*इयें मराठीचियें नगरीं। ब्रह्मविद्येचा सुकाळुं करीं।*
कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती श्रीज्ञानोबाराय
भाषेच्या इतिहासाचा जेंव्हा आपण विचार करतो तेंव्हा वैदिक संस्कृत ही आदिभाषा आहे अशी सर्व प्राचीन अशा एतद्देशीय व्याकरणकारांची नि भाषाशास्त्रज्ञांची संमती आपणांस प्राप्त होते. वैदिक शब्दांवर आधारित नि वैदिक-पद-बहुला लोकभाषा जी ब्रह्मा आणि सप्तर्षींद्वारे सृष्ट्यारंभीच्या आदि मानवांमध्ये व्यवह्रत झाली, जिचा उल्लेख भरतमूनीने त्याच्या नाट्यशास्त्रामध्ये १७।२७ आणि २८ येथे अतिभाषा किंवा आदिभाषा असा केला आहे, अश्या ह्या मूल वैदिक संस्कृतपासून लौकिक संस्कृत नि प्राकृतभाषांचा विस्तार नि विकार पुढील काळांत झाला. वैदिक संस्कृतपासून उद्भवलेल्या किंवा विकार पावलेल्या प्राकृतभाषांमध्ये सर्वप्रथम जिचा आविष्कार झाला, ती म्हणजे शौरसेनी प्राकृत. ह्या शौरसेनी प्राकृतचे पुढे जे तीन प्रमुख भेद झाले, त्यामध्ये महाराष्ट्री ही प्रथम असून मागधी नि पैशाची ह्या दोन पश्चातच्या आहेत. प्राकृतभाषांच्या अध्ययनासाठी जो सर्वात प्रथम नि अधिकारी ग्रंथ असा जो उपरोक्त भरतमूनींचा नाट्यशास्त्र नावाने सुपरिचित आहे, ज्याचा कालावधी महाभारतकालाच्या पूर्वीचा आहे, त्या ग्रंथामध्ये १७।४८ येथे नाट्याचार्य श्रीभरतमूनींनी
*सर्वास्वेव हि शुद्धासु जातिषु द्विजसत्तमाः।*
*शौरसेनीं समाश्रित्य भाषां काव्येषु योजयेत्।*
असे म्हटलंय. विक्रम संवत पूर्व पांचव्या शतकांतले महान मीमांसक श्रीकुमारिल भट्टपाद हे त्यांच्या तंत्रवार्त्तिक ह्या अत्यंत प्रसिद्ध ग्रंथामध्ये
*मागध-दाक्षिणात्य-तदपभ्रंशप्रायासासाधुशब्दनिबन्धिना।*
असे म्हणतात. इथे मागधी व दाक्षिणात्यावरून महाराष्ट्री अथवा जैनीचा अभिप्राय श्रीकुमारिलभट्टांस आहे असे लक्ष्यीं येते. अपभ्रंशही आहे.
*महाकवी श्रीदंडीचा काव्यादर्श मधील संदर्भ*
ज्याचे पदलालित्य प्रसिद्ध आहे, असा श्रीदंडी त्याच्या काव्यादर्श ह्या ग्रंथामध्ये महाराष्ट्री अर्थात मराठीविषयी जे लिहितो महत्वाचे आहे.
*महाराष्ट्राश्रयां भाषां प्रकृष्टं प्राकृतं विदुः।*
*सागरः सूक्तिरत्नानां सेतुबन्धादि यन्मयम्।*
महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा हींस लोक प्रकृष्ट प्राकृत समजतात. ह्यामध्ये सूक्तीरुपी रत्नांचा सागर आहे ज्यात सेतुबंध नावाचे काव्य रचलं गेलंय.
ह्या सेतुबंधग्रंथाच्या टीकेमध्ये रामदास नामक लेखकाने 'महाराष्ट्रभाषायां' असा शब्दप्रयोग केला आहे. कर्पुरमञ्जिरी ह्या ग्रंथामध्येही शौरसेनी व महाराष्ट्री दोन्हींचा उल्लेख आहे.
प्राकृतभाषेच्या बव्हतांश सर्व वैय्याकरणींनी एकमुखाने महाराष्ट्रींस सर्वोत्तम प्राकृत मानलं आहे आणि मुख्यतः तिचेच नियम दिले आहेत. विस्ताराने ह्यावर पुढे लिहुच.
पुरुषोत्तम नावाच्या व्याकरणकाराने त्याच्या 'प्राकृतानुशासन' नावाच्या ग्रंथामध्ये ११।१ येथे शौरसेनी व महाराष्ट्री अर्थात मराठी दोन्ही एकंच आहेत असे प्रतिपादन केलं आहे. आपल्याला अभिमान हवा की संस्कृतला सर्वांत जवळ भाषा कोणती असेल तर ती मराठी आहे. एक मराठीभाषिक म्हणून, महाराष्ट्रीय म्हणून आपल्या मातृभाषेच्या निर्मितीसंबंधी काहीसं चिंतन आवश्यक आहे म्हणून हा लेखनप्रपंच.
*प्राकृत ही संस्कृतपासूनंच*
सर्व प्राचीन संस्कृत नि प्राकृत व्याकरणकार ज्यांत हेमचंद्र नावाचा जैन व्याकरणकार आहे, हा स्पष्ट लिहितो की प्राकृत ही संस्कृत पासून निर्माण आहे. त्याने वैदिक संस्कृत सर्व भाषांची जननी मानलीय. ईसवी सन पूर्व ५६ च्या विक्रमाच्या प्रासादांतला जो नवरत्नांपैकी एक असा कालिदास वगैरे, त्यांतलाच एक म्हणजे आचार्य वरऋचि हा प्रथितयश व्याकरणकार नि निरुक्तकार. हा संस्कृतबरोबर प्राकृत भाषांचाही व्याकरणकार होता. हा त्याच्या *प्राकृत प्रकाश* ह्या ग्रंथांतही लिहितोच की
*प्राकृत ही संस्कृत पासूनंच आहे. वैदिक संस्कृत सर्व एतद्देशीय भाषांची जननी आहे...*
सांप्रत काही ब्रेकिंग इंडिया फोर्सेस अर्थात भारत विखंडन शक्ती ह्या प्राकृत नि संस्कृत ह्यात भेद दाखवून,भेद आहेच, पण तो भेद आर्य विरुद्ध अनार्य वादासाठी दाखवून हिंदु समाजांत फुट पाडण्याचे काम करताहेत. सूज्ञांनी सावध रहावे ही विनंती. भविष्यांत ह्यावर विस्ताराने येऊच.
भवदीय,
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com
#संस्कृत_प्राकृत_मराठीभाषा_महाराष्ट्री_भरतमूनी_वरऋचि