इतिहासाचार्यांचा अपमान यापेक्षा मोठ्ठा असुच शकत नाही पण....
आज इतिहासाचार्य वि का राजवाडे यांचं पुण्यस्मरण! त्यांच्या स्मृतिशताब्दीच्या वर्षाला आरंभ. इंडियन हिस्टरी काँग्रेस (IHC) म्हणजे नावातच काँग्रेस असलेल्या संस्थेने राजवाड्यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार ईर्फान हबीब सारख्या वामपंथी इतिहासकाराला देणं यात नवल असं काहीच नाही म्हणा. देश स्वातंत्र्य झाल्यापासून चुकीच्या व्यक्तींना सन्मानित करण्याची परंपरा कायम राखण्यात आपण तसेही 'उज्ज्वल' आहोत. अर्थात ७७ वर्षात आह्मां उजव्यांना अर्थात राष्ट्रनिष्ठांना अर्थात हिंदुत्वनिष्ठांना शैक्षणिक क्षेत्रातली डाव्यांची मक्तेदारी अद्यापही मोडीत काढता आलं नाही हे आमचं अपयश आहे. आर्यसमाजी विद्वानांची परंपरा सोडली तर उजव्यांना इतक्या वर्षात स्वर्गीय सीता राम गोयलांशिवाय एकही विद्वान इतिहासकार निर्माण करता आला नाही पण याच गोयलांना आडवाणींनी व संघ-भाजपाने काय वागणूक दिली यावर मागे लिहिलंच आहे, त्यामुळे ही शोकांतिका आहेच. हाँ आमचे हिंदुसभाई जीवन कुलकर्णी काही अंशी पाखंड खंडणकर्ते होते पण हे नावही आजच्या बव्हंशी हिंदुत्ववाद्यांना माहिती नसेल, (लवकरंच कळेल ते) पण ते असे दिग्गजही नव्हते. किंबहुना सावरकरांच्या वेळीच संपलेल्या आमच्या हिंदुसभेला जीवनजींना पोसताही आलं नाही. कारण संघ-भाजपाला नावं ठेवण्याशिवाय व गोळवलकरांच्या नावाने विलाप करण्याशिवाय आमच्यातल्या बव्हंशी हिंदू महासभायांना दुसरं जमलंय तरी काय? मीही त्यातलाच म्हणा 🤭 !
एकुणंच अपयश...
देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ वर्षे होत आली तरी सुद्धा हिंदुत्वनिष्ठ म्हणविणाऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटविणारा एकही इतिहासकार निर्माण करता आला नाही हे हिंदुत्वनिष्ठांचं अपयश आमच्या स्वत:च्या कधी लक्षात येणार आहे कुणांस ठाऊक? गेली ७८ वर्षे शिक्षणसंस्थांवर मार्क्सवादी वेटोळे घालून बसलेल्या या लाल पावट्या सर्पांची नांगी ठेचणारे प्रा. माख्खन लाल, प्रा. शंकर शरण यांची नावे गेली १५-२० वर्षे व सांप्रतही चर्चेत असली (किती हिंदुत्ववाद्यांना ही नावे माहिती आहेत???) तरीही यांच्या योगदानाचं चीज न होणं हे सरकारी पातळीवर सत्तेत ५६ ईंच असो नाहीतर अन्य कोणी, maintain the status quo हे ठरलेलं असतंच. यातही मास्टरस्ट्रोक असेल म्हणा काहीतरी, कुणांस ठाऊक? माझ्यासारख्या अतिउजव्या हिंदुसभाई अडाण्याला तो काय कळणार? प्रा. शंकर शरणजींवर मागे लिहिलंय, गेली दोन दशके राष्ट्रीय पातळीवर ते उत्तम लेखन करताहेत पण संघ-भाजपाचे सेक्युलर दोष दाखवत असल्याने त्यांनाही उपेक्षा आहेच. ती पाचवी पुजलीच आहे...
शेष, IHC तशीही पहिल्यापासून डाव्यांचीच आहे, आणि राजवाडेही तसे उत्तरायुष्यात थोडेसे डावीकडे झुकल्यासारखे, भरकटल्यासारखे वाटावेत असे लेखन करतात, पण म्हणून ते डावे ठरत नाहीत हेही तितकंच खरं. विवाहसंस्थेचा इतिहास पाहिला तरी लक्ष्यीं येईल. त्याची कारणमीमांसा स्वतंत्रपणे कधीतरी!
पण ग्रँट डफसारखे इंग्रज व एकूणंच इंग्रज आमच्या इतिहासाचं, त्यातही आपल्या तेजस्वी नि विजीगीषु अशा मराठेशाहीच्या इतिहासाचं पद्धतशीर वाटोळं करत असताना त्यांचे ते षड्यंत्र हाणून पाडणाऱ्या राजवाड्यांचं नाव हे म्हणूनंच आमचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे ह्यावर अन्य कुणी व्यक्त होईल न होईल, आमचं काम आहे. आमच्या शिवरामपंत कार्लेकरांचा लेख दै. सकाळला आलेला आहे सुदैवाने, तो जोडलाय.
साधनसिद्ध इतिहास...
खरंतर इतिहास हा डावा आणि उजवा, हिंदुत्ववादी किंवा मार्क्सवादी, काँग्रेसी किंवा भाजपाई, पू-रोगामी किंवा प्रतिगामी, संघी किंवा हिंदुसभाई, ब्राह्मणी, मनुवादी किंवा ब्रिगेडी असा कधीच नसतो. इतिहास हा इतिहास असतो. पण या बाबतीत उजव्यांची एकुणंच प्रगती विचार करत असताना काही गोष्टी लक्ष्यात येतात
१. उजव्यांचं आंग्ल भाषेवर प्रभूत्व नसणं ही मुख्य घोडचूक
२. उजवेच उजव्यांना पाय घालून पाडताना दिसणं हे तर आजकाल अधिक होतेय
३. उजव्यांना इतिहास संशोधन हे घर जाळून कोळशाचा व्यापार करताना दिसणं - डाव्यांना जसं पोसलं जातं, तसं उजव्यांचं होताना दिसतंच नाही, ना शिष्यवृत्ती ना अन्य काही.
४. हिंदुत्ववादी संघटना किंवा पक्ष असं प्रामाणिक संशोधन करणाऱ्या उजव्यांना कुठल्याही प्रकारची मदत करताना तर अजिबात दिसत नाहीत, व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून देत नाहीत, उलट ब्रिगेड्यांना व्यासपीठे मिळताहेत.
५. सर्वात शेवटी, मूलमें भूल हैं।
बाकी जाता जाता...
इतिहास संशोधन हा विषय आजकाल विनोद, छद्म अभिमान व जातीय अभिनिवेशाचा झाला आहे; तो प्रामाणिक जिज्ञासेचा, चिकीत्सेचा नि प्रेरणेचा राहिलाच नाही. आजकाल कुणीही उठतंय, काहीही लिहितंय, कारण इतिहास हे चलनी नाणं आहे. कुठलीही विचारसरणी असो, डावे काय अन् उजवे काय, सगळे एकाच माळेचे मणी झालेत. त्यातून जातीय अभिनिवेश भयंकर वाढत चाललाय. त्यामुळे हा विषय जगासमोर मांडायला तरी आजकाल नकोसा वाटतोय, नकोच. हाँ, व्यक्तिगत अध्ययनासाठी व स्वत:ची ज्ञानपिपासा किंचित् शमविण्यासाठी तो मरेपर्यंत चिंतनीय आहेच पण केवळ स्वत:पुरता, इतिहासाचा प्रामाणिक विद्यार्थी म्हणून काही लेखन करावं व जगासमोर मांडावं असे आजकाल वाटत नाही. तरीही अंत:करणातली उर्मी शांत बसु देत नाही.
निदानभूत: इति ह एवमासीत् इति य उच्यते सेतिहास:।
निरुक्त
इतिहास पुराणं च पंचमो वेदोच्यते।
श्रीमद्भागवत
पुराणमितिवृत्तमाख्यायिकोदाहरणं धर्मशास्त्रमर्थशास्त्रं चेतीतिहास:।
कौटिल्य
धर्मार्थकाममोक्षाणामुपदेशसमन्वितम्। पूर्ववृत्तंकथायुक्तमितिहासम् प्रचक्षते।
आमच्या शास्त्रकारांनी इतिहास हा पांचवा वेद सांगितल्याने या वेदोनारायणाची सेवा करणं हे आमचं कर्तव्य असल्याने...
बुडतें हे जन देखवेना डोळां।
असो!
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#इतिहासाचार्य_विकाराजवाडे_पुण्यस्मरण_स्मृतिशताब्दी_इतिहासलेखन_मार्क्सवादी_डावे_हिंदुत्ववादी






