वर्षभर ज्या एकाच तिथीची आतुरतेने वाट पहायची अशी आजची तिथी...
*वैशाख शुद्ध पंचमी अर्थात बौद्धादिबुद्धितमसां खलु चण्डभानु: अशा श्रीमच्छंकरभगवत्पादाचार्यांचा जन्मोत्सव...!*
अद्यापपावेतो युधिष्ठिर शक २६३१ अर्थात इसवी सन पूर्व ५०९ ही जन्मतिथी मानत होतो पण मित्रसूतीतले एक विद्वान Vedveer Arya(वेदवीर आर्य) जे स्वत: एक विद्वान इतिहाससंशोधक आहेत, त्यांच्या संशोधनानुसार ती इसवी सन पूर्व ६ एप्रिल ५७६ निघाली. कारण सूर्य मेष राशीत, शुक्र मीन राशीत, शनी तुळ राशीत, मंगळ सिंह राशीत, बुध मेष राशीत. आणि याला जोडून सूर्य-शुक्राची युती वृषभेत ! हे सर्व तपशील ना इसवी सन पूर्व ५०९ ला जुळतात, ना इसवी सन पूर्व ४४ ना मेकॉलेपुत्रांनी मांडलेल्या व मानलेल्या इसवी सन ७८८ ला...
*पण कालनिर्णय काहीही असला तरी इतकं निश्चित की आचार्यांचा काळही इसवी सन पूर्व ५वं शतकंच आहे, यात कधीच तडजोड नाही. मेकॉलेपुत्रांनी दूर रहावे. या सर्व गोंधळाचे कारण कांची, शृंगेरी, कुंभकोणम् मठांचे अंतर्गत वादविवाद तर आहेतंच. पण बोलायचं कोण?*
या आर्षज्ञानप्रचंड भानुचे जीवनातलं स्थान अचल नि अढळ आहे, होतं नि राहील. महर्षि दयानंदांइतकंच. दोघे मला धर्मजिज्ञासेत पूज्य होते नि राहतील.
यद्यपि माझ्यावर महर्षि दयानंद प्रणीत त्रैतवादाचा प्रभाव असल्याने अद्वैतवाद पूर्ण मान्य करण्यांस अद्यापही माझं मन तयार होत नाही तरीही ह्या दोन वादांमध्ये फारसा काही तात्विक भेद आहे असेही नाहीये. दोघांतली साम्यस्थळं कधीतरी विस्ताराने मांडेन. अनुयायांनी अकारण गोंधळ घातलेला असला तरी मला त्यात रस नाही....
आचार्यांची गुणवैशिष्ट्ये...
ही व्यक्ती सद्गुणांची अशी खाण होती. तिची गुणशालिनता मोजु पाहिली तरी लेखमालेचा विषय होईल. अलोकसामान्य व्यक्तित्व, दिव्योदात्त चरित्र, नवनवोन्मेषशालिनी प्रतिभा, अपार नि उत्कट भक्ती, ब्रह्मज्ञानाने तप:पूत देह नि जोडीला तर्कशुद्ध प्रत्युत्पन्न मतीचा धनी असलेला हा योद्धा संन्यासी! बालपणीच पितृछत्र हरपलं तरी संन्यास घेऊनही जन्मदात्री मातेवर निरतिशय प्रेम नि श्रद्धा ठेवणारा हा अद्वितीय मातृभक्त, संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तित्वाला आपलंसं करणारी गुणग्राहकता, आपल्या शिष्यांवर केलेलं अलौकिक प्रेम, भक्तांप्रती असीम दया नि शत्रुंप्रतीही अहैतुकी क्षमा!
आईला दिलेल्या शब्दासाठी संन्यासधर्मही प्रसंगी गुंडाळून ठेवणारा हा थोर मातृभक्त...! आणि त्यावेळी मातृपंचकम् सारखी नेत्रांच्या कडा ओलावणारी रचना करणारा हा कोमल ह्रदयाचा कवी..! माझी आई काहीकाळ आयसीयुत होती त्यावेळी मी ह्या रचनेची पारायणे केली होती. ती बाहेर आली त्यावेळी ह्याची एक पोस्टही केली होती.
*भारतीय दार्शनिकांचा, तत्वचिंतकांचा मुकटमणी...*
अद्वैतवेदांताशी कुणाची सहमती असेल नसेल, हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, पण त्याकाळी उपलब्ध असलेल्या ६४ मतमतांतरांचा गलबला पाहून कुठेही विचलित न होता, हतोत्साहित न होता, मी एकटा काय करणार असा आपल्यासारखा नकारात्मक विचार कदापिही मनात न आणता हा माणुस आपल्या खड्गाच्या धारेसारखा सुतीक्ष्ण बुद्धीने परमतखंडन नि शुद्ध वैदिक मत पुनर्संस्थापन हेतुने तितक्याच प्रगल्भतेने मीमांसा करत तत्कालीन अवघा आर्य्यावर्त पादाक्रांत करत त्याला सुत्रै मणिगणा: इव या गीतोक्तीप्रमाणे चार पीठाधीश्वरांच्या संन्यासपरंपरेत गुंफत राष्ट्रीय एकात्मता साधत भामतीकार वाचस्पति मिश्रांनी म्हटल्याप्रमाणे
*आचार्यकृतिनिवेशनमप्यवधूतं वचोऽस्मदादीनाम् ।*
*रथ्योदकमिव गङ्गाप्रवाहपातः पवित्रयति: ॥*
भामतीकार वाचस्पति मिश्र...
*म्हणजे ज्याप्रमाणे गंगेचे निर्म्मल जल हे गल्लीतल्या पाण्यालाही निर्म्मल करतं, तद्वतंच आचार्यांची वाणी व लेखणी आमच्यासारख्यांच्या वाणींस व लेखणींस पवित्र करते...*
राष्ट्रीय, सामाजिक, राजकीय, वैश्विक, तात्विक, सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, वांशिक, दार्शनिक एकात्मता साधणाऱ्या ह्या प्रज्ञासूर्याच्या चरणी २५३२/२५९९ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
भवदीय...
#श्रीभगवत्पाद_शंकराचार्यजयंती_शांकरमठपरंपरा_वैदिकधर्म_राष्ट्रनिर्णाण_भामती