त्वत्स्थंडिली अतुल-धैर्य वरिष्ठ बंधु।
केला हवीं परमकारुण पुण्यसिन्धु।
हें आपुलें कुलहिं त्यामधि ईश्वरांश।
ज्यांचे समग्र जीवन क्रांतिप्रवण होते नि ज्यांचे विचार क्रांतिगर्भ होते, अशा स्वातंत्र्यवीरांच्या ज्येष्ठ बंधुंच्या, त्यांच्या पाठी पित्यासमान असलेल्या एका अतुल धैर्य वरिष्ठ बंधुंच्या, ज्यांचं समग्र जीवनंच उपेक्षित अंधार्या कारावासांत नि अप्रसिद्धीच्या गुहागुंफात संपून गेले, ज्यांचे जीवन म्हणजे अमूल्य रत्नांची खाणंच आहे नि ज्यांत उदात्त अन् उज्ज्वल प्रसंगांचे कोहिनूर ठासून भरलेले आहेत, ज्यांनी सोसलेल्या नरकयातना ह्या तात्यारावांइतक्याच, किंबहुना अधिक आहेत, ज्यांचे समग्र जीवन हिंदुराष्ट्राच्या नि हिंदुत्वाच्या नि हिंदुसमाजाच्या उत्कर्षासाठीच वाहिलेले होते, अनेक गुप्त क्रांतिकारी संघटनांचे जे उद्गाते नि अनेक तरुण क्रांतिकारकांचे जे मार्गदर्शक, रा स्व संघासारख्या आज हिमालयाएवढ्या उत्तुंग अशा राष्ट्रव्यापी नि विश्वव्यापी संघटनेचे जे उद्गाते, असे अंदमानदंडित क्रांतिवीर श्री गणेश दामोदर उपाख्य श्रीबाबाराव सावरकर ह्यांच्या अमृतमहोत्सवी पुण्यस्मरणानिमित्त सांगलींस जाण्याचा योग नुकताच १६ मार्चला प्राप्त झाला.
महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे भूतपूर्व अध्यक्ष, आमच्या पंढरपूर हिंदुसभेचे श्री अभयसिंह कुलकर्णींचा अट्टाहास होता की हे कार्य आपण तरी करायला हवंच. आधीच सावरकर कुटुंबाची घोर उपेक्षा नि त्यातून बाबाराव तर विस्मृतंच. त्यामुळे हे सतीचं वाण हिंदुसभाच पेलु शकते. म्हणून भुवैकुंठ पंढरीतल्या सर्व हिंदुसभायांसह आह्मीं सर्व सांगलीस श्रीबाबारावांना अभिवादन करण्यासाठी निघालो. ह्यावेळी हिंदुसभेचे श्री विवेक बेणारे, विद्यमान अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरे, महाराष्ट्र प्रदेश हिंदुसभेचे विद्यमान अध्यक्ष श्री अनिल पवार, सोलापूरचे श्री कल्याणी, वारकरी संप्रदाय पाईक संघाची धडाडती )तोफ श्री रामकृष्ण महाराज वीर, पेशवे युवा मंचाची तोफ श्री गणेश लंके आणि श्री महेश भंडारकवठेकर, हिंदुसभेचेच आनंद कुलकर्णी, सुवर्णा पोवार इ. अशी मंडळी उपस्थित होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सांगलीतलेच हिंदुसभाई श्री अरुण गडचे ह्यांनी भूषविले.
सांगलीत चारच्या दरम्यान पोहोचताच सांगलीतले आमचे पंढरपूरचेच मूळचे स्नेही संस्कृत भाषेंवर प्रभुत्व असलेले आचार्य श्रीरघुवीर रामदासींकडे चहा पाण्याची व्यवस्था झाली. सांगलीतल्या ज्या गावभागांत बंधार्यासमीप श्रीबाबारावांचे स्मारक आहे, तिथून जवळंच ह्यांचा निवास आहे. साडेचारच्या समीप कार्यक्रमस्थळी पोहोचलो. मधील काळांत सांगलीतल्या जलप्रलयाच्या थैमानाने स्मारकाची झालेली वाताहात पाहवंत नव्हती. सुदैवाने पूर्वसूचना दिल्याने काही स्वच्छता होतीच. प्रवेशद्वारांवरंच एका पाटीवर त्या वास्तुच्या तत्कालीन उद्घटनाची अक्षरे कोरलेली दिसली. भूतपूर्व पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी नि बाबारावांचे शिष्य हिंदुसभाई थोर चित्रपटकार श्रीभालजी पेंढारकरांच्या हस्तेच हे उद्घाटन झालं होते. त्यावेळी श्री अटलजींचे झालेलं व्याख्यानही उपलब्ध आहे. कथा क्रांतिवीरांच्या - विश्वास सावरकर
स्मारकांत श्रीबाबारावांची अत्यंत दिव्य अशी हातीं ग्रंथ घेतलेली बैठक असलेली तेजस्वी मूर्ती पाहून धन्यता वाटली. त्या नररत्नांस अभिवादन करण्यासाठी नकळंत हात जोडले गेले. इतक्या जलप्रलयाचा आघात सोसूनही मूर्तीवरचे तेज किंचितही ढळलं नव्हतं.
कार्यक्रमाचा आरंभ श्रीभंडारकवठेकरांच्या वेदमंत्रपठनाने नि श्री रामकृष्ण वीर महाराजांच्या हस्ते मूर्तीपूजनाने झाला. त्यानंतर महाराष्ट्र हिंदुसभेच्या वतीने चैत्र पाडवा पासूनच्या दिनदर्शिकेचे विमोचन झाले. पुढे नियोजित कार्यक्रमपत्रिकेनुसार श्रीतात्यारावांच्या अखिल हिंदु विजय ध्वज गीताने आरंभ होऊन श्रीअभयसिंह कुलकर्णींचे प्रास्ताविक झालं. त्यानंतर मान्यवरांची व्याख्याने झाली तींत प्रामुख्याने हिंदुसभेचे श्री गांधी, श्री रामकृष्ण महाराज वीर, श्री तुकाराम चिंचणीकर (अस्मादिक) ह्यांचे चिंतन झाले. ह्यात उपरोल्लेखित श्री रघुवीर रामदासी ह्यांनीही संस्कृतमध्ये श्रीबाबारावांवर छानसं चिंतन प्रकट केलं. अंती अध्यक्ष श्री अरुण गडचेंचे ह्यांचे अध्यक्षीय चिंतन झालं.
कार्यक्रमाचे पूर्ण सूत्रसंचालन हे श्री विवेक बेणारे ह्यांनी केले. कार्यक्रमांस उपस्थितांची संख्या जरी न्यून म्हणजे वीस-पंचवीसच्या समीप असली तरी कार्यक्रम उत्साहांत पार पाडला. आटपाडीतले आमचे एक धारकरी मित्र नि बंधु श्री प्रथमेश देशपांडे आमच्या स्नेहाखातर उपस्थित राहिले. सांगलीतले स्थानिक मित्र श्री संदीपजी कुलकर्णीही उपस्थित होते. दुर्दैव इतकंच की अपेक्षेप्रमाणे सांगलीकरांची उपस्थिती फारंच न्यून होती. आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांची उपेक्षाही. अस्तु।
कार्यक्रमाची सांगता अध्यक्ष श्री बाळासाहेब डिंगरेंच्या आभारप्रदर्शनाने नि आमच्या वंदे मातरम गायनाने झाली...
ज्या सांगलीत श्रीबाबारावांच्या जीवनांतला अंतिम काळ गेला, त्याच वास्तुंत त्यांना अभिवादन करणे हे आमच्या दृष्टीने अत्यंत भाग्याचे लक्षण होते. क्रांतिवीरांना सर्व जग विस्मृतीच पाठवेल पण आह्मीं हिंदुसभाई मात्र हे सतीचे वाण कधीच त्यागणार नाही.
ह्या कार्यक्रमांत आह्मांस त्या भीषण जलप्रलयाने ओलसर झालेल्या काही ग्रंथांचीही प्राप्ती झाली. त्यावर सविस्तर पुढील लेखांत येऊच.
ह्या कार्यक्रमाच्या काही महत्वपूर्ण चित्रफीती
सौजन्य श्री रामकृष्ण महाराज वीर
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037763949621784&id=100001646254878
https://m.facebook.com/story.php?story_fbid=3037803272951185&id=100001646254878
आमचं वन्दे मातरम्
https://youtu.be/HAt-Ww5NiHw
सौजन्य श्री प्रथमेश देशपांडे
वि रा करंदीकरांच्या शब्दांतंच लेखणींस विराम देतो..
निज राष्ट्राच्या उदयासाठी
हिंदु जातीच्या विजयासाठी
तुमुल संगरी प्राणपणाने लढलें जे बेभान
मंगल ते बलिदान। त्यांचे। मंगल ते बलिदान।
भवदीय,
पंढरपूर हिंदुसभा
#क्रांतिवीर_बाबाराव_सावरकर_अमृतमहोत्सवी_पुण्यस्मरण_सांगली_अटलबिहारीवाजपायी_भालजीपेंढारकर