Tuesday 3 October 2017

रावणाचे उदात्तीकरण कधी थांबणार ???




न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् !
गीता
सर्वप्रथम सर्वांस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
काय विकृती वैचित्र्य आहे आपल्या देशात ! एकीकडे रामायण-महाभारत हे थोतांड आहे, काल्पनिक आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्यातलेच काही पात्रे घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी विकृतींचे उदात्तीकरण करायचे ! प्रतिवर्षी दसरा अर्थात विजयादशमी समीप आली की काही लोकांची कोल्हेकुई सुरु होते रावण उदात्तीकरण करण्याची ! एरवी रामायण काल्पनिक बरंका ह्यांनाच ! आणि दुर्दैव हे की सांप्रत समाज माध्यमांवर (सोशल मेडिया) वर तर स्वघोषित ब्रेकिंग इंडिया अभ्यासक आणि संशोधक इतके झाले आहेत की बोलायलाच नको. दुर्दैव हेच की सर्वसामान्य मनुष्य कधीच मूळ साहित्य वाचत नसल्याने तो सहजपणे ह्या भ्रमांस बळी पडतो ! म्हणूनच हा लेखनप्रपंच !
वस्तुत: हे सर्व करण्यामागे एक षड्यंत्र तर आहे हे वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आर्य-विरुद्ध अनार्य किंवा मूलनिवासी- बाहेरचे असला बालिश नि भंपक नि थोतांड सिद्धांत पुन:पुन: माथी मारून समाजमन भडकविणे व आपली पोळी भाजून घेणे. हेतुपुरस्सर बुद्धिभेद करणे व सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे हा आपला टीपिकल ब्रेकिंग इंडिया अजेण्डा राबविणे हा सर्वात महत्वाचा हेतु ह्या लोकांचा आहे. असो.
रावणाच्या उदात्तीकरणाची फैशन
म्हणे तो संयमी होता, त्याला पश्चाताप झाला होता, सीतेला त्याने कधीही स्पर्श नाही केला म्हणून तो श्रेष्ठ होता म्हणे, त्याने बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी कशाचीही पर्वा न करता रामाशी शत्रुत्व घेतले वगैरे (त्याचे भगिनी प्रेम म्हणे). वगैरे वगैरे !
आता शंभरातल्या ९८ वांनी आयुष्यात वाल्मीकि रामायण कधीच मुल संस्कृत आणि अनुवादही वाचला नसल्याने लगेचच असल्या संदेशांवर विश्वास बसतो आणि लोक लगेचच ते गावभर पसरवितात. अर्थात ह्यात त्यांचा दोष जरी नसला तरी म्हणूनच ह्या बुद्धीभेदाचे हा निवारण प्रपंच !

रावणासारखा बलात्कारी व पापी केवळ तोच !
अरण्यकांड अध्याय ३८ मध्ये मारीच राक्षसाने सीतेच्या अपहरणाचा निर्णय अत्यंत घातकी आणि कुलविनाश करणारा आहे असे एकदा सांगितल्यावर रावण परत लंकेस गेला. परंतु शुर्पणखेने त्यांस फूस लावून परत सीतेच्या लोभासाठी तिचे अपहरण परत करायला सांगितले. आणि ४० व्या अध्यायामध्ये पुन्हा तो मारिचाकडे गेल्यावर त्याने पुनश्च एकदा रामचंद्राची महती गाऊन परस्त्रीहरण हे जगातले सर्वोच्च पाप आहे आणि ते संपूर्ण कुलाचा नाश करील हे सांगूनही रावणाने त्याचे ऐकले नाही. अरण्यकांडा मध्ये हे सर्व संवाद आहेत. पण लोक कधीच वाचत नाही. बरं पुन्हा भविष्यात त्याला आजोबांनी, मंत्रींनी, बायकोने आणि सर्व भावांनी सांगूनही तो सीतेचा त्यागच करत नाही ह्याचे काय ??? रावणाने किती स्त्रियांवर बलात्कार केले ह्याची उदाहरणे रामायणात जागोजागी आहेत.
असा मनुष्य संयमी आणि विवेकी असू शकतो का ???

त्याला पश्चाताप झाला होता का ???
सर्वांनी सांगून आणि पुढे युद्धात सर्व हरवून आणि कुलाचा नाश बघूनही त्याला मरेपर्यंत पश्चाताप झालेला नाहीये. तरीही लोक काहीच्या काही फालतू लेख समाज माध्यमांवर फिरवितात. इथे जाताजाता एक सांगणे आवश्यक आहे की तो मृत्युशय्येवर असताना म्हणे रामचंद्राने ज्ञानार्जनासाठी लक्ष्मणांला त्याकडे पाठविले व त्यानेही त्यांस उपदेश केला वगैरे वगैरे कथा निव्वळ भंकप आहे, तद्दन असत्य नि निराधार. कारण एवढीच अक्कल आधी असती तर का ऐकलं नाही? सर्व कुलाचा नाश का केला???
ती कथा कुणीतरी रामचंद्रांचे महिमामंडन करण्यासाठीच घुसडलीय हे सिद्ध आहे. असो.

म्हणे सीतेला त्याने कधीच स्पर्श केला नाही ???
अरे मूर्खांनो, मग तिला त्याने लंकेस नेले कसे ??आपोआप गेली का ती ??? अरण्यकांड ४९वा अध्याय तिला कसे घेऊन गेला ते सांगतो.
वामेन सीतां पद्माक्षीं मूर्धजेषु करेण सः ।
ऊर्वोस्तु दक्षिणेनैव परिजग्राह पाणिना ॥ १७ ॥
अर्थ - त्याने डाव्या हाताने कमलनयनी सीतेच्या केसासहित तिचे मस्तक पकडले आणि उजवा हात तिच्या दोन्ही मांड्यांच्या पाठमागून खाली घालून त्या द्वारे तिला उचलले. ॥१७॥
ह्या स्पष्ट वर्णनाविषयी पाठकांनी आम्हांस क्षमा करावी पण सत्य सागणे आवश्यक आहे. ह्या पूर्ण अध्यायांत आणि आधीच्याही अध्यायात रावण किती काममोहित झाला होता हे अनेकवेळा लिहिले आहे. पुढेही पूर्ण रामायणांतच त्यांस अनेकवेळा कामांध म्हटलंय. पण हे लोक त्यांस संयमी म्हणतात ??? काहीही खोटे का पसरविता लोकहो ????

बहिणीवर प्रेम करणारा रावण आदर्श ???
गेली कित्येक वर्षे एक संदेश फिरतोय ज्यात एक मुलगी आपल्या आईला रावणासारखा भाऊ पाहिजे म्हणते. का तर म्हणे त्याने बहिणीच्या प्रेमाखातर हे सर्व केले ??? खरंतर त्याचं आंग्ल भाषेत सविस्तर नि सप्रमाण संवादात्मकच खंडण मी केंव्हाच केलंय. पण अशा पढतमूर्खांना विचारावंसं वाटतं की आपण रामायण कधी वाचले आहे का ? ह्याच रावणाने तिच्या नवर्याचा वध करून तिला विधवा केले होते हे किती जणांना माहिती ??? उत्तरकांडांत हा संदर्भ २३ वा अध्याय १८ वा श्लोक येथे आहे. तलवारीने त्याने तिच्या पतीचा वध केला आणि म्हणे बहिणीवर प्रेम ??? बरं हीच शूर्पणखा पुढच्या २४ व्या सर्गात रावणांला दोष देताना विलाप करते. हे असले बहीणीवरचे प्रेम??? वस्तुत: उत्तरकांड प्रक्षिप्त असले तरीही आधीच्या अरण्यकांडात ती विधवा आहे असे स्पष्ट संदर्भ आहेतच. मग तिला विधवा केलं कुणी???
त्यामुळे हे प्रेम वगैरे काही नसून त्याच्या मनात तिने भरविलेली ती सीतेविषयी ती अभिलाषा आणि वासना कारणीभूत आहे ! तो पूर्ण अध्याय नीट वाचला तरी कळेल. पण वाचणार कधी नि कोण???

रावण हा लंपटच होता हे तो स्वतः मान्य करतो
सीतेच्या अपहरणावेळी तो तिला म्हणतो की मी आजपर्यंत अनेक स्त्रियांचे अपहरण केले आहे. अरण्यकांड - अध्याय ४७
बह्वीनामुत्तमस्त्रीणामाहृतानामितस्ततः ।
सर्वासामेव भद्रं ते ममाग्रमहिषी भव ॥ २८ ॥
अर्थ - मी इकडून- तिकडून बर्याच सुंदर स्त्रियांना हरण करून आणलेले आहे. त्या सर्वांमध्ये तू माझी पट्टराणी बन. तुझे भले होवो. ॥२८॥
ह्याचा अर्थ काय ??? संयम कि लंपटपणा???

आता स्वतः मंदोदरी रावण मेल्यावर त्याविषयी काय म्हणते बघा 👇👇👇
क्रियतामविरोधश्च राघवेणेति यन्मया ।
उच्यमानो न गृह्णासि तस्येयं व्युष्टिरागता ।।
अर्थ - मी तुम्हाला आधीही सांगितले होते कि तुम्ही श्रीरामाशी वैर धरू नका पण तुम्ही माझे ऐकले नाही. आज त्याचेच फल आपणांस मिळाले आहे.
वसुधायाश्च वसुधां श्रियः श्रीं भर्तृवत्सलाम् ।
पतिव्रतायास्तपसा नूनं दग्धो ऽसि मे प्रभो ।।
अर्थ - सीता ही पृथ्वीपेक्षा क्षमाशील, समस्त संपदांची अधिष्ठात्री देवी आणि पतिव्रता स्त्री आहे. हे स्वामी निश्चयच आपण ह्या पतिव्रतेच्या तपाने भस्म झालेले आहात
सर्वथा सर्वभूतानां नास्ति मृत्युरलक्षणः ।
तव तावदयं मृत्युर्मैथिलीकृतलक्षणः ।।
अर्थ - ह्या जगात कुणीही अकारण मरत नाही त्यामुळे ही सीताच आपल्या मृत्यूचे कारण आहे. ह्यापेक्षा आणखी स्पष्टीकरणं हवंय???? पतीव्रतेच्या तपाने हे शब्द काय सांगतात???

काय तर म्हणे सीता रामांस पवित्र मिळाली हे रावणाचे श्रेष्ठत्व म्हणे !

कोण म्हटलं? रावण सीतेंस म्हणतो की जर तु मला प्राप्त झाली नाहीस तर मी तुला खाऊन टाकेन. काय होतो ह्याचा अर्थ??? ही धमकी संयमी पुरुषाची आहे का??? बरं तो नरमांसभक्षक होता हे अनेक ठिकाणी स्पष्ट केलंय. ही राक्षसवृत्तीची सर्व चिन्हे दृष्टिगोचर होतात रामायणांत.

बलात्कारी रावण व त्याचा शाप 👇
युद्धकांडातच १३ व्या सर्गामध्ये बलात्कारी रावणाने आपल्या आधीच्या बलात्काराची घटना व त्याला मिळालेला शाप कसा सांगितलाय ते बघा. रावणाने पुंजिकस्थला अप्सरेशी केलेला बलात्कार व त्याला मिळालेला ब्रह्मदेवाचा शाप
महापार्श्व निबोध त्वं रहस्यं किञ्चिदात्मनः ।
चिरवृत्तं तदाख्यास्ये यदवाप्तं पुरा मया ॥ १० ॥
अर्थ - महापार्श्व ! बरेच दिवस झाले, पूर्वकाळात एक गुप्त घटना घडली होती- मला शाप प्राप्त झाला होता. आपल्या जीवनांतील हे गुप्त रहस्य आज मी सांगत आहे, ते ऐक. ॥१०॥
पितामहस्य भवनं गच्छन्तीं पुञ्जिकस्थलाम् । 
चञ्चूर्यमाणामद्राक्षं आकाशेऽग्निशिखामिव ॥ ११ ॥
अर्थ - एक वेळ मी आकाशात अग्निशिखेप्रमाणे समान प्रकाशित होत असलेल्या पुञ्जिकस्थला नामक अप्सरेला पाहिले जी पितामह ब्रह्मदेवांच्या भवनाकडे जात होती. ती अप्सरा माझ्या भयाने लपत-छपत पुढे जात होती. ॥११॥
सा प्रसह्य मया भुक्ता कृता विवसना ततः । 
स्वयम्भूभवनं प्राप्ता लोलिता नलिनी यथा ॥ १२ ॥
अर्थ - मी बळपूर्वक तिचे वस्त्र उतरविले आणि हट्टाने तिचा उपभोग घेतला. त्यानंतर ती ब्रह्मदेवांच्या भवनात गेली. तिची दशा हत्तीद्वारा तुडवून फेकल्या गेलेल्या कमलिनी प्रमाणे झालेली होती. ॥१२॥
तस्य तच्च तथा मन्ये ज्ञातमासीन्महात्मनः । 
अथ सङ्कुपितो वेधा मामिदं वाक्यमब्रवीत् ॥ १३ ॥
अर्थ - मी समजतो की माझ्याकडून तिची जी दुर्दशा केली गेली होती ती पितामह ब्रह्मदेवांना ज्ञात झाली. यामुळे ते अत्यंत कुपित झाले आणि मला याप्रकारे बोलले- ॥१३॥
अद्यप्रभृति यामन्यां बलान्नारीं गमिष्यसि । 
तदा ते शतधा मूर्धा फलिष्यति न संशयः ॥ १४ ॥
अर्थ - आजपासून जर तू कोणा दुसर्‍या नारीशी बळपूर्वक समागम करशील तर तुझ्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील, यात संशय नाही. ॥१४॥
इत्यहं तस्य शापस्य भीतः प्रसभमेव ताम् । 
नारोहये बलात् सीतां वैदेहीं शयने शुभे ॥ १५ ॥
अर्थ - याप्रकारे मी ब्रह्मदेवांच्या शापामुळे भयभीत आहे म्हणून आपल्या शुभ शय्येवर वैदेही सीतेला बलाने चढवत नाही आहे. ॥१५॥
हा भेकड नि लंपट रावण आहे हे तो स्वत:च मान्य करतोय आणि काही लोक त्याला फार पराक्रमी समजतात. तो स्वत: स्पष्टपणे मान्य करतोय की तो सीतेला उपभोगिल तर त्याच्या मस्तकाचे शंभर तुकडे होतील. ह्या शापानेच तो घाबरला होता. आणि हे येडे लोक्स म्हणतात म्हणे सीतेवर त्याने काहीच अपकृत्य केलं नाही. सुधरा रे !
आणि वर तर स्वतः मंदोदरी रावणाच्या विनाशाचे कारण सीताहरण सांगते आहे. तरीही लोक त्याला संयमी आणि श्रेष्ठ म्हणत असतील अशा मूर्खांना काय म्हणावे ????

श्रीरामचंद्राने सीतेचा त्याग केला होता का???
नाही. कारण उत्तरकांड पूर्ण प्रक्षिप्त सिद्ध असल्याने ह्यावर सविस्तर भाष्य करायची आवश्यकताच नाही. अग्नीपरीक्षाही प्रक्षिप्तच आहे हे आम्ही आमच्या आधीच्या अनेक लेखांत सिद्ध केलंय. कधीतरी सविस्तर भाष्य करेनच. त्यामुळे तूर्तास विराम !
काही स्वयंघोषित ब्राह्मण लोकही सांप्रत रावणाचे तो ब्राह्मण होता म्हणून उदात्तीकरण करताना दिसतात तेंव्हा तर त्यांच्या बुद्धीची कीवच करावीशी वाटते. तो ब्राह्मण वगैरे जरी आधी असला तरी तो नंतर किती लंपट नि राक्षसी प्रवृत्तीचा, स्त्रियांना पळवून आणणारा, नरमांस खाणारा होता. अशा व्यक्तींस ब्राह्मण म्हणून कौतुकायचे??? असो.

रावण अनार्य मूलनिवासी होता म्हणे.
हा शब्द जरी ऐकला नि वाचला तरी खोखो हसायला होतं. कीव येते ह्या लोकांची. पण मूळातच रामायणांत त्याचा उल्लेख आर्य म्हणून आलेला आहेच. तो मेल्यावर त्याच्या अनेक पत्नी त्यांस आर्य म्हणून विलाप करतात. बरं तो स्वत: बिभीषणांस बहिष्कृत करताना अनार्यांची निंदा करतो. जर तो अनार्य असता तर अनार्यांची निंदा का करतो???
तरीही रावणाला अनार्य म्हणजे मूलनिवासी व रामाला आर्य म्हणजे परकीय हे दाखविण्याचे जे षडयंत्र सांप्रत सुरु आहे ते वेळीच हाणून पाडलं पाहिजे. अन्यथा...! असो.

असो तरीही काहींना अद्यापही रावणाचे उदात्तीकरण करायचे असेल तर खुशाल करावे ! शेवटी
नोलुकोप्यवलोकते दिवा किं सूर्यस्य दूषणं ???
किंवा झोपलेल्याला जागं करता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्याला??? असो.

भवदीय,
तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
Pakhandkhandinee.blogspot.com

3 comments:

  1. अभ्यासपूर्ण लेख

    ReplyDelete
  2. खुप महत्त्वपूर्ण आणि अभ्यासपूर्ण लेख आहे ताई

    ReplyDelete
  3. चांगले उत्तर,पुरव्यासहीत

    ReplyDelete