आज २६ नोव्हेंबर अर्थात भारतीय संविधान दिनाची ७५री आहे म्हणजेच अमृतमहोत्सव आहे. गेली चार-पाच महिने मी भारतीय संविधानावर जवळजवळ ८-१० व्याख्याने दिलेली आहेत. बव्हतांशी इंग्रजी भाषेमध्ये, अगदी एक दोन मराठी भाषेमध्ये. सुदैवाने मी नुकताच अधिवक्ता झालेलो आहे, २०१३ सालीच विधीज्ञ पदवीधर झालेले असलो तरी सनद विलंबाने घेतली, असो. त्यामुळे भारतीय संविधानावर बोलणं हा माझ्यासाठी गौरवाचा विषय आहे...
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व घटना सदस्यांनी ज्या भारतीय राज्यघटनेचा हा अलौकिक वारसा आपणा सर्वांना दिला, त्या संविधानाचे पालन करणे आणि रक्षण करणे हे आपणा सर्वांचे एक भारतीय म्हणून कर्तव्य आहेच. परंतु गेली काही वर्ष हेतुपुरस्सर याच भारतीय संविधानाविषयी भ्रम निर्माण करण्याचं काम भारतीय जनता पक्षाची सत्ता देशात आल्यापासून सुरू झालेलं आहे. म्हणजेच ज्यांनी भारतीय संविधान कधीच मानलं नाही असे डाव्या विचारसरणीचे लोक आज स्वतःला 'भारतीय संविधानाचे आह्मींच कसे संरक्षक' म्हणून मोठ्या दिमाखाने मिरवीत आहेत. यावर पुस्तके सुद्धा लिहिली गेली आहेत डाव्यांकडून. २०२४च्या लोकसभेवेळीचा प्रचार पहा.
म्हणूनच आपल्याला आज भारतीय संविधानाचे खरे शत्रू कोण हे ओळखणे आवश्यक झालं आहे.
आपलं सुदैव इतकं आहे की स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच भारतीय संविधानाचे खरे शत्रू कोण हे त्याचवेळी मांडून ठेवलेलं आहे. दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ ला संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रप्रसाद यांचे समारोपाचे भाषण होऊन त्यादिवशी भारताचे संविधान संमत झाले. त्याच्या एक दिवस आधी म्हणजे २५ नोव्हेंबर, १९४९ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार या शब्दांनी ज्यांचा सार्थ गौरव होतो, यांचे संविधान सभेत शेवटचे भाषण झाले. त्यात बाबासाहेबांनी संविधानाला सुरुवातीपासून कुणाचा विरोध आहे हे स्पष्ट करताना म्हटलं आहे की
"साम्यवादी पक्ष आणि समाजवादी पक्ष या दोन घटकांकडून संविधानावर मोठया प्रमाणात नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. ते संविधानाच्या प्रती नापसंती का व्यक्त करतात ? खरोखर संविधान वाईट आहे म्हणून ते नापसंती व्यक्त करतात काय ? निश्चितपणे नाही असे मी म्हणतो. साम्यवादी पक्षाला कामगारांच्या हुकुमशाही तत्त्वावर आधारलेले संविधान हवे आहे. हे संविधान सांसदीय लोकशाहीवर आधारित असल्यामुळे ते संविधानाचा निषेध करतात. समाजवाद्यांना दोन गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट त्यांना हवी आहे ती अशी की, ते जर सत्तारुढ झाले तर मोबदला न देता खाजगी संपत्तीचे राष्ट्रीयीकरण किंवा सामाजीकरण करण्याचे संविधानाने, त्यांना स्वातंत्र्य दिलेच पाहिजे. समाजवाद्यांना पाहिजे असलेली दुसरी गोष्ट अशी की, संविधानातील मूलभूत अधिकार निरपेक्ष आणि कोणत्याही निर्बधाशिवाय असावे, जेणेकरुन त्यांच्या पक्षाला सत्ता प्राप्त करण्यात अपयश आले तर, केवळ अनिर्बंध टीका करण्याचेच नव्हे तर राज्य उलथून पाडण्याचेही स्वातंत्र्य त्यांना हवे. "
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८, भाग ३ पृष्ठांक १६६
https://archive.org/details/volume-18-1-mar/Volume18_3_Mar/page/n202/mode/1up?q=+%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80
मला नाही वाटत की यापेक्षा स्पष्ट आणखी काय शब्द बाबासाहेबांनी उच्चारायचे होते की ज्यातून त्यांनी भारतीय संविधानाच्या खऱ्या शत्रूंचं वर्णन त्याचवेळी संविधान सभेच्या भाषणातंच करून ठेवलेलं आहे. खरंतर संविधान बचाव नामक खोट्या चळवळीच्या वेळीसंच मी हे सर्व संदर्भ बाहेर काढले होते, असो.
पण गेल्या ७५ वर्षातला प्रचार याच्या नेमका उलटा आहे...
ज्यांनी भारतीय संविधानाला पहिल्यापासून विरोध केला, तेच डावे आज स्वतःला भारतीय संविधानाचे फार मोठे संरक्षक म्हणून घेत आहेत आणि जे भारतीय संविधानाला प्रमाण मानतात आणि त्याच्यानुसार आचरण करतात असे हिंदुत्ववादी, त्यांना मात्र संविधानाचे शत्रू म्हणून हेटाळलं जात आहे.
संविधानाचे आणखी शत्रु कोण?
इंदिरा गांधींची सेक्युलर आणि सोशालिस्ट काँग्रेस
भारतीय संविधानाची पूर्वपीठिका म्हणजे प्रिएम्बल भारतीय संविधानाचा आत्मा आहे पण हा आत्मा मारण्याचं काम ज्यांनी केलं, ती इंदिरा गांधी यांची काँग्रेस !
आपणा सर्वांना माहिती असेल की देशावर आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानाच्या पूर्वपीठिकेमध्ये म्हणजेच प्रिएम्बलमध्ये सेक्युलर आणि सोशालिस्ट हे दोन शब्द घुसडवून भारतीय संविधानाच्या मूळ गाभ्यालाच हात घातला, ज्यावर पुढे केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये आव्हान दिले गेल्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या १३ न्यायमूर्तींनी जो काही निर्णय दिलाय, तो वाचल्यानंतर ही घटना दुरुस्ती किती वाईट होती हे आपल्या लक्षात येईल. म्हणजेच भारतीय संविधानाची पूर्वपीठिका म्हणजेच सरनामा याची हत्या करण्याचं काम तत्कालीन इंदिरा गांधींच्या सरकारने केलं पण याच विचारधारेचे लोक आज स्वतःला संविधानाचे संरक्षक म्हणून घेत आहेत आणि हिंदुत्ववादी असलेल्या आमच्यासारख्यांना संविधानाचे मारेकरी म्हणून बोंबा मारत आहेत. वास्तविक पाहता जेव्हा घटना दुरुस्ती सुचवली जाते तेव्हा किंवा कोणताही कायदा दुरुस्त करून त्यामध्ये एखादी नवीन संकल्पना किंवा शब्द भर म्हणून घातला जातो, तेव्हा त्याची व्याख्या करणं अभिप्रेत असतं. पण दुर्दैवाने ही घटना दुरुस्ती करत असताना सेक्युलर आणि सोशालिस्ट या दोन्ही शब्दांच्या व्याख्या सुद्धा केल्या गेल्या नव्हत्या, यापेक्षा संविधानद्रोह कोणता?
२०२४ साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदी सरकारने ४००सो पारची घोषणा दिली, त्यावेळी हेच लोक मोदी सरकार संविधान बदलणार म्हणून बोंबा मारत होते. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. मोदी सरकारला अनेक ठिकाणी पराभव पत्करावा लागला. आणि वरून आरोप काय तर ईव्हीएम घोटाळा?
वास्तविक पाहता मोदी सरकार जर ईव्हीएम घोटाळा करत असतं तर मोदी सरकारचं ४०० पारचं स्वप्न केव्हाच पूर्ण झालं असतं पण घडलं काय सर्वांना ज्ञात आहे. यालाच डाव्यांची ईकोसीस्टम म्हणतात.
दुर्दैव असं की आमचे हिंदुत्ववादी या विषयात अजूनही प्रचंड मागे आहेत. आमच्या लोकांना आपल्या विरोधात काय प्रचार चालू आहे याचं भानच नाही. आणि भविष्यात आपल्या विरोधात काय प्रचार आणखी होणार आहे याचं सुद्धा भान नाही, याचा सुद्धा अंदाज घ्यायची शक्ती नाही.
क्षणभर भाजपा-काँग्रेस या सर्व गोष्टी बाजूला ठेवून विचार केला तरी एवढे तरी मान्य करावे लागेल की भारतीय संविधानाचे खरे शत्रू हे डावेच आहेत की ज्यांनी गेली ७० वर्ष हिंदू समाजाला म्हणजेच भारतीयांना त्यांचा बुद्धिभेद करून मूळ विषयांपासून लक्ष भरकटवून केवळ त्यांच्यात भांडण लावायचं काम केलेलं आहे. या डाव्यांनी म्हणजे संविधानद्रोहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी सतत भारतीय इतिहासाचं विकृतीकरण करत हिंदू समाजातल्या अनेक जातींना-जमातींना एकमेकांच्या विरोधात पेटवण्याचं काम केलेलं आहे, यापेक्षा मोठा संविधानद्रोह काय असू शकतो???
तुम्ही या देशातल्या कोणत्याही समाजवाद्याचं, साम्यवाद्याचं, पू-रोगाम्याचं, डाव्या विचारसरणीच्या मनुष्याचं लिखाण, त्याचं वाङ्मय, त्याची भाषा हे सगळं उघडून पहा. आजही तुम्हाला हे लोक समाजामध्ये भांडणे लावताना दिसतील. हे लोक एका समाजाला दुसऱ्या समाजाच्या विरोधात सतत पेटवण्याचे काम करत असतात आणि वरून हे लोक आरोप कोणावर करतात तर हिंदुत्ववाद्यांवर!
इतिहासामध्ये कोळसा आणि चंदन दोन्ही आहे पण हे लोक सतत कोळसाच उगाळण्याचं काम करतात कारण यांचं लक्ष एकच असतं ते म्हणजे समाजामध्ये सतत वर्ग-संघर्ष म्हणजे क्लास स्ट्रगल पेटवत राहणं; एका समाजाला, एका वर्गाला दुसऱ्या वर्गाच्या विरोधात सतत पेटवत राहणं आणि समाज संघर्षरत ठेवणं. बरं या सगळ्याच्या मुळाशी आहे कार्ल मार्क्सचा मार्क्सवाद!
सर्वात महत्त्वाचं म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या साहित्यामध्ये या समाजवाद्यांच्या, साम्यवाद्यांच्या, मार्क्सवाद्यांच्या या षड्यंत्राला वेळीच ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या साहित्यामध्ये मार्क्सचा अत्यंत स्पष्ट शब्दांमध्ये निषेध केलेला आहे. दुर्दैव म्हणजे या डाव्यांनी म्हणजे संविधानद्रोह्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा सोडलेलं नाही. हे लोक बाबासाहेबांच्या प्रकाशित साहित्यामध्ये सुद्धा छेडछाड करताहेत. उदाहरण द्यायचे तर बाबासाहेबांचे 'बुद्ध किंवा कार्ल मार्क्स' हे भाषण सुद्धा दुर्दैवाने आता 'बुद्ध आणि कार्ल मार्क्स' अशा नावाने छापले जात आहे, यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांशी छेडछाड कोणती?
बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये सुद्धा त्यांच्या मूळ भाषणामधला अनेक भाग गाळून त्यांचे साहित्य पुन्हा प्रकाशित केलं जात आहे आणि ही गोष्ट मी १३ जानेवारी, २०२४ रोजी विरार येथे जागतिक मराठी साहित्य संमेलनात जाहीरपणे पुराव्यासहित बोललेलो आहे.
त्यामुळे स्वतःला भारत देशाचे सुजाण नागरिक म्हणून आणि भारतीय संविधानाचे पाईक म्हणणाऱ्या आपणा सर्वांनी आपल्या देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी आपल्या संविधानाचे खरे शत्रू कोण आहेत हे ओळखून सावध झालं पाहिजे.
हिंदू समाज फोडण्यासाठी, हिंदू समाजामध्ये भांडण लावण्यासाठी, प्रत्येक जातीला हिंदू समाजापासून वेगळं करण्यासाठी गेली २०० वर्ष सातत्याने प्रयत्न सुरू आहेत आणि भविष्यात सुद्धा ते सुरू राहणारंच आहेत आपण जर वेळी सावध नाही झालो तर!
ज्या भारतीय संविधानाची सुरुवात 'We, the People of India' ने होते म्हणजेच आता आपली भारतीय हीच आपली ओळख आहे आणि तीच जपली पाहिजे. त्यामुळेच आजच्या संविधानदिनी आपण सावध होणं आवश्यक आहे!
संविधानाचे प्रमुख शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व सदस्यांच्या चरणी विनम्र अभिवादन!
भवदीय...
#संविधानदिवस_भारतीयराज्यघटना_डॉआंबेडकर_भारतीयत्व_लोकशाही_समाजवादीसाम्यवादी_हिंदुत्ववादी


