आषाढ शुद्ध एकादशीला देवशयनी व आजच्या कार्तिक शुद्ध एकादशीला देवोत्थापिनी एकादशी म्हणतात हे सर्वांना ज्ञात आहे. मागील वर्षी मार्गशीर्ष मासाच्या निमित्ताने याविषयी काही चिंतन केलं होतं पण ते विस्ताराने पुढे करू असं सांगितलं होतं, ते आता
देवशयनी व देवोत्थापिनी म्हणजे काय???
अहो देव कधी झोपतो का? देव कधी उठतो का? या वचनांचे तात्पर्य नेमकं काय?
देवशयनी म्हणजे आषाढ शुद्ध एकादशीपासून वर्षाऋतु आरंभ होण्याने हरि किंवा देव किंवा सूर्य-चंद्रादिंचे शयन होते म्हणजे त्यांचा प्रकाश, तेज हे क्षीण होत जाते, आपली इंद्रियेही या काळात बाह्य वातावरणामुळे क्षीण नि दुर्बल होतात, पचनक्रिया क्षीण होते, म्हणून देवशयनी ! चातुर्मासात पित्त स्वरुप अग्नीही थंडावलेला असल्याने शरीरशक्ती क्षीण असते.
थंडी तशी मागेच सुरु झाली असली तरी आजपासून वर्षा ऋतुही संपल्याने आता पचनक्रिया सुधारतेही, सूर्यचंद्रादि यद्यपि उन्हाळ्यासारखे तेजोमयी नसले तरी वर्षा नसल्याने ते उपयुक्त ठरतात म्हणून देवोत्थापिनी इतकाच साधा अर्थ आहे. आपली इंद्रियेही प्रबळ होतात.
शरीरस्थ विष्णु अर्थात सत्वगुण या काळात दुर्बल होतो व रजो-तमोगुणाची वृद्धी होते म्हणून यास देवशयनीचा काळही म्हणतात.
शेष, या योगनिद्रेचा आणखी योगिक अर्थ सांगायचा तर भगवान महर्षि पतंजलि कृत योगदर्शनामध्ये व त्यावरच्या योगवार्त्तिकामध्ये व मार्कंडेय पुराणामध्ये म्हटल्याप्रमाणे
योगनिद्रां यदा विष्णुर्जगत्येकार्णवीकृते।
आस्तीर्य शेषमभजत् कल्पान्ते भगवान् प्रभुः इति।
मार्कंडेय पुराण - ८१।४९
कल्पाच्या अंती जेंव्हा सर्व जगत् महासमुद्राकार (सदृश) होते, तेंव्हा भगवान् विष्णु शेषनागाची शय्या करून योगनिद्रेस प्राप्त होतात.
म्हणजेच सृष्टीनिर्मितीचं व प्रलयाचे रहस्य सांगणारीही ही एकादशी आहे. यावर विस्ताराने कधीतरी!
आजपासून भीष्मपंचक व्रतही आरंभ होते
महाभारती शरशय्येवर पडल्यावर श्रीभीष्माचार्यांनी पांडवांना जो उपदेश केला, तो महाभारताच्या शांतिपर्वात आहे, गीताप्रेस गोरखपूरच्या प्रतीनुसार याचे ३६५ अध्याय आहेत व ते सर्व वाचनीय आहे. अलौकिक उपदेश आहे तो श्रीभीष्माचार्यांचा ! पाच दिवसांत सहज वाचून होईल ! गीताप्रेसचं समग्र महाभारत सर्चेबल पीडीएफ इथे आहे. 👇
https://archive.org/details/20221031_20221031_0328
शेष, आज जगाच्या दृष्टीने चातुर्मासाची व दीपावलीचीही अधिकृत सांगता आहे, पण आह्मां पंढरपूरकरांसाठी आमच्या श्रीनामदेवरायांनी म्हटल्याप्रमाणे
श्रीविठोबाचें राज्य आह्मां नित्य दिवाळीं।
असल्याने नित्य दिवाळीच आहे.
अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु।
भवदीय,
Pakhandkhandinee.blogspot.com
#देवशयनी_देवोत्थापिनी_कार्तिकशुद्धएकादशी_प्रबोधिनी_योगनिद्रा_भगवानविष्णु_सनातनहिंदुधर्म