Thursday, 27 April 2017

वेदांतले ऋषी व देवता ही व्यक्तीवाचक नावे किंवा देहधारी व्यक्ती नाहीत.




वैदिक ऋषी ह्या अर्थाबद्दल तीन प्रवाह आहेत

१. ऋषी मंत्राचे उद्गाते आहे अर्थात त्या ऋषींनी ते मंत्र समाधी अवस्थेत ते सत्य पाहिले व ते तत्व किंवा सत्य शब्दबद्ध केलं. थोडक्यात त्यांना ते मंत्र स्फुरले.थोडक्यात ते मंत्रांचे कर्ते आहेत. इथे पाहिले म्हणजे उघड्या डोळ्यांनी नव्हे तर अंत:चक्षूंनी असा अर्थ आहे.

२. मंत्र आधीपासूनच आहेत पण त्यात्या ऋषींनी त्यात्या मंत्राचे समाधी अवस्थेत चिंतन केलं व त्यावर भाष्य केलं किंवा त्या मंत्रांचा अर्थ त्यांस अधिक स्पष्ट झाला. म्हणून ते मंत्रकर्ते नसून मंत्रद्रष्टे झाले. द्रष्टेस्वरुपात ते मंत्र त्यांनी पाहिले व त्यावर भाष्य केलं.

३. मंत्र व त्यांची सुक्ते व त्यांचे ऋषी आधीपासूनच आहेत. परमेश्वरानेच ती नावे त्यात्या सुक्तास आधीच देऊन ठेवली आहेत.

ह्यातला पहिला विचारप्रवाह आम्हांस अजिबात मान्य नाही. अनेक विद्वानांनाही तो मान्य नाही कारण त्याने वेदांची रचना क्रमाक्रमाने झाले असे सिद्ध होते व अपौरुषेयत्वांस बाधा येते.

दुसरा प्रवाह तसा वैदिकांत मान्य आहे पण आम्हांस नाही. कारणे सविस्तर खाली लिहिली आहेत..

तिसरा प्रवाह जास्ती मान्य आहे व तोच आम्हांस अधिक सयुक्तिक वाटतो. कारणे निम्नलिखित!

सविस्तर भूमिका निम्नलिखित स्वरुपांत.

सर्वेषां तु स नामानि कर्माणिच पृथक् पृथक् !
वेदशब्देभ्यः एवादौ पृथक् संस्थाश्च निर्ममे !
मनु - १.२१

अर्थ – सृष्टीच्या आधी परमेश्वराने वेदांतील शब्दावरून चेतन आणि अचेतन अशा सर्वच वस्तूंचे नामकरण केले आणि त्यांचे पृथक म्हणजे भिन्न भिन्न कर्म ठरविले आणि संस्था निर्माण केल्या.

 वेदांच्या अपौरुषेयत्वासंदर्भातला हा संदर्भ व सिद्धांत महत्वाचा असून मनुस्मृती मध्ये तो अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे

आता पुढचा श्लोक बघुयात

ब्रह्मसूत्र भाष्यात १/३/३०

समाननामरूपत्वाच्चावृत्तावप्यविरोधो दर्शनात्स्मृतेश्च।

 ह्या सूत्रावर भाष्य करताना आचार्य शंकर म्हणतात

ऋषीणां नामधेयानि याश्च वेदेषु दृष्टय !
शर्वयन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः !

अर्थ - वेदांमध्ये ऋषींची जी नावे व ज्यादृष्टीने ती आलेली आहेत तीती सर्व नामे आणि त्या सर्व दृष्टी तो अजन्मा परमेश्वर प्रलयाच्या अंती म्हणजेच पुढच्या सृष्टीच्या आरंभी निर्माण केलेल्या ऋषी आणि मानवांना प्रदान करतो !

ह्या दोन श्लोकांवरून खालील निष्कर्ष निघतात

१. वेद हे सृष्टी आरंभी विद्यमान असल्याने यांची रचना कुण्या ऋषींनी केली किंवा त्यांना ते मंत्र स्फुरले किंवा त्यांनी ते रचले असे म्हणणे हे सर्वथा निंदनीय आहे.

२. सर्व मंत्रांवरची जी नावे आहेत ती परम्यात्माने सृष्टीच्या आरंभीच ठेवली आहेत.

३. आणि नंतरच्या काळात जन्माला आलेल्या सर्व ऋषींची नावे ही ह्यात वेदांतील सुक्तांवरूनच ठेवली गेली आहेत.

आता खालील शंका उपस्थित होतात

काही ऋषींची नावे वेदांतल्या सुक्तांच्या वर आढळतात परंतु ती नावे वेदांतल्या मंत्रांमध्ये (संहिता भागात) मात्र आढळत नाहीत असे का?

शंकेचे उत्तर -  परमेश्वर पक्षपाती नाही त्यामुळे तो सर्व ऋषींची नावे स्वतःच ठेवतो. काही ऋषींची नावे स्वतः आणि काही ऋषींची नावे भविष्यांत जन्माला येणार्या सर्व सामान्य मनुष्यांनी ठेवावे असा पक्षपात तो करत नाही.

दुसरे असे की वैदिक सुक्तांवर ही ऋषींची नावे सृष्टीच्या आधीच ठेवली गेलेली आहेत. ती नंतर कुणी त्यांना दिली हा सिद्धांत निराधार आहे. त्यामुळे भविष्यात निर्माण होणार्या भावी मर्त्य मानवांना, मग भले ते विश्वामित्र, व्यासांसारखे, वाल्मिकिंसारखे कितीही विद्वान असोत, त्यांना ह्या सुक्तांना स्वतःची नावे देण्याचा अधिकार नाही. उलट त्यांची नावे ह्या आधीच्याच सुक्तांच्या ऋषींच्या नावांवरून आणि त्याने प्रकट होणार्या अर्थांवरून घेतली आहेत. ऋग्वेदामध्ये २/३(दोन तृतीयांश) ऋषी असे आहेत की जे त्या मंत्राच्या वरही आहेत आणि त्या मंत्रातही आहेत.

कुर्मपुराणांत पण उपरोक्त सिद्धांतच सांगितला आहे.

कूर्मपुराणम्-पूर्वभागः/सप्तमोऽध्यायः

वेदशब्देभ्य एवादौ निर्ममे स महेश्वरः ।
आर्षाणि चैव नामानि याश्च वेदेषु सृष्टयः ।७.६८

शर्वर्यन्ते प्रसूतानां तान्येवैभ्यो ददात्यजः ।।
यथर्त्तावृतुलिङ्गानि नानारूपाणि पर्यये ।७.६९


लिङ्गपुराणम् - पूर्वभागः/अध्यायः ७०

येथे पण उपरोक्त श्लोकच आहे तसे दिलेले आहेत. थोडक्यात पुराणे पण तीच गोष्ट सांगतात जी मन्वादि स्मृतिकार सांगतात.

त्यामुळे ऋषी मंत्रकर्ता आहेत ह्या सिद्धांताचे खंडन खालील गोष्टींनी होते

१. अनेक सुक्तांना एकापेक्षा अनेक ऋषी आहेत व काही ठिकाणी तर ते सहस्त्र (१,०००) इतक्या संख्येने किंवा त्यापेक्षाही जास्ती आहेत. मग आता ह्या वरून त्या सर्वांनी ते सुक्त द्रष्टे स्वरुपात पहिले किंवा रचले असे ठरवायचे का???स्पष्टपणे नाहीच नाही ! म्हणजेच ते ऋषी कुणी देहधारी मानव नसून परमेश्वराने आधीच ठेवलेली नावे आहेत.

२. काही मंत्र एकाच वेदामध्ये किंवा अन्य वेदामध्ये परत येतात यद्यपि त्यांचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे हा पुनरुक्तीचा दोष काही भाष्यकार मानतात पण तो चुकीचा आहे. असो तो स्वतंत्र विषय आहे. स्वतंत्रपणे त्यावर कधीतरी लिहीन. पण तूर्तास एवढेच की अश्या मंत्राचे एकाच वेदांतले भिन्न भिन्न ठिकाणचे ऋषी वेगवेगळे का असतात ??? मंत्र तोच आहे म्हटल्यावर ऋषीही तोच का येत नाही??? थोडक्यात वेद आधीपासूनच आहेत हे स्पष्ट होते.

३. अनेक मंत्रांच्या ऋषींची नावे तरप्-तमप् प्रत्यय लावल्यानेत्यांची रूपे बदलतात जसे इन्द्राचे इन्द्रतम् किंवा कण्व ऋषींचे कण्वतम् असे रूप होते. जर हे ऋषी व्यक्तिवाचक नावे असती तर त्यांची ही अशी रूपे कधीच झाली नसती. थोडक्यात हे ऋषी व्यक्तिवाचक नावे नाहीत.

४. अनेकवेळा येणारी अलौकिक वर्णने ही मानव रूपांतील देहधारी व्यक्तींची असूच शकत नाहीत. त्यामुळेही वेदांतील देवता वा ऋषी हे सर्व देहधारी जीव असूच शकत नाहीत.

५. असे अनेक सुक्त आहेत ज्यांचे ऋषी हे तिर्यक योनीतील पशु पक्षांची नावे आहेत. ऋग्वेद ८/६७ सूक्ताचे ऋषी हे “जालबद्धाः मत्स्याः’ असे आहेत. मग आता मासा कसा काय ऋषि असु शकेल ???


ऋकसर्वानुक्रमाणिका मध्ये आचार्य कात्यायन हे ऋषी आणि देवता ह्याबद्दल लिहिताना म्हणतात

यस्य वाक्यं स ऋषिः; या तेनोच्यते सा देवता !

ज्याचे वाक्य आहे तो ऋषी आहे आणि ज्याला उद्देश्यून ते म्हटले जात आहे ती देवता आहे.

अगदी साधे उदाहरण आपण यम-यमी सूक्ताचे(ऋग्वेद – १०/१०) घेऊ. ह्या सूक्ताचे अनेक विकृत अर्थ इतिहासाचार्य राजवाडे व पाश्चिमात्य भाष्यकारांनी काढले आहेत. सविस्तर कधीतरी त्यावर लिहीन पण आत्ता जो विषय आहेत त्यात हे सांगणे आवश्यक आहे की ह्या सुक्तामध्ये ज्या ऋचांमध्ये यम बोलतो आहे तिथे तो ऋषी आहे आणि ज्या यमीला तो उद्देश्यून बोलतो ती त्या त्या ऋचेपुरती त्या मंत्राची देवता आहे. आणि जिथे ती यमी बोलते आहे त्या ऋचांची ती ऋषी असून ती ज्या यमाला उद्देश्यून बोलते आहे तो यम त्यात्या ऋचांचा ऋषी आहे.

आता ऋषी शब्दांची व्युत्पत्ती पाहुयांत

ऋषी हा शब्द व्याकरणानुसार तुदादि धातू पासून ईन् प्रत्यय लागून निर्माण होतो. “ऋषति गच्छति, प्राप्नोति, जानाति वा स ऋषिः - गतीचे ज्ञान, गमन आणि प्राप्ती” हे तीन अर्थ होतात. निरुक्तकारांनी “ऋषिर्दर्शनात्” ह्य शब्दाने मंत्राच्या अर्थाचा किंवा गुढार्थ ह्याचा द्रष्टा किंवा प्राप्तकर्ता, साक्षात्कार कर्ता असे अर्थ प्रतिपादून  किंवा “साक्षात्कृतधर्मा”हाच सिद्धांत सांगितला आहे. महर्षी दयानंदांनी “मंत्रद्रष्टा” ह्याबरोबरच “ईश्वर” असाही अर्थ सांगितला आहे. सायणाचार्य “अतीन्द्रियार्थद्रष्टा” असा अर्थ लावतात. यजुर्वेदाचे भाष्यकार उव्वट हे “मन्त्रव्याख्याता” अशी उपमा देतात. मेधातिथी ह्यांनी वेद आणि त्याचा अर्थद्रष्टा दोघांनाही ऋषी मानले आहे.

वेदांच्या प्रत्येक सुक्ताला ऋषी आहेत. काही सुक्तांना तर एकापेक्षा अनेक ऋषी आहेत. मग हे ऋषी म्हणजे नेमके कोण???

गायत्री मंत्र ज्या ऋग्वेदाच्या ३.६४ येथे येतो त्या सुक्ताचे ऋषी विश्वामित्र आहेत. ह्याचा अर्थ विश्वामित्रांनी तो मंत्र स्फुरला असा नाही. कारण काही असे अनेक सुक्त वेदांमध्ये आहेत ज्यांचे एकापेक्षा अनेक ऋषी आहेत. एका सुक्ताला तर सहस्त्र ऋषी आहेत असे सांगितले आहेत. मग त्या सर्वांनी तो मंत्र रचला असे समजायचे का??? त्यामुळे मनुष्यरुपांत ते मंत्रद्रष्टे आहेत असे म्हणणे चुकीचे ठरेल. मग ते नेमके कोण??? ह्याचे प्रमाण खालीलप्रमाणे


अयमेव विश्वामित्र अय जमदग्नि:, इमावेव वसिष्ठकश्यपो, अयमेव वसिष्ठ अयं कश्यप । वागेवात्रिर्वाचा अन्नमद्यते । अत्तिर्हवै नामैतद् यदत्रिरिति ।


अर्थ - इथे दोन कान, दोन नेत्र, दोन नासिका छिद्र, आणि वाणी ह्या सर्वांना गौतम, भरद्वाज, जमदग्नी, वसिष्ठ इत्यादि नावांनी संबोधिले गेले आहे.

पुढचा संदर्भ कण्व ऋषींचा


कण्व इति मेधाविनाम
निघण्टु - ३.१५

अर्थ - कण्व हे नाव मेधाबुद्धिसंपन्न सर्व व्यक्तींच्या साठी आहे.


कण्व ऋषी जरी इतिहासात झाले असले तरी त्यांचा वैदिकऋचांशी काही संबंध नाही. त्यांचे नाव वैदिक ऋचांच्या ऋषीवरून ठेवले गेले आहे हा सिद्धांत इथे मांडण्याचा प्रस्तुत लेखकाचा प्रयत्न आहे.

थोडक्यात ही नावे व्यक्तिवाचक नाहीत. तर ती नित्य नावे आहेत. अनित्य व्यक्तींचा, वस्तुंचा इतिहास वेदांमध्ये नाही.

त्यामुळे वेदांतल्या ऋषी शब्दांवरून एखाद्या व्यक्तीचा बोध घेत असु तर ते चुक आहे.

अर्थात वेदांतील शब्दावरून नंतरच्या काळात इतरांची नावे ठेविली गेलीत हे त्रिवार सत्य आहे.

म्हणजेच वसिष्ठ शब्दांवरून वसिष्ठ ऋषींचे नाव ठेवले गेले. तसेच इतर ऋषींचे ! तेंव्हा आता ऋषी वसिष्ठांनी देहधारणकरून वेदमंत्र द्रष्टेस्वरुपात पाहिले किंवा रचले असे म्हणले तर तेही चुक ठरेल. वेदांतले ऋषी हे व्यक्तिवाचक नावे नसून ते प्राण वगैरे आहेत हे वर स्पष्ट केलं आहेत.

ह्यावरूनच वेदांचे अपौरुषेयत्व सिद्ध होते. कारण वेदांमध्ये इतिहास सिद्धच होऊ शकत नाही. अर्थात वेदांमध्ये इतिहास सिद्ध करण्याचा प्रयत्न काही लोक करतात त्यांनी विशेषकरून ह्या गोष्टींकडे लक्ष द्यावे.

वेदांतले ऋषींची नावे ही व्यक्तीवाचक नसून ती प्राण, नेत्र वगैरे वाचक आहे.
ह्यांचा संबंध प्रत्यक्ष परमेश्वराशी आहे. कारण वेद ही साक्षात् ईश्वरीय वाणी आहे.

आता देवता शब्दाबद्दल !

वैदिक सिद्धांतामध्ये देवता हा शब्द परमात्मा ह्या अर्थानेच आला आहे. किंवा देव हा शब्द परमात्मा व त्या परमात्म्याच्या विविध शक्ती म्हणजे देवता असा अर्थ आहे. त्यामुळे वेदांमध्ये सुक्तांच्यावर ज्या देवता आहेत त्या प्रत्यक्ष परमेश्वर किंवा त्याच्या शक्ती ह्या अर्थाने आहेत. जसे की इंद्र, अग्नी, मरुत्, मातरिश्वा, ब्रह्म विष्णु, रुद्र वगैरे देवता. ही एकाच परमात्म्याची विभिन्न नामाभिधाने आहेत जसे निम्नलिखित प्रमाण सांगते

ओ३म् इन्द्रं॑ मि॒त्रं वरु॑णम॒ग्निमा॑हु॒रथो॑ दि॒व्यः स सु॑प॒र्णो ग॒रुत्मा॑न् । एकं॒ सद्विप्रा॑ बहु॒धा व॑दन्त्य॒ग्निं य॒मं मा॑त॒रिश्वा॑नमाहुः ॥

ऋग्वेद - १.१६४.४६

अर्थ - इथे अग्नी जो ईश्वराचे प्रकाशरुप आहे, इंद्र जो ईश्वराच्या ऐश्वर्याचे प्रतीक आहे, जो वरुण हा 'वरुणो नाम वर श्रेष्ठ:' असा आहे, प्रकृत्यादि दिव्य पदार्थांमध्ये व्यापून राहिलाय तो दिव्य, ज्याचे उत्तम पालन व कर्म आहेत असा सुपर्णा, ज्याचा आत्मा अर्थात स्वरुप महान आहे, जो वायुसमान बलवान आहे असा मातरिश्वा, जो सर्वांचा मित्र असा इंद्र, अग्नी म्हणजे प्रकाशमान,

स ब्रह्मा स विष्णु: स रुद्रस्स शिवस्सोsक्षरस: परम: स्वराट् ।

स इन्द्रस्स कालाग्निस्स चन्द्रमा: ।

अर्थ - तो सर्व विश्वाला निर्मितो म्हणून ब्रह्म, तो सर्वव्यापक असल्याने विष्णु, तो दुष्टांना दंड देतो म्हणून रुद्र, मंगलमय व सर्वांचा कल्याणकर्ता असल्याने शिव, जो सर्वत्र व्याप्त अविनाशी असा, स्वयं प्रकाशरुप असा विराट् व प्रलयामध्ये सर्वांचा काल असा कालाग्नि असो तो परमेश्वर !


वेदांमध्ये देवता ही संकल्पना प्रामुख्याने अध्यात्मिक अर्थाने आहे. अध्यात्मिक भाग तो आहे की जो एका जीवाच्या आश्रयाने होत असतो. आपल्या शरीरातल्या विविध अवयवांच्या, आत्मा, मन, इंद्रिये, बुद्धी, हे सर्व अध्यात्मिक ह्या नावाने जाणले जातात.


प्राण हाच रुद्र आहे, वक्तृत्व शक्तीच अग्नी आहे, श्वास आणि प्रच्छवास आश्विनीकुमार आहेत, इंद्र मन आहे, पृथ्वी आप तेज आदि वसु आहेत वगैरे वगैरे.

आता आधिभौतिक भावनेने पाहिले तर ह्या समग्र विश्वात असलेली शक्ती की जो परमात्मा ह्या अर्थाने हा शब्द येतो.

तिसरी अधिभौतिक भाग हा ह्या दोघांवर अवलंबून आहे.

थोडक्यात सांगायचे तर ह्या सर्व वैदिक देवता ह्या सूत्रात्मा आहेत व सुक्ष्म रुप आहेत.

जसे अग्नी - भूलोक, वीर्य, प्राण, मन, आत्मा, पुरुष, ब्रह्म, पर्जन्य, आदित्य, समग्र देवतादि

इंद्र - अंतरिक्षलोक, वीर्य, वाक्, प्राण, ह्रदय, मन, आत्मा, सूर्य, समग्र देवतादि

सोम - चंद्रमा, अन्न, रस, प्राण, क्षत्र, रेतस, इत्यादि

देवता ह्या विषयांवर मी स्वतंत्रपणे चिंतन करेन कधीतरी.

व्यासांनी वेदांचे चार विभाग केले असा थोतांड सिद्धांत मांडणार्यांनी तर इथे विशेष लक्ष द्यावे. पुरुषसुक्तांत स्पष्टपणे चारीही वेदांचा उल्लेख आधीच असताना व्यासांनी महाभारतकाली किंवा नंतर किंवा आधी वेदांचे चार विभाग केले असे म्हणणे बालिशपणाचेच नव्हे तर अतिमूर्खतेचे ठरेल.

अर्थात झोपलेल्याला जागे करता येतं पण झोपेचे सोंग घेतलेल्याला नव्हे.

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

© तुकाराम चिंचणीकर
#पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

Monday, 3 April 2017

ब्रह्मचर्याचा अनुपम नि सर्वोकृष्ट आदर्श – पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण


मूर्खस्य पञ्चचिन्हानि गर्वो दुर्वचनं तथा !
क्रोधश्च दृढवादश्च परवाक्येष्वनादरः !
श्रीकृष्णाच्या चारित्र्यावर शंका घेणार्या मुर्खांनी आधी आपली लायकी पहावी !!! अर्थात ज्यांची अंतःकरणे आधीच वासनेने बरबटली आहेत त्यांना कावीळ झाल्याप्रमाणे जग पिवळेच दिसणार. पुराणांतल्या काही विकृत कथांनीही ह्यात भर घातलेलीच आहे म्हणा ! पण ज्यांनी आयुष्यात कधीच महाभारत वाचले नाही त्यांचासाठी हा लेखनप्रपंच !!!

श्रीकृष्णाच्या ब्रह्मचर्याचा आदर्श !!!
महाभारताच्या जितक्या प्रती आज उपलब्ध आहेत त्यापैकी १९६६ ह्या वर्षी आदरणीय राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन ह्यांच्या करकमलांनी प्रकाशित झालेली भांडारकर इथली सुखटणकर, बेलवलकर आदि विद्वानांनी संपादित केलेली चिकीत्सक अशी संशोधित प्रत आज सर्वमान्य आहे. सुदैवाने ही प्रत आज आंतरजालावर उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी इथे ती अभ्यासावी http://sanskritdocuments.org/…/mahabh…/mahabharata-bori.html
श्रीकृष्णाच्या रासलीला वगैरे कथांनी भ्रमित होऊन अनेक लोक त्यांच्या चरित्रावर आक्षेप घेऊन मोकळे होतात. आणि स्वतःला अभ्यासक म्हणविणारेही केवळ पुराणांवर विश्वास ठेऊन श्रीकृष्ण चरित्राचे अध्ययन करतात. वास्तविक पाहता कृष्णचरित्राच्या अध्ययनात महाभारताचा अभ्यास केवळ आवश्यकच नाही तर अपरिहार्यही आहे. श्रीमद्भागवतामध्ये रासक्रीडेच्या प्रसंगातच त्यांना “साक्षातमन्मथमन्मथः” असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात कामविकाराचा लवलेशही असणे भागवतानुसार तर संभवत नाही. पण आता महाभारतानुसार पहायचे म्हटले तर सौप्तिक पर्वाततरी श्रीकृष्णाचे ब्रह्मचर्य त्यांच्याच मुखातून स्पष्टपणे सिद्ध झाले आहे. तो पूर्ण प्रसंग खालीलप्रमाणे
अश्वत्थाम्याने पांडववधाची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अपयश आल्यानंतर त्याचे ब्रह्मशिरास्त्र पांडवांचा शेवटचा गर्भ असा उत्तरेचा त्याच्यावर ते सोडले. त्याआधी श्रीकृष्णांनी अश्वत्थाम्याचा हा अविचार पाहून युधिष्ठिराला भीमाचे संरक्षण करण्यांस सांगितले. त्यावेळी श्रीकृष्णांनी युधिष्ठीराला अश्वत्थाम्याने मला एकदा माझे सुदर्शन चक्र मागितल्याची कथा सांगितली. आपले ब्रह्मशिरास्त्र श्रीकृष्णांनी घेऊन त्यांचे सुदर्शन आपल्यांस द्यावे अशी गळ त्याने घातली पण त्याला ते जागचे हलविताही येईना. तेंव्हा श्रीकृष्णांनी त्याला उत्तर देताना म्हटले की
“अरे माझ्या प्रिय अशा गांडीवधरी अर्जुनाने देखील कधी मला ते मागितले नाही.”
पुढे आपल्या नैष्ठिक ब्रह्मचार्याचे उदाहरण देताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात
ब्रह्मचर्यं महद्घोरं चीर्त्वा द्वादशवार्षिकम् |
हिमवत्पार्श्वमभ्येत्य यो मया तपसार्चितः ||२९||
समानव्रतचारिण्यां रुक्मिण्यां योऽन्वजायत |
सनत्कुमारस्तेजस्वी प्रद्युम्नो नाम मे सुतः ||३०||
महाभारत – सौप्तिक पर्व – अध्याय १२
अर्थ - विवाहानंतर हिमालयात जाऊन द्वादश वर्षे मी घोर असे ब्रह्मचर्याचे तप करून आणि माझ्या बरोबर माझ्या पत्नीने म्हणजे रुख्मिणीने देखील तसेच समान ब्रह्मचर्य व्रत आचरून आम्हा दोघांस ह्या तपःसामर्थ्याने सनत्कुमारांसारखा तेजस्वी असा प्रद्युम्न नामक पुत्र प्राप्त झाला.
अशा प्रद्युम्नाने देखील मला कधी माझे सुदर्शन मागितले नाही ? आणि तु मागतो आहेस ???"""
थोडक्यात विवाहानंतरही जे भगवान द्वादश वर्षे पत्नीसह ब्रह्मचर्याचे अतिघोर आणि उत्कृष्ट पालन करतात, त्या श्रीकृष्णासारख्या चारित्र्यसंपन्न पुरुषांवर स्त्रीलंपटपणाचा आरोप करणारे लोक काय लायकीचे आहेत हे आपण सर्व सुज्ञ आता निश्चितच जाणते व्हाल ! सांप्रतकाली विवाहाच्या आधीही ब्रह्मचर्य पालन करण्याची कल्पनाही न करणारे लोक स्वतः किती लायकीचे आहेत ह्याचा विचार करतील का ??? आचरण तर दूरच राहिले!!!

अश्वमेधिक पर्वातले श्रीकृष्णांचे आणखी एक ब्रह्मचर्याचे उदाहरण
अश्वत्थाम्याने ते ब्रह्मशिरास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडले तेंव्हा जन्माला येणारे मुल जे पुढे परीक्षित नावाने ओळखले गेले ते मृत म्हणूनच जन्माला आले ! तेंव्हा पांडवांचा हा वंश खुंटणार की काय ह्या भीतीने सर्व पांडवपक्षातल्या स्त्रिया विलाप करित असताना द्रौपदी मात्र श्रीकृष्णांच्या आगमनाची वाट पाहत बसली. भगवान तिथे येताच ती त्यांस म्हणाली
“यादवश्रेष्ठ कृष्णा, तु दिलेले वचन पूर्ण करशील ना? तु पराक्रमी, धर्मवेत्ता सत्यप्रतिज्ञ आहेस. त्रिभुवन सारे मृत झाले तरी त्याला जीवित करण्याचे सामर्थ्य तुझ्यात आहे. मग भाच्याच्या मुलाला जीवित करण्याचे तुला काय कठीण आहे? तुझे सामर्थ्य ज्ञात असल्यानेच तुझ्यापुढे हे हात जोडून मी मागणे मागत आहे.”
पुढे उत्तरेनेही श्रीकृष्णांची करुणा भाकल्यावर त्यांनी तिला अभय देताना म्हटले.
न ब्रवीम्युत्तरे मिथ्या सत्यमेतद्भविष्यति |
एष सञ्जीवयाम्येनं पश्यतां सर्वदेहिनाम् ||१८||
नोक्तपूर्वं मया मिथ्या स्वैरेष्वपि कदाचन |
न च युद्धे परावृत्तस्तथा सञ्जीवतामयम् ||१९||
यथा सत्यं च धर्मश्च मयि नित्यं प्रतिष्ठितौ |
तथा मृतः शिशुरयं जीवतामभिमन्युजः ||२२||
महाभारत भांडारकर प्रत – अश्वमेधिक पर्व - अध्याय ६८
अर्थ - “उत्तरे, माझे भाषण अन्यथा कधी होणार नाही; ते सत्यच होईल... मी आजवर कधी थट्टेनेही असत्य भाषण केले नाही, ब्रह्मचर्य व्रताचे निष्ठेने पालन केले आहे, कधी युद्धांत पाठ दाखविली नाही. तरी त्या पुण्याने हा बालक जीवित होवो ! सत्य आणि धर्म जर माझ्या ठायीं असतील तर हा अभिमन्यूपुत्र जीवित होवो !!!”
इथे ब्रह्मचर्य व्रताचे पालन आणि सत्यनिष्ठा हे शब्द सर्व काही सूचित करणारे आहेत. त्यामुळे आणखी काही पुरावे द्यायची आवश्यकता मला तरी वाटत नाही ! वाचक सुज्ञ आहेत !!!


आता ब्रह्मचर्य म्हणजे काय ???
माझ्या हनुमान जयंतीच्या लेखातही मी ब्रह्मचर्य ही संकल्पना स्पष्ट अर्थासहित शब्दबद्ध केली आहे. पुनश्च एकदा स्पष्ट करतो. ब्रह्मचर्य हे दोन प्रकारचे असते
१. उपकुर्वाण ब्रह्मचर्य – आजीवन अखंड ब्रम्हचारी राहणे आणि अष्ट म्हणजे आठ प्रकारच्या मैथूनांपासून सदैव दूर राहून आपले चित्त सदैव सत्कर्मात आणि सद्विचारात मग्न ठेवणे. आता जे आठ प्रकारचे मैथुन कोणते?
 अष्टप्रकार मैथुन-(दक्षस्मृति अ० ७ श्लोणक ३१-३२ ।)
‘श्रवणं स्मरणं चैव दर्शनं भाषणं तथा ।
गुह्यवार्ता हास्यरती स्पर्शनं चाष्टमैथुनम्’ ॥

२. गार्हस्थ्य ब्रह्मचर्य – विवाह करून देखील केवळ स्वस्त्रीशीच व तेही केवळ रतीकाल प्राप्त झाल्यावर केवळ दोन रात्रीच रत होणे. केवळ दोन रात्री कोणत्या ह्यांचे सविस्तर वर्णन महाभारतातच भीष्माचार्यांच्या मुखातून धर्मराज युधिष्ठीर ह्यांनी श्रवण केले आहेत जे शांतिपर्वात आहे ! जिज्ञासूंनी ते वाचावे किंवा मनुस्मृती वाचावी किंवा महर्षी दयानंदांचा ‘संस्कार विधी: हा ग्रंथ वाचावा ही नम्रतेची विनंती !!!

हा ब्रह्मचर्याचा तसाही वरवरचा अर्थ आहे ! मुल अर्थ फार व्यापक आहे. पण विस्तारभयास्तव इथे देत नाही.
आपल्या सभोवतालची जनावरे देखील केवळ रतीकालातच स्त्रीगमन करतात आणि आम्ही मनुष्य मात्र??? बोलायलाच नको !!! 


मग आता पुराणांतल्या कथांचे काय ???
मी वरच सांगितले आहे की मला महाभारत प्रमाण आहे, पुराणे नाहीत ! ह्याचा अर्थ आम्ही पुराणे पूर्णतःच नाकारतो असे नसून ती जितकी उपरोक्त महाभारत वचनांस अनुकूल आहेत तितकीच स्वीकारतो !!! तरीही ज्यांना पुराणातल्या कथांवरून श्रीकृष्ण चंद्रांवर आक्षेप घ्यायचे आहेत त्यांनी पुराणांत वर्णिलेल्या त्यांच्या चमत्काराच्या सर्वच कथा मान्य करायला हव्यात ! अन्यथा केवळ आपल्याया सोयीचे तेवढे उचलणे ही पुरोगामी हिंदुद्वेष्टी आणि शी-क्युलर उचलेगिरी थांबवावी !!! एवढे सांगणे पुरेसे आहे!!!

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्येषु !!!
© तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com