स्वार्थी अट्टाहासासाठी हेतुपुरस्सर वेदांत इतिहास शोधणे नि वेदांविषयी वाट्टेल ते लेखन करणे ही एक विकृत परंपरा आहे. ही परंपरा काही नवीन आहे असे नव्हे....

निरुक्तकार यास्काचार्यांनी इतिहासपक्षाचा उल्लेख केलाच आहे..

निरुक्तकारांच्या काळीही वेदांमध्ये इतिहास शोधणारे लोक होतेच हे ते 'इत्याख्यानम्' किंवा 'इत्यैतिहासिकाः' ह्या शब्दांवरून प्रकट करतातंच. अर्थात त्यांनी त्याचे सप्रमाण खंडणही केलंच आहे. त्यामुळे हा इतिहास शोधण्याचा पक्ष अगदी काही नूतन नसला तरी तो त्याज्य निश्चितंच आहे.

वेदांमध्ये इतिहास का नाही नि ही प्रवृत्ती वेदार्थ प्रतिपादनांत का घातुक आहे हे आम्ही जे अट्टाहासाने मांडताहोत, त्यांत आमचा व्यक्तिगत स्वार्थ काहीच नाहीये. ह्यासाठी आम्ही प्रत्यक्ष वेदांचीच अंतःसाक्षी देण्यांस तयार आहोत. वैदिक साहित्याचीही आहेच. उपरोक्त ग्रंथ त्यादृष्टीने सहाय्यभूत होईल म्हणून हा परिचय...

प्रस्तुत लेखकाने *यम-पितृ परिचय* नावाचा आणखी एक ग्रंथ लिहिला आहे तोही चिंतनीय आहे. त्यावरही आम्ही विस्ताराने येऊच....

उपरोक्त ग्रंथ प्राप्त होण्यासाठी निम्नलिखित धागा

https://drive.google.com/file/d/11yFCTUYyjnjkcyCI8ueEsNNQEuwGWpRc/view?usp=drivesdk

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#वेदांमध्येइतिहास_अपौरुषेयत्व_नित्यअनित्य_भारतीयइतिहास_निरुक्त_रामकृष्ण_ऋषि_सरस्वती

Sunday, 12 January 2020

डाव्यांचे सोयीस्कर कथित विद्रोही, कथित पू-रोगामी विवेकानंद...




सर्वप्रथम सर्वांना विश्वमानव श्रीमत्स्वामी विवेकानंद जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विलंबाने शुभेच्छा! राजमाता आदरणीय जिजाऊसाहेबांच्या प्रतीही विनम्र अभिवादन !

डाव्यांना अर्थात स'माज'वाद्यांना, साम्यवाद्यांना, पू-रोगाम्यांना, कथित विवेकाचा आवाज बुलंद करणार्यांना, कथित बुद्धिवाद्यांना, कथित विद्रोह्यांना, कथित सर्वधर्मसमभाववाल्यांना, कथित शेक्युलरांना आज कित्ती कित्ती वाईट्ट दिवस आलेत पहा ना. आह्मांस खरंतर कीव येते ह्यांची....

ह्यांच्या वैचारिक जन्मदात्यांना म्हणजे मार्क्स-लेनिन-स्टैलिन-कॉम्रेड प्रभृतींना कुणीही कुत्रंही आज विचारत नाही म्हणून हे लोक त्यांच्या राष्ट्रद्रोही, संविधानद्रोही, धर्मद्रोही, ब्राह्मणद्रोही नि समग्र हिंदुसमाजद्रोही वर्ग संघर्षाच्या (Class Struggle) कथित विद्रोही विषवल्लीच्या पेरणीसाठी आता राष्ट्रनायक श्रीमत्स्वामी विवेकानंद नि सावरकर प्रभृती पुरुषश्रेष्ठांचे अपहरण करण्याचे क्षुद्र (शुद्र नव्हे)प्रयत्न करताहेत. अर्थात ह्यातंच त्यांची हतबलता दिसून येते...

प्रतिवर्षी विश्वमानव स्वामी विवेकानंदांची जयंती आली की डाव्यांना म्हणजे ह्या कथित विवेकवाद्यांना अचानकपणे विवेकानंदांचा साक्षात्कार होतो. आणि त्यासाठी स्वामीजी हे कसे बळेच सर्वधर्मसमभावी होते, कसे पू-रोगामी होते, कसे ब्राह्मणद्वेष्टे होते, कसे वेदद्वेष्टे होते, कसे बुद्धिवादी होते नि धर्मांवर कठोर प्रहार करून तो जणु नाकारणाराच होते, कसे गोहत्येचे नि गोमांसाचे नि मांसाचे समर्थक होते, इस्लामचे नि ख्रिस्ताचे गोडवे गाणारे होते वगैरे वगैरे शोध लागतात..विवेकानंदांना गोहत्येचा बळंच समर्थक ठरविणे, इस्लामचा नि त्याच्या स्थापनकर्त्याचा अन् अस्तित्वांत नसलेल्या ख्रिस्ताचा स्तुतीपाठक दर्शविणे (हे असले धंदे गेली चाळीस वर्षे भरकटलेला रामकृष्ण मठही करतंच आहे, दुर्भाग्याने), श्रीमत्शंकराचार्यांची बळंच निंदा करणे, बुद्धिवादाच्या किंवा कथित विवेकवादाच्या नावाखाली विवेकानंदांना धर्मद्रोही नि सर्वच प्रथांवर टीका करणारा दर्शवून आपला धर्मद्रोह साध्य करायचा बालिश प्रयत्न केवळ डावेच करु शकतात. विवेकानंदांच्या साहित्यातले आपल्याला सोयीस्कर नि तोडूमोडून संदर्भ गोळा करून त्यांचा स'माज'वादी शोध घेण्याचा अत्यंत हास्यास्पद प्रयत्न केवळ डावेच करु शकतात...*

कारण काय

तर ह्यांच्या मार्क्स-लेनिन-स्टैलिनला आता जगांत कुणीही कुत्रं भीक घालत नाही. मग हे करणार तरी काय बिच्चारे...

चचचचचचचचचचचच

काय वेळ आलीय रे तुमच्यावर...

तुमचं हसु येतं नि कीवही येते...

आमच्या मागील लेखांतच आम्ही डाव्यांच्या विवेकानंद द्वेषाला प्रत्युत्तर दिलंय..

आणि ह्या लोकांची असहिष्णुता पहा...

आमच्या एका पत्रकार मित्राने काही वर्षांपूर्वी विवेकानंदांच्या ह्या अपहरणांस सप्रमाण प्रत्युत्तर दिल्यावर ह्याच लोकांनी त्याला धमक्या वगैरे देण्याचा प्रयत्न केला होता...विवेकाचा आवाज बुलंद वेग्रै. विचारांची लढाई विचारांनी वेग्रै वेग्रै...

काही जण म्हणतील की विवेकानंदांवर तर सर्वांचाच समान अधिकार आहे, ते थोडीच कुणाचे प्रताधिकार आहेत...???

अरे वाह आता सर्वाधिकार आठवला का??? पण तुमच्या मार्क्स-लैनिन-स्टैलिन-माओ-डांगे-जावडेकर प्रभृतींचे काय झालं??? श्राद्ध-बिद्ध घातलंत की काय???

विवेकानंद हे वेदांना सर्वोच्च प्रमाण मानणारे नि राष्ट्रनिष्ठ हिंदुधर्माभिनानी होते.

म्हणून तर मग खरे विवेकानंद आहेत तरी कोण हे आकळून घ्यायचे असेल तर निम्नलिखित साहित्य वाचा

१. स्वामी विवेकानंद ग्रंथावली जन्मशताब्दी प्रकाशन १९६३चं प्रकाशन - एकुण दहा खंड (मूळ इंग्रजीत नऊ खंड)
२. Swami Vivekananda in the West - New discoveries - Mary Louise Burke (Sister Gargi) - Six Volumes
३. Comprehensive Biography of Swami Vivekananda - S N Dhar - Three Volumes
४. उपरोक्त तीन खंडांचा मराठी अनुवाद - विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित पुण्यांत केलाय तो अभ्यासावा.
५. विश्वमानव स्वामी विवेकानंद - वि रा करंदीकर - तीन खंड
६. महाराष्ट्रांत विवेकानंद - रामकृष्ण मठ प्रकाशन

एवढं वाचून या नि मग विवेकानंदांना हायजैक करण्याचा बालिश प्रयत्न करा.

ह्या कथित विचारजंतांना उघड आव्हान अर्थात ओपन चैलेंज...

विवेकानंद ह्या विषयांवर चर्चेंस या...पाहुयांत खरे विवेकानंद कोणते नि खोटे कोणते???

भवदीय,

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#विवेकानंदजयंती_राष्ट्रीययुवादिन_डाव्यांचेविवेकानंद_पूरोगामित्व_वर्गसंघर्ष

Wednesday, 8 January 2020

*अश्वमेध यज्ञ, भारतीय संस्कृती कोश आणि काही सोशल मीडियावीरांची बौद्धिक दिवाळखोरी !*


तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते ।
जगद्गुरु तुकोबाराय

आपल्याला ज्या विषयांतले काही कळत नाही, त्यावर भाष्य करायचं नि स्वत:चे हसु करून घ्यायची सवय काहींना असते. ऊचं ढुंगणही कळत नाही पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार मनसोक्त उपभोगणे हे तर आजच्या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठी, चिकीत्सकवृत्ती म्हणविणार्या ह्या विचारधारेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. ना वैदिक व्याकरण आपल्याला कळतं, ना संस्कृत कळतं ना वैदिक साहित्याचा आपल्याला काही परिचय. पण कौप्या करून काही मुलं जशी परीक्षा उत्तीर्ण होतात, तसंच कुणाचेतरी कौप्या करून स्वत:च्या अंगरख्याची मान वर करून आम्ही कशी जिरविली म्हणून मिरविणारे असतातच.अशांसाठी हा लेखनप्रपंच !

*मुख्य आक्षेप*

काय तर म्हणे आमचे पूर्वज वैदिक अश्वमेध यज्ञांत घोडा मारायचे, त्याचा होम यज्ञांत करायचे व राजपत्नी त्या घोड्याशी एक रात्रभर समागम करायची म्हणे?

आणि संदर्भ कुणाचा ? तर भारतीय संस्कृती कोशाचा ! 😂😂😂😂

कडक गांजा नि वड पाचची संघटनेचे अध्यक्ष नि त्यांचे कार्यकर्ते !

महर्षि दयानंदांनी दीडशे वर्षांपूर्वीच ह्या आक्षेपांचं सप्रमाण खंडन त्यांच्या *ऋग्वेदादिभाष्यभमिका* ह्या अजरामर ग्रंथात केलेलंच आहे.वेदमहर्षी सातवळेकरांनीही ह्यावर सविस्तर भाष्य केलंच आहे. वास्तविक पाहता खूप पूर्वीच ह्यावर लेखन केल्यामुळे पुन्हा लेखनाची आवश्यकता नव्हती. पण गुर्वादेशामुळे लिहिता झालो. अस्तु !

*अश्वमेध शब्दाचा अर्थ*

अश्व शब्दाची व्युत्पत्ती

वैदिक शब्दांचे अर्थ आकळण्यासाठी त्यांची व्युत्पत्ती पहावी लागते.

निरुक्तकार लिहितात.

*अश्व: कस्मात् । अश्नुतेsध्वानम् । महाशनो भवतीति वा । तत्र दधिका इत्येतद् दधत्क्रामतीति वा ।*

यास्ककृत निघण्टु - २.२७

अर्थ - *अश्व का ? कारण तो मार्गक्रमण करतो नि तेही खूप वेगाने धावतो म्हणून.तो खुप खाणारा आहे अर्थात कुणालातरी धारण करून पुढे पाऊल टाकणारा आहे.म्हणजेच मनुष्य किंवा वस्तु वाहून नेणारा आहे.*

ही अश्व शब्दाची व्युत्पत्ती आहे.

*आता यज्ञ शब्दाची व्युत्पत्ती पाहुयांत.*

माझ्या मागील पंडित युधिष्ठिर मीमांसकांवरील लेखांत लिहिल्याप्रमाणे वैदिक शब्द धातुज आहेत अर्थात प्रत्येक शब्दाची धातु नि व्युत्पत्ति पाहिल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध होत नाही. कौपी पेस्टांना हे झेपणार नाही ही गोष्ट वेगळी. असो.

यज्ञ हा शब्द *यज्ञ देवपुजासंगतिकरणदानेषु* (पाणिनी धातुपाठ - १।७२८) ह्या धातुपासून बनत असून महाभाष्यानुसार (३।३।९०) यज् धातुंस *यजयाचयतविच्छप्रच्छरक्षो नङ ।* हा नङ प्रत्यय लागून हा शब्द तयार होतो.

*आता मेध शब्दाचा अर्थ पाहुयांत*

मेध शब्दाचे तीन अर्थ आहेत धातुपाठानुसार.

बुद्धिवर्धन, संगतीकरण आणि हिंसाही. पण हिंसा अर्थ अभिप्रेत होऊच शकत नाही हे आम्ही विस्तृत विवेचन निम्नलिखित केलंच आहे. बुद्धीला म्हणूनच मेधा म्हणतो. एखादी व्यक्ति मेधावान आहे म्हणजेच बुद्धिवान आहे असा अर्थ असतो.

आता अश्वमेधाची प्रक्रिया पाहुयांत.

कात्यायन श्रौतसुत्रामध्ये अध्याय २०व्या मध्ये अश्वमेध यज्ञाविषयी विस्तारपूर्वक उल्लेख आहे. शतपथांतही दिलाय हे संस्कृती कोशात लेखक लिहितातच. अस्तु !

*आता संस्कृती कोशकारांचे आक्षेप पाहुयांत.*

संस्कृती कोशाचे लेखक म्हणतात की म्हणे ह्या यज्ञांत एक कुत्रा मारला जातो म्हणे. आता कुत्र्याचा संबंध ह्यात कुठून आला हे त्यांनी दिलेलंच नाही. अस्तु ! तरीही कुत्राच काय कुठल्याच प्राण्याची हिंसा वैदिक यज्ञांत संमत नाही हे आजपर्यंत आम्ही अनेकवेळा आमच्या लेखांतून सिद्ध केलेलंच आहे.

माझे उघड आव्हान अर्थात ओपन चैलेंज आहे की चतुर्वेद संहिताभागांत पशुहत्येची संमती देणारा एकतरी मंत्र ह्या पढतमूर्खांनी दाखवावा. ह्याउलट कोणत्याही प्राण्याची हिंसा करुच नका असे शेकडो मंत्र मी आपणांस सादर करेन. आधीही अनेकवेळा केलेलेच आहे. ब्लौगवर वाचावे.

अश्वमेध यज्ञांत अश्वाची हिंसा करण्याची आज्ञा वेदांत असती तर वेदांत निम्नलिखित मंत्र आलाच नसता. अनेकवेळा हा मंत्र सादर केलाच आहे.

यदि नो गां हंसि यद्यश्वं यदि पुरुषम् ।
त्वं त्वा सीसेन विध्यामो यथा नोsसो अवीरहा ।
अथर्ववेद - १/१६/४

अर्थ - जर तु आमच्या गाय, घोडे व पुरुषांची हत्या केलीस तर आम्ही तुला शीस्याने (शीसगोळीने)विद्ध करु. ज्यामुळे तु आमच्या वीरांचा वध करु शकणार नाहीस !

हे काय आहे ? की ओढला गांजा व लिहिलं सोशल मीडियावर ? कौपी पेस्ट बहाद्दर लोक्स इथे लक्ष देतील का?

*अथर्ववेदांत ११.७.७ येथे अश्वमेधाविषयी एक मंत्र स्पष्टपणे त्याच्या हत्येचा निषेध करणारा आहे.*

*राजसूयं वाजपेयमग्निष्टोमस्तदध्वरः। अकार्श्वमेधावुच्छिष्टे जीव बर्हिममन्दितमः।।*

अर्थ - *राजसूय, वाजपेय, अग्निष्टोम, अर्कमेध, अश्वमेध हे सर्व अध्वर अर्थात हिंसा रहित यज्ञ आहेत, जे प्राणीमात्रांस बुद्धी-सुख-शांती प्रदान करणारे आहेत.*

*सर्व वैदिक यज्ञ हे अध्वरच आहेत.*

ऋग्वेदाची प्रथमच सूक्ताची चौथीच ऋचा *अग्ने यं यज्ञमध्वरं* असे सांगते. यज्ञ हा अध्वर आहे.

*अध्वर म्हणजे काय ? ध्वरिति हिंसा कर्म - तत्प्रतिषेध: - निरुक्त ।*

*ध्वर म्हणजे हिंसा व त्याचा जिथे निषेध आहे तो अध्वर.*

आता आणखी काय प्रमाण पाहिजे ?

बरं आता कोशलेखकांनी सत्याषाढ श्रौतसूत्रासंबंधी केलेलं विधान पाहुयांत.

सत्याषाढ श्रौतसूत्र हे कृष्ण यजुर्वेदाच्या श्रौतसूत्रांपैकी एक आहे ज्यांस आम्ही वेदच मानत नाही. पण क्षणभर तो मानला तरी प्रत्यक्ष वेदभगवान काय सांगतो ते आम्ही वर दिलंच आहे. संस्कृती कोशकार लिहितात की म्हणे ह्या श्रौतसूत्रानुसार अश्वमेधयज्ञाविषयी अनेक पशुंचे हनन करायचे असते.

कशावरून ? काहीही विधान करायची. बरं त्यांनी प्रमाण काय दिलंय? मोघम नि बाष्कळ विधाने करायची. हे शोभतं तुम्हाला ???बरं ह्या सत्याषाढाच्या १४ व्या प्रश्नांतच अश्वमेधाविषयी जे काही लिहिलंय ते संस्कृत कोशकारांनी वाचलंय का ? संदर्भ तरी दिलेत का नीटसे ?

त्यांनीच नाही दिले तर हे कौपी पेस्ट बहाद्दर कुठून देणार ?

कोशकार लिहितात की यज्ञाच्यावेळी ती राजपत्नी त्या अश्वांस उद्देश्यून काही अश्लील व ओंगळवाणे शब्द उच्चारते.

हे कुठून लिहिलंत हो ? काही प्रमाण वैदिक साहित्यातले?

*कोशकारांची अक्षम्य चूक नि गोंधळ*

पुढे तर लिहितात की म्हणे ह्या यज्ञांत मृत घोडा (अश्व) व राजपत्नीचे मैथुन विहित आहे. आणि ह्यासाठी ते संदर्भ देतात तो  कात्यायन श्रौतसूत्र २०.६.१५-१६ चा.

काय दिवाळखोरी आहे. मृत अश्वाशी मैथुन कसे संभव आहे? हे संस्कृती कोशकारांनी लिहिताना आपली बुद्धी गहाण टाकली होती का ? मृत व्यक्तीशी किंवा प्राण्याशी मैथुन कसं संभव आहे ? कैच्या काय ? तरीपण तो मूळ संदर्भ पाहुयांत.

अश्वशिश्नमपुस्थे कुरुते वृषा वाजीति । १५।
उत्सक्थ्याsत्यश्वं यजमानोsभिमन्त्रयते ।१६।

इथे अश्वशिश्नमुपस्थे शब्द आला की लगेचच ह्यांनी त्याचा अर्थ विकृत काढून मोकळे झाले. वाह धन्य आहात.

आता ह्याचा वास्तविक अर्थ काय आहे ते पाहुयांत.

*शिश्न: सूर्यप्रकाश: (धातो:षस्य शकारादेशश्छान्दस:) तं प्रकाशं राजमहिषी उपस्थे कुरुते ।*

इथे अश्वाचे शिश्न म्हणजे मृत अश्वाचे शिश्न नसून सूर्यप्रकाश ह्या अर्थाने ते आहे. तो प्रकाश ती राजमहिषी आपल्या उपस्थांत धारण करते अर्थात सूर्यप्रकाश धारण करते. प्रकाशांत येते असा ह्याचा भावार्थ आहे.

पण व्यवस्थित वाचायचंच नाही, पूर्ण प्रकरण पहायचंच नाही, तेवढ्यापूरतं पहायचं व द्यायचं ठोकून. विद्वानांनी तरी अशा गोष्टी करु नयेत हो. अस्तु।

मूळातच हा आरोपच तथ्यहीन आहे कसे ते पाहुयांत.

*यज्ञासाठी ब्रह्मचर्याची दीक्षा*

बरं सर्वप्रथम तर हे महत्वाचंय की कोणत्याही वैदिक यज्ञात नैष्ठिक ब्रह्मचर्याची दीक्षा पती-पत्नींस घ्यावीच लागते. त्याचे प्रमाण आम्ही आमच्या ब्लौगवरील प्रथमच लेखांत दिलंय. शतपथ ब्राम्हणामध्ये मांस भक्षण करण्याचा नि मैथुनाचा अधिकार पूर्णत: नाकारलेला आहे :-

 *न मांसमाश्रीयात् ! यन्मासं माश्रियात् यन्मिप्रानमुपेथादिति नेत्वेवैषा दीक्षा ।*
(शतपथ ६:२.२.३९)

*अर्थात मनुष्याने मांस भक्षण करता कामा नये. जर त्याने मांस भक्षण केले किंवा मैथुन केले तर त्याला यज्ञ दीक्षेचा अधिकार नाही.*

आता बोला. यज्ञाची दीक्षा घेणार्याला मैथुनाचा अधिकारच नाही. तरी ही संस्कृत कोशकार लिहितात की मृत अश्वाबरोबर राजपत्नीचे मैथुन ?

बापरे !

*वाल्मीकि रामायणांतील अश्वमेध*

कोशकार असा आक्षेप घेतात की बालकांडात म्हणे १४ व्या अध्यायांत ३४ व्या श्लोकांत राणी एक रात्र त्या अश्वाजवळ काढते म्हणे.

जर कोशकारांच्या मते तो अश्वच मारला गेलाय तर त्याच्याजवळ तिने रात्र घालवायचा विषयच येतो कुठे ? एकतर मूळात ह्या श्लोकाचा अर्थच हा होत नाही. तरीही कोशकार ओढून ताणून अर्थ का काढतात हे त्यांचे त्यांनाच माहिती.ते मूळ दोन श्लोक पाहुयांत.

*बालकांड - वाल्मीकि रामायण*

*कौसल्या तं हयं तत्र परिचर्य समंततः ।*
*कृपाणैर्विससारैनं त्रिभिः परमया मुदा ॥ ३३ ॥*

अर्थ - राणी कौसल्येने तेथे प्रोक्षण आदिच्या द्वारा सर्व बाजूंनी त्या अश्वाचा संस्कार करून मोठ्या प्रसन्नतेने तीन तलवारींनी त्याला स्पर्श केला॥ ३३ ॥

इथे स्पर्श केला एवढंच लिहिलंय. मारलं असे नव्हे. कारण पूर्वमीमांसेतही स्पर्श एवढाच अर्थ अभिप्रेत आहे. आता पुढे कोशकारांचा संदर्भ पहा.

*पतत्त्रिणा तदा सार्धं सुस्थितेन च चेतसा ।*
*अवसद् रजनीमेकां कौसल्या धर्मकाम्यया ॥ ३४ ॥*

अर्थ - तदनंतर कौसल्या देवीने सुस्थिर चित्ताने धर्मपालनाची इच्छा ठेवून त्या अश्वाच्या निकट एक रात्र निवास केला. ॥ ३४ ॥

इथे शेजारी झोपणे म्हणजे समागम करणे असा अर्थ थोडीच होतो ?ही कोशकारांची कुठली संस्कृती आहे?

*ऋग्वेदाचा संदर्भ पाहुयांत आता*

ऋग्वेदाच्या ज्या प्रथम मंडलाच्या १६२ व १६३ व्या सूक्ताचा संदर्भ संस्कृती कोशकारांनी दिलाय त्याचा संबंध हा सृष्टीरचनेशी आहे. शब्दश: अर्थ घेणार्यांना तो कळणं संभव नाही. तसंही कोशकारांनी दिलेला अर्थ कुणाचा आहे हे कळायला मार्ग नाहीये. तो कोशकारांचा अर्थ जसा उपरोक्त आमच्या सर्व विवेचनाला सोडून तर आहेच, तसाच एकुण वेदांच्या अंत:साक्षीलाही सोडूनच आहे. त्यामुळे तो कदापि ग्राह्य नाही. त्यात अश्वाला कापण्याचे व त्याचा वध करण्याचा जो विकृतार्थ कोशकारांनी केलाय तो तथ्यहीन नि अवास्तव तर आहेच पण भयंकरही आहे.

कोशकार पुढे म्हणतात की वेदोत्तर कालांत हा अश्वमेध कमी झाला व पुढे त्याला अध्यात्मिक रुप दिलं गेलं म्हणून उपनिषदांमध्ये म्हणे त्याची अलंकारिक वर्णन आले म्हणे.

मूळात कोशकारांना हे तरी कळायला हवं की उपनिषदे ही वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ असलेल्या ब्राह्मणग्रंथांची एक भाग आहेत. सनातनी परंपरेमध्ये तर उपनिषदांनाही वेद संबोधायचा प्रघात आहे. क्षणभर तो मान्य केला तरी काही परस्परविरोध सिद्ध होत नाही. कोशकारांनी बृहदारण्यकाच्या १.१.१ चा संदर्भ देऊन तिथे अश्वमेध हा कसा अलंकारिक आहे हे वर्णन दिलंय. ह्यावरूनच सिद्ध होते की वैदिक मंत्रातही हेच वर्णन अपेक्षित आहे जे आम्ही वर सृष्टिनिर्मितीच्या संबधाने मांडलेलं आहे. अस्तु ।

शेष, कोशकारांनी पुढे दिलेला भाग फारसा समीक्षा करण्यासारखा नसल्यामुळे लेखणींस विराम देतो. अंतिम क्षणी पुनश्च हेच ठासून सांगायचे आहे की अश्वमेध, नरमेध, गोमेध आदि यज्ञांमध्ये कुठेही कोणत्याही प्राण्याची हिंसा अभिप्रेतच नाही.

ह्याविषयी आम्ही कुणाशीही शास्त्रार्थ करण्यांस उत्सुक आहोत. कधीही, कूठेही.

उर्ध्वबाहुर्विरोम्येष ।

*आणि हो जाता जाता !*

*वेदांमध्ये मांस खाणार्याला राक्षस म्हटलेलं आहे*

क्रव्याद,पिशाच,असुतृप, गर्भाद,अण्डाद, मांसाद, कौणप:, आशर:, कर्बुर:

असे मांस खाणार्यांसाठी शब्द योजिले आहेत.

*त्यामुळे पढतमूर्खांनी परंपरेतून वेदाध्ययन करावं व मगच वेदांविषयी आपली बुद्धी पाजळावी.*

*स्वयंघोषित बुद्धिप्रामाण्यवाद्यांची दिवाळखोरीच पहा*

एकीकडे आम्ही बुध्दिवादी आहोत, शब्दप्रामाण्यवादी नाही अशी टिमकी वाजविणारे हे लोक्स सोयीस्कर कुणाचेही भाष्य प्रमाण मानतात नि आपल्या वैचारिक दारिद्र्याचे प्रदर्शन करतात. संस्कृती कोशकार त्यांनी लिहिलं व ह्यांनी प्रमाण मानलं. म्हणजे इथे सोयीस्कर शब्दप्रामाण्यवाद बरंका. बुद्धिवाद गेला चुलीत. आहे की नाही गंमत ? असो.

हेच आक्षेप नरमेध, गोमेध विषयीही आहेत, त्याचेही निराकरण कधीतरी करुच. मूळात ते वरच झालंय व आधीही अनेकवेळा केलंचंय म्हणा. तरीहीे

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु ।

पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

#अश्वमेध_यज्ञ_हिंसा_वेद_अहिंसा_समागम_अश्लीलतानिषेध_भारतीयसंस्कृतीकोश_दिवाळखोरी_बुद्धिवाद_शब्दवाद