Tuesday, 27 August 2024

राम की कृष्ण की रामकृष्ण???

 


कालंच लिहिलं होते की राम आमच्या हिंदुतनमनाचा श्वास आहे तर कृष्ण हा प्रश्वास आहे. कारण दोघेही अत्यंत प्रिय आहेत, नाम दोघांचंही येतं हो. पण दोघांचीही काही वैशिष्ट्ये आहेत.


श्रीरामचंद्रांचं चरित्र वाचलं तर त्यांचे  चरित्र हे साधंसरळ आहे, त्यात फारसे चमत्कार नाहीत, अतिरंजित वर्णनं नाहीत, चक्रवर्ती सम्राट असलेल्या रघुवंशातला जन्म असला, राजाधिराज असले तरी त्यांच्या जीवनात ती दिव्यता, भव्यता, कल्पकता, रंजकता वाटत नाही जी योगेश्वर भगवान श्रीकृष्णांच्या चरित्रात ठायी ठायी आहे. योगेश्वरांचे चरित्र तर केवळ अलौकिकतेने भरलंय. 


म्हणूनच 'रामादिवत् वर्तितव्यं न कृष्णादिवत्' म्हटलं जातं ते काहीअंशी खरंच आहे, अर्थात दोघेही समतुल्यंच आहेत. यद्यपि रामादिवत् वर्तितव्यं हेही वाटते तितके सोप्पे नाहीच. दोघांच्या योग्यतेत काडीचाही भेद नाही...


पण श्रीरामचंद्र हे असे आहेत की त्यांच्या चरणांवर डोकं ठेवावंसं वाटतं, त्यांना दुरून नमस्कार करावासा वाटतो, त्यांच्या विभूतिमत्वाने दिपून जावंसं वाटतं, पण एक सखा म्हणून, जिवलग म्हणून त्यांना मिठी नाही मारावीशी वाटत, कारण त्यांच्याविषयीचा आदर हा इतका टोकाचा असा आहे की तो नतमस्तकावासाच वाटतो...


पण भगवान श्रीकृष्णांचे काय???


त्यांच्या विश्वरुपदर्शन घडविणाऱ्या चरणांवर जीवनसर्वस्वंच वहावंसं वाटतं हे खरंच, त्यांच्या हिमालयापेक्षाही उत्तुंग व्यक्तित्वाने, विकीर्ण अशा दिव्य आभेने नेत्र दिपले तरी आवश्यकता पडल्यांस त्याच कृष्णाला सखा, प्रिय मित्र, बाळगोपाळ म्हणून त्याला मिठीच मारावीशी वाटते...


रामाला पहिल्याच हाकेत 'ए रामा' म्हणायचं साहस नाही हो होत...


पण कृष्णाला 'ए कृष्णा' पहिल्याच हाकेत म्हणता येतंच. किंबहुना म्हणावंसंच वाटतं.


कारण तो योगेश्वर व पूर्णपुरुषोत्तम असला तरीही तो फार जवळचा वाटतो.


पण श्रीराम आरंभी तितके जवळचे वाटत नाहीत म्हणजे दूरचे वाटतात असे नसून एकेरी हाक मारायसारखे वाटत नाहीत...


असे आरंभी होते ना???


हो सर्वांचं होते...


पण जसाजसा वेळ जातो, तसं हे अंतर राहतंच नाही ही गोष्ट वेगळी.


अगदी संक्षेपांत एका वाक्यात सांगितलं तर राम हा बाप आहे नि कृष्ण ही आई आहे...


आदर दोघांविषयी आहेच, दोघेही जन्मदातेच आहेत, पण ज्याप्रमाणे आपल्या जन्मदात्या पित्याविषयी आपल्या अंतःकरणात कितीही प्रेम, माया, ममत्व असलं तरी त्यांच्याविषयीच्या आदरयुक्त भावनेने काही मर्यादा येतात, पण आईचं तसं नसतं, आईला आपण ए आईच म्हणतो, बापाला काहीही झालं तरी 'ए बाबा' म्हणायचं साहस होत नाही, दोघेही जन्मदाते असले तरीही. हाँ आजकाल काही लोक बापाला 'ए बाबा' तसं म्हणताना दिसतात(लहान मुलांनी म्हणणं वेगळं), अर्थात बापाला एकेरी म्हणणं त्यात काही वाईटंय किंवा लगेचंच अनादर आहे अशातलाही भाग नाही, पण एक सर्वसामान्य नियम हाच की बापाला आपण अहोच म्हणतो, इतकंच...


तसंच राम नि कृष्णाचं आहे इतकंच ! म्हणूनंच राम बाप आहे तर कृष्ण आई आहे असे म्हटल्यांस अत्युक्ती ठरणार नाही...


अर्थात वर म्हटल्याप्रमाणे ही केवळ सुरुवात असते, कारण एकदा सद्गुरुनिर्दिष्ट नामसाधना सुरु झाली की आपलं आपल्याला कळायला लागतं व हे द्वैतही तुटत जातं...


पण श्रीहनुमंतांनी म्हटल्याप्रमाणे 


तु देव मी भक्त ऐसें करीं।


हा दास्यभाव सदोदित राहो हीच प्रार्थना अंतःकरणी असावी. बाकी ते द्वैत, अद्वैत, त्रैत, विशिष्टाद्वैत, विशुद्धाद्वैत वगैरे निरर्थक शब्दजंजाळात अडकून व्यर्थ काथ्याकुट करण्यापेक्षा, कारण ही विद्वानांची कामे आहेत नि आपण अत्यंत अजाण बालक आहोत, त्यामुळे श्रीसमर्थांनीच म्हटल्याप्रमाणे 


अखंड नाम स्मरावेें। परि दुसरीयासी कळों नेदावें।

निदिध्यास लागलिया राघवें। पाविजे तात्काळ।  

कांहीं साक्षात्कार जाहला। तो सांगों नयें दुसरियाला।

जरी आळकेपणें सांगितला, तरी पुन्हा होणार नाही। 

पुन्हा साक्षात्कार कैचा। जाला तरीं वरपांगाचा। 

हा मी आपुले जीवाचा। अनुभव सांगतो।

श्रीसमर्थ रामदास 


आयुष्यात एक वेळ येतेच ज्यावेळी मनुष्याला नामसाधनाच अंतिम वाटते, अन्य सायास नकोच वाटतात. त्या नामातंच अखंडपणे एकरसपणे राहणं हे एवढंच सार आहे...! 


जन्माष्टमीनिमित्त हे सहज सुचलेलं. यात कुठेही काही दर्शवायचा हेतु नाही.


श्रीराम जय राम जय जय राम

जय श्रीकृष्ण 


भवदीय,


पाखण्ड खण्डिणी 

Pakhandkhandinee.blogspot.com 


#श्रीकृष्णजन्माष्टमी_श्रीरामचंद्र_महाभारत_रामायण_नामस्मरण_नामोपासना_आईबाप