Friday, 20 October 2017

बळी वामनाची वास्तवकथा - असत्याचे वस्त्रहरण


धर्माचे पालन, करणे पाषांड खंडन !
हेंचि आम्हा करणें काम, बीज वाढवावें नाम !
तुकोबाराय

सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या पाडव्याच्या नैका: हार्दा: शुभाशया: ! 

एक असत्य सहस्त्रवेळा सांगितले की ते सत्य वाटायला लागते ह्या गोबेल्स तंत्राप्रमाणे एरवी सर्व धर्मेतिहास थोतांड असला तरी हेतुपुरस्सर प्रतिवर्षी दीपावली आली पाडवा आला की बळी वामनावताराची मूळची सूर्याची रुपक कथा, जी पुराणांनी अकारण ऐतिहासिक करून विपर्यस्त केली, त्या कथेंस आपल्या टीपिकल ब्रेकिंग इंडिया प्रक्रियेसाठी फोडा नि झोडा ह्या अनीतीसाठी तिचा विपर्यांस करून ब्राह्मण-विरुद्ध ब्राह्मणेतर, तथाकथित बहुजन, आर्य-अनार्य वाद पेटवित राहणे हे सांप्रतचे धंदे आपणांस समाजमाध्यमांतून तर नेहमीच पहायला मिळतात. त्यावर काहींनी तर म्हणे ग्रंथनिर्मितीही केली आहे.
वस्तुत: ह्या वामनाच्या कथेतल्या बळीराजाचा शेतकर्यांशी काडीमात्र संबंध नसताना तो जोडला जाऊन ह्या कथेतून ब्राह्मण वर्ग हा शेतकर्यांशीच द्रोही आहे असे ठासविण्याचा विकृत हेतु सांप्रत लेखनांतून सतत सुरु आहे. 

शेतकर्याला बळीराजा म्हणायचेच असेल तर त्यांचा संबंध भगवान श्रीकृष्णांचे थोरले बंधु बलराम दादांशी जोडायला हवाय ज्यांच्या हातात आपण सदैव हल म्हणजे नांगर पाहतो. त्यांची गदा हल म्हणजे नांगर ही प्रमुख आयुधे आहेत. पण हेतुपुरस्सर त्याचा संबंध बळी वामनाच्या कथेशी जोडून भेदनीती अवलंबिली जातीय, त्याचे खंडन करण्यासाठी ह्या कथेचा नेमका परामर्श घेण्यासाठी केलेला हा लेखनप्रपंच ! 

वामनावताराची पुराणांतली कथा ही मूळ वैदिक रुपक कथेचे ऐतिहासिक अलंकारिक रुपांतर आहे.

पुराणांतली कथा आम्ही इथे सांगत बसत नाही ती सर्वांस परिचित आहे. तेंव्हा ही कथा मूळची ऋग्वेदांतली पहिल्या मंडलातली २२ व्या १५४ व्या सूक्तांमधील ऋचेंवरून घेतली आहे, ज्यात तो सूर्य अर्थात विष्णु ह्या तीन गोष्टींना आपल्या तीन पाऊलांत व्यापतो. ज्यात ही तीन पाऊले म्हणजे दिवसाचे तीन सकाळ, सायंकाळ रात्र असे तीन भाग किंवा विश्वाचे पृथ्वी, आकाश पाताळ असे तीन भाग ह्या अर्थाने आहे. ही सूर्यकिकरणांनी व्यापिलेल्या ह्या तीन भागांची रुपक कथा ऋग्वेदामध्ये आहे. ह्या तीन पाऊलांत तो सूर्य अर्थात विष्णु सर्व विश्व व्यापितो. ते मूळ पाच मंत्र पाहुयांत.

अतो॑ दे॒वा अ॑वंतु नो॒ यतो॒ विष्णु॑र्विचक्र॒मे  पृ॒थि॒व्याः स॒प्त धाम॑भिः १६
इ॒दं विष्णु॒र्वि च॑क्रमे त्रे॒धा नि द॑धे प॒दं  समू॑ळ्हमस्य पांसु॒रे १७
त्रीणि॑ प॒दा वि च॑क्रमे॒ विष्णु॑र्गो॒पा अदा॑भ्यः  अतो॒ धर्मा॑णि धा॒रय॑न् १८
विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे  इंद्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ १९
तद्विष्णोः॑ पर॒मं प॒दं सदा॑ पश्यंति सू॒रयः॑  दि॒वी॑व॒ चक्षु॒रात॑तं २०
तद्विप्रा॑सो विप॒न्यवो॑ जागृ॒वांसः॒ समिं॑धते विष्णो॒र्यत्प॑र॒मं प॒दं २१

ह्या पाचही मंत्रांचा अर्थ सायण नावाच्या भाष्यकारानुसार सांगायचा तर विष्णूने अर्थात सूर्याने ह्या संसारास तीन पाऊलांनी व्यापिलं आहे. इथे सायणाचार्यांचे भाष्य आपण अभ्यासले तर इथे अकारण वामनावताराची मनगढन्त कल्पना केली आहे. वेदांमध्ये कोणत्याही अवताराची कथा नाहीये. पण पुराणांमध्ये ती आलीय. 
आता १५४ वं पूर्ण सूक्त पाहुयांत.
विष्णो॒र्नु कं॑ वी॒र्या॑णि॒ प्र वो॑चं॒ यः पार्थि॑वानि विम॒मे रजां॑सि  यो अस्क॑भाय॒दुत्त॑रं स॒धस्थं॑ विचक्रमा॒णस्त्रे॒धोरु॑गा॒यः
प्र तद्विष्णुः॑ स्तवते वी॒र्ये॑ण मृ॒गो भी॒मः कु॑च॒रो गि॑रि॒ष्ठाः  यस्यो॒रुषु॑ त्रि॒षु वि॒क्रम॑णेष्वधिक्षि॒यंति॒ भुव॑नानि॒ विश्वा॑
प्र विष्ण॑वे शू॒षमे॑तु॒ मन्म॑ गिरि॒क्षित॑ उरुगा॒याय॒ वृष्णे॑   इ॒दं दी॒र्घं प्रय॑तं स॒धस्थ॒मेको॑ विम॒मे त्रि॒भिरित्प॒देभिः॑
यस्य॒ त्री पू॒र्णा मधु॑ना प॒दान्यक्षी॑यमाणा स्व॒धया॒ मदं॑ति   उ॑ त्रि॒धातु॑ पृथि॒वीमु॒त द्यामेको॑ दा॒धार॒ भुव॑नानि॒ विश्वा॑
तद॑स्य प्रि॒यम॒भि पाथो॑ अश्यां॒ नरो॒ यत्र॑ देव॒यवो॒ मदं॑ति । उ॒रु॒क्र॒मस्य॒ हि बंधु॑रि॒त्था विष्णोः॑ प॒दे प॑र॒मे मध्व॒ उत्सः॑
ता वां॒ वास्तू॑न्युश्मसि॒ गम॑ध्यै॒ यत्र॒ गावो॒ भूरि॑शृंगा अ॒यासः॑ अत्राह॒ तदु॑रुगा॒यस्य॒ वृष्णः॑ पर॒मं प॒दमव॑ भाति॒ भूरि॑
ह्या सूक्ताचा संक्षेपांत अर्थ पहायचा म्हटला तर मी त्या विष्णूचे अर्थात सूर्याचे वर्णन करतो ज्याने तीन पाऊलांत समग्र विश्व व्यापिले आहे आकाशांस स्थिर केले आहे. ज्याने पृथ्वी, द्युलोक समस्त भूवनांस धारण करून ठेवलेलं आहे, ज्याने निर्माण केलेल्या औषधी, अन्नादिंनी मनुष्याचे पोषण होते, त्यांस मी वंदन करतो.

इथे विष्णु म्हणजे दुसरे कुणीही नसून तो सूर्य ह्या अर्थाने आहे. सूर्य तीन पाऊलांनी तीन भूवने व्यापितो ह्याचाच अर्थ विष्णूची तीन पाऊले आहेत.

आश्चर्य म्हणा किंवा शोकांतिका म्हणा

ह्या संपूर्ण मंत्रांमध्येच काय पण चारीही वेदांमध्ये कुठेही बलीचा साधा किंवा पुसटसा उल्लेखही नाहीये. नाही म्हणजे ना आणि ही. तरीही पुराणांनी ही मनगढन्त कथा का रचली त्यासाठी व्यासांचा नावाचा बळी अकारण का दिला हेच कळत नाहीये. असो त्यावर कधीतरी सविस्तर भाष्य करुच.

ऋग्वेदांतले आणखी काही मंत्र जिथे जिथे ह्या तीन पाऊलांच्या विष्णु म्हणजे सूर्याच्या तीन पाऊलांच्या कथेचा वामनावताराशी वरवरपाहता अर्थ प्रतिध्वनित होतोय असा भ्रम होतो. ऋग्वेद .११५.,.४९.१३,.१००.४८.१२.२७ ह्या सर्वांत अन्यत्र "उरुगाय", " विचक्रमे", उरुक्रम:, मिमान:,  रजसो विमान:, पार्थिवानि विममे आदि मंत्रांमध्ये देखील हेच विष्णुच्या त्रिपाद विक्रमाचे संदर्भ आहेत. अन्य तीन वेदांतले मंत्रही ह्याच प्रकारचे असून तिथेही विष्णुच्या अर्थात सूर्याच्या किंवा परमेश्वराच्या त्रिपाद विक्रमाचे वर्णन आहे. विस्तारभयास्तव ते वर्णित नाही.

आता भाष्यकारांचे अर्थ पाहुयांत.

स्कंदस्वामी नावाचे ऋग्वेदांवरचे सर्वात प्रथम भाष्यकार ह्याचा मुख्यत: इतिहासपरक गौणत: सूर्यपरक असा दोन्ही अर्थ करतात. इतिहासपरक अर्थ करताना ते  सप्तधाम अर्थात पृथ्वीचे सात द्वीप असा अर्थ करतात. .२७.२० ह्या मंत्राचा अर्थ प्रकट करताना स्कंदस्वामी सूर्यपरक अर्थ करतात त्यात विष्णु हा सूर्य असून जो प्रत्यही विक्रमण करतो उदय, मध्यान्ह अस्त ही त्याची तीन पाऊले आहेत असा रुपक अर्थ प्रकट करतात. ते तीन लोकांची आणखी कल्पना करताना अग्नीरुप पृथ्वीस, विद्युतरुप अंतरिक्षांस सूर्यरुप द्युलोकांस व्यापतो असे रुपक करतात. यजुर्वेदभाष्यकार उव्वट महीधर हे वामनावतारच मानतात. 
वेंकटमाधव हे भाष्यकार ह्या मंत्रांचा अध्यात्मपरक सूर्यपरक अर्थ करतात. त्यांच्या मते विष्णु हे परमपद यज्ञ असून सप्तछंद हे सप्त धाम आहेत, मनुष्यांच्या  कर्मांचे बंधन हे ह्या विष्णूचे खरे कर्म आहे. सूर्यपरक अर्थामध्ये ते विष्णूंस इंद्राचा नियोज्य सखा आकाशांत पसरलेले तेज हे परमपद असा अर्थ घेतात.
मुद्गल नावाचे भाष्यकार ह्याचा अध्यात्मपरक अर्थ करताना ईश्वरांस जगताचा पालक, रक्षक सांगतात. त्रेधा ह्या शब्दांवरून ईश्वर हा कर्ता, धर्ता संहर्ता रुपांत आहे हे सांगतात. गायत्र्यादि सात छंद हे सप्तधाम आहेत असा अर्थ ते करतात.

जिज्ञासूंनी ह्या तीन्ही भाष्यकारांचे भाष्य निम्नलिखित संकेतस्थलांवरून संग्राह्य करून प्राप्त करावे. करावे. https://archive.org/details/RigVeda31 इथे ते प्राप्त होईल.वेदहर्षी श्रीमत्स्वामी दयानंदांचा अर्थ 

वेदांवरचे  षड्वेदांगाना अनुकूल असे आजपर्यंतचे सर्वोत्तम भाष्यकार वेदादिधर्मशास्त्राविषयीच्या अनेक भ्रांतींचे निवारण करणारे वेदोद्धारक ऋषिश्रेष्ठ, ज्यांची पुण्यतिथी कालच अमावस्येंस झाली, ते आपल्या ऋग्वेद भाष्यामध्ये उपरोक्त मंत्रांचा अर्थ अध्यात्मिक करतात विष्णुंस संसारांत व्याप्त असण्याने निराकार परमेश्वराचे द्योतक मानतात. ते "त्रेधा निदधे पदम्" ह्या "विष्णुुपद" ह्याचा संबंध सृष्टीरचनेच्या संदर्भात लावताना परमेश्वर आपल्या पायांनी अर्थात प्रकृती, परमाणु आदि सामर्थ्याच्या अंशाने सर्व जगांस तीन स्थानांमध्ये धारण करतो असा व्यापक अर्थ करतात. 

निरुक्तकार यास्कांचा अर्थ 

षड्वेदांगापैकी एक प्रमुख अशा निरुक्तामध्ये विष्णुपद ह्या विषयांवर यास्कमूनीसुद्धा परमेश्वराने सृष्टी बनविताना तीन प्रकारची रचना दाखवितात असा अध्यात्मपरक अर्थच केला आहे. 

वेदमहर्षी श्रीपाद दामोदर सातवळेकर सुद्धा ह्या मंत्रांचा परमात्मपरक अर्थच लावताना परमात्मा सप्तधामांमध्ये अर्थात पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश, तन्मात्रा, महत्तत्व ह्या सात तत्वांत व्याप्त होऊन पराक्रम दर्शवितो असा अर्थ प्रकट करतात. सात्विक, राजस तामस ह्या तीन भेदांनी क्रमश: द्युलोक, अंतरिक्ष भूलोक हे तीन पाद अर्थात पाय आहेत असा अर्थ करतात. 

जयदेव शर्मा विद्यालंकार ह्यांनी देखील परमात्मपरक अर्थच केला आहे. जास्ती कशाला अहो परकीय अशा पाश्चात्य भाष्यकार मैक्सम्युलर, मैक्डौनेल, कीथ, ग्रिफीथ हे देखील विष्णूंस सूर्य मानूनच अर्थ प्रकट करताना आपल्याला दिसतात.


मग हे वामनाचे स्वरुप आले कुठून???

तर तैत्तिरीय संहितेमधून ..३१ येथून. ह्यानंतरच सर्व परवर्ती भाष्यकारांनी ह्याचा अर्थ अकारण वामनावताराची जोडला आहे.  अर्थात पुराणांनी अकारण बळीला मध्येच घुसडले आहे जे ह्या आधीच्या उपरोक्त ग्रंथांत कुठेही उल्लेखिलेले नाहीये.


वेदांवरचे व्याख्यानरुपी असे ब्राह्मणग्रंथांतील वर्णन

शतपथ ब्राह्मण ह्या ग्रंथामध्ये ह्याचा अर्थही विस्ताराने वर्णिताना विशुद्ध असा यज्ञपरक केला असून विष्णु हे यज्ञाचे स्वरुप असून यज्ञीय देवता असाही केला आहे. "वामनो हि विष्णुरास:" असे ... येथे शतपथामध्ये म्हटले आहे. "यो वै विष्णु: यज्ञ:" (...) येथे "विष्णुर्वैयज्ञ:" असे ऐतरेय, तांड्य, तैत्तिरीय ब्राह्मण गोपथ ब्राह्मणामध्येही म्हटलेलं आहे. 

निरुक्तामध्ये विष्णु शब्दाचा अर्थ पदार्थांमध्ये व्याप्त प्रविष्ट गुण अशा अर्थाने आहे. त्याची व्युत्पत्ती निम्नलिखित आहे.

विष्लृ- व्याप्तौ, विश-प्रवेशने, वि पूर्वक अशूङ्-व्याप्तौ धातु पासून हा विष्णु शब्द सिद्ध होतो. निरुक्तावर भाष्यकरताना दुर्गाचार्य, ज्याचे "निरुक्ताचे मराठी भाषांतर" नावाने भाषांतर इतिहासाचार्य राजवाड्यांचे बंधु वैजनाथ काशिनाथ राजवाड्यांनी केलंय, जे पीडीएफ उपलब्धही आहे, त्यातही सूर्य हाच अर्थ दुर्गाचार्य करतात. भगवद्दत्त रिसर्च स्कौलर शिवनारायण शास्त्री हे निरुक्तभाष्यकारही हाच अर्थ घेतात. 

शौनकाच्या बृहद्देवतेमध्ये सूर्याच्या नावांची व्युत्पत्ती सांगताना 
विष्णातेर्विशतेर्वा स्याद् वेवेष्टेर्व्याप्तिकर्मण: !
विष्णुर्निरुच्यते सूर्य: सर्वं सर्वान्तरश्च : !
.६९
अर्थ - विष्णु हा शब्द व्यापणारा ह्या अर्थाने विष्णूची त्या सूर्यस्वरुपांत व्याख्या केलीय जो सर्व काही सर्वव्याप्त आहे.

उपनिषदांमध्येही व्यापक परमात्मा असा अध्यात्मपरकच अर्थ आहेकाठक संहिता /, मैत्रायणी .२६, .१६, ., तैत्तिरीय .. येथेही हेच वर्णन आहे. म्हणजे उपनिषदे देखील हाच व्यापक अर्थ प्रकट करतात.


आता लौकिक साहित्यातला अवतारपरक अर्थ कुठे कुठे आहे ते पाहुयांत.

रामायणामध्ये, महाभारतामध्ये तीन वेळा, पुराणांमध्ये तर अतिरंजित असा आहे. अर्थातच तो प्रक्षेप आहे हे सिद्ध आहे. विस्तारभयास्तव आम्ही ते सर्व संदर्भ देऊ शकत नाही. जिज्ञासूंनी ते पहावेत. क्षमा. 

ह्या सर्वांच्या विवेचनाचा निष्कर्ष काय????

ऋग्वेदामध्ये कुठेही विष्णुसाठी वामन शब्दाचा प्रयोग नाहीये बळीचे नावही नाहीये ! आम्ही वरही सांगितलंय की बली हा शब्दही चारी वेदांच्या संहितांमध्ये नाही म्हणजे नाहीच. 

वैदिक साहित्यापासून पौराणिक साहित्यापर्यंत ह्या आख्यानाचे अर्थ किती बदललेले आहेत उत्तरोत्तर ते किती विकृत होत गेले आहेत हे आपल्या लक्षात येईल. त्यामुळेच वैदिक मंत्रावरून जे तसा अवतारपरक ऐतिहासिक अर्थ काढण्याचा प्रयत्न करतात ते सर्व लोक चूकीच्या दिशेवर आहेत हे सांगण्यांस कोणताही प्रत्यवाय नाहीये. 

वामन हे नाव त्याच्या रुपाची प्रेरणा कल्पना तैत्तिरीय संहिता ब्राह्मणग्रंथ, जे वेदांवरची व्याख्यानरुपी ग्रंथ आहेत हे आम्ही अनेकवेळा सांगत आलोय, त्या ब्राह्मणग्रंथांमध्येदेखील हे सर्व वर्णन केवळ आख्यानस्वरुपाने आलंय. कारण ब्राह्मणग्रंथांची शैली ही मूळातच आख्यानात्मक रुपकात्मक आहे. ती अलंकारिक आहेत्यामुळे त्यामध्ये ह्या वर्णनांत ऐतिहासिक पक्ष सिद्ध होत नाहीच नाही. आमच्या आधीच्या आचार्य शंकराचार्यांच्या लेखातही आम्ही वेदांमध्ये नित्यपक्ष सिद्ध केला आहे.आर्याक्रमण सिद्धांत सप्रमाण खोडणार्या एका मुख्यमंत्र्यांच्या ग्रंथांचा संदर्भ


डॉ. संपूर्णानंद हे नाव अनेकांनी ऐकलं असेल. ते उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री होते. अतिशय विद्वान मनुष्य ! त्यांनी
यह आर्योंका आदि देश है 
नावाने जो ग्रंथ लिहिलाय, त्यात पृष्ठ क्रमांक २०३ वर वैदिक आख्यान मांडताना ह्या कथेवर भाष्य करताना
सूर्य का पहिय्या विष्णु के तीन पाद ह्या शीर्षकाखाली ही पूर्ण वेदांतली कथा कशी रुपक कथा आहे पुराणांनी अकारण त्याचे कसे ऐतिहासिक रुपांतर करून विपर्यांस केलाय हे सविस्तर लिहिलं आहे. तो ग्रंथ पीडीएफ उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी तो वाचावा ही विनंती.


अंतिम निष्कर्ष 

पूर्वोक्त आख्यान हे दोन स्वरुपांत आपणांस पाहता येईल.
. प्रकृतीपरक अर्थात सूर्याच्या स्वरुपांत
. रुपक अलंकांरिक अर्थात परमात्मस्वरुपामध्ये

. ह्यात प्रकृतीपरक अर्थ घेणार्यांमध्ये निम्नलिखित भाष्यकार आणखी सांगता येतील.
अधिकांश भारतीय तथा पाश्चात्य भाष्यकार जसे यास्कमूनी, शाकपूणि, और्णवाभ, मेधातिथी, शौनक, स्कंदस्वामी, वेेंकटमाधव, लोकमान्य टिळक, मैक्सम्युलर, मैक्डोनल, कीथ, ग्रिफीथ, बेर्गेन, !
डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण त्यांच्या "इंडियन फिलॉसॉफी"ह्या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये ४९५ पृष्ठांवर सूर्यच अर्थ घेतात. डॉ. बलदेव उपाध्याय त्यांच्या "वैदिक साहित्य  और संस्कृती" ह्या ग्रंथामध्येही सूर्यच अर्थ घेतात. डॉ. एस एन दासगुप्ता देखील आदित्य असाच अर्थ घेतात (दि हिस्टरी एफ इंडियन फिलॉसौफी भाग द्वितीय, पृष्ठ ५३५). डॉ. रामचंद्र मजुमदार हे नामवंत इतिहासकारही सूर्याचेच प्रतीक असा अर्थ घेतात. 

. अध्यात्मपरक अर्थात परमात्मवाचक अर्थामध्ये महर्षि दयानंद, मुद्गल, जयदेव शर्मा विद्यालंकार, सातवळेकर, महर्षी अरविंदसुद्धा. 


मग आता पुराणांमधल्या वामनावताराच्या कथेचं काय???

तर ही कथा रुपक अर्थाने आहे हे स्पष्ट होत असून त्यात झालेली अत्युक्ती ही त्याज्य असून जरी ती स्वीकारायची म्हटली तरी ती ऐतिहासिक अर्थाने घेता अध्यात्मपरक रुपक अर्थाने घ्यावी हीच विनंती ! 

शेवटचे 

ज्या ब्रेकिंग इंडिया फोर्सेसना ह्यात ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर, आर्य विरुद्ध अनार्य, बहुजन वगैरे भिकार नि टुकार वाद रंगवायचे असतील त्यांनी ते खुशाल रंगवावेत द्वेष पसरवत राहावा. एरवी सर्व पुराणे, रामायणं महाभारत वगैरे तुम्हाला थोतांड असतं, काल्पनिक असतं. पण ह्याच तुमच्या कल्पनेतल्या कथांचा उपयोग स्वत:च्या विकृत मानसिकतेसाठी वारपण्याची धंदेवाईक कला तुम्हांसच यावी हो. कारण तुम्हाला तसेही काही काम आहेच कुठे??? समाज जोडायचा का की तो तोडायचा हे ठरविण्यांस वाचक सूज्ञ जिज्ञासू आहेत. जास्ती काही लिहित नाही.


तुका म्हणे सत्य सांगे, येवोत रागे येतील ते 
गुण अवगुण निवाडा, म्हैस म्हैस रेडा रेडा !
हा तो निवाड्याचा ठाव, खर्या खोट्या निवडी भाव !
अंगे उणे त्याचे बसे टाळक्यांत, काय करु म्हणे आम्ही धक्का खवंदासि लागतसे !
जगद्गुरु तुकोबाराय

अलमतिविस्तरेण बुद्धिमद्वर्य्येषु !

तुकाराम चिंचणीकर
पाखण्ड खण्डिणी
#बळी_वामन_वामनावतार_ब्राह्मण_ब्राह्मणेतर_भेदनीती_वस्त्रहरण