यतिवर ऋषिश्रेष्ठ श्रीमद्दयानंद सरस्वति पुण्यस्मरण
(तिकडे कार्तिक वद्य अमावस्या, आपल्याकडे अश्विन वद्य अमावस्या)
जब मैं आर्यजातिकीं सार्वत्रिक अधोगति और अवनति देखता हूँ, तो मेरी वेदना का पार नहीं रहता।
इति महर्षि श्रीदयानंद
कृण्वन्तो विश्वमार्यम् ही वेदांची नि श्रावयेच्चतुरो वर्णान् ही प्रत्यक्ष श्रीमन्महाभारताची प्रत्यक्ष जगभर वेदप्रचार करण्याची आज्ञा धिक्कारून वेदांपेक्षा मध्यकालीन स्मृतींना प्रमाण मानत विदेशयात्रा गमन निषेध करून विश्वव्यापी विश्वगुरु वैदिक धर्मांस संकुचित करणाऱ्या समुद्रबंदी सारख्या रुढींचं प्राबल्यत्व, वैदिक यज्ञामध्ये निर्दोष पशुंची हिंसा, बळीप्रथेचे थोतांड, कलिवर्ज्याचं थोतांड, शास्त्रात् रुढीर्बलीयसी ही मानसिकता, स्वमतसिद्धांतासाठी षट्दर्शनांची वेदविरुद्ध विकृत मांडणी, अवतारवादाचा अतिरेक, आठव्या किंवा सहाव्या वर्षी मुलींचा विवाह लावण्याची विकृती (धर्मसिंधु), सतीसारख्या विकृतींना वेदसंमत ठरविण्याचा अट्टाहास, केवळ ब्राह्मण स्त्रियांचे केशवपन, एखादी विधवा स्त्री केशवपन न करता समोर आली तर तिला तुच्छ लेखत दर्शन नाकारणारे कथित संन्यासी, विधवांना पुनर्विवाहास निषेध करून त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी नि त्यातून आमच्या ब्राह्मण समाजाला त्या निष्पाप माता भगिनींचे लागलेलं अश्रांत शाप, वेदांपेक्षा आपल्या कथित परंपरा प्रमाण मानणारे आचार्य नि त्यांचे अंधानुयायी, स्त्री-शुद्रांनी वेद ऐकु नये सारखी वचने स्मृतिग्रंथात घालून त्यांना वेदाधिकारापासून वंचित ठेवणे, याने अकारण ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाला शत्रुंकडून घातले गेलेलं खतपाणी, श्रीसीतेसारख्या महासाध्वीचा विवाह सहाव्या वर्षी दाखवून मध्ययुगीन स्मृतींचे विकृत समर्थन, सोवळ्याच्या नावाखाली केवल चंडालांपुरती मर्यादित असलेल्या अस्पृश्यतेला सर्वच शुद्रांसाठी जन्मजात सिद्ध करण्याचा कथित 'सनातनी' अट्टाहास नि वर्णव्यवस्था जन्माधिष्ठित सिद्ध करण्याचा अवैदिक प्रयत्न...
वैदिक धर्माचे वाट्टोळं करणाऱ्या या धर्मविध्वंसक प्रथांना आपल्या सुतीक्ष्ण तर्काने नि अपार वेदनिष्ठेने छेद देणारा ऋषिश्रेष्ठ महात्मा आजच्याच तिथींस १८व्या विषप्रयोगाने देहदान करता झाला...
बर या सर्व गोष्टी नाकारणारे महर्षी श्रीदयानंद हे पहिले व्यक्ती होते अशातलाही भाग नाही, त्यांच्याही आधी नि नंतर अनेकांनी यातल्या काही तर काहींनी सर्वर गोष्टी धिक्कारलेल्याच आहेत, त्यामुळे श्रीदयानंदांनी हे सर्व नाकारून फार मोठ्ठा सनातन द्रोह केला असेही नव्हे, पण केवळ मूर्तीपुजा-अवतारवाद नाकारला इतकंच घोकत या दोन कारणांसाठी म्हणून ते कुणासाठी शत्रु असतील तर हे शत्रुत्व आह्मींही आजीवन मिरवु भलें आह्मीं मूर्तीपुजा अवतारवाद नाकारत नसलो तरीही...
भारतीय विद्वत्ता जेंव्हा पाश्चात्यांच्या अभ्यासाने दिपून जाऊन दिग्भ्रमित होऊन पुढे लोटांगणं घालत आर्याक्रमण मान्य करत आपल्या इतिहासाचे आपल्याच हाताने श्राद्ध घालत होती, तेंव्हा 'यस्मिन्देशे द्रुमो नास्ति तत्रैरण्डोऽपि द्रुमायते' अशी मैक्सम्युलरची निर्भ्रर्त्सना करत भारतीय इतिहासाची विशुद्ध भारतीय पंरपरेवर आधारित यथोचित ऐतिह्य मांडणीचे दिग्दर्शन नि सूत्रपात करणारा इतिहासवेत्ता आज लोपला
आपल्या आजीवन अखंड अविप्लुत नैष्ठिक ब्रह्मचर्याने नि योगसाधनेने तपःपूत देहांत त्या नीलकंठाप्रमाणे १७वेळाचा विषप्रयोग स्वीकारत आपलं मूलशंकर हे मूळ नाम सार्थ करणारा तो महायोगी आज अमावस्येच्या तिथींस स्वलोकधामी निर्गमन करता झाला...
मला चारही वेदांचे भाष्य करायला ४०० वर्षे लागतील - इति महर्षि दयानंद
जर ते जीवित असते तर आज न्यूनतम २०० वर्षांच्या आयुचे असते आणि त्यांच्या हातून वेदभाष्य तरी पूर्ण झालं असतं पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. जर तरला इतिहासात काहीच स्थान नसतं. इतकंच काय पण त्यांनीच त्यांच्या मतप्रणालीत स्वतःहून बदलही निश्चित केला असता, कारण ते स्वतःला कधी सर्वज्ञ मानत नव्हते.
त्यांची प्रत्येक गोष्ट आंधळ्यासारखी मानावीच असा अट्टाहास त्यांच्याविषयीच्या अंधभक्तीचा सोहळा ठरण्यापेक्षा आपल्या उपासनेने, अध्ययनाने नि डोळस वृत्तीने त्यांचे जे योग्य ते स्वीकारून नि अयोग्य ते त्यागून राष्ट्रप्रथम ही वृत्ती अंगी दृढ करत वैदिक सिद्धांतानुसार जीवनाचा मार्ग धरणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल...
आज खूप काही लिहायची इच्छा होती पण वेळेअभावी इतकंच.
महर्षि दयानंद खरंच ऋषि होते का?
ज्या सत्पुरुषाचा समग्र प्रयत्न हा या भारत देशामध्ये पुन्हा एकदा वैदिक आणि आर्ष युगाच्या प्रोज्वल आणि पुनीत जीवन प्रणालीला पुनर्स्थापित करणे हा होता, ज्याचा संपूर्ण पुरुषार्थ हा प्राचीन ऋषीमुनींच्या चिंतनाला आणि कर्तुत्वाला पुनर्जीवित करणे हा होता, हेच कारण आहे की ब्रम्ह्यापासून ते महर्षी जैमिनीपर्यंतच्या ऋषि परंपरेची पुनः पुनः आठवण करून देणाऱ्या महर्षी श्रीदयानंद यांची गणना सुद्धा वशिष्ठ, विश्वामित्र आणि व्यासांसारख्या ऋषींच्या कोटीमध्ये होऊ लागली होती. दानापूर नावाच्या एका ग्रामी त्यांचं आर्ष चिंतन आणि कर्तुत्वाला, वक्तृत्वाला पाहून एकाने विचारलं की
'महाराज, आपण तर ऋषी आहात!'
पण अत्यंत निर्लोभी, निर्मम, निरहंकारी असणाऱ्या या संन्याशाने स्वतःला त्या ऋषीपरंपरेचा अकिंचन अनुयायी आणि आर्षधारणांचा विनम्र पक्षपोषक मानत असताना अत्यंत विनम्रपणे जे उत्तर दिलं ते पाहण्यासारखे आहे, श्रीदयानंद म्हणतात
'बंध, पुराकालीन ऋषियों के अभाव में तुम मुझें कुछ भी कह लो, किन्तु यदि सांख्य एवं वैशेषिक दर्शनोंके प्रवक्ता महर्षि कपिल और कणादके युग में मैं होता, तो मेरी गणना साधारण विद्वान के रूप मे भी कथञ्चित ही हो होती।'
सरलता आणि विनम्रतेचा अनुपम साक्षात्कार करणाऱ्या या ऋषिश्रेष्ठाच्या चरणी आज पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी दंडवत प्रणाम!
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#महर्षि_दयानंद_पुण्यस्मरण_दीपावली_अमावस्या_सनातन_वैदिकधर्म