Thursday, 11 February 2016

वेदांतील गणपती - आक्षेप नि खंडण

वेदांतील गणपती - आक्षेप नि खंडण

आज गणेश प्रकट दिन ! जयंती हा शब्दप्रयोग चुकीचा आहे कारण जे ईश्वरतत्व आहे ते अंत कसे होईल? जे नियम आम्हां मर्त्य मानवांना लागु पडतात ते गणपतीसारख्या ईश्वरांस कसे लागु होतील? त्यामुळे फार तर प्रागट्य असा शब्दप्रयोग अगदी उचितच आहे व त्यास काही प्रत्यवाय नाही. असो तर ह्या पावन दिनी गणरायांवरच्या काही तर्कहीन आक्षेपांचा विचार व त्यांचं खंडण करुयात.

आक्षेप
१. गणपती ही पौराणिक देवता, ती वैदिक नाही म्हणे - एक तर्कहीन व दुष्ट आक्षेप
२. तो विघ्नहर्ता नसून विघ्नकर्ता आहे म्हणे - दुसरा आरोप

पाश्चिमात्यांच्या अंधानुकरणामुळे भारतीय विद्वानांचीही मतीही कशी गुंग झाली आहे हे ह्याचं उदाहरण ! सर्वसामान्यांचं तर सोडूनच द्या !

पण काही टुकार लेखक आपल्या भिकार बुद्धीमापनाने वेदांचा अभ्यास करतात व स्वत:ला वैदिक पंडित समजतात. अर्थात ह्यामागे त्यांचा स्वार्थ असतो ही गोष्ट वेगळी ! कारण हिंदुधर्माला तसेही शत्रु काही कमी नाहीत ! असो !

खरंतर अगदी साधं अथर्वेदातलं अथर्वशीर्ष पाहिलं तरी लक्षात येतं की ते वेदांतलंच आहे. जे अथर्वशीर्ष रोज म्हटलं जातं, तेच अथर्ववेदांतलं आहेच हे ह्या लोकांच्या कसं लक्षात येत नाही. त्यामुळे गणपती ही पौराणिक देवता आहे व ती वेदांत नाहीच असा जो बालिश तर्क व आक्षेप घेतला जातो तो किती निराधार नि हास्यास्पद आहे हे आपल्याला दिसून येईल. आता आपण प्रत्यक्ष वेदांचीच प्रमाणे पाहुयांत !


ऋग्वेद :- द्वितीय मंडल - २३ वा अध्याय - १ ली ऋचा (२.२३.१) व ५वी, ९वी, ११वी, १७वी व १९ वी ऋचा

ह्या सर्व ऋचा ह्या ब्रह्मणस्पती सुक्तातल्या आहेत. हे ब्रह्मणस्पती सुक्त म्हणजेच गणपतीचं सुक्त आहे.

ही १ली ऋचा खालीलप्रमाणे आहे.
ऋषी - गृत्समद, भार्गव, शौनक
छंद - जगती
देवता - ब्रह्मणस्पती

ॐ गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कविनामुपमश्रवस्तमम् !
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आ न: शृण्वन्नूतिभि: !

खरंतर हे पुर्ण सुक्त ब्रह्मणस्पती सुक्त नावाने प्रसिद्ध आहे.

हे ब्रह्मणस्पती सुक्त म्हणजेच गणपती सुक्त आहे हे त्यातील शब्दांवरून कळेल.
विशेषत: ह्या पहिल्याच ऋचेत गणपती हा शब्द स्पष्टपणे आलेला आहे एवढं वाचूनही जर अक्कल येत नसेल तर काय म्हणावं???

आता ऋग्वेद अष्टम मंडल, ८वं सुक्त पूर्ण
(ऋचा ८.८१.२ ते ८.८१.९ पुरावे)


आता ऋग्वेद दशम मंडल, ११२ वं सुक्त ऋचा संख्या ९वी व १०वी

ह्या ९व्या ऋचेत गणपतीचा स्पष्ट उल्लेख आहे. तो खालीलप्रमाणे
नि षु सीद गणपते गणेशु त्वामाहुर्विप्रतमं कवीनाम् !
न ऋते त्वत्क्रियते किॅ चुनारे महामर्कं मधुवंचित्रमर्चं !९वी ऋचा)

इथे "नि षु सीद" म्हणजे त्या गणेशाला तु इथे स्तुती ऐकायला येऊन बस असा अर्थ अभिप्रेत आहे.


आता ह्यापेक्षा आणखी काय संदर्भ हवाय???





तरीही गणपती हा वैदिक देव नाही असं ज्यांन म्हणायचं असेल त्यांनी खुशाल म्हणावं ! शेवटी झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला नव्हे ! नाही का???


आता दुसर्या आक्षेपाचं खंडण - म्हणे गणपती हा विघ्नहर्ता नसून तो विघ्नकर्ता आहे !

काही टुकार लेखक असं प्रतिपादन करतात की वेदांमध्ये अशा काही ऋचा आहेत की त्यात गणपती हा यज्ञांमध्ये विघ्न आणतो म्हणून त्याला दूर ठेवा असं प्रतिपादन आहे. खरंतर अशी एकही ऋचा आहे आम्हांस एकाही वेदांत आढळळेलं नाहीये. तरीही काही दीडशहाण्यांना फारच उत्साह असेल तर त्यांनी तशी मुळ ऋचा द्यावी ही विनंती व अकलेचे तारे तोडावेत !


काहीजण महर्षी दयानंदांचा संदर्भ देतात

ह्याला म्हणतात स्वार्थी प्रवृत्ती किॅवा पढतमूर्खता ! एरवी दयानंदांचं भाष्य ह्यांना अजिबात मान्य नसते कारण दयानंदांनी वेदांवरच्या सर्व विकृत आक्षेपांचं, अगदी सायणाचार्यांपासून ते मॅक्सम्युलरपर्यंतच्या सर्व आक्षेपांचं साधार नि सप्रमाण खंडण नि मंडण केलंय. गोमांसभक्षण, सोमरस म्हणजे मद्य ह्या नि असल्या टुकार आक्षेपांचं खंडण दयानंदांनी १५० वर्षांपूर्वीच केलंय ! पण एरवी दयानंदांना प्रमाण न मानणारे लोक इथे मात्र दयानंदांना लगेचच पुढे करतात.

आता दयानंद नक्की काय  म्हणताहेत ते पाहु

दयानंदांचा विरोध गणपतीच्या मूर्तीपुजेला आहे पण गणपती देवतेला नाही. गज म्हणजे हत्तीच्या रुपातल्या गणेशाला किॅवा कोणत्याही साकार रुपाला दयानंद विरोध करतात.

दयानंदांनी मूर्तीपुजा अर्थात साकार नि सगुण पुजा नाकारली व अनेकेश्वरवाद नाकारून वेदांमध्ये एकेश्वरवाद आहे असं प्रतिपादन केलंय हे खरंय ! पण ह्याचा अर्थ अगदी शब्दश: घ्यायचा म्हटला तर ह्याच वेदांत "एकं सत्विप्रा: बहुधा: वदन्ति" अश्या ऋचा आढळतात. त्यामुळे ईश्वरतत्वाला अनेक स्वरुपात जाणणं किॅवा पाहणं हे काही वेदविरुद्ध होत नाही. अगदी साकार रुपात पाहणंही काही निंदनीय नाही.

खरंतर मूर्तीपुजेच्या बाबतीत आमच्या महाराष्ट्रीय संतांनी केंव्हाच सिद्धांत मांडले आहेत

"सगुणाचेनि आधार निर्गुण पाविजे" असं म्हणणारे किॅवा "तुज सगुण म्हणु की निर्गुण रे ! तु सगुण निर्गुण गोविॅदु रे" असं म्हणणारे आमचे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय असतील किॅवा "वेद अनंत बोलिला ! अर्थ इतुकाचि घेतला ! विठुरायांसी शरण जावे !" असं म्हणणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय असोत ! संताना वेद महिमा कळला नव्हता असं का आपणांस वाटतं??? जर नसता तर त्यांनी इतक्या ठामपणे हे का प्रतिपादन केलं असतं??? त्यांना निर्गुण निराकार-सगुण साकार कळत नव्हतं का???

त्यामुळे मूर्तीपुजेत काहीच दोष नाही, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

त्यामुळेच गणरायांवरच्या ह्या टुकार आक्षेपांचं खंडण इथे संपलं !

विनंती एकच आहे की ह्याच आक्षेपकांनी ह्याच बुद्धीच्या देवतेला शरण जाऊन आपली बुद्धी सुधरावी !

कारण तो गणराय आपणांस नक्कीच सद्बुद्धी प्रदान करेल !

तेंव्हा आपणांस गणेश प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

गणपत्ती बाप्पा मोरया ! मंगलमूर्ता मोरया !!!



Sunday, 7 February 2016

सामाजिक क्रांतीसाठी किॅवा पुनरुत्थानासाठी किंवा समरसतेसाठी धर्म नष्ट करण्याची आवश्यकता नाही. धर्म हा हवाच हवा !



धर्मावर हल्ले चढवून किंवा त्यांची निॅदा करून किंवा तो नष्ट करण्याची भाषा करून सामाजिक पुनरुत्थान किॅवा समरसता किंवा एकात्मता किंवा समानता येईल असे आम्हांस तरी वाटत नाही. हिॅदुस्थानच्या स्वातंत्र्यचळवळीचा अभ्यास केला तर असे काही गट अभ्यासायला मिळतात की ज्यांना ह्या देशात आधी सामाजिक क्रांती व मग नंतर राजकीय स्वातंत्र्य हवे होते. दुसरा एखादा गट असा होता की ज्याला आधी राजकीय स्वातंत्र्य व मग नंतर सामाजिक क्रांती हवी होती. पण एक वर्ग व तोही अपवादत्मक असा होता की ज्याला ह्या दोन्ही गोष्टी साध्य करणे एकाच वेळी आवश्यक वाटत होते व त्यादृष्टीने तो तितका कृतीशील व यशस्वी वाटचाल करणाराही होता. अशांत हिंदुह्रदयसम्राट तात्याराव सावरकरांचं नाव आग्रहाने घ्यावं लागेल. कारणे खालीलप्रमाणे

"हिॅदुंचा हिॅदु राहूनच त्याची अस्पृश्यता गेली पाहिजे, हेच आमचे ध्येय आहे."

इति कृतिशील समाजोद्धारक हिॅदुह्रदयम्राट तात्याराव सावरकर 

आता ज्या सावरकरांनी अस्पृश्योद्धाराचं एवढं अलौकिक कार्य रत्नागिरीत करून दाखविलं व तेही स्थानबद्धतेत असूनही, ते सावरकर आपल्या ह्या अस्पृश्यता चळवळीच्या हेतुबद्दल काय म्हणतात ते वर स्पष्ट केलंय. थोडक्यात म्हणजेच अस्पृश्योद्धारासाठी किॅवा सामाजिक पुनरुत्थानासाठी किॅवा समरसतेसाठी किॅवा सामाजिक क्रांतीसाठी हिॅदुधर्मास सतत शिव्या घालून व वेगळा धर्म निवडून जाण्याची आवश्यकता त्यांना वाटली नाही. व हेच त्यांच्या चळवळीचे व एकुणेक सामाजिक क्रांतीच्या योगदानाचे व श्रेष्ठतेचे व वेगळेपणाचे द्योतक आहे. जर ते तसे नसते तर महर्षी विठ्ठल रामजी शिॅदेंनी सावकरांच्या अस्पृश्योद्धारासंदर्भात खालील उद्गार का काढले असते? 

१९३७ च्या मे महिन्यात महर्षी विठ्ठल रामजी शिंदे सावरकरांच्या सामाजिक क्रांतीबद्दल म्हणतात 

"सामाजिक क्रांतीपुरतेच सावरकरांचे कार्य मर्यादित राहिले असते तर आणखी पाच वर्षांच्या आत सार्या हिॅदुस्थानमधून अस्पृश्यतेचे साफ उच्चाटण करून दाखवले असते. त्यांचं हे कार्य पाहून माझे ह्रदय भरून आले आहे. परमेश्वराने माझे अर्धे आयुष्य सावरकरांना ह्या कार्यासाठी द्यावे !"

इति महर्षी विठ्ठल रामजी शिंदे


हेच उद्गार त्यांनी आंबेडकर किंवा शाहु महाराजांच्या सामाजिक क्रांतीबद्दलच्या चळवळीबद्दल का काढले नाहीत??? पाचच्या ठिकाणी दहा किंवा पंधरा वर्षे लागावीत पण त्यांना हे करून दाखविता आले असते, असे ते का म्हटेल नाहीत??? ते केवळ सावरकरांच्याच बाबतीत हे का म्हटले???

ही गोष्ट आम्हांस नक्कीच विचार करायला लावणारी आहे व सुज्ञांनी अगदी निरपेक्षपणे व डोळे सताड उघडे ठेऊन ह्याचा विचार करायला हवा.

थोडक्यात आम्हांला हेच सिद्ध करायचे आहे की अस्पृश्यता किॅवा तत्सम अनिष्ट चालीरीती किंवा विकृतींशी लढण्यासाठी स्वधर्मांवर म्हणजे हिॅदुधर्मावर शतघ्नी (तोफ) डागण्याची आवश्यकता सावरकरांना तरी त्याकाळी वाटली नाही व आजही जरी अस्पृश्यता वगैरे नसली तरीही इतर सामाजिक समरसतेसाठी आज धर्म नष्ट करण्याची आवश्यकता आहे असे आम्हांस तरी वाटत नाही. 

अर्थात इथे एक मुद्दा आधीच स्पष्ट करणे आवश्यक आहे की ह्या लेखातून आम्ही शाहु-आंबेडकरांच्या चळवळीचा व त्यांच्या एकुणेक समाजोत्थानाच्या कार्याचा व त्यांनी तत्कालीन घेतलेल्या त्या अलौकिक अशा व्रताची कुठेही निंदा करत नाही आहोत किॅवा तिला दूषणे देऊन तिचे महत्व सावरकरांच्या सामाजिक क्रांतीशी तुलना करून कमी करण्याचा प्रयत्नही नाही करताहोत. आम्हांला केवळ हेच सिद्ध करायचं आहे की हिॅदुस्थानात तत्काळी किॅवा आजही सामाजिक पुनरुत्थानासाठी जी काही चळवळ किॅवा एकुणेक संघर्ष उभा करायचा आहे किॅवा त्याकाळीही झाला असेल तो धर्माची निॅदा करुन किॅवा त्याचा त्याग करुन करणे अभिप्रेत नाही. त्याकाळी जर तो तसा करण्याचा आंबेडकर प्रभृतींनी प्रयत्न केला असेल तर तो आम्हांस स्तुत्य वाटत नाही व आम्हांस हेही वाटते की त्यांचा तो तसा प्रयत्न त्यांच्या किॅचित अपयशास काही अंशी कारणीभूत आहे. 

ह्यांस अपवाद फक्त शाहु महाराजांचा ! कारण त्यांनी जी काही सामाजिक क्रांती केली नि जो आदर्श उभारून दिला तो करत असताना त्यांनी हिॅदुधर्माची निॅदानालस्ती करण्याचा किॅवा तिचा त्याग करण्याचा कुठेही प्रयत्न केल्याचा दिसत नाही. उलट शाहु महाराज हे स्वत: कट्टर वेदानुयायी असल्याचे आपणांस त्यांच्या चरित्रावरून व पत्रव्यवहारातून स्पष्ट प्रतिपादन करता येते. ह्याबाबतीत पुरावाच द्यायचा म्हटला तर खालील देता येईल


राजर्षी शाहु छत्रपतींचे वैदिकधर्मावरचे प्रेम ! 👇

स्वत: शाहू छत्रपतींना वैदिक धर्म आणि स्थूल स्वरुपाची समाजरचना मान्य होती. त्यांचे एक पत्र यावर प्रकाश टाकते.

कोल्हापुरच्या विद्याविलासच्या संपादकांना लिहिलेले हे पत्र
(ता २३ मार्च १९२१)

"माझ्या मतासंबंधी बराच गैरसमज करण्यात येत आहे म्हणून माझे मत जनतेपुढे मांडण्याकरिता पाठवत आहे. 

सत्यशोधक, समाजिस्टांचा हलल माझेवर का?

ज्याप्रमाणे ख्रिस्त ,बुद्ध, थिऑसफी इ. पंथांची काही तत्वे मला मान्य आहेत त्याप्रमाणे सत्यशोधक समाजाची काहीतत्वे मला मान्य आहेत. 

मी सत्यसमाजिस्ट कधीही नव्हतो व नाही. 

हुबळीस ब्राह्मणेतर समाजाची बैठक झाली तेव्हा तेथील सत्यशोधक समाजाने मला पानसुपारीस बोलावले असता मी इतर संस्थांना जसा पाहुणा म्हणून तसा येईल असे सांगितले.

 मग मला सत्यशोधक का म्हणवले जाते? 

मला वेद मान्य असून, मी वेदास चिकटून रहाणारा आहे असे असता माझ्यावर हल्ला का ?

कळावे,
शाहू छत्रपती मुंबई !"


पुढे जाऊन हेच शाहु छत्रपती वैदिक धर्माबद्दल म्हणतात की 

"वैदिक धर्म विश्वव्यापी बनेल. ह्यादेशात भ्रातृभाव जागृत करणे हे आर्यांचे कर्तव्य आहे. देशाला जागृत करणारी रामबाण मात्रा वैदिक धर्मातच आहे.
कारण हिन्दूमात्राच्या अंत:करणात वेदाभिमान वसत आहे."

राजर्षी शाहु छत्रपतींचे चरित्र
धनंजय कीर - पृष्ठ क्रमांक ४५९

शाहु छत्रपतींना वैदिक धर्माबद्दल प्रचंड आस्था होती ! ते स्वत:ला कट्टर वैदिक म्हणवून घेत ! 

ते एकदा म्हणाले होते की

"मला जे काही शक्य झाले ते मी केले आहे. माझे जे कर्तव्य होते ते मी करून टाकले आहे. आता पुढील कर्तव्य सर्वस्वी तुमच्या हाती आहे. जर इतक्यावरही वैदिक धर्म प्रभावी झाला नाही तर आर्य प्रतिनिधी सभा व आपण हेच दोषी व्हाल"

पृष्ठ क्रमांक - ४५९ - राजर्षी शाहु छत्रपती - धनंजय कीर

ह्यावरून आमच्या म्हणण्याचा अर्थ वाचकांस लक्षात येईल.

थोडक्यात आम्हांस पुन्हा हेच सांगावेसे वाटते की सामाजिक पुनरुत्थानासाठी धर्म नष्ट करणे आवश्यक आहे असं ह्या शाहु छत्रपती व सावरकर प्रभृती दोन राष्ट्रपुरुषांस वाटत नाही हेच दिसते. ह्याबातीत आम्ही पुन्हा श्रीमद् स्वामी विवेकानंदांचाच सिद्धांत मांडतो म्हणजे आमच्या म्हणण्याचे मर्म वाचकांस लक्षात येईल

धर्म हीच भारतवर्षाची जीवनशक्ती - स्वामी विवेकानंद

धर्माला धक्का न पोहोचवता सर्वसामान्य जनतेची सर्वांगीण उन्नती - हे ध्येयवाक्य समोर ठेवा ! हिंदु समाजाच्या उन्नतीसाठी घर्म नष्ट करून टाकण्याची जरुरी नाही असे माझे ठाम मत आहे ! समाजाची सध्या जी अवस्था आहे ती धर्मामुळे आहे असं नव्हे तर सामाजिक व्यवहाराच्या बाबतीत ज्या तर्हने धर्माचा उपयोग करावयास हवा होता तसा तो केला गेला नाही म्हणूनच समाजाची आज अशी दशा झाली आहे ! जर धर्माला बाजुला सारून राजकारण, समाजकारण किंवा आणखी काहीतरी जीवनाचे केंद्र म्हणून किंवा राष्ट्राची जीवनशक्ती म्हणून स्वीकाराल तर याचा परिणाम हा होईल की तुमचा पूर्णपणे नाश होउन जाईल ! हा नाश जर टाळावयाचा असेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट, तुमची जीवनशक्ती जो धर्म, त्याच्या आधारेच केली पाहिजे ! 
(माझा भारत, अमर भारत - पृष्ठ क्रमांक ३१-३२)


"हिंदुंनी धर्म सोडता कामा नये ! मात्र धर्माला त्याच्या योग्य सीमेत ठेवुनच स्वत:ची उन्नती करून घेण्यासाठी स्वतंत्रता दिली पाहिजे ! भारतातील सार्या समाजसुधारकांनी जर कोणती भयंकर चूक केली असेल तर ती ही की त्यांनी पुरोहितांच्या अघोरीपणासाठी व सामाजिक अवनतीसाठी धर्माला जबाबदार ठरविले आणि हिंदु धर्मरुपी अभेद्य किल्ल्यावर हल्ला चढवून तो उध्वस्त करून टाकण्याचा त्यांनी चंग बांधला आणि याचा परिणाम काय झाला? - हाच की त्यांना अपयश आले ! बुद्धदेवांपासुन तो राममोहन राॅय यांच्यापर्यंत सर्वांनी जातिभेदाला धर्माचे अंग मानण्याची चुक केली आणि जातिभेदाबरोबर धर्मावरही आघात केला. व्हायचे तेच झाले - त्यांना अपयश आले !
( माझा भारत, अमर भारत - पृष्ठ क्रमांक ३३


आज सामाजिक समरसता किॅवा पुनरुत्थानाचे आवाहन करणार्यांना हे विचार स्वीकारार्ह्य का वाटु नयेत???

आता आंबेडकरांचे धर्माबाबतचे विचार पाहु

आंबेडकरांनी जरी सुरुवातीस हिॅदुधर्मांवर प्रचंड निंदा करून त्याचा त्याग करून बौद्ध पंथाचा (धर्माचा नव्हे) जरी स्वीकार केला असला तरी त्यांनीही धर्माची आवश्यकता मानलेलीच आहे. म्हणजे त्यांनी जरी काही ठिकाणी सुरुवातीस हिॅदु धर्माची प्रखर व अकारण अशी निंदा केलेली असली तरीही ते धर्माची आवश्यकता नेहमीच अधोरेखित करतात हेही तितकंच महत्वाचे आहे.

थोडक्यात आजकाल जी निधर्मीपणाची जी काही बोंबाबोंब सुरु आहे ती ह्या तीन राष्ट्रपुरुषांस तरी मान्य होती असे त्यांच्या समग्र साहित्याच्या अभ्यासावरून तरी वाटत नाही. जर तसं असतं 
त्यासंदर्भात विशेषत: आंबेडकरांचे खालील विचार पाहणे आवश्यक आहे.


आंबेडकरांना धर्म हवा होता ! त्यांची धर्म नष्ट करा अशी कुठेही धारणा नव्हती. बहिष्कृत भारत ह्या त्यांनी स्वत: सुरु केलेल्या वृत्तपत्रात ते म्हणतात.

"धारणात् धर्म इत्याहु: धर्मो धारयति प्रजा ही महाभारतकारांची व टिळकांची "प्रामाण्यबुद्धिर्वेदेषु साधनानाम् अनेकता उपास्यानाम् अनियम:" ही व्याख्यादेखील मला मान्य आहे. समाजाच्या धारणेकरिता घातलेली बंधने म्हणजे धर्म ही माझीदेखील कल्पना आहे."


पुढे तर ते अगदी स्पष्ट म्हणतात

"ख्रिस्ती व महंमद धर्माच्या सिद्धांतापेक्षा हिॅदु धर्माचा सिद्धांच कितीतरी पटीने समतेच्या तत्वाला पोषक आहे. माणसे ही ईश्वराची लेकरे, एवढ्यावरच न थांबता, ती ईश्वराचीच रुपे आहेत असे मोठ्या निर्भीडपणे हिॅदु धर्म सांगत आहे.
जेथे सारीच ईश्वराची रुपे आहेत तिथे कोणी उच्च कोणी नीच असा भेदभाव करणे शक्य नाही. हे त्या धर्माचे महान तत्व आहे, हे कोणासही नाकबूल करता यावयाचे नाही."

पुढे ते म्हणतात

"जेव्हा घर्माचे आचार त्या धर्माच्या विचारांशी विरोधी असतील तेव्हा तेव्हा धार्मिक आचारांमध्ये फेरबदल करून ते धर्माच्या तात्विक अंगांशी सुसंगत करून घेणे आवश्यक असते."


थोडक्यात, आंबेडकरांना पण हेच सुरुवातीस वाटत होते की धर्माचा त्याग न करताच त्यातील प्रथा किॅवा चालीरीतींत परिवर्तन करून समाजाची उन्नती साधावी. हे त्यांचं मत अगदी ग्राह्य वाटतं.

आता इथे एक गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे पुढे झालेले त्यांचं बौद्ध धम्म (पंथ) स्वीकार व त्यामागची भूमिका

आंबेडकरांनी मी हिंदु म्हणुन जन्माला आलो तरी हिंदु म्हणुन मरणारा नाही अशी घोषणा केल्याने अनेकांना असं वाटतं की ते हिॅदुद्वेष्टे होते. पण ह्याबातीत त्यांचे चरित्रकार धनंजय कीरांचे वाक्य फार सुचक आहें. ते आंबेडकर चरित्रात स्पष्टपणे म्हणतात

की ही घोषणा करत असताना त्यांचा स्वर सद्गदित झाला होता व त्यांच्या डोळ्यातून अश्रु वाहत होते.

म्हणजेच त्यांनी फार आनंदातिरेकाने किंवा फार द्वेषाने ही घोषणा केली होती असं निश्चितच नाही, हे धनंजय कीर देखील स्पष्टपणे उद्धृत करतात.

थोडक्यात केवळ नाईलाजास्तवच त्यांनी ही पंथांतराची घोषणा केली असावी असे आम्हांस वाटते. व त्यातूनही त्यांनी शेवटी बौद्ध का होईना पण हिॅदुधर्माचेच अपत्य असलेल्या पंथांचा स्वीकार करून शेवटी धर्मद्रोहीपणाचा किॅवा स्वत:स आजकालच्या फॅशनप्रमाणे निधर्मी दाखविण्याचा कुठेही अट्टाहास केला नाही हे स्पष्ट होते.


थोडक्यात आमचं सगळं म्हणणं आम्ही अगदी सोप्या भाषेत मांडतो

सेक्युलरिझमच्या नावाखाली निधर्मीपणा, सर्वधर्मसमभाव असले बाष्कळ शब्दप्रयोग करून जनतेला बावळट बनविण्यापेक्षा सामाजिक समरसता, समानता, एकता, आणायची असेल व समग्र हिंदु समाज एकसंघ टिकवायचा असेल तर त्यासाठी धर्म नष्ट करण्याची आवश्यकता नसून त्यातल्या अनिष्ट प्रथांना किंवा तत्सम चालीरीतींना फाटा देऊन कार्य करावे ही अपेक्षा आहे.


बहोत काय लिहिणे ! तुम्ही सुज्ञ असा !